डिजिटल अर्काईव्ह

तुकोबांवर मराठीमध्ये विविध प्रवाहातील विविध लेखकांनी विविध प्रकारे चर्चा-चिकित्सा समीक्षा करणारे लेखन केले आहे. त्यातील प्रमुख पुस्तके वाचून "सत्य असत्याशी मन केले ग्वाही" या शीर्षकाचे पुस्तक जी.डी. पारेख यांनी लिहिले आहे, 'गोल्डन पेज पब्लिकेशन'कडून येत आहे. या पुस्तकाचे प्रकाशन 3 डिसेंबर 2025 रोजी, पुणे येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात न्या.ए.पी.शहा यांच्या हस्ते आणि लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. अभय टिळक प्रमुख पाहुणे असतील. या पुस्तकाच्या प्रस्तावनेतील काही अंश येथे प्रसिद्ध करीत आहोत.

आज एकविसाव्या शतकात पुन्हा एकदा घड्याळाचे काटे उलट दिशेने फिरू लागले आहेत. सत्तेचा सोपान गाठणे व राखण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या प्रयत्नांमुळे सामाजिक सौहार्द कमी होत चालले आहे. संविधान स्वीकारून ज्या समता, बंधुता, न्याय आणि मानवी प्रतिष्ठेच्या तत्त्वज्ञानाच्या आधारे भारताची पुरोगामी वाटचाल सुरू झाली होती, तिला जबरदस्त खीळ बसली आहे. राजकारण, अर्थकारण आणि धर्मकारणाची अभद्र युती झाली असून, बुद्धिप्रामाण्यवादाची व समाजसुधारणेची चळवळ मंदावली आहे, त्याला दुर्दैवाने संतांचा महाराष्ट्र, बुद्धिवंतांचा महाराष्ट्र आणि शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्रदेखील अपवाद राहिला नाही.

देशाच्या भवितव्याची काळजी वाटावी अशा अवनती व पुराणमतवादी विचारांकडे झुकलेल्या काळात 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही' हे निवृत्त न्यायाधीश आणि समाजवादी विचारांवर डोळस श्रद्धा बाळगणारे जी. डी. पारेख यांचे पुस्तक मराठी वाचकांच्या भेटीस येत आहे, त्याचे मी सहर्ष स्वागत करतो. पारेख यांच्या सदर पुस्तकलेखनाची प्रेरणा संत तुकारामांच्या 'बुडता हे जन, न देखवे डोळां, येतो कळवळा म्हणूनी...' या अभंगाप्रमाणे समाजचिंता व सामान्य जनांप्रति वाटणाऱ्या अपार करुणेतून मिळाली आहे.

लेखकाने तुकोबाचे काय झाले, हा प्रश्न स्वतःला विचारून त्याचे जे उत्तर शोधले आहे, ते म्हणजे प्रस्तुतचे चिंतनगर्भ व मर्मभेदक पुस्तक 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही' होय. त्याचे उपशीर्षक लांबलचक, पण अत्यंत अर्थवाही आहे, ते पुस्तकाच्या अंतरंगाचे सूचन करणारे आहे. 'भक्तीला नीतीचे वाहक बनवून मानवतेचा सोपान गाठू पाहणारा वारकरी रूपातील दार्शनिक' (ग्रंथ). काही शतकांची परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीत टाळमृदंग वाजवत 'विठ्ठल विठ्ठल !' आणि 'ग्यानबा तुकाराम' असा घोष करीत पायी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मनात भक्ती सदैव जागृत असते. पण आज हिंदुत्वाचे राजकारण करू पाहणारे व स्वतःला धारकरी म्हणवून घेणारे लोक तिला संकुचित, असहिष्णू आणि 'ब्राह्मणाळायचा' प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे वारकऱ्यांच्या मनातला संतांनी सांगितलेला मूळचा समतावादी-मानवतावादी आणि बंधुतेचा विचार पुन्हा जागा व्हावा, त्यावर जमा झालेली अनिष्ट, समाजात दुही निर्माण करणाऱ्या अमंगळ विचारांची पुटं काढून भक्तीला नीतीची जोड द्यावी, तिचे वाहक बनवावे आणि पुन्हा मानवतेचा सोपान गाठण्यासाठी प्रवृत्त करावं, या उद्देशाने जी. डी. पारेख यांनी मराठी जनांसाठी नव्याने ऊर्जःस्वल आणि मानवतावादी तुकारामाचे खरे दर्शन या पुस्तकाद्वारे घडविले आहे. अशा चिंतनपर पुस्तकाची आज महाराष्ट्राला फार गरज होती.

मी श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर समिती, आळंदीचा काही काळ विश्वस्त होतो, तेव्हा वारकऱ्यांतील काही माणसं धारकऱ्यांकडे आकर्षित होताना मी पाहिली होती. त्या वेळी ज्ञानेश्वरांच्या पालखीत त्यांना प्रवेश मिळणार नाही, हे कटाक्षाने पाहिले होते. पण या अनिष्ट बदलाची अशुभ चाहूल मला त्या वेळी लागली होती. एक लेखक व संत-साहित्यप्रेमी म्हणून 'पसायदान' हे मानवता, भूतदया व जगकल्याणाचे महन्मंगल स्तोत्र आहे. या भावनेतून 'पसायदान विचार साहित्य संमेलन' आळंदीला 2018 मध्ये तारा भवाळकर या विदुषी व स्त्री संतसाहित्याच्या अभ्यासिकेच्या अध्यक्षतेखाली भरवून माझ्या परीनं वारकऱ्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच प्रबोधनाचे काम अत्यंत प्रभावीपणे हे पुस्तक करणारे आहे. ते जे वारकरी वाचतील, त्यांना वारी-परंपरेचा मूळ बंधुभाव व सामाजिक समतेचा हेतू प्रकर्षाने पुन्हा एकदा जाणवेल. तुकाराम महाराजांचे कवित्व हे किती विद्रोही आणि समाजसुधारणेचे होते, याची प्रचिती येईल.

लेखक हे खऱ्या अर्थाने न्यायाधीश आहेत. न्यायिक धारदार तैलबुद्धीने तुकाराम गाथेचे वाचन-मनन-चिंतन केले आहे, पण त्याच वेळी मराठीत ज्यांनी तुकाराम साहित्याची चिकित्सा केली आहे, ते डॉ.आ.ह. साळुंके, सदानंद मोरे, कवी दिलीप चित्रे, समीर चव्हाण, देविदास पोटे आणि साक्षात विनोबा भावे यांचे लेखन चिकित्सक बुद्धीने वाचले. श्री.म. माटे, गं. बा. सरदार, भालचंद्र नेमाडे, म.वा. धोंड, वि.वि. शिरवाडकर आदी लेखकांचे तुकारामांचे लेखन नजरेखालून घातले. पण तुकाराम समजायला एवढे पुरेसे नव्हते. काहीतरी एक ट्रिगर पॉइंट हवा होता. तो दिला आजच्या सामाजिक सांस्कृतिक प्रदूषणानं, तसाच इंद्रायणी नदीनं. तिनं लेखकाला भक्ती आणि मानवी अनुभूती दिली आणि त्यांना खरा तुकाराम आकळला.

लेखकाचे काव्यमय भक्तिरसात चिंब झालेले मन आणि तैलबुद्धीने गाथेचा तसेच तुकारामांवर लिहिलेल्या महत्त्वाच्या ग्रंथांचा अभ्यास यांचा मनोज्ञ संगम या पुस्तकाच्या पानापानांवर वाचकांच्या प्रत्ययास येईल, अशी माझी खात्री आहे. तुकोबारायांचं कवित्व हे ज्ञान आणि भक्तीच्या परिपूर्ण संगमातूनच खऱ्या अर्थानं समजून येतं. त्याला तत्कालिक इतिहास व समाजजीवनाची साक्षेपी जोड दिली की, तुकोबा ज्या कालखंडाचे गोमटे अपत्य होते, तो कालखंड आणि त्याला दिलेला तुकारामांचा प्रतिसाद समजून येतो. पुन्हा लेखक तुकाराम दर्शन त्याच्या आकलनातून आजच्या सामाजिक-राजकीय प्रदूषित पर्यावरणाच्या निमित्ताने घडवत आहे, त्यामुळे आजचे सामाजिक वास्तव ताकदीने कथन करीत, त्यातून पुढे जाण्याचा मार्ग तुकारामांचे विचार दाखवणारा आहे, हेही सांगतो. आणि हे भक्तीला नीतीचे वाहक बनवून मानवतेचा सोपान गाठू पाहणारे वारकरी रूपातले दार्शनिक सफल व संपन्न होते.

भारतीय संतांनी, म्हणजे तामिळनाडूमधील तेरा अलवार संत आणि कर्नाटकातील बसवण्णांची चळवळ, उत्तरेतली कबीर, रईदास (रविदास), मीरा, नानक, रहीम, आदींची भक्तिचळवळ व महाराष्ट्रातली ज्ञानेश्वर-नामदेव ते निळोबाराय व्हाया तुकाराम, अशी वारकरी चळवळ पाहिली तर ती सामान्य जनांना जशी भक्ती शिकवणारी होती, तशीच ती विद्रोही व धर्मचिकित्सेची होती. या साऱ्या संतांचा पहिला विद्रोह वा बंड होते तो वेदांना विरोध करण्याचा. दुसरा विरोध होता संस्कृत भाषेला. तो आपापल्या भागातील सामान्य माणसं जी भाषा बोलत होते, त्यात काव्य रचून केला. जर भारतात संत झाले नसते, तर बहुजन समाजाला तत्त्वचिंतन, धर्मचिंतन आपल्या बोली भाषेत समजलंच नसतं. संतांनी तिसरा विरोध केला, तो जातिव्यवस्थेला - उच्च-नीचतेला. तो किती प्रखर होता, हे तुकारामांचं काव्य वाचलं की प्रत्ययास येतं.

विद्रोही तुकारामांइतकाच सामाजिक आणि व्यावहारिक रूपातला तुकाराम प्रस्तुत पुस्तकात लेखकाने विविध प्रकरणांत वेगवेगळ्या संदर्भात रेखाटला आहे. माणसाचं सामाजिक मन काय असतं, असं जर मला कुणी विचारलं, तर माणूस वाचणारा एक लेखक म्हणून माझं उत्तर आहे की, जगत असताना समाज व माणसं न्याहाळणं, त्यांचे भावविश्व समजून घेणे, समाजातील बदल व घडामोडींबाबत आणि इष्ट-अनिष्टतेबाबत व्यक्त होणं होय. तसंच, एकूण माणसानं जीवनात काय ध्येय ठेवावं, कसं वागावं, काय टाळावं व काय स्वीकारावं, याबाबत सजग असणं म्हणजे स्थूल मानानं माणसाचं सामाजिक रूप होय. या परिप्रेक्षात अभंगातून दिसणाऱ्या तुकारामाचे दुसरे रूप सामाजिकतेचे आहे. विद्रोही तुकारामांइतकेच सामाजिक तुकाराम विलोभनीय आहेत.

लेखकाने भालचंद्र नेमाडेंचे या सामाजिक तुकारामांबाबत जे मत नमूद केले आहे, ते अत्यंत समर्पक आहे. नेमाडे म्हणतात, 'वारकरी संप्रदायाने आपल्या उदार हृदयी भूमिकेने व सहानुभूतीने महाराष्ट्रात ब्राह्मणवादाचा पूर्ण पराभव केला. या संप्रदायाचा लोकशाहीवादी प्रभाव इतका परिणामकारक होता की, त्यामुळे जाती-जातींमधील बंधने तुटली आणि स्त्रियांना अधिक सन्मानाने जगणे शक्य झाले. तुकाराम हा मराठीतला भक्तिसंप्रदायाचा अस्सल प्रतिनिधी आहे.'

ग.त्र्यं. माडखोलकरांचा संदर्भ देत तुकारामांचे सामाजिक व्यक्तिमत्त्व लेखक अधोरेखित करतो. 'वारकरी संप्रदायात तुकारामांइतका स्वतंत्र प्रतिभेचा दुसरा आत्मज्ञानी व उद्गाता पुरुष ज्ञातच नाही. प्रसंगी देवालाही खडसावणारे त्यांचे बाणेदार निस्पृह व्यक्तित्व, हृदयाला झोंबणारी त्यांची आत्माविष्काराची भेदक शैली, अनुभवाच्या मुशीतून निघालेले त्यांचे रसरशीत बोल आणि बहुमताला न मानता आपल्या सदसद्विवेकबुद्धीला पटलेली प्रमेये सडेतोडपणे सांगण्याचे धाष्टर्थ्य इतर कोणाही संतकवीत आढळणार नाही. या दृष्टीने 'तुका झालासे कळस' हे त्यांच्याविषयी बहिणाबाईंनी काढलेले धन्योद्वार अगदी यथार्थ वाटतात.'

तुकाराम हे सत्यशोधक होते म्हणून प्रस्तुत पुस्तकात लेखक त्यांनी सत्यशोधनाची वाट आयुष्यभर चोखाळली, हे अधोरेखित करताना 'चित्त ठेवी ग्वाही। आणि कांशी चाड नाही। आपुल्या विचार करीन जीवाशी। काय या जनाची चाड मज ।' त्यातून त्यांच्या सत्यधर्माची प्रचिती येते. 'सत्य तोचि धर्म। असत्य ते कर्म। आणिक हे वर्म नाही दुजे। सत्य सत्ये देते फळ। नाही लागताचि बळ। तुका म्हणे लोपे। सत्याचिया घडती पाप।' हा सत्यधर्म तुकाराम 'सत्य हाच देव मानणाऱ्या महात्मा गांधींना आपला वाटला तर नवल नाही. 'मुझे तुकाराम बहोत प्रिय है।' हे त्यांचे उद्गार त्याची प्रचिती देतात.

तुकारामांचा प्रभाव त्यांच्या काळात जसा होता, तो आजही तेवढाच आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे तुकोबाराय हे माणसाचं मन जाणणारे आजच्या काळात ज्याला 'मानसशास्त्रज्ञ' म्हटलं जातं, तसे होते. रामदासांच्या 'मनाच्या श्लोकां'ची चर्चा होते व तेही मनाबाबत मूलभूत विचार मांडणारे आहेत. पण तेवढेच महत्त्वाचे भाष्य करणाऱ्या तुकारामांचा या अंगाने म्हणावा तितका विचार झाला नाही.

विद्रोही तुकाराम आणि सामाजिक तुकाराम ही आजही वारकऱ्यांसाठी तुकोबाची रूपे फारशी परिचित नाहीत. कारण वारकरी संप्रदायाला ब्राह्मणवादाने व अलीकडे हिंदुत्ववादी धारकऱ्यांनी बऱ्याच प्रमाणात हायजॅक केले आहे. आणि वारकरी संप्रदायाची सर्वसमावेशकता विसरून तो समता-बंधुता मानवता नाकारणाऱ्या हिंदुत्वाचे जाणतेपणाने वा अजाणतेपणानं वाहक बनला आहे. त्यांना विद्रोही तुकाराम आणि सामाजिक भाष्य करणारा तुकाराम समजून सांगणे आजचे सर्वांत मोठे आव्हान आहे. जी. डी. पारेखांचे हे पुस्तक त्या दिशेने एक दमदार आश्वासक पाऊल आहे.

'संत आणि संविधान' या पाचव्या प्रकरणातील विषयाकडे वाचकांचे लक्ष केंद्रित करायचे आहे. भारतातील ब्रिटिशकाळातील समाजसुधारणेची चळवळ ही संतसाहित्याच्या उपदेशाच्या आधारे चालवली गेली होती. कारण साऱ्या भारतीय संतांनी एकता, सहिष्णुता व शांततापूर्ण सहजीवनाची शिकवण दिली होती, हे लेखकाचे मत सर्वमान्य होईल असेच आहे. विनोबा भावे यांच्या मते, संतांनी भारतभर हिंडून प्रेमाचा प्रचार केला व त्यामुळे हे प्रेमसाम्राज्य भारतभर पसरले गेले. इतिहास संशोधक त्र्य. शि. शेजवलकर स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यत्रयी फ्रेंच राज्यक्रांतीशी जोडण्याऐवजी मराठी संतांशी जोडतात. एकनाथ म्हणजे समता, तुकाराम म्हणजे बंधुभाव आणि रामदास म्हणजे स्वातंत्र्य अशी मांडणी शेजवलकर करतात. लेखकाच्या मते, या मूल्यत्रयींचा खणखणीत आविष्कार असणारे तुकोबांचे अनेक अभंग आहेत. त्यांनी जातिव्यवस्थेवर कठोर प्रहार केले आणि अस्पृश्यता निर्मूलनाचा संदेश दिला, म्हणून त्यांच्या अभंगात सामाजिक न्यायाची पडछाया दिसून येते. एकूणच, संतसाहित्यामध्ये संविधानाची काही प्रमाणात बीजं आढळतात हे नक्की!

जी. डी. पारेखांचे 'सत्य असत्याशी केले मन ग्वाही' हे पुस्तक तुकारामांचे नवे परिपूर्ण दर्शन घडविणारे असून, आजच्या प्रदूषित सामाजिक व राजकीय दूषित पर्यावरणात तुकारामांच्या विचारांची प्रासंगिकता कितीतरी अधिक प्रमाणात जाणवणारी आहे.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लक्ष्मीकांत देशमुख ( 62 लेख )
laxmikant05@yahoo.co.in

भारतीय प्रशासकीय सेवेतील माजी अधिकारी, लेखक व बडोदा येथे २०१७ सालच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी