या प्रवासात सरकारी यंत्रणा त्यांना वेळोवेळी वेठीला धरते. रस्त्यावरची दुकानं बंद, गावात जायला बंदी, पोलिसी दंडुक्यांचा मार आणि सगळ्यात कहर म्हणजे प्रत्येक राज्याने बंद केलेल्या सीमा. स्वतःच्या गावाकडे जाणाऱ्या वाटा ठिकठिकाणी रोखून धरलेल्या. कधी विनवणी करून, तर कधी आंदोलनाचं हत्यार उपसून हे मजूर एक एक सीमा ओलांडत जातात. रस्त्यात मिळेल तो रानमेवा खात, प्राण्यांची शिकार करत पोट जगवण्याचा प्रयत्न करतात. मजुरांसाठी, सामान्यांसाठी असलेले टाळेबंदीचे नियम राजकीय पक्षांसाठी मात्र शिथिल होताना दिसतात. 'महामारीवर मात करण्यासाठी आपणच केलेले नियम धाब्यावर बसवून सत्ताधारी सर्रास सभा, रॅल्या काढत होते. कोविड गाइडलाइन, प्रोटोकॉल वगैरे फक्त मजुरांसाठी, गोरगरिबांसाठी, हातावर आणून पानावर खाणाऱ्या श्रमिकांसाठीच होता.
'ते पन्नास दिवस' ही पवन भगत यांची कादंबरी कोरोना महामारीमुळे जाहीर केल्या गेलेल्या लॉकडाउनची कथा आणि व्यथा सांगणारी कादंबरी. पवन भगत यांनी माणसामाणसांमधील मानुषता आणि अमानुषता यांचे प्रत्ययकारी चित्रण या कादंबरीतून घडवले आहे. कोरोनाकाळातील लॉकडाउनला सामोरे जाताना समाजातील प्रत्येक वर्गाची प्रतिक्रिया वेगवेगळी होती. हत्ती आणि सहा आंधळ्यांच्या गोष्टीप्रमाणे प्रत्येकाला हे लॉकडाउन आपापल्या दृष्टीकोनातून दिसले. डोळसांना मात्र त्याचे सर्वांग रूप प्रत्ययाला आले. सुस्थित वर्गाने या लॉकडाउनची मजा लुटली. वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवत, मनोरंजनात्मक बातम्या बघत दिवस घालवले. सर्वहारा वर्गाला मात्र या लॉकडाउनने माणसांतून उठवले आणि खऱ्या अर्थाने माणसांत बसवलेही. 'गुरुत्वाकर्षणाच्या मर्यादा ओलांडल्या की, देशादेशांतील सीमा अस्पष्ट होतात आणि या जगद्व्याळ विश्वातील आपले शून्यत्व आणि क्षुद्रत्व यांची जाणीव होते. ती या अंतराळवीरांनी अत्यंत अहंमन्य अशी व्यक्ती देशप्रमुख असतानाही व्यक्त केली.' (लोकसत्ता, 8 एप्रिल 2026, अग्रलेख : चंदा रे चंदा रे) अंतराळवीर जे म्हणतायेत की, गुरुत्वाकर्षणाच्या मर्यादा ओलांडल्या की, देशादेशांतील सीमा अस्पष्ट होतात; अगदी त्याचप्रमाणे कसंही करून फक्त जीव वाचवण्यासाठी माणूस धडपडायला लागला की, त्याच्या सगळ्या धार्मिक, सामाजिक समजुती कशा क्षुद्र ठरतात, ते या कादंबरीकाराने दाखवून दिले आहे. हे दाखवून देणे हे या कादंबरीचे आशयकेंद्र आहे तर कोरोना आणि लॉकडाउन हे निमित्त.
समोर 'अघटित' घडत असताना खऱ्या संवेदनशील माणसाला पडणारा प्रश्न 'मी गप्प कसा राहू?' पवन भगत नामक लेखकालाही पडतो. लेखक लिहितो, 'जेव्हा शोषकसत्ता एखादं षडयंत्र आखते तेव्हा आधारभूत नवसमाजाच्या निर्मितीसाठी झटणाऱ्या कलावंतांनी, कवींनी, पत्रकारांनी तिच्या विरोधात पुढे येणं गरजेचं असतं. मी तेच केलंय. हे काम करण्यासाठी मजुरांच्या काफिल्यांसोबत फिरून, काही नोंदी घेऊन, काहीएक आकलन मिळवलं आणि मग मी हा लेखनप्रपंच तुमच्या पुढ्यात ठेवतोय. पण, हा सगळा उद्योग तुमच्यासमोर ठेवताना मी आनंदी नाही. खरं तर या मजुरांच्या शोकांतिक प्रवासाचं कुणीही भांडवल करू नये, त्यांनी सोसलेल्या यातनांचा कुणी बाजारही भरवू नये. पण, मी ते केलंय. मला क्षमा नकोच! मी दयेला पात्र नाही हे मला ठाऊक आहे; पण मी जर हा बाजार तुमच्यापुढे ठेवला नाही, तर या दुःखाच्या नोंदी दुसरं कोण करणार? कलावंत म्हणून ते माझं काम आहे. ही अटळ जबाबदारी मी पार पाडली नाही तर इतिहास मला कसा माफ करेल?' (पृ. 6-7) लेखकाची ही अस्वस्थता हीच या कादंबरीची प्रेरणा आहे. लेखनामागची ही प्रेरणा साहित्याची इतिकर्तव्यता सांगणारी आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कादंबरीला 'प्रस्तावने 'ऐवजी जोडलेल्या एका टिपणात प्रकाशक म्हणतात, 'कादंबरीतली पन्नास दिवसांची कैफियत हजारो वर्षांच्या शोषक व्यवस्थेच्या संदर्भाना, तिनं रुजवलेल्या सांस्कृतिक मूल्यांना कठोरपणे प्रश्नांकित करते; त्याचबरोबर नव्या समतामूलक आनंदी जगाचं स्वप्न पाहण्याचा हक्कही शाबूत ठेवते. (पृ.10) हे सगळे व्यवस्थेचे संदर्भआणि सांस्कृतिक मूल्यं जीव तगवण्याच्या लढाईत कसे कुचकामी ठरतात, याचा प्रत्यय ही कादंबरी देते. याचा दुसरा अर्थ असा की, व्यवस्थेचे हे सगळे संदर्भ आणि मूल्यं माणसाने भरल्यापोटी स्थिरस्थावर अवस्थेत निर्मिलेले आहेत.
कोरोनाच्या कालावधीत अचानक टाळेबंदी पुकारली जाते; आणि महानगरातली हातावर पोट असणारी माणसे अक्षरशः बेघर होतात. खायला अन्न नाही, राहायला जागा नाही, खिशात पैसा नाही अशा कफल्लक अवस्थेत ही माणसे महानगरामधून आपापल्या गावचा रस्ता धरतात. बसेस आणि रेल्वे सगळेच ठप्प झाल्याने स्टेशनवर प्रचंड गर्दी होते. तुम्हा-आम्हाला घरात बसून टीव्हीवर फक्त ही गर्दी दिसली; पण या गर्दीत कोण कोण होते, ते लेखक आपल्याला गर्दीत शिरून दाखवतो. 'लहान मुलं, बायामाणसं, तरणीताठी, म्हातारीकोतारी, अपंग, आजारी, जेजे हॉस्पिटलात आलेले कॅन्सर पेशंट, नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी आलेली तरणी पोरं, कुणी नुसतंच शाहरुख खानला, तर कुणी मुंबई बघायला आलेलं, कुणी मंत्रालयात कामासाठी आलेलं, कुणी परीक्षा देण्यासाठी आलेलं, कुणी कंत्राटी मजूर असे सगळे आपल्या गावी जायला स्टेशनवर गोळा झाले होते. (पृ. 23-24) याच गर्दीत रामस्वरूपला पंडित ब्रिजमोहन मिश्रा आणि आरिफ शेख भेटतात. या तिघांची दिशा एक म्हणताना त्यांचे धागे जुळत जातात. कसंही करून त्यांना मुंबईतून बाहेर पडायचं आहे. रेल्वे आणि बसेस बंद म्हणताना ते पायीच गावाकडे निघतात. आता हजारो किलोमीटरची वाट त्यांना तुडवायची आहे. या तिघांचे प्रथम दर्शन वाचकाला घडते ते असे... 'या तिघांच्या फक्त बोली भाषेत साम्य होतं. बाकी खानपान, राहणीमान, बोलण-चालणं यांत बरंच अंतर होतं. तिघांच्या विचार करायच्या पद्धतीत अंतर होतं, जगण्याच्या पद्धतीत अंतर होतं, जात-धर्म यांत अंतर होतं. अंतर इतकं होतं की, लघवी करायच्या पद्धतीतही साम्य नव्हतं. कानात जानवं अडकवल्याशिवाय एक मुतायचा नाही, दुसरा वीट दगडाचा तुकडा हातात घेतल्याशिवाय मुतायचा नाही, तर तिसरा मुतल्यावर हातपाय न धुता तोंडात पाण्याचा घोटही घ्यायचा नाही. मनात मतभेद कायम ठेवून ओठांवर उसनं हास्य दाखवत ते एकमेकांच्या चालीरीतींवर आतून चिडत, चरफडत एकमेकांच्या सोबतीनं चालत होते. ते एकमेकांचं अन्नही खात नव्हते. (पृ.31) पुढे प्रवासाचा एक एक पडाव जसा जसा पडत जातो तसतसे या तिघांचे बदलत जाणारे रंग हा या कादंबरीचा मुख्य गाभा आहे. रामस्वरूप हिंदू मागास वर्गीय, पंडित ब्रिजमोहन मिश्रा ब्राह्मण; तर आरिफ शेख मुसलमान. असे हे काहीसे अमर, अकबर आणि अँथनीचे त्रिकूट सरकारी निर्णयांचा जाच सहन करीत, त्यावर चर्चा करीत बनारसच्या दिशेने चालू लागते. ते वाहनांचा शोध घेतात, वाहन मिळत नाही म्हटल्यावर पायीच चालत राहतात.
त्यांचा हा मुंबई ते बनारसपर्यंतचा पायी प्रवास पन्नास दिवस चालू राहतो, म्हणून 'ते पन्नास दिवस'. या पन्नास दिवसांत या तिघांसोबत वाचकांनाही तो प्रवास अनुभवायला मिळतो. या अनुभवातून एकेक वैश्विक सत्य त्यांना उमगत जाते. अशोक चक्रवाला निळा झेंडा हाती घेतलेल्या तरुणाने दिलेले अन्नाचे पाकीट हातात आल्यानंतरचा प्रसंग... 'त्या दलित चपात्यांना आपण हात लावायचा, त्या खायच्या? आपण तर अस्सल ब्राह्मण, गंगाकाठावरील पूजापाठी, कर्मकांडी वर्णव्यवस्था मानणारे, पक्के धार्मिक. रीतिरिवाज पाळणारे. आपण सनातन धर्माचे रक्षक आहोत. आपल्या धर्मग्रंथात शूद्रांच्या हातचं खाणं निषिद्ध मानलं गेलंय. त्यांची सावलीही आपल्याला निषिद्ध आहे. त्यांच्याच घरचं अन्न आपण कसं खायचं..? रामस्वरूपला पंडितजींची मनःस्थिती ध्यानात आलीच होती. तो त्यांना सरळ म्हणालाच, 'भूक लागलीय ना प्रचंड ? मग भुकेसमोर कुठली जात? कसली सनातन व्यवस्था आणि कुठला धर्म आणि कसले छापील धर्मग्रंथ ? भूक भेदभाव करीत नसते. भेदभाव माणसं करतात, धर्म करतो, जात करते. भूक ही कुणालाच सोडत नाही. ज्याला पोट आहे त्याला भूक असतेच. भूक उच्चनीच काहीच पाहत नाही, भुकेचं नातं फक्त आणि फक्त भाकरीशीच असतं. भाकरी श्रेष्ठ आहे. अहो घ्या ते. ही माणसंही देवाची लेकरंच आहेत ना? माझे म्हणणे इतकंच की, भूक हेच सनातन सत्य.' साला सब झूट! मिश्राजींचे डोळे निळ्या झेंड्यावरच्या अशोकचक्राकडे आणि चपातीच्या पॅकेटकडे बराच वेळ आळीपाळीने बघत राहिले. शेवटी विजय मात्र अशोकचक्राच्या चोवीस आऱ्यांचाच झाला. मिश्राजींच्या डोळ्यांतली आसवं त्याचा अंगरखा भिजवू लागली'. (पृ.35) पोटाची भूक हे किती सनातन सत्य आहे त्याचा प्रत्यय पुढे आणखी तीव्रतेने येतो. पंडितजी आणि आरिफ रामस्वरूपच्या पोटलीतील सुके मटनही खातात. तिघेही एकमेकांत मिसळत जातात.
हजारो मैल चालत निघालेला हा मजुरांचा तांडा अनेक सुखदुःखांच्या, नव्हे दुःखांच्याच प्रसंगांना सामोरा जात वाटचाल करतो. अनेक जण ट्रकखाली चिरडले जातात. कोणी रेल्वेखाली सापडतं; तर कोणी चालण्याच्या श्रमामुळेच या जगाचा निरोप घेतं. कोण होते हे मजूर?.. 'फक्त दोन वेळच्या भुकेची सोय करण्यासाठी हा मजुरांचा तांडा आपल्या घराला, गावाला अलविदा करत गाव सोडून हजारो किलोमीटर अंतरावर आला होता. या मजुरांना उंच गगनभेदी इमारतीत राहायचं नव्हतं की, स्वतःसाठी मोठमोठे आलिशान बंगले बांधायचे नव्हते. महागड्या गाड्या घेऊन त्यांना फिरायचंही नव्हतं. हा श्रमिकांचा तांडा आपले श्रम विकायला आला होता. कारचे टायर फुटू नये म्हणून सिमेंटचे, डांबरी रस्ते तयार करण्यासाठी हे मजूर आले होते. पूल बांधण्यासाठी हे मजूर आले होते. त्यांच्या श्रमाची किंमत जर रस्त्यावर बेवारसपणे पडून आलेला मृत्यू असेल तर, हा देश देश राहिला नव्हता, तर फार मोठी एक छळछावणी ठरू पाहत होता. (पृ.45).... अशा फक्त जगण्यासाठी बाहेर पडलेल्या या मजुरांच्या संदर्भात सरकार किती उदासीन होते, किती निष्वर होते आणि किती क्रूर वर्तत होते यावरही कादंबरीकाराने भाष्य केले आहे. 'यंत्रणा बेखबर, बिनघोर आणि बेमुर्वत झाल्या होत्या. पोलिसी दंडुकेशाही जिवंत होती. हा देश सायरनचा देश झाला होता. बॅरिकेट्सच्या लोखंडी कुंपणात नागरिक खुल्या कारागृहाप्रमाणे जगत होते. नागरी अधिकार संपुष्टात आले होते. 'वर्क फ्रॉम होम' म्हणजे सगळे घरातूनच काम करत होते. विरोधी पक्षाचे नेते सरकारवर घरातूनच तुटून पडत होते. सामाजिक कार्यकर्ते घरातूनच सामाजिक काम करत होते. रस्त्यावर जायला त्यांना बंदी होती. आपत्ती निवारण कायद्याखाली काही लोकांना पोलिसी कार्यवाहीला सामोरे जायला लागले होते. पत्रकार घरातूनच बातम्या देत होते. स्वयंघोषित महात्मे, संत, बाबा त्यांच्या वातानुकूलित आश्रमात होते. सगळं जग वर्क फ्रॉम होम करून थकलं होतं आणि फक्त मजूर रस्त्यावर होते... असाहाय्य !' (पृ.45) केवळ घाईत आततायीपणाने घेतलेला टाळेबंदीचा निर्णय अनेकांच्या जिवावर कसा बेतला त्याचे असे प्रवाही चित्रण कादंबरीत येते.
जातिधर्मावरून केला जाणारा भेदभाव काय असतो आणि तो कसा जिव्हारी लागतो, याचा प्रत्यय पंडितजींना या प्रवासात येतो. दुरून वाढलेले पाणी ओंजळीने प्यावे लागल्यानंतर 'त्यांचा ब्राह्मण्याचा दर्प, त्यांची घमेंड क्षणातच एका झटक्यात गळून पडली होती. पंडितजी अस्वस्थ होते, दुःखी होते. चालत चालत दोन किमी दूर मुख्य रस्त्यावर पोहोचले तरीही दुरून देण्यात आलेलं पाणी, ओंजळीनं प्यायलेला पाण्याचा प्रत्येक घोट त्यांना कडवट वाटू लागला होता. मळमळ होत होती. जनावरांना सन्मान आणि मी उच्च वर्णीय ब्राह्मण असूनही मला अमानवीय वागणूक, या विचाराने त्यांचं डोकं सुन्न आणि मन खिन्न झालं होतं. ते आतून पार हलून गेले होते. रामस्वरूपनं त्यांना सावरलं. मिश्राजींनी रामस्वरूपला जवळ ओढून आपल्या कवेत घेतलं आणि ते दोघेही ढसाढसा रडू लागले. त्या घटनेने डोळ्यांपुढची अंधारी जाऊन एकाच्या अंतर्मनाला जग अगदी स्वच्छ दिसलं होतं. दुसरा मनातला संताप बाहेर निघाल्यानं हलका झाला होता. आता ते कुठेतरी एका समान पातळीवर आल्यासारखे झाले होते. आरिफ अचंबित होऊन त्या दोघांकडे फक्त पाहतच राहिला. त्याला काहीच कळलं नव्हतं. (पृ.49) पुढे पुढे तर हे तिघे इतके एकरूप होत जातात की, आरिफच्या दाढीमुळे त्याच्यावर हल्ला होऊ शकतो या भीतीपोटी खुद्द पंडितजी त्याची दाढी आपल्या हाताने काढून टाकतात.
या प्रवासात सरकारी यंत्रणा त्यांना वेळोवेळी वेठीला धरते. रस्त्यावरची दुकानं बंद, गावात जायला बंदी, पोलिसी दंडुक्यांचा मार आणि सगळ्यात कहर म्हणजे प्रत्येक राज्याने बंद केलेल्या सीमा. स्वतःच्या गावाकडे जाणाऱ्या वाटा ठिकठिकाणी रोखून धरलेल्या. कधी विनवणी करून, तर कधी आंदोलनाचं हत्यार उपसून हे मजूर एक एक सीमा ओलांडत जातात. रस्त्यात मिळेल तो रानमेवा खात, प्राण्यांची शिकार करत पोट जगवण्याचा प्रयत्न करतात. मजुरांसाठी, सामान्यांसाठी असलेले ताळेबंदीचे नियम राजकीय पक्षांसाठी मात्र शिथिल होताना दिसतात. 'महामारीवर मात करण्यासाठी आपणच केलेले नियम धाब्यावर बसवून सत्ताधारी सर्रास सभा, रॅल्या काढत होते. कोविड गाइडलाइन, प्रोटोकॉल वगैरे फक्त मजुरांसाठी, गोरगरिबांसाठी, हातावर आणून पानावर खाणाऱ्या श्रमिकांसाठीच होता. सगळे राजकीय पक्ष, त्यांची नेतेमंडळी, त्यांचे कार्यकर्ते नावाचे बगलबच्चे लोक सभा, रॅल्या घेत होते. कोविडचे सगळे नियम तुडवत फिरत बिनधास्त होते. विशिष्ट धार्मिक, उत्तेजक घोषणा दिल्या जात होत्या. समाजात ध्रुवीकरण केलं जात होतं. 'आपले लोक आणि ते लोक' अशी भाषा, कुजबुज यंत्रणेकडून सुरू झाली होती. रामाच्या, महाकालेश्वराच्या, कुराणाच्या शपथा दिल्या घेतल्या जात होत्या. जात, समाज आणि पंथांची गणितं नव्यानं मांडली जात होती. मोर्चे निघत होते. अफीम, गांजा, दारूची बरसात होत होती. राज्यात आपल्याच पक्षाची सत्ता कशी आणता येईल यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा होत होती. एकूणच, वातावरण धार्मिक आणि जातीय द्वेषाचं करण्यात आलं होतं. इतकंच पुरलं नाही म्हणून ज्या महामारीच्या नावानं मजुरांना हुसकावून लावलं होतं त्या हुसकावण्याला, महामारीलाही केसरिया आणि हिरवा रंग दिला जात होता. 'देशात आलेली ही महामारी एका धार्मिक समूहानं देश नष्ट करण्यासाठी आणली आहे.' असं सांगण्याची मोहीम अथकपणे राबवली जात होती. (पृ.63) राजकीय पक्ष या संकटकाळी असा धार्मिक अजेंडा राबवत होते; तर उद्योगपती, व्यापारी, दुकानदार वाहत्या गंगेत हात धुवून घेत होते. 'आजारांचा धंदा करणारे महामारीवरची बोगस औषधं विकत होते आणि दोन रुपयांची नाकाला बांधायची फडकी सुरुवातीला चार-पाचशेला आणि नंतर पाच-पन्नास रुपयांना विकली जात होती. दुकानांतून जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार सर्रास सुरू होता. रेशनवरचं धान्य गायब झालं होतं. गावांपासून शहरांपर्यंत सगळीकडं लूटमार सुरू होती. सत्तापक्षाचे पुढारी महामारीचं निमित्त साधून आपली राजकीय सत्ता टिकवत होते, मजबूत करत होते. महामारीची भीती दाखवून उद्योगपती आपला टाकाऊ माल चढ्या भावात बाजारात विकत होते. मास्क, सॅनिटाइजर, फ्लोअर क्लिनरपासून ते नव्यानंच बाजारात दाखल केलेले फ्रूट क्लिनर, निलगिरीचं तेल अशा इतर कितीतरी वस्तू विकून सामान्य नागरिकांच्या खिशातले हजारो-लाखो रुपये हिसकावत होते. तथाकथित स्वयंघोषित महात्मे, संत-बाबा आयुर्वेदिक औषधाच्या नावानं कोरोनाचे शर्तीया इलाज सांगून औषधी तयार केल्याचा दावा करत होते. गाईच्या शेणामुताला राजदरबारात जागा मिळाली होती, शेणामुताचा धंदा तेजीत आला होता आणि आता तर तो ऑनलाइन झाला होता.
गाईचं मूत गंगाजलासारखंच पवित्र झालं होतं. हे कमी नव्हतं म्हणून या महामारीच्या धंद्यात गल्लीबोळांतले जादूटोणा, फूकफाक करणारेही मागं राहिले नव्हते. सामान्य जनता फक्त मूक दर्शक झाली होती. पेपर, टीव्ही, पोलीस, प्रशासन आणि न्यायालयंही सत्तेच्या ताटाखालची मांजरं झाली होती. मरकजसारख्या घटनांचं निमित्त करून देशाला खाजगी कंपनी बनवू पाहणारे लोक देशात फक्त एकच धर्म शिल्लक ठेवायला टपले होते. महामारीसारख्या या गंभीर आपत्तीचा मोका बनवून आपलं उद्दिष्ट साधण्यासाठीचा एक महामार्ग तयार केला होता' (पृ.66) महामारीच्या आणि टाळेबंदीच्या या काळात सामान्यांच्या समस्या सोडविण्याऐवजी सरकार आपली तत्त्वज्ञानात्मक धोरणं राबविण्याची संधी शोधताना दिसतं.
उद्या लॉकडाउन संपेल आणि मग एखाद्या वाहनाने घर जवळ करता येईल, या आशेवर चाललेली ही मंडळी लॉकडाउन आणखी वाढल्यानंतर मात्र गलितगात्र होतात. पंडितजी तर धोरणकर्त्यांना लाखोली वाहतात. धोरणकर्त्यांचे धोरण कसे चुकत गेले म्हणण्यापेक्षा ते कसे पक्षपाती होत गेले यावर कादंबरीकाराने नेमके बोट ठेवले आहे. 'अनिश्चित काळासाठी पुन्हा लॉकडाउन घोषित झाल्यामुळे मजुरांची पंचाईत झाली होती. सुरुवातीचे दोन लॉकडाउन तीन आठवड्यांचे होते. ते संपून हा तिसरा सुरू झाला होता. आणि आता लॉकडाउनचे पर्व किती काळ चालणार हे अनिश्चित झालं होतं. ह्या घटनेनं सर्वांना निराशेच्या खाईत लोटून दिलं. केंद्र सरकारच्या या घोषणेमुळे फक्त या तिघांनाच नाही तर संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या महामार्गांवरच्या एका शहराकडून अनेक शहरे तुडवत गावाकडे परतू पाहणाऱ्या मजुरांना एक जबर शॉक बसला होता. देशभरात वेगवेगळ्या रस्त्यांवरून जवळपास वीसेक लाख मजूर पायी चालत होते. या सगळ्यांची स्थिती जवळपास सारखीच होती. पायी जाणारे प्रवासी रस्त्यावर उपाशीपोटी भूकबळीनं मरत होते, पाण्यासाठी तडफडत होते, अति थकव्याने वा उष्माघाताने हे जग सोडून चालले होते. लॉकडाउन वाढवताना किमान या मजुरांचा विचार तरी शासनानं करायला हवा होता. त्यांना त्यांच्या राज्यात, त्यांच्या गावापर्यंत तरी सोडण्याची तयारी दाखवायला हवी होती.
लाखो रुपये भरून राजस्थानातल्या कोटामध्ये नीट, जेईईचे क्लासला गेलेल्या नेते, उद्योगपती, मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या मुलांना घरी परत आणण्यासाठी शेकडो गाड्यांची व्यवस्था केली होती. परदेशात सिलिकॉन व्हॅलीतल्या व्हाइट कॉलर लोकांना देशात आणण्याची तत्परता दाखवली होती. त्यांना थ्री स्टार, फाइव्ह स्टार हॉटेलात क्वारंटाइन केलं होतं. दुसरीकडे देशातल्या कष्टकऱ्यांना, मजुरांना मात्र हाडामांसाची माणसं मानायला सरकार आणि त्याचं प्रशासन तयार नव्हतं. सरकारकडून अशी अपेक्षा करणं म्हणजे दुभता सांड शोधण्यासारखं होतं. (पृ.70) सरकार, मग ते कोणत्याही पक्षाचे असू देत, असते नेहमी प्रस्थापितांच्या बाजूने. सर्वहारा वर्गाला वाऱ्यावर सोडून देण्याची खोड तशी पक्षनिरपेक्षच म्हणायला हवी. मतदानाच्या वेळी हवा असणारा हा वर्ग नंतर मात्र शासनकर्त्यांना गजकर्णासारखा वाटू लागतो. या दृष्टीकोनामुळेच या वर्गाची ससेहोलपट थांबत नाही.
या दीर्घ प्रवासात या त्रिकूटाला पुढे सुरतहून आलेली आणि मिर्जापूरला निघालेली दीपाली भेटते. तिच्या निमित्ताने मग कादंबरीकार या प्रवासात स्त्रियांच्या वाट्याला कोणते भोग आले, त्याचे चित्रण करतो. कोणत्याही स्थलांतरावेळी, दंगलीवेळी सगळ्यात जास्त स्त्रीच होरपळली जाते. हा प्रवासही त्याला अपवाद नाही. दीपालीची मासिक पाळी, तांड्यातील गरोदर स्त्रीची रस्त्यात झालेली प्रसूती अशा कितीतरी मन सुन्न करणाऱ्या घटना कादंबरीकाराने टिपल्या आहेत. हा प्रवास या तिघा चौघांनाच नव्हे; तर एकूण वाचकालाच मानवी जीवनाचे अंतर्बाह्य दर्शन घडवतो. माणूस म्हणून स्वतःला स्वतःची ओळख पटवून देतो. 'आता यापुढच्या आयुष्यात मजुरांच्या, कष्टकऱ्यांच्या हितासाठीच जमेल तेवढं काम करायचं, अशा विचारात मिश्राजी गढून गेले होते. जवळपास महिन्याभराच्या एकमेकांच्या सोबतीचा, परिस्थितीनं दिलेल्या तडाख्यांचा तो परिणाम होता. रस्त्यात सहन करावा लागलेला मान-अपमान आणि मिळालेली आपुलकी अशा एकूणच वातावरणाच्या भारावलेपणाचा तो परिणाम होता. दलित, आदिवासी, बहुजन समाजांतल्या लोकांची धर्माच्या नावाने लूट होतेच. आधीच परिस्थितीनं गांजलेले लोक आणि धर्माच्या नावानं लूट.. सगळं कसं अमानवी! त्यांनी रामस्वरूप आणि आरिफला जवळ बोलावून घेतलं. त्यांच्या मनात काय चाललं आहे ते सांगून ते म्हणाले, 'मैं अकेला रोक भी ना सकू यह सब, लेकिन मैं इसका भागीदार नही बनूंगा.' यापुढं आपण पूजापाठ वगैरे कर्मकांड करणार नाही आणि जातीय ओळख असलेलं हे जानवं तोडण्याचा इरादा त्यांनी जाहीर केला. आरिफभाईही या प्रवासातील पंचवीस दिवसांच्या कालखंडात बराच काही शिकला होता. आपण मुसलमान आहोत म्हणजे नेमके कोण आहोत? आपण 'अश्रफ' का नाही? हे मौलवी मुघल सत्ताधीशांची उदाहरणं आपल्याला किती दिवस ऐकवणार? अजान अरबी भाषेतच का द्यायची आणि ऐकायची? हिंदी-उर्दूत का नाही? या देशातले हे आपले लोक पंडितजी, दीपाली, रामस्वरूप धर्मानं मुसलमान नाहीत म्हणून ते आपले भाऊबंद का होऊ शकत नाहीत? अडीअडचणीत आपल्याला कोण मदत करतंय? असे विचार आरिफच्या डोक्यात यायला लागले होते. रामस्वरूपच्या डोक्यात काही वेगळी खळबळ नव्हती. वेगवेगळ्या संस्कृती-समाजरचना आणि माणसांमधल्या भेदभावाला देशावर कब्जा ठेवलेला मालकवर्ग जिम्मेदार आहे. आपली ओळख, खानपान, धर्म, जाती, भाषा यांतल्या भेदांचा आधार घेऊन हा मालक नावाचा सैतान आपल्याला कोंबड्याप्रमाणे झुंजवतो. हे सगळं रामस्वरूपला आजवरच्या जगण्याच्या अनुभवातून कळू लागलं होतं'. (पृ.79)
मानव्याचा असा साक्षात्कार झाल्यानंतर हे चौघेही एकमेकांची अधिकच काळजी घेऊ लागतात. आजारपणात एकमेकांची सेवा करतात. एकेकाचं गाव जवळ येतं, तेव्हा गाव जवळ आल्याच्या आनंदापेक्षाही घडीच्या प्रवासातील या साथींची साथ सुटणार याचं त्यांना वाईट वाटू लागतं. आपल्या मासिक पाळीच्या वेळी आपला गमछा देणारे मिश्राजी आजारी आहेत, त्यांची काळजी घेता यावी म्हणून दीपाली आपलं एटीएम कार्ड आरिफच्या हवाली करते. रामस्वरूपही त्या दोघांचा निरोप घेतो. दोन साथी सोडून गेल्याने पंडितजी आणखी खचून जातात. आता आरिफ आणि पंडितजींचा पुढचा प्रवास सुरू होतो. पंडितजींसोबत 'कचोडी-पुरी-भांडाराचं दुकान' टाकायचं स्वप्न रंगवत झोपी गेलेल्या आरिफला, त्याच स्वप्नात सोडून पंडितजी जगाचा निरोप घेतात. पंडितजींच्या अस्थी झोळीत घेऊन आरिफ पुढचा प्रवास सुरू करतो. गावी पोहोचतो. त्याला क्वारंटाइन केलं जातं. मात्र, तो आयुष्यातूनच क्वारंटाइन होतो. घरच्या लोकांकडे तो शून्य नजरेने बघत राहतो. बोलत काहीच नाही. सातव्या दिवशी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला त्याचे आधार कार्ड, एटीएम कार्ड देऊन सोडले जाते. सेंटरच्या बाहेर पडल्यावर तो स्वतःच्या घराकडे न जाता पंडित ब्रिजमोहन मिश्राजींच्या घराकडे चालू लागतो. इथे ही कादंबरी संपते.
सर्वहारा वर्गाचा टाळेबंदीतील हा पायी प्रवास मानवी जीवनाविषयीचं एक वेगळंच आकलन आपल्यासमोर मांडून जातो. कादंबरीचे वाचन संपल्यानंतर काही प्रश्न मात्र वाचकाच्या मनात निर्माण होतात. महामारीचे हे भीषण रूप बघितल्यानंतर त्यात होरपळून निघालेली या कादंबरीतील माणसे जशी पूर्णांशाने बदलतात तशी इतर का बदलत नाहीत. बरं, जी बदलली ती तरी कायमस्वरूपी बदलतात की हा बदल स्मशानवैराग्यासारखा तात्पुरता असतो? कोरोनाकाळात मानवी जीवनाचं आकलन बदललं, आता साहित्यही बदलेल, या जाणिवेने काही समीक्षकांनी 'कोरोनोत्तर साहित्य' अशी संकल्पना मांडण्याचा प्रयत्नही करून पाहिला; पण आज साहित्यात असे काही आढळत नाही. महामारी संपल्यानंतर माणूस पुन्हा मूळ पदावर आलेला दिसतो. साहित्यही त्याला अपवाद नाही.
या कादंबरीपुरतं बोलायचं झालं तर 'मानवी जीवनाचं निर्लेप रूप समोर ठेवणं हे कादंबरीचे मुख्य प्रयोजन; आणि सरकारच्या चुकीच्या निर्णयावर भाष्य करणे ही अपरिहार्यता' असे म्हणता येईल. प्रा. रणधीर शिंदे म्हणतात, "ते पन्नास दिवस' ही महामारी काळाविषयीची लोकविलक्षण अशी कादंबरी, मुंबई ते वाराणसी असे स्थलांतरित मजुरांचे करुण कथन या कादंबरीत आहे. मैलोन्मैल जिवाच्या आकांताने स्वतःच्या भूमीकडे जाणाऱ्या एका समूहगटाच्या पन्नास दिवसांच्या भीषण प्रवासाचे हे कथन आहे. महामारीच्या काळातील मजुरांच्या दुःखशोषणाचे प्रभावी चित्रण कादंबरीत आहे. या कादंबरीतील दुःखितांच्या शोषणचित्रणाला बहुल असे सामाजिक, राजकीय पदर आहेत. स्थलांतरित मजुरांच्या असुरक्षित भीती-प्रवासातील अनेकजिनसी अनुभवचित्रांमुळे कादंबरीतील चित्रणास बहुआवाजीपणा प्राप्त झाला आहे. मजुरांच्या स्थलांतरणाबरोबर भांडवली दलाल, भ्रष्टाचारी यंत्रणा, कायदा, आरोग्य दहशतीचे क्रौर्य, भूक, उखडलेपणाची जाणीव, असुरक्षितता, व्याकूळ मरणदर्शने आणि सामान्य माणसांतील माणुसकीच्या ओलाव्याचे दर्शन घडविणारी ही कादंबरी आहे. रस्त्यांवर नाडल्या गेलेल्या माणसांच्या या हतबलकथा आहेत. 'अब शिकायत भी की नहीं जाती' आणि 'हमें जाने दो' असा भीषण भयकाळस्वर कादंबरीचित्रणात आहे. कादंबरीत मजुरांच्या केविलवाण्या अस्वस्थ जगण्याला समांतर गडद असे अदृश्य पटल आहे, ते राज्यसंस्थेच्या बेफिकीर एकाधिकारशाहीचे. राज्यसंस्थेच्या अप्रत्यक्ष मौनाने सर्वहारांचे जगणे अधिकच दुभंग आणि करुण झाले आहे. आपत्तिकाळातील 'नाही रे' वर्ग आणि नाडणाऱ्या विरोधपूर्ण व्यवस्थासंदर्भचित्रणाने कादंबरीचा आवाका वाढला आहे'. (मलपृष्ठ)
लोकशाहीत सरकारच्या निर्णयावर, चुकीच्या धोरणांवर भाष्य करणे हा लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. तटस्थ वृत्तीचा लेखक चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणारच. मग सरकार कोणत्या पक्षाचे आहे याचे त्याला देणेघेणे असण्याचे कारण नसते. हे देणेघेणे असते राजकीय पक्षांना. आपल्या आधी सत्तेवर असणाऱ्या पक्षाच्या सरकारविषयी, त्याच्या धोरणाविषयी सतत टीकेचा सूर लावणाऱ्या सत्ताधारी पक्षाला स्वतःवरील टीका मात्र सहन होत नसेल, तर ही भूमिका दुटप्पीच म्हणावी लागेल. साहित्यात आलेल्या चित्रणाने अंतर्मुख होत आत्मनिरीक्षणाला, परीक्षणाला सामोरे जात भावी काळात तरी 'धोरणात्मक चुका' कशा टाळता येतील ते शिकण्याची संधी खरे तर मिळत असते. ही संधी घेत सरकारने व एकूण समाजानेही स्वतःच्या दृष्टीकोनात व धोरणात मानवतावाद रुजवायला हवा.
पवन भगत यांनी लिहिलेली "ते पन्नास दिवस" ही मराठी कादंबरी ऑक्टोबर 2022 मध्ये मैत्र पब्लिकेशन, पुणे यांच्याकडून प्रकाशित झाली. नंतर इंग्रजी व अन्य काही भारतीय भाषांमध्ये तिचे अनुवाद झाले आहेत. सहा महिन्यांपूर्वी अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठात द्वितीय वर्ष बी.ए.च्या दुसऱ्या सत्रासाठी ही कादंबरी विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाकडून निवडली गेली. डॉ. काशिनाथ बहऱ्हाटे हे त्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष होते. नंतर विद्यापीठाच्या अकॅडमिक कौन्सिलने त्या निर्णयाला मान्यता दिली. अभ्यासक्रमात ती शिकवायला सुरुवातही झाली. मात्र, 'त्या कादंबरीमध्ये विद्यमान केंद्र सरकारविरोधी चित्रण आहे' अशा प्रकारची तक्रार दाखल झाल्यामुळे, विद्यापीठ प्रशासनाने अभ्यास मंडळाला पुनर्विचार करण्यासाठी सांगितले. अभ्यास मंडळाने पुन्हा एकदा बैठक घेऊन व चर्चा करून असा निर्णय दिला की, 'या कादंबरीत आक्षेपार्ह असे काहीही नाही, त्यामुळे ही कादंबरी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला लावण्याचा निर्णय कायम ठेवावा.' त्यानंतर कुलगुरू मिलिंद बारहाते यांनी विद्यापीठ अधिसभेत (सिनेटमध्ये) हा विषय चर्चेला घेतला. काही सदस्यांनी बाजूने व काही सदस्यांनी विरोधात मते व्यक्त केली. अंतिमतः मतदान घेण्यात आले, तेव्हा 23 विरुद्ध 8 अशा मताधिक्याने ही कादंबरी अभ्यासक्रमातून मागे घेण्याचा निर्णय एप्रिल 2023 मध्ये झाला. आता या कादंबरीऐवजी उद्धव शेळके यांची "धग" ही कादंबरी त्या अभ्यासक्रमाला लावण्यात आली आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या