डिजिटल अर्काईव्ह

मराठी काव्यपरंपरेत दासू वैद्य हे आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील नाव आहे. 'तूर्तास' आणि 'तत्पूर्वी' या दोन सकस संग्रहांनंतर प्रदीर्घ काळानंतर आलेला 'तथापि' हा काव्यसंग्रह पॉप्युलर प्रकाशनाने काढला आहे. दासू वैद्य हे केवळ शब्दांचे कारागीर नाहीत, तर ते भोवतालाच्या विसंगतींचे आणि शोषणाचे सूक्ष्म शल्यचिकित्सक आहेत. त्यांच्या 'तथापि' या काव्यसंग्रहाचा केंद्रस्थ विषय एका शब्दात सांगायचा झाला, तर तो आहे 'माणसाची तगमग'. ही तगमग केवळ वैयक्तिक नाही तर ती सामाजिक, नैतिक, पर्यावरणीय आणि अस्तित्वात्मक आहे. या संग्रहातील कविता प्रेम, वेदना, एकाकीपण, विस्थापन, अन्याय, निसर्गाची हाक, स्त्री-शोषण आणि माणसाच्या संवेदनांची झीज या भावनांच्या परिघात फिरतात; मात्र त्या कधीही स्वतंत्र कप्प्यात विभागल्या जात नाहीत.

तथापि म्हणजे 'तरीही'. हा शब्दच या संग्रहाचा भावनिक गाभा स्पष्ट करतो. वेदना आहेत, तथापि जगायचं आहे. अन्याय आहे, तथापि माणूसपण सोडायचं नाही, असा चिवटपणा आहे. ही कविता पराभव स्वीकारत नाही; पण आशावादाचा कृत्रिम मुखवटाही चढवत नाही. 'तथापि' हे शीर्षक विरोधाभास आणि सतत चालू असणाऱ्या संघर्षाचे प्रतीक आहे, जे मुखपृष्ठावरील रंगीत, काळ्या अर्धविरामचिन्हातून (;) प्रतिबिंबित होते.

दासू वैद्य यांच्या कवितांमधील प्रतिमा अत्यंत सूक्ष्म, पण परिणामकारक आहेत. पृथ्वी, पाणी, झाडं, प्राणी, रस्ता, फुटपाथ, काळेपणा, अर्धविराम अशा प्रतिमा वारंवार येतात. मात्र, त्या केवळ दृश्य सौंदर्यासाठी नाहीत; त्या सामाजिक अर्थवाही प्रतिमा आहेत.

उदा., पृथ्वी ही केवळ निसर्गाची प्रतिमा न राहता ती माणसाच्या लालसेखाली थकलेली आई बनते. पाणी हे केवळ जीवनदायी घटक नसून जगण्याच्या विषमतेचे मोजमाप ठरते.

या संग्रहातील सर्वांत प्रभावी प्रतीक म्हणजे अर्धविराम. पूर्णविराम न येणारी माणसाची कथा, थांबलेलं पण न संपलेलं जीवन, हे प्रतीक कवी फार प्रभावीपणे वापरतो. प्रेमाच्या कवितांमध्येही प्रतीके मृदू
आहेत. दासू वैद्य मुख्यतः मुक्त छंदात लिहितात. मात्र, हा मुक्त छंद विस्कळीत नाही. अंतर्गत लय जाणवते. यमकांचा अट्टाहास नाही; पण शब्दांची पुनरावृत्ती, ओळींची लांबी आणि विराम यांमधून लय साधली जाते. ही लय कवितेला वाचकाच्या श्वासाशी जोडते. भाषा साधी, बोलकी आहे. मोठे, बोजड शब्द नाहीत; पण शब्दामागचा आशय खोल आहे. कवी शब्दांपेक्षा मोकळ्या जागेवर अधिक विश्वास ठेवतो. ही मोकळी जागाच कवितेचा अर्थ विस्तारते.

दासू यांनी कवितांमध्ये दैनंदिन जीवनातील साध्या वस्तू (पैंजण, लोणचं, डांबर, वात) प्रतिमा म्हणून वापरत सामाजिक शोषणाचे आणि संघर्षाचे प्रतीक बनवले आहे. उदाहरणार्थ, 'लोणचं' या कवितेत लोणचं बनवण्याची प्रक्रिया स्त्री-शोषणाचे रूपक आहे: 'आत आहे खमंग अंधार। अधूनमधून तेलाची धार। भूक भागवण्या पुरुषाची। देहाचा या चविष्ट संसार।' 'खमंग अंधार' ही प्रतिमा स्त्रीच्या बंदिस्त जीवनाचे प्रतीक आहे, तर बरणी कैदेचे सूचक आहे. काही कवितांमध्ये लय आणि यमक लोकगीतासारखे आहेत, जसे 'चिक्की बाई चिक्की'मध्ये पुनरुक्ती : 'चिक्की बाई चिक्की मूठभर चिक्की। जलमाच्या आधी, गेल्या कुठं लेकी।' ही लय स्त्री-भेदभावाच्या चक्राला गती देते. 'मायबाप' मध्ये 'काय मी प्यावे। काय मी खावे। तुम्ही शिकवावे मायबाप।' हे व्यंग्यात्मक यमक खुबीने येते.

कवितेतील शब्दनिवड ग्रामीण आणि आधुनिक मिश्रण आहे 'पांदी', 'घागर', 'मायंदाळ नेटवर्क' यांसारखे शब्द सामाजिक विसंगती दाखवतात. स्वर व्यंगात्मक आणि चिंतनशील आहे, जसे 'सेल्फी विथ फोर्ट' मध्ये : 'भूतकाळातून बाहेर या। ही तिखटमीठ लावलेली पेरूची फोड खा।' हे व्यंग्य इतिहासातील शोषण आणि आधुनिक पर्यटनावर टीका करत वाचकाला अस्वस्थ करते.

'तहान' या कवितेत शाब्दिक अर्थ स्त्रीच्या श्रमाचा आहे. 'गेली गेली, बाई गेली। तहान सोबत घेऊन गेली। तहान मागे ठेवून गेली।' असे सांगत गर्भित अर्थ दुष्काळातील गरिबी आणि स्त्री-दुःखाचे चक्र सांगणारा आहे. 'जनानखाना'मध्ये राजघराण्यातील स्त्रियांचा : 'पाचशे बायकांची घुसमट गाळासारखी दबून राहते तळाशी', असे मांडताना गर्भित अर्थ पितृसत्ताक शोषण आणि इतिहासाच्या महिम्यामागील अन्याय आहे. 'खोडरबर'मध्ये 'खोडरबरासारखीच स्वच्छ झाडझूड करून मावळतो दिवस', असे शब्दांत सांगताना गर्भित अर्थ जीवनातील नव्या सुरुवाती आणि चुका मिटवण्याचा आहे, ज्यात आशेचा स्वर आहे. कवीचा हेतू वाचकाला सामाजिक बदलासाठी उद्युक्त करणे हा आहे.

' मेल्या आईचं लेकरू', 'मांजर', 'कढी-भात' आदी कविता सामाजिक समस्यांवर भाष्य करतात. सर्व कवितांमधील प्रतीकं आणि उपमा इतक्या प्रभावी आहेत की, त्या वाचकाला सामाजिक वास्तवाचे भेदक विश्लेषण देतात. संग्रह वाचकाला अस्वस्थता, चिंतन आणि बदलाची प्रेरणा देतो, ज्यातून जीवनाच्या निसटलेल्या क्षणांचे आणि शोषणाचे आरसे दिसतात.

दासू वैद्यांच्या कवितेत 'स्त्रीवाद' हा स्वतंत्र विषय म्हणून न येता तो पर्यावरणीय जाणिवेशी गुंफलेला आहे. स्त्री आणि निसर्ग दोघेही पितृसत्ताक, भांडवली व्यवस्थेच्या ताब्यात गेलेले असल्याने, या दोन प्रवाहांचा संगम 'तथापि'मध्ये स्वाभाविक ठरतो. 'झाडाच्या रक्ताचे डाग झाकण्यासाठी 'महाकाव्याचं महावस्त्र' पांघरलं जातं', या ओळीतून कवीने साहित्याच्या आणि संस्कृतीच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेकडे लक्ष वेधले आहे. संग्रहातील कवितांमध्ये पर्यावरण, भूक, विस्थापन, माणसाचे एकाकीपण, भांडवली व्यवस्थेचा ताण, मानवी संवेदनेची झीज असे अनेक सामाजिक संदर्भ विखुरलेले आहेत. 'पृथ्वी नावाचा गोलगप्पा। टम्म भरलेला असावा। जगण्याच्या आंबट-गोड पाण्यानी' अशा ओळींतून कवी पर्यावरणीय संकटाकडे पाहण्याची मानवी, अनुभवप्रधान दृष्टी देतो.

या काव्यसंग्रहात एकूण 58 कविता आहेत. या कविता स्वतंत्र असल्या तरी भावनिक पातळीवर त्या एकमेकींशी संवाद साधतात. संग्रह वाचताना एका दीर्घ कवितेचा अनुभव येतो. 'उजळण्यामागचं जळण' या मनोगतात त्यांनी सांगितलेली काव्यनिर्मितीची 'आत जळणं, मग उजळणं' ही प्रक्रिया संपूर्ण संग्रहात अनुभवता येते. हे मनोगत कवीच्या सामाजिक भूमिकेचे स्पष्टीकरण आहे.

ज्या काळात कवितेमध्ये केवळ शब्दच्छल वाढला आहे, अशा काळात दासू वैद्यांचा काव्यसंग्रह सामाजिक बांधिलकी जपणारा ठरतो. हा संग्रह वाचकाला अस्वस्थ करतो; पण निराश करत नाही.

आजच्या मराठी कवितेच्या नकाशात 'तथापि'ची जागा ही संवेदनशील सामाजिक कवितेची आहे, जी ना प्रचार करते, ना पलायन. ती समजून घेते, प्रश्न विचारते आणि वाचकाला स्वतःकडे पाहायला लावते.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी