डिजिटल अर्काईव्ह

सुधीर हेंद्रे नावाचे एक विक्षिप्त गृहस्थ कुटुंबनियोजन विरोधी आघाडी चालवण्याचा उपद्व्याप करत असतात. येत्या प्रजासत्ताक दिनापर्यंत मुसलमानांनी सवतबंदीचा कायदा मान्य करण्याला कबुली दिली नाही तर त्यांचे नागरिकत्वाचे हक्क काढून घ्यावे असे आंदोलन सुरू करू असे त्यांनी जाहीर केले आहे.

लोकमातांच्या पाण्याचा वाद
कृष्णा नदीचे पाणी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र यांच्यात कशा प्रकारे वाटले जावे त्याचा निवाडा करण्यासाठी 1969 मध्ये एक मंडळ नेमले होते. मंडळाने चार वर्षे प्रश्नांचा सर्व बाजूंनी अभ्यास करून आपला 800 पानी निवाडा तयार केला आहे. ह्या निवाडयानुसार महाराष्ट्राला 565, कर्नाटकाला 695 व आंध्रला 800 टी. सी. एम. पाणी देण्यात येईल; आणि हा निर्णय सर्व संबंधितांवर बंधनकारक राहील. इ.स. 2000 मध्ये जरूर तर पाणी वाटपाचा फेरविचार होऊ शकेल, तत्पूर्वी नाही.

चोराच्या हाती जामदारखाना
केंद्र सरकारच्या माहिती खात्यातील एक अधिकारी श्री. डिसूझा यांनी परदेशी वकिलातींना गुप्त माहिती पुरवली या आरोपाखाली गुप्तचर विभागाने त्यांना गिरफदार केले.

पशुवैद्यक महाविद्यालयाची जागा
मुंबईच्या पशुवैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी हे महाविद्यालय आरे येथील दूध वसाहतीच्या निकट न्यावे अशी रास्त मागणी केली आहे. पशुवैद्यक महाविद्यालय म्हणजे व्याख्यानांवर गुजराण करणारे कला-वाणिज्य महाविद्यालय नव्हे की जे कुठेही चालवावे. पण आडमुठे महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांची ही रास्त मागणी मान्य करायला तयार नाही !

काटकसरीचे उपाय आणि परिषदा
विद्यापीठ अनुदान मंडळाने विविध परिषदा आणि चर्चासत्रे आयोजित करण्यासाठी द्यावयाच्या रकमांमध्ये काटकसरीसाठी कपात केल्यामुळे अनेक चर्चासत्रे आणि परिषदा यांना काट बसली आहे. आपला विचार विनिमय समाजाला उपकारक आणि ज्ञानसाधनेला उपयुक्त असल्याने तो स्वखर्चाने चालू ठेवावा अशी विद्वानांना फारशी इच्छा नसावी असे दिसते. सरकारी खर्चाने ही बौद्धिक चैन चालली तरच त्यांना ती हवी असते, असा त्याचा अर्थ होतो.

सरकारचा अजब कारभार
महाराष्ट्र सरकारने इतर अनेक राज्यांप्रमाणे वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण केले आहे आणि व्यवसाय बराच कार्यक्षमपणे आणि किफायतशीर रीतीने चालवला आहे. राज्य परिवहन मंडळाकडे हजार बसेस असून त्यांना दरसाल  1 लाख 27 हजार टायर्स लागतात. यंदा त्यांना फक्त 47 हजार टायर्स मिळाले असून सरकारने साठे ताब्यात न घेता भावनियंत्रण केल्याने मंडळाची शंभरावर वाहने वाहतुकीतून बाद झाली आहेत. लहान अंतरावरील गाडयांना आता बदली चाक न दिल्याने प्रवाशांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत. वक्तशीरपणा आणि कार्यक्षमता खालावत चालली आहे.

लोकशाही बचाव मोहीम
उत्तर प्रदेश, ओरिसा आणि अन्य राज्यांत मध्यावधी निवडणुकीच्या वेळी पैसा, जात आणि अन्य भ्रष्ट मार्गांचा अमाप वापर होण्याची भीती आहे. लोकशाहीची ही विटंबना थांबवण्यासाठी युवकांनी पक्षातीत संघटना उभाराव्या अशी सूचना जयप्रकाशजींनी केली असून या बाबतीत तरुण शांतीसेनेसारख्या संघटनांनी लोकशाही बचाव मोहीम चालवावी असे सुचवले आहे.

महाराष्ट्रातील सीमा दंगलीतील हानी
महाराष्ट्रात सीमा प्रश्नाच्या निमित्ताने ज्या दंगली झाल्या त्यांत 70-75 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

एक एकान्तिक आग्रह
सुधीर हेंद्रे नावाचे एक विक्षिप्त गृहस्थ कुटुंबनियोजन विरोधी आघाडी चालवण्याचा उपद्व्याप करत असतात. येत्या प्रजासत्ताक दिनापर्यंत मुसलमानांनी सवतबंदीचा कायदा मान्य करण्याला कबुली दिली नाही तर त्यांचे नागरिकत्वाचे हक्क काढून घ्यावे असे आंदोलन सुरू करू असे त्यांनी जाहीर केले आहे. आपल्याला भारतीय नागरिकत्व हवे की शरीयत हवी, याबद्दल मुसलमानांनी निर्णय ठरवावा असे त्यांनी मुस्लिमांना बजावले आहे. 

मुसलमानांतील हुंडापद्धती 
मुसलमानांतील सधन आणि महत्त्वाकांक्षी मंडळीत हुंडापद्धती बोकाळू लागली आहे. बिहारमध्ये ‘तिलक’, आंध्रात ‘मोडा-जोडा’, उत्तर प्रदेशात ‘सलामी’ या नावाने ही पद्धत रूढ होत आहे; आणि त्यामुळे मुलगी जन्माला येणे म्हणजे गळयात धोंडा येण्यासारखे आहे असे मुलीच्या आई-बापांना वाटू लागले आहे. हुंडाप्रतिबंधाची चळवळ चालवण्यात हयगय केली तर मुस्लिम मुलींना एक तर आत्महत्या कराव्या लागतील किंवा वेश्यावस्त्यांचा रस्ता धरावा लागेल, अशी भीती निर्माण झाली आहे! हुंडाप्रतिबंधाच्या आघाडीवर हिंदू-मुस्लिम महिलांना संयुक्त आघाडी उघडावी लागेल असे दिसते.

परतलेले पाक सैनिक
भारतीय युद्धबंदी म्हणून राहून परतलेल्या पाकिस्तानी सैनिकांना पुन्हा सैन्यदलात दाखल करून घेतले जाणार नसून त्यांची भू-सेना उभारण्याचा पाकिस्तानचा इरादा आहे. परतणाऱ्या सैनिकांना दोन महिन्यांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात येत आहे. भू-सेना उपळणाऱ्या जमिनींची दुरुस्ती, खार जमिनींची सुधारणा इत्यादी कामेही सेना करील. परतणाऱ्या सैनिकांवर भारतीय प्रभाव राहू नये यासाठी त्यांना एक आठवडा छावण्यांत प्रथम डांबण्यात येते व त्यांच्यावरील भारतीय प्रभाव रद्द करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यानंतर दोन महिन्यांची रजा व नंतर भू-सेना.

निवडणूक- एक व्यसन 
गुजरातमध्ये इदर नावाचे एक गाव आहे. तेथील नगर परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. अर्जुनसिंग यांना नगर परिषद हा एक कौटुंबिक व्यवहार करावयाची जणू दुर्बुद्धी झाली. ते स्वतः दहा विभागांतून उभे राहिले. त्यांच्या पत्नी दोन विभागांत उभ्या राहिल्या. त्यांचा मुलगा एका विभागांत उभा होता. त्यांची सून एका विभागात उभी होती. त्यांची सून सोडून सर्व जण पराभूत झाले आणि माजी अध्यक्षांची आठ विभागात तर अनामत ही गेली !

Tags: Pakistani Sainik Hundapadhdhati Sudhir Hendre Seema Prashna Jayprakashji Rajya PArivahan Mandal PAshuvaidyak Mahavidyalaya Guptchar Vibhag Karnatak Maharashtra Krishna River पाकिस्तानी सैनिक हुंडापद्धती सुधीर हेंद्रे सीमा प्रश्न जयप्रकाशजी राज्य परिवहन मंडळ पशुवैद्यक महाविद्यालय गुप्तचर विभाग आंध्र कर्नाटक महाराष्ट्र कृष्णा नदी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके