डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कविवर्य वसंत बापट यांचे अध्यक्षीय भाषण

साधना परिवारातील व्यक्ती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असणे ही निश्चितच अभिमानाची बाब. अध्यक्ष वसंत बापट यांचे भाषण संपूर्ण छापणे वर्तमानपत्रांना जागेअभावी शक्य होईलच असे नाही. वाचकांच्या संग्रही हे भाषण असावे म्हणून ते जसेच्या तसे देत आहोत.

"साहित्यप्रेमी भगिनींनो आणि बंधूंनो, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 72 व्या अधिवेशनासाठी आपण सारे जमलो आहोत. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदासाठी नियुक्त केलेल्या मतदारांनी ही जबाबदारी माझ्याकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला, माझा आणि माझ्यापेक्षाही मराठी कवितेचा बहुमान केला, याबद्दल आरंभीच मी मतदारांचे आभार मानतो. हे मतदार वस्तुतः साहित्य महामंडळाच्या विविध घटक संस्थांचे प्रतिनिधी होते. साहित्य महामंडळाच्या सर्व घटकसंस्थांनी बहुमताने माझ्या बाजूने आपला कौल दिला म्हणून हा सन्मान मला प्राप्त झाला. आपणां सर्वांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न मी मनापासून करीन, एवढेच आश्वासन मी आपल्याला देऊ इच्छितो. आरंभीच मला, जन्मभर माझ्या मनात दृढ झालेल्या निष्ठांचा उल्लेख केला पाहिजे. साथी एस. एम. जोशी आणि महाराष्ट्राची माउली म्हणजे साने गुरुजी, यांनी माझ्या पिढीला जीवननिष्ठा दिल्या. ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुन श्रीकृष्णाला सांगतो- 'कृष्णा, माझा कसला आला आहे पराक्रम? हा पार्थु द्रोणाचा केला - म्हणजे द्रोणाने मला घडवले. तशी, जगायचं कशासाठी ही शिकवण मला आणि माझ्या पिढीला मिळाली ती एस. एम. जोशी आणि साने गुरुजी यांच्यासारख्या साधुचरित समाजनेत्यांकडून.

सामाजिक न्यायाच्या कैवारासाठी आणि अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी शक्ती आणि बुद्धी पणाला लावा, हे त्यांनी आम्हांला शिकवलं. साने गुरुजींची यंदा जन्मशताब्दी साजरी होते आहे. ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’, असं त्यांना कुणी सांगण्याची गरज नव्हती. त्यांचे जीवन म्हणजे ‘रात्रंदीस’ चाललेला युद्धाचा प्रसंग होता. त्यांच्या धगधगत्या मशालीसारख्या जीवनावर आम्ही आमच्या पणत्या लावून घेतलेल्या आहेत. 1942 च्या अखेरच्या बंडात ‘करेंगे या मरेंगे’ असा निर्धार करून जनतेला निर्भयतेची दीक्षा दिली गांधीजींनी. म्हणून प्राण जाण्याचा धोकाही लहान माणसांनी पत्करला. त्यामुळे तर मी त्या अखेरच्या बंडात सामील व्हायला कचरलो नाही. 

‘‘राज्य पुनर्रचना करताना मराठी भाषकांवर अन्याय होऊ नये या तिरीमिरीनं संयुक्त महाराष्ट्रासाठी केवढं तरी आंदोलन उभं राहिलं. त्या वेळीही आम्ही न मोरारजीभाईंची भीती बाळगली, न जवाहरलाल नेहरूसारख्या महनीय व्यक्तित्वाला शरण गेलो. मी आंदोलनाचा प्रचार केला. पोवाडे गात मी आणि माझे सहकारी गावोगाव फिरलो. चिनी फौजांनी भारतावर आक्रमण केलं तेव्हा ‘उत्तुंग आमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू’, या निर्धाराचा पुकारा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सर्वत्र केला. त्याची कोणी टिंगलटवाळी केली म्हणून अंतर्यामीचा आवाज आम्ही दाबून टाकला नाही. इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीच्या काळात माझी पन्नाशी उलटलेली होती, तरीही आणीबाणीच्या विरोधात जे साहित्यिक उभे राहिले त्यांच्यामधे मीही निश्चितपणे होतो. कवीने आपली लेखणी हुकूमशाहीकडे गहाण टाकता कामा नये हीच माझी भूमिका होती. ‘आमंत्रण’ या शीर्षकाच्या कवितेत मी लिहिलं होतं – 

'सत्य भार पेलत असता ज्यांचा देह झुकला नाही, त्रैलोक्याच्या राज्यासाठी ज्यांनी आत्मा विकला नाही, मूर्तिमंत मृत्यूचीही आमने सामने भेट होता ज्यांच्या थडयड नाडीमधला ठोका मुळीच चुकला नाही, ज्यांच्या अस्थी वज़बीजे, नसांत उकळणारे रक्त, शारदेचे आमंत्रण... आज त्यांनाच आहे फक्त'

‘‘या काळामध्ये ‘धी न्यू ग्रेट इंडियन सर्कस’, ‘माझे विद्यापीठ’, ‘बुद्धिवंत’, ‘कशासाठी तारुण्याचा होम आम्ही केला होता?’ अशा अनेक कवितांतून मी आणीबाणीची छी:थू! केली होती, खणखणीत निषेधही केला होता आणि प्रतिज्ञेवर सांगितलं होतं, ‘नाचणार नाही मी सबळांच्या तालावर... शेवटला उंच सूर मुक्तीला वाहिन मी । गीत नवे गाइन मी ॥’ मी आपणांस ग्वाही देऊ इच्छितो की मी सदैव विचारस्वातंत्र्य आणि उचारस्वातंत्र्य यांचाच पुरस्कर्ता राहीन आणि सर्व मराठी साहित्यसेवकांनी आपलं आत्माविष्काराचं स्वातंत्र्य अबाधित राखलं पाहिजे, असंच माझं मत आहे. लोकशाही शासनपद्धती सर्वांत आदर्श शासनपद्धती नसेलही, पण मानव समाजातली कमीतकमी जबरदस्ती करणारी आणि जास्तीतजास्त न्याय्य पद्धत लोकशाही हीच आहे.

आविष्कार-स्वातंत्र्याचा प्रश्न लोकशाही मानणाऱ्या समाजात अतिशय महत्त्वाचा ठरतो. आविष्कार आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांनादेखील मर्यादा असल्या पाहिजेत हे मान्य केलं तरी त्या मर्यादा आपणच सामंजस्य आणि सुसंवाद यांच्या बळावर ठरवायला हव्यात. परंतु आज धर्म, सर्वकल्याण आणि सामाजिक हित यांचे आपणच मत्तेदार आहोत असं काही लोक मानतात. ते आपल्याच शहाणपणावर संतुष्ट असतात. आपल्या मतापेक्षा वेगळं मत त्यांना सहन होत नाही आणि ते जुलूम-जबरदस्तीच्या साहाय्यानं, आपल्यापेक्षा भिन्न मत असलं तर त्याला चिरडू पाहातात. आपला देश खंडप्राय आहे आणि त्यातले बरेच भाग मागासलेले आहेत. अशा स्थितीत अनिर्बंध स्वातंत्र्याची कल्पना स्वीकारता येत नसेलही, पण स्वातंत्र्याच्या संकल्पनेला अधिकाधिक मान्यता कशी मिळेल याचा आपण विचार करायला हवा. उदाहरणासाठी सेन्सॉर बोर्डच घ्या. सद्यःस्थितीत पूर्व परीक्षण अपरिहार्य असेलही, पण ते कमीतकमी जाचक कसं होईल याचा विचार खूपच महत्त्वाचा ठरतो.

गतानुगतिकतेच्या आंधळ्या बळावर सेन्सॉर बोर्डाची रचना कायम मानता येणार नाही. त्याच्यावरील प्रतिनिधित्वाचा सतत नव्यानं विचार करावा लागेल. विशिष्ट कलाकृतीवर बंधन घालण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डानं घेतला तर तो आपण मान्य करायला हवा आणि समजा, बोर्डाचा निर्णय अस्वीकार्य आहे असं वाटलं तरी तो फिरवण्यासाठी एखाद्या शक्तिशाली संस्थेनं किंवा व्यक्तीनं धाकदपटशाचा मार्ग स्वीकारणं हे सर्वथा गैर आहे. नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क इत्यादी देशांत नग्नतेचं आणि लैंगिक विकृतीचं दर्शन खुशाल जाहीरपणे केलं जातं. परंपरेने चालत आलेले निर्बंध तिथे काढून टाकण्यात आलेले आहेत. पण सहनशील वृत्तीने हा अतिरेक येथील जनतेने सहन केल्यामुळे त्या देशांतलं लोकमतच आता नग्नतेच्या या दर्शनाला विटलं आहे. अश्लीलतेवर निर्बंध नसल्यामुळे समाजालाच ती नकोशी झाली आणि अश्लील प्रदर्शनं मांडणाऱ्यांना आळा बसला हे लक्षात घेण्यासारखं आहे. आज आपल्या देशातही चित्रपट आणि तेही दूरदर्शनमार्फत घरोघर पोचल्यामुळे हिडीस दृश्यं, लाज आणणारी दृश्यं, ओंगळ हावभाव यांचा अतिरेक मुलाबाळांपर्यंत गेलेला आहे. ढिश्यांव ढिश्यांवच्या घनचक्कर लढायाही, त्यांची अविश्वसनीयता सहज लक्षात येईल इतक्या बंधनांपलीकडे गेलेल्या आहेत. खरं म्हणजे आता लहान मुलांनाही घनचक्कर लढायांचं लटकेपण चांगलं ठाऊक झालेलं आहे. ओंगळपणा आणि हिंसा यांच्या गळामिठीतून आपले चित्रपट सुटतील आणि त्याचं श्रेय लोकांना आलेल्या त्यांच्या उबगालाच द्यावं लागेल. माझ्या बोलण्याचा अर्थ असा नाही की आपण बीभत्सतेचं खुले आम स्वागत करावं. 

‘‘माझं म्हणणं एवढंच आहे की बीभत्सता, जीवनाची कुरूपता, विकृती यांचं दर्शन नकोसं होऊन कलात्मक सौंदर्याचा वेध समाजाच्या मनाला लागावा, यासाठी निर्बंधांचा अनिर्बंध उपयोग करून चालणार नाही. चांगल्या कलाकृतीचं दर्शन समाजाला वारंवार घडलं पाहिजे. म्हणजे हिणकस काय आणि चांगलं काय हे आपोआपच उमजू लागेल. प्रश्न एखाद्या नाटकावर किंवा चित्रपटावर दंडुकेशाहीने बंदी आणून अपप्रवृत्तीचं निर्मूलन करण्याचा नाही. त्यापेक्षा समाजाची एकंदर अभिरुची वाढवण्याची नितांत आवश्यकता आहे आणि हे काम कायद्यापेक्षा शिक्षणानेच साधू शकेल, यावर माझा विश्वास आहे.’’

बाजारूपणाचा प्रश्न :

‘‘आज समाजापुढे सर्वांत मोठा प्रश्न आहे तो सर्व क्षेत्रांतला बाजारपणा नाहीसा करायचा. या बाजारूपणामुळेच शिक्षणाच्या क्षेत्रात प्रचंड हानी होते आहे, याचा विचार स्वतंत्रपणे योग्य व्यासपीठावरच व्हायला हवा. मी आज फक्त मातृभाषेच्या अवहेलनेमुळे समाजाचं जे प्रचंड नुकसान होत आहे, त्याच्याकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. एकसंघ महाराष्ट्राची संकल्पना विशद करताना अनेक महनीय व्यक्तींनी मराठी भाषेचं हे राज्य होणार आहे असं चित्र रंगवलं होतं. प्रत्येक संमेलनात ‘मराठीच्या नावाने गळा काढणं बस झालं,’ असं कुणी म्हणतात. साहित्य संमेलनात साहित्याच्या विकासाचा आढावा घेणं, त्यातील आकृतिबंधांची चिकित्सा करणं, साहित्यातले सरस-निरस कोणतं याच्यावर बोट ठेवणं हीच कामं प्राधान्यानं व्हायला हवीत असं विचारवंत म्हणतात आणि त्यांचं म्हणणं पटण्यासारखंच आहे. पण साहित्याचा संसार ज्या भाषेच्या अस्तित्वावर उभा राहतो ते अस्तित्वच जर धोक्यात येताना दिसू लागलं तर साहित्यिकांनी अस्वस्थ होणं स्वाभाविक नाही का? मराठी भाषा जर मुमुर्षू झाली, मराठी संस्कृतीला, समाजाला जर घरघर लागली तर मराठी साहित्याचं भविष्य वेगळ सांगावं लागणार नाही. आज शिक्षण, शासन आणि लौकिक व्यवहार या प्रत्येक क्षेत्रात मराठीला रक्तक्षय झालेला आहे असं दिसतं आहे. या सर्वांगीण शक्तिपाताचं भान ज्या तीव्रतेनं आपल्या सर्वांना व्हायला हवं तसं ते होताना आज दिसत नाही. शैक्षणिक विश्वात मराठी आक्रसत चालली आहे.

लौकिक व्यवहारात मराठीचा पराभव झालेला आहे आणि ज्या शासनानं मराठीचा ध्वज खांद्यावर घ्यावा, तेही मराठीच्या विकासाची चिंता वाहत नाही, हे सर्व आपल्या दुर्दैवाचे दशावतार आहेत. ज्या प्रदेशातल्या हजारो बालकांना बिगर मराठी - म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांत पालक आपखुशीनं पाठवतात त्याला काय मराठी भाषेचं राज्य म्हणता येईल? मोठ्या शहरांत तर सोडाच पण छोट्या छोट्या गावांत इंग्लिश माध्यमाच्या शाळा फोफावतात. लहानमोठे, गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित - सगळ्यांच पालकांना आपल्या मुलामुलींना इंग्लिश माध्यमातून शिकवण्याची इच्छा अनावर असते. यापुढे इंग्रजीचा आश्रय केल्याशिवाय तरणोपाय नाही, असं म्हणत तळमळणाऱ्या मुलखाला कशाला म्हणायचं मराठीचं राज्य? आणि समाजात ढोंग मात्र असं बोकाळलं आहे की, आम्ही बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शिबिरं भरवतो, संस्कारवर्ग चालवतो, पण इथं आपल्या बाळाला झोपवण्यासाठी अंगाईदेखील कुणी मराठीत गात नाही!

'ये रे ये रे पावसा' म्हणत बाळगोपाळ पावसात भिजत नाहीत, 'गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या'च्या लयीवर कुणी फेर धरत नाहीत. चिऊकाऊच्या गोष्टी आपण आपल्या मुलांना सातशे वर्षं सांगत आलो, आता ते बंद! ट्रिंकल ट्रिंकल, बाबा ब्लॅकशिप, हम्टी डम्टी यांची पोपटपंची मुलांना करायला लावतात आणि वर बाळ ‘नर्सरी ऱ्हाइम्स’ किती छान गातो, असं कौतुकही करतात. आपलं बाळ एबीसीडी लिहायला लागलं, त्याला 'वन् टु हंड्रेड' पाठ आहे, अशी शेखी मिरवतात. ‘लिपेर्यधावत् ग्रहणेन वाङ्मयम् नदीमुखेनैव समुद्रमाविशत्॥’ म्हणजे 'जणू लिपीरूप नदीमधुनि रघू शिरे वाङ्मयसागरात' यातली गंमत आता हरवली. आता एबीसीडीच्या शिडीवरून बाब्या इंग्लिश लिटरेचरमधे प्रवेश करता झाला याचं कौतुक होईल. त्यातही लिटरेचर म्हणजे शेली, कीट्स, शेक्सपियर नाही! फक्त पेपरबॅक, रहस्यकथा, कामकथा आणि कॉमिक्स! ही उच्च विद्या मुलं घेतील. थोडी बुद्धिमान मुलं विदेशी विद्यापीठांतही शिकायला जातील पण बाकीचा गळाठा? तो मराठीला मुकलेला आणि इंग्रजीत वाट चुकलेला, असा नुसता चाचपडत राहील. ‘बालकुमारांच्या शिक्षणाचं आदर्श माध्यम म्हणजे त्यांची मातृभाषा’, हे जगातल्या मोठमोठ्‌या शिक्षणतज्ज्ञांचं सांगणं. मातृभाषेत शिक्षण घेण्याचा प्रत्येक बालकाला जन्मसिद्ध अधिकार आहे. तो नाकारण्याचा पालकांना काय अधिकार?

आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात कोंबण्याचा प्रकार आपण केव्हा थांबवणार? हवं ते माध्यम स्वीकारण्यात मात्र व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय आहे म्हणे! महाराष्ट्राच्या शासनाने असा कायदा केला पाहिजे की, सर्व मुलांनी त्यांची मातृभाषा असणाऱ्या माध्यमाच्या शाळेतच गेलं पाहिजे. ज्या बालकांची प्रथम भाषाच इंग्लिश असेल त्यांनी जावं इंग्लिश माध्यमाच्या शाळेत! एरवी शिक्षण मातृभाषेतच घेतलं पाहिजे. ही केवळ पहिली पायरी झाली. मराठी मुलखात अशी व्यवस्था पाहिजे की, विद्येच्या सर्व शाखांत मराठीच्या एका प्रश्नपत्रिकेचा अंतर्भाव असलाच पाहिजे, मग माध्यम कोणतंही असो. विज्ञान-तंत्रज्ञान, स्थापत्य, व्यापार, वैद्यक, व्यवस्थापन या सर्व विद्याशाखांसाठी इंग्लिशशिवाय पानही हलणार नाही, हा सिद्धान्त म्हणजे शुद्ध भ्रम आहे, फसवणूक आहे. दुनियेमध्ये कितीतरी देशांत सर्व प्रकारच्या शिक्षणशाखांत इंग्रजीची कुबडी घेण्याची गरज भासलेली नाही.

इंग्लिश भाषेची सुविधा आपल्याला उपलब्ध आहे तर तिचा उपयोग का करून घेऊ नये, हा प्रश्नही फसवा आहे - आपल्या भाषेच्या ज्ञानकक्षा वाढवण्याऐवजी निमूटपणे भाषेची कोंडी करणारा आहे. वादासाठी इंग्लिश भाषेचा अभ्यास आपल्या आंतरराष्ट्रीय संबंधांसाठी जरुरीचा आहे असं मानलं तरी त्याचा अर्थ एवढाच की इंग्लिश भाषा हा विषय म्हणून उत्तम शिकला पाहिजे. माध्यम म्हणून इंग्रजीची गरज नाही. अगदी प्राथमिक स्तरापासून मातृभाषेबरोबरच इंग्रजी भाषा शिकवावी, पण माध्यम म्हणून स्वीकारू नये.

‘‘आपल्याला कदाचित चमत्कारिक वाटेल. पण प्राथमिक शिक्षणापासूनच मराठीची हेळसांड करण्याची रीत आमच्या शिक्षणव्यवस्थेत केलेली आहे. प्राथमिक शिक्षणाचा ढाचाच बदलला पाहिजे. बालवाडीपासून प्राथमिक शिक्षणाच्या सर्व स्तरांवर आपण मुलांना अनेक भाषा शिकवल्या पाहिजेत. मराठी, इंग्रजी किंवा हिंदी, जवळच्या एखाद्या प्रदेशाची भाषा आणि संस्कृतदेखील, प्राथमिक शाळेपासूनच शिकवता येईल. मुलं पटापट भाषा शिकतात. भाषाशिक्षणाला बोजा समजतात ते पालक किंवा शिक्षक! सर्वांनी बहुभाषक होण्याची आपल्या संघराज्यात गरजच आहे. बाकी विषयांची भारूडभरती करण्यापेक्षा बालकांच्या शिक्षणात लेखन, वाचन आणि अंकगणित एवढ्यापुरतीच शिक्षणाची सीमा ठेवली तरी चालेल.

भाषाशिक्षणात उच्च स्तर आणि निम्न स्तर असला भेदाभेद असता कामा नये. तसंच पीसीएम आणि पीसीबी यांनाच महत्त्व देण्याचा वेडेपणा थांबवून मराठीचा अभ्यासही समान महत्त्वाचा मानला पाहिजे. वैद्यक, स्थापत्य, तंत्रज्ञान अशा विद्याशाखांत मराठीची गरज नाही असं मानणं चुकीचं आहे. ज्या समाजात आपल्या शिक्षणाचं विनियोजन करायचं असतं त्या क्षेत्रातील कामकाजासाठी सर्वांना लोकभाषा आलीच पाहिजे. आपल्या कामासाठी इंग्रजीचा आश्रय करावा हे केवळ हितसंबंधांसाठी तथाकथित सुशिक्षित लोक मानतात. आपण इंग्रजी शब्दांचा मारा केला की, ते न समजणाऱ्या लोकांना फसवता येतं आणि आपला स्वार्थ साधता येतो. 

‘‘मायभाषेचा आग्रह प्रत्येक क्षेत्रात कदाचित धरता येणार नाही. विशेषतः उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालय यांतील सुरळीत कारभारासाठी सर्व संघराज्याला संपर्कभाषेचा स्वीकार करावाच लागेल. सर्व प्रदेशांतील उच्च न्यायालयांचे निवाडे सर्व प्रदेशांत समजावे लागतील आणि सर्वोच्च न्यायालयालाही भिन्न भिन्न उच्च न्यायालयांतील विचारविमर्श जाणून घ्यावा लागेल.’’

आंतरभारतीचा स्वीकार :

‘‘मराठी भाषेवरचं आमचं प्रेम म्हणजे दुसऱ्या भाषांचा द्वेष नव्हे. खरं म्हणजे ज्या क्षणी आपण भाषिक राज्यांची कल्पना प्रत्यक्षात आणली त्या क्षणी विविध प्रदेशांतील भाषांच्या जाणकारीचं आपण स्वागतच करायला हवं होतं. साने गुरुजींच्या आंतरभारतीचा स्वीकार त्यांच्या जन्मशताब्दीच्या वर्षात तरी आपण करू या! कोणी म्हणतील, 'भाषा भाषा, शिकाच्या तरी किती भाषा?' हा प्रश्न आज हास्यास्पद वाटतो याचं कारण आपण सर्व क्षेत्रांतच नवा विचार करायला नाराज असतो, नाखूश असतो. आपल्या प्रदेशात एक पाठ्यपुस्तक मंडळ आहे. पाठ्यपुस्तक निर्मितीशिवाय या मंडळाकडे अभ्यासक्रमाच्या नवनिर्मितीचं कामही दिलेलं आहे.

गेल्या कित्येक वर्षांत या मंडळानं अभ्यासक्रमाच्या नवनिर्मितीच्या क्षेत्रात शून्य काम केलेलं आहे. या मंडळावर कोणत्या व्यक्ती नेमल्या जातात? मंडळावरील प्रतिनिधित्व जिल्हावार किंवा जातवार ठरवलं जातं. नवा शैक्षणिक विचार करण्याची कुवत असणाऱ्या माणसांना त्यात स्थान नसतं. जीवनाच्या अनेक क्षेत्रांत खाजगीकरणाला वाव दिला जात आहे. अनेक क्षेत्रांत शिथिलीकरण, उदारीकरण होत आहे. मग पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत तरी शासनाचा एकाधिकार कशाला? असा एकाधिकार नसताना पाठ्यपुस्तकं चांगली निघत होती. मग आता यापुढेही नव्या तज्ज्ञांना, विचारवंतांना त्यांची प्रयोगशीलता उपयोगात आणायला का मना असावी ? इतर प्रांतांच्या नागरिकांनी आपली मुलं महाराष्ट्रातील शाळांत घालताना त्यांना शिक्षण नेमकं कसं मिळणार आहे याची चिंता केलेली नाही आणि आपणही त्यांची चिंता केलेली नाही, पण महाराष्ट्रातल्या सर्व मुलांची तरी आपण कुठे चिंता करतो आहोत? उदा. आदिवासी मुलांना शिकवताना, त्यांना सहज समजेल अशा भाषेत प्राथमिक शिक्षण तरी आपण देतो का? पहिली तीन वर्षं त्यांना त्यांच्या भाषेत शिकू द्यावं आणि क्रमशः त्यांना प्रमाणभाषा अवगत होईल असं करावं, अशी ताराबाई मोडक यांची सूचना होती. त्या सूचनेचं काय झालं? मी नुकतंच, विदर्भात 'झाडी' भाषेत साहित्य निर्माण झालेलं पाहिलं.

अहिराणी, खान्देशी, डांगी, ठाकरी, कोकणी अशा नाना प्रकारच्या बोली बोलणारे लोक आता शिक्षित होणार आहेत. मुख्य प्रवाहात येणार आहेत याचा, विचार कोण करणार आहे? पुन्हा बोलीभाषा केवळ विभागीय असतात असं नव्हे. त्या उपेक्षित जाती-जमातींच्याही असतात. परिवर्तन ही संज्ञा व्यापक आहे आणि सखोलही आहे. परिवर्तन केवळ समाजाच्या बांधणीपुरतं मर्यादित नाही. प्रत्येक क्षेत्रात कालानुरूप बदल करण्याची गरज असते हे परिवर्तनावर असणाऱ्या सर्वांनी ओळखले पाहिजे. मराठीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पायाभूत आहे ते शिक्षण, हे ओळखून शिक्षणाची आमूलाग्र फेररचना करायला आपण प्राधान्य दिलं पाहिजे.’’

लौकिक व्यवहारातील पिछेहाट :

‘‘शिक्षणानंतर प्रश्न येतो लौकिक व्यवहाराचा. महाराष्ट्रात लौकिक व्यवहारांतही मराठीची पिछेहाट झालेली आहे. टपालखाते, तारखाते, दूरध्वनी येथील सर्व व्यवहारांचे अर्ज आणि तर्जुमे महाराष्ट्रात तरी मराठीतच असले पाहिजेत. रेल्वे, बसगाड्‌या, आगगाड्या, विमानतळ- दवणवळणाची सगळी खाती पाहावी तर कुठेही मराठीच्या वापराचा आग्रह नाही. बँका, स्टॉक एक्स्चेंज, व्यापारी संघटना आणि त्यांचे व्यापार... कुठेच मराठीची गरज भासत नाही. त्यामुळे मराठी जनता म्हणजे केवळ दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी पिणारी रयत झाली आहे.

आर्थिक उलाढालींच्या केन्द्रात मराठीला स्थान नाही. मग मराठी माणसं नोकरीपेशाकडे वळतात. पण या पेशातदेखील सगळा बडिवार आहे तो इंग्रजीचा. पत्रव्यवहाराचं काम म्हणावं तर तिथे मराठीला स्थान नाही. हिशेबटिशेब करायला मराठीत आकडेमोड थोडीच करायची असते? जणू इथे एक स्वर्गीय आकाशवाणी झाली आहे- ‘रामा होऽऽ तुम्ही भाजी घासा घाट्यांनो, माथाड्यांनो तुम्ही हमाली करा. सखुबाई, सोनुबाई तुम्ही कथलाचे वाळे घालून फार तर केळी विका आणि गॅज्युएट देशी साहेबांनो, तुम्ही बाबू पीछेलाल इंग्रजीत बड्‌या अन्य भाषिकांचे मोस्ट ओबीडियन्ट सर्व्हंट व्हा. खरोखर इंग्लिश हा विषय न घेता शालान्त परीक्षा का उत्तीर्ण होता येऊ नये? शासनाच्या सूचना मराठीऐवजी इंग्रजीत का असतात? बँकांमध्ये लोकभाषेऐवजी आग्रह धरला जातो हिंदीचा. तिथे हिंदी भाषेवे तज्ज्ञ अधिकारी म्हणून घेतले जातात.

'अरे भाई, इंग्लिश में या हिंदी में बोलो । तुमचा इकडे तिकडे आम्हांला नाही समजेल'- असं आम्हांला मराठी मुलखात ऐकावं लागतं. महाराष्ट्राच्या राजधानीत साधा बस कंडक्टर आणि पाशिंजर यांचं संभाषण मराठीऐवजी बंबईया हिंदीतून होतं. मराठी बोलणाऱ्याची संभावना ‘ए तात्या’ किंवा 'ए मावशीबाय' अशी केली जाते. मुंबईतली कार्यालयं आणि दुकानं यांच्यावरील पाट्या मराठीत असाव्यात एवढादेखील नियम आपल्याकडे नाही. खरं म्हणजे मराठी भाषेत पाटी लावण्याचा कायदा 1948 स्पष्ट शब्दांत काय म्हणतो ते पाहा -

“The Bombay Shop and Establishments Act, 1948 20A. Name boards to be in Marathi - The name boards of every establishment shall be in Marathi in Devnagari Script. Provided that, it shall be permissible for the employer to have the name board in any other language or, languages or script or scripts (in addition to Marathi in Devnagari Script).

‘‘मुंबई दुकाने व आस्थापना अधिनियम 1948 (20अ). नामफलक मराठीत असावा. प्रत्येक आस्थापनेचा नामफलक मराठीत असावा. परंतु मालकाला (मराठी भाषेत आणि देवनागरी लिपीत असेल त्या खेरीज) मराठीबरोबर इतर कोणत्याही एक किंवा अनेक भाषांत किंवा भाषांमध्ये आणि लिपीत किंवा लिप्यांमध्ये नामफलक लावण्याची परवानगी असेल. ‘‘कितीही आक्रोश केला तरी मराठीचा भाग्योदय होईल की नाही, याविषयी मी साशंक आहे. मराठी मुमुर्षू आहे म्हणजे तिला मरण्याची इच्छा आहे, याचं कारण मराठी माणसांचाच मराठीला जगवण्याचा विचार मरू घातलेला आहे. मरणवांछेने (death wish) पछाडलेल्या माणसाचे मरण अटळ झालेलं असतं.

मराठीची दुर्दशा अन्य भाषकांनी केलेली नाही. मराठीला मारण्याचा कट न हिंदीच्या समर्थकांनी केला आहे, न इंग्रजीच्या. आपणच आपल्या भाषेचे मारेकरी व्हायला खुशीने तयार झालो आहोत. हे बोलणं कुणाला आततायीपणाचंच वाटेल पण ते सत्य आहे. मायभाषा जगवण्यासाठी तिच्या पुत्रांनीच आपली प्रबळ इच्छाशक्ती जागृत केली पाहिजे. आपल्या समाजाच्या चिरफळ्या उडालेल्या आहेत धर्मांच्या नावाने, जातींपातीच्या लेबलाखाली, पक्ष-पंथांच्या अभिनिवेशांनी आपल्या ऐक्यभावनेला केव्हाच मूठमाती दिलेली आहे. प्रदेशाप्रदेशांतले तणाव उणावलेले नाहीत. अनुशेषांची आकडेवारी मांडून आपण आपल्या अंतर्गत बेबनावांचं प्रदर्शन मांडत असतो. दलित आणि दलितेतर, मनुवादी आणि मन्वंतरवादी, नागर आणि ग्रामीण- अशी विषमतेची नाना रूपं आहेत. 'तुम्ही एक वर्तुळ आखून आम्हांला त्याच्या बाहेर ठेवता. आम्ही तुमच्यापेक्षा मोठं वर्तुळ काढून तुम्हांला आमच्यातच ठेवतो', अशी भावना व्यक्त केली तरी ती लक्षात कोण घेतो? तीच गोष्ट आहे मराठीविषयीच्या अभिमानाची, मराठी मनाला हवं आहे तरी काय, याचा आज कोणीच गंभीरपणे विचार करत नाही. 

‘‘आता मराठी भाषेचा अभिमान असणाऱ्यांनी स्वतःची एक व्यापक सनद निर्माण करण्याची आवश्यकता आहे. हे काम केन्द्र शासनाचं नाही, राज्य शासनाचंही नाही. साहित्य महामंडळाच्या नेतृत्वाखाली मराठीच्या सुपुत्रांनी आणि मानकऱ्यांनी मराठीची महासनद (मॅग्ना चार्टा) सिद्ध करणं आवश्यक आहे. शैक्षणिक, शासकीय आणि लौकिक- तिन्ही क्षेत्रांत मराठीच्या अभ्युदयाच्या दृष्टीने आपल्या काय मागण्या आहेत ते आपण स्पष्ट आणि तपशीलवार सांगितलं पाहिजे. या सनदेत दर्शवलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पक्षातीत दृष्टीनं आणि अभंग एकोप्यानं आपणांस परिश्रम करावे लागतील. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसारखाच आज मराठीच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. आपापल्या राहुट्यांवरील बावटे खाली करून मराठीच्या अस्मितेचा एकच ध्वज आपल्या माथ्यावरच्या आभाळात फडकला पाहिजे.

महाराष्ट्राच्या राजधानीत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा अद्ययावत अभ्यास करणारे बुद्धिमंत आहेत. विद्यापीठांची अभ्यासमंडळे आहेत. शासकीय आणि निमशासकीय संस्था आहेत. कोशकार आणि संशोधक आहेत. निर्भयपणे मायमराठीचा पुरस्कार करणारे भाषाभिमानी आहेत. महामंडळाने आणि घटक संस्थांनी हे कार्य एकजुटीनं करायचं ठरवलं तर सर्व संबंधितांच्या साहाय्यानं एक प्राणभूत व्यापक योजना करणं, हे केवळ स्वप्न नाही. माझं एकट्याचं तर ते असूच शकत नाही. मुंबई आणि महाराष्ट्रातील आकाशवाणी आणि दूरदर्शन केन्द्र मराठीचा कितपत मान राखत आहेत? महाराष्ट्रातील शिक्षणसंस्था आणि विद्यापीठं मराठीच्या विकासासाठी काय परिश्रम करायला तयार आहेत? - या सर्व बाबींचा विचार करून मराठीची महासनद निर्माण करण्याचा शुभारंभ आपण तत्काळ केला तर ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अलौकिक यश ठरेल असा मला विश्वास वाटतो.

‘‘मराठीच्या भवितव्याविषयी मी काही विचारप्रदर्शन केलं आणि जी खास माझी प्राणशक्ती असं मी म्हणतो त्या कवितेविषयी मी काही बोलतच नाही हे अनेकांना विपरीत वाटेल. मतदारांनी तुम्हांला मराठी कवितेचे आजन्म सेवक म्हणून निबहून दिलं आहे तर तुम्ही कवितेसंबंधी बोला, साहित्यासंबंधी बोला, अशी अपेक्षा आपल्यातीलच काही जण करतील. या विषयासंबंधी बोलण्यापूर्वी मला आपल्याला जाणीव करून द्यायची आहे ती ही की, राजवंश येतात आणि जातात; युगकर्ते पुरुष आणि महान सम्राट अशी बिरुदंही आपण अनेकांच्या मागे लावतो. पण आता मागे नजर टाकली तर असं दिसतं की समाजाचं चैतन्य कवितेमधून प्रकट होतं. आणि म्हणून कालखंड मोजले जातात ते राज्यकर्त्यांच्या नावाने नव्हेत तर त्या त्या काळातील कवींच्या नावाने. नाममात्र एखादा कालखंड राणी एलिझाबेथचा म्हणून ओळखला जातो. पण वस्तुतः तो असतो शेक्सपिअरचा कालखंड. आपण म्हणतो यादवकालीन जमाना पण त्याची ओळख ज्ञानेश्वरांसारख्या कवीमुळेच अधिक सार्य ठरते. हे मी एक कवी म्हणून बोलत नाही. बाङ्मयेतिहासातील एक सत्य, एक वस्तुस्थिती म्हणून मी हे आपणांस सांगितलं.

‘‘मराठी वाङ्मयाची सद्य:कालीन विशेषता कोणती? ज्यांना आपण तळागाळाचे प्रतिनिधी म्हणतो त्या लेखकांनी साहित्यामध्ये सर्व कोंडलेले प्रवाह मोकळे केले आहेत, असं आपल्याला दिसतं. दलित साहित्य आणि दलित साहित्यिक यांच्यासाठी दुसरी पंगत मांडणं व त्यांचे पाट आडवे ठेवणं मला मंजूर नाही. दलित साहित्याने विशेषतः कवितेने, एकूणच मराठी साहित्याच्या साचलेल्या पाण्यावर नवे संस्कार केले आहेत असं मी मानतो. आधुनिक मराठी कवितेत बोरकर, कुसुमाग्रज, मर्ढेकर, पु. शि. रेगे, इंदिरा प्रभृतींनी जुन्या मळवाटांऐवजी नव्या वाटा निर्माण केल्या. मराठी कवितेवर त्यांचं ऋण आहेच. पण दलित कवींच्या विद्रोहानं कवितेच्या अंतःस्वरुपाला निराळं आणि मोठं बढळ दिलं हेही आपण ओळखलं पाहिजे. हे खरं की, चांगल्या दलित लेखकांची पहिली साहित्यकृती आत्मचरित्रपर असते आणि दुर्दैवाने या पहिल्या कृतीचीच त्यांनी शेवटची कृती करून टाकली आहे, असं दिसतं. या घटनेला कारण हेच आहे की दलित साहित्याला दलितेतर साहित्यापासून आपण अलग काढत असतो. मराठीच्या मुख्य प्रवाहाला नवं वळण देण्याची, नवी कलाटणी देण्याची त्याची शक्ती आपण ओळखतच नाही.

जीवनाचं दर्शन घडवताना वरवरच्या थरातल्या जीवनाचं गुळगुळीत दर्शन घडवण्याऐवजी तळागाळातील जीवनाची भीषणता प्रतिबिंबित करण्याची ऊर्मी दलितेतर लेखकांतही बळावायला हवी. यावं थोडंबहुत दर्शन मुक्त झालेल्या स्त्रीवादी लेखनात पडतं. पुरुषी वर्चस्वाखाली निर्माण झालेल्या साहित्यातून दिसणाऱ्या भोगवादी आणि लंपट जीवनचित्रणापेक्षा काही लेखिका, आज स्त्रीजीवनाचे वाभाडे कसे निघत आहेत याचं मर्मस्पर्शी दर्शन घडवताना दिसतात. म्हणजेच एका निराळ्या संदर्भात हे दलितांहून दलित असलेल्या समाजाचं चित्रण असतं. 

‘‘प्रेरणेचे झरे आकाशातून पडणाऱ्या पाणलोटांचे कशाला असले पाहिजेत? त्यापेक्षा भूगर्भातून उसळणाऱ्या झऱ्यांचं महत्त्व अधिक आहे. माझ्या प्रतिपादनाचा अर्थ असा नाही की, दलित लेखकांनी लिहिलेलं सर्वच साहित्य मला उच्चतर वाटतं. दलितांचं साहित्य हे फक्त आत्मकथनापुरतं मर्यादित राहू नये, तर त्यांनी कल्पनेच्या भेदक नजरेनं एकूण दुनियादारीची चित्रंही काढावीत. म्हणजेच त्यांच्या साहित्याच्या दर्शनाने एकूणच मराठी कथा-कादंबऱ्यांचा जुना ठसा पुसून जाऊन त्यात अभिनव जीवनदर्शन घडू लागेल. दलित साहित्य आणि दलितेतर साहित्य असा भेद साहित्यात करणं चुकीचं आहे. दलित साहित्याने एकूणच साहित्याला आपल्या शक्तीचं वरदान दिलं पाहिजे.’’

कविता भुसकट पेंढा झाली :   

‘‘कविता ‘गवताऐसी उदंड’ झाली तर काही बिघडलं नाही; पण ती भुसकट पेंढा झाली आहे, चैतन्य हरवून बसली आहे असं आजचं दृश्य आहे. एक तर कविता छंदमुक्त होता होता ती आपलं सर्वस्व गमावून बसली आहे, याची अनेक निदर्शनं आहेत. पहिली गोष्ट अशी की कविता ही कलाकृती आहे ही जाणीवच नाहीशी झाली आहे. त्यामुळे एकूणच कविता आकृतिबंधविरहित झालेल्या आपल्याला दिसतात. कविता म्हणजे भाषेचं उत्कट रूप असायला पाहिजे. त्याऐवजी भाषेचा अघळपघळपाणा, रचनेचं ढिसाळपण आणि निरर्थक पुनरुक्ती यांनीच कवितेच्या विश्वात थैमान मांडलेलं दिसतं.

पूर्वीचे कवी दुसऱ्यांचं अनुकरण करीत असत म्हणे, पण आताचे कवी तर स्वतःचंच अनुकरण पुन्हा पुन्हा करत असतात आणि एकाच कवितेची पुन्हा पुन्हा आवृत्ती काढीत असतात. कविता काय आणि इतरही साहित्यप्रकार काय, निर्मात्याच्या अनुभवसंपन्नतेशी त्यांचं नातं दृढ झालेलं असलं पाहिजे. ही अनुभवसमृद्धी जर तोटकी असेल तर तो पोकळपणा साहित्याच्या निर्मितीतही जाणवल्याशिवाय राहत नाही. आपण कवितेतली युगं फारच स्वस्त करून टाकली आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन युगांची कल्पना मी समजू शकतो. पण साठोत्तरी कविता, सत्तर ते या दशकातली कविता असल्या कालखंडांची गणना ढिसाळ पायावर केली आहे. काळ आणि समाज यांचं प्रतिबिंब कवितांत पडतं; नाही असं नाही. पण काळ आणि परिस्थिती यांच्या पल्याड प्रबळ भावनांचं उत्कट दर्शन घडविणारी कविताही असते, याचा आपल्याला विसर पडलेला आहे. अधू दृष्टीने केलेल्या समीक्षेमुळे प्रतिभावंतांनी निर्माण केलेल्या रसपूर्ण कवितेवरील, सामर्थ्यसंपन्न कवितेवरील लक्ष उडून चाललं असून तात्कालिक स्वरूपाच्या संसृतिटीकेवर आधारलेली कविता वाढू लागली आहे. मान्यता पावू लागली आहे. 

‘‘कवितेच्या रसग्रहणाची चांगलीच गोची झालेली आहे. कवितेत काव्यात्मता किती आहे यापेक्षा काव्यात्मतेच्या आभासावरच मंडळी खूश असतात. कविता शिकवणाऱ्यांनी तर अनन्वित अत्याचार चालविलेले असतात. अर्ध्याकच्च्या ज्ञानाच्या आधारावर पुस्तकातले कवितापाठ शिकवले जातात. शिक्षणसंस्थांची संख्या आता खूप वाढलेली आहे. त्यामुळे अर्ध्याकच्च्या समजुतींचे गुणाकारही खूप वाढत जातात. कवितांचे चुकीचे अर्थ लावण्यापेक्षा आणि त्यांच्यावर मनमानी टीकाटिपणी करण्यापेक्षा अभ्यासक्रमात कवितांचा अंतर्भाव करू नका असं सांगण्याची वेळ आली आहे.

काव्यविधातल्या दुरवस्थेला केवळ अध्यापक आणि समीक्षकच जबाबदार नाहीत. स्वतःच्या करणीने कवींनीच ही स्थिती ओढवून घेतली आहे. 'कविता ही आकाशीची वीज आहे. तिला धरू पाहणाऱ्या शंभरातले नव्व्याण्णव जळून जातात', असे केशवसुत म्हणाले होते. या न जळलेल्या एक टक्क्यात आपला समावेश असावा अशी कोणी अपेक्षा ठेवली तर ती योग्य म्हणता येईल. पण हा विवेक न ठेवता गतप्राय ओळीच्या चवडीवर चवडी रचणारी माणसं कवित्वावर आपला हक्क सांगत आहेत. या मंडळींना सांगावंसं वाटतं, जरा सबूर. पांढऱ्यावर काळे करण्यापूर्वी जरा आत्मचिंतन करा. आपण कोणतं व्रत घेतो आहोत याचं भान ठेवा. मैफलींचा नाद सोडा. कविसंमेलनात घुसण्यासाठी तळमळू नका. अनेकदा तर कविसंमेलनं म्हणजे कवींची साठमारी वाटू लागते. 'आम्हांला एक चान्स द्या' म्हणून कवी अजीजी करतात.

आपण सूर्यकुळाचे वंशज आहोत याचा त्यांना विसर पडतो. परिणामी ते तर हास्यास्पद ठरतातच; पण एकूण कविता हा विषयच समाजाच्या लेखी उपहासाचा विषय ठरतो. कवींनी आत्मसन्मानाची बूज राखली तर तेही आपल्या भाषेच्या प्रगल्भतेचं एक सुचिन्ह ठरेल. काही प्रसंगी तर कवींची संख्या श्रोत्यांच्या संख्येपेक्षा अधिक झालेली असते. अशा वेळी मला वाटतं की कवींना प्रेक्षागृहात बसवावं आणि जे कोणी श्रोते उरतील त्यांना व्यासपीठावर बसवावं. एके काळी सपक प्रेमकवितांनी आणि सांकेतिक निसर्गकवितांनी उच्छाद मांडला होता. आता ती जागा उथळ सामाजिक जाणिवेनं आणि विद्रोहाच्या भडक भाषेनं घेतली आहे.

एक गोष्ट उघड आहे. विद्रोही साहित्यानं, विशेषतः कवितेनं, एका नव्या युगाचं प्रवर्तन केलं. गेल्या 25-30 वर्षांत साहित्याचं आळलेलं, थिजलेलं तळं फोडून टाकण्याचें बरंचसं श्रेय विद्रोही साहित्यालाच दिलं पाहिजे, पण विद्रोहाची भाषा बटबटीत झाली, काल्पनिक दुःखांसाठी कविता जर सतत आक्रोश करू लागली तर विद्रोहाच्या भावनेतील शक्ती क्षीण होत जाते. सूचकतेची धार बोथट होत जाते. आज समाजातील नवे नवे घटक आपली प्रखर जीवनदृष्टी घेऊन साहित्याच्या विश्वात येत आहेत, त्यांचं सर्वांनी आनंदानं स्वागत केलं पाहिजे. शिक्षणाचे आणि त्यातही साहित्याचे संस्कार आत्मसात करण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे. छोटी साहित्य संमेलनं अधिकाधिक संख्येनं भरत आहेत, ही घटनाही स्वागतार्ह आहे. परंतु क्रीडा क्षेत्रातून ज्याप्रमाणे आपण जात व धर्म यांवर आधारलेले वर्गीकरण कालबाह्य ठरवून रद्द केलं, त्याप्रमाणे साहित्याच्या क्षेत्रातही धर्म, पंथ, जाती यांची लेबलं माथ्यावर लावलेली संमेलनं भरवू नयेत. 

‘‘महाराष्ट्राचं क्षेत्र आता विस्तारानं खूप वाढलेलं असल्यामुळे विभागवार संमेलनं भरवणं मात्र अपरिहार्यच झालं आहे. कोकण, विदर्भ, मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र अशी विभागीय संमेलनं सांस्कृतिक वातावरणाच्या दृष्टीनं लाभदायकच आहेत. परंतु मुस्लीम साहित्य संमेलन, ख्रिश्चन साहित्य संमेलन, नवबौद्ध साहित्य संमेलन यांचे वेगळे प्रपंच मांडू नयेत अशी मी सर्व संबंधित मंडळींना मनापासून विनवणी करतो. तीच गोष्ट स्त्रियांचे वा स्त्री-वाद्यांचे वेगळे गोट निर्माण करण्याची. संतवाङ्मयात जशी महान संतपुरुषांबरोबर जनाई. मुक्ताई, कान्होपात्रा, बहिणाई यांची कर्तुकी कमी मोलाची नाही, तशीच आधुनिक साहित्यातील मानकऱ्यांमध्ये रमाबाई रानडे, लक्ष्मीबाई टिळक, कुसुमावती देशपांडे, कमलाबाई देशपांडे, बहिणाबाई चौधरी, दुर्गा भागवत, इरावती कर्वे, मालतीबाई बेडेकर, इंदिरा संत, शांता शेळके, संजीवनी मराठे, पद्मा गोळे, शिरीष पै यांचीही कर्तुकी महत्त्वाची आहे. अगदी अलीकडच्या काळातही मराठी साहित्य निर्मितीत कथा-कादंबऱ्यांच्या क्षेत्रात दर्जेदार लेखन करणाऱ्यांत गौरी देशपांडे, आशा बगे, सानिया, प्रतिमा इंगोले, शांताबाई कांबळे, मल्लिका अमरशेख, अरुणा ढेरे प्रभृती अनेक लेखिकांचा समावेश आहे. आता लेखक आणि लेखिका अशा भेदकल्पनेला जागा उरलेली नाही.’’

कृतिशूर परिवर्तनवादी :

‘‘आता मुंबईमध्येही तीन साहित्य संमेलनं भरत आहेत. परंतु अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे परिवर्तनविन्मुख आहे असं विधान काही लोक सर्रास करतात हे आपण पाहतो. परंपरावादी आणि परिवर्तनवादी यांच्यांत पाचर ठोकली पाहिजे असं जे मानतात त्यांची मला कीव येते. प्रत्येक प्रतिभावंत लेखक परिवर्तनासाठीच आसुसलेला असतो असं मी मानतो. जग अथवा समाज यांचं स्वरूप काय आहे याची जाणीव झाल्यानंतर हे स्वरूप कसं असावं, ते आपण सांगितलं पाहिजे, अशी प्रेरणा त्याच्या अंतर्यामी असते, आहे आणि असावी. यांतलं अंतर मिटवून एकजिनसी समाजाने उन्नतीच्या मार्गाने वाटचाल करावी अशी सर्वच परिवर्तनवाद्यांची वृत्ती असते. व्यापक आणि सखोल अर्थाने प्रत्येक नवनिर्मितीचा उगम याच वृत्तीतून होतो. हा रोमँटिसिझम असेल तर आपण सगळेच रोमँटिक असतो. सर्व प्रकारची गुलामगिरी नष्ट व्हावी, दासवृत्ती मावळून जावी हाच परिवर्तनाचा आशय आहे ना? कृतिशूर परिवर्तनवादी अनेक विधायक आणि विघातक कृतींच्या द्वारे जो परिणाम घडवू पाहतात तोच परिणाम प्रतिभावंत साहित्यिकांनाही अभिप्रेत असतो. किंबहुना कृतीच्या मागे स्फूर्ती देण्याचं काम साहित्यानं केलेलं असतं. साहित्यिकांना केवळ ‘वाचावीर’ म्हणणं बरोबर नाही. उलट द्रष्टेपणानं ते भविष्यकाळाच्या वाटा दाखवीत असतात. ते प्रचारक नसतात पण प्रसारक असतात.

प्रचार हा 'मोले घातले रडाया' या न्यायाने तरी होतो किंवा मर्यादित स्वार्थासाठी होतो. पण ‘अंतःस्फूर्ती’ने सुचलेले विचार समर्थ शब्दांच्या माध्यमातून जे प्रसृत करतात त्याला प्रसार म्हणतात. आपल्या पसंतीला न उतरलेल्या विचारांना जे दडपशाहीने, बाहुबळाने नष्ट करू पाहतात, त्यांना शरण न जाणं हा साहित्यिकांचा धर्मच आहे. साहित्य आणि कला यांच्या क्षेत्रात भलाई आणि बुराई दोन्ही असू शकतात. पण मी म्हणेन तीच भलाई असा हेका चालवण्याचं कोणालाही कारण नाही. 'न्यून ते पुरते आणि अधिक ते सरते' करून घेण्याचं काम काळच करत असतो. म्हणून आपण परिवर्तनाचे पुरस्कर्ते असतो, त्याप्रमाणे आविष्कार-स्वातंत्र्याचेही पाठीराखे असले पाहिजे.’’ 

गुरुजींचे स्वप्न :

‘‘आपण सारे एका युगांताच्या आणि नवयुगाच्या सीमारेषेवर आज उभे आहोत. पण मानवाचा इतिहास आपल्याला सांगतो की, सर्व क्षणिक असले तरी गेल्या पाच-सात हजार वर्षांत सुस्थिर झालेली शाश्वत जीवनदृष्टी म्हणूनही काही निर्माण झाली आहे, तिचं श्रेय समग्र मानवी इतिहासालाच आहे. हिंसा आणि बळजबरी अभद्र आहेत, संकुचित स्वार्थापेक्षा सर्वकल्याणाची कल्पना आपण स्वीकारली पाहिजे, विकसित केली पाहिजे, हे आज अवघ्या दुनियेचं मत झालं आहे, युगान्त आणि युगजन्म या संकल्पना जरी आपण स्वीकारल्या नाहीत तरी हा दोन शतकांचा संधिकाल तरी आहे! यंदा तर अनेक थोर पुरुषांची जन्मशताब्दी आली आहे. पण आज मला विशेष लक्ष वेधावसं वाटतं ते साने गुरुजींच्या जन्मशताब्दीसंदर्भात. विसाव्या शतकाचा पूर्वार्ध साने गुरुजींच्या जीवनकार्यामुळे चैतन्याने भारला गेला आणि त्यांच्या मृत्यूनंतरच्या अर्धशतकात त्यांचं स्मरण आपल्याला 'संतत स्फुरणदायी' ठरलं आहे.

विद्यालय, ग्रंथशाळा, इस्पितळ, सांस्कृतिक संस्था अशी अनेक कार्यक्षेत्रं साने गुरुजींच्या स्मरणाने सजग झाली आहेत. पण साहित्य संमेलनात मला सर्वाधिक महत्त्वाचं वाटतं ते त्यांचं साहित्य आणि संस्कृतिदर्शन. भारतीय संस्कृतीचा विशाल दृष्टिकोन त्यांनी वारंवार स्पष्ट करून सांगितला. त्यांनी ज्यांना आदर्श पुरुषोत्तम मानलं त्यांत स्वर्गीय रवीन्द्रनाथही होते. 'यत्र विश्वं भवति एकनीडम्' म्हणजे ज्ञानेश्वरांच्या शब्दांत सांगायचं तर 'हे विश्वचि माझे घर, ऐसी जेयांची मति स्थिर' असं मानवी जीवन घडवण्याची प्रेरणा रवीन्द्रनाथांनी आपल्याला दिली, त्याचाच भारतापुरता आविष्कार साने गुरुजींच्या आंतरभारतीत झाला आहे. कोणाला कदाचित वाटेल की भाषणाच्या आरंभी मायमराठीचा जागर करू पाहणारा अध्यक्ष भाषणाच्या भरतवाक्यात आंतरभारतीची महती कोणत्या हेतूने सांगत आहे! मी नम्रपणे सांगू इच्छितो की मराठीवर माझं नितांत प्रेम आहे आणि म्हणूनच मला सर्व भारतीय भाषाही प्रिय आहेत. साने गुरुजी म्हणत, ‘‘जो आपल्या आईवर प्रेम करत नाही तो भारतमातेवर काय प्रेम करणार?’’ भारतीय भाषांबाबतही आपण हाच विचार केला पाहिजे. भारत हा अनेक आवाजांचा कोलाहल होता कामा नये, तो एक महान वाद्यमेळ झाला पाहिजे. 

‘श्रुतिसुंदर वाद्यवृन्द भारतात वाजे, 

विविध रंग विविध अंग भारती विराजे 

या सहस्रवीणेवर नित नवीन फुलति सूर

भावगंध, काव्यबंध रचिति ज्ञानराजे’ 

भारतीय भाषांनी एखाद्या सुरेल वाद्यमेळाप्रमाणे परस्परांचं स्वरसौंदर्य वाढवलं पाहिजे, हे सांगण्याचा या गीताचा रोख आहे. हा वाद्यवृन्द केव्हा सुरेल होईल? जेव्हा अनेक जनजीवनांचं सौंदर्य आपल्या जाणिवा समृद्ध करील तेव्हा! एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या भारताने हे साने गुरुजींचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचा निश्चय करावा असं मला वाटतं, या स्वप्नाची अर्थपूर्ण परिसमाप्ती व्हायला हवी आहे. प्रेम, शांती, करुणा आणि विधायक अस्मिता या मूल्यांचा हार्दिक स्वीकार मानवजातीनं केला तरच विश्वकल्याणाची पहाट क्षितिजावर दिसू लागेल. अशा क्षणाला सर्व दुनियेची प्रार्थना एकच असू शकेल- जी माझ्या ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या समापनाच्या वेळी केली आहे. ज्ञानेश्वरीतील पसायदान म्हणजे विश्वकल्याणाचं महावाक्य आहे. मानव कल्याणाचा तो ओजस्वी साक्षात्कार आहे.’’

Tags: साने गुरुजींचे स्वप्न मराठीची महासनद अभ्युदय मराठी भाषा वसंत बापट अध्यक्षीय भाषण मराठी साहित्य संमेलन dream of sane guruji magna charta rise-up marathi language vasant bapat presidential speech marathi sahitya sammelan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके