डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

संमेलनाध्यक्ष प्रा. वसंत बापट यांनी केलेल्या तेजस्वी भाषणातील काही भाग

‘‘लेखक म्हणजे काय कःपदार्थ समजता? ते लेखकांना- वाङ्मयसेवकांना विचारत नाहीत. साहित्यिक चांगले काम करीत नाहीत, असे म्हणतात, पण जगाचा इतिहास मुख्यतः लेखकांनीच घडविलेला आहे. भारतीय संस्कृतीची उभारणी भारत, भागवत आणि रामायण या त्रयींवर झालेली आहे. प्राचीन ग्रंथांतील शब्द मंत्राने प्रेरित झालेले होते. संस्कृतीचा कळस या शब्दांवरच उभा राहिला आहे. फ्रेन्च राज्यक्रांती घडविणारे किंवा ब्रिटिश साम्राज्यशाहीला धक्का देणारे लेखकच होते. लेखक समाजाला स्वप्न देतो, तेव्हा समाज कंबर कसून उभा राहतो आणि त्याचे खरेखुरे राज्य अवतरते.

"गुंडगिरीने, ठोकशाहीने किंवा पैशाच्या मिजाशीने कोणी समाज चालवू पाहत असेल, तर जनशक्तीच्या जोरावर आम्ही ही गुंडगिरी चालू देणार नाही. कोणी पंचवीस लाख काय, पंचवीस कोटी रुपये दिले, तरी आमचा आत्मा कदापि विकणार नाही. आमच्या सहनशीलतेचा अर्थ मनाचा कमकुवतपणा, असा कोणी लावीत असेल, तर आपण तो झडझडून दूर केलाच पाहिजे. श्री. मनोहर जोशी यांचे प्रचलित आडनाव जोशी असे असले, तरी ते खरे म्हणजे 'गोडबोले' असेच असले पाहिजे. हा गोडवा कायम ठेवूनही त्यांना कोंडीत पकडणाऱ्यांना त्यांनी कधी कधी चार शब्द सुनावलेही पाहिजेत. माझे बोलविते धनी कोणी वेगळेच आहेत, असे सांगताना त्यांनाही संकोच वाटला पाहिजे. आम्हांला आमचा महाराष्ट्र सभ्य, समंजस आणि सौजन्यशील लोकांचा हवा; पण तो स्पष्टवक्तेपणाचाही असावा, अशी आमची अपेक्षा आहे.

पंचवीस लाखांच्या देणगीचे बूच कोणी आमच्या तोंडात घातले, तरी आम्ही गप्प बसणार नाही. कारण आम्ही आमचा आत्मा विकावयास काढलेला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी आपल्या शाळकरी मुलाच्या मुख्याध्यापकांना उद्देशून लिहिलेले पत्र मला खूप आवडते. 'गुरुजी, त्याला भल्यांशी भलाईने वागायला शिकवा; पण गुंडगिरी करणाऱ्यांना अद्दल घडविण्याचेही शिकवा. गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावे, कारण त्यांना नमविणे सर्वांत सोपे असते.' या त्या पत्रातील ओळींचा संदर्भ लक्षात घ्या. पंचवीस लाख रुपये देण्यात आल्याची माहिती मी आज वृत्तपत्रांत वाचली; पण मला काहीच कळेना, की ही रक्कम माझ्या खिशात तर आलेली नाही. मला तर अजून मानधनही मिळालेले नाही. पैसे मिळालेच नाहीत तर मग द्यावयाचे काय? आणि श्री. ठाकरे हे पैसे देणारे केव्हापासून झाले? ते फक्त घेणारे आहेत, असे लोक म्हणतात, एवढीच माझी माहिती आहे. कोणाकडूनही मोफतची तनसडीही नको आहे.

‘‘मराठी लेखकांनी कोणतेही मिंधेपण न स्वीकारता झोटिंगशाहीच्या पुढे वाकता कामा नये, आम्ही अशा पैशांवर थुंकतो. दर संमेलनातून चार-पाच लाख रुपये शिल्लक उरतात. अशा शिलकी रकमेचा एक निधी करावा आणि त्यातून संमेलने व्हावीत, म्हणजे कुणाकडे मदतीसाठी याचना करावी लागणार नाही. पैशाची मिजास कोणीही मिरवू नये. एक वेळ तुम्ही लक्ष्मीधराला हातात ठेवू शकाल; पण धैर्यधराचे धैर्य ही वेगळीच गोष्ट असते. ती कोणाच्याही धमक्यांना भीक घालत नाही. मराठी माणसांच्या जिद्दीबद्दल आपण नेहमी खूप ऐकतो. ती सारी माणसे हे सारे कसे सहन करतात? कोणता तरी एक दांडगेश्वर त्यांना धमकावतो म्हणजे काय? हे फार काळ चालणार नाही. हुकूमशहांनी कितीही शर्थ केली, तरी दुबळी वाटणारी जनता त्यांचा हा गर्व दूर केल्याशिवाय राहत नाही, हा जगाचा इतिहास आहे. आम्ही हुकूमशहांचे चालू देणार नाही, त्यांचा रिमोट कंट्रोल मोडून टाकू.

‘‘लेखक म्हणजे काय कःपदार्थ समजता? ते लेखकांना- वाङ्मयसेवकांना विचारत नाहीत. साहित्यिक चांगले काम करीत नाहीत, असे म्हणतात, पण जगाचा इतिहास मुख्यतः लेखकांनीच घडविलेला आहे. भारतीय संस्कृतीची उभारणी भारत, भागवत आणि रामायण या त्रयींवर झालेली आहे. प्राचीन ग्रंथांतील शब्द मंत्राने प्रेरित झालेले होते. संस्कृतीचा कळस या शब्दांवरच उभा राहिला आहे. फ्रेन्च राज्यक्रांती घडविणारे किंवा ब्रिटिश साम्राज्यशाहीला धक्का देणारे लेखकच होते. लेखक समाजाला स्वप्न देतो, तेव्हा समाज कंबर कसून उभा राहतो आणि त्याचे खरेखुरे राज्य अवतरते.

‘‘पंचवीस लाख रुपये दिले, ही बढाई तुम्ही कोणासमोर मारता? हे पैसे लेखकांना थोडेच दिले आहेत? हे द्रव्य महाराष्ट्र सरकारने दिले आहे आणि पुढील प्रत्येक संमेलनासाठी ही रक्कम दिली जाणार आहे. त्यासाठी कायदेशीर तरतूदही करण्यात आली आहे. आता आपण आपली मूळची ओळखही विसरू लागलो आहोत. मराठी भाषिक मुलेमुली त्यात सहभागी होऊ लागली आहेत. तीळगूळ देणे-घेणे त्यांना पसंत नाही. तो गोडवा त्यांना आता नकोसा झाला आहे. आज आपण समारंभ 'अटेंड' करू लागलो आहोत; तर दूरदर्शनवरील मुलाखती देताना अनेकांना क्रियापदे आठवत नाहीत. सर्वसमावेशक संस्कृती हे आपले वैशिष्ट्य आहे आणि धार्मिक सामंजस्यापेक्षाही ते महत्त्वाचे आहे.’’

Tags: प्रा. वसंत बापट अध्यक्षीय भाषण 72 वे साहित्य संमेलन साहित्य prof. vasant bapat presidential speech 72 th literary convention literature weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके