खुराड्यात टोकाला एक फरशी निघालेली दिसली.जरा ती हलवून पाहिली तर ती हातातच आली आणि आतील छोटेसे तळघर उघडे पडले. तोच प्रकार सरपणाचा. लाकूडफाटा ठेवलेल्या जागीही तीच क्लप्ती वापरली होती. काश्मिरात न्हाणीघरांची रचना विशिष्ट प्रकारे केलेली असते. तेथे पाणी गरम करण्यासाठी बंब वापरतात. तेथे बंबामध्ये जाळण्यासाठी सरपण घातले जाते. एके ठिकाणी बंबाखाली सरपण घालण्याची जी जागा होती, तो सारा कप्पा पेटत्या सरपणासह बाजूला करता येत होता. त्यामागे दरवाजा. आत चार-पाच जण आरामात बसू शकतील अशा जागी हे होते, खिरूमधील 'तकरीबल व्हिलेज' दहशतवाद्यांविरुद्ध कमी तीव्रतेची कारवाई (लिको) करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण या गावात दिले जाते. दहशतवादी कुठे कसे लपलेले असू शकतील, हे दाखवण्यासाठी हे गाव मुद्दाम बसवण्यात आले आहे.हे गाव वसवण्याची कल्पना ऑगस्ट 1994 ला पुढे आली आणि 1997 ला ते स्थापून पूर्ण झाले.
श्रीनगरची हद्द ओलांडून जरा बाहेर आलो. आता मुख्य रस्ता सोडून जरा आड बाजूची डांबरी सडक पकडली. दोन्ही बाजूची हिरवीगार शेते ओलांडून एका गावात शिरलो. सारे गाव टकमका पाहात होते. आमच्या गाड्या आता धुरळा उडवीत पुढच्या गावात शिरल्या. या गावाचं नाव खिरू. त्या गावाच्या पलीकडच्या डोकाला जवान गस्त घालताना दिसले. गाड्या थांबल्या. तीन बाजूला डोंगर. त्या डोंगरांच्या पायथ्याशी बेचक्यात तीस-बत्तीस घरांची वस्ती होती. अस्सल काश्मिरी वस्ती. दाटीवाटीने उभी राहिलेली घरे. लाकडाचा भरपूर वापर. एक माणूस जाऊ शकेल अशा गल्ल्या. बहुतेक घरे अरुंद, दुमजली. छपरे उतरती. काही घरांना थोडेसे आवार. बहुतेक घराच्या पायालगत कोंबड्यांचे खुराडे. लाकूडफाटा ठेवण्याची जागा. कोणत्याही खेडेगावासारखे हे गाव होते. समोर सिमेंटचा पोकळ खांब दिसला. एखादा माणूस उतरून जाईल अशा पायऱ्या होत्या खांबात. पायऱ्या उतरलो, तर एका घराचे आवार होते. जरा बाजूला अर्धवट तुटलेली पाण्याची टाकी होती. जुनाट होती. कळकटलेली. उत्सुकता म्हणून टाकीचे झाकण उघडले तर आत खड्डा दिसला. जवळच्या बॅटरीचा प्रकाशझोत टाकला, तर आत पुरुषभर उंचीचा खड्डा. भुयारासारखे वाटले. उतरून पाहिले तर तो भुयारी मार्गच निघाला. शेजारच्या दुसऱ्या वस्तीच्या दिशेने गेलेला. दुसऱ्या घरात गेलो.जुन्या वाड्यात धान्य साठवायला भिंतीत बखळ केलेली असायची, तशी बखळ दिसली. एक दरवाजा वर जरा बाजूला केला, तर आत एक लपवलेली छोटीशी खोली दिसली. पुढच्या घरात पायरीजवळच कोंबड्याचे खुराडे होते.
खुराड्यात टोकाला एक फरशी निघालेली दिसली.जरा ती हलवून पाहिली तर ती हातातच आली आणि आतील छोटेसे तळघर उघडे पडले. तोच प्रकार सरपणाचा. लाकूडफाटा ठेवलेल्या जागीही तीच क्लप्ती वापरली होती. काश्मिरात न्हाणीघरांची रचना विशिष्ट प्रकारे केलेली असते. तेथे पाणी गरम करण्यासाठी बंब वापरतात. तेथे बंबामध्ये जाळण्यासाठी सरपण घातले जाते. एके ठिकाणी बंबाखाली सरपण घालण्याची जी जागा होती, तो सारा कप्पा पेटत्या सरपणासह बाजूला करता येत होता. त्यामागे दरवाजा. आत चार-पाच जण आरामात बसू शकतील अशा जागी हे होते, खिरूमधील 'तकरीबल व्हिलेज' दहशतवाद्यांविरुद्ध कमी तीव्रतेची कारवाई (लिको) करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण या गावात दिले जाते. दहशतवादी कुठे कसे लपलेले असू शकतील, हे दाखवण्यासाठी हे गाव मुद्दाम बसवण्यात आले आहे.हे गाव वसवण्याची कल्पना ऑगस्ट 1994 ला पुढे आली आणि 1997 ला ते स्थापून पूर्ण झाले. काश्मीरमध्ये दहशतवादी खूप जोरात असल्याचे ते दिवस होते. एखाद्या गावात दहशतवादी शिरले आहेत अशी खातरजमा झालेली असली, तरी प्रत्यक्ष कारवाईत कुणी सापडत नसे. अशावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून त्यांच्यावर कारवाई करणे हे सैनिकांची सत्त्वपरीक्षा पाहणारे होते. एकदा खबऱ्यांनी माहिती दिली होती. दहशतवादी कोणत्या घरात लपून बसले, त्याची पक्की खबर होती. जवानांनी घराचा ताबा घेतला. संपूर्ण घर पिंजून काढले. पण दहशतवादी सापडले नाहीत. एक अधिकारी स्वच्छतागृहात गेला होता. त्याला ते शौचालयाचे भांडे जरा सैल झाल्यासारखे वाटले. त्याने ते हालते का बघितले तर ते चक्क पूर्ण हातातच आले. सर्वसाधारणतः कोणीही शौचकूप उचलू पाहणार नाही, ही गोष्ट लक्षात घेऊनच दहशतवाद्यांनी त्याखाली लपण्यासाठी जागा तयार केलेली होती. त्या खास जागेत पाच दहशतवादी आरामात बसले होते. ही लपण्याची जागा सापडल्यानंतर, जवानांना जागा शोधण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची निकड भासली व हे गाव वसवण्यात आले.
काश्मीरमधील वस्त्या विखुरलेल्या व घरे मात्र खेटून असतात. तेथे कारवाई करणे कठीण जाते. निरपराध व्यक्तीला त्रास होता कामा नये, व अपराधी सुटता कामा नये, हे लष्कराने पक्के ठरविले आहे. म्हणूनच कोणत्याही गावासारखेच गाव येथे प्रशिक्षणासाठी वसवण्यात आले. दहशतवाद्यांच्या आतापर्यंतच्या लपण्याच्या ज्ञात जागा येथील घरात आहेत. नवी क्लप्ती सापडली की येथे नवे घर वसवले जाते. हा परिसरच 'बॅटल स्कूल'चा आहे, येथे सध्या राष्ट्रीय रायफल्सचे प्रशिक्षण दिले जात होते. ही जागाही काही सहज सापडली नव्हती. गाव उभारायची कल्पना पुढे आल्यावर दीडदोन वर्षे जागा शोधण्यात गेली. बराच काळ शोध केल्यावर खिरू गावापासून दूर डोंगरात ही जागा सापडली, काश्मीरमधील उंच पर्वतराजीत लढण्याचे प्रशिक्षणही जवानांना देता येईल, अशी ही जागा आहे. काश्मीरची भौगोलिक स्थिती पाहिली तर तेथे धडकी भरवणारे डोंगर आहेत. पाकिस्तानने प्रशिक्षण दिलेले दहशतवादी, त्यांच्या कारवाया व त्यांनी लपण्यासाठी तयार केलेल्या जागा व क्लप्त्या पाहिल्यानंतर प्रत्यक्ष कारवाईवर जाण्यापूर्वी किंवा दहशतवाद्यांच्या छुप्या कारवाईला तोंड देण्यापूर्वी सैनिकांची तयारी करून घेणे आवश्यक आहे, असे पटते. काश्मीरमधील उंच पर्वतराजी लढाईसाठी कठीण. खालून वर पहाडावर किंवा पहाडावरून खाली 80-85 अंशाच्या कोनात गोळीबार करून शत्रूला टिपणे ही कठीण साध्य गोष्ट. त्यासाठी खास प्रशिक्षणच हवे. त्यामुळे काश्मीरमध्ये बदली होऊन आलेले लष्कराचे जवान व सीमा सुरक्षा दलाचे जवान पहिल्यांदा येथे प्रशिक्षण घेतात. येथे वेगवेगळे कोन असलेल्या, परिस्थिती असलेल्या अनेक 'फायरिंग रेंज' आहेत. जसे इथे पहाडावरून खालच्या दिशेला किंवा खालून वरच्या दिशेला गोळीबाराचे प्रशिक्षण दिले जाते, तसेच अशा भागात मोजक्या जवानांनी जाऊन कारवाई कशी करावी, याचेही प्रशिक्षण दिले जाते. चालत्या गाडीतून दहशतवाद्यांवर हल्ला कसा करायचा याचेही प्रशिक्षण येथे मिळते. आम्हा पत्रकारांना एके-47 चालवण्याची संधी येथे मिळाली.
महूला आम्ही सर्वांनी रायफल्समधून शूटिंग केले होते.त्यापूर्वीही काहींनी एन.सी.सी.त असताना अगर ष्कराच्या एखाद्या दौऱ्यात रायफल हाताळली होती. पण एके-47 पहिल्यांदाच हाती येत होती. सर्वांना पाच गोळ्यांचा राऊंड देण्यात आला. एके-47चे वजन चांगलेच जाणवत होते. नेम धरून पहिली गोळी झाडली आणि खांदा जोरात मागे फेकला गेला. रायफलचा दणका बसत नाही, तर खांद्यांची पकड योग्य नसेल तर एके- 47 खांदा निखळून ठेवील, हे त्या पहिल्याच दणक्याने जाणवले. पाचही गोळ्या बरोबर अंतःवर्तुळात मारणारा मी एकटाच होतो. मेजर दाभोलकर (नागपूर) व मेजर राजगुरू (सातारा) हे मराठी अधिकारी खूष झाले आणि त्यांनी आणखी पाच गोळ्यांचा राऊंड मला दिला. त्याही नेमक्या मारल्या. फक्त त्यानंतर खांदा कामातून गेला होता.खांद्याला व्यायाम देत दाभोलकरराजगुरुंना म्हणालो, 'गोळ्यांनी बरोबर लक्ष्यवेध केला आहे, पण मला तुमच्या कंपनीत सामावून घ्या ना!" मेजर दाभोलकर म्हणाले, "नेमबाजीच्या स्पर्धेत तुला पाठवायला हरकत नाही. पण सीमेवर तुझा उपयोग नाही. तुझ्या दोन गोळ्यांच्या अंतरात शत्रूच्या दहा गोळ्या शरीरात शिरतील." दाभोकरांच्या बोलण्यावर मला अलीकडचा एक राजकीय विनोद आठवला, अटलबिहारी वाजपेयी यांच्या भाषणांतील दोन वाक्यांमधल्या पॉजमध्ये सोनिया गांधींचं अख्खं भाषण संपतं. मी लक्ष्यवेध केला खरा, पण एक गोळी झाली की खांदा नीट करायचा व मग दुसरी गोळी झाडायची असे माझे चालले होते. मेजर राजगुरूंनी एका जवानाला बोलावून दहा गोळ्यांचा राऊंड घ्यायला सांगितले. त्याने ट्रिंगरवर बोट ठेवले व उचलले. दहा गोळ्या संपल्या होत्या आणि त्याचा खांदा तसूभरही हलला नव्हता. या केंद्रात गरजेनुसार दोन ते चार आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाते. इराकच्या युद्धानंतर काही अमेरिकन सैनिकांनी 'तकरीबल व्हिलेज 'मध्ये प्रशिक्षण घेतले. आता अमेरिकेत अशा प्रकारचे गाव वसवले जात आहे. भारतीय लष्कराचा दहशतवाद्यांशी लढतानाचा अनुभव अमेरिकन लष्कराला महत्त्वाचा वाटत आहे.
रात्रीची गस्त
पुण्यात रात्री दोन वाजेपर्यंत एकट्याने भटकताना काही वाटत नाही. भारत-पाक सीमा रेषेवरची पूर्ण रात्रीची गस्त हा मात्र थरारक अनुभव होता. गस्तीला निघालो. निघण्यापूर्वीच रात्रीच्या गस्तीसाठी जाताना वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या यंत्रणांचा परिचय करून देण्यात आला होता. काहीशा सपाट जागेत आम्ही उभे होतो. अचानक त्या काळोखात काही हाताच्या अंतरावरच्या खडकात हालचाल जाणवली. आम्हांला दहा हत्यारबंद माणसांनी घेरले होते. ही माणसे आली कुठून, होती कुठे? ही केवळ चुणूक होती. त्यामुळे असे बेसावध राहून यापुढे चालणार नव्हते. रात्रीच्या वेळेस मानवी हालचाल टिपणाऱ्या इन्फ्रारेड दुर्बिणीतून पाहिले, तर समोरचा डोंगर उतरून झाडीतून पाच-सहा जण खाली येताना दिसले. त्या लोकांना गाठायचे होते. आमच्या बारा जणांच्या गटातील पाच जण पहिल्या पाच मिनिटांतच खाली बसले. सपाट जागा सोडून आम्ही पुढे निघालो होतो. आता कंबरेपर्यंत उंच गवतातून आम्ही चालत होतो.त्या गवताच्या खाली खड्डा आहे की दगड हे कळत नव्हते. ठेचाळत होतो.वाटेवर काटेरी झुडपेही होती. हाता पायाला ओरखडून जात होती. माझ्या गटातील पाच जण...विनायक परबबरोबर पुढे गेले होते.निशा कार आणि मी मागे पडलो होतो. निशा गेला आठवडाभर आजारी होती. तिला ताप येऊन गेला होता. जेवण जात नव्हते. अशक्त झाली होती. दिवसाढवळ्या चांगल्या रस्त्यावरून चालतानाही ती थकायची; पण आता हट्टाने रात्रगस्तीत दाखल झाली होती. तिच्याबरोबर मी मागे थांबलो. आता गवताचा भाग संपला, भुसभुशीत मातीची चढण लागली. कोन 75 ते 80 अंशाचा.ते पंचवीस मीटर अंतर चढताना कस लागला.
हाताची बोटे मातीत रोवायची, पायांनी जोर देत शरीर पुढे ढकलायचे. मग पुन्हा हात लांबवून बोटे रुतवायची. असे करीत वर गेलो. आता सरळ उभा खडक होता. कपारीत बोटे सरकावीत शरीर वर खेचायचे. पायांना चाचपत आधार शोधायचा. मग पुन्हा वर. आतापावेतो सातशे मीटर उंच आलो होतो. निशा अगदी थकून गेली होती. आम्ही दोघे तिथेच थांबलो. विनायक, सागर कुलकर्णी, रमाकांत दाणी, सिद्धार्थ कश्यप, रतन पुढे गेले. तीव्र उतार असलेल्या खडकावरच मी व निशा कसेबसे बसलो होतो. समोर खाली दूरवर श्रीनगरचे दिवे. उधळून विखुरल्यासारखे. शहराच्या मध्यभागात झिलमिल प्रकाशाचा मळा फुलला होता. वर आभाळातही लुकलुक दिवे चांदण्याचे. माथ्यावर रत्नजडित घुमट आणि पायतळी रत्नांचाच द्रोण. टॉस करून वर उडवलेल्या कलदार नाण्यासारखा चंद्र डोईवर. काश्मीरचे रात्रीचे सौंदर्य समोर होते. एवढ्यात दुसऱ्या वाटेने पाच-सहा जणांचा एक गट खाली उतरू लागला. विनायक परतला. आम्ही दोघे निघालो. सोबतच्या मुलींना खडकावरून खाली उतरवताना विनायकचा तोल गेला. त्याने आधाराला एक झुडूप धरले, झुडूप होते काटेरी. हातांत 32 काटे घेऊन तो खाली उतरला. डोंगर चढताना जेवढे कठीण वाटले नव्हते, तेवढे आता जाणवू लागले. पाय नेमका कुठे ठेवावा कळत नव्हते.जरा तोल गेला तर कपाळमोक्ष ठरलेला. आमच्याबरोबर बॅटरी घेऊ दिली नव्हती. चंद्र चांदण्याच्या प्रकाशात दिसेल तेवढी वाट आपली. मला बॅटरीवरून पराग करंदीकरचा अनुभव आठवला. कारगिल युद्धानंतर पत्रकारांच्या दौऱ्यात तो उरी सेक्टरमधील रुस्तम या ठाण्यावर गेला होता.
हाजीपीर खिंडीजवळच्या या ठाण्यावर त्याने एक रात्र घालवली होती. दिवसा निसर्गाचे मनोहारी रूप समोर होते. त्यामुळे रात्री सैनिकांबरोबर पराग व त्याचे काही सहकारी गस्तीला निघाले. त्या ठाण्यावर रात्री भयंकर गोळीबार चालत असे. पावसाने निसरड्या झालेल्या पाऊलवाटेवरून ते चार किलोमीटर अंतरावरच्या बंकरकडे निघाले होते. सरबाडीत ठाण्याजवळ ते पोहोचले व समोर शत्रूच्या ठाण्यावर काही हालचाल दिसली. सर्वांना 'पोझिशन' होण्याचा आदेश दिला गेला. त्या प्रकारात वेळ गेला. काळोख झाला होता. बंकरमधून निघून पोस्टकडे निघाले, तर शेजारचा माणूसही दिसेना. एकाने जरा वाट चाचपडण्याचा प्रयत्न केला तर तो आठ-दहा फूट घसरला. तो नक्की कुठे गेला, हे पाहण्यासाठी एकाने बॅटरी लावली. दहा-बारा सेकंदच असेल; पण त्यानंतर मिनिटभरात त्या गटाच्या डोक्यावरून दोन ट्रेसर बुलेट घोंगावत निघून गेल्या होत्या. प्रकाशाचा एखादा किरणही मृत्यूला कसे निमंत्रण देऊ शकतो, हा अनुभव त्यांनी घेतला होता. आज आम्ही बॅटऱ्या न घेताच गस्तीला निघालो होतो. आम्ही सारेजण व्यवस्थित परतलो, असे बोलत असतानाच लक्षात आले की, सागर, रमाकांत, सिद्धार्थ, रतन वरच राहिले होते. त्यांना हाका मारल्या. ते वाट चुकले होते. मग विनायक व मी पुन्हा वर गेलो. अर्ध्यावर आमची भेट झाली, त्यांना घेऊन खाली आलो. त्यावेळी एक पाऊलही टाकण्याची ताकद आमच्यात उरली नव्हती.
Tags: उरी सेक्टर हाजीपीर काश्मीर पुणे श्रीनगर संतोष शेणई Uri Sector Hajipir Kashmir Pune Srinagar Santosh Shenai weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या