शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मराठी विभागाच्या वतीने दरवर्षी वि.स. खांडेकर स्मृती व्याख्यान आयोजित केले जाते. यावर्षीचे व्याख्यान प्रस्तुत संपादकाने दिले आहे. ते शब्दांकन करून याच अंकात प्रसिद्ध करण्याचे एक कारण खांडेकरांची स्मृती, दुसरे कारण साने गुरुजींच्या ध्येयवादाशी असलेले खांडेकरांचे नाते आणि तिसरे कारण आजच्या काळात सर्वाधिक संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला ध्येयवाद.
दोन आठवड्यांपूर्वी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संदर्भात (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) जागतिक शिखर संमेलन दिल्ली येथे झाले. मागील तीन वर्षांत झालेले हे चौथे संमेलन आहे. आधीची तीन संमेलने इंग्लंड, फ्रान्स व दक्षिण कोरिया येथे झाली होती. या चारही शिखर संमेलनांवर दृष्टिक्षेप टाकून एआय संदर्भात वस्तुनिष्ठ चित्र मांडण्याचा प्रयत्न निलेश मोडक यांनी या अंकात केला आहे. या विषयावर विविध माध्यमांमधून खूप काही प्रसिद्ध होत आहे, यानंतरही होणार आहे. ते सर्व वाचण्यासाठी पाहण्यासाठी हा लेख पायाभूत म्हणता येईल असा आहे.
या अंकातील दुसरा लेख मीना कर्णिक यांचा आहे. मागील तीन महिन्यांत त्यांनी आधी गोव्यातील इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया (इफी) मध्ये पाहिलेल्या सिनेमांवर पाच लेख लिहिले. आणि गेल्या महिन्यात पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (पिफ) मध्ये पाहिलेल्या सिनेमांवर तीन लेख लिहिले आहेत. हे सर्वच लेख जागतिक स्तरावर येऊ घातलेल्या सिनेमांचे आशय-विषय आपल्यापर्यंत पोहचवणारे आहेत. हे लेख वाचून अनेक वाचकांना असे वाटणे साहजिक आहे की, 'हे सिनेमे बघायला मिळत नाहीत, त्यामुळे हे लेख वाचून अतृप्ततेची भावना राहते.' मात्र नजिकच्या वर्ष-दोन वर्षांत हे सिनेमे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सहज उपलब्ध होणार असतात, त्यामुळे या लेखांच्या वाचनातून ज्या सिनेमांबाबत विशेष कुतूहल वाटते, त्यांची नोंद करून वेळेची वाट पाहणे अधिक योग्य ठरेल.
जर्मन भाषेच्या प्राध्यापक अभ्यासक नीती बडवे यांनी जर्मनी व युरोपच्या संदर्भातील एक लेखमाला गेल्या वर्षी साधनात लिहिली होती. तिथला समाज आणि संस्कृती यांचे कवडसे पकडणारे ते लेख आहेत. आता त्यांनी जर्मन भाषेतील दोन विशेष महत्त्वाच्या कादंबऱ्यांवर दोन लेख लिहिले आहेत. त्यांचे संदर्भ जरी गेल्या शतकातील असतील तरी, त्यातील मध्यवर्ती आशय आजच्या वर्तमानाला लागू पडणारा आहे. म्हणून ते दोन्ही लेख एकापाठोपाठ प्रसिद्ध करणार आहोत. त्यातील एक लेख या अंकात आहे, दुसरा लेख पुढील अंकात प्रसिद्ध होईल.
ग.प्र. प्रधान संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जानेवारी महिन्यात दोन अभ्यासवृत्ती घोषित केल्या आहेत. त्यातील एक अभ्यासवृत्ती "महाराष्ट्रातील दहा कुलगुरूंच्या मुलाखती" घेण्यासाठी सुनील पाटील यांना देण्यात आली आहे. त्या नियोजित मालिकेतील पहिली मुलाखत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मिलिंद बारहाते यांची घेतलेली आहे, ती प्रस्तुत अंकात आहे. विद्यापीठांचे विश्व आणि कुलगुरूंचे कार्यक्षेत्र प्रचंड मोठे असते, एका दीर्घ मुलाखतीत ते पकडता येणे अवघड असते. त्यामुळे त्या-त्या विद्यापीठाचे वेगळेपण व त्या-त्या कुलगुरूचे बलस्थान यांना केंद्रस्थानी ठेवून या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्याप्रमाणे मिलिंद बारहाते यांच्या मुलाखतीमधील प्रश्नाचा रोख अर्थकारण आणि व्यवस्थापन यांच्यावर ठेवला गेला आहे.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मराठी विभागाच्या वतीने दरवर्षी वि.स. खांडेकर स्मृती व्याख्यान आयोजित केले जाते. यावर्षीचे व्याख्यान प्रस्तुत संपादकाने दिले आहे. ते शब्दांकन करून याच अंकात प्रसिद्ध करण्याचे एक कारण खांडेकरांची स्मृती, दुसरे कारण साने गुरुजींच्या ध्येयवादाशी असलेले खांडेकरांचे नाते आणि तिसरे कारण आजच्या काळात सर्वाधिक संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला ध्येयवाद.
वरील सर्वच लेखन दीर्घ आहे. त्यातील भाषण व मुलाखत वाचायला आणि त्यातील आशय समजून घ्यायला सुबोध आहेत. उर्वरित तीन लेख मात्र वाचायला व समजून घ्यायला थोडे कठीण आहेत. त्या-त्या विषयाची अपरिचितता आणि ते सर्व समजून घेण्यासाठी बरेच संदर्भ माहीत असल्याची गरज, यामुळे तसे होणार आहे. मात्र जागतिक स्तरावरील विषयांच्या संदर्भात असे होणे साहजिक आहे. त्यामुळे सोप्याकडून अवघडाकडे आणि अवघडाकडून अधिक अवघडाकडे जाण्याची तयारी वाचक मनाची असायला हवी !
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या