एप्रिल 2026 च्या पहिल्या आठवड्यात अंबरीश मिश्र यांच्याशी त्याचा फोन झाला, ते साधनामध्ये मागील वर्षभरापासून 'बोहारणीचे गाठोडे' हे सदर लिहीत आहेत. त्या निमित्ताने कामाचे बोलणे झाल्यावर त्याने अंबरीश यांना सहज विचारले, "सध्या नवीन कोणते पुस्तक लिहिताय, की अनुवाद करताय?" ते सांगू लागले, "दीर्घकाळ एका पुस्तकाचा अनुवाद करायचं मनात आहे, ते करायला घ्यायचं म्हणतोय. छोटंसंच पुस्तक आहे. गांधींवरचं. एका अमेरिकन पत्रकाराने लिहिलेली डायरी." त्यांनी पुढे काही बोलण्याच्या आत तो म्हणाला, " 'A Week With Gandhi'चा अनुवाद करायला घेताय का?" ते म्हणाले, "करेक्ट!" मग त्यांना पुढे काही बोलू न देता, त्याने त्या पुस्तकाची मनाच्या तळाशी असलेली मागील दोन दशकांची स्टोरी थोडक्यात सांगितली.
भारतातील सर्व भाषांमध्ये आणि जगातील अनेक भाषांमध्ये स्वतंत्र व अनुवादित स्वरूपात आलेले महात्मा गांधींचे व त्यांच्या विषयीचे लेखन इतके जास्त आहे की, मागील शतकाचा विचार करता क्वचितच अन्य एखाद्या महामानवाबद्दल असे घडले असेल. आणि मराठीचा विचार करता मागील पाऊण शतकात गांधीजीचे व त्यांच्या विषयीचे लेखन साधना साप्ताहिकात जेवढे व ज्या दर्जाचे प्रसिद्ध झाले आहे, तसे क्वचितच अन्य एखाद्या नियतकालिकाने केले असेल. त्यामुळे, गांधींचे व गांधींविषयीचे लेखन अगदीच काही वेगळे असल्याशिवाय प्रसिद्ध करायला आम्ही उत्सुक नसतो. मात्र हा महात्मा कितीही चर्चेत आला तरी उरतोच, नव्याने गवसतोच, प्रश्न उभे करतोच आणि अर्थातच उत्तरांच्या दिशाही सूचित करतोच! त्यामुळे, गेल्या दशकभरातही साधनातून गांधींविषयी अगदी वेगळे व वैशिष्ट्यपूर्ण म्हणावे असे भरपूर लेखन प्रसिद्ध झाले आहे. लहान-मोठे लेख, भाषणे, मुलाखती, पुस्तक परिचय यांची संख्या तर बरीच आहे. पण ठळक नोंदीसुद्धा विशेष लक्षवेधी आहेत.
उदा. सुरेश द्वादशीवार यांनी लिहिलेली 'गांधीजी आणि त्यांचे टीकाकार' ही वर्षभर क्रमशः प्रसिद्ध झालेली लेखमाला नंतर पुस्तकरूपाने आली. कमालीची वाचकप्रिय ठरली. 'गांधींचे गारुड' हा संजीवनी खेर यांनी लिहिलेला स्तंभ गांधीजींच्या सहवासातील स्त्रियांची ओळख करून देणारा होता, नंतर तोही पुस्तकरूपाने आला. चोखंदळ वाचकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. गांधीजींनी 'चले जाव'चा नारा दिला, त्या मुंबईच्या सभेतील (गांधी, नेहरू, पटेल, आझाद) भाषणांचा विशेषांक केला, नंतर तो छोट्या पुस्तिकेच्या रूपाने आला. रावसाहेब कसबे यांची दीर्घ मुलाखत असलेला एक पूर्ण अंक काढला. नागनाथ कोत्तापल्ले, भारत सासणे व चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेल्या त्या मुलाखतीमध्ये प्रामुख्याने गांधी-आंबेडकर यांच्या विचारांचा परामर्ष घेतला आहे. साधनात व अन्य मराठी नियतकालिकांत (गेल्या 100 वर्षांत) प्रसिद्ध झालेले गांधींविषयीचे लेख 'गांधींविषयी' या शीर्षकाखाली तीन खंडांत प्रकाशित झाले. गांधीजींचे नातू (मणिलाल यांचे चिरंजीव) अरुण गांधी यांची दोन इंग्रजी पुस्तके 'वारसा प्रेमाचा' व 'वरदान रागाचे' या नावाने मराठीत आणली. सोनाली नवांगुळ यांनी त्याचे उत्तम अनुवाद करून दिले. या सर्वांच्या सोबत लुई फिशर लिखित 'लाईफ ऑफ महात्मा गांधी' हे 700 पानांचे पुस्तक गांधींच्या दीडशेव्या जयंती वर्षात (2019 मध्ये) साधना प्रकाशनाकडून आणले. वि.रा. जोगळेकर यांनी त्याचा अप्रतिम अनुवाद केला आहे. ते गांधींच्या सर्वोत्तम चरित्रांपैकी एक मानले जाते. तेच पुस्तक प्रमुख आधाराला घेऊन 'गांधी' हा इंग्रजी व हिंदी सिनेमा 1982 मध्ये आला. त्याला सात ऑस्कर मिळाले. तो सिनेमा जागतिक सिनेसृष्टीतील उत्कृष्ट 'बायोपिक' मध्ये गणला जातो. अशा पार्श्वभूमीवर फिशर यांनी लिहिलेल्या 'A Week With Gandhi' या रोजनिशीचा (छोट्या पुस्तकाचा) अनुवाद करून साधनाचा संपूर्ण अंक प्रसिद्ध करण्याची गरज काय, असा प्रश्न कोणाही सुबुद्ध वाचकाला पडणे साहजिक आहे. म्हणून त्याच्या मागची कहाणी थोडक्यात सांगणे आवश्यक वाटते.
प्रस्तुत लेखक-संपादक, 2003 दरम्यान लेखनाचे प्राथमिक धडे गिरवत होता, पण वाचक म्हणून चांगलाच तयार झाला होता. तेव्हा जुन्या पुस्तकांच्या दुकानातून मिळालेले 'A Week With Gandhi' हे छोटेसे इंग्रजी पुस्तक त्याच्या वाचनात आले. त्याने तो इतका प्रभावित झाला की, जवळच्या मित्रांना त्याविषयी तो सांगत सुटला, त्यातील काही उतारे व संवाद वाचून दाखवत राहिला. साहजिकच, हे पुस्तक मराठीत आहे का, हा प्रश्न त्याला विचारला गेला. त्याच्या माहितीनुसार ते नव्हते. त्यामुळे, या पुस्तकाचा अनुवाद आपण करावा असे त्याला वाटत होते. मात्र ते काम अवघड व आव्हानात्मक आहे हेही लक्षात येत होते. त्यानंतर, 2005 मध्ये त्याने साधना साप्ताहिकात 'थर्ड अँगल' हे पाक्षिक सदर तरुणाईसाठी लिहिले. त्या सदरात, 2 ऑक्टोबर 2005 च्या अंकात लिहिला गेलेला लेख होता 'A Week With Gandhi' या पुस्तकावर. त्या लेखाचे शीर्षक होते, 'गांधींविषयी इतके गैरसमज का आहेत?' त्या पुस्तकाची पार्श्वभूमी सांगून, त्यातील सौंदर्यस्थळे दाखवून त्या लेखात असा निष्कर्ष काढला होता की, "गांधींजी हयात होते तेव्हा आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याविषयी प्रत्येक पिढीतील सुजाण व सुबुद्ध वाचकांच्या मनातही अनेक गैरसमज राहिले आहेत. ते गैरसमज का निर्माण होत असावेत, याचे उत्तर या पुस्तकातून ध्वनित होते आहे. म्हणून तरुणाईने हे पुस्तक व फिशरची अन्य पुस्तकेही वाचायला हवीत." अर्थातच, साधनातील त्या लेखाला उत्तम प्रतिसाद मिळाला, फिशरच्या त्या छोट्या रोजनिशीकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. तेव्हा आयुष्याच्या अखेरच्या पर्वात असलेले ग.प्र. प्रधान म्हणाले होते, "हे पुस्तक मी विद्यार्थी असताना आणि प्राध्यापक झाल्यावरही वाचले होते, पण अशा प्रकारे या पुस्तकाकडे पाहिले नव्हते." त्या लेखावर आलेली एक प्रतिक्रिया सर्वांत महत्त्वाची ठरली, आप्पासाहेब सा.रे. पाटील यांची! ते त्या वेळी साधना ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त होते, वयाने 80 च्या पुढे गेले होते. एका साखर कारखान्याचे चेअरमन होते. कोल्हापूर जिल्ह्यातील विधायक कार्यातील अग्रणी होते. सेवा दलाच्या मुशीत घडले होते. साने गुरुजी, वि.स. खांडेकर हे त्यांचे दैवत होते. त्यांनी साधनातील तो लेख वाचून, "मला हे मराठी पुस्तक हवे आहे" असे साधनाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना सांगितले. मराठी अनुवाद उपलब्ध नाही असे आप्पासाहेबांना सांगितले गेले, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया होती, "मला इंग्रजी वाचता येत नाही याची खंत पूर्वीपासून वाटत आली आहे, पण हे पुस्तक वाचायला मिळणार नाही यामुळे वाईट वाटते आहे." त्याच वेळी या पुस्तकाचा अनुवाद करायचे त्या युवा लेखकाने (प्रस्तुत संपादकाने) ठरवले.
काही दिवसांनी श्रीगणेशा केला. दोन-तीन पानांचा अनुवाद केला, त्याच दिवशी संध्याकाळी पुण्यातील इंटरनॅशनल बुक स्टॉलमध्ये फेरफटका मारायला तो गेला होता. तेव्हा पॉप्युलर प्रकाशनच्या एका जुन्या पुस्तकावर मागच्या बाजूला जाहिरात दिसली, 'आमची आगामी प्रकाशने'. त्यामध्ये, चार-पाच पुस्तकांचा उल्लेख होता. त्यातील एक पुस्तक होते गांधींच्या सहवासात एक आठवडा, लेखक लुई फिशर, अनुवाद सत्यबोध हुदलीकर. शोध घेतला तर, 1945 मध्ये तो अनुवाद प्रकाशित झाल्याचे आणि दीर्घकाळ उपलब्ध नसल्याचे लक्षात आले. मग त्या युवा लेखकाने त्या पुस्तकाचा अनुवाद करायचे थांबवले. त्याची दोन कारणे होती. पहिले, पूर्वी अनुवाद झालेला आहे तर आता गरज नाही, किमान तो अनुवाद वाचल्याशिवाय तरी नवीन अनुवाद नको. आणि दुसरे, त्या पुस्तकाच्या शीर्षकाचा त्या युवा लेखकाने केलेला अनुवाद 'गांधींसोबत एक आठवडा' असा होता आणि सत्यबोध हुदलीकर यांनी त्या शीर्षकाचा केलेला अनुवाद 'गांधींच्या सहवासात एक आठवडा' असा होता. म्हणजे with चा अर्थ 'सोबत' हा तितकासा योग्य नाही, 'सहवासात' हा बरोबर आहे असे त्याला वाटले. म्हणजे अनुवादासाठी आपल्याला अजून बरीच मजल मारणे बाकी आहे, हे त्याच्या पुन्हा लक्षात आले. त्यानंतर वर्षभराने सत्यबोध हुदलीकरांनी अनुवाद केलेले पुस्तक त्याला एका जुन्या पुस्तक विक्रेत्याकडे मिळाले. ते पाहिल्यावर कळले, आचार्य प्र. के. अत्रे यांनी त्याला प्रस्तावना लिहिली आहे. त्यातून हेही कळले की, अत्र्यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाची पारायणे केली होती, अनेक मित्रांना ते वाचायला दिले होते. त्यापैकी एक मित्र स.बा. हुदलीकर यांना ते इतके आवडले की, त्यांनी पुढील काही दिवसांत त्याचा अनुवाद केला आणि नंतर ते पॉप्युलर बुक डेपोकडून प्रकाशित झाले.
सत्यबोध यांनी केलेला तो अनुवाद वाचल्यावर त्याला वाटले, त्यांनी त्यांच्या स्तरावर खूप चांगला प्रयत्न केला आहे. पण ती भाषा जुन्या वळणाची आहे आणि ते इंग्रजी पुस्तक वाचनातून येणारी गंमत मराठी अनुवादामध्ये येत नाही. तेव्हा त्याला असेही वाटले की, हे पुस्तक अनुवाद करण्यासाठी कोणीही घेतले तरी त्यातील खटकेबाज संवाद, दोन संस्कृतींमधील आदान-प्रदान, सूक्ष्म पातळीवरचा मार्मिक विनोद हे सर्व आणता येणे खूप कठीण आहे. त्यामुळे, त्याने ठरवले : आपल्याला पुस्तकातील बिटवीन द लाईन्स अर्थ इतके कळलेले आहेत आणि त्यातली अनेक सौंदर्यस्थळे दिसताहेत तर भविष्यात आपणच कधीतरी त्याचा अनुवाद करू. शिवाय, त्याला असेही वाटले की, आपल्याला हे पुस्तक जसे भावले, तसे अन्य कोणा अनुवादकाला भावेलच असे नाही.
त्यानंतर दहा वर्षे उलटली, 2015 मध्ये यशवंत सुमंत यांचा 'महात्मा गांधी काही अलक्षित पैलू' हा लेखसंग्रह साधना प्रकाशनाकडून आला. त्याचा प्रकाशन समारंभ सेवाग्राममध्ये झाला. तेव्हा पूर्वीचा तो युवा लेखक आता साधनाचा संपादक या नात्याने तिथे गेला होता. त्या पुस्तकात फिशर यांनी वर्णन केलेल्या सेवाग्राममधील सर्व जागा त्याने प्रत्यक्ष पाहिल्या. आणि त्याच कार्यक्रमात त्याने संकल्प सोडला, 'A Week With Gandhi'चा अनुवाद पुढील वर्षभरात करून सेवाग्राममध्येच त्याचे प्रकाशन करू या. त्यानंतर त्याने अनुवाद करायला घेतला. दरम्यानच्या दहा वर्षांत त्याने इंग्रजीतून मराठी अनुवाद करण्यासंदर्भात बरीच प्रगती केली होती, तरीही फिशरच्या त्या डायरीचा आपल्याला समजलाय तसा आशय मराठीत उतरवता येणे अवघडच आहे, असे त्याला वाटले. आणि मग तो दुसरा प्रयत्नही त्याने सोडून दिला. म्हणजे स्वतःकडून तो अनुवाद होत नाही आणि इतरांना करायला द्यावा अशी इच्छा होत नाही, असा तो विचित्र प्रकार होता. इतके ते पुस्तक त्याला जवळचे झाले होते. त्यामुळे, भविष्यात कधीतरी निवांत वेळ मिळाल्यावर तो अनुवाद आपणच करू अशी अंधुकशी शक्यता मनाच्या कोपऱ्यात त्याने जपून ठेवली होती. वेळोवेळी तशी शक्यता स्वतःला आणि जवळच्या काही लोकांना बोलून दाखवली होती.
त्यालाही दहा वर्षे उलटली. एप्रिल 2026 च्या पहिल्या आठवड्यात अंबरीश मिश्र यांच्याशी त्याचा फोन झाला, ते साधनामध्ये मागील वर्षभरापासून 'बोहारणीचे गाठोडे' हे सदर लिहीत आहेत. त्या निमित्ताने कामाचे बोलणे झाल्यावर त्याने अंबरीश यांना सहज विचारले, "सध्या नवीन कोणते पुस्तक लिहिताय, की अनुवाद करताय?" ते सांगू लागले, "दीर्घकाळ एका पुस्तकाचा अनुवाद करायचं मनात आहे, ते करायला घ्यायचं म्हणतोय. छोटंसंच पुस्तक आहे. गांधींवरचं. एका अमेरिकन पत्रकाराने लिहिलेली डायरी." त्यांनी पुढे काही बोलण्याच्या आत तो म्हणाला, " 'A Week With Gandhi'चा अनुवाद करायला घेताय का?" ते म्हणाले, "करेक्ट!" मग त्यांना पुढे काही बोलू न देता, त्याने त्या पुस्तकाची मनाच्या तळाशी असलेली मागील दोन दशकांची स्टोरी थोडक्यात सांगितली. आणि म्हणाला, "तुम्हालाही हे पुस्तक इतके जवळचे आहे तर तुम्ही त्याचा अनुवाद करायला घ्या, आपण ते साधना प्रकाशनाकडून आणू." त्यानंतर लगेचच 'थर्ड अँगल' मधील तो लेख त्याने त्यांना पाठवला. त्यांनी तो वाचून कळवले, 'लेख छान आहे, तूच अनुवाद करायला घे, मी तुला मदत करतो.' ती सूचना त्याने तत्काळ उडवून लावली आणि म्हणाला, "आता तो अनुवाद तुम्हीच करायचा आहे आणि शक्य तितक्या लवकर !" ते म्हणाले, "1 मे रोजी मी अनुवाद सुरू करणार." नंतर 30 एप्रिलला त्याने त्यांना आठवण करून दिली. 'हो, सुरू करतोय' असे उत्तर आले. 15 मे दरम्यान त्यांचा फोन आला, 'मी बातमी सांगितली तर तू वैतागशील.' फिशरच्या डायरीचा अर्ध्याहून अधिक अनुवाद पूर्ण झालाय अशी ती बातमी होती. त्याने विचारले, "का वैतागेल असे तुम्हाला वाटले?" "इतक्या कमी वेळात केला म्हणजे अनुवादाच्या दर्जाबद्दल तुझ्या मनात शंका निर्माण होईल", त्यांचे उत्तर. तो हसला, म्हणाला, "अगदी बरोबर ! इतर कोणी असता तर तशी शंका माझ्या मनात निश्चित आली असती, पण तुमच्याबद्दल नाही!" त्याचे लॉजिक काय होते? क्षमता असणाऱ्या माणसाच्या हृदयाशी असलेली एखादी गोष्ट किती उत्तम प्रकारे आणि किती कमी वेळात होऊ शकते याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. साने गुरुजींनी 'श्यामची आई' पाच दिवसांत लिहिले, हे किती मोठे उदाहरण !
30 मे रोजी अंबरीश यांनी संपूर्ण अनुवाद पाठवला, दुसऱ्या दिवशी दोन बैठकीत त्याने तो वाचला आणि त्यांना एक ओळीचा मेसेज टाकला, "गेली वीस वर्षे हा अनुवाद विचाराधीन होता. पण मी तो अनुवाद केला नाही आणि इतरांनाही करायला दिला नाही, हा निर्णय योग्यच होता असे तुमचा अनुवाद वाचून वाटते आहे." मात्र हा सर्व ऐवज थेट पुस्तकरूपाने आणण्याच्या आधी साधना साप्ताहिकातून विशेषांक म्हणून प्रकाशित करावा, असा विचार त्याच्या मनात आला. पुस्तक आणणार आहात तर विशेषांक कशाला, असा प्रश्न काही लोक विचारणार हेही साहजिक होते. पण फिशरची ही डायरी एकाच आठवड्यात महाराष्ट्रात सर्वदूर जाईल, हजारो वाचकांना फिशर माहीत होईल आणि गांधी आणखी नव्याने कळतील, हा त्यामागचा उद्देश होता. 8 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यानचा तो आठवडा असेल. म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्धापन दिनाला सुरू झालेल्या साधना साप्ताहिकाच्या 79 व्या वर्धापन दिनाला आपल्या वाचकाना ही सर्वोत्तम भेट ठरेल असेही वाटले. ही भेट देता आली यासाठी त्याने गांधींना अभिवादन केले, फिशर यांना मानवंदना दिली, आणि अंबरीश यांना सलाम केला आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या