सलग पाच दिवस भटकणं आणि चार रात्री जागरणं करूनही डोळ्यांना विश्रांतीपेक्षा खिडकीबाहेरचे डोंगर आणि ढग बघण्यात जास्त इंटरेस्ट वाटत होता. गेल्या पाच दिवसांतल्या आठवणी डोळ्यासमोर तरंगल्या तसं आपोआप ओठांवर हसू आलं. सर्वसाधारण चिनी लोकांच्या डोक्यातली इनर मंगोलियन ट्रीपबद्दलची कल्पना म्हणजे हिरवीगार कुरणं, वाळवंट, उंट सफारी वगैरे. आमची सहल मात्र ह्याच्यापेक्षा एकदमच वेगळी होती. आतापर्यंतच्या सगळ्या सहली मी स्वतः प्लॅन करून परदेशी मैत्रिणींना सोबत घेऊन केल्या होत्या. फॉरेनरसारखं फिरणं आणि लोकल चिनी मित्रांच्या सोबतीने फिरणं ह्यात किती फरक होता ! विचार करता करता दोन तासांचं अंतर पाच मिनिटांत संपल्यासारखं वाटलं.
"यांग चंगवनच्या घरी इनर मंगोलियाला कोणा कोणाला जायचंय हात वर करा पाहू!" कोरियाची मैत्रीण किम द्वारी मोठ्या आवाजात म्हणाली. बी.एल.सी.यु. (बीजिंग लँग्वेज अँड कल्चरल युनिव्हर्सिटी) कँटीनच्या दुसऱ्या मजल्यावर लांबलचक टेबलाभोवती बसून नाश्ता करत असलेल्या पंधरा वीस जणांच्या माना लगेच तिच्या दिशेने वळल्या. रोज सकाळी साडेसात वाजता न चुकता एकत्र नाश्ता करणारा आमचा हा वीसएक जणांचा कंपू म्हणजे बी.एल.सी.यु.चा होस्टिंग टुप म्हणजेच निवेदनाचा गट. युनिव्हर्सिटीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं निवेदन करण्यासाठी निवडलेल्या अस्खलित चायनीज आणि इंग्लिश बोलणाऱ्या सुंदर मुली आणि हँडसम मुलांचा हा गट (चीनमध्ये तरुण मुला-मुलींचा उल्लेख अस्साच करतात बरं). ह्या गटात बहुतेक करून सारी बी.ए.च्या पहिल्या वर्षाला असणारी चिनी मुलं मुली होती आणि त्यासोबतच माझ्यासारखी चार-पाच हौशी परदेशी मंडळीदेखील होती. रोज सकाळी एकत्र आवाजाचा रियाझ करून मग नाश्ता करायला जमत असल्याने सगळ्यांचं मस्त बाँडींग जमलं होतं. कोरियन मैत्रीण ह्वारीने दिलेलं, चिनी मित्र यांग चंगवनच्या घरी जायचं ओपन इन्विटेशन ऐकून मी लगेच बोटांमध्ये पकडलेल्या चॉपस्टिक्सनिशी हात वर केला.
चीनमध्ये एक मे कामगार दिनाला लागून पाच दिवसांची सुट्टी असते. ह्या वर्षी बी.एल.सी.यु.ने आम्हाला ह्या सुट्टीला लागून अजून एक आठवड्याचा रीडिंग वीक दिला होता. रीडिंग वीकच्या 'सुट्टीत' निवेदनाच्या गटातील सहा सुंदर मुलं-मुली इनर मंगोलियाला जायला निघाली. सात मे ला सकाळी कोरियाची किम द्वारी, म्यानमारची त्सुन शौत्वान, चीनचा लाय चंगथान आणि मी मेट्रोने 'बीजिंग छिंग ह' स्टेशनला पोहोचलो. आमची दुपारी पावणेअकराची इनर मंगोलियाच्या उलांछाब (Ulanqab) शहराला जाणारी बुलेट ट्रेन होती. ट्रेनमध्ये बसल्याबसल्या आमचा उनो आणि पत्त्यांचा डाव सुरू झाला. पत्ते खेळता खेळता दोन तासांचं अंतर कसं संपलं कळलंच नाही. तेवढ्या वेळातही खेळताना हसण्याचा आणि बोलण्याचा आवाज वाढल्याने आम्हाला ट्रेनमधल्या कर्मचाऱ्यांकडून दोनदा ओरडा मिळाला.
स्टेशन जवळ आलं तसं ट्रेनमध्ये चिनी, इंग्रजी आणि मंगोलियन अशा तीन भाषांमध्ये घोषणा झाल्या. स्टेशनला उतरल्यावर दिशा दाखवणाऱ्या फलकांवरही चायनीज कॅरेक्टर्ससोबतच मंगोलियन लिपीसुद्धा लिहिली होती. आमचा आणखी एक चिनी मित्र चाव ईहांग कामगार दिनाच्या सुट्टीमध्ये घरी गेला होता. तो आज सकाळी विमानाने चिलीन (Jilin) प्रोविन्सवरून इनर मंगोलिया ऑटोनॉमस रीजनची राजधानी होहहॉथ (Hohhot) ला आला, आणि मग तिथून पुढे बुलेट ट्रेनने उलांछाबला आला. आम्ही सगळे सारख्याच वेळी स्टेशनला उतरलो. उलांछाबचा मित्र यांग चंगवन सहा सीटर गाडी घेऊन आम्हाला घ्यायला स्टेशनला आला. त्याच्यासोबत स्वच्छ निळं आकाश, मोठाले गुबगुबीत पांढरे ढग, भरपूर सूर्यप्रकाश आणि ताजी हवा आमच्या स्वागताला हजर होते. आमच्या स्वागताची तयारी करायला तो बीजिंगवरून एक दिवस आधीच घरी गेला होता. पुढचे पाच दिवस आम्हाला फिरवायची पूर्ण जबाबदारी छोट्या चंगवनने घेतली होती.
चीनमध्ये स्थानिक वंशाच्या लोकांच्या प्रशासकीय गरजा पूर्ण करण्यासाठी अंतर्गत कारभारात अधिक स्वातंत्र्य असलेले ऑटोनॉमस रीजन म्हणजेच स्वायत्त प्रदेश स्थापन केले आहेत. चीनमध्ये एकूण पाच ऑटोनॉमस रीजन आहेत, इनर मंगोलिया हा त्यांपैकी एक. चीनच्या उत्तरेला 2400 कि.मी. लांब आडवा पसरलेला हा प्रदेश मंगोलिया आणि रशिया या दोन देशांच्या सीमांना लागून आहे. समुद्रसपाटीपासून 1 हजार मीटर उंचीवर असलेले इनर मंगोलियन पठार चीनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पठार आहे. येथील 70 ट्यांहून अधिक जमीन माळरानांनी (Grasslands) व्यापलेली असून लोकसंख्या फारच विरळ आहे. विस्तीर्ण गवताळ प्रदेश, वाळवंट, जंगलं आणि इथली आगळीवेगळी संस्कृती अनुभवण्यासाठी पर्यटक इथे मोठ्या संख्येने येत असतात.
उलांछाबचे रस्ते फारच सुने सुने होते. बीजिंगवरून आलेल्या आम्हाला असे रस्ते बघायची अजिबात सवय नव्हती. इथलं तापमानही बीजिंगपेक्षा फारच कमी अवघं पंधरा डिग्री होतं. चंगवनने एका दुमजली रेस्टॉरंटसमोर गाडी उभी केली. उलांछाबमधलं पहिलं जेवण म्हणून त्याने आम्हाला मंगोलियन हॉटपॉटची मेजवानी द्यायचं ठरवलं होतं. रेस्टॉरंटच्या दुसऱ्या मजल्यावर तंबूच्या आकाराच्या गोलाकार खोल्या होत्या, ह्यांना मंगोलियन गेर असं म्हणतात. तंबूमध्ये झुंबर, पताका आणि चित्रं वगैरे लावून पारंपरिक सजावट केलेली होती. आम्ही तंबूच्या मध्यभागी असलेल्या वर्तुळाकार टेबलाभोवती बसलो. टेबलाच्या मध्यभागी बाहेरून लाल रंगाची नक्षी असलेलं भलंमोठं स्टीलचं भांडं होतं. चंगवनने आम्हाला सांगितलं की, आम्ही इथे इथली खासियत असलेलं बर्फात शिजवलेलं मटण खाणार आहोत !
दोन वेटर मावश्यांनी येऊन सर्वांत आधी टेबलावरच्या भांड्यात बर्फ ओतला. मग त्यावर मटणाचे तुकडे घातले. मटणानंतर भांड्यामध्ये बारा प्रकारचे सॉस, सुगंधी पाणी वगैरे टाकलं. भांड्याच्या एका बाजूला मिरच्या घातलेलं तिखट सूप आणि दुसऱ्या बाजूला साधं पाणी ओतलं. सर्वांत शेवटी भांड्यावर सुंदर नक्षी असलेलं झाकण ठेवून शेगडी सुरू केली. मटण शिजायची वाट बघत असताना मावशींनी प्रत्येकाच्या समोरच्या वाडग्यात भरपूर साय असलेला दुधाळ चहा ओतला. इनर मंगोलियन चहामध्ये साखरेऐवजी मीठ घालतात. खारट चहाची चव सुरुवातीला वेगळीच वाटली, पण पुढच्या पाच दिवसांत आम्ही इतके वेळा असा चहा प्यायला की ही चवही आवडून गेली. ह्वारीने तर लगेच पहिला वाडगा संपवून दुसऱ्यांदा चहा ओतूनही घेतला.
आमचं चहापान चालू असताना मावश्या टेबलावरती कायकाय मांडून ठेवत होत्या! सर्वांत आधी भांड्याभोवती मटणाचे जवळपास साठ-सत्तर पातळ काप वर्तुळाकार मांडून ठेवले. त्याबरोबरीने टोफू, कोबी, लेट्यूस, पालक, इतर पालेभाज्या, बटाट्याचे काप, वेगवेगळ्या प्रकारचे मशरूम्स, सी-वीड, मीट बॉल, कोलंबी, न्यूडल्स वगैरे पदार्थही मांडले. मटणापाठोपाठ हे इतर पदार्थही भांड्यात शिजवले गेले आणि मग आम्ही मेजवानीवर तुटून पडलो. इनर मंगोलियन हॉटपॉट डेंजर भारी होता! बर्फात शिजवलेल्या मटणाची चव फारच अप्रतिम लागत होती. इतकं ताजं मटण मी दोन वर्षांत बीजिंगमध्ये कधीच खाल्लं नव्हतं. "बीजिंगपासून दोन तासांवरच तर आहे. ह्यापुढे हॉटपॉट खावासा वाटला की लगेच ट्रेन पकडून उलांछाबला यायचं, आम्ही खूश होऊन म्हणालो.
पोटभर जेवण करून झाल्यावर आम्हाला डेझर्ट म्हणून आंबटगोड दही देण्यात आलं. दह्यावरती बटरवर भाजलेली कुरकुरीत तांदळाची कणी घातलेली होती. दोनच्या सुमारास रेस्टॉरंटची मावशी सांगायला आली की, आता रेस्टॉरंट दुपारच्या विश्रांतीसाठी बंद होणार आहे. आम्ही आरामात खात बसू शकतो पण नवीन पदार्थांची ऑर्डर घेणं आता बंद करणार होते. आमचं दही खाऊन झालंच होतं त्यामुळे आम्ही लगेच उठलो. निघताना मावशीकडून मंगोलियन भाषेत हॅलो सॅनो आणि धन्यवाद - बायलर्ला बोलायला शिकलो. आम्ही निघालो तशी मावशीही आमच्या मागोमाग रेस्टॉरंटला कुलूप लावून स्कूटरवर घरी जायला निघाली.
जेवून झाल्यावर चंगवन आम्हाला गाडीने टायगर माउंटन पार्कला घेऊन गेला. रस्त्याने जाताना सगळ्या दुकानांवरच्या पाट्या चिनी आणि मंगोलियन अशा दोन लिपींत लिहिलेल्या होत्या. "हे मंगोलियनमध्ये लिहिलेलं कसं वाचायचं रे?" मी चंगवनला विचारलं. चीनमध्ये बहुसंख्याक असलेला 'हान' एथनिक ग्रुप सोडून इतर पंचावन्न मायनॉरिटी एथनिक ग्रुप आहेत. चंगवन अशाच अल्पसंख्याक 'मंगोलियन' एथनिक ग्रुपचा आहे. "मला मंगोलियन भाषा बोलता येत नाही आणि लिपीही वाचता येत नाही." तो म्हणाला. मला त्याचं आश्चर्यच वाटलं. "अरे! फारच निराशा केलीस तू माझी." माझा पडलेला आवाज ऐकून गाडीमध्ये जोरदार हशा पिकला. पुढचे पाच दिवस सगळे जण उठसूठ एकमेकांना हा टोमणा मारू लागले.
टायगर माउंटन पार्क म्हणजे एका छोट्याशा टेकडीवरची बाग होती. टेकडीवरती विजय स्तंभआणि सैनिकांचं शिल्प होतं. सुंदर चेरी ब्लॉसमची फुलं फुललेली होती. एक आजोबा हातात मोबाईल घेऊन आजींचा फुलांसोबत फोटो काढत होते. "मी तुमचा फोटो काढायला मदत करू? आजोबा तुम्हीपण जा फोटोमध्ये", ह्वारी म्हणाली. तिने वयस्कर जोडप्याचा फोटो काढला तेव्हा दोघेही मनापासून हसत होते. टेकडी उतरून आम्ही पुन्हा गाडीत बसलो. गाडीत गाणी, गप्पा नुसता गोंगाट चालू होता. चढाच्या रस्त्यावर पार्क केलेल्या गाडीची रिव्हर्स घेताना अचानक मागे उभ्या असलेल्या जेसीबीला धडक बसली. आम्ही घाबरून गाडीतून उतरलो.
जेसीबीच्या बॉनेटच्या खालच्या बारला तडा गेला होता, आमच्या गाडीच्या डिक्कीलाही डेंट पडला होता. जेसीबीचे ड्रायव्हर आणि क्लीनर 300 युआन मागू लागले. पण मग नंतर हेडलाईटला स्क्रॅच गेलाय, दार लावताना घासलं जातंय, वगैरे कारणं देत नुकसानभरपाईची मागणी 1 हजार युआनपर्यंत गेली. "आम्ही विद्यार्थी आहोत हे बघून उगाच अव्वाच्या सव्वा किंमती सांगू नका!" द्वारी भडकलीच. मला आपल्याकडच्या रस्त्यावरच्या बाचाबाचीची आठवण आली. चंगवनला जरा टेन्शनच आलं होतं, पण तो शांतपणे गाडी जिथून भाड्याने घेतली ती कंपनी आणि कार इन्शुरन्स कंपनीला वगैरे फोन लावू लागला. भरपूर फोनाफोनी झाली. बरीच भांडाभांड होऊन अखेर प्रकरण मिटलं. इन्शुरन्स कंपनीकडून जेसीबीचे भरपाईचे पैसे मिळतील आणि आमची गाडी आम्हाला स्वतःच्या पैशाने दुरुस्त करावी लागेल असा निकाल लागला. "इट्स ओके रे", गाडीत बसताना सगळ्यांनी चंगवनच्या खांद्यावर थोपटलं. "मी उगाच ते गाणं म्हणायला सुरुवात केली. नाहीतर असं झालंच नसतं", शौत्वान म्हणाली. "आता उगाच कोणी स्वतःला दोष देत बसू नका हं", आमच्यात सगळ्यात मोठी असलेल्या द्वारीने मोठ्या ताईच्या सुरात सगळ्यांना दम दिला.
टायगर माउंटन पार्कनंतर आम्ही हंड्रेड स्प्रिंग्स माउंटन बघायला गेलो. ह्या डोंगरावरती पारंपरिक चायनीज स्थापत्यशैलीचा फिनिक्स टॉवर होता. टॉवरच्या दाराला कुलूप असल्यामुळे आम्ही त्याच्या आसपासच्या परिसरामध्येच फोटो काढले. "इथे हरणंही आहेत. बघायला जाऊयात?" आई शप्पथ ! इनर मंगोलियाच्या डोंगरांवर हरणं दिसतात ? मी एकदम उत्साहाने चंगवनच्या पाठोपाठ चालू लागले. पण तारेच्या कुंपणाच्या आत असलेली हरणं बघून माझी पुन्हा निराशा झाली. काही लहान मुलं हरणांना मका भरवत होती. भरवणारे आणि खाणारे दोघेही जरा वेंधळेच असल्याने जमिनीवर सगळीकडे मक्याचे दाणे विखुरलेले होते. आम्ही ते दाणे वेचले आणि पुन्हा हरणांना भरवले. दुपारी जंगी मेजवानी करूनही माहीत नाही का, कदाचित इथल्या हवेमुळे असेल, पुन्हा सगळ्यांना भुका लागल्या. संध्याकाळचं जेवण करण्यासाठी चंगवन आम्हाला इनर मंगोलियाचे स्पेशल 'योउमिएन ओट्स न्यूडल्स' खायला घेऊन गेला. गव्हाळ रंगाच्या ओट्स न्यूडल्सचा आकार मधाच्या पोळ्यासारखा जाळीदार होता. नुसत्याच उकडलेल्या या न्यूडल्स आधी खारट चिकन सूपमध्ये भिजत ठेवायच्या आणि मग खायच्या असतात. दुपारी बर्फात शिजवलेलं चविष्ट मटण खाल्ल्याने इथली दुसरी खासियत असलेल्या या जेवणाबद्दलच्या आमच्या अपेक्षा फारच उंचावल्या गेल्या होत्या. त्यामुळे फारच पौष्टिक लागणाऱ्या ह्या ओट्स न्यूडल्स आम्हाला काही फारशा आवडल्या नाहीत.
जेवून झाल्यावर चंगवन आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. त्याच्या आणखी दोन मैत्रिणी बी.एल.सी.यु. वरून उलांछाबला फिरायला आल्या होत्या. आम्ही वाटेत त्या दोघींना हॉटेलवरून घेतलं आणि एकत्र घरी गेलो. काका-काकूंसाठी आम्ही बीजिंग ट्रेन स्टेशनला ग्रेट वॉल, फॉरबिडन सिटी, टेम्पल ऑफ हेवन वगैरे आकारांची नक्षी असलेल्या चायनीज पेस्ट्री विकत घेतल्या होत्या. त्यासोबतच चाळिशी-पन्नाशीच्या लोकांच्या प्रकृतीसाठी चांगली म्हणून पाकोळी पक्ष्याच्या घरट्याचं सूप बनवण्याची पेस्ट विकत घेतली होती! ह्या भेटींच्या निवडीमध्ये द्वारी आणि शौत्वानचा पुढाकार होता. मी भारताहून आणलेल्या हर्बल टी बॅग्स आणि द्वारीने कोरियाचे स्कीन केअर प्रॉडक्ट्सदेखील भेट द्यायला सोबत घेतले होते. चंगवनचं घर एका हाउसिंग सोसायटीमध्ये होतं. सोसायटीमध्ये पाच-सहा मजल्यांच्या अनेक इमारती होत्या. आम्ही इमारतीसमोर गाडी लावली आणि लिफ्ट नसल्याने पायऱ्या चढत निघालो. जवळपास सगळ्याच घरांच्या दारावर लाल रंगाचं पेपर कटिंग चिकटवलं होतं. त्यावर 'फु' म्हणजे हॅपीनेस असा अर्थ असलेलं चायनीज अक्षर होतं. दाराच्या चौकटीच्या दोन्ही बाजूंना लाल उभे कागद चिकटवले होते. त्यावर 'छुन लिएन' म्हणजे सदिच्छा व्यक्त करणारी छोटी वाक्यं लिहिलेली होती. एका घरावरती तर मंगोलियन लिपीमध्ये अशी काळ्या शाईतली कॅलिग्राफीची अक्षरं लिहिली होती.
चंगवनची आई आमच्या स्वागतासाठी जिन्यामध्येच उभी होती आणि प्रत्येकाला हसून "नि हाव!" म्हणत होती. आम्ही दारात चप्पल काढायला लागलो, तर "नको नको, नका काढू बूट" म्हणत आम्हाला असंच आत यायला सांगितलं. चंगवनचं घर फारच मस्त होतं. प्रशस्त हॉलमध्ये भलामोठा सोफा, टी. व्ही., झुंबर होतं, छोटा झोकासुद्धा होता. जिने चढताना इमारत जरा जुनाट दिसत होती, पण चंगवनच्या घराचं इंटेरियर डिझाईन एकदम हायफाय तरीही डिसेंट होतं. आम्ही जेवण करून येतोय असं कळवल्यामुळे टेबलावर आमच्यासाठी संत्री, द्राक्ष, सफरचंद वगैरे फळं, चॉकलेट, बीफचे स्नॅक्स, खाकरा (हो, अगदी आपल्या खाकऱ्यासारखा सेम टू सेम पदार्थ!) वगैरे 'थोडासा' खाऊ आधीच छान मांडून ठेवला होता. वेलकम ड्रिंक म्हणून गरमागरम चायनीज ब्लॅक टी प्यायला दिला. चहाचे घोट घेत चंगवनने काका-काकूंना सगळ्या मित्र-मैत्रिणींची ओळख करून दिली. काका-काकूंनीही स्वतःबद्दल सांगितलं. चंगवनची आई युनिव्हर्सिटीमध्ये चिनी साहित्य विषयाची प्राध्यापक आहे, तर वडील आधी सैन्यात होते. "ही सानिया, हिचं चायनीज नाव आहे खा च्युनयान." चंगवन माझं नाव घेताना सानियाच्या 'नि' वरती खास जोर देत होता. "सानिया, चाय यिन्तु ये शिळ् मेईन्यू पा?" (सानिया, तुला भारतामध्येपण सगळे 'किती गं तू सुंदर' असं म्हणत असतील नाही?") काकू म्हणाल्या. मी त्यावर नुसतीच हसले. कारण चीनला आल्यापासून हे कौतुकाचं वाक्य मी अनेक वेळा ऐकलं आहे.
चंगवनचे बाबाही चांगलेच गप्पिष्ट होते. त्यांच्या गप्पांमध्ये खाण्याचाच विषय जास्तीत जास्त होता. "काहीही म्हणा, चीनइतकी खाद्यपदार्थांची विविधता जगात इतर कुठेही नाही. चीनची खाद्यसंस्कृती नंबर वन आहे!" काका म्हणाले. "आता पुढे काका म्हणतील की, 'उलांछाबएवढं भारी जेवण कुठेच मिळत नाही'. काकूंनी थट्टा केली. "हो खरंच!" काकांनी बोलणं सुरूच ठेवलं, "इनर मंगोलियन लोक जेवणामध्ये नुसतं शिजवलेलं मांस खातात. टेबलावर मांसाचा मोठा गोळा ठेवलेला असतो. प्रत्येकाने आपापल्या सुरीने मांस कापून घ्यायचं. सोबत खारट चहा प्यायचा, म्हणजे मांस पचून जातं. चंगेझ खान असं जेवायचा म्हणूनच तर लढाया जिंकून एवढं मोठं राज्य बनवलं त्याने. इथलं हवामानच असं आहे की, भरपूर मांस खावंच लागतं. मागच्या वेळी सुचौला फिरायला गेलो तेव्हा तिथल्या जेवणाला दोन दिवसांत कंटाळलो, किती तेलकट!" "हॉटेलच्या जेवणात तेल जास्त वापरत असणार", काकू पुन्हा हसत हसत म्हणाल्या. काकांनी मग सगळ्यांना चिनी मातीचे छोटे कप भेट दिले. प्रत्येकावर माओ झेडोंगचं चित्र होतं. "सानिया, तुला चालेल नं असा कप भेट दिलेला ?" काकूंनी मला विचारलं. मी 'हो' म्हटल्यावर काकूंनी सगळ्यात आधी चॉईस करण्यासाठी माझ्या हातात खोकं दिलं. मी एक कप निवडला. त्यावर माओच्या चित्राखाली चार चायनीज कॅरेक्टर्स लिहिली होती, 'लिंगताव च्वानयोंग' म्हणजे 'खास नेत्यांसाठी'.
भेटवस्तू देऊन झाल्यावर काकू चंगवनच्या मागे लागल्या, "तुझा लहानपणीचा फोटो अल्बम दाखव ना सगळ्यांना." भरपूर आढेवेढे घेऊन चंगवन अखेर खोलीतून अल्बम ऐवजी एक छोटी फोटोफ्रेम घेऊन आला. त्यात मिलिटरी गणवेशातल्या बाबांच्या पुढ्यात मॅचिंग वेशातला छोटुकला चंगवन बसला होता. "आमचा चंगवन लहानपणी खूप गोड दिसायचा बरं का", काकू चंगवनला प्रेमाने निरखत कौतुकाने म्हणाल्या. "आताही अगदी तसाच गोड आहे! अरे, लाजू नको", आम्ही मुद्दाम चिडवत म्हणालो. काकू खूश होऊन स्वतःच अल्बम शोधायला खोलीत गेल्या. थोड्याच वेळात त्या खोलीतून अल्बमसोबतच त्यांचे मंगोलियन पारंपरिक पोशाखही घेऊन आल्या. "तरुणपणी बारीक होते तेव्हा व्हायचे हे मला, तुम्हाला घालून बघायचे आहेत?" आम्ही तर हौसाळलेल्याच होतो. मी आणि द्वारीने एक-एक करून तिन्ही प्रकारचे कपडे घालून बघितले. ते काळ्या रंगाचे, सुंदर विणकाम केलेले रेशमी कपडे घातल्यावर एकदम रुबाबदार दिसायला होत होतं. "काकू, मला ह्या कपड्यांमध्ये तुमच्यासोबत फोटो काढायचाय", असं म्हटल्यावर "थांब हं, मी जरा कपडे बदलते", असं म्हणत त्या लगबगीने खोलीत गेल्या आणि फोटोसाठी तयार होऊन आल्या.
आम्ही चंगवनच्या घरी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसलो आणि मग राहण्यासाठी बुक केलेल्या स्टुडिओ अपार्टमेंटला गेलो. खरंतर चंगवनने आम्हाला त्याच्या घरी राहायचाच आग्रह केला होता, पण आमची संख्या वाढल्यामुळे त्याने आमच्यासाठी हे अपार्टमेंट बुक केलं. ह्या अपार्टमेंटला भलामोठा हॉल आणि तीन खोल्या होत्या. पण बाथरूममध्ये गरम पाणी येत नव्हतं, वाय-फायही चालू होत नव्हतं. हॉलमध्ये एक माच्यांग टेबल होतं, त्याचा मात्र आम्ही पुरेपूर वापर केला. माच्यांग (Mahjong) हा चीनमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला एक बैठा खेळ आहे. तरुण मुलं, मोठी माणसं, आजी-आजोबा सगळ्यांनाच तो फार आवडतो. हा खेळ काहीसा रमीसारखा असला, तरी त्याचे नियम आणखी जास्त आहेत. ह्यात पत्ते नाही, तर नक्षीदार ठोकळे वापरले जातात. इनर मंगोलिया सहलीला यायच्या आदल्या रात्री लाय चंगथानने मला हा खेळ खेळायला शिकवला. वेगवेगळ्या नक्ष्यांची चायनीज नावं लक्षात ठेवणं गोंधळात टाकत होतं, पण मग हळूहळू मजा यायला लागली. आम्ही अगदी मध्यरात्री अडीच-तीन वाजेपर्यंत जागून माच्यांग खेळलो. नवीनच खेळ शिकलेल्या व्यक्तीला 'बिगीनर्स लक'चा अनुभव येतो असं म्हणतात. माझा असा लकी पिरीयड अजूनही संपला नसल्याने मी फार डोकं न लावताही चुकून माकून अनेकदा जिंकले.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठले तेव्हा फक्त एकटा चाव ईहांग उठून बसलेला होता. माझ्यासारखाच तोही लवकर उठायची सवय असलेला गुणी बाळ. मी अपार्टमेंटच्या खिडकीतून बाहेर बघितलं, तर लांब बाह्यांचा लाल शर्ट आणि लाल पँट अशा गमतीशीर वेशातले वयस्कर चिनी आजी-आजोबा 'थायची' (अतिशय संथ हालचाली असलेला चायनीज मार्शल आर्ट्सचा प्रकार) करत होते. चिनी लोकं, खास करून वयस्कर मंडळी प्रचंड व्यायामप्रेमी असतात. "भारतात नसेल ना थायची?" ईहांग म्हणाला. "अर्थात", मी म्हणाले. मग गंमत म्हणून मी त्याला सूर्यनमस्कार घालायला शिकवले. बी.एल.सी.यु.मध्ये अरेबिक भाषा शिकत असलेला ईहांग 'ओम भास्कराय नमः' वगैरे ओळी माझ्यापाठोपाठ अगदी हुबेहूब बोलत होता. थोड्या वेळात गाडी घेऊन चंगवन आम्हाला घ्यायला आला. आज काका-काकूंनी आम्हाला 'मंग हंग' नावाच्या एका फेमस रेस्टॉरंटमध्ये नाश्त्यासाठी बोलावलं होतं. ह्या रेस्टॉरंटचा आकार मंगोलियन तंबूसारखा होता. आम्ही आत शिरलो तशा तिथे नाश्ता करणाऱ्या सगळ्यांच्या नजरा माझ्यावर रोखल्या गेल्या. उलांछाबमध्ये कदाचित परदेशी पाहुणे फारच दुर्मीळ असावेत.
चंगवन आम्हाला दुसऱ्या मजल्यावरच्या तंबूमध्ये घेऊन गेला, तिथे काका-काकू आमची वाट बघत बसले होते. त्यांनी आम्ही यायच्या आधीच भरपूर पदार्थांची ऑर्डर देऊन ठेवली होती. आम्ही आत शिरलो तेव्हा एक-एक पदार्थ टेबलावर मांडले जात होते. मटण आणि कांदापातीचा एक प्रकार ह्याचं सारण असलेले स्टीम्ड बन्स, ते एवढे भलेमोठे होते की एक खाऊनच पोट भरून जावं, बटाट्याचं स्टफिंग असलेले स्टीम्ड बन्स, शिजवलेल्या मटणाचे पातळ काप, चटण्या, अंडी, सूप, वेगवेगळ्या प्रकारचं चीझ आणि खारट चहा. हा नाश्ता म्हणजेसुद्धा जंगी मेजवानीच होती. काकू सगळ्यांना प्रचंड आग्रह करत होत्या. हाडाच्या शिक्षिका असलेल्या त्यांना आम्हा सगळ्यांची नावं लक्षात होती. कोणाच्या ताटातलं काय संपलंय ह्यावर नजर ठेवत, त्या अगदी प्रत्येकाचं नाव घेऊन आग्रह करत होत्या. “चंगवन, तूपण व्यवस्थित खा हं. थांब, काकूंना वाढू दे तुझ्या ताटात, त्या थट्टेने म्हणाल्या. काकूंचा प्रेमळ आणि दिलखुलास स्वभाव मला फारच आवडला. आम्ही सगळ्यांनी भरपूर खाल्लं आणि तरीसुद्धा टेबलावर भरपूर नाश्ता उरला. काकूंनी आम्हाला ते सगळं प्रवासात खायला होईल म्हणून पिशवीत भरून दिलं. खाऊन झाल्यावर आम्ही सगळ्यांनी एकत्र फोटो काढले. मी आनंदाने दोन-तीन उड्या मारल्या, तर मला बघून काका म्हणाले, "बॉलीवूड सिनेमात दाखवतात तसं तुम्ही भारतातले लोकं जरा आनंद झाला की खरंच लगेच नाचायला लागता की काय ?"
नाश्ता झाल्यावर काका-काकू कामावर गेले आणि आम्ही उलांछाब शहरापासून 56 कि.मी. अंतरावर असलेलं उलांहादा वॉलकॅनो माउंटन पार्क बघायला गेलो. हे जिऑलॉजिकल पार्क म्हणजे 260 चौरस कि.मी. विस्तीर्ण माळरानावर पसरलेल्या तीसहून अधिक लहान-मोठ्या ज्वालामुखीच्या डोंगरांचा समूह. 26 हजार वर्षांपूर्वी जागृत ज्वालामुखी असलेल्या ह्या डोंगरांच्या समूहामध्ये वेगवेगळ्या रंगांचे, आकारांचे खडक, आणि इतर भौगोलिक वैशिष्ट्यं पाहायला मिळतात. त्यामुळे ह्या जागेला वॉलकॅनो म्युझिअम असंही म्हणतात. पार्क भलंमोठं असल्याने आत बसने फिरण्याची सोय होती. बसमध्ये बसून आम्ही सर्वांत आधी सहा नंबर ज्वालामुखीच्या डोंगरापाशी उतरलो. इथल्या रखरखीत उजाड जमिनीवर पांढरे करडे केसाळ उंट बसले होते. पाठीवर दोन टेंगुळ असणारे हे उंट कॅमल राईडसाठी गिऱ्हाइकांची वाट बघून बघून अगदी पेंगुळलेले दिसत होते.
उंटांच्या मागे दूरवर काळा आणि लाल रंगाचा खडकाळ ज्वालामुखीचा डोंगर दिसत होता. तो डोंगर पाहून अगदी 'मार्शियन' सिनेमातल्या मंगळावर आल्याचाच भास होत होता. कुठे कोणता धंदा करून पैसे कमवता येतील ह्यात चिनी लोकांना कोणीच मागे टाकू शकत नाही. ज्वालामुखीचा डोंगर मंगळासारखा दिसत असल्याने इथे अंतराळवीराचा पोशाख भाड्याने देणारी दुकानंही होती. पैसे खर्च करायला लावणारी असली फॅडं म्हणजे मला वेडेपणा वाटतो. मात्र मूळ भाडं 70 युआन असणारा तो ड्रेस लाय चंगथानने टिकटॉकवर डिस्कांउट कूपन शोधून 37 युआन मध्ये मिळवायची सोय केली. एखाद्या गोष्टीवर डिस्कांउट मिळतोय म्हणल्यावर त्याला नाही म्हणणं काही मला जमत नाही. त्यामुळे थोड्याच वेळात शौत्वानने निवडलेला पांढरा, आणि ह्वारी आणि मी निवडलेला गुलाबी रंगाचा अंतराळवीराचा पोशाख घालून, कमरेवर पाण्याची घागर घ्यावी तसं ते काळ्या काचेचं गोल गरगरीत हेल्मेट काखेला मारून आम्ही उलांछाबचा 'मंगळ' सर करायला निघालो. मंगळावरती दुसरे बिझनेस पार्टनर -कॅमेरावाले काका हजर होते. "आम्ही तीन वेगवेगळ्या देशांतून आलेल्या मुली आहोत. आम्ही आमच्या सगळ्या मैत्रिणींना तुमच्याकडूनच फोटो काढून घ्या असं सांगू", असं म्हणत भरपूर मस्का मारत शौत्वानने मस्त बार्गेनिंग केलं. काकांनी आम्हाला परदेशी पाहुणे म्हणून खास डिस्काउंट दिली. "हा काय प्रकार आहे? चिनी लोकं एकमेकांना फसवतात पण परदेशी पाहुण्यांना खास सवलत कशी काय देतात?" चिनी मित्र चक्रावले.
सहा नंबर ज्वालामुखीच्या लाल डोंगरावर अंतराळवीरांचे फोटो काढून झाल्यावर आम्ही बसने तीन क्रमांकाच्या डोंगरावर गेलो. ज्वालामुखीच्या डोंगराच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा गमतीशीर फोटोशूट झालं. पहिल्या फ्रेममध्ये इनर मंगोलियाचा चंगवन पाठ करून उभा राहिला. दुसऱ्या फोटोत द्वारी त्याच्या बाजूला उभी राहिली. तिसऱ्या फोटोत चाव ईहांग अॅड झाला. असं करत सहा फोटो काढले आणि मग "माझ्यासोबत इनर मंगोलियाला येणार?" "मी येते", "आणि मीपण, "मला सोडून नका जाऊ वगैरे कॅप्शन टाकत सहा जणांनी एकापाठोपाठ एक धडाधड वीचॅट मोमेंट्सवर अपलोड केले. लगेचच त्यावर निवेदन ग्रुपमधल्या इतर मित्र-मैत्रिणींकडून "किती रे आम्हाला जळवाल!" अशा कमेंट्सचा पाऊस पडला. मजा करून झाल्यावर आम्ही भरपूर पायऱ्या चढून डोंगरावर गेलो. वरती चिक्कार वारा होता. डोंगरावरून चारही दिशांना अगदी क्षितिजापर्यंत सपाट माळरान पसरलेलं दिसत होतं. "जुलै महिन्यात सगळी माळरानं लुसलुशीत हिरव्या गवताने आणि रंगीबेरंगी रानफुलांनी भरून जातील." चंगवन म्हणाला. अरेरे! ऑफ सीझनला इनर मंगोलियाला आल्याचं मला जरा वाईटच वाटलं.
उलांहादा वॉलकॅनो माउंटन पार्कमधले दोन डोंगर बघण्यातच आमचा अर्धा दिवस गेला. "आपण दुपारचं जेवण केलं नाहीये अजून", असं म्हणत आम्ही गाडीत बसलो आणि उलांछाबला परत जायला निघालो. गाडीत सगळ्यांनी काकूंनी सकाळी पिशवीत बांधून दिलेल्या योगर्ट ब्रेड आणि चीजचा फडशा पाडला. साडेचारच्या सुमारास आम्ही उलांछाबला पोहोचलो. सकाळी ब्रंच केला होता, तसं आता लंच आणि डिनर एकत्रच करायचं ठरवलं. जेवताना सगळे जण पूर्णवेळ लहानपणी बघितलेले चिनी सिनेमे, कार्टून्स, टी.व्ही. सिरियल्स, गाणी ह्या विषयांवर गप्पा मारत होते. शौत्वान चिनी वंशाची आहे, ती म्यानमारची असली तरीपण लहानपणापासून चिनी शाळेत गेलेली आहे. द्वारीचा तर जन्मच चीनचा. तिची आई चिनी आहे, आणि 15 वर्षांची होईपर्यंत ती चीनमध्ये वाढलेली आहे. त्यामुळे सगळ्या चिनी मित्रांसोबत त्या दोघी गप्पांमध्ये अगदी रंगून गेल्या होत्या. मला मात्र त्यांच्या विषयांबद्दल शून्य माहिती असल्याने मी शांतपणे श्रवणभक्ती करत होते. खूप भूक लागली होती, पण त्यांनी ऑर्डर केलेल्या पदार्थांच्या चवी मला फारशा रुचल्या नव्हत्या.
हे दोन दिवस मी खाण्याच्या बाबतीत सगळं काही ॲडजस्ट करत होते, आवडीने ट्राय करून बघत होते, आवडलं नाही तरी तक्रार न करता खात होते. माझ्या मित्र-मैत्रिणींसाठी मी त्यांच्यातलीच एक होते. पण माझं परदेशी असणं आणि म्यानमार, कोरियाच्या चिनी वंशाच्या मैत्रिणींचं परदेशी असणं पूर्णतः वेगळं होतं. सगळ्या चिनी वंशाच्या माणसांसोबत पाच दिवस राहणं, खाणं, फिरणं, 24 तास चिनी बोलणं माझ्यासाठी नवीनंच होतं. सुरुवातीला मला अगदी वेगळं पडल्यासारखं वाटलं. खूप प्रयत्न केला तरी शौत्वान आणि द्वारीसारखी मी त्यांच्यात सहज मिसळून जाऊ शकत नव्हते. पण मग अट्टाहास करून कशाला स्वतःला त्रास करून घ्यायचा? मी कुठे चिनी वंशाची आहे? आहेच मी मुळात वेगळी! ह्याची पुन्हा एकदा स्वतःला आठवण करून दिल्यावर मी आणखी मोकळेपणाने सहलीची मजा घेऊ लागले.
दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा पहाटे हिमवर्षाव होऊन गेलेला होता. खिडकीबाहेरचा ए.सी., झाडं, गाड्या, मैदान सगळ्यांनी पांढरी शाल पांघरलेली होती. अचानकच प्रचंड थंडी पडली होती. बरं झालं मी थंडीचं फेदर जॅकेट सोबत घेऊन आले होते. आदल्या रात्री चिनी सिनेमा बघून पुन्हा अडीच-तीन वाजेपर्यंत माच्यांगचा डाव रंगल्याने सकाळी उठून सगळ्यांची आवराआवर व्हायला उशीरच झाला. पुढच्या दोन रात्रींसाठी आम्ही दुसऱ्या ठिकाणचा प्फ्लॅट भाड्याने घेतल्याने पहिले सगळ्या सामानाचं नवीन जागी शिफ्टिंग करून घेतलं आणि मग ब्रंच करायला गेलो. दोन दिवस खूप मटण खाणं झाल्याने आज जरा भाज्या खायचं ठरवलं. आम्ही मागवलेल्या सॅलड प्लेटमध्ये चेरी टोमॅटो, काकडी, गाजर, बिटाच्या चकत्या, कांदापात, जांभळा कोबी आणि लेट्यूसची पानं सुंदर रचून ठेवली होती. अजून एका प्लेटमध्ये उकडलेल्या दुधीसारखी कोणतीतरी हिरवी भाजी आणि काजू असं कॉम्बिनेशन होतं, ज्यात फक्त चवीपुरतं मीठ टाकलं होतं. ह्यांचं शाकाहारी जेवण म्हणजे अगदी दुसरं टोकच होतं. दोन दिवस मटणावर ताव मारून आज मेंढीचा खुराक खाल्ल्यासारखं वाटलं.
जेवून झाल्यावर आम्ही उलांछाब वस्तुसंग्रहालय बघायला गेलो. वस्तुसंग्रहालय बऱ्यापैकी मोठं असून आत भरपूर ऐतिहासिक ऐवज, नकाशे, माहिती फलक, पुतळे, मॉडेल्स होते. मात्र हे सगळं पाहायला आम्ही सोडून इतर कोणीही नव्हतं. संग्रहालय बघून झाल्यावर आम्ही उलांछाबपासून दीड-दोन तासांवर असलेला 'लावलीहाय' नावाचा तलाव बघायला जायचं ठरवलं. इथे सगळं काही खूपच लांब लांब पसरलेलं होतं. गाडीची सोय असल्याशिवाय फिरणं अशक्यच. हायवेला दोन्ही बाजूला पांढऱ्या चुन्याने रंगवलेल्या भिंती आणि करड्या कौलांची छपरं असलेली घरं होती. त्यांच्या बाजूला असलेली भलीमोठी शेतं नांगरून ठेवलेली होती. कुंपणाच्या लांबच लांब भिंतींवर सगळीकडे मोठ्या लाल अक्षरांत देशभक्तीपर घोषवाक्यं लिहिलेली होती. लावलीहाय तलावाला जाण्यासाठी आम्ही हायवेवरून एका गावात वळलो. त्या खड्डड्या खुड्डड्यांच्या रस्त्याने आत आत जाताना मोबाईलवरचं पायतू मॅप रस्ता बरोबर दाखवतोय नं, अशी शंका येत होती. शेवटी तर तो खड्डयांचा रस्ताही संपला आणि थेट माळरानच सुरू झालं. त्यात मेंढ्या आणि गाई चरत होत्या. पहाटे हिमवर्षाव होऊन गेल्याने माळरानात सगळीकडे चिखल झाला होता.
अखेर तो तलाव आमच्या नजरेस पडला. आम्ही असलेल्या डोंगरावरून उतरून पाण्याजवळ जायचं म्हणजेसुद्धा बरंच चालायला लागणार होतं. खाली नुसताच चिखल आणि काटेरी कुंपण दिसत होतं. फोटोमध्ये दिसणारा खरा सुंदर तलाव आणि 'लावलीहाय'चा टुरिस्ट स्पॉट पलीकडच्या किनारी होता वाटतं. एवढा दोन तास प्रवास करून हे पाणी बघण्यासाठी आलो असल्याने आम्ही तलावाला पूर्ण वळसा घालून पलीकडच्या टुरिस्ट स्पॉटला जायचं ठरवलं. गाडीत बसलो आणि पायतू मॅप लावला. नकाशा डेस्टिनेशनपर्यंत पोहोचणारा एक अनामिक रस्ता दाखवत होता. पण तो रस्ता कसला, माळरानातली चिखल आणि दलदलीने भरलेली पायवाट होती ती. मनात शंका उमटण्याइतकाही अवसर न देता आमची गाडी चिखलात मस्तपैकी रुतून बसली. सगळ्यांनी लगेचच गाडीतून बाहेर उड्या मारल्या आणि तिला कसं बरं चिखलातून बाहेर काढता येईल ह्याच्या कल्पना लढवू लागले. मोबाईलवर व्हिडिओ शोधून झाले, ड्रायव्हर्सची अदलाबदल झाली, चाकाखाली कोरडी माती आणि दगड घालून झाले, जोर लगाके धक्का मारून झाला, पण इतकं करूनही गाडीची चाकं अजूनच खोल खोल रुतत गेली.
अगदी चित्रपटात शोभावा तसा प्रसंग होता तो. आजूबाजूला ओसाड माळरान, माणसांचा मागमूस नाही, दूरवर गवतात चरणाऱ्या मेंढ्या, चिखलात रुतून बसलेली गाडी आणि अंगात फेदर जॅकेट वगैरे थंडीचे कपडे आणि पायात चिखलाने माखलेले बूट घालून डोकं खाजवत उभे असलेले आम्ही. कोणाला तरी अजून एक उपाय सुचला आणि लागलीच हायवेवर पाहिलेल्या आपत्कालीन हेल्प लाईनला फोन लावला गेला. पण आम्ही इतक्या दुर्गम जागी येऊन चिखलात फसलो होतो की, त्यांच्याकडून मदत मिळण्यासाठीदेखील तासभर वाट पाहायला लागणार होती. वाट पाहता पाहता जवळपासच्या गावांमध्ये काही मदत मिळतेय का बघायचं ठरलं. चाव ईहांग टेकडीपलीकडच्या गावाच्या दिशेने निघाला, तर मी आणि लाय चंगथान दुसऱ्या बाजूच्या गावात मदत मागायला पळत पळत निघालो. "आयुष्यात केव्हातरी अशी धम्माल परिस्थिती यावी आणि मी त्यातून डोकं लढवून मार्ग काढावा असं मला नेहमी वाटायचं, लाय चंगथान एकदम अॅडव्हेंचरच्या मूडमध्ये आला होता. काल वॉलकॅनो माउंटनवर उत्साहाने पळापळी करताना पाय दुखावला गेल्याने तो पळताना जरा लंगडत होता. पण तरी एकदम खुशीत होती स्वारी.
आम्ही पळत पळत एका घरापाशी पोहोचलो. हे घर गावाच्या बरंच बाहेर होतं. आम्ही कुंपणाबाहेरून जोरजोरात हाका मारल्या. आतमध्ये माणसांची चाहूल लागली. एक म्हातारे आजोबा घराचं दार उघडून हळूहळू चालत येऊ लागले. त्यांनी अंगण ओलांडेपर्यंत आतल्या तीन-चार कुत्र्यांनी भुंकून भुंकून अगदी गोंधळ घातला. आतून आजींनी मोठ्याने आवाज काढून कुत्र्यांना दम भरला. कुत्रे गप्प बसले तरी म्हाताऱ्या आजोबांना ऐकू जावं म्हणून चंगथानला मोठ्या आवाजात ओरडूनच बोलायला लागत होतं. मदतीला एखादी व्यक्ती किंवा रस्सी, फळकुटं, गावातल्या इतर कोणाचा फोन नंबर ह्यातलं एकही आम्हाला आजोबांकडून मिळालं नाही. "ही मुलगी कोण? कुठून आली?" वगैरे चौकश्यांना सुरुवात झाली, तसे त्यांना गुंगारा देऊन आम्ही बाकीच्यांना काही मार्ग सापडलाय का हे बघायला गाडीपाशी परतलो.
इथे परिस्थिती 'जैसे थे' होती. थोड्याच वेळात हिरोची एन्ट्री व्हावी तसा समोरच्या टेकडीवरून एका आजोबांसोबत खटाऱ्यात बसून येणारा चाव ईहांग प्रकटला. त्याला बघून इकडे जोरदार हशा पिकला आणि त्याची छबी पकडायला मोबोईलचे कॅमेरे सरसावले. खटारा चिखल सुरू व्हायच्या अलीकडे दूरवरच थांबला आणि ते दोघे चालत आमच्या दिशेने येऊ लागले. आजोबांनी येऊन गाडीची पाहणी केली आणि म्हणाले, “ट्रॅक्टर लावून गाडी खेचण्याशिवाय पर्याय नाही. पाचशे युआन द्या, मी ट्रॅक्टरची सोय करतो." "पाचशे युआन ! काय वेड लागलंय काय?" चिनी मित्रांचे उद्गार ऐकून आजोबा जरा चिडलेच. "अजून किती तास वाट बघत बसायचं?" असं म्हणत बार्गेनिंग एक्स्पर्ट शौत्वान 'परदेशी पाहुण्यांचं' ग्रीन कार्ड घेऊन सरसावली आणि गावच्या बेरकी आजोबांसोबत कशीबशी तीनशे युआनवर डील सेटल झाली.
वीस मिनिटांनी आजोबा लाल रंगाचा ट्रॅक्टर घेऊन हजर झाले. त्यांच्या मागोमाग अजून एक दुसरे आजोबा खटारा घेऊन आले. दोघांनी खटाऱ्यातून जाडजूड दोर आणि फावडी काढली. मला जराही समजत नसलेल्या गावच्या भाषेत अखंड बडबड करत त्यांनी गाडीला दोर बांधला. ट्रॅक्टरने जरा हिसका देताच गाडी लगेच बाहेर आली. आम्ही सगळे अतिशय आनंदाने गाडीत बसलो. चंगथानने गाडी सुरू केली खरी पण ती पुढेच जाईना. आमच्या सहा जणांच्या वजनाने गाडीची चाकं पुन्हा एकदा चिखलात रुतून बसली होती. ट्रॅक्टरने पुढे निघालेले आजोबा परत मागे आले आणि गाडीला दोर जोडला गेला. ह्या वेळी आम्ही त्यांना जरा दूरपर्यंत गाडी खेचायला सांगितली. थोड्या कोरड्या जागी आल्यावरच त्यांनी दोर सोडून टाकला. आम्ही मात्र पुन्हा गाडीत बसायची रिस्क घेतली नाही. गाडी गावात पोहोचेपर्यंत आम्ही गाडीच्या मागे पळत पळत निघालो. माळरानात थंडगार हवा अंगावर घेत सुसाट पळायला धमाल आली.
गाडी गावात पोहोचली खरी, पण अडचणी अजून संपायचं नाव घेत नव्हत्या. आजोबांना पैसे द्यायची वेळ आली तसा आमच्यासमोर नवीनच प्रश्न उभा राहिला. आजोबांना फक्त कॅशच ठाऊक होती. पण हल्लीच्या काळात खिशात कॅश घेऊन कोण फिरतं? चीनमध्ये तर त्याची बिलकुलच गरज पडत नाही. आमच्याकडे फक्त मोबाईलवरच्या अलीपे, वीचॅट वगैरे अॅपमध्येच पैसे होते. "जवळच्या पेट्रोल पंपावर जाऊन कॅश आणूयात?" कोणीतरी कल्पना सुचवली. पण इथे कोणतीच जागा 'जवळ' असणं शक्य नव्हतं. बेरकी आजोबांनी पण आम्हाला असं जाऊ दिलं नसतं. आजोबाच मग चाव ईहांगचा फोन घेऊन त्यांच्या ओळखीतल्या लोकांना फोन करू लागले. आम्ही तोपर्यंत दारापलीकडच्या अंगणातल्या गायी, मेंढ्या आणि कोंबड्यांचं निरीक्षण करत बसलो. आजोबांच्या जोडीने सिगरेट पीत उभे असलेले आणखी दोन आजोबा आणि एक आजी कुतुहलाने आम्हाला न्याहाळत होते. अखेर आजोबांच्या ओळखीत कोणीतरी असं निघालं जे मोबाईल पेमेंटची ॲप वापरत होतं. आम्ही त्या व्यक्तीला वीचॅटवर पैसे ट्रान्सफर केल्यावर आजोबांनी पुन्हा एकदा फोन करून खात्री करून घेतली आणि मगच आमची तिथून सुटका झाली.
'लावलीहाय' दर्शनाला निघालेली आमची गाडी चिखलाने पूर्ण माखून गेली होती. हाय वे वरच्या पेट्रोल स्टेशनला फ्री वॉशिंगची पाटी बघून आम्ही थांबलो आणि पेट्रोल भरून गाडीला स्वच्छ अंघोळ घातली. आमच्या सगळ्यांचे बूटही खराब झाले होते. पेट्रोल स्टेशनच्या दादाकडून आम्ही तेपण धुऊन घेतले. “दादा तुझं गाव कुठलं? खूपच तरुण दिसतोस. विशीच्या आसपास असेल नं वय ?" ह्वारी आणि शौत्वान त्याच्याशी पूर्ण वेळ गप्पा मारत होत्या. लाजून लालेलाल झालेल्या दादाने आम्हा तीन मुलींचे बूट जराही तक्रार न करता धुतले. आमच्या पाठोपाठ लाय चंगथानदेखील बूट धुवायला आला, तेव्हा मात्र दादाने सरळ पाण्याचा पाईप त्याच्या हातात दिला. अखेर गाडी आणि आम्ही सारेच चकचकीत होऊन उलांछाबला जायला निघालो. अचानक आलेल्या अडचणीने सहलीचा तिसरा दिवस एकदम इंटरेस्टिंग करून टाकला. चौथ्या दिवशीदेखील हवेतली थंडी तशीच होती. सकाळी चंगवन योउथ्याओ (डीप फ्राईड डो स्टिक्स), तौच्यांग (सोय मिल्क) आणि तिखट खारट टोफू पुडिंग असा अस्सल चायनीज नाश्ता घेऊन फ्लॅटवर आला. खाता खाता सगळे टी.व्ही.वर चीनमधली एकदम जुनी क्लासिक अशी 'जर्नी टू द वेस्ट' मालिका बघू लागले. एकूण एक सगळ्यांनी त्याची पारायणं केली होती. द्वारी आणि शौत्वानलासुद्धा त्यातले सगळे प्रसंग आणि संवाद पाठ होते. "मी माझ्या आजीसोबत किमान पन्नास वेळा पहिला असेल हा एपिसोड", शौत्वान म्हणाली. "मी पहिल्यांदाच पाहतेय", मी म्हणाले. "काय? शक्यच नाही!" ह्वारी डोळे मोठे करून म्हणाली. "ही जुनी चिनी सिरीयल भारतात कोणी कशासाठी बघेल ?" मी जरा वैतागलेच. "आज पुन्हा माळरानांवर हिमवर्षाव झालाय. जाऊ या की नको? तुम्ही सांगा", चंगवन म्हणाला. "जाऊयात की!" सगळे उत्साहाने म्हणाले. थंडी, पाऊस, चिखल, बर्फ काहीही असू दे. मित्रांसोबत असताना धमालच येते. आमचं आजचं डेस्टिनेशन होतं, 'ह्वांगह्वाकौ' (यलो फ्लॉवर व्हॅली) माळरान. विस्तीर्ण माळरानं हीच इनर मंगोलियाची खरी पेहचान आहे. हिरवीगार माळरानं पाहण्याचा सीझन जुलै महिन्यापासून सुरू होतो. मे महिन्यात बीजिंगमध्ये उन्हाळा सुरू झाला असला तरी इनर मंगोलियातलं हवामान मात्र अजून हिवाळा आणि वसंत ऋतूच्या दरम्यानच घुटमळत होतं. हायवेवरून जाताना आम्हाला बर्फाचे डोंगर दिसायला लागले. एका भलामोठ्या डोंगरावर तर धावणाऱ्या घोड्यांचे आकार चितारले होते. आम्ही 'ह्वांगह्वाकौ' च्या हद्दीत शिरलो तसं हिरवं गवत आणि पांढरा बर्फ ह्यांचं कोलाज असणारे डोंगर, त्यावर चरणारे घोड्यांचे कळप आणि डोंगराच्या टोकाशी असणाऱ्या पवनचया असं सुंदर दृश्य आमच्या नजरेस पडलं. रस्त्यावरही बर्फ जमा झाला होता. आम्ही हळूहळू गाडी चालवत रस्त्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत गेलो. समोर खुरटं हिरवं गवत वाढलेल्या भरपूर दऱ्या आणि डोंगर होते. गाडीतून उतरलो तर प्रचंड थंडी होती, वाराही डेंजर वाहत होता. "आता इथवर आलोच आहोत तर घोडेस्वारी करूयात", असं म्हणत आम्ही घोड्यांवर बसून घेतलं आणि मग बर्फातल्या माळरानावरून परत जायला निघालो. वाटेत पांढराशुभ्र बर्फ पाहून पुन्हा थांबलो आणि बर्फात पळापळी आणि मस्ती करून घेतली.
परत येतानाच्या वाटेत सगळ्यांनी चिनी गाणी म्हटली. "ह्या दुकानातलं स्मोक्ड चिकन जबरदस्त असतं हा." चंगवनचं बोलणं ऐकताच, "चला खाऊयात!" सगळे एकसुरात म्हणाले. "परत जाऊन जेवायचंच आहे. आता खायला एक कोंबडी पुरे", असं म्हणून आम्ही एक अख्खी कोंबडी विकत घेतली आणि गाडीत येऊन खायला बसलो. ती कोंबडी पाय, डोकं, चोच, तुऱ्यासकट अख्खी भाजलेली होती. कोळशाची धुरी दिलेल्या चिकनला हलकी मीठ आणि मसाल्याची चव होती, पण जास्तीत जास्त त्याचा ओरिजनल प्क्लेवर जपायचा प्रयत्न केला होता. कोंबडीचा चट्टामट्टा करून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला लागलो.
एकतर चिनी लोकांना खायला खूप आवडतं. त्यातून तरुण मुलांचा आहार जास्त असतो. आणि इनर मंगोलियाच्या स्पेशालिटी पदार्थांची यादी फारच मोठी होती. त्यामुळे 'जेवण' हा आमच्या सहलीचा आत्मा होता. साडेचार-पाचच्या सुमारास उलांछाबला पोहचलो तसे थेट रेस्टॉरंटपाशीच उतरलो. ह्या वेळी आम्ही ऑथेंटिक इनर मंगोलियन पदार्थ 'शोउपारौ' म्हणजे उकडलेल्या मटणाचे काप खाल्ले. त्यासोबतच साखर लावलेल्या गुलाबजामसारखा आकार असणारा, पण पिवळ्या रंगाच्या चीजपासून बनवलेला गोड पदार्थ, आणि अतिशय हलका आणि लुसलुशीत असा गोड पावदेखील खाल्ला. जेवून झाल्यावर फ्लॅटवर गेलो आणि पुन्हा माच्यांगचा डाव रंगला. चंगवन रोज संध्याकाळी झोपायला घरी जात होता. आज उलांछाबमधली शेवटची रात्र असल्याने आम्ही त्याला इथेच ठेवून घेतलं.
बी.एल.सी.यु.ला परत गेल्यावर काही दिवसांनी आमच्या निवेदनाच्या गटाचा एक स्टेज परफॉर्मन्स होणार होता. त्या कार्यक्रमासाठी आम्हाला गायचं आणि नाचायचं होतं. सुट्टीमध्ये सगळ्यांनी सराव करून नाचाचा एक व्हिडिओ कंपल्सरी सबमिट करायचा आहे, असा आमच्या गटाच्या लीडरकडून दम मिळाला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी उठून मी, चंगवन, लाय चंगथान आणि चाव ईहांग बिल्डींगखालच्या मोकळ्या जागेत नाचाचा व्हिडिओ बनवायला गेलो. लाय चंगथान सोडून बाकी दोघांना नाचाचं जराही अंग नव्हतं. त्यामुळे मला त्यांच्या डान्स टीचरची भूमिका पार पाडायला लागली. सुट्टीचा हा गृहपाठ पूर्ण करून झाल्यावर आम्ही सामान गाडीत भरून जेवायला निघालो. जेवायला इनर मंगोलियाची आणखी एक स्पेशल डिश 'शाओमाय' म्हणजे एक प्रकारचे स्टीम्ड डम्पलिंग्स खाल्ले आणि मग चंगवनने आम्हाला ट्रेन स्टेशनला सोडलं.
दुपारची बुलेट ट्रेन पकडून आम्ही बीजिंगला यायला निघालो. माहीत नाही का पण प्रवासामध्ये मला कधीच झोप लागत नाही. सलग पाच दिवस भटकणं आणि चार रात्री जागरणं करूनही डोळ्यांना विश्रांतीपेक्षा खिडकीबाहेरचे डोंगर आणि ढग बघण्यात जास्त इंटरेस्ट वाटत होता. गेल्या पाच दिवसांतल्या आठवणी डोळ्यासमोर तरंगल्या तसं आपोआप ओठांवर हसू आलं. सर्वसाधारण चिनी लोकांच्या डोक्यातली इनर मंगोलियन ट्रीपबद्दलची कल्पना म्हणजे हिरवीगार कुरणं, वाळवंट, उंट सफारी वगैरे. आमची सहल मात्र ह्याच्यापेक्षा एकदमच वेगळी होती. आतापर्यंतच्या सगळ्या सहली मी स्वतः प्लॅन करून परदेशी मैत्रिणींना सोबत घेऊन केल्या होत्या. फॉरेनरसारखं फिरणं आणि लोकल चिनी मित्रांच्या सोबतीने फिरणं ह्यात किती फरक होता! विचार करता करता दोन तासांचं अंतर पाच मिनिटांत संपल्यासारखं वाटलं. "पोहचलो रे, बी.एल.सी.यु.ला." आम्ही 'उलांछाब फॅमिली'च्या वीचॅट ग्रुपवर चंगवनला मेसेज टाकला. उद्या नाश्त्याच्या टेबलापाशी निवेदन गटातल्या मित्र-मैत्रिणींना कधी एकदा सगळे धमाल किस्से ऐकवतो असं आम्हाला झालं.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या