डिजिटल अर्काईव्ह

स्वयंसेवी संस्थांचा मातृहृदयी आधारवड

भारतात सहा लाखांहून अधिक स्वयंसेवी संस्था सामाजिक बदलाची धडपड करीत आहेत. अशा संस्थांचे सक्षमीकरण करणारे, त्यांना शाश्वतता, व्यापकता, सेवेची समावेशक दृष्टी देत समविचारींशी जोडणारे काही अदृश्य शिल्पकार असतात. असाच एक असामान्य मातृहृदयी संस्थापालक म्हणजे रमेशभाई गुलाबचंद कचोलिया. सहज शक्य असूनही त्यांनी स्वतःची मोठी संस्था उभी केली नाही. अंधार भेदण्यासाठी आणखी एक ज्योत प्रज्वलित करण्याऐवजी देशभरातील अस्तित्वाचा संघर्ष करणाऱ्या सुमारे दोन हजार संस्थांना सक्षम करण्यात आयुष्यातील 50 वर्षे आणि सर्वस्व त्यांनी दिले.

 

लाखो वंचितांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याच्या प्रक्रियेला शाश्वत, नैतिक आणि आध्यात्मिक पाया देणाऱ्या रमेश भाईंचे 10 जुलै 2026 रोजी वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले.

इंटरनेट आणि सोशल मीडियाची आयुधे उपलब्ध होण्यापूर्वीच्या काळात रमेशभाईंनी भारताच्या कानाकोपऱ्यातील प्रामाणिक समाजकार्याचा शोध सुरू केला. वृत्तपत्रे, संस्थांची माहितीपत्रके, पुस्तके, मित्र आणि प्रवास यांच्या माध्यमातून ते दुर्गम भागांतील धडपड्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचत. संस्थेचे काम प्रत्यक्ष पाहणे, लाभार्थ्यांकडून थेट प्रतिसाद घेणे, संस्थापकाची आणि त्याच्या संघाची सचोटी तपासणे, त्यानंतर प्रथम स्वतःचा मोठा आर्थिक सहयोग देणे, संस्थेच्या दुर्बल बाजूंचा अभ्यासपूर्वक शोध घेऊन त्यावर संस्थेसोबत काम करणे, ती निकोप झाल्यावर तिच्या गरजांवर अन्य दात्यांसोबत काम सुरू करणे, अशी त्यांची कार्यपद्धती होती. विविध स्त्रोतांतून संस्थांना आर्थिक मदत मिळण्यासाठी संस्थाकार्याचे उत्तम शब्दांकन हृदयाला स्पर्शणाऱ्या इंग्रजीत ते स्वतः करून देत. संस्थेच्या कार्यकर्त्यांसह दात्यांना भेटून कार्याचे सादरीकरण कसे करावे याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण देत. संस्थेबद्दल पूर्णतः अनभिज्ञ असणाऱ्या दात्यांना अपेक्षित असणारी संस्थेच्या पारदर्शकतेची, बांधिलकीची आणि विश्वासार्हतेची हमी ते स्वतः देत. याच आधारे संस्थांना दात्यांचा सहयोग मिळू लागे. दाता आणि दानाचे सातत्य टिकवण्यासाठी त्यांच्याशी अनौपचारिक संवाद ठेवण्यावर त्यांचा भर असे. त्यामुळे आरंभी शेकड्यात देणगी देणारे पुढे विश्वासाने स्वतःचे कोटी रुपये संस्थांना सोपवीत... पुढील दशकाचा वाटचालीचा आराखडा ते संस्थांना तयार करायला लावत. त्यासाठी सातत्यपूर्वक मार्गदर्शन चिकाटीने करीत. संस्था चालविणाऱ्यांना समाजकार्याचे औपचारिक शिक्षण आणि प्रशिक्षण घेण्यासाठी त्यांनी जगभर पाठविले. संस्थांचे कार्यकर्ते त्यांना अंकल असेच संबोधत.

संस्थाशोध

बंगालमधील हावडा येथील टिकियापाडा म्हणजे मुंबईच्या धारावीचे प्रतिरूप. येथे मामून अख्तर याने आपल्या पत्र्याच्या खोपटीत सुरू केलेल्या समरिटन हेल्प मिशन या बालशिक्षण प्रयोगाची कहाणी त्यांना समजली. आर्थिक कोंडीमुळे हा प्रकल्प थबकला होता. थेट संपर्काचे साधन नसल्याने तत्काळ ते तेथे पोहोचले.

रमेशभाईंनी या संस्थेचा कायाकल्प केला. वार्षिक 400 रुपये आय व्यय असणारी ही संस्था सध्या चार सुसज्ज शाळांमधून सुमारे सोळा हजार विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक स्तरापर्यंत मोफत दर्जेदार शिक्षण देते. त्यांचा वार्षिक जमा खर्च 16 कोटी रुपये असतो. आरोग्य, रोजगार आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या माध्यमातून ती हावडा परिसरातील परिवर्तनाचे केंद्र बनली आहे.

मध्यप्रदेशातून कोलकाता येथे शिक्षणासाठी आलेला विनायक लोहानी हा आय.आय.टी. आणि आय.आय.एम. मध्ये अव्वल ठरला. विनायकने त्याची उच्च वेतनाची नोकरी सोडून वंचित मुलांच्या शिक्षणासाठी परिवार केंद्र ही संस्था सुरू केली. रमेशभाईंच्या परीसस्पर्शामुळे ही संस्था तीन हजार मुलांचा निवासी शैक्षणिक प्रकल्प बंगालमध्ये चालवते. छत्तीसगड, मध्यप्रदेश, बंगाल आणि झारखंड मधील आदिवासी आणि ग्रामीण भागातील सहा लाखांवर मुलांच्या शिक्षणासाठी 'सेवा कुटीर' हा प्रकल्प राबवते. इ.स.2000 मध्ये भविष्य अधांतरी असलेल्या या प्रकल्पाची वार्षिक उलाढाल शंभर कोटींवर केव्हाच गेली. केंद्र शासनाकडून मिळालेला पद्मश्री पुरस्कार विनायकने रमेश अंकलला समर्पित केला.

विज्ञान शिक्षक राजीव वर्तक यांच्या प्रयोगाधारित शिक्षणाच्या स्वप्नाला संस्थात्मक स्वरूप मिळवून देण्यासाठी त्यांनी अध्ययन संस्थेला प्रोत्साहन दिले. गेल्या पंचवीस वर्षांत या संस्थेने 6 हजार शिक्षकांना प्रशिक्षण देऊन 18 लाख विद्यार्थ्यांपर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवले. तंत्रज्ञानाचा उपयोग करून सरकारी शाळेतील शिक्षणदर्जा उंचावण्याचे जीवनध्येय संजय दालमिया या IIT च्या माजी विद्यार्थ्याने निवडले. त्याच्या ओपन लिंक फाउंडेशनचा 2016 मधील आवाका मर्यादित आणि वार्षिक खर्च 25 हजार रुपये होता. रमेशभाई यांच्या सहभागाने या संस्थेचे विनोबा हे अॅप महाराष्ट्र, छत्तीसगढ, बिहार आणि मध्यप्रदेशात 3 लाख शिक्षक आणि 52 लाख विद्यार्थ्यांच्या वापरात आले आहे. स्नेहालय आणि ओपन लिंक फाउंडेशनचे विश्वस्त राजीवकुमार व रमेश अंकल या कामात दुव्याचे काम करीत.

देशातील अनेक राज्ये ओपन लिंक फाउंडेशनशी कार्यकरार करण्यास उत्सुक झाली आहेत. ही संस्था देशाला एका मोठ्या शिक्षण क्रांतीकडे अगदी शांतपणे घेऊन चालली आहे. हयात असताना रमेशभाई सातत्याने या उपक्रमाची चौकशी करीत, उपयुक्त सल्ले आणि सहयोग देत. 250 तंत्रस्नेहींची टीम, 18 कोटी रुपयांचा वार्षिक खर्च असा या संस्थेचा प्रवास एका दशकात झाला.

संस्थेतील प्रत्येकाशी संपर्क

1998 मध्ये रमेशभाई अहिल्यानगर मधील स्नेहालय संस्थेत आले. जिल्ह्यातील 13 वेश्यावस्त्या आणि झोपडपट्ट्यांत फिरून त्यांनी प्रश्नांची दाहकता समजून घेतली. त्या वेळी स्नेहालयचे चार प्रकल्प आणि अत्यल्प आर्थिक संसाधने होती. रमेशभाईंचा वरदहस्त लाभल्याने स्नेहालयचे 8 जिल्ह्यांत 27 बहुविध सेवा प्रकल्प उभे राहिले. 18 हजार लाभार्थ्यांपर्यंत सेवा पोहोचू लागल्या.

संस्थेने मुंबई-पुण्यातील मोठ्या देणगीदारांवर अवलंबून न राहता स्वतःची आर्थिक आणि संसाधनांची स्वयंपूर्णता स्थानिक स्तरावर साध्य केली पाहिजे. आसपासची माणसे न जोडता जगातील देणगीदार शोधणे फोलपणाचे. यवतमाळमधील दिलासा, खानदेशातील भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन, दिल्लीतील गुंज, मेळघाटातील महात्मा गांधी आदिवासी रुग्णालय, डॉ. भारत वाटवानी यांचे श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाउंडेशन, नर्मदा खोऱ्यातील मेधा पाटकर यांच्या जीवनशाळा, पुण्यातील सार्थक, आणि संपर्क, कोक्राझारमधील ऍक्शन नॉर्थ ईस्ट ट्रस्ट, मध्य प्रदेशातील समाज प्रगती सहयोग, कर्नाटकातील उन्नती महेश फाउंडेशन, भारतीय लोकशाहीच्या शुद्धीसाठी धडपडणारी प्रा. त्रिलोचन शास्त्री यांची असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म, बंगाल मधील संनलाप, अशा हजारो संस्थांच्या उभारणीत रमेशभाई उत्स्फूर्त मदत मिळवून देत राहिले.

रमेशभाईंना अनेक संस्था आपले अध्यक्ष किंवा विश्वस्त होण्याचा आग्रह करीत. परंतु ते कुठल्याही संस्थेचे सदस्यदेखील झाले नाहीत. सेवा करीत असताना आपल्या निरपेक्षतेला जागत ते कोणत्याही बिरूद किंवा मोहात गुंतले नाहीत. इदं न मम, हा त्यांचा भाव कायम राहिला. ते आजन्म 'कार्यकर्ता' राहिले.

प्रत्येक संस्थेच्या फक्त संस्थापकांशीच नव्हे तर अन्य सर्व विश्वस्त आणि कार्यकर्त्यांशी रमेशभाई यांचा थेट आणि नियमित संपर्क असायचा. त्यामुळे संस्थेच्या कारभाराची आणि प्रश्नांची सखोल माहिती त्यांच्याकडे उपलब्ध असे. संस्थांमधील वादविवाद विकोपाला गेले, तर रमेशभाईंचे सर्वोच्च न्यायालय यात नैतिकतेवर आधारित न्यायपूर्ण निवाडा करीत. त्यांच्या निकालामुळे पुन्हा त्याच प्रकारच्या वादविवादांमध्ये संस्था अडकल्या नाहीत. त्यांना कार्याची नवीन दृष्टी मिळाली.

रमेशअंकल यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा संस्थेत संपन्न झाला. वयोमानामुळे यापुढे प्रवास जमणार नाही, म्हणून अंकल स्नेहालय संस्थेत आले होते. या वेळी घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांनी विस्ताराने आपल्या जगण्याचे तत्त्वज्ञान सांगितले. ते म्हणाले की, आपल्या यशात आणि वाटचालीत परमेश्वराची महत्त्वाची भूमिका असते. जगात खूप लोक परिश्रम करतात. परंतु यशस्वी थोडेच होतात. स्वतःच्या कष्ट आणि हुशारीच्या पलीकडे परमेश्वराचे आशीर्वाद, अनेकांची मदत आणि नशीब यांचा वाटा अनमोल असतो.

आयुष्यातील नवे वळण

20 मे 1938 रोजी विदर्भातील अकोला येथे कष्टकरी कुटुंबात रमेशभाई जन्मले. त्यांचे वडील कापड गिरणीत कामाला होते. चाळीतील एका खोलीत त्यांचे 9 लोकांचे कुटुंब रहात असे. नगरपालिकेच्या मराठी शाळेत ते शिकले. कष्ट आणि नोकऱ्या करीत त्यांनी मुंबईत कायद्याची पदवी घेतली. बिर्ला उद्योगसमूहात वरिष्ठ पदावर ते रुजू झाले. एक दशक सौदी अरब देशात आणि कार्पोरेट क्षेत्रात काम केले. त्यांच्या आयुष्याला निर्णायक वळण मिळाले ते 1981 मध्ये आनंदवनाशी जडलेल्या नात्यानंतर. महामानव बाबा आणि साधनाताई आमटे यांच्या कामाने ते भारावले. त्यांनी महारोगी सेवा समितीच्या आनंदवनाबाहेरच्या सर्व कामात स्वतःला झोकून दिले. साधनाताई आणि बाबांनी त्यांना विकास आणि प्रकाश यांच्याप्रमाणेच आपला तिसरा मुलगा मानले. त्यांच्या सहवासात समाजकार्याच्या त्यांच्या जाणिवा सखोल आणि व्यापक झाल्या. बाबांनी त्यांना सांगितले की, आपला देश आणि समाज प्रचंड मोठा आणि विविधतेने बनलेला आहे. त्याच्या विकासासाठी हजारो स्वयंपूर्ण आणि विविध विषयांत सेवाकाम करणाऱ्या संस्थांची देशाला गरज आहे.

याच विचारातून 'केअरिंग फ्रेंड्स' या अनोख्या उपक्रमाचा जन्म झाला. 2003 पासून त्यांनी संवेदनशील दाते, उद्योगपती, व्यावसायिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांना एका मुक्त व्यासपीठावर आणण्यास सुरुवात केली. हे व्यासपीठ नोंदणीकृत संस्था नव्हते. त्याचे बँक खाते, पदाधिकारी असे काहीच नाही.

प्रत्येक देणगी थेट संबंधित संस्थेकडे जात असे. दरवर्षी सुमारे 150 संस्थांना रमेशभाई आणि केअरिंग फ्रेंड्स आर्थिक सहयोग देत आले. जुन्या संस्थांची मदत चालू ठेवून ही नवीन भर त्यात पडत असे.

आर्थिक क्षेत्रात मोठी भरारी घेतलेला रमेशभाई यांचा मुलगा आशिष हा त्यांचा संस्थांसाठीचा सर्वात मोठा दाता बनला. आपल्या वडिलांना आग्रहाने योग्य संस्थांना सहयोग देण्यासाठी कोट्यवधी रुपये देणारा मुलगा, या दानयज्ञाने आनंदी होणारी त्यांची पत्नी लता, सुष्मिता सारखी सून असा त्यांच्या कामाला अनुरूप परिवार त्यांना योगायोगाने मिळाला नव्हता. त्यांनी कुटुंबात रुजवलेल्या संस्कारांचे ते फलित होते.

दरवर्षी संस्थांच्या कार्यकर्त्यांचा तीन दिवसांचा मेळावा केरिंग फ्रेंड्सद्वारे आयोजित केला जात असे. त्यातून त्यांनी संस्थांची अनुभवांची देवाणघेवाण, परस्पर सहकार्य आणि सामूहिक शिक्षणाची संस्कृती निर्माण केली.

गेल्या पंचवीस वर्षांत केअरिंग फ्रेंड्सच्या माध्यमातून आणि विविध स्त्रोतांतून त्यांनी विविध संस्थांना 1500 कोटी रुपयांहून अधिक मदत थेट पोहोचवली.

रमेशभाईंचे वैयक्तिक जीवन त्यांच्या विचारांइतकेच साधे होते. अंधेरीतील छोट्याशा तीन खोल्यांच्या घरात त्यांनी आयुष्याचा मोठा भाग व्यतीत केला. दिवसातील केवळ एक तास व्यवसाय आणि उर्वरित वेळ समाजकार्यासाठी राखून ठेवणे, हे त्यांचे जीवनसूत्र होते.
साधा बटणाचा मोबाईल, जुनी वस्तू पूर्ण झिजेपर्यंत वापरणे, अनावश्यक खर्च टाळणे आणि पर्यावरणपूरक जीवनशैली ही त्यांच्या जगण्याची वैशिष्ट्ये होती. त्यांचे लहान घर सतत कार्यकर्त्यांनी गजबजलेले असे. मुंबईत येणाऱ्या दुर्गम भागातील कार्यकर्त्यांसाठी त्यांनी राहण्याची व्यवस्था केली, दात्यांच्या भेटींचे नियोजन केले. स्वतःचे वाहन ते कार्यकर्त्यांना देत, स्वतः मात्र रिक्षाने प्रवास करत.

रमेशभाईंनी केवळ संस्थांना निधी मिळवून दिला नाही, तर संस्था संचालनाचे तत्त्वज्ञान दिले. आपल्या आसपासच्या सर्वसामान्य लोकांकडून निधी संकलन करण्याला संस्थांनी प्राधान्य द्यावे असा त्यांचा आग्रह होता. कारण संस्थांना आपला किमती वेळ देणारे कार्यकर्ते या लहान देणगीदारांतून मिळण्याची शक्यता जास्त असते. आपल्या आसपासच्या लोकांकडून काहीही मदत न मिळवता केवळ शहरातील CSR आणि मोठे देणगीदार शोधणाऱ्या संस्थांचा सामाजिक पाया कमकुवत राहतो, असे ते लोकांना सांगत.

स्थानिक पातळीवर वेळ आणि लहान वस्तुरूप सहयोग मिळवून त्याला आपल्या कार्याचा मोठा आधार बनवणाऱ्या स्नेहालय संस्थेचे उदाहरण ते सर्वांना देत. केअरिंग फ्रेंड्सच्या संमेलनाचे आयोजन त्यांनी आम्हाला अहिल्यानगर मध्ये करायला लावले. शहरातील 300 संवेदनशील लोकांना आम्हाला एकत्र आणायला सांगितले. त्यांच्या भाषण आणि संवादाने आमच्याच गावातील लोकांनी आम्हाला एकाच संमेलनात नऊ लाखांची मदत दिली. काही फाउंडेशन आणि परिवार यांनी वार्षिक सहयोगाचा शब्द दिला. तो आजअखेर, गेली 17 वर्षे पाळला.

विविध जाती-धर्मातील लोकांचा विशेषतः महिला आणि लाभार्थी यांचा सहभाग, राजकारणापासून कटाक्षाने लांब राहणे, आपल्या लक्ष्य गटाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करताना वैचारिक संप्रदायवादात न पडणे, व्यक्तिकेंद्रित न ठेवता संस्था व्यवस्थाकेंद्रित करीत जाणे, सर्वांनाच आपल्या ध्येयासाठी सोबत घेणे, सक्षम उत्तराधिकारी आपल्या हयातीत तयार करणे आणि त्यांच्या हाती कामाचे सर्वाधिकार सोपविणे, समाजाशी विश्वासाचे नाते आणि संपूर्ण पारदर्शकता जपणे, संस्थेच्या आत लोकशाही पद्धतीने कारभार करणे, विरोधी मते व्यक्त झाली तर त्यावर सहानुभूतीने चिंतन करणे, या मूल्यांचा त्यांनी सातत्याने आग्रह धरला.

सेवाकार्याची नवी पेरणी

ओळख आणि विश्वासार्हता नसलेल्या नव्या संस्थांसाठी पहिले एक लाख रुपये उभे करणे सर्वांत कठीण असते. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या निधीतून एक योजना सुरू केली. नवोदित पात्र संस्था निवडून त्यांना बीज मदत देण्याची.

ही सर्व जबाबदारी त्यांनी स्नेहालय संस्थेला दिली. स्नेहालय संस्थेच्या शिफारसीनुसार 350 नवोदित संस्थांना त्यांनी 6 कोटी 79 लाख रुपयांची बीजमदत दिली. त्याचबरोबर अशा नवोदित संस्थांसाठी स्नेहालयला सेवा संवर्धन कार्यशाळा सुरू करायला लावल्या. या संस्थांना स्वतःचे ध्येय निश्चित आणि शब्दांकित करणे, अहवाल लेखन, माहितीपत्रक, तंत्रज्ञानाचा वापर, देणगीदारांशी संवाद यांचे प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले.

या मिशनमध्ये कुठेही त्यांचा उल्लेख न करण्याची अट मात्र त्यांनी कायम ठेवली. पुरस्कार, सत्कार, व्यासपीठे आणि प्रसिद्धी यांपासून ते जाणीवपूर्वक दूर राहिले. केअरिंग फ्रेंड्सच्या बैठकांमध्ये, वार्षिक स्नेहमिलनात सर्व उपस्थितांसाठी ते सुमारे 300 प्रकारचे हिंदी - इंग्रजी - मराठी भाषांमधील प्रेरणादायी पुस्तकांचे संच उपलब्ध करायचे. ज्याला जी पुस्तके हवी आणि जेवढ्या प्रमाणात हवी तेवढ्या प्रमाणात ती घेऊन जाण्याची मुभा असे. या पुस्तकांनी अनेकांना देण्यातील आनंद घेण्याची प्रेरणा दिली. बिल गेट्स आणि वॉरन बफेट यांच्या 'गिविंग क्लेज'चे आकलन होण्याच्या फार पूर्वी रमेशभाई यांनी देण्यातील आणि त्यागातील आनंदाची चव चाखण्यासाठी हजारोंना प्रोत्साहित केले.

रमेशभाई यांच्या निधनाने भारतातील स्वयंसेवी क्षेत्राने केवळ एक दानशूर व्यक्ती गमावली नाही, तर संस्थांना जोडणारा, त्यांच्यावर निस्सीम विश्वास ठेवणारा आणि समाजपरिवर्तनासाठी आयुष्य वेचणारा असामान्य आधारवड गमावला.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गिरीश कुलकर्णी, अहमदनगर ( 2 लेख )

लेखक, पेमराज सारडा महाविद्यालयात प्राध्यापक असून, स्नेहालय या सामाजिक संस्थेचे संस्थापक आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके