डिजिटल अर्काईव्ह

18 नोव्हेंबरला माझा IIT मधला आणि सामाजिक चळवळीतला खूप जवळचा मित्र आनंद करंदीकर आपल्यातून आपल्याला सोडून गेला. मी गोव्याला जाण्यासाठी एअरपोर्टवर होतो तेव्हाच सरिताचा फोन आला आणि 'त्याला बरं नाहीये आणि हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं आहे' हे ऐकून धस्स झालं ! गोव्याला पोहोचल्यावर फोन केला तेव्हा तो गेल्याचीच बातमी कळली. ज्याची मला अनेक दिवस भीती होती, ते शेवटी झालंच. हे केव्हातरी होणारच होतं. पण तरीही मी अजूनही प्रचंड बेचैन आहे. माझ्या मनात सहा दशकांच्या आठवणी नाचायला लागल्या.

माझ्याबरोबर IIT मध्ये माझ्याच हॉस्टेलमध्ये तो होता. ते 1967चं वर्ष असावं. तो मेटॅलर्जीला होता, तर मी केमिकलला. पहिल्याच दिवशी तो थॉरस्टीन व्हेब्लिनच्या 'थिअरी ऑफ लेझर क्लास' या पुस्तकाविषयी उत्साहात बोलत होता तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं. सोलापूरला कॉलेजमध्ये असतानाच 'वर्ल्डली फिलॉसॉफर्स' हे हेलब्रोनरनं लिहिलेलं पुस्तक मी वाचलं होतं आणि त्यात व्हेब्लिनच्या 'कॉन्सपिक्युअस कंझम्पशन 'बद्दलचे त्याचे विचार आणि त्यानं लिहिलेलं पुस्तक यांविषयी वाचलं होतं. पण आयआयटीमध्ये ते वाचलेला कोणी भेटेल आणि त्याविषयी बोलेल असं मात्र मुळीच वाटलं नव्हतं. एवढं भरभरून बोलणारा हा मुलगा कोण, असं मला कुतूहल वाटलं आणि त्यानंतर आमची मैत्री जुळली ती कायमचीच. विंदा करंदीकर माझे अत्यंत आवडते कवी. ते सोलापूरला आमच्या घरी येत असत. आनंद हा त्यांचाच मुलगा आहे हे माहीत झाल्यावर तर आणखीनच आपुलकी निर्माण झाली होती.

तसं पाहिलं तर आमच्या दोघांची आयुष्यं समांतरच गेली असं म्हणायला हरकत नाही. दोघेही आयटीत शिकलो, दोघंही नंतर सामाजिक चळवळीत शिरलो, दोघेही सत्याग्रह केल्यामुळे दहा-एक दिवस तुरुंगात गेलो, त्यानंतर दोघंही कॉर्पोरेट जगात वावरलो, परदेशात चिकार भटकलो, दोघांनी कालांतरानं ग्लोबल बिझनेसेस सांभाळले, पुस्तकं लिहिली, अनेक ठिकाणी भाषणं दिली, पण सामाजिक भान मात्र कधीच विसरू दिलं नाही.

बेकारी, गरिबी, धर्मांधता, जातिव्यवस्था, पुरुषप्रधान भांडवलशाही व्यवस्था, स्त्री-पुरुष असमानता, स्त्रियांवरचे अन्याय, अंधश्रद्धा, वैज्ञानिक दृष्टीकोन, लैंगिक स्वातंत्र्य आणि सेक्स पॉझिटिव्हच्या कल्पना या सगळ्यांबाबत आमची मतं बरीचशी जुळणारी होती आणि त्यामुळे वादचर्चा करायला खूप मजा यायची. आमच्यात मतभेदही होते; पण त्याचं वाचन, त्याची बुद्धिमत्ता, त्याचा प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा हा मला नेहमीच खूप महत्त्वाचा वाटे आणि या सगळ्यांच बाबतीत तो मला माझ्यापेक्षा खूपच सरस वाटे.

आयआयटी नंतर त्यानं आयआयएम कलकत्ता इथून एमबीए केलं होतं आणि त्यानंतर चक्क डॉक्टरेट करून पीएचडी मिळवली होती. म्हणजे तो खऱ्या अर्थाने 'डॉ. आनंद करंदीकर' होता. मला बऱ्याच ठिकाणी मी डॉक्टरेट न करूनसुद्धा 'डॉ. अच्युत गोडबोले' असं म्हणतात तसा तो खोटा डॉक्टरेट नव्हता. (अर्थात, माझ्यावर आणि माझ्या लिखाणावर तीन जण पीएचडी करता आहेत आणि त्यातल्या एकीला मिळालीसुद्धा आहे यावरच मी समाधान मानून घेतो एवढंच.)

आमच्या समाजवादाच्या कल्पना वेगळ्या होत्या; पण ध्येय बरचसं सारखंच होतं. तो 'युक्रांद' मध्ये होता तर मी 'मागोवा' गटामध्ये. त्या काळी त्याच्यावर समाजवादाचा प्रभाव होता, तर माझ्यावर मार्क्सवादाचा. समाजवादी मंडळी जातीला सगळ्यांत जास्त महत्त्व देतात आणि वर्गीय अर्थकारण व राजकारण कमी महत्त्वाचं मानतात अशी आमची त्यांच्यावर टीका असायची, तर मार्क्सवादी लोक जातीला महत्त्व देत नाहीत अशी त्यांची आमच्यावर टीका असायची. मार्क्सवादावरची त्यांची टीका मला नेहमीच महत्त्वाची वाटलेली आहे. साक्री इथे कॉम्रेड शरद पाटील यांच्याबरोबर केलेल्या चर्चा आणि त्यांची पुस्तकं मला त्यामुळेच बरंच काही शिकवून गेली होती. त्यानंतरच्या वर्षांत आमच्या बरेच वेळा भेटी आणि वादचर्चा व्हायच्या. तो सतत काहीतरी करत असायचा. त्याला स्वस्थ बसवायचंच नाही. 'विचारवेध' नावाचं व्यासपीठ आणि एक चळवळ त्यानं सुरू केली आणि तिथे अनेक वेगवेगळे वक्ते बोलवून दरवर्षी एक विचारसंमेलन भरवणं, त्यासाठी एक यूट्यूब चॅनेल चालू करून त्यावर अनेक विषयांवर चर्चा घडवून आणणं, लोकांना वेगवेगळ्या विषयांवर बोलकं करणं हे त्याचं सतत चालू असे. या कामात त्यानं अनेक तरुण जोडले होते. दर वेळी या संमेलनाच्या अगोदर तो आणि सरिता एक मीटिंग भरवत असत. या वर्षी कोणाकोणाला बोलवायचं, कुठली भाषणं आणि कुठल्या चर्चा ठरवायचा याविषयी त्यात चर्चा व्हायची.

'विचारवेध' साठी मीही विषमता, बेकारी, वाहतूक, पर्यावरण अशा बऱ्याच विषयांवर अनेक व्हिडिओज केले होते. एकदा तर एस. एम. जोशी सभागृहात विचारवेध संमेलनातच भारतीय अर्थशास्त्रावर त्यानं मी आणि जयंती घोष यांची भाषणंही ठेवली होती. त्याच्या 'मेट्रिक' (मार्केटिंग अँड इकॉनॉमेट्रिक कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) या कंपनीतही त्यानं मला भाषणाला बोलावलं होतं.

अलीकडे, मी काही काळ पुण्यात त्याच्याच 'अथश्री'मध्ये काढला होता. त्यानंतर गेल्या वर्षात मी दर महिन्याला त्याच्याकडे जात असे. खूप छान गप्पा आणि चर्चा रंगायच्या. सध्याचं जगावरचं आणि भारतावरचं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अरिष्ट आणि भयानक परिस्थिती (विषमता, बेकारी, गरिबी, शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, स्त्रियांवरचे अन्याय आणि अत्याचार, क्लायमेट क्रायसिस, युद्ध, धर्म आणि जात यांवरून जगामध्ये आणि विशेषतः भारतामध्ये वाढत असलेली असहिष्णुता आणि हिंसा, अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन...) हे नेहमी आमचे मुख्य विषय असायचे.

अलीकडे, आंतरजातीय विवाह यावर त्यानं खूपच लक्ष द्यायचं ठरवलं होतं. दोन वेगवेगळ्या जातींतल्या किंवा धर्मांतल्या तरुणांनी लग्न करायचं ठरवलं आणि त्याला घरातून किंवा इतर नातेवाइकांकडून आणि समाजाकडून विरोध होत असेल तर आनंद आणि सरिता त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहत असत. मग त्यांना काही काळ तात्पुरती राहायला जागा हवी असेल तर तो स्वतः ती द्यायचा किंवा आमच्यासारख्या काही मित्रांना ती देण्याची विनंती किंवा आग्रह करायचा.

तरुणांमधली बेकारी माझ्याप्रमाणेच त्यालाही खूप अस्वस्थ आणि बेचैन करत असे. स्वतः त्यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यानं त्याचा अभ्यास करून एक पुस्तिकाही लिहिली होती. पण तो तेवढ्यावर थांबला नाही. कुठल्याही एखाद्या चांगल्या तरुणाला / तरुणीला नोकरी हवी असेल तर तो व्यक्तिशः सुद्धा त्यासाठी प्रयत्न करायचा.

त्यानं 'माझ्या धडपडीचा कार्यनामा', 'धोका', 'विचारवेध', 'स्टोरीज ऑफ मार्केटिंग इन इंडिया', 'रोजगार निर्मितीची दिशा' आणि 'वैचारिक घुसळण' अशी अनेक एकाहून एक झकास अशी वैचारिक पुस्तकं लिहिली. ती सगळी माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणारी आहेत.

काही महिन्यांपूर्वी मी आणि डॉक्टर माधुरी कुलकर्णी यांनी फेमिनिस्ट स्त्री-पुरुषांच्या आयुष्यावर आणि कार्यावर आधारलेलं 'विद्रोही लेकी' हे मराठीमधलं, तर 'डिफाइंग डॉटर्स' हे इंग्लिशमधलं पुस्तक अशी दोन पुस्तकं लिहिली. ती मी आनंद आणि सरिता यांना अर्पण केली होती. ज्या वेळी मी ती पुस्तकं द्यायला त्यांच्याकडे गेलो तेव्हा आनंदला खूपच छान वाटलं होतं. त्याच वेळी 'वैचारिक घुसळण' हे त्याचं पुस्तक त्यानं मला भेट दिलं.

'वैचारिक घुसळण' हे पुस्तक प्रत्येकानं वाचलंच पाहिजे असं आहे. लैंगिकता, स्त्री-पुरुष समानता, बेकारी, जातिव्यवस्था, वैज्ञानिक दृष्टीकोन अशा अनेक विषयांवर त्यानं अतिशय सुंदर मांडणी केली आहे. विशेष म्हणजे त्यात खूप रिसर्च करून महत्त्वाचा डेटाही दिलेला आहे. सगळे विचार अतिशय धीटपणे आणि मोकळेपणे त्यानं मांडले आहेत. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मृगंधा दीक्षित यांनी स्त्री-पुरुष समानतेविषयी आनंदनं या पुस्तकात जे 8 लेख लिहिले आहेत त्याविषयी जे उद्गार काढले आहेत, ते जसेच्या तसे देणं मला गरजेचं वाटलं म्हणून खाली देत आहे.

'स्त्री-पुरुष समानतेविषयी सर्वाधिक म्हणजे आठ लेख आहेत. या लेखांमध्ये पुरुषी अहंकार तर नाहीच, पण स्युडो फेमिनिझमही नाही, किंबहुना फेमिनिझमच्या पुढे जाऊन तटस्थपणे; परंतु जिव्हाळ्याने त्यांनी या विषयांकडे बघितले आहे. मासिक पाळी व सेक्स पॉझिटिव्हसारख्या taboo विषयावर त्यांनी यातील लेखांत बिनधास्त लिहिलेले आहे. असे विषय लोकांमध्ये चर्चेसाठी आणणाऱ्या काही मोजक्या मराठी लेखकांमध्ये आनंद सरांचा उल्लेख यामुळे करावा लागेल. 'कामसूत्र ते लिपस्टिक अंडर...', 'सेक्स पॉझिटिव्ह'चा प्रवास या लेखात ते लिहितात 'परस्पर संमतीने शरीरसंबंध याचा 'सेक्स पॉझिटिव्ह' मधील अर्थ संभोगाच्या प्रत्येक वेळी संभोगात सहभागी प्रत्येक व्यक्तीला तो अनुभव हवासा वाटणे असा आहे. 'लग्न केले आहे तेव्हा संमती गृहीतच आहे', 'दुसऱ्यासाठी सोसायची तयारी पाहिजेच', 'ओठांवर 'नाही' असले तरी मनात 'हो' आहे', वगैरे नसलेल्या संमतीला संमती म्हणणे 'सेक्स पॉझिटिव्ह' चळवळीला मान्य नाही.'

त्याला प्रकृतीकडे लक्ष द्यायला मी नेहमी बजावायचो. सरिताला आणि जयालाही त्याची खूप काळजी वाटायची. पण तो त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायचा आणि उत्साहात सतत प्रवास, लिखाण आणि वाचन करायचा. कारण त्याला स्वस्थ बसवायचंच नाही. त्याची सामाजिक कमिटमेंट आणि कळकळ सच्ची आणि पक्की होती. त्याचा स्पष्टवक्तेपणा तसंच मिसळ, मटन आणि फिश बनवण्याची, खाण्याची आणि खिलवायची त्याची हौस मी कधीच विसरणार नाही. पण 'आनंद कभी मरते नहीं' हे आनंद या सिनेमातलंच वाक्य आठवतोय आणि थोडसं सावरण्याचा प्रयत्न करतोय. तरीही I will miss you. Anand!!!

 



व्यवस्थापन तज्ज्ञ, लेखक आणि कार्यकर्ते अशी तिहेरी ओळख असलेल्या आनंद करंदीकर यांचे 18 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. अखेरपर्यंत ते कार्यरत होते आणि त्यांनी नेत्रदान व देहदान करायचे ठरवले होते. त्याप्रमाणे, त्याच दिवशी संध्याकाळी त्यांचे नेत्रदान झाले आणि दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांचा देह पुणे येथील ससून रुग्णालयाकडे सुपूर्द केला गेला. त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन.

कवी विंदा करंदीकर यांचे चिरंजीव आनंद यांनी IIT व IIM मधून शिक्षण घेतले, नंतर युवक क्रांती दल व अन्य पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते म्हणून काम केले. त्यानंतर जागतिक स्तरावरील कंपन्यांमध्ये वरिष्ठ पदांवर काम केले. गेल्या दशकभरात त्यांनी "विचारवेध" हा महत्वाचा उपक्रम चालवला आणि चार पाच पुस्तकेही लिहिली. त्यातील "वैचारिक घुसळण" हे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे. दोन वर्षांपूर्वी, त्या पुस्तकाला राज्य सरकारचा एक लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र त्याच वेळी अन्य एका लेखकाच्या "फॅक्चर्ड फ्रीडम" या पुस्तकाला जाहीर केलेला पुरस्कार सरकारने मागे घेतला होता; त्याचा निषेध म्हणून आनंद करंदीकर यांनी स्वतःच्या पुस्तकाला मिळत असलेला पुरस्कार नाकारला होता.

गेल्या दशकभरात त्यांनी साधना साप्ताहिकात महत्वाचे असे दोन डझन लेख लिहिले. ते सर्व लेख साधनाच्या वेबसाइटवर आहेत. त्यामध्ये, दोन लेख विशेष महत्वाचे आहेत. त्यांच्या विचार प्रक्रियेचा गाभाघटक म्हणावा असा लेख म्हणजे "ब्रह्मज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान आणि तंत्रविज्ञान" आणि कळस म्हणावा असा लेख "मेंदू धुलाई" हे दोन्ही लेख दीर्घ आहेत, दुसरा लेख तर तब्बल आठ हजार शब्दांचा.

- संपादक

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अच्युत गोडबोले ( 15 लेख )
achyut.godbole@gmail.com

तंत्रज्ञ, मराठीतील लेखक आणि वक्ते 




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी