1876 ते 1947 असे 70 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या धर्मानंद कोसंबी यांचे आता 150 वे जयंती वर्ष चालू आहे. त्यांचे वयाच्या चाळीशी पर्यंतचे आत्मकथन म्हणजे 'निवेदन' हे पुस्तक. शंभर वर्षांपूर्वी म्हणजे 1924 मध्ये ते मुंबई येथील मनोरंजन प्रकाशनाकडून प्रकाशित झाले. त्याची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून नुकतीच आली आहे. या नव्या आवृत्तीचे प्रकाशन गोव्यातील मडगाव येथे 18 डिसेंबर 2025 रोजी झाले. तेव्हा, बौद्ध तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्रणव आजरेकर हे प्रमुख पाहुणे होते. त्यावेळी त्यांनी केलेल्या इंग्रजी भाषणाचा अनुवाद येथे प्रसिद्ध करीत आहोत. मूळ इंग्रजी भाषण 'कर्तव्य साधना'वर वाचता येईल.
व्होरेन्झ विद्यापीठातील डॉ. ए. सेमेन्कोव्ह यांनी 2019 मध्ये मला बौद्ध धर्माशी संबंधित काहीतरी सादर करण्यासाठी निमंत्रित केलं. त्या वेळी मी नुकतंच दिवंगत मीरा कोसंबी यांनी केलेलं 'निवेदन'चं इंग्रजी भाषांतर वाचून पूर्ण केलं होतं. मी त्या पुस्तकाचा आशय एका लेखाच्या रूपात संक्षिप्त केला, मला आचार्य धर्मानंद कोसंबी यांच्याविषयी जी काही माहिती होती त्याबद्दलचे काही परिच्छेद वाढवले, आणि तो मजकूर डॉ. सेमेन्कोव्ह यांच्याकडे पाठवला. त्या निबंधाची निवड होऊन फेब्रुवारी 2020 मध्ये तो प्रकाशित झाला. या वेळी काही समकालीन अभ्यासकांच्या प्रतिक्रिया आल्या की, त्यांनी धर्मानंद कोसंबींचं नाव कधीच ऐकलं नव्हतं, त्यांना रशियाशी संबंध आलेले केवळ राहुल सांकृतायन हे एकच भारतीय बौद्ध पंडित ठाऊक होते. या अभ्यासकांनी सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात (सोव्हिएतकाळातील 'लेनिनग्राड अॅकॅडमी ऑफ सायन्सेस') काही शोधाशोध केली, तेव्हा त्यांना मार्च 1929 ते फेब्रुवारी 1930 या काळात पाली भाषा व बौद्ध धर्म यांचे सहायक प्राध्यापक म्हणून तिथे काम करून गेलेल्या धर्मानंद दामोदर कोसंबी यांचं सिरिलिक लिपीमधलं नाव सापडलं.
ही झाली रशियन अभ्यासकांची गोष्ट. पण आपल्यासारख्या भारतीयांना, गोंयकरांना धर्मानंद कोसंबींविषयी कितपत माहिती आहे ?
तरुणपणी स्वतःच्या आदर्शासाठी ठाम भूमिका घेतल्याबद्दल त्यांच्यावर समाजाने बहिष्कार टाकला होता, हे आपल्याला माहीत आहे का?
त्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी समाज म्हणून व्यक्तींनी व गोंयकरांनी कसं वागावं यासाठीची मार्गदर्शक तत्त्वं लिहिली होती आणि ती आजच्या काळाशीही सुसंगत आहेत, हे आपल्याला माहीत आहे का ?
बौद्ध धर्मग्रंथांमधील पाली ही भाषा अकादमिक अभ्यासप्रवाहामध्ये येण्याला कोसंबींचं कार्य कारणीभूत आहे, हे आपल्याला माहीत आहे का ?
ते भारतातील अशी पहिली व्यक्ती होते आणि ज्यांनी बौद्ध धर्म व मार्क्सवाद यांच्यात समन्वय साधायचा प्रयत्न केला, हे आपल्याला माहीत आहे का?
बौद्धाच्या सर्वसंग परित्यागासंदर्भात त्यांनी मांडलेल्या सिद्धान्तातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेरणा घेतली, हे आपल्याला माहीत आहे का ?
शेवटचं त्यांनी एक क्रांतिकारी संस्था उभी करण्याचा प्रयत्न केला, हे आपल्याला माहीत आहे का?
कोसंबींना त्यांच्या प्रवासादरम्यान बरीच मानखंडना आणि वंचना सहन करावी लागली तरी, ज्ञानाची भूक त्यांना थांबू देत नव्हती, याची छाप 'निवेदन' वाचणाऱ्या कोणत्याही वाचकावर पडतेच. 'सुत्त निप्पाता' मध्ये पुन्न सुनप्रन्तक या बुद्धाच्या एका अनुयायाची गोष्ट सांगितली आहे. लोक विरोधात गेले, छळू लागले, शिव्या देऊ लागले, किंवा अगदी मारून टाकायला आले, तर तो काय करेल; असं बुद्धाने पुन्न सुनप्रन्तकाला विचारलं. यावर तो म्हणाला की, 'लोक असे वागले तरीही तो त्यांचा ऋणीच राहील आणि धम्म सोडणार नाही'. 'निवेदन'मध्ये अशीच चिकाटी पाहायला मिळते.
पोर्तुगीजकालीन गोव्यामध्ये जन्मलेला एक ब्राह्मण मुलगा ज्ञानाच्या यात्रेला निघतो, त्याची कथा 'निवेदन' या पुस्तकात आहे. त्या काळी गोव्यात बौद्ध धर्माची काहीही शाब्दिक वा प्रत्यक्ष खूण उरलेली नव्हती; पण धर्मानंदांनी या प्राचीन धर्मातील ज्ञानाचा पुनर्शोध घेण्यासाठीचा प्रवास केला. 'निवेदन'मधील आशय आणि लेखकाचा समर्पणभाव या दोन्हींचा विचार केला तर बौद्ध यात्रेकरूंच्या दीर्घ परंपरेमध्ये या आत्मकथनाला स्थान मिळणं आवश्यक वाटतं. फा हिआन यांचं 'रेकॉर्ड ऑफ बुद्धिस्ट किंगडम्स' आणि हुएन त्सुंग यांचं 'रेकॉर्ड ऑफ वेस्टर्न रिजन्स' इथपासून ते पंडित सांकृतायन यांच्या 'तिबेट की ओर' या आधुनिक बौद्ध प्रवासवर्णनापर्यंत प्रदीर्घ अशी ही परंपरा आहे. फा हिआन व हुएन त्संग हे दोघे बौद्ध धर्म चीनमध्ये नेण्याकरता भारताच्या प्रवासावर आले होते, तर पंडित सांकृतायन व आचार्य कोसंबी यांनी बौद्ध धर्म पुन्हा भारतात आणण्यासाठी परदेशांमध्ये प्रवास केला.
'धर्मा शेणॉय लोटलीकर' म्हणून 9 ऑक्टोबर 1876 रोजी गोव्यातील या गावात जन्मलेले धर्मानंद हे सात भावंडांपैकी सर्वांत धाकटे होते. अंतर्मुख आणि विचारमग्न वृत्तीच्या धर्मानंदांची तब्येत वारंवार बिघडत असे आणि आयुष्याच्या अखेरीपर्यंत त्यांना तब्येतीच्या या तक्रारींना सामोरं जावं लागलं. आरंभीच्या काळात ते संत तुकाराम व गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारांकडे आकर्षित झाले. प्रचंड वाचन असलेल्या धर्मानंदांनी प्रचलित वाट अनुसरण्याऐवजी धर्म व समाज यांविषयी स्वतःच्या कल्पना घडवायला सुरुवात केली. एका नियतकालिकात आलेल्या लेखामुळे त्यांची बुद्धाच्या जीवनचरित्राशी व त्याच्या धम्माशी ओळख झाली. आपल्याला जन्मजात लाभलेल्या धर्मातून न मिळालेली आत्मिक शांतता बुद्धाच्या धम्मातून मिळेल, अशी खात्री पटल्यावर त्यांनी त्या दिशेने शोध घ्यायला सुरुवात केली.
त्यांचे मेहुणे डॉ. सखाराम लाड यांच्यावर समुद्र ओलांडणारा प्रवास केल्याबद्दल बहिष्कार टाकण्यात आला, तेव्हा धर्मानंदांनी त्यांच्यासोबतचे संबंध तोडायला नकार दिला. परिणामी, धर्मानंदांवरही बहिष्कार टाकण्यात आला. याबाबतीत त्यांच्या जीवनाचा धागा महात्मा गांधींशी जोडता येतो. गांधींनीही लंडनला जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर जातीमधून बहिष्कृत करण्यात आलं आहे. धर्मानंदांच्या वडिलांचं 1898मध्ये निधन झालं. पिता हयात नसलेला, रूढ चौकटीत न बसणारा, आजारी, धड शिक्षण न झालेला व कर्जबाजारी मुलगा जातीतून बहिष्कृतही झाला. यामुळे त्यांचा सामाजिक घरगुती जीवनातील रस संपला. कुटुंबावर ओझं म्हणून राहण्याऐवजी त्यांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. माणूस सर्व काही गमावून बसतो, तेव्हा स्वातंत्र्य कमावतो आणि काहीतरी साध्य करण्याची इच्छाशक्ती मिळवतो, असं म्हटलं जातं. मनात संत तुकारामाच्या गाथेचं बीज घेऊन आणि त्याला बुद्धाच्या शिकवणुकीचं पाणी घालत धर्मानंदांनी स्वतःचा मार्ग आखायचं ठरवलं. युवराज सिद्धार्थाप्रमाणे धर्मानंदही मायभूमी सोडून सत्य आणि ज्ञान यांच्या शोधात बाहेर पडले.
धर्मानंदांनी गोवा सोडलं तेव्हा ते 23 वर्षांचे होते. या वयात माणसांमध्ये काहीएक जीवनदृष्टी विकसित व्हायला नुकतीच सुरुवात झालेली असते. बहुसंख्य तरुण आईवडिलांकडून व पूर्वजांकडून वारशात मिळालेली जीवनदृष्टी स्वीकारतात, आणि जैसे-थे स्थितीपुढे आज्ञाधारक वृत्तीने वागतात. पण धर्मानंदांनी स्वतःची जीवनदृष्टी घडवली आणि तिला परिपूर्णतेकडे नेलं. 'निवेदन'मधील पाचवं प्रकरण त्यांची व्यक्ती व व्यापक समाज यासंदर्भातील मतांची झलक दाखवणारं आहे, आणि समाजातील समस्यांवरील उत्तरंही सुचवणारं आहे. त्यातील सन 1898च्या नोंदीची सुरुवात अशी आहे : 'मुलांनो, तुम्हांस माझ्यामागे काही राहावे असा माझा उद्देश आहे.' हे काही त्यांचं निरोपाचं पत्र नव्हतं, तर वारसा म्हणून काहीतरी मागे सोडून जाण्याविषयी बोलत होते. पुढे त्यांनी लिहिलं, "तुम्हांस ठेवावयास माझ्यापाशी संपत्ती तर नाहींच. तेव्हां या जगातील अत्यल्प अनुभव तुम्हांकरितां टिपून ठेवतों. त्याचा तुम्हीं चांगला उपयोग करावा, असा माझा हेतु आहे.'
आपल्या पुतण्यांना व मुलीला चांगले पालक लाभणार नाहीत, अशी चिंता धर्मानंदांना वाटत होती. या संदर्भात ते लिहितात :
1) 'अज्ञानासारखी दुसरी भयंकर गोष्ट या जगांत नाहीं म्हटलें तरी चालेल. [...] ज्ञानप्राप्तीला पहिल्यानें विद्यादेवीची अत्यंत भक्ती जडली पाहिजे. भक्तीवाचून कोणतीही देवता प्रसन्न होत नाही, हे तुम्हांला ठाऊक असेलच.' आणि 'ज्ञानसंपादन करण्याची मर्यादा म्हटली म्हणजे मरण ही होय. मरणापर्यंत ज्ञानसंपादनांत अंतर पडू देऊं नका.'
2) "कल पाहून कला शिकविली नाहीं, तर घोटाळा होईल. मी माझ्या तीर्थरूपांस मला संस्कृत शिकविण्याविषयी सांगत असतांही त्यांनी मनावर घेतलें नाही. त्यायोगे माझी फार नुकसानी झाली.'
3) यानंतर धर्मानंद 'कुसंगती' टाळण्याची सूचना करतात.
शेवटी ते म्हणतात, 'मुलांनो, तुम्हांस फार फार सांगावें असें मनांत येतें; पण वेळ नाहीं. [...] शेवटीं, आणखी एक गोष्ट चुकून राहिली. ती ही कीं, वृद्धपणीं मातापितरांस यथाशक्ती सहाय्य केल्यावांचून राहूं नका.'
हे पहिलं पत्र त्यांनी त्यांच्या मुलीसाठी व पुतण्यांसाठी लिहिलं होतं. त्यानंतर 1899 मध्ये लिहिलेलं दुसरं पत्र गोंयकर समाजासाठी लिहिलेलं आहे. त्यात धर्मानंद लिहितात : 'मनुष्याच्या जीविताशी धर्माचा जेवढा संबंध आहे तेवढा राजकारणाचासुद्धां असू शकत नाही.' याच पत्रात ते पहिल्यांदा निर्भीडपणे लिहितात की, 'सध्यां मी मनाने तरी साफ बौद्ध बनलो आहे. समर्थ बुद्धाची मतें मला फार फार आवडतात. सगळ्या जगाचें, राष्ट्राचें, कुटुंबाचें, व स्वतःचें हित साधण्याची कोणाची इच्छा असेल, तर त्यानें सदुरू बुद्धाला शरण गेलें पाहिजे.'
'जातिभेद निखालस मोडला पाहिजे; बालविवाह लवकर बंद झाला पाहिजे,' असंही ते सुचवतात. त्यांना स्वतःला बालविवाहाचा त्रास भोगावा लागला होता.
या काळी भारतात वासाहतिक राजवट होती, त्या पार्श्वभूमीवर धर्मानंद लिहितात, 'प्रजासत्ताक पद्धती चांगली; त्याच्या खालोखाल राजप्रजासत्ताक; त्याच्या खालोखाल स्वदेशीय राजसत्ताक; आणि सर्वांत कनिष्ठ हल्लीं हिंदुस्तानांत चालू आहे ती.'
व्यक्तींनी काय करायला हवं, यासंदर्भात धर्मानंद म्हणतात, 'आपण अज्ञान आहों तोपर्यंत आपल्या आईबापांच्या आज्ञेत रहावें. नंतर शेवटपर्यंत त्यांना मान द्यावा; त्यांना दुखवू नये. अंधपरंपरेने चालत आलेल्या ज्या दुष्ट चाली असतील, त्या बेलाशक सोडाव्या. दुसऱ्यास दुःख न होईल अशा रीतीनें आपला धंदा चालवावा. [...] मादक पदार्थांचं सेवन करणें व्यक्तीच्या नाशास कारण होतें.'
अल्पवयात विवाह झाला असेल तर काय करावं, याबद्दल धर्मानंद सांगतात, 'तुमचा विवाह तुमच्या अल्पवयांत झाला असेल, तर त्यापासून प्रौढपणी सुख होण्यास एकच उपाय दिसतो. तो कोणता म्हणाल तर आपल्या बायकोस सुशिक्षित करणे हा होय.'
'सद्गुरू बुद्धाला शरण जावें व त्याच्या मतांचा विचार करावा,' असाही सल्ला ते देतात.
अशा रीतीने गोव्याच्या या सुपुत्राने आपल्या समाजाला ग्रासणाऱ्या रोगांचं निदान केलं, आणि त्यावरचा सर्वगुणकारी उपाय बुद्धाच्या धर्मामध्ये असल्याचंही त्यांच्या ध्यानात आलं. पुढील काळात त्यांची मतं आणखी उत्क्रांत होत गेली. त्यांचा समाजवादाशी, मार्क्सवादाशी, गांधीवादाशी परिचय झाला; पण बुद्ध व अहिंसा यांवर आधारित त्यांचा विचारसरणीय पाया कधी बदलला नाही.
गोव्यातून पुणे आणि तिथून पेळा, मग नेपाळहून श्रीलंका असा भारतीय उपखंडात प्रवास करत असताना श्रीलंकेत त्यांनी श्रामणेर म्हणून दीक्षा घेतली, आणि पुढे म्यानमारमध्ये ते भिक्खू झाले. कलकत्त्याला राहत असताना त्यांनी भारतात बौद्ध धर्माचं पुनरुज्जीवन करायचं ठरवलं. त्यांनी कलकत्त्यात नव्यानेच स्थापन झालेल्या नॅशनल कॉलेजच्या प्रशासनाला 1906 मध्ये पाली भाषेचा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी उद्युक्त केलं. तिथे त्यांनाच पालीचे अध्यापक म्हणून नेमण्यात आलं. 1907 मध्ये कलकत्ता विद्यापीठात त्यांना पालीचे 'रीडर' म्हणून नियुक्ती मिळाली. त्यांनी ब्रह्मदेशातील काही पाली संहिता विकत घेण्यासाठी विद्यापीठाला मदतही केली. त्याच वर्षी त्यांनी हिमालयाच्या दिशेने प्रवास करण्याचं ठरवलं. श्रीलंकेत व ब्रह्मदेशात त्यांनी थेरवादावर प्रभुत्व मिळवलं, आणि आता तिबेटी व वज्रायन बौद्ध धर्माबाबत संशोधन करण्याचा त्यांचा मानस होता. त्यांनी तिबेटी लिपी पूर्णपणे शिकून घेतली आणि मग ते सिक्कीमला गेले. सिक्कीमला पोहोचल्यावर त्यांना असं जाणवलं की, ब्रह्मदेशात व श्रीलंकेत बौद्ध धम्माचं सचोटीने पालन होत नाहीये. प्राण्यांची कत्तल पाहून त्यांना घृणा वाटली, आणि लोकांची जीवनशैली पाहून त्यांनी हा प्रयत्न सोडून दिला.
'निवेदन'मधील त्यांच्या लेखनावरून असा अंदाज बांधता येतो की, नेपाळ व सिक्कीम इथल्या अनुभवांमुळे वज्रायन बौद्ध धर्माविषयी त्यांचं नकारात्मक मत झालं. हिमालयाच्या परिसरात आचरणात येणारा बौद्ध धर्म त्याच्या उगमापासून फारकत घेणारा आहे, असं त्यांना वाटलं. दोन दशकांनी पंडित राहुल सांकृतायन लडाखमार्गे तिबेटला गेले, आणि 1928 च्या अखेरीला त्यांनी तिबेटाभ्यास या विद्याशाखेत भरही घातली. धर्मानंदांनी बौद्ध धर्माविषयी त्यांना वाटणाऱ्या उत्साहापेक्षा पूर्वग्रहाला प्राधान्य दिल्यामुळे 'अकादमिक आत्महत्या' केली, असं व्यक्तिशः मला वाटतं. विसाव्या शतकारंभी तिबेटाभ्यासाची विद्याशाखा अजूनही बाल्यावस्थेत होती. धर्मानंदांनी त्यांच्या पूर्वग्रहावर आणि हिमालयातील डोंगररांगावर मात केली असती तर, बौद्ध अभ्यासशाखेतील व्यापक वर्तुळांमध्ये त्यांचं नाव परिचित झालं असतं, आणि हिमालयापलीकडच्या त्यांच्या साहसांची कहाणी सांगणारं आणखी एखादं उत्कृष्ट प्रकरण 'निवेदन' मध्ये वाढलं असतं.
डिसेंबर 1906 मध्ये बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड कलकत्त्याला आले. त्यांनी धर्मानंदांशी भेट झाल्यावर त्यांना बडोद्याला बोलावलं. तिथे सयाजीरावांच्या उपस्थितीत धर्मानंदांनी पाच व्याख्यानं दिली. त्यातील तीन व्याख्यानं 'बुद्ध, धर्मानंद आणि संघ' या शीर्षकाच्या पुस्तकामध्ये आहेत.
त्यांनी 1909 मध्ये 'विशुद्धिमग्गा' मधील बराच मोठा भाग मराठीमध्ये भाषांतरित केला आणि त्याला 'बोधिचर्यावतार' असं नाव दिलं. याकडे भारत विद्याभ्यासक डॉ. जेम्स वूड यांचं लक्ष गेलं. त्यांनी धर्मानंदांना हार्वर्ड विद्यापीठात बोलावून 'विशुद्धिमग्गा'च्या भाषांतर प्रकल्पावर काम करण्याची विनंती केली. दिवंगत एच. सी. वॉरेन यांनी या प्रकल्पाची सुरुवात केली होती. युरोपातून अमेरिकेकडे जाताना धर्मानंदांची विविध विचारप्रवाहांशी ओळख झाली आणि त्याकडे ते आकर्षिले गेले. यात समाजवाद, फेबियन विचार, मार्क्सवाद, कल्पितादर्शवाद, इत्यादींचा समावेश होता. हार्वर्डमध्ये असताना त्यांनी भारतातील एतद्देशीय समाजवाद व कामगारांची दुर्दशा यांबाबत दोन दीर्घ लेख लिहिले. 'वज्जींचे महाजनसत्ताक राज्य' आणि 'हिंदी कामगारांची स्थिती सुधारण्यास उपाय' अशा शीर्षकांचे हे लेख होते.
धर्मानंद कोसंबी अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर 'निवेदन' हे त्यांचं आत्मकथन संपतं. अनेक महत्त्वाच्या घटना त्यांच्या या कथनातून निसटतात. त्यांनाही या घटना किती महत्त्वाच्या आहेत याची कल्पना नव्हती. उदा., 1912 मध्ये पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत त्यांनी 'कार्ल मार्क्स' या शीर्षकाखाली व्याख्यान दिलं. त्यामुळे भारतीय राजकीय इतिहासातील मार्क्सवादाचे ते उद्गाते ठरले. बोल्शेव्हिकांनी 1917 मध्ये विंटर पॅलेसवर धडक मारण्यापूर्वी, आणि 1924 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना होण्यापूर्वीची ही घटना आहे. बौद्ध धर्म व साम्यवाद या परस्परविरोधी विचारसरणी असल्याचं मानलं जात होतं; पण धर्मानंदांनी त्यांच्या प्रतिभाशक्तीच्या जोरावर मार्क्स व बुद्ध यांच्यात समन्वय साधला. समाजवाद व साम्यवाद यांमधील समता, मानवतावाद व सामाजिक परिवर्तन या तत्त्वांमुळे धर्मानंदांचा त्या विचारसरणीकडे ओढा होता. ही तत्त्वं बौद्ध तत्त्वज्ञानाच्या जवळ जाणारी होती.
'लेनिनग्राड अॅकॅडमी ऑफ सायन्सेस'ने बौद्ध संस्कृतीच्या अभ्यासासाठी एक केंद्र सुरू केलं होतं. धर्मानंदांनी प्राध्यापक फ्योदर शेरबाट्स्की यांना पत्र पाठवलं. ते धर्मानंदांच्या कामाने प्रभावित झाले आणि औपचारिक शिक्षण पुरेसं नसलं तरी धर्मानंदांना त्यांनी रशियाला निमंत्रित केलं. धर्मानंद 3 मार्च 1929 रोजी भारताकडून रशियाकडे रवाना झाले. रशियात त्यांना लेनिनग्राड अॅकॅडमी ऑफ सायन्सेस व लेनिनग्राड विद्यापीठ इथे पाली शिकवण्याची नोकरी मिळाली. ते तिथे वर्षभर राहिले आणि पगाराची रक्कम वापरून समाजवादी प्रजासत्ताक रशियामध्ये निरनिराळ्या ठिकाणी प्रवास केला. मार्क्सच्या लेखनाशी त्यांचा परिचय होता, आणि 1917 नंतर रशियन समाजामध्ये किती आमूलाग्र बदल झाला, हे पाहून ते अतिशय प्रभावित झाले. तसंच, यास्नाया पोल्याना इथला साधुवत उमराव तोलस्तोय (टॉलस्टॉय) याच्या विचारांकडे आकर्षित होऊन तेही त्यांनी स्वाभाविकपणे आत्मसात केलं. 'काउन्ट लेव्ह तोलस्तोय यांच्यासारखी चांगली माणसे ख्रिस्ताच्या उक्तीद्वारे आणि स्वतःच्या कृतीद्वारे समाजवादाच्या तत्त्वाचे सर्वार्थाने समर्थन करतात', असं त्यांनी नोंदवलं.
धर्मानंदांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. महात्मा गांधींविषयी त्यांना अतीव आदर वाटत असे. सविनय कायदेभंगाच्या आंदोलनावेळी धर्मानंदांनी कोकणातील शिरोडा इथे मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतला. मुंबईतील विले पार्ले इथे त्यांनी भूमिगत कामगार चळवळीत सहभाग घेतला. या चळवळीचे नेते अब्दुला शेठ यांना अटक झाल्यावर धर्मानंदांनी त्या संघटनेची धुरा स्वीकारली. धर्मानंदांना व त्यांच्या अनुयायांना 11 ऑक्टोबर 1930 रोजी अटक झाली आणि वर्षभरासाठी त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. ते 1931 पर्यंत ठाण्यातील तुरुंगात होते.
त्यांनी 1932 मध्ये अमेरिकेचा शेवटचा दौरा केला. या वेळी त्यांनी 'विशुद्धिमग्गा'चं व इतर पाली संहितांचं भाषांतर पूर्ण केलं. 1934 मध्ये काशी विद्यापीठात राहत असताना त्यांनी 'हिंदी संस्कृती आणि अहिंसा' या पुस्तकाचं लेखन पूर्ण केलं. हे पुस्तक 1935 च्या अखेरीला प्रकाशित झालं. त्यांनी 1940-41 मध्ये 'भगवान बुद्ध' हा त्यांचा द्विखंडी महाग्रंथ लिहून पूर्ण केला. या पुस्तकात बुद्धाच्या जीवनचरित्राविषयी प्रकल्प दृष्टीकोन मांडण्यात आला. विशेषतः त्याच्या सर्वसंग परित्यागाविषयीच्या सिद्धान्तांबाबत धर्मानंदांनी मर्मग्राही मांडणी केली. युवराज गौतमाची आई त्याला जन्म देतानाच मरण पावली. असा मनुष्य एकोणतिसाव्या वर्षापर्यंत दुःख व मृत्यू यांबाबत अजाण असेल, यावर धर्मानंदांचा विश्वास नव्हता. त्यांनी सर्वसंग परित्यागाचं खरं कारण 'कुणालजातका'मध्ये शोधलं. या संहितेत रोहिणी नदीकाठच्या जमिनीवरील अधिकारावरून शाक्य व कोलिय यांच्यात झालेल्या संघर्षाचा उल्लेख आहे. युवराज असणाऱ्या गौतमाने या संघर्षात सहभागी होण्यास नकार दिला, आणि त्याने स्वतःचं युवराजपद सोडून दिलं. धर्मानंदांचा हा सिद्धान्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनाही भावला आणि त्यांच्या 'बुद्ध अँड हिज धम्म' या पुस्तकात त्याचा समावेश केला.
धर्मानंद कोसंबींनी बौद्ध मठवजा विद्यापीठ स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. हे महाराष्ट्रातील व भारतातील बौद्ध धर्माच्या प्रसाराचं केंद्र झालं असतं. बौद्ध धर्म व मार्क्सवाद यांच्यात परिपूर्ण समन्वय साधल्यानंतर धर्मानंदांना त्यांच्या कल्पना लेनिनच्या 'व्हॅनगार्ड' पक्षाच्या रूपाने व गांधींच्या लोकआंदोलनाच्या रूपाने प्रत्यक्षात राबवून बघायच्या होत्या. या चळवळीचं केंद्र बहुजन विहार हे असणार होतं. बुद्धाच्या बाबतीत अनंतपिंडकाने जी भूमिका बजावली ती धर्मानंदांच्या बाबतीत जे. के. बिर्ला यांनी बजावली. बहुजन विहाराचं रूपांतर क्रांती मठामध्ये झालं. तिथे दर रविवारी धर्मानंद बौद्ध धर्मावर प्रवचनं देत. त्यात सोबतच समाजवाद, समता, शिक्षण, जातिभेदाचं व अस्पृश्यतेचं उच्चाटन, स्त्रीहक्क, कामगार चळवळ व स्वातंत्र्य यांबद्दलही भाष्य केलेलं असे. आर्थिक यथास्थितिवाद आणि धर्म यासंदर्भातील मतांमुळे या शांततावादी भिक्खूच्या जीवनात वैरभाव निर्माण झाला. त्यांनी धाडसाने या वैरभावाला तोंड दिलं. त्यांच्या बहुतांश विचारांबाबत बिर्ला यांनी मतभिन्नता व्यक्त केली. मग धर्मानंदांकडे बहुजन विहारापासून दूर जाण्यावाचून दुसरा काही पर्याय उरला नाही.
आपल्या जीवनाचा व कार्याचा विचार केल्यानंतर धर्मानंदांनी या धरतीवरील आपली भूमिका संपुष्टात आल्याचा निष्कर्ष काढला आणि 'सल्लेखना'ला (मरण येईपर्यंत उपवास) आरंभ करण्याचं ठरवलं. सेवाग्राम आश्रमात ते स्वतःच्या मृत्यूची वाट बघत थांबले. त्यांच्या जीवनक्रमाप्रमाणेच त्यांचा मृत्यूही देदीप्यमान होता. ते 4 जून 1947 रोजी दुपारी दोन वाजता मरण पावले. मृत्यू स्वतःहून त्यांच्याकडे आला नाही, त्यांनी त्याला स्वतःकडे निमंत्रित केलं. सेवाग्राम आश्रमाचे प्रमुख बळवंत सिन्हा म्हणाले, "मी याहून उदात्त व याहून शांतचित्त मृत्यू याआधी कधीही पाहिला नव्हता." एका छोट्या टेकडीवर संध्याकाळी पाच वाजता धर्मानंदांच्या शवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीत 5 जून रोजी आयोजित केलेल्या त्यांच्यासाठीच्या अभिवादनसभेत गांधीजींनी पुढील शब्दांत आदरांजली वाहिली, 'धर्मानंदांना पडद्यामागे राहून शांतपणे काम करण्याचा पर्याय पसंत होता. त्यांनी कधीही स्वतःची टिमकी वाजवली नाही. ईश्वर आपल्या सर्वांना त्यांच्या वाटेवरून चालण्याची प्रेरणा देवो.'
धर्मानंदांचा बौद्ध धर्माकडे इतका ओढा असण्याचं कारण काय? त्यांची नात मीरा कोसंबी यांच्या म्हणण्यानुसार, 'शील' या तत्त्वामुळे धर्मानंद बौद्ध धर्माकडे आकर्षित झाले. बौद्ध धर्मामध्ये मेत्ता, करुणा, मुदित, उपेक्खा असे चार बौद्धविहार सांगितले आहेत. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये प्रतिमा आणि प्रतिभा या दोन परस्परसंबंधित संकल्पना आहेत. हिंदू असो वा बौद्ध वा ख्रिस्ती, आपण सर्वच जण प्रतीकात्मक रूपात यातील एक संकल्पना अमलात आणत असतो. त्याचा भाग म्हणून आपण मंदिरात किंवा चर्चमध्ये जातो. फुलं वाहतो किंवा मेणबत्त्या पेटवतो. ही प्रतिमेची संकल्पना झाली. तर, प्रतिभा म्हणजे आदर्श. बुद्ध, येशू किंवा कृष्ण यांची शिकवणूक आपल्या जगण्यातील व्यवहारामध्ये अमलात कशी आणायची, त्याच्याशी या संकल्पनेचा संबंध येतो. आपल्यापैकी बहुसंख्य लोक आपल्या गुरूच्या शिकवणुकीचं उपयोजन करताना अडखळतात. धर्मानंद कोसंबींनी बौद्ध धर्मातील आदर्श तत्त्वे विचारांमध्ये, शब्दांमध्ये व कृतींमध्ये अमलात आणली. या मार्गातील सर्व क्षुल्लक अडथळ्यांवर त्यांनी मात केली आणि अखेरीस निर्वाणाची स्थिती साध्य केली.
भाषांतर - प्रतिनिधी
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या