नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील येरला हे अमिताभ पावडे यांचे मूळ गाव. ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक, सुधारणावादी, शिक्षण प्रसारक, पुरोगामी नेते अॅड. मोतीरामजी उपाख्य दादासाहेब पावडे हे त्यांचे वडील. तर ज्येष्ठ आंबेडकरवादी समाजसेविका, इतिहास संशोधक, संस्कृत पंडित, प्राध्यापक कुमुदताई पावडे ह्या त्यांच्या आई होत. समाजसेवेचा वारसा अमिताभयांना घरातूनच मिळाला होता. विमानतळ प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता पदावर असताना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मात्र दरम्यानच्या काळात ते शेती आणि पर्यावरण या क्षेत्रांतील अभ्यासक व कार्यकर्ते होते. 18 ऑगस्ट रोजी त्यांचे वयाच्या 61 व्या वर्षी अपघातात निधन झाले. त्यांच्या श्रद्धांजली सभेत, त्यांच्या जवळच्या मित्राने केलेले हे भाषण आहे.
आदरणीय अध्यक्ष महोदय,
व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, तसेच माझ्या प्रिय मित्रांनो. मी रामेश्वर काळे. अमरावती इंजिनियरिंग कॉलेजमध्ये मी अमितला एक वर्ष ज्युनिअर होतो. त्याच्याविषयी असे दोन शब्द बोलावे लागावे यासारखे दुर्दैव नाही. हीच परिस्थिती इथे उपस्थित आपणा सर्वांची आहे. अमित जेवढा बहुआयामी, बहुसंग्रही, तितक्याच विविध स्वरूपात आपण त्याच्याशी जोडलेले आहोत.
अमितशी झालेली माझी पहिली भेट मी कधीच विसरू शकत नाही. याची वाच्यता, उजळणी मी अमितसोबत व आम्हा मित्रांमध्ये नेहमीच करत आलो आहे. त्या भेटीतून त्याचा पिंड, त्याच्या स्वभावाचे बीजतत्त्व आपल्या सहज लक्षात येते. 42 वर्षांपूर्वी, जून 1983 मध्ये त्याची आणि माझी भेट कॉलेजमधील माझ्या पहिल्याच दिवशी झाली. अॅडमिशन, लायब्ररी, स्टोअर, लॅबोरेटरी असे सारे सोपस्कार आटोपता आटोपता संध्याकाळचे साडेपाच-सहा वाजले होते. हॉस्टेलमधील रूमची चावी मला क्लार्ककडून मिळाली होती. पण रॅगिंगच्या भीतीने हॉस्टेलच्या आत जाण्याची माझी हिंमत होत नव्हती. तोपर्यंत सिनियर्स घोळक्या घोळक्याने हॉस्टेलच्या आवारात आणि विंगेत ताजेतवाने होऊन जमले होते.
मला 208 क्रमांकाची रूम मिळाली होती, पण मी गावखेड्यातून आलेलो असल्याने मला वाटत होते की, 200 च्या वर रूम असलेल्या इमारतीत 208 क्रमांकाची रूम शोधायची कशी? पण माझी सिनियर्सना विचारायची काही हिंमत होईना. तेवढ्यात एक मुलगा विंगेतून स्पोर्ट्स सायकल चालवताना दिसला. स्पोर्ट्स सायकल म्हणजे त्या काळी लक्झरी होती. भीतीही वाटत होती की, हा श्रीमंत घरचा मुलगा माझे ऐकेल का? मला वाटले, हा एकटा काही रॅगिंग घेणार नाही, हिंमत करून यालाच गाठले पाहिजे.
त्याला आवाज देताच तो थांबला. खालपासून वरपर्यंत माझ्याकडे बघत सायकलवरूनच त्याने माझी वास्तपुस्त सुरू केली. तेवढ्यात सिनियर्सच्या घोळक्यातील दोघे तिघे माझी रॅगिंग घ्यायच्या इराद्याने आमच्याकडे आले. अमितनी त्याच्या खास स्टाइलने एक हलकी-शेलकी शिवी त्यांना हासडली आणि दम भरला. मी सुखरूप रूममध्ये जाईपर्यंत तो मागोवा घेत राहिला. तेव्हाच लक्षात आले की, हे रसायन काही वेगळेच आहे. तेवढ्या वेळात त्याने माझा पूर्ण अभ्यास केला होता की हा खेड्यातून, जेमतेम परिस्थितीतून आलेला मुलगा आहे. याला आपण प्रोटेक्टच नाही तर सपोर्टही केलं पाहिजे.
ही लहानशी गोष्ट अमितच्या स्वभावाचा स्थायीभाव आणि त्याच्या आयुष्याचे बीजतत्त्व सांगणारी आहे. तो नुसत्या सहानुभूतीने नाही, तर अनुभूतीने, एम्पथीने जगाकडे पाहायचा. त्याला दुर्बलांवर होणाऱ्या अन्यायाची भारी चीड होती. त्या विरोधात तो कितीही किंमत मोजायला तयार असायचा. हाच त्याचा मूळ स्वभावपिंड.
काळासोबत आमची मैत्री वाढत गेली. अनेक मित्र जुळत गेले. मी अमितच्या मित्रांच्या आऊटर ऑर्बिटमधून त्याच्या इनर ऑर्बिटमध्ये कधी गेलो ते कळलेच नाही. त्याला सर्व थरांतील आणि स्तरांतील मित्र होते. त्याच्या प्रत्येक कार्यसिद्धीसाठी आम्ही त्याच्यासोबतच असायचो अगदी मारामाऱ्या करण्यापासून तर संजीवनी (वहिनी) च्या लेडीज होस्टेलच्या भिंतीवर त्याला चढवण्यापर्यंत.
तो कॉलेजमध्ये असताना जवळच्या मित्रांना अगत्याने 'माझ्या घरी नागपूरला ये' सांगायचा. मोठ्या मनाने घरी बोलवायचा. मला वाटायचे की असे काय आहे त्या घरात. त्याच्या घरी जाण्याचा योग कॉलेज संपल्यावर 1988 मध्ये आला. तिथे गेल्यावर बघतो तर काय घरातील प्रत्येक व्यक्ती ही प्रति-अमितच आहे, तर अमितमध्येसुद्धा काही अंशी त्यातला प्रत्येक जण आहे. झाले, साऱ्या घराशी माझे नाते जुळले. बाहेरून आलेल्या मला नागपूरसारख्या शहरात एक हक्काचे घर मिळाले. असे घर मी त्यापूर्वी कधी बघितले नव्हते आणि अजूनपर्यंत तसे दुसरे घर मला सापडलेही नाही.
अमितच्या व्यक्तिमत्त्वाला विविध आयाम होते. विशेष म्हणजे त्याचा प्रत्येक आयाम हा प्रखर आहे, गौण काहीच नाही. त्याचं व्यक्तिमत्त्व आणि व्यक्तीमहत्त्व दोन्हीही अफाट आहेत. मी वर म्हटल्याप्रमाणे, दुर्बलांवरील अन्यायाविरुद्ध पेटून उठणे हा तर त्याचा स्थायीभावच होता. म्हणूनच तो कायम चळवळीत राहिला. प्रखर बुद्धिमत्ता, अनुभूती, मानवता आणि धाडस ह्या त्याच्या गुणांच्या आधारे तो इथली व्यवस्था बदलायला सतत धडपडत होता. पण हाच अमित आपल्याशी आपुलकीने बोलतो, समजूत घालतो, रागावतो, दटावतो, कुणासाठी पोटतिडकीने बोलतो, सगळ्यांना जमवतो, तर सगळ्यांमधे जातो, पायपीट करतो, धरणे धरतो; हे कसे काय असा प्रश्न आपल्याला पडतो. माझ्या मते याचं कारण म्हणजे कुमुद काकू - दादासाहेब पावडे यांचे संस्कार, त्यांचा जीवनालेख आणि समस्त पावडे परिवार.
सर्जनशील, तत्त्वशील, गाढा अभ्यासक, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन तिचा सखोल अभ्यास करणारा, त्याला शेवटावर नेणारा अमित, दादा आणि काकूंच्या विचारधारेचा खरा पाईक होता. दादांनी शिकवलेला महात्म्याचा विश्वस्तपणा आणि कणव, काकूंनी दिलेल्या फुले-शाहू-आंबेडकर या कानमंत्रासोबत तो वास्तवात आणत होता.
पण कोणत्याही परिस्थितीला, प्रसंगाला, व्यक्तीला, घटनेला सार्वत्रिक सापेक्षतेने म्हणजे सम्यक दृष्टीने बघणे, तितकाच अनुग्रह, निरपेक्ष बुद्धीने म्हणजे निःस्पृहपणे त्यावर विचार करणे, मगच त्याविषयी आपले मत बनवणे, ते अमलात आणणे, ही त्याची विचार आणि कार्य करण्याची पद्धती होती. मुख्य म्हणजे त्यात जर त्याला काही अन्यायकारक, सामाजिक वा राजनैतिक भेदभावाचे, अनैतिक, अपमानास्पद, सकलसमाज हानीचे वा देशहानीचे आढळले, तर तो त्या विरुद्ध पेटून उठायचा. खासकरून इथल्या व्यवस्थेने दुर्बल केलेल्या घटकांवर, बहुजनांवर काही अन्याय झाला, त्यांचा अपमान झाला, तर त्याला प्रचंड चीड येत असे. त्यासाठी तो त्याच्या जनसंग्रहाला जागा करायचा, आवाहन करायचा, वाटेल ती किंमत मोजायचा, भरभरून लिहायचा, पदरमोड करून पायपीट करायचा. हीच त्याची कार्यशैली तथा वर्क अल्गोरिदम आहे, असे दिसून येते.
दादा आणि काकूंनी दिलेल्या स्वानुभव आणि सहानुभूतीच्या डोळ्यांनी तर तो जगाकडे बघायचाच -ते त्याचं फाउंडेशनच होतं त्याहीपुढे तो अनुभूतीतून जगाला बघायचा. नुसते बघायचाच नाही तर ती अनुभूती तो जगायचा; जे अत्यंत कठीण काम आहे.
म्हणूनच स्वकर्तृत्वाने, कष्टाने भल्या मोठ्या हुद्द्याची नोकरी तो मिळवतो, देशासाठी जागतिक दर्जाचे दोन डझनांवर प्रकल्प बांधतो मिळवलेल्या, कमावलेल्या एवढ्या प्रतिष्ठेच्या नोकरीचा, अपमान झाला, खोटा आरोप झाला म्हणून तडक राजीनामा देतो.
पण अपमान-आरोप सहन करत स्वस्थ बसत नाही. आपल्या आत्मसन्मानाला धक्का लागू देत नाही.
अनुभूती म्हणूनच
तो मोठा प्रशासकीय अधिकारी राहूनसुद्धा स्वतःला
शेतीत झोकून देतो,
परत खेड्यात जाऊ शकतो, राहू शकतो,
स्वतःला गर्वाने शेतकरी म्हणवून घेतो.
अनुभूती म्हणूनच
तो नुसता बैठकीत बसणारा शेतकरी राहत नाही,
तर औत शेतअवजारे हाती घेतो
शेतकरी, शेतमजुराच्या बरोबरीने शेतात राबतो
हीच अनुभूती त्याला अंतर्मुख करते तेव्हा तो
ठोकताळा लावून बघतो, ताळेबंद काही जमत नाही,
वास्तव प्रश्न समजतो, त्याला भिडतो.
शेती-शेतकी हा कसा आतबट्ट्याचा धंदा आहे, हे तो पुराव्यानिशी जगाला सांगत सुटतो
सखोल अभ्यास करून शेती, शेतकी, शेतकरी,
गावगाडा, बहुजन समाज असा बहुस्तरीय
एक्स रे की एमआरआय तो जगासमोर आरशासारखा धरतो.
एवढे करून थांबत नाही तर, तो शेती, शेतकी, शेतकरी समस्यांवर उत्तरेही शोधतो
अशी सर्वांगीण अनुभूती समाजात काम करणाऱ्या
कोण्या संघटनेच्या नेत्याने घेतली असेल? दुरापास्तच आहे
अनुभूती म्हणूनच तो प्रत्येक पुरोगामी चळवळीचा भाग होतो, कार्यकर्ता होतो, नेता होतो, पाठीराखा होतो,
पदरमोड करून गावोगाव बहुजनात जातो.
मोठ-मोठे आंतरजातीय सामूहिक विवाह घडवून आणतो.
अनुभूती म्हणूनच तो खुसरो,
गालिब अजून काय काय अभ्यासतो
आणि एक दर्जेदार कविता संग्रह लिहितो.
खरं तर अमित कुमुद काकूंसारखा फार मोठ्या सर्जनाचा दावेदार होता. त्याच्या कविता वाचून वाटते की, त्याने खूप काही विविधांगी साहित्यिक-वैचारिक लेखन केले असते. त्याचा इतिहास, विज्ञान, फिलॉसॉफी अशा विविध विषयांचा सखोल अभ्यास होता. त्याला कलांमध्ये, खेळांमध्ये फार रुची होती. व्यायाम तर त्याला प्राणप्रिय होता. कोणत्याही गोष्टीचा नुसता अभ्यास करून तो थांबत नसे, तर त्यावर चिंतन-मनन करून त्या गोष्टीची स्थळ-काळ सापेक्षता तो तपासायचा. स्वतःचे आकलन, निष्कर्ष तयार करायचा, मूल्यमापन करायचा.
आज अनेक वृत्तपत्रांत, नियतकालिकांत प्रसिद्ध झालेले अमितचे टेक्नॉलॉजी, कृषी, सामाजिक अशा विविध विषयांवरचे लेख आणि चारेक वर्षे अगोदर त्याने लिहिलेला कवितासंग्रह आपल्याकडे आहे, तो आपण प्रकाशित करू आणि त्याचा सगळा वैचारिक ठेवा जतन करू. भौतिकदृष्ट्या त्याला कशाचीच कमी नव्हती. त्याने वैयक्तिक आयुष्यात कधीच कोणाकडून अपेक्षा केली नाही. पण मी जाणून आहे की, इथल्या प्रत्येकाला त्याची नितांत गरज आहे. त्याच्या कुटुंबाला तर ती आहेच आहे, पण कुणाला मित्र म्हणून, नेता म्हणून, सहकारी म्हणून, सखा म्हणून, खासकरून इथल्या प्रत्येक पुरोगामी चळवळीला अमितची नितांत आवश्यकता आहे.
महिनाभरापूर्वी 26 जुलैला आम्हा मित्रांच्या एका गेट-टुगेदरमध्ये आम्ही दिवसभर सोबत होतो, अगदी उत्तर रात्रीपर्यंत. अमितचे जाणे हे एका तत्त्ववेत्त्याचे जाणे आहे. त्याच्या अवेळी जाण्याने समाजाची मोठी हानी झाली आहे. पावडे कुटुंबीयांवर तर आभाळच कोसळले आहे. ईश्वर त्यांना हे दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना करतो. अमित करत आलेल्या अनेकविध समाजकार्यातून, वैचारिक देवाण-घेवाणीतून आपण इथे एकत्र आलेलो आहोत. ही बांधिलकी अशीच ठेवून आपण त्याचे कार्य, वसा पुढे नेऊ. हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल. धन्यवाद.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या