डिजिटल अर्काईव्ह

स्वामी रामानंद तीर्थ यांचे मूळ इंग्रजी आत्मकथन वि. पां. देऊळगावकर यांनी मराठीत अनुवादित केले, ते 1976 मध्ये पॉप्युलर प्रकाशन, मुंबई यांनी प्रकाशित केले. मात्र अलीकडची अनेक वर्षे ते पुस्तक उपलब्ध नव्हते. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती 'संन्याशाच्या डायरीतून : हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामाच्या आठवणी' या नावाने साधना प्रकाशनाकडून आली आहे. या आवृत्तीचे प्रकाशन 14 सप्टेंबर 2025 रोजी, छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. त्या निमित्ताने, त्या पुस्तकातील एक प्रकरण इथे प्रसिद्ध करीत आहोत. यातून स्वामीजींच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट तर कळतोच; परंतु त्यांचे प्रांजळ व लालित्यपूर्ण आत्मनिवेदन आणि वि.पां. देऊळगावकर यांचे अचूक व प्रवाही भाषांतर यांचेही दर्शन घडते.

ईश्वरी योजना ही अगम्य असते. एखाद्या दिवशी मी वर्गात काही मुलांना घेऊन काही शिकवीत बसेन, याची मला स्वप्नातसुद्धा कल्पना नव्हती. पण 1929 च्या जून महिन्यात ग्रामीण भारताच्या एका कोनाकोपऱ्यात चाललेल्या एका राष्ट्रीय शिक्षणसंस्थेचा प्रमुख म्हणून प्रत्यक्षात मी काम करू लागलो हे सत्य होते.

हैद्राबाद संस्थानातील उस्मानाबाद जिल्ह्यातील 'हिप्परगे' हे एक अगदी छोटेसे खेडे आहे. जेमतेम काहीशेच लोकवस्तीचे ते गाव आहे. तसे त्या गावाविषयी विशेष असे काहीच सांगण्यासारखे नव्हते; पण त्या गावच्याच दोघा भावांनी गुरुकुल पद्धतीवर तेथे सुरू केलेल्या एका शैक्षणिक संस्थेमुळे त्या गावाला एकदम एक आगळेच महत्त्व प्राप्त झाले. त्या बंधुद्वयांपैकी वडील असलेल्या श्री. व्यंकटरावांनी आपल्या मालमत्तेचा बहुभाग संस्थेला देणगीदाखल देऊन टाकला होता व संस्थेच्या खर्चापैकी बराचसा वाटा आपल्या वकिली व्यवसायातील प्राप्तीतून ते उचलीत असत. श्री. व्यंकटराव म्हणजे एक प्रामाणिक व निरलस व्यक्ती. त्यांचे धाकटे बंधू श्री. अनंतराव यांनी असहकारितेच्या चळवळीतील आवाहन स्वीकारून बी.ए.च्या वर्गात असताना कॉलेजला रामराम ठोकला होता. तेच ती संस्था चालवीत होते. एका छोट्याशा खेड्यात अगदी गाजावाजा न करता चाललेल्या संस्थेचा लवकरच चोहोकडे खूपच प्रभाव पडत चालला. संस्थानातील निरनिराळ्या ठिकाणांहून विद्यार्थी तेथे शिक्षणासाठी येऊ लागले. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ इच्छिणाऱ्या कुणालाही न चुकता आपल्या मुलाला या संस्थेत प्रविष्ट करावे असे वाटत होते. ती वसतिगृहात्मक संस्था होती. त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक एकत्रच राहात असत. ते एकत्र काम करीत, एकत्र जेवीत. त्यांचे जीवन अत्यंत साधे होते. त्यात कुठल्याही प्रकारचा थाटमाट, दिखाऊपणा नव्हता. चकाकणारे वा नेत्रदीपक असे तेथे काही नव्हते. ग्रामीण वातावरणातील साधेपणाचा प्रत्यय तेथे घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीत येत असे. विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्यासाठी खेडुतांच्यासारख्या झोपड्या घातल्या होत्या. दोघांमध्ये पृथकपणा नव्हता. दोघांची राहणी इतकी सारखी होती की, तेथे येणाऱ्या नवख्या गृहस्थाला विद्यार्थी व शिक्षक यांतील भेद करणे कठीण होते. सर्वांना शारीरिक श्रमाबद्दल आस्था होती व प्रत्यक्षात सारेच शारीरिक श्रम करीत असत. आमचे साधे वर्ग आम्हीच बांधले होते. खोल्या झाडण्यासाठी व स्वच्छ ठेवण्यासाठी नोकर नव्हते. दर रविवारी विद्यार्थी शेण गोळा करून आणीत व खोल्या सारवीत. शिक्षकही त्या सारवीत. कामात सहभागी होत. एखादा खादीचा सदरा व एक घोंगडी एवढ्याच काय त्या शाळेच्या जीवनातील गरजेच्या वस्तू होत्या. अभ्यासाचा तास सुरू होताच राहण्याच्या जागेचे वर्गामध्ये रूपांतर होत असे. विद्यार्थी आपल्या घोंगड्या पसरून त्यावर बसत. खुर्ची-टेबल इत्यादी कोणताच बैठकीचा प्रकार तेथे नव्हता. कधी कधी झाडाखाली अथवा उघड्यावर वर्ग घेतले जात.

तेथील जीवन क्रमबद्ध होते. पहाटे 4.30 ला आम्ही उठत असू. बरोबर 5 वाजता सामुदायिक प्रार्थना होई. त्यानंतर प्रत्येकाला आपापल्या कामाला जायला मोकळीक होती. सकाळी 8 वाजता दूध व ज्वारीची भाकरी ही न्याहारी असायची. त्यानंतर दुपारपर्यंत वर्ग भरायचे. जेवण झाल्यानंतर विश्रांतीसाठी वेळ दिला जाई. पुन्हा दोन प्रहरी एक-दोन तास वर्ग घेतले जात. सायंकाळी 5 पासून व्यायामाला आरंभ होई. 7 वाजता सायंप्रार्थना होत असे. रात्रीचे भोजन झाल्यानंतर मुले अभ्यास करीत. रात्रौ 9.30 ला झोपी जात.

संस्थेचा अंतर्गत कारभार व शैक्षणिक बाजू सांभाळणाऱ्या एका व्यक्तीची संस्थेला गरज होती. विद्यार्थ्यांवर त्यांनी देखरेख करावी व त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना चांगले शिक्षण देण्याची व्यवस्था करावी, अशी त्या व्यक्तीकडून अपेक्षा होती. त्याचा अर्थ असा की, विद्यार्थ्यांना केवळ बौद्धिक पातळीवरच शिक्षण देऊन भागणार नव्हते, तर विद्यार्थिजीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करावयाचा होता. मानवी बाजूचा तसेच मानसिक व आध्यात्मिक बाजूंचाही विचार करून त्यांचा विकास करावयाचा होता. एक परिपूर्ण व्यक्ती बनविण्याचा तोच एक खात्रीचा मार्ग होता. त्यायोगेच आपली जीवननौका सामाजिक अस्तित्वाच्या महासागरात लोटण्यास लागणारी आवश्यक ती पात्रता विद्यार्थ्यांना पात्र होईल. इतरत्र चोहोकडे मिळणाऱ्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ विभाजित व्यक्तिमत्त्व प्राप्त होते. असे व्यक्तिमत्त्व फार तर समाजाला एकाच बिंदू ठिकाणी स्पर्श करू शकेल, बुद्धी प्रगल्भहोऊनही अंतःकरण दुबळे राहील. तसेच शारीरिक, मानसिक जोम प्राप्त होऊनही बौद्धिक विकास अपेक्षित पातळीपर्यंत होणार नाही. समाजाला त्रुटित वा खंडित शिक्षणाची आवश्यकता नाही, तर पूर्ण शिक्षणाची आवश्यकता आहे. पूर्ण शिक्षणानेच जीवन पूर्ण बनेल व सभोवतालच्या जिवांशी सामरस्य साधता येईल.

चांगले निरलस, भ्रातृभावाने प्रेरित झालेले, गरिबांसाठी कळवळा असणारे, पददलितांची समर्पण भावनेने सेवा करणारे सामाजिक कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रेरित होऊन संस्थापकांनी या संस्थेची स्थापना केली होती. परित्याग व शुचिता या दोन गोष्टीच त्यांच्या जीवनाचा आधार बनायच्या होत्या.

हे काम समजून घेण्याची पात्रता असणाऱ्या व्यक्तीच्या शोधात संस्थेचे संस्थापक होते. योगायोगाने त्यांनी मला वेधले. मी केवळ एक साधा मनुष्य आहे आणि हे कार्य मात्र प्रचंड आहे, असे मी त्यांना सांगितले. कशीतरी मला तेथे चलण्याची व मुख्याध्यापक बनण्याची त्यांनी गळ घातली. मी काय वेतन घेणार, असे मला त्यांनी विचारल्याबरोबर मी स्तिमित झालो. काय उत्तर द्यावे हे मला समजेना. श्री. ना. म. जोशी यांच्या हाताखाली काम करतानासुद्धा दर महिन्यास 60 रुपये असे मानधन मला मिळत असे. वेतनिक नोकर या नात्याने नोकरी करण्याची मला सवय नव्हती. साधे जीवन जगणाऱ्याच्या सामान्य गरजा भागण्यास जेवढे आवश्यक असेल, तेवढेच मला पुरेल, त्याहून अधिक काही नको, असे मी त्यांना सांगितले. माझ्या खास देखरेखीखाली असे कोणीच नव्हते. मी एकटाच होतो. दर महिन्याला माझ्या नावे 50 रुपये जमा केले जातील. जेव्हा मला कशाची गरज भासेल, तेव्हा मी त्या शिलकेतून पैसे काढू शकेन असे मला सांगण्यात आले. मी होकार दिला. मला माझ्या पगारातून पैसे उचलण्याचा तसा प्रसंगच आला नाही. एकदाच माझ्या एका आजारी नातेवाइकाला भेटायला जाण्यासाठी मी पैसे काढले. जेव्हा माझ्याजवळील असलेल्या सर्व चीजवस्तूंचा त्याग करण्याचे मी ठरविले, त्या वेळी माझ्या नावे जमा असलेली सर्व रक्कम मी संस्थेलाच देऊन टाकली. यासंबंधी अधिक निवेदन पुढील एका प्रकरणात येईल.

'धर्म हृदयाकडून हृदयाकडे जातो' अशी एक महत्त्वपूर्ण म्हण आहे. शिक्षणाच्या बाबतीत तर ही म्हण अधिक यथार्थ आहे. अंतःकरणातूनच खरे शिक्षण बाहेर पडू शकेल. मानवी अंतःकरणाच्या अंतरंगातील तारा छेडल्या गेल्याशिवाय विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित होणे शक्य नाही. यासाठी पुन्हा विकसित अंतःकरणाची आवश्यकता आहे. विद्यार्थिजीवनाच्या सर्व स्पंदनांची नोंद घेणारे शुद्ध अंतःकरण हवे आहे. आपण विद्यार्थ्यांहून श्रेष्ठ व निराळे आहोत किंवा आपले स्थान वरचे आहे ही जाणीव न ठेवता आपण त्यांचे एक स्नेही व सहकारी आहोत असे समजून एकरूप होण्याची, त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारचा शिक्षकच मुलांना चांगले शिक्षण देऊ शकेल. मी स्वतःला पुढीलप्रमाणे प्रश्न विचारायला आरंभ केला. मी स्वतःवर जितके प्रेम करतो तितकेच विद्यार्थ्यांवर करू शकेन काय? मी स्वतःला जशी क्षमा करतो, तशी विद्यार्थ्यांना त्यांच्या चुकीबद्दल क्षमा करू शकेन काय? त्यांच्या सुख-दुःखात मी सहभागी होऊ शकेन काय ? मुलांच्या जीवनातील सर्व अवस्थांत मी त्यांच्याशी पूर्णपणे एकरूप होऊ शकेन काय? मी हे करू शकेन असे मला वाटले आणि समर्पणाच्या भावनेतून मी ते काम स्वीकारले.

पूर्वीपासूनच मी खादीधारी होतो. माझे जीवन जितके साधे करणे आवश्यक होते, तितके मी साधे केले. तरी माझ्या पोषाखात विजारी होत्या. नव्या जीवनपद्धतीच्या सिद्धतेसाठी मी त्या विजारी सोडून दिल्या, म्हणण्यासारखे माझे असे माझ्याजवळ काहीच सामान नव्हते. मी नुसता एक विद्यार्थी होतो. मी माझ्याजवळची वळकटी टाकून दिली आणि दोन घोंगड्या घेतल्या. एक अंथरण्यासाठी व एक पांघरण्यासाठी. चहा, कॉफीसारखी पेये मी सोडून दिली. अशा रितीने बाह्योपाधींची जुळवाजुळव केल्यानंतर माझ्या आंतरिक जीवनाच्या प्रयोगाला आरंभ झाला.

बाह्यपरिवर्तन सहजतेने घडून आले; पण आंतरिक परिवर्तनाची प्रक्रिया दुष्कर होती. प्रत्येक पाऊल ठेवीत असताना मी अंतश्चक्षूने त्याची पूर्णपणे छाननी करीत असे. संस्थाप्रमुख या नात्याने कुणाला तरी शिक्षा करण्याचा प्रसंग येई. तेव्हा शिक्षा देण्याचे मी पुढे ढकली. मी मुलाचे मन बदलण्याचा प्रयत्न करीत असे व स्वतःच्या चुकीची जाणीव त्याला करून देऊन आपली चूक सुधारण्याची इच्छा त्याच्यामध्ये निर्माण करीत असे. पण कधीकधी अगदी निर्वावलेल्या व पक्क्या विद्यार्थ्याशी प्रसंग यायचे. अशा वेळी छडीचा अवलंब मला करावा लागे. आतापर्यंतच्या आयुष्यात छडी हाताळण्याचा प्रसंग माझ्यावर कधी आला नव्हता. येथेही शिक्षा देण्यास मी अगदी अपात्र आहे असे मला आढळून आले. चांगुलपणा हा आदेशाबरहुकूम बनत नसतो. जुलूमजबरदस्तीने उत्स्फूर्त अशी संबादी प्रतिक्रिया लाभणे शक्य नाही. दडपणाखाली विकास खुंटित होईल. मानवी व्यक्तिमत्त्वाचा दडपणाने विकास होणे शक्य नाही. व्यक्तीला स्वातंत्र्य आवश्यक आहे. आपल्यातील उणिवा व दोषांची जाणीव हीच गुरुकिल्ली. छडी हातात घेऊन मी योग्य साधन बनणार नाही. चुकूनमाकूनच मी छडीचा उपयोग केला असल्यास त्यात आश्चर्य नाही. अशाच एका प्रसंगी जेव्हा मी छडीचा उपयोग केला तेव्हा किती छड्या द्यायच्या हे मी ठरविले. तितक्याच छड्या मी प्रथम माझ्या स्वतःच्या हातावर घेऊन पाहिल्या. त्यामुळे शारीरिक क्लेश किती प्रमाणात होतील यांची कल्पना केली. तसेच त्या छड्यांची मानसिक प्रतिक्रिया काय होईल याचाही अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. मी मुलाला तीन छड्या मारल्या आणि तसे केल्याबद्दल तत्काळ त्याच्या गळा पडून ओक्साबोक्शी रडू लागलो.

अशा रितीने कडकपणे वागणे हे आपल्याला सर्वथा जमणार नाही हे कळून आल्यानंतर मी पुढे निराळ्या मार्गाचा विचार केला. विद्यार्थ्यांनी केलेल्या चुकांबद्दल प्रायश्चित्त म्हणून मी उपवास करू लागलो. त्यात कसल्या प्रकारची बतावणी नव्हती. मला एक प्रसंग आठवतो. एका विद्यार्थ्याने एक अनैतिक कृत्य केले होते. स्वतःवर क्लेश लादून घेऊनच आपण त्या मुलामधील सूक्ष्म अंतरात्म्यात चैतन्य निर्माण करू शकू या श्रद्धेने मी एक आठवडाभर प्रायोपवेशन केले. ते केवळ क्लेश होते का? ती केवळ एक तपश्चर्या होती. तिच्याबरोबर तीत अंतर्भूत असलेला आनंद व पावित्र्य होते.

आजाऱ्याची चांगली शुश्रूषा करण्याची सवय मी केली. मी चांगला परिचारक बनलो. विद्यार्थ्यांच्या आजारपणात कित्येक रात्री त्यांना थोपटून झोपविण्यात मी घालविल्या आहेत. मी देशभक्तिपर गाणी व मधून मधून भक्तिपर कविता गाऊन दाखवी. एका अर्थाने मी त्यांची आई बनण्याचा प्रयत्न करी. औषधांचीही मी थोडीशी माहिती करून घेतली. अशा त-हेने मी त्यांच्यापैकीच एक बनून गेलो. मी त्यांच्यावर पराकाष्ठेचे प्रेम केले व विद्याथ्यर्थ्यांनीही माझ्यावर मनापासून प्रेम केले. सुट्टीत थोड्या दिवसांकरिता का होईना ते जेव्हा आमचा निरोप घेत, तेव्हा आम्ही सामान्य माणसाप्रमाणे रडत असू व लवकर परत येण्याचे आश्वासन एकमेकांना देत असू.

त्या लहान मंडळींच्या सहवासातील जीवन सरलतेने व सालसतेने व्याप्त होते. त्या वर्षांची जेव्हा मला आठवण होते, तेव्हा ती वर्षे म्हणजे माझ्या जीवनातील सर्वश्रेष्ठ पारितोषिकच असे मी मानतो. मी जरी वयाने व कदाचित अनुभवानेही मोठा झालो असलो, तरी ते सुखी क्षण पुन्हा प्राप्त व्हावेत यासाठी मी नेहमी तळमळत राहिलो आहे. माझ्यासाठी राजकीय कार्य पूर्वनियुक्त होते, याची त्या वेळी मला यत्किंचितही कल्पना नव्हती. त्या राजकीय कार्यासाठी विशेष कणखरपणाची आवश्यकता असते.

हिप्परगे येथील काही महिन्यांच्या वास्तव्यातच हैद्राबाद संस्थानात त्या वेळी निर्माण होत असलेल्या परिस्थितीशी माझा प्रत्यक्ष संबंध येत चालला. माझे बालपण जरी संस्थानात गेले होते, तरी शिक्षणासाठी प्रदीर्घ काळ मी बाहेरच होतो. मी जसजसा मोठा होऊ लागलो, तसतसा माझ्याभोवती वाढत्या राष्ट्रवादाचा उत्साह मला जाणवू लागला होता व मी त्यात पूर्णपणे निमज्जन केले होते. मला हिंदुस्थानातील संस्थानी प्रजेच्या परिस्थितीची, सरंजामदारी राजवटीत होत असलेल्या त्यांच्या ससेहोलपटीची यत्किंचितही कल्पना नव्हती. हैद्राबादच्या जनतेच्या दैन्यावस्थेची मला काहीच जाणीव नव्हती, असे म्हटले तरी चालेल. त्या बाबतीत मी कोरा करकरीत होतो.

संस्थानातील निरनिराळ्या भागांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक आपल्याला कसे अपमानास्पद जिणे जगावे लागत होते, याचे निवेदने करीत. सरकारी अधिकाऱ्यांकडून त्यांचा जो छळ होत असे, त्याविरुद्ध ते जेव्हा तक्रार करीत त्या वेळी ते अगदी हलक्या आवाजात काहीतरी कुजबुजल्यासारखे बोलत. धन्याला खूश करण्याकरिता त्यांना ती 'फेझ' टोपीही घालावी लागे. स्वतःच्या मातृभाषेची पायमल्ली करून त्यांचे शिक्षण उर्दूतून झाल्यामुळे त्या सर्वांचे उर्दूकरण झाले होते. सार्वजनिक ठिकाणी ते पूजा करू शकत नसत, असे ते म्हणत. धार्मिक उत्सवांवर नेहमी निर्बंध घातले जात. अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय व्यायामशाळा उघडली जाऊ शकत नव्हती. नाव घेण्यासारखी वर्तमानपत्रे प्रकाशित होत नव्हती. सभा भरणे शक्य नव्हते. खाजगी शिक्षणसंस्थांना उत्तेजन नव्हते. चोहो बाजूंनी अशा त-हेने कुचंबणा होत असल्यामुळे जिवाचा अगदी कोंडमारा होत होता. त्यातून कुणाला मार्ग सापडत नव्हता. 

जीवनाची सारी सूत्रे जातीय मुस्लीम धर्ममंडळाच्या हाती होती. हिंदू असणे म्हणजे अवहेलनेचा विषय बनणे होते. हिंदू संशयास्पदच समजला जाई. वरिष्ठ वर्गातील मुसलमानांना सर्व प्रकारच्या सवलती मिळत होत्या. आपला सहधर्मी सूत्रचालक आहे व आपण राज्यकर्त्यांच्या जातीचे आहोत, या गोष्टीचा अज्ञ गरीब मुसलमानाला मोठा आनंद वाटत असे. स्वतः चिरगूट चिध्या गुंडाळून राहात असला तरी आपल्या जातीचाच एक वर्ग ऐश्वर्यसंपन्न आहे, या गोष्टीविषयीच्या आसुरी सुखात तो मग्न होता. एखादे शेंबडे कारटेही हिंदूला वेडावून दाखवू शके व हिंदू स्त्रियांचा उपमर्द करू शकत असे. सरकारी यंत्रणेत मुसलमान अमीरउमरावांचा खूप भरणा होता. बहुसंख्याक समाज दडपणाखाली कसा चिरडला जात होता, याची वरवर पाहणाऱ्यांनाही सहज कल्पना येत होती. त्यामुळे हिंदूंच्या मनात एक प्रकारच्या गुलामी वृत्तीचा प्रादुर्भाव झाला असल्यास त्यात आश्चर्य नव्हते. त्यांच्या आंतरिक प्रेरणा भीतीने झाकळून गेल्या होत्या. हैद्राबाद संस्थानाच्या जनतेची त्या वेळी अशी स्थिती होती.

आमची संस्था पाहायला आलेले लोक शोचनीय हकिगती सांगत असत. आमच्याबरोबर राहिल्याने त्यांना एक प्रकारचा अंमळसा विरंगुळा मिळे. संस्थेकडून आपल्याला काही प्रेरणा मिळेल, काही मार्गदर्शन होईल, या दृष्टीने ते संस्थेकडे पाहात असत. देशभर दिसत असलेल्या नव्या प्रवृत्ती आपल्या मुलांनी आत्मसात कराव्यात असे त्यांना फार वाटे. आपल्यासारखेच अवमानित जीवन आपल्या भावी पिढ्यांनी जगू नये, असे त्यांना वाटे. ते हतबल होते. त्यांच्या मुलांवर मात्र तसा प्रसंग येऊ नये, अशी जणू मनोमय ते प्रार्थना करीत.

पददलित बहुजनसमाजाला मुक्त करणारी एक नवी सेना तयार करणे हाच या छोट्याशा संस्थेचा पूर्वनियोजित उद्देश होता. आम्हाला भेटायला येणारी मंडळी तक्रारी खूप करीत, पण त्या तक्रारीची दाद लावून घेण्यासाठी लागणाऱ्या दिव्यातून जाण्याची बहुतेक कोणाचीच तयारी दिसत नव्हती. म्हणून फारसा गाजावाजा न करता शांतपणे काम करून सरंजामदारी जोखडातून जनतेला मुक्त करण्यासाठी आपल्या सर्वस्वाचे बलिदान करायला तयार असणाऱ्या निष्ठावंत त्यागी कार्यकर्त्यांचा एक संच तयार करणे अगदी आवश्यक होते.

आम्ही शिक्षकांना व विद्यार्थ्यांना देशभक्तीचा श्वासोच्छ्वास करण्यास शिकवले. जनसेवा हे त्यांचे ब्रीदवाक्य ठरले. केवळ त्यांना उपदेश देऊनच आम्ही थांबलो नाही, तर खेडुतांकरिता रात्रीचे वर्ग चालवीत होतो व इतर ग्रामसुधारणांची कामे आम्ही मुलांकडून प्रत्यक्ष करवून घेत होतो. दररोज संध्याकाळी आम्ही त्यांना प्रसिद्ध लेखकांच्या कृतींतून चांगले उतारे, थोर राष्ट्रीय पुढाऱ्यांची चरित्रे, स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास वाचून दाखवीत असू. वीर गीते, पोवाडे म्हणून दाखवीत असू, मैथिलीशरण गुप्तजींचा आवेश त्यांच्या मनात भरविला जात होता. 'तुम्ही केवळ स्वयंकेंद्रित बनू नका. पददलितांच्या उद्धाराकरिता जगा, त्यांच्याशी एकरूप होऊन जा', असे आम्ही त्यांना सांगत असू. ती मुले व्यक्तिशः व सांघिकपणे स्फूर्तिदायी गाणी म्हणत असत. अशा रितीने नव्या कार्यासाठी आम्ही त्यांचा मानसिक व आध्यात्मिक दृष्टीने विकास करीत होतो.

ही संस्था म्हणजे थोडक्यात स्फोटक मानवी सामग्री निर्माण करण्याचा जणू एक मोठा कारखानाच बनली होती. सरकारला या भयंकर प्रयोगाचा सुगावा लागण्यास फार वेळ लागला नाही. आमच्याभोवती गुप्तहेरांचे जाळे पसरविण्यात आले.

असहकारितेच्या चळवळीतूनच आमचा उदय झाला असल्यामुळे आम्ही सर्व कट्टर काँग्रेसवादी होतो. आमच्या अंगी राष्ट्रीय वृत्ती चांगली बाणली होती. त्या वेळी देशभर रूढ असलेल्या पद्धतीनुसार आम्हीसुद्धा दर महिन्यांच्या शेवटच्या रविवारी काँग्रेस ध्वजवंदनाचा कार्यक्रम करीत असू. कदाचित संस्थानात काँग्रेस ध्वजारोहण होत असलेले हे पहिलेच ठिकाण असावे. या मासिक ध्वजवंदनाचे वृत्त अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले. त्यांच्या दृष्टीने आम्ही मंडळी भयंकर होतो. त्याचा परिणाम असा झाला की, आमच्या हालचालींवर, कार्यक्रमावर नजर ठेवण्यासाठी त्या खेड्यात कायमची एक पोलीस तुकडी नियुक्त करण्यात आली. शाळा पाहायला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्रथम फौजदार किंवा साहाय्यकाला वर्दी देऊनच यायला पाहिजे, असा नियम करण्यात आला. पण आम्ही या सर्व डावपेचांकडे दुर्लक्ष केले व भावी परिणामांची फारशी क्षिती न बाळगता आमचे कार्य चालू ठेवले.

सर्व वातावरण समर्पणाच्या भावनेने भारावून गेले होते. शिक्षक स्वतःच अनुकरणीय असे आदर्श होते. आमचे स्वतःचे असे म्हणण्यासारखे आमच्याजवळ काहीच नव्हते. व्यक्तिगत असे ज्याला म्हणता येईल, अशा प्रत्येक वस्तूचा आम्ही त्याग केला होता. उपदेशापेक्षा आचरणाचा अधिक प्रभाव पडत होता. प्रत्येक क्षणी आमचा विकास होत होता; आणि आमच्याबरोबर विद्यार्थ्यांचाही. सेवा व त्यागासाठी हे एक मित्रमंडळ आहे, अशी भावना आमच्या मनात रुजली होती.

सुमारे सहा वर्षांच्या सतत व भरीव कामामुळे हे मित्रमंडळ दिव्यातून जाण्यास समर्थ बनले आहे असा आम्हाला विश्वास वाटू लागला. असो. पुढील कार्याची योजना कशी आखण्यात आली हे सांगण्यापूर्वी माझ्या जीवनातच क्रांती घडवून आणणाऱ्या दुसऱ्या एका अवस्थांतराविषयी मी काही निवेदन करू इच्छितो.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी