डिजिटल अर्काईव्ह

नव्या दिशेच्या प्रतीक्षेतील जुना वाद

20 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली येथे 'ईश्वर अस्तित्वात आहे काय?' (Does God Exist?) या विषयावर एक जाहीर वादसंवाद झाला. हिंदीतील प्रख्यात पटकथा लेखक जावेद अख्तर आणि मुस्लिम धर्माचे अभ्यासक मुफ्ती शमाइल नदीम या दोघांच्या मध्ये झालेल्या या वाद-संवादाचे सूत्रसंचालन लल्लनटॉपचे संपादक सौरभ द्विवेदी यांनी केले. दोन तास चाललेल्या त्या वाद-संवादामध्ये दोन्ही वक्त्यांनी आधी आपापली मांडणी करणारी भाषणे केली, नंतर परस्परांच्या मांडणीचे खंडन करणारी भाषणे केली आणि नंतर दोन्ही वक्त्यांना उपस्थित श्रोत्यांनी काही प्रश्नही विचारले. दोन तास चाललेल्या त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहे. या वाद-संवादाचे विश्लेषण आणि चिकित्सा करणारा लेख इथे प्रसिद्ध करीत आहोत.

खलील जिब्रान यांची 'दोन विद्वान' (The Two Learned Men) नावाची गोष्ट आहे. एका शहरात दोन विद्वान राहायचे. ते दोघंही नेहमी त्यांच्या शिष्यांच्या कोंडाळ्यात असायचे. ते परस्परांचा राग करायचे; कारण त्यांतील एक जण आस्तिक होता तर दुसरा नास्तिक होता. एके दिवशी, योगायोगाने दोघं बाजारात समोरासमोर आले आणि तिथेच त्यांच्यात देवाच्या अस्तित्वावरून वाद सुरू झाला. हा वाद काही तास रंगला. त्यांनी एकमेकांना पेचात पकडणारे प्रश्न विचारले, उत्तरांवर प्रतिउत्तरं दिली. एकमेकांवर कुरघोडी करणारे युक्तिवाद मांडले. अनेक तास वाद घातल्यानंतर मात्र ते दोघंही थकले आणि आपापल्या घरी परत गेले.

त्या रात्री आस्तिकाने घरी जाऊन सगळे देव घराबाहेर काढले आणि घरातील धार्मिक ग्रंथ जाळून टाकले. कारण आस्तिकाचा देवावरील विश्वास साफ उडाला होता.

नास्तिक मात्र तडक देवळात गेला आणि देवाच्या पाया पडला. कारण नास्तिकाला देवाचं अस्तित्व पटलं होतं.

20 डिसेंबर 2025 रोजी दिल्लीतील 'कॉन्स्टिट्यूशन क्लब' मध्ये याच विषयावर जाहीर वादविवाद केल्यानंतर जावेद अख्तर आणि मुफ्ती शमाइल नदवी यांच्या बाबतीत मात्र असं काही घडलं असल्याचं ऐकिवात नाही. लाखो लोकांनी या वादविवादाचा व्हिडिओ यूट्यूबवर बघितला आहे. त्यातील किती लोकांचं मतपरिवर्तन घडलं हे नेमकं सांगणं अवघड आहे. या वादविवाद किंवा चर्चेच्या भरपूर प्रतिक्रिया फेसबुक, ट्विटरसारख्या सामाजिक माध्यमांवर उमटल्या. 'अशा प्रकारच्या वादातून काहीही निष्पन्न होत नाही. देशात इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे असताना ज्या प्रश्नाचं सर्वमान्य उत्तर निघणं शक्य नाही त्यावर चर्चा करून काय फायदा?' असंही मत काही जणांनी व्यक्त केलं. पण ज्या देशात धर्म हा ऐहिक प्रश्नांपेक्षा जास्त चघळण्यात येणारा विषय आहे, जिथे देशाचं राजकारण धर्माच्या जोखडाला घट्ट बांधलेलं आहे, तिथे अशी चर्चा घडणे सयुक्तिकच ठरतं. देवाबद्दलच्या चर्चेत धर्माचा अनेकदा उल्लेख झाला, अशी तक्रार काही जण करू शकतात. पण सर्वसाधारण माणसासाठी देव आणि धर्माबद्दलचे विचार परस्परांत गुंतलेले असतात त्यामुळे एकासोबत दुसरा विषय येणं अनिवार्य आहे. सर्वप्रथम ज्या पद्धतीने ही चर्चा घडली त्याचा विशेष उल्लेख करायला हवा. भारतात चर्चा, वादविवादांची मोठी परंपरा असली (The Argumentative Indian) तरीही अलीकडच्या काळात टीव्हीवर ज्या पद्धतीने वादविवाद घडतात, त्यात हा कार्यक्रम अपवादात्मक ठरतो. वादविवादाच्या नावाखाली हमरीतुमरीवर येणे, जोरात ओरडून बोलण्याला युक्तिवाद समजणे, समोरच्याला बोलू न देणे, मुद्द्याला धरून बोलण्याऐवजी समोरच्या व्यक्तीचा पाणउतारा करण्यात समाधान मानणे म्हणजे जाहीर वादविवाद, असा भ्रम काहींनी करून घेतलेला आहे. त्यातही चर्चानियमन करणाऱ्याचे वर्तन या गोंधळात भर घालणारे असते. टीव्हीवर जोरात खेकसणारे काही चेहरे डोळ्यांपुढे आणून बघा. असा कुठलाही गोंधळ या वा‌द्विवादात घडला नाही. शांततापूर्ण पद्धतीनं, युक्तिवादांवर भर देत ही चर्चा घडली. वादविवादाच्या कार्यक्रमांसाठी हे चांगलं उदाहरण ठरावं. त्यामुळे ही चर्चा घडवल्याच्या पद्धतीची कौतुकाने दखल घ्यायलाच हवी. या चर्चेत दोन्ही बाजूंनी मांडलेल्या मुद्द्यांच्या गुणवत्तेचा विचार केल्यास मात्र चर्चेच्या उपयुक्ततेच्या मर्यादा जाणवू लागतात. परखड शब्दांमध्ये चर्चेचं मूल्यमापन केल्यास ही चर्चा म्हणजे 'शिळ्या कढीला ऊत आणण्या'चा प्रयत्न होता. इतिहासाच्या पार्श्वभूमीवर 'Deja vu' वाटावी अशी ती चर्चा होती.

देव अस्तित्वात नसेल तर आपलं नियमबद्ध जग किंवा विश्व कोणी बनवलं ? देवाने विश्वाला बनवलं असेल तर देवाला कोणी बनवलं ? देव नसेल तर काय नैतिक आणि काय अनैतिक हे कुठल्या आधारावर ठरवावं? सर्वज्ञ, सर्वशक्तिमान देव अस्तित्वात आहे तर जगात वाईट गोष्टी का घडतात? देव वाईट गोष्टी का थांबवत नाही? अशा प्रकारच्या मुद्द्यांवर या वादविवादात ऊहापोह घडला. देवाच्या अस्तित्वाबद्दलच्या वादविवादांना हजारो वर्षांची परंपरा आहे. अशा चर्चामध्ये वर दिलेल्या मुद्द्यांचा हमखास उल्लेख होतो. जगभरातील प्राचीन संस्कृतींतील तत्त्वज्ञांनी या प्रश्नांचा उल्लेख केला आणि त्यावर मत व्यक्त केलं. अडीच हजार वर्षांपेक्षा जुनं, ऋग्वेदातील 'नासदीय सूक्त' (सृष्टि से पहले सत् नहीं था, असत् भी नहीं.) यातील काही प्रश्नांवरच आधारित आहे. थोडक्यात, ज्या मार्गावरून जावेद अख्तर आणि मुफ्ती शमाइल नदवी गेले, ती वाट जुनीच आहे. या मार्गावरील विविध टप्प्यांना इतिहासातील कित्येक तत्त्वज्ञांनी आणि विचारवंतांनी अनेकदा भेट दिली आहे. ठरलेल्या मार्गावर ठरलेल्या पद्धतीनेच वाटचाल केल्यास नव्या ठिकाणी कसे पोहोचणार? नव्या ठिकाणी पोहोचायचं असेल तर एक तर मार्ग तरी बदलावा लागेल किंवा वाटचालीची पद्धत तरी! या चर्चेतून नवं काही निघालं नाही; कारण यात एका महत्त्वाच्या घटकाचा अभाव होता.

या मूलभूत घटकाच्या अभावी घडलेली चर्चा 'अळणी' ठरली.

डॉ. जयंत नारळीकरांनी 'The Scientific Edge' या पुस्तकात एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे. 'एकविसाव्या शतकात मानव प्रजातीसमोरील महत्त्वाच्या समस्या' या विषयावर एक आंतरराष्ट्रीय विचारपरिषद सुरू होती. नारळीकरांसहित जगभरातील विचारवंत या परिषदेत सहभागी होते. यात पर्यावरणाचा प्रश्न, लोकसंख्या वाढ, अन्नसुरक्षा व इतर महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा झाली. जगभरातील विचारवंतांनी यावर वेगवेगळे मुद्दे मांडले. यासंदर्भात नारळीकर लिहितात- 'ही सगळी चर्चा ऐकताना मला एका महत्त्वाच्या घटकाचा अभाव प्रकर्षाने जाणवत होता. जणू काही माझ्यासमोर जेवणासाठी पंचपक्वानांनी सजलेलं ताट होतं; पण त्या ताटातील पदार्थांना चव नव्हती. कारण जेवणात चुटकीभर मिठाचा अभाव होता.' हे मीठ म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन ! त्याशिवाय जगासमोरील समस्या नीट समजून घेता येत नाहीत आणि त्यांची उत्तरेदेखील शोधता येत नाहीत. 20 डिसेंबरला झालेल्या वादविवादात मुफ्ती नदवी यांनी स्वतःची बाजू मांडताना अगदी सुरुवातीलाच काही पूर्वअटी घातल्या. त्यातील पहिली अट म्हणजे वादविवादात 'विज्ञानाचा वापर केला जाणार नाही. 'विज्ञान हे निसर्गबद्ध किंवा भौतिक वास्तवाचा शोध घेतं. देव हा भौतिक वास्तवाच्या पलीकडे आहे, निसर्गाचे नियम देवाला लागू पडत नाहीत. त्यामुळे देव आहे की नाही याचं उत्तर विज्ञान देऊ शकत नाही.' असं स्पष्टीकरण मुफ्ती नदवी यांनी दिलं. दुर्दैवाने, या पूर्वअटीला जावेद अख्तर यांनी आक्षेप घेतला नाही. देवाचा विषय विज्ञानाच्या कार्यक्षेत्रात येत नाही, हा युक्तिवाद क्षणभर मान्य केला तरी चर्चेत वास्तवासंदर्भातील ज्या मुद्द्यांचा उल्लेख झाला, त्यांतील अनेक मुद्दे हे विज्ञानाच्या मूलभूत संशोधनाचा भाग आहेत. शेकडो वर्षांपासून उल्लेख होणाऱ्या 'फ्री विल', 'नैतिकता' यांसारख्या मुद्द्यांचा नवा अन्वयार्थ लावण्याची संधी होती. ती विज्ञान नाकारल्यामुळे हुकली. विज्ञानाच्या आधारे या चर्चेला नवं वळण कसं देता आलं असतं ते आता बघू-

जगात युद्धं, बलात्कार यांसारख्या वाईट गोष्टी का घडतात याचं स्पष्टीकरण देताना मुफ्ती नदवी यांनी 'फ्री विल'चा उल्लेख केला. म्हणजे देव माणसाला चांगले किंवा वाईट निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देतो. त्या निर्णयांचे परिणाम मात्र जिवंतपणी किंवा आत्म्याला मेल्यानंतर भोगावे लागतात. इथे 'फ्री विल' आणि आत्म्याचं अस्तित्व गृहीत धरलं आहे. 'फ्री विल' अस्तित्वात असते का? हा गेल्या काही वर्षांपासून न्यूरोसायन्समधील संशोधनाचा विषय आहे. या संशोधनानुसार असं लक्षात येतं की, माणसाला वरवर वाटतं तितकं निर्णयस्वातंत्र्य नसतं. हार्मोन्सचा वर्तनावर आणि जीन्स (Genes) चा हार्मोन्सवर प्रभाव पडतो. जन्माला आलेलं बाळ मोठेपणी कसं वागेल यावर जीन्सचा लक्षणीय प्रभाव पडतो. त्याशिवाय, बालपणीचे अनुभव, कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती यांचादेखील मोठा प्रभाव पडतो. या सगळ्या घटकांनी व्यक्तीचं वर्तन ठरतं, ती व्यक्ती कुठल्या प्रकारचे निर्णय घेईल हेदेखील ठरतं. म्हणजे 'फ्री विल'देखील खऱ्या अर्थाने 'फ्री' किंवा स्वतंत्र नसते. बलात्कार करणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत हार्मोनल आजाराची पार्श्वभूमी असू शकते. एखाद्या गाडीचा ब्रेक खराब झाला तर तिचा जसा अपघात होतो तसे मानसिक आजार किंवा विकृती असलेल्या व्यक्तीच्या हातून गुन्हा घडू शकतो. 1966 मध्ये अमेरिकेत चार्ल्स व्हिटमन नावाच्या व्यक्तीने अंधाधुंद गोळीबार करून अनेक व्यक्तींचा जीव घेतला. व्हिटमनला थांबवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. व्हिटमनचं जेव्हा शवविच्छेदन करण्यात आलं तेव्हा असं लक्षात आलं की, व्हिटमनच्या मेंदूत गाठ आली होती. या गाठीमुळे व्हिटमनच्या अमिग्डाला (amygdala) भागात विकृती निर्माण झाली होती. अमिग्डाला भागाचा प्रभाव राग, भीती यांसारख्या भावनांवर पडतो. त्यामुळे व्यक्तीची आक्रमकता वाढते. मेंदूतील, हार्मोन्समधील विकृतीमुळे माणसाचं वर्तन बदलल्याची अशी अनेक उदाहरणं आहेत. या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थाने 'फ्री विल' नसलेल्या माणसाच्या हातून घडणाऱ्या वाईट घटनांचा काय अर्थ लावावा ? हा प्रश्न आस्तिकांसाठी महत्त्वाचा आहे तसा तो नास्तिकांसाठीही आहे. कारण गुन्ह्यांचा न्यायनिवाडा करताना, शिक्षा ठरवताना या घटकांचा विचार करावा लागतो. एकाच गुन्ह्यासाठी मानसिक आजार असलेल्या आणि नसलेल्या व्यक्तींना वेगवेगळी शिक्षा असते.

देव माणसाला 'फ्री विल' देतो आणि त्यानुसार माणसाच्या चांगल्या-वाईट वर्तनाचा निवाडा करतो असा युक्तिवाद मुफ्ती नदवी यांनी केला. दुसरीकडे माणसाच्या वर्तनामागे जेनेटिक वारसा, मानसिक आरोग्य, लहानपणीची परिस्थिती, सामाजिक परिस्थिती अशी अनेक कारणे असतात हे विज्ञान सांगतं. शारीरिक, मानसिक आरोग्याचे प्रश्न सोडवणे, सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे हा ऐहिक कृतीचा भाग आहे. ऐहिक घटकांमध्ये बदल करून व्यक्तींना वाईट कृतींपासून परावृत्त करणं शक्य आहे. 'फ्री विल'बद्दलच्या चर्चेत या गोष्टींचा विचार व्हायला हवा. आता नैतिकतेच्या विषयाकडे वळू.

देवामुळे माणसाला काय नैतिक आहे, काय नाही हे कळतं असा युक्तिवाद मुफ्ती नदवी यांनी मांडला. दुसरीकडे नीतिमत्ता ही मानवी संकल्पना आहे, निसर्गात नीतिमत्ता नसते. सामाजिक जीवन चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी माणसं परस्पर संमतीने काही नियम ठरवतात. या नियमांनुसार नैतिकता ठरते असा युक्तिवाद जावेद अख्तर यांनी मांडला. ज्यांचा देवाच्या अस्तित्वावरच विश्वास नाही त्यांना 'देव नीतिमत्ता शिकवतो' हे सांगण्यात किती शहाणपण आहे याबद्दल मुफ्ती नदवी यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. त्या तुलनेत जावेद अख्तर यांचा युक्तिवाद सरस आहे; पण तोही पूर्णपणे बरोबर नाही. निसर्गात अनेक प्रजातींमध्ये परस्पर सहयोग आढळतो. कुठलं वर्तन योग्य आहे, कुठलं नाही याचे अलिखित नियम आढळतात. हे वर्तन उत्क्रांतीतून घडलेलं आहे. 'गेम थिअरी'च्या आधारे या वर्तनाला समजून घेता येतं.

विसाव्या शतकात उदयाला आलेली गेम थिअरी ही ज्ञानशाखा मानवी संबंधातील कुठली धोरणे, डावपेच अधिक योग्य ठरतात हे शोधायला मदत करते. प्राण्यांचं विशिष्ट वर्तन समजून घेण्यासाठीदेखील गेम थिअरी वापरता येते. उदाहरणार्थ, माकडांच्या प्रजातींमध्ये एकमेकांशी पाठ खाजवण्याचं वर्तन दिसून येतं. एकमेकांची पाठ खाजवून माकडं किडे, कचरा वगैरे काढतात. जितका वेळ माकड दुसऱ्या माकडांची पाठ खाजवण्यात घालवतं तितका वेळ अन्न शोधता येत नाही. त्यामुळे काही माकडं स्वार्थीपणे स्वतःची पाठ खाजवून घेतील, दुसऱ्याची खाजवायला मात्र टाळाटाळ करतील. अशा फसवणूक करणाऱ्या माकडांना शिक्षा देण्यात येते. त्यांची पाठ खाजवणं इतर माकडं बंद करतात. हे वर्तन गेम थिअरीमधील मॉडेल्सच्या आधारे समजून घेता येतं. गेम थिअरीमधील मॉडेल्स उत्क्रातींमध्ये कुठलं वर्तन दीर्घ काळासाठी उपयुक्त ठरतं (Evolutionarily Stable Strategy) हे दाखवतं. बायबलमध्ये 'Do unto others as you would have them do unto you.' असा नीतिमत्तेचा नियम आहे. याला 'गोल्डन रूल' म्हटलं जातं. याच प्रकारचं वर्तन उत्क्रातीमध्ये उपयुक्त असल्याचं गेम थिअरीमधूनदेखील दिसून येतं. माकडांना देव नीतिमत्ता शिकवतो इतका धाडसी दावा करायला मुफ्ती नदवीदेखील धजावणार नाहीत. कारण तसं म्हटलं तर माकडांना 'आत्मा' असतो का आणि त्या आत्म्याचं काय होतं याचं उत्तर मुफ्ती नदवी यांना शोधावं लागेल. तसेच निसर्गात नीतिमत्ता नसते असं जावेद अख्तर यांच्या म्हणण्याची मर्यादा इथे लक्षात येते. त्याऐवजी ज्या प्रकारचं वर्तन हे उत्क्रातींमध्ये उपयुक्त आहे किंवा हानिकारक नाही ते नीतिमान ठरतं असा निसर्गातील नीतिमत्तेचा अर्थ लावता येईल. समलैंगिक संबंध एके काळी बहुतांश धर्मामध्ये अनैतिक मानल्या जायचे. आजच्या काळात विकसित समाजांमध्ये ते अनैतिक मानल्या जात नाहीत. या बदलाचा अर्थ दैवी प्रेरणेच्या गोष्टीत शोधता येत नाही. विज्ञान समलैंगिकतेची कारणं सांगतं. तसेच निसर्गात हजारो प्रजातींमध्ये समलैंगिक संबंधांची उदाहरणे आढळतात हेदेखील दाखवतं. या पार्श्वभूमीवर समलैंगिकता अनैतिक नाही हे लक्षात येतं. नैतिकतेच्या चर्चेत याची जाणीव ठेवायला हवी.

देव नाही तर विश्वाची निर्मिती कोणी केली, हा वादविवादातील मुफ्ती नदवी यांचा आवडता मुद्दा होता. 'आपण समुद्रातील एखाद्या बेटावर पोहोचलो आणि तिथे आपल्याला छानसा चेंडू सापडला, तर तो चेंडू इथे कोणी आणला, किंवा कोणी बनवला असा प्रश्न पडतो. एखाद्या छोट्याशा चेंडूची आपण निर्मात्याशिवाय कल्पना करू शकत नाही, तर विश्वाची कशी करावी?' असा मुद्दा मुफ्ती नदवी यांनी मांडला. हा युक्तिवाद खूप जुना आहे. सर्व धर्मांच्या मिथककथांमध्ये देवाने विश्वाची निर्मिती कशी केली याच्या गोष्टी आढळतात. वेगवेगळ्या धर्मांचे लोक एकाच जगात राहतात. मग धर्मानुसार विश्वाच्या निर्मितीच्या कथा विभिन्न आणि काहीशा परस्पर विरोधी का आहेत याचा मुफ्ती नदवी यांनी विचार करायला हवा. 'विश्वाची निर्मिती नेमकी कशी घडली हे माहीत नाही. देव नेहमीच अस्तित्वात होता असं जर मानता येतं, तर विश्व नेहमीच अस्तित्वात होतं असं का मानता येणार नाही?' अशा प्रकारचा युक्तिवाद जावेद अख्तर यांनी मांडला. हा युक्तिवाद प्रामाणिक आणि निगर्वी आहे. ऋग्वेदातील नासदीय सुक्तात या प्रश्नाचं उत्तर देवालाही ज्ञात नाही असं म्हटलेलं आहे -

'सृष्टि ये बनी कैसे, 
किससे 
आई है कहां से। 
कोई क्या जानता है, 
बता सकता है? 
देवताओं को नहीं ज्ञात 
वे आए सृजन के बाद।'

देवाने विश्व बनवलं असं म्हटलं की, निर्मितीचा पूर्णपणे प्रश्न सुटला असं म्हणणं हे उथळपणाचं, वैचारिक आळशीपणाचं लक्षण आहे. असा आळशीपणा हजारो वर्षांपूर्वी रचलेल्या ऋग्वेदात केलेला नाही. आताच्या काळात तो करणं अधिकच अक्षम्य ठरतं कारण आजच्या काळात विश्वाबद्दल, जगाबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे. जीवनासाठी आवश्यक असलेली मूलद्रव्ये ताऱ्यांच्या गर्भात कशी निर्माण होतात हे विज्ञान सांगतं. एकपेशीय सूक्ष्म जीवांपासून सुरुवात होऊन मानव प्रजातीपर्यंतची जैवविविधता कशी निर्माण झाली हे उत्क्रांतीचा सिद्धान्त सांगतो. रिकाम्या अंतराळाच्या पोकळीत ऊर्जेचे तरंग कसे व का उमटतात हे क्वांटम मॅकेनिक्सचा सिद्धान्त सांगतो. आपलं विश्व एकमेव नसून अशी अनेक विश्वे असण्याची शक्यता आहे हे आधुनिक विज्ञानातील सिद्धान्तातून लक्षात येतं. या सगळ्याची सुरुवात कशी झाली ते ज्ञात नाही. उत्क्रांतीच्या सिद्धान्तातील सर्वांत महत्त्वाची शिकवण अशी की, अगदी सोप्या वास्तवापासून सुरुवात होऊन हळूहळू गुंतागुंतीचं, समृद्ध वास्तव घडू शकतं. हेच विश्वाच्या बाबतीतही लागू पडतं. विश्वाच्या विस्ताराची क्रिया किंवा 'Big Bang' ची सुरुवात 'इन्फ्लेटॉन' नावाच्या क्वांटम फील्डमधील सूक्ष्म बदलांमुळे (Inflation quantum fluctuations) झाली, असं मानलं जातं. याच्या तांत्रिक तपशिलांत आपण जाणार नाही. मुफ्ती नदवी यांना विश्वाच्या निर्मितीबद्दल समजून घेण्याचं प्रामाणिक कुतूहल असेल तर त्यांनी याबद्दल वाचायचा प्रयत्न करायला हवा. विज्ञानाला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. पण हजारो वर्षांपूर्वी मांडलेल्या, शिळ्या झालेल्या मुद्द्यांचं एकाच एक पद्धतीने रवंथ करण्यात रममाण होणं शहाणपणाचं नक्कीच नाही. ज्याला वास्तव समजून घेण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्याने वैज्ञानिक दृष्टीकोन नाकारणं घोडचूक ठरतं.

कार्ल पॉपर हे विसाव्या शतकातले प्रसिद्ध विज्ञानतत्त्वज्ञ आहेत. त्यांनी विज्ञानाच्या बाबतीत 'थिअरी ऑफ फॉल्सिफिकेशन'ची मांडणी केली होती. यानुसार 'चांगला वैज्ञानिक सिद्धान्त हा खोटा ठरवणं शक्य असतं' असं ते म्हणाले. याचा अर्थ समजून घेऊ. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त मांडला. या सिद्धान्तानुसार सूर्यमालेतील ग्रहांच्या कक्षा कशा असतील ते कळालं. न्यूटनचा सिद्धान्त बरोबर असेल तर सैद्धांतिक पद्धतीने शोधलेल्या कक्षा आणि त्यांचं प्रत्यक्ष निरीक्षण हे एकमेकांसोबत जुळायला हवं. जर सैद्धांतिक कक्षा आणि वास्तवातील कक्षा जुळली नाही तर न्यूटनचा सिद्धान्त चुकीचा आहे असं म्हणावं लागेल. उत्क्रांतीच्या सिद्धान्तात प्रजातींच्या उत्क्रांतीचा घटनाक्रम दिला आहे उदाहरणार्थ, समुद्रातील माशांची उत्क्रांती सरपटणाऱ्या प्राण्यांच्या आधी झाली आहे, सस्तन प्राण्यांची उत्क्रांती ही नंतरच्या काळात झाली आहे. या घटनाक्रमानुसार कुठल्याही सस्तन प्राण्याचं जीवाष्म हे 32 कोटी वर्षांपेक्षा जुनं असायला नको. कारण या काळात सरपटणाऱ्या प्राण्यांची उत्क्रांती सुरू झाली होती. थोडक्यात, विज्ञानात एखादी गोष्ट चुकीची ठरवण्याची संधी असते. जेव्हा कोणी 'देव अस्तित्वात आहे की नाही?' यावर वाद‌विवाद करतात, तेव्हा काय घडलं तर देवाचं अस्तित्व नाकारता येईल यावर त्यांचं एकमत असायला हवं. आणि हे ठरवण्याचा निकष ऐहिक असायला हवा, म्हणजे तो काटेकोरपणे पडताळून बघता येईल. 'देवाला कुठलेही निकष लागत नाहीत. देवाचं अस्तित्व पडताळून बघता येत नाही' असं म्हटलं तर 'देवाचं अस्तित्व आहे की नाही?' हे प्रामाणिकपणे शोधण्याचा मार्ग बंद होतो.

या लेखाच्या सुरुवातीला मी खलील जिब्रान यांच्या दोन विद्वानांच्या गोष्टीचा उल्लेख केला आहे. या गोष्टीमुळे आस्तिक आणि नास्तिक विचार यांच्यात वैचारिक पातळीवर समतोल असतो असं वाटू शकतं. विज्ञान नाकारणारे कोणी नास्तिक असतील तर ते अपवादात्मक ठरावेत. विज्ञान नाकारणारे कट्टर धार्मिक लोक मात्र जगभर आढळतात. अगदी स्वतःला बुद्धिप्रामाण्यवादी आस्तिक समजणारे मुफ्ती नदवी विज्ञानाला नाकारण्यात धन्यता मानतात. मुफ्ती नदवी यांचा इतिहासाचा अभ्यासही तोकडा आहे असं जाणवतं. कारण वादविवादात जावेद अख्तर यांनी धर्माने विज्ञानाला विरोध करण्याचा उल्लेख केला तेव्हा 'धर्म विज्ञानाच्या विरोधात नाही' असं मुफ्ती नदवी म्हणाले. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं म्हटल्यामुळे पोपने गॅलिलिओला शिक्षा दिली होती ही विकसित देशांमधील शाळकरी मुलांसाठी सर्वसामान्य माहिती आहे. आजही डार्विनच्या उत्क्रातीच्या सिद्धान्ताला कट्टर धार्मिक लोक विरोध करतात हे विसरणं 'विद्वानाला' शोभणारं नाही.

देव अस्तित्वात आहे की नाही? 'आत्मा' आहे का ? स्वर्ग, नरक असतो का? मृत्यूनंतर काय होतं? विश्व कसं निर्माण झालं? कुठल्याही विचारी माणसासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. हजारो वर्षांपासून तत्त्वज्ञांनी या प्रश्नांवर विचार केला आहे. गेल्या काही शतकांमध्ये विज्ञानामुळे वास्तवाबद्दलच्या ज्ञानात लक्षणीय भर पडली. प्राचीन काळात वर उल्लेख केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यात धार्मिक अधिसत्तेची एकशाही होती. आज विज्ञान यातील अनेक प्रश्नांची उत्तरे देत आहे. ज्यांचं पोट धर्मावर अवलंबून आहे त्यांना हे खचितच आवडणारं नाही. मात्र, ज्यांना वास्तव समजून घेण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांना विज्ञानाचा मार्ग नवी दिशा दाखवतो आहे. विज्ञानाच्या मार्गावर चालण्यासाठी नास्तिक असण्याची कुठलीही पूर्वअट नाही. डोळसपणे अज्ञाताच्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणं, मनाला प्रश्न पडू देणं आणि आधीच विज्ञानाला नाकारण्याचा दुराग्रह न करणं इतकंच अपेक्षित आहे. कारण याच वाटेवर जुन्या प्रश्नांची नवी उत्तरे मिळण्याची आशा आहे.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी