मी माझ्या आजूबाजूच्या लोकांचं दुःख पाहिलं आहे. माझ्या वयाचे अनेक तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, पण त्यांचं सिलेक्शन होत नाही. मी त्यांच्याशी बोलते, त्यांचं दुःख समजते. मी काही हवामहालात राहत नाही, जमिनीवर आहे. लोकांशी संलग्नदेखील. त्यामुळे मला सामान्य लोकांचे प्रश्न माहिती आहेत. आणि मी स्वतः स्त्री आहे, त्यामुळे महिलांचे प्रश्न मला स्वतःहून समजतात. हे सारं माझ्या गाण्यात अपोआप प्रकट होत जातं.
2020 च्या बिहारच्या निवडणूक काळात 'बिहार में का बा?' हे भोजपुरी गाणं चांगलंच गाजलं. त्या गाण्यात 'बिहारमध्ये काय आहे?' असा प्रश्न विचारत बिहारची दुरवस्था, पूरस्थिती, बेरोजगारी अशा विविध मुद्द्यांवर टोकदार प्रहार करण्यात आला होता. लोकांच्या मनात असलेली खदखद त्या दोनेक मिनिटांच्या गाण्यातून व्यक्त झाली. ते गाणं लोकांनी उचलून धरलं आणि चांगलंच व्हायरल केलं. तोवर उडत्या चालीची, द्विअर्थी शब्दांची आणि स्त्रियांचं लैंगिक वस्तुकरण करणारी भोजपुरी गाणीच लोकप्रिय होती. त्या गदारोळात नेहा सिंह राठौर ही युवती समोर आली आणि तिने भोजपुरी गाण्यांचा लहेजाच बदलून टाकला. साडी, डोक्यावर पदर, माथ्यावर ठसठशीत लाल रंगातील बिंदी अशा पारंपरिक वेशात ती आली खरी, पण तिचा विचार पारंपरिक अनुनयाचा नव्हता. खेरीज, त्यावर तार्किक प्रश्न करण्याचा, प्रखर टीका करण्याचा विचार होता. त्यामुळेच 2020 मध्ये अवघ्या तेविसाव्या वर्षी तिने लिहिलं आणि गायलं,
'बिहार में का बा?
कोरोना से बीमार बा, बाढ़ से बदहाल बा।
भरी जवानी में मंगरुवा चलत ठेगुरवा चाल बा।
अरे का बा? बिहार में का बा?
15 साल चचा रहलन, 15 साल पप्पा।
तबो ना मिट बेरोजगारी का ठप्पा।
जब जब सइया होले मोर अरब के रवाना,
तब तब जियरा खोजे एहो इहा कारखाना।
बोला का बा।'
या गाण्याने सोशल मीडियावर धूम केली, ते त्यातील उघड राजकीय टीकेमुळे. कोरोना, सततची पूरस्थिती, बेरोजगारी, स्थलांतर, त्यामुळे महिलेची होणारी तगमग आणि त्याला जबाबदार असणारे राजकारणी. सारं काही त्या गाण्यात होतं. ती लोकभावना होती. लोकांच्या आतला आक्रोश. कोरोनाच्या त्याच 2019 च्या वर्षात नेहालाही स्वतःचा आवाज सापडला होता. एकदा परखड प्रश्न वा टीका करून गप्प बसणं हा तिचा स्वभाव नव्हता. त्यामुळेच मागील सहा वर्षांपासून ती राजकीय-सामाजिक विषयांवर सातत्यानं गात आहे. त्यात परिस्थिती अन् सरकारवर उघड टीका, टोकदार भूमिका आणि तिचा स्पष्ट विचार दिसत राहिला. 'बिहार में का बा' (2020), नंतर तिची 'यूपी में का बा?' (2022), 'यूपी में का बा? सत्र-2' (2023), आणि 'एमपी में का बा?' (2023) ही गाणी सोशल मीडियावर खूप लोकप्रिय झाली.
नेहा बिहारमधील जंदाहा गावची. तिने 2018 मध्ये कानपूर विद्यापीठातून बी.एस्सी. पूर्ण केलं. मात्र त्या क्षेत्रात तिचं मन रमलं नाही. स्वतःची वाट शोधताना तिला भोजपुरी लोकगीतांनी आकृष्ट केलं. तिने 2019 पासून भोजपुरी गीतकार, संगीतकार आणि लोकगायिका म्हणून स्वतःच्या कारकिर्दीला सुरुवात केली. राजकारण, राजकीय व्यक्ती आणि नागरी प्रश्नांवरची टीकात्मक गाणी ती फेसबुक, इन्स्टाग्राम आणि द्विटरवर पोस्ट करू लागली. मे 2020 मध्ये तिने स्वतःचं यू-ट्यूब चॅनेल सुरू केलं. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा मार्ग तिला जवळचा वाटला. या तिच्या NSR नावाच्या यू-ट्यूब चॅनेलच्या डिस्क्रीप्शनमध्ये तिची भूमिकाही वाचायला मिळते.
स्पष्ट आणि निर्भयपणे तिने तिची भूमिका स्पष्ट केलीये. तिच्या यू-ट्यूब चॅनलवर मागच्या पाच वर्षांतील 750 व्हिडिओ आहेत आणि 17.3 लाख सब्सक्रायबर्स आहेत. तिच्या परखड भूमिका असणाऱ्या या गाण्यांमधून, स्थानिक नेत्यांपासून पंतप्रधानांपर्यंत आणि उद्योगपतींपासून बड्या बड्या असामीपर्यंत कुणीही सुटलेलं नाहीये. त्यामुळे तिचा आवाज दाबण्याचाही प्रयत्न सुरू आहे. तरीही, ती धीटपणे लिहीत गात आहे. ती केवळ कंटेंट निर्माण करत नाहीये, तर तिच्या भूमिकांमधून ती तरुणांना प्रश्न करते, विचार करण्यास उद्युक्त करतेय आणि स्वतःच्या धाडसी जगण्याने प्रेरितही करते आहे.
प्रश्न : लोकगीत, संगीताच्या क्षेत्रात येण्यापूर्वी तुझा प्रवास कसा होता, तुझं बालपण, जडणघडण कुठे झाली ? थोडक्यात लहानपणीच्या नेहाविषयी सांग.
- बिहारमध्ये भबुआ नावाचा एक जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात जंदाहा नावाच्या एका छोट्याशा गावची मी रहिवासी आहे. संगीताच्या कारकिर्दीपूर्वी माझं आयुष्य अगदी सामान्य मुलांप्रमाणे होतं शाळेत जाणं, अभ्यास करणं, खेळणं, थोडा अभ्यास, थोडं खाणं-पिणं, मित्र-मैत्रिणींसोबत फिरणं. आणि हो, मला आमच्या बागेत जाऊन आंबे तोडायला, शहातूतावर दगडं मारायला फार मज्जा यायची. मी लहानपणापासूनच खूप खोडकर आहे. माझ्या कुटुंबात वडील, आई, एक मोठा भाऊ आणि एक मोठी बहीण आहे. मी सगळ्यात लहान आहे. माझी आई गृहिणी आहे, वडील एका खासगी कंपनीत आर्किटेक्ट आहेत. माझा भाऊ लष्करात आहे, आणि बहीणदेखील गृहिणी आहे. गावातल्या मुलांचं बालपण जसं जातं, तसंच माझंदेखील सर्वसामान्यपणे बालपण गेलं. अभ्यासात हुशार होते, पण बी.एसस्सी. करताना वाटत होतं मी हे काय आणि का शिकतेय. पण प्रवेश घेतलाय म्हणून रोज उठून कॉलेज करणं सुरू होतं. 2018 मध्ये पदवी घेतल्यानंतर मी गाण्याकडे, लोकसंगीताकडे वळले.
प्रश्न: 2018 मध्ये असं काय झालं की तू लोकगीतांकडे वळलीस? त्यातून राजकीय व्यंगकार म्हणून प्रारंभ केलास?
- 2018 मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर, बी. एड. कर आणि शिक्षक हो, असा धोशा माझ्या घरी सुरू झाला. माझ्या कुटुंबात फार मोठी शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. त्यामुळे कुणी असं सांगणारं नव्हतं की, स्पर्धा परीक्षेची तयारी कर, एखाद्या मोठ्या डिग्रीसाठी प्रयत्न कर, किंवा काही टेक्निकल डिग्री घे. उलट मी कळत्या वयापासून माझ्या घरातल्या स्त्रियांना बी. एड करताना पाहत होते. माझ्या वहिनी, आत्या बी.एड. करतायत, लग्नाला दहा वर्षं झालेल्या नातेवाईक स्त्रिया बी.एड. करताहेत. त्यांना मुलं झाली आहेत. त्यांचा अभ्यासाशी कोणताही संबंध उरलेला नव्हता. पण बी.एड. एकदम चालू आहे. त्यामुळे मला वाटायचं की बी.एड. करणारे काही विशेष करू शकत नाहीत. अर्थात ही माझी वैयक्तिक भावना होती. पदवी होऊन घरीच होते तेव्हा सगळे हा एकच पर्याय सांगत होते. माझा दादा म्हणायचा, "तू अभ्यास करणार नाहीस, तर तुझं पुढे कसं होणार? नोकरी कशी मिळणार ? बी.एड. करून शिक्षक हो." मला काय करायचं हे ठाऊक नव्हतं, पण काय करायचं नाही हे एकदम पक्कं झालं होतं.
लहानपणी काही वेळा लोकांनी मला सांगितलं होतं की, "तू चांगलं गातेस, गायनातही प्रयत्न करू शकतेस." पण मी ती गोष्ट कधी गांभीर्याने घेतली नव्हती. फक्त मनोरंजन म्हणून गात होते. पण 2018 नंतर, त्या लहानपणीच्या आठवणी उफाळून आल्या. मी संगीत शिकू या असा विचार करून कलकत्त्याला गेले. हार्मोनियम आणि शास्त्रीय संगीत शिकण्याचा प्रयत्न केला. पण माझ्या बंगाली शिक्षकाचा आलाप ऐकून मला हसू यायचं. तसं वेड्यागत हसण्याला काही अर्थ आणि कारणही नव्हतं. मग वाटलं, इथेही माझं काही खरं नाही. माझ्या जगण्याचं ध्येय मला समजत नव्हतं. मग मी परत गावी आले.
गावी आल्यावर मी पाहिलं, गावातील एका रस्त्याचा वापर लोक शौचालय म्हणून करायचे. रस्ता घाण आणि दुर्गंधीयुक्त होता. त्या रस्त्यावरून मला अचानक काही शब्द सुचले आणि मी एक गीत लिहिलं, "हमरा प्रेम के निशानी दिखाई द पिया, शौचालय बनाई द पिया ना." याचा अर्थ एक स्त्री तिच्या नवऱ्याला म्हणतेय, जर तुझं माझ्यावर प्रेम असेल, तर त्या प्रेमाची काही तरी भेट दे आणि ती भेट म्हणजे शौचालय बांधून दे, मला उघड्यावर जायचं नाही. मी ते गीत फेसबुकवर अपलोड केलं. माझ्याकडे सोशल मीडियाच्या नावाने फक्त फेसबुकच होतं. त्यावर माझ्या पोस्टला चाळीस-पन्नास लाईक आणि दोन-तीन कमेंट यापलीकडे माझी मजल नव्हती. अकल्पितपणे तिथून माझा प्रवास सुरू झाला.
लोकांना हे गाणं आवडेल याची मला अजिबात कल्पना नव्हती. लोक कमेंट्समध्ये वेगवेगळे मुद्दे सुचवू लागले बेरोजगारी, शिक्षणाची दुरवस्था, महिलांच्या समस्या. त्यावर गाणं मागत होते. मग मला काही तरी 'सापडल्या सारखं झालं. मी खूप विचार करून, स्ट्रॅटेजी ठरवून लोकगीतांच्या क्षेत्रात आले नव्हते, न राजकीय-सामाजिक टीका करण्याबाबत जागरूक होते. मला जे दिसत होतं त्यावर बोलावसं वाटलं आणि त्यासाठी माझ्या हाताशी गाणं आणि सोशल मीडिया होता. फक्त मी सातत्य ठेवून काम सुरू केलं आणि त्याला प्रतिसाद मिळत गेला.
प्रश्न : तू सांगितलंस, लहानपणी तुझं गाण्यासाठी कौतुक व्हायचं. तर तू शाळेत किंवा इतर ठिकाणी परफॉर्म केलं होतंस का? गाणं लहानपणापासूनच तुझ्या हृदयाजवळ होतं का?
- हो, हो, अगदीच. गाणं बिलकुल माझ्या हृदयाजवळच होतं. एक तर लहानपणी मी माझ्या आईला गाताना पाहिलंय. ती भोजपुरीत खूप सुरेल गाते. लहानपणी तिला लग्न मांडवात गाताना पाहिलं-ऐकलं आहे. लग्न मांडवात वरपक्षाला, व्याही मंडळींना शिव्या दिल्या जातात. त्यांची छेड काढली जाते. त्या आशयाची गाणी असायची. आई हातवारे करून बिनधास्त ती गाणी माईकवरून गायची. ती मला खूप रंजक वाटायची. गाणी गातानाची तिची जिंदादिली, बेधडकपणा मला खूप आवडायचा. माझ्याकडे गाण्याची कला आणि प्रेम तिच्याकडूनच आलं असणार. पण मी कधी कुठल्या स्पर्धेसाठी गायले नाही.
मला आठवतं, गावात दसऱ्याच्या मेळ्यावेळी मोठ्या माणसांनी एकदा मुलामुलांमध्ये गाण्याची स्पर्धा लावली होती. मी तिथे गायले आणि पहिली आले. मी चांगलं गाते, लोक माझं कौतुक करतात, हे मला कळायचं. पण त्याकडे करिअर म्हणून पाहावं असा कधी विचार केला नव्हता.
प्रश्न : तुझ्या घरचे तुला बी.एड. करण्याविषयी सुचवत होते, भाऊदेखील तुझ्या नोकरीविषयी चिंता व्यक्त करत होता? मुलींचं शिक्षण, नोकरी या अनुषंगानं तुझ्या घरचं वातावरण कसं होतं?
- खूप सामान्य. मध्यमवर्गीय सामान्य घरात मुलींच्या शिक्षणाविषयी जी कथित मोकळीकता असते, तेवढीच होती. म्हणजे मुलींना शिकवणार, पण विशिष्ट पद्धतीने. विशिष्ट प्रकारच्या नोकरी करण्याची मुभा. असं चौकटबद्ध. बिहारमध्ये आजही पालकांना मुलींना शिक्षणासाठी बाहेर पाठवण्याची भीती वाटते. मुलगी बाहेर गेली तर बिघडेल. हॉस्टेलमध्ये जाईल तर तिथे कोणाशी तरी प्रेम किंवा लग्न केलं तर... यापेक्षा चांगलं आहे की तिला गावातच ठेवा. जास्त शिकवू नका. आता मी हे स्वतःची स्तुती केल्यासारखं होईल, पण मी अभ्यासात नेहमीच हुशार होते. माझे शिक्षक आणि माझ्या मित्र-मैत्रिणींना मी खूप शिकेन, प्रगती करेल असं वाटायचं. पण मला बाहेर जाऊन शिक्षण घेण्याची संधी मिळाली नाही. हुशार असूनही मला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी बाहेर पाठवलं नाही. माझ्या मोठ्या भावाला मात्र दिल्लीला पाठवलं होतं. गावाबाहेर जाऊन शिक्षण घ्यायचं म्हणून मी खूप रडले. पण त्यांना काही फरक पडला नाही. मुलींच्या दृष्टीकोनातून माझ्या घरचे फार पारंपरिक विचारांचे आहेत. मी गाणी म्हणू लागले, सोशल मीडियावर लोकांकडून दाद मिळू लागली, माध्यमांनी विचारपूस सुरू केली, तेव्हाही माझ्या भावाला हे काही आवडत नव्हतं. तो माझ्यावर कित्येक दिवस नाराज होता. 'फेसबुकवर गाणं टाकून मोठी होणारेस का?' अशी टिपण्णी केली. पण मी माझ्या कामावर/निर्णयावर ठाम राहिले. आज मी कुठल्याही मुलाखतीत माझ्या घरच्यांच्या वैचारिक मागासलेपणाविषयी सांगते तेव्हा माझी आई खूप नाराज होते. माझ्यावर चिडून म्हणते, 'तुला आता कशाची कमी आहे म्हणून जाऊन तू घरातल्या या गोष्टी सांगतेस ?' मीही तिला सांगते, 'त्या साऱ्या तुमच्या वागणुकीबद्दल आजही माझ्या मनात दुःख आहे आणि त्यावर प्रश्न आल्यावर माझ्या ओठांवर ते सहज येतं.' बरं जे एकदा सांगितलं ते पुन्हा कितीही वेळा विचारलं तरी तेच उत्तर येणार, फक्त त्यांना नाराज करायचं नाही म्हणून, 'माझे आई-वडील खूप सुधारणावादी होते' असं कसं म्हणणार? मी खोटी नाही का ठरणार? त्यांच्यात किंचित बदल झाला, पण तो मुलीने स्वतःला सिद्ध केल्यावर. तसं नसतं तर?
आजही बिहारमध्ये मुलींच्या अभ्यासाबाबत लोक जागरूक नाहीत. तिला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं जात नाही. आजही माझ्या चुलत बहिणी गावाबाहेर पडू शकत नाहीत. त्या अभ्यासात खूप हुशार आहेत. पण त्यांना बाहेर पडण्याची मुभा नाही. आता माझं आयुष्य सोशल मीडियामुळे बदललं.
प्रश्न : थोडक्यात, तू सहज म्हणून लिहिलेलं पहिलं गीत तुझ्या आयुष्याला कलाटणी देऊन गेलं, असं म्हणू शकतो...
- हो, नक्कीच. त्यानंतर मला दिशा मिळाली. आता काय करायचंय याची स्पष्टता आली. गोंधळ थांबला. रस्ते, पाणी, बेरोजगारी, महिलांच्या समस्या, शिक्षणातल्या अडचणी असे कित्येक विषय डोक्यात येऊ लागले आणि आता यावर सातत्याने लिहायचं आहे, गायचं आहे, हे समजू लागलं. डोक्याला एक खुराक मिळाला. आज एक गाणं लिहिलं, मग वर्षभराने गाणं लिहिलं असं ते प्रकरण नव्हतं. मी रोज काहीतरी लिहीत होते, गात होते, शेअर करत होते. सुरुवातीला जास्त व्ह्यूज येत नव्हते. पण मी निराश झाले नाही. मला व्ह्यूज किंवा शेअर्सची पर्वा नव्हती, मी फक्त माझं काम करत गेले.
प्रश्न: लोक जेव्हा कमेंट्समधून तुला अमुक विषयांवर, तमुक विषयावर लिहिण्यासाठी सांगू लागले, तेव्हा लोकांच्या मनात विविध नागरी प्रश्नांना घेऊन असंतोष आहे असं तुला जाणवत होतं का आणि ते तुझ्या माध्यमातून त्या प्रश्नांवर व्यक्त होऊ इच्छित आहेत असं वाटत होतं का?
- नक्कीच. मला अजूनही तसं वाटतं. सामान्य जनतेत सरकार, सरकारी धोरणं, नागरी प्रश्नांवर असलेली सरकारी उदासीनता यांबाबत खदखद आहे. आजही एखाद्या मॉलमध्ये किंवा रस्त्यावरून जाताना लोक मला भेटतात, तेव्हा ते हेच सांगतात, 'नेहा, आमच्या मनातही खूप प्रश्न आणि राग आहे, पण आम्ही सरकारी नोकरीत असल्याने बोलू शकत नाही' किंवा कुणी म्हणतं, 'आमच्यात ती हिंमत नाही.' काही लोक माझ्यासोबत फोटो काढतात, पण म्हणतात, 'मी हा फोटो अपलोड करू शकत नाही, कारण मला माझ्या नोकरीची चिंता आहे.' लोक भयभीत आहेत. लोकांमध्ये राग आहे, विशेषतः 2014 नंतर. सरकार बदललं तेव्हा लोक खूश होते. माझ्या वयाच्या मुला-मुलींचं सांगायचं तर त्यांना वाटलं, 'अच्छे दिन आ गये. आता नोकरी मिळणार, रोजगार मिळणार.' वर्ष दोन वर्षं लोकांनी वाट पाहिली. पण रोजगार नाही ना काही नाही. लोकांचा संयम सुटू लागला आणि आता तर 2025 पर्यंतही तीच परिस्थिती आहे. आज मी 28 वर्षांची आहे. आणि माझ्या बरोबरीच्या काही मुली आजही कुठलं ना कुठलं शिक्षण घेत आहेत, कोर्स करत आहेत, जेणेकरून नोकरी मिळेल. लोक सांगतात, आमच्याकडे बोलण्याची ताकद नाही किंवा काही तरी अगतिकता आहे. तुम्ही आमचा आवाज व्हा. आणि हीच मंडळी समर्थन देऊन बळ देतात.
प्रश्न : खुलेपणाने सत्तापक्षावर व्यंग/टीका करण्याची हिंमत तुला कुठून मिळते?
- आपण लोकशाही असलेल्या देशात राहतो, ही फार जमेची गोष्ट आहे. टीका करण्याचं साहस मला संविधानातून मिळतं. लोकशाही देशात प्रत्येकाकडे मोलाचे घटनात्मक अधिकार आहेत. हे अधिकार आपल्याला आपलं सरकार निवडण्याचा अधिकार देतात, तसेच त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकारही देतात. लोकांचं प्रेम आणि प्रोत्साहन यांमुळेदेखील मला बळ मिळतं. मग तुमचं माध्यम काहीही असू शकतं - कॉमेडी किंवा गीत किंवा आणखी काहीही. पण त्यातून तुम्ही कोणती गोष्ट सांगत आहात, कोणतं स्टेटमेंट करत आहात किंवा कशाचा विरोध नोंदवत आहात हे सगळं लोकांच्या समोर असतं. आणि जर ते तुमच्या पाठीशी नसतील तर तुमचं मनोधैर्य खचतं. पण प्रेम मिळालं, प्रोत्साहन मिळालं, तर अजून जास्त काम करण्याची प्रेरणादेखील मिळते.
प्रश्न : लोक ट्रोलही करतात. तेव्हा डगमगतेस का?
- ट्रोलिंग हे खूपच सुनियोजित पद्धतीनं होत आहे. काही लोक मला वैयक्तिकरीत्या पसंत करतात, पण त्यांच्या मते, त्यांना मजबुरीने मला ट्रोल करावं लागतं. मला याची गंमत वाटते. मी हे सत्य जाणते. म्हणून माझं मनोबल कधी कमी होत नाही. हे ट्रोल्स सुनियोजित आहेत, टास्क असल्याप्रमाणे काम करतात. माझ्या सोसायटीतही काही लोक मला भेटतात, म्हणतात, 'तुझं काम छान आहे, पण आम्ही RSS किंवा BJP शी जोडलेले आहोत, त्यामुळे कधी-कधी तुझी टीका करतो.' पण कोणीही मला प्रत्यक्षात भेटून असं म्हणालं नाही की, तू चुकीचं काम करतेस किंवा देशविरोधी आहेस. उलट, लोक मला म्हणतात, 'लोकशाहीत टीका करणं गरजेचं आहे, तू असंच काम करत राहा.'
प्रश्न : तू फक्त भाजपचीच नाही, तर बिहारच्या राज्य सरकारचीही टीका केली आहेस. कोणी तुझ्यावर अमुक पक्षाशी जोडले गेल्याचा आरोप केला आहे का?
- हो, तसे खूप आरोप होतात. पण मी ते फार मनावर घेत नाही. मी वेळोवेळी बिहारच्या सरकारवरही टीका केली आहे, जसं तेजस्वी आणि नीतिश यांच्या आघाडीच्या वेळीदेखील केली. मी अगदी अलीकडे बंगालच्या निवडणुकीवरही गायलं आहे. पण लोकांचा एक समज आहे की, मी फक्त यूपी किंवा बिहारवर गाते. कारण माझं 'यूपी में का बा' गाणं खूप व्हायरल झालं. मी बंगालवरही गायलं आहे, फक्त ते तितकं लोकप्रिय झालं नाही. त्यात माझी काय चूक ? मी माझं काम करते. लोकांच्या मनात आपल्याविषयी संशय निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपची ट्रोल आर्मी सतत करते. जे माझे चाहते आहेत, जे मला फॉलो करतात, त्यांना आपण नेमकं काय काय करतोय, कुणाकुणाला प्रश्न करतोय हे सारं ठाऊक असतं. ते मला समजून घेतात, पण ट्रोल्सना फक्त टीका करायची आहे. आणि लोकांचं लक्ष भरकटवायचं आहे.
प्रश्न : तू स्वतःला व्यक्त करण्यासाठी भोजपुरी भाषा का निवडली? भोजपुरीत बऱ्याचदा अश्लील गाणी असतात, आणि त्या भाषेची सध्या तीच ओळख निर्माण झाली आहे.
- मी भोजपुरी निवडली नाही; ती माझी मातृभाषा आहे. माझी पहिली बोली भोजपुरीच होती. मी भोजपुरीत गाऊ लागले तेव्हा अगदी माझे मित्र-मैत्रिणीदेखील म्हणाले, 'आता भोजपुरी कोण ऐकतं.' त्यांच्या मतेही, भोजपुरीला अश्लील आणि गावंढळ भाषा मानलं जातं, आणि मी त्यात गायले तर पुढे जाऊ शकणार नाही. बऱ्याच जणांना असंच वाटत होतं. मला हा समज मोडायचा होता.
भोजपुरीविषयी ही एक प्रतिमा बनली आहे. ही तर अश्लील आहे. ही तर गवारांची भाषा आहे. अलीकडे तर भोजपुरीत खूपच अश्लील, केवळ स्त्री देहाचं वर्णन करणारी गाणी येऊ लागली आहेत. मला आठवतं, मी एकदा अलाहाबादहून माझ्या वडिलांसोबत गावी येत होते. वडील माझ्या शेजारील सीटवर बसले होते. त्याच वेळी बसमध्ये एकदम फुहड भोजपुरीची गाणी वाजत होती. आणि त्यांचे पूर्ण व्हिडिओ वगैरेही लावलेले होते. आम्हाला दोघांनाही संकोच वाटत होता. तुम्ही विचार करा, पिता आणि मुलगी एकत्र प्रवासही करू शकणार नाहीत अशी गाणी सार्वजनिक ठिकाणी चालतात. तुमच्या कुटुंबासोबत त्या गाण्यांना तुम्ही ऐकू शकत नाही. म्हणून मी ठरवलं, मी लोकांना हे सांगण्याचा प्रयत्न करेन की, भोजपुरीत फक्त अश्लील गाणीच नाहीत, तर राजकीय व्यंग, बेरोजगारी, सामाजिक मुद्द्यांवरही गाणी गायली जाऊ शकतात. आजवर लेखकांनी लिपस्टिक, लेहंगा, कमरिया यांच्याच आधारे गाणी लिहिली. पण मी ठरवलं, मी याच भाषेतून बेरोजगारीची, मजुरांची कैफियत गाईन. भाषा सन्मानजनक होण्यासाठी माझ्या वाटची जबाबदारी मला घ्यावी वाटली.
प्रश्न : तू राजकीय टीका करणारी गाणी गातेस, पण त्यात हास्यही असतं आणि गंभीर विचारही. या दोघांचा समतोल कसा साधतेस? आणि तुला तुझ्यातील लेखक/गीतकाराची जाणीव कधी झाली?
- मी स्वतःला मोठी लेखिका म्हणणार नाही. मला वाटतं, मी खूप सामान्य लिहिते. मला कधी-कधी आश्चर्यही वाटतं की, लोकांना माझं लेखन का आवडतं? कदाचित ते लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर असतं म्हणून आवडतं. पहिलं गीत लिहिल्यावर (2018 मध्ये 'हमरा प्रेम के निशानी') जाणवलं की, मी लिहू शकते. नंतर 2020 मध्ये लॉकडाउनदरम्यान मी बेरोजगारीवर आणि इतर विषयांवर लिहिलं, आणि लोकांना ते आवडलं. मला लहानपणी गाण्याची आवड होती, तशी लेखनाची नव्हती. 2018 नंतर मी लिहायला सुरुवात केली, आणि ते बऱ्यापैकी साधतं.
हास्य आणि गंभीरतेचा समतोल गरजेचा आहे, कारण गंभीर गोष्टी लोकांना आवडतात. पण त्यात मनोरंजन नसेल तर लोक कंटाळतात. पण मी काही पहिली व्यक्ती नाहीये. माझ्या आधीही अनेकांनी अशा गंभीर गोष्टी एकदम चुटकीसरशी हसवून सांगितल्या आहेत. म्हणून मी माझ्या गाण्यांत हास्याची एक मात्रा देते, जेणेकरून लोक ऐकत राहतात आणि गंभीर मुद्दाही समजतात. लोकांना प्रवचन आवडत नाही. त्यांनी आपलं म्हणणं ऐकावं असं वाटत असेल, तर थोडं मनोरंजन करत ते सांगितलं, तर ते ऐकायला थांबतात.
प्रश्न : तुला तुझ्या चाहत्यांमध्ये कोण जास्त दिसतं? तरुण की सर्व वयोगटांतील लोक?
- मी फेसबुक आणि यू-ट्यूबवर पाहिलं की, 25 ते 34 या वयोगटातील लोक मला जास्त ऐकतात. त्यानंतर 45 ते 50 वयोगटातील काही लोक. कारण मी त्या तरुणांच्या प्रश्नांवर गाते. मजुरांवर गाते, तेव्हा मजूरवर्ग मला ऐकतो. महिलांसाठी गाते, तेव्हा त्या मला ऐकतात. मी विविध प्रकारची गीतं गाते. बेरोजगारी, महागाई, मजूर, महिला, छठ, चैता, कजरी इत्यादी. त्यामुळे सगळेच माझ्याशी जोडले जातात.
प्रश्न: कोरोना काळात गरोदर महिलेसाठी गायलेल्या गाण्याचा अनुभव सांगशील?
- 2020 मध्ये लॉकडाउनदरम्यान एक बातमी आली होती. एक गरोदर महिला 165 कि.मी. पायी चालत होती, आणि रस्त्यावरच तिने बाळाला जन्म दिला. ही बातमी ऐकून मला खूप धक्का बसला. त्या महिलेची अवस्था, तिचं दुःख याचा विचार माझ्या मनात आला. मी त्या घटनेवर एक गीत लिहिलं :
"अरे, उठला दरदिया कमरिया में, बिचरे बजरिया में हो ए ललना, लाज लागे हमारी नजररिया में, देखे लोग बजरिया में हो..."
याचा अर्थ, त्या महिलेला प्रसववेदना होत असताना बाजारात, रस्त्यावर लोक तिच्याकडे बघत होते. ती माता झाली, पण तिच्यासाठी कोणी सोहर (बाळाच्या जन्माचं स्वागताचं गीत) गायलं नाही, कोणी छठी बरही केली नाही. मी त्या महिलेसाठी सोहर गायलं, तिच्या दुःखाला आवाज दिला. मला माहिती नाही की माझं गाणं तिच्यापर्यंत पोहोचलं की नाही, पण माझ्या मनाला समाधान मिळालं.
सोहर हे भोजपुरी लोकगीतातील मंगलगीत आहे. बाळ जन्मतं, तेव्हा गावातल्या महिला एकत्र येऊन सोहर, छठी, बरही अशी गीतं गातात. यात पूर्वजांचं स्मरण केलं जातं, आणि बाळाच्या जन्माचं स्वागत केलं जातं. पण त्या रस्त्यावर जन्म देणाऱ्या महिलेसाठी कोणी हे केलं नाही, म्हणून मी तिच्यासाठी गायलं.
प्रश्न : तू वेगवेगळ्या लोकांच्या अनुभवांना तुझ्या गीतांत कसं सामावून घेतेस? मजुरांचे, महिलांचे प्रश्न तू कसे समजून घेतेस?
- मी गावात वाढले आहे, ग्रामीण पार्श्वभूमी हा माझा प्रीविलेज आहे. शेतकरी आणि मजूर, त्यांचं कष्ट आणि जीवन बघतच मी मोठी झाले आहे. काही पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी दिल्ली, पाटणा, कोटा इथे पाठवतात, पण त्यांच्याकडे पुढच्या महिन्याचा खर्च नसतो. त्यांना गहू, धान्य विकावं लागतं. पण ते मुलांचे शिक्षण सोडत नाहीत. त्यांना आशा असते. शिक्षण पूर्ण करून मूल नोकरी करेल. पण रोजगार कुठे आहे आणि शिक्षणाचा दर्जा काय आहे? शेतकऱ्यांच्या पिकांना भाव कुठं आहे...? मी माझ्या आजूबाजूच्या लोकांचं दुःख पाहिलं आहे. माझ्या वयाचे अनेक तरुण स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, पण त्यांची निवड होत नाही. मी त्यांच्याशी बोलते, त्यांचं दुःख समजून घेते. मी काही हवामहालात राहत नाही, जमिनीवर आहे. लोकांशी संलग्नदेखील. त्यामुळे मला सामान्य लोकांचे प्रश्न माहिती आहेत. आणि मी स्वतः स्त्री आहे, त्यामुळे महिलांचे प्रश्न मला स्वतःहून समजतात. हे सारं माझ्या गाण्यात अपोआप प्रकट होत जातं.
प्रश्न : तू पहलगामच्या हल्ल्यानंतर केलेल्या व्हिडिओविरुद्ध पोलीस तक्रार झाली. यापूर्वीही कोर्ट केस सुरू आहेत. अशा प्रसंगांचा सामना तू कसा करते? तुला कधी भीती वाटली का?
- खरं सांगायचं तर, अशा प्रसंगांना सामोरं जाणं खूप कठीण आणि तणावपूर्ण आहे. पहलगाम घटनेनंतर पहिल्यांदा मला थोडी भीती वाटली. मी स्वतःला खोलीत डांबून घेतलं. त्याचं कारणही तसंच होतं, नव्या भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार माझ्यावर गंभीर आरोप ठेवले गेले. शिवाय, ट्विटरवर दोन दिवस 'नेहा सिंह राठौर गद्दार है' हा ट्रेंड नंबर एकवर होता. ट्रोल्सनी खूप सुनियोजितपणे मला टार्गेट केलं. पण मला माहिती आहे की, हे ट्रोल्स सुनियोजित आहेत. तरीही सततच्या त्या वारानं घायाळ झाले. आपण लोकशाहीत पंतप्रधानांना प्रश्न करणार नाही तर कुणाला? हल्ल्याची जबाबदारी कुणी घ्यायची? माध्यमं तर सर्व चुकीची माहिती देत होते. गावखेड्यात तर तेच खरं मानलं जातं. त्या स्थितीत आपण सत्य सांगायचं नाही? काही झालं की आपल्याकडे पाकिस्तानात धाडायची खूप हौस असते. ते तेव्हाही बोललं गेलं. काही दिवस मानसिक त्रास झाला. पण मी घाबरून गाशा गुंडाळला नाही.
प्रश्न : मीडियाबद्दल तुझं काय मत आहे?
- मीडियाबद्दल, फक्त मीच नाही, तर सामान्य लोकांमध्येही खूप नाराजी आहे. आता मी पाहते, नोएडाचे हे गोदी मीडियाचे पत्रकार, लोकांमध्ये काही मुद्द्यांवर बोलायला जातात, तर लोक त्यांना हाकलून देतात. 'गोदी मीडिया गो बॅक' अशी घोषणाबाजी करतात. गेल्या काही वर्षांत मीडियाने आपला स्तर खूप खालावला आहे.
उदाहरणच घ्या, पहलगाम हल्लल्याबद्दल. मीडियातून इतकं खोटं बोललं गेलं की, कोणी कराची गेलं, कोणी इस्लामाबाद, कोणी लाहौर. काहीच खरं नाही. सेनेकडून कोणतीही अधिकृत माहिती आली नाही, पण नोएडात बसून हे लोक सगळं काही ठरवतात. लोकांनी विश्वास ठेवला होता, पण आता गावातल्या, कमी माहिती असलेल्या लोकांनाही कळतंय की, हे खोटं बोलताहेत. त्यामुळे सामान्य लोकांमध्ये नाराजी आहे.
काही वर्षांपूर्वी हे मीडियावाले मला त्यांच्या डिबेट्ससाठी बोलवायचे. आता ते मला पूर्णपणे टाळतात. कारण माझे त्यांच्याशी वाद होतात. ते मला त्यांच्या मंचावर अपमानित करायचा प्रयत्न करतात. त्यासाठीचे त्यांचे तर्क इतके निकृष्ट असतात, पण मी त्यांना माझे तर्क सांगते, आणि मग वादच होतो. म्हणून आता त्यांनी मला पूर्णपणे बहिष्कृत केलंय. असो. मीडिया करत नाही ते काम करण्याचा आपण प्रयत्न करत राहायचं.
प्रश्न: अशा सर्व विपरीत स्थितीतही तू काम करत राहिलीस. तुझ्याकडे पाहून मुलींना प्रेरणा मिळत असणार. तुला असा काही अनुभव आला आहे का?
- पूर्वी माझ्या ट्विटरवर मुलींच्या फारशा प्रतिक्रिया येत नव्हत्या. कुणी एक जण काही म्हणाली, तर त्यावर इतर पंचवीस पुरुषांच्या कमेंट्स असायचे. त्याही वाईट. तिचा रेट विचार, तिचा मोबाईल नंबर माग, अशा स्वरूपाच्या. पण आता मी पाहते, खूप मुली असतात. किमान लाईक करतील. छोटी-मोठी कमेंट करतील. तिथंच कुणी म्हणतं, आम्हाला तुझ्याकडून खूप प्रेरणा मिळते. हिंमत मिळते, आम्ही घरात बोलू शकतोय इत्यादी. प्रत्यक्षात भेटी होतात तेव्हा मुली सांगतात, तेव्हा आनंद होतो. आता सांगितलं तर विश्वास बसणार नाही, पण मी सुरुवातीला व्हिडिओ करत होते तेव्हा माझ्याकडेही फोन नव्हता. मी भावाच्या फोनवर व्हिडिओ करायचे. त्याची मर्जी बघून, त्याची इच्छा पाहून ते करावं लागायचं. मुलींना फोन देऊ नये, त्या बिघडतील असं माझ्या घरातल्यांचं म्हणणं. त्यांच्या दृष्टीने मी बिघडलेसुद्धा. म्हणजे प्रेमविवाह केला ना. माझ्या भावाचा एक छोटा फोन होता. त्या फोनवरून मी सुरुवात केली. मग कधी कधी मित्राचा फोन घेतला. त्यावर काही व्हिडिओ रेकॉर्ड केले, अपलोड केले. फोन मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. माझ्याकडे फोन नसला, तरी सांगण्यासाठी गोष्ट होती आणि ती मी सांगायला सुरुवात केली. त्यानंतर मी हळूहळू सोशल मीडियावरून थोडं थोडं कमवायला सुरुवात केली. मग मी स्वतःसाठी एक iPhone घेतला.
प्रश्न : तू सांगितलं की फोनच्या निमित्ताने तू तुझ्या आयुष्याच्या जोडीदारालाही शोधलं. ती गोष्ट काय होती?
- हा खूप सुंदर प्रश्न आहे. लोक म्हणतात, फोन ही वाईट गोष्ट आहे. हो, कदाचित तसंही असू शकतं. पण माझ्या बाबतीत फोन नसता तर काय झालं असतं? मी बिहारमध्ये बसलेली, आणि हिमांशु दिल्लीत राहत होते. आमचं बोलणं कसं झालं असतं? म्हणून फोनचा वाटा खूप मोठा होता. सोशल मीडियावर मी गाणी अपलोड करायचे, तेव्हा हिमांशुने माझं प्रोफाइल पाहिलं. आणि त्यांना मी आवडले असं ते सांगतात. ते पण कविता लिहितात, म्हणून त्यांनी मला त्यांच्या कविता पाठवायला सुरुवात केली. मग आमची ओळख झाली. मैत्री झाली. मैत्रीनंतर आम्हाला वाटलं की, आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. आणि मग आम्ही लग्नही केलं.
प्रश्न: तो प्रवास, तुमचं लग्न, सोपं होतं का? तुमच्या कुटुंबाकडून कसा स्वीकार झाला?
- नाही, अजिबात सोपं नव्हतं. एक-दोनदा माझ्या भावाने माझा फोनही तोडला होता. मम्मी-पप्पांना हे मान्य नव्हतं. घरातल्या लोकांना वाटत होतं की, मुलीने प्रेमविवाह करू नये. प्रेमविवाह केला तर गावात, समाजात नाक जातं. लोक नावं ठेवतील. पण हळूहळू सगळं ठीक झालं. आज आमच्या दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले संबंध आहेत. सगळे खूश आहेत. मी आणि हिमांशु एकमेकांसोबत खूश आहोत.
प्रश्न : त्या तणावपूर्ण वातावरणात तुम्हा दोघांची भूमिका काय होती? कुटुंबाशी नातं तोडणं सोपं असतं, पण जोडून राहणं, नातं टिकवणं आणि पुन्हा नॉर्मल करणं, यात युवकांची भूमिका काय असावी?
- मला वाटतं, ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. पण मी माझ्या नात्याबद्दल सांगते. आमचं एकमेकांवर प्रेम होतं आणि आम्ही ठरवलं होतं की आम्ही एकमेकांशीच लग्न करणार. पण मम्मी-पप्पा तयार नव्हते. त्या वेळी आम्ही ठरवलं, प्रेमाने, बसून, समजावून सांगायचं. आम्हाला पळून जायचं नव्हतं, तर कुटुंबाला सोबत घेऊन जायचं होतं आणि सांगायचं होतं की, आम्ही काही गुन्हा केलेला नाही, ज्यामुळे तुम्ही आम्हाला नाकारावं.
आज आम्ही तीन वर्षांपासून लग्नात आहोत. सगळं ठीक चाललंय, कोणतीही समस्या आली नाही. आम्ही कुटुंबाला समजावण्याचा प्रयत्न केला की, आम्ही गुन्हा केलेला नाही. 'ज्या मुलाशी मी लग्न करतेय, तो मला समजतो, माझ्या कामाला समजतो, तुमच्या मुलीला समजतो. यापेक्षा जास्त काय हवं? तुम्ही माझं लग्न कुठे करणार? अनोळखी व्यक्तीशी? तो मला समजेल की नाही, माझ्या करिअरच्या महत्त्वाकांक्षा समजेल की नाही? आणि हा मुलगा इतक्या निष्ठेने माझ्यासोबत उभा आहे, तर मला याच्यासोबत जायला हवं.'
आम्हाला माहीत होतं की, 40-50 वर्षांचा त्यांचा विचार लवकर बदलणार नाही. पण आम्ही प्रयत्न केला. आणि ती प्रक्रियादेखील तणावपूर्ण होती. असं नाही की आम्ही समजावलं आणि ते लगेच तयार झाले. तसं होत नाही. पण आम्ही एकच सांगत राहिलो, "आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. आम्ही काही गुन्हा करत नाहीये." वेळ लागला, मात्र ते या लग्नासाठी राजी झाले. खूप अडचणी येतात. पण आमचा हेतू कधीच कुटुंबाला दुखवण्याचा नव्हता.
प्रश्न : आता तुझे नवीन काही प्लॅन आहेत ?
आता बिहार निवडणूक एक-दोन महिन्यांवर आली आहे. आणि मला आठवतं, 2020 च्या बिहार निवडणुकीत मी 'काबा' गायलं होतं, तेव्हा लोकांनी मला खूप ऐकलं. आता या वेळी मी त्या गाण्यात थोडं संपादन करणार आहे आणि काही नवीन मुद्दे जोडणार आहे. सध्या मी लिहिते आहे, विचार करते आहे की, काय करू, कसं करू, जेणेकरून ते प्रासंगिक राहील आणि लोकांना कंटाळवाणं वाटणार नाही. लवकरच बिहार निवडणुकीत 'बिहार में का बा' येईल.
प्रश्न : पुढच्या वर्षांत तू स्वतःला कुठे पाहतेस ?
- मी स्वतःला असंच राजकीय उपहास लिहिताना, गाताना, लोकांचे मुद्दे मांडताना पाहते. बाकी, जिथे जायचं असेल तिथे आपण जातोच. पाहू या, माझं हे करिअर, हा प्रवास मला कुठे घेऊन जातो.
प्रश्न : महाराष्ट्रातल्या युवकांना तू काय संदेश देशील ?
मी फक्त महाराष्ट्रातल्याच नाही, तर देशातल्या सर्व युवकांना हा संदेश देईन की, तुम्ही कोणत्या पक्षाला, नेत्याला, कोणालाही आवडा अगर नावडा. पण तुमच्या हक्कांबद्दल जागरूक रहा आणि प्रश्न विचारायला शिका. लोकशाहीत कोणतंही पद मोठं नसतं. पंतप्रधान, गृहमंत्री, मोठे नेते, यांना घाबरण्याची गरज नाही. ते मोठ्या पदावर आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करायची नाही, त्यांच्यासमोर मान झुकवायची हे लोकशाहीला मारक आहे. तुम्ही मतदान करता, त्यांना निवडून देता. तुम्ही त्यांना निर्भयपणे प्रश्न विचारू शकता.
संवादक : हिनाकौसर खान
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या