पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेसाठी नरेंद्र डेंगळे ह्यांनी महाराष्ट्रातील आर्किटेक्चरच्या परंपरा हा विषय निवडला आहे. पुढे इतिहास सादर करताना त्यात परंपरा; सौंदर्य, शैली आणि अनुभव; समाज आणि व्यक्तिनिष्ठता; निसर्गाशी नाते; महाराष्ट्रातील प्रादेशिक उदाहरणांच्या नोंदी असे पाच भाग केले आहेत. त्यामध्ये एकूण 25 लेख आहेत. त्यातील काही निबंधाच्या स्वरूपातले आहेत, तर काही संशोधन आणि अकॅडेमिक पद्धतीच्या चौकटीला अनुसरून लिहिलेले आहेत. सर्व लेखांत तळटिपा आणि संबंधित संदर्भाचा समावेश आहे. येथे सर्व लेखांचा आढावा घेतला नसला तरी त्यातील काही निवडक लेखांची तोंडओळख करून देणार आहे.
1967 मध्ये मुंबईच्या जे.जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये मी प्रवेश घेतला तेव्हा मला आर्किटेक्चर ह्या विषयाबद्दल जुजबी माहिती होती. माझ्या वडिलांच्या मते माझ्यासाठी तो शिक्षणाचा चांगला पर्याय होता. मागे वळून बघता मलाही मी हा व्यवसाय निवडला त्याचे समाधान आहे.
पन्नास वर्षांपूर्वी नाशिक शहरात एकही व्यावसायिक आर्किटेक्ट नव्हता. कोणालाही आर्किटेक्चरचा स्वतंत्र व्यवसाय असतो हे माहीतही नव्हते. कारण ब्रिटिश राज्याच्या काळात इंजिनिअरिंग कॉलेजेस पुष्कळ निघाली होती. रुरकीचे पहिले कॉलेज 1847 मध्ये सुरू झालेले होते. तेव्हापासून बांधकाम व्यवसायात सिव्हिल इंजिनिअर्सचे महत्त्व वाढते होते. धरणे, कालवे, मोठ्या इमारती, रस्ते, पाणी-मैलापाणी, सांडपाणी योजना ह्यामध्ये गणिती तंत्रांना महत्त्व आलेले होते. त्या काळात मुंबई-दिल्ली-कोलकाता अशा महानगरांमधील सार्वजनिक इमारतींचे, तेथील घरे, बंगले ह्याचे डिझाईन ब्रिटिश आर्किटेक्ट्स करीत असत. नवी दिल्ली शहराचे नियोजन करण्यासाठी ब्रिटिश आर्किटेक्ट्स बोलावले होते. मुंबईमध्ये 1890 च्या दशकात जे.जे. कला महाविद्यालयाच्या आवारात आर्किटेक्चरचे शिक्षण सुरू झाले ते ब्रिटिश आर्किटेक्ट्सना मदतनीस म्हणून ड्राफ्ट्समन तयार करण्यासाठी. अर्धवेळ शिक्षण आणि काम करून सात वर्षांनी पदविका मिळत असे. त्यापैकी थोडे इंग्लंडला जाऊन अनुभव घेऊन रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चरची पदवी मिळवून भारतात परत येत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आर्किटेक्चरचे महत्त्व ओळखून मुंबईला जे. जे स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्येच पाच वर्षांचा, पूर्ण वेळेचा अभ्यासक्रम सुरू झाला. विद्याथ्यर्थ्यांना मुंबई विद्यापीठाची पदवी मिळू लागली. पदवी आणि पदविका असे दोन्ही अभ्यासक्रम तेथे चालत. 1950 च्या दशकात मुंबईला पदविका देणाऱ्या दोन खाजगी संस्था निघाल्या तरी अनेक दशके जे. जे. कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हेच पदवी शिक्षण देणारे महाराष्ट्रातले एकमेव कॉलेज होते.
आज महाराष्ट्रात प्रत्येक विद्यापीठामध्ये आर्किटेक्चर विषयात पदवी बहाल करणारी 103 कॉलेजेस आहेत. त्यांपैकी बहुतेक सर्व 1992 नंतर खाजगी संस्थांनी सुरू केलेली आहेत. 1972 मध्ये संसदेने केलेल्या आर्किटेक्ट्स कायद्यानुसार (The Architects Act 1972) स्थापन झालेल्या काउंसिल ऑफ आर्किटेक्चरकडे संस्थांना मान्यता देण्याची, व्यावसायिकांची नोंदणी करण्याची, तसेच आर्किटेक्चरच्या व्यवसायाचे नियमन करण्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे 1972 नंतर आर्किटेक्चर हा डॉक्टरांच्या व्यवसायाप्रमाणे स्वतंत्र व्यवसाय म्हणून भारतामध्ये ओळखला जाऊ लागला आहे. देशामध्ये होणाऱ्या सर्वप्रकारच्या इमारतींचे बांधकाम आर्किटेक्टने तयार केलेल्या आराखड्यानुसार त्याच्या सही-शिक्याने तसेच देखरेखीखाली करणे अनिवार्य झाले.
आर्किटेक्बर व्यवसायाचा हा इतिहास सांगण्याचे कारण म्हणजे, आधुनिक आर्किटेक्चरचा व्यवसाय आता पन्नास वर्षांत सर्वसाधारण नागरिकांच्या माहितीचा आणि तोंडओळखीचा झाला असला, तरी आर्किटेक्चर व्यवसायाबद्दलचे ज्ञान, आकलन ह्या बाबतीत आपला समाज आणि विशेषतः आपले राज्यकर्ते आणि प्रशासक अनभिज्ञ आहेत. ह्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने 'महाराष्ट्रातील वास्तुकला आणि परंपरा' हे दोन महत्त्वाचे खंड इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित केले आहेत, त्याचे स्वागत करायला हवे. पुण्याचे आर्किटेक्ट नरेंद्र डेंगळे आणि त्यांच्या चार सहकाऱ्यांनी तयार केलेल्या दोन खंडांपैकी पहिल्या खंडातील विषयांचा परिचय करून देणे, त्याबाचत माझी निरीक्षणे नोंदवून समीक्षा करणे, असे ह्या लेखाचे स्वरूप आहे.
आर्किटेक्चरला मराठीमध्ये 'वास्तुकला' आणि आर्किटेक्ट्सना 'वास्तुकलाकार म्हटले जाते. आपल्या देशातील बौद्ध लेणी, हिंदू धर्मीयांची देवळे, ताजमहालसारख्या मुघलकालीन मशिदी, तसेच चर्च ह्यांचे कलात्मक स्वरूप बघता त्यांच्याकडे कला म्हणून बघणे हे योग्यच होते. आधुनिक काळात विशेषतः गेल्या पाचशे वर्षांमध्ये आर्किटेक्चरचे स्वरूप कलेच्याही पलीकडे उत्क्रांत झाले आहे. त्यातून जगातल्या अनेक आधुनिक ठोकळेबाज इमारती, तसेच आपल्या देशातील अलीकडच्या 30-40 वर्षांत बांधलेल्या बहुतेक इमारती बघता त्यांना 'वास्तुकला' म्हणणे धारिष्ट्याचे होईल. तसेच सरसकट सर्व आर्किटेक्ट्सना वास्तुकलाकार म्हणणेही पटणारे नाही. म्हणून आर्किटेक्चरसाठी 'वास्तुकला' हा मराठी शब्द वापरला जात असला तरी तो दिशाभूल करणारा आहे. शिवाय आधुनिक काळातील बांधकामांचे गुंतागुंतीचे स्वरूप आणि अपेक्षा स्पष्ट करण्यासाठी तो अपुरा आहे. त्यामुळेच पहिल्या खंडाच्या शब्द सूचीमध्ये आर्किटेक्टसाठी वास्तुकलाकार, वास्तुकार, वास्तुरचनाकार, वास्तुसंकल्पक आणि स्थपती असे विविध शब्द योजलेले आहेत. त्यामुळे आधुनिक काळातील रचनांना 'वास्तुकला' शब्दाऐवजी आर्किटेक्चर हाच शब्द वापरला असता तर तो अधिक समर्पक ठरला असता, असे मला वाटते. इंग्रजी भाषेतील ह्या प्रचलित शब्दाचा वापर जाणीवपूर्वक स्वीकारण्याची गरज आणि कारणे देता आली असती. ह्याच प्रमाणे आज ह्या व्यवसायात आणि व्यवहारात अजिबात वापरात नसलेले तलविन्यास, तीर असे अनोळखी शब्द न वापरता प्लॅन, ब्रकेट हे शब्द वापरले असते तर ते बाचकांना सहज समजले असते. सामान्य वाचकांसाठी किंवा मराठी भाषिकांसाठी, तसेच आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांसाठी, व्यावसायिकांसाठी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये मराठी, संस्कृतप्रचुर आणि वापरात नसलेल्या शब्दांचा आग्रह मला योग्य वाटला नाही. विशेषतः शासनाचे मोठे अनुदान असलेल्या, अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या मराठी पुस्तकातील भाषा सोपी, सरळ आणि लोकांना जवळची वाटणारी, तसेच सहज समजणारी असावी. अर्थात, मराठीमध्ये लिहिणाऱ्यांसाठी ते एक मोठे आव्हान आहे ह्याची मला जाणीव आहे.
महाराष्ट्रातील वास्तू परंपरा
पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेसाठी नरेंद्र डेंगळे ह्यांनी महाराष्ट्रातील आर्किटेक्चरच्या परंपरा हा विषय निवडला आहे. पुढे इतिहास सादर करताना त्यात परंपरा, सौंदर्य, शैली आणि अनुभव; समाज आणि व्यक्तिनिष्ठता; निसर्गाशी नाते; महाराष्ट्रातील प्रादेशिक उदाहरणांच्या नोंदी असे पाच भाग केले आहेत. त्यामध्ये एकूण 25 लेख आहेत. त्यातील काही निबंधाच्या स्वरूपातले आहेत, तर काही संशोधन आणि अकॅडेमिक पद्धतीच्या चौकटीला अनुसरून लिहिलेले आहेत. सर्व लेखांत तळटिपा आणि संबंधित संदर्भाचा समावेश आहे. येथे सर्व लेखांचा आढावा घेतला नसला तरी त्यातील काही निवडक लेखांची तोंडओळख करून देणार आहे.
महाराष्ट्रातील परंपरा ह्या विभागातील तीन लेख आहेत. येथे सहजपणे उपलब्ध असलेल्या बेसॉल्ट दगडातून साकारलेल्या ऐतिहासिक वास्तुप्रकारात दगडांमध्ये कोरलेली लेणी आणि बांधकामांमध्ये दगडी चिरे/ठोकळे वापरून केलेली बांधकामे असे दोन मुख्य प्रकार बघायला मिळतात, डोंगरात कोरलेली लेणी हा एक आद्य प्रकार. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या काळात बांधलेली विविध धर्मीयांची प्रार्थना मंदिरे, देवळे, थडगी, त्यात वापरलेलीबांधकाम तंत्रे, कौशल्ये, कलाकुसर हा दुसरा प्रकार. त्यासाठी पंढरपुरातील धर्म आणि वारकरी परंपरांच्या संदर्भात चंद्रभागेच्या तीरावर निर्माण झालेली दगडी बांधकामाची देवळे आणि नागरिकांच्या सोयीसाठी बांधलेल्या लाकडी इमारतींची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. ब्रिटिश काळात, मुख्यतः मुंबईमध्ये इंडो सारसेनिक वास्तुरचनाशैली विकसित झाली होती. एशियाटिक सोसायटी, विद्यापीठ आणि तेथील राजाबाई टॉवर ही त्याची प्रसिद्ध उदाहरणे आहेत. अशा पारंपरिक दगडी बांधकामांच्या उदाहरणांतून बुद्ध, हिंदू, मुस्लीम आणि पाश्चिमात्य वास्तुशैलींची, तंत्रांची, समाज आणि संस्कृतींची, राजकारणाची आणि कला-कौशल्याच्या परंपरांची एकमेकांवर प्रभाव टाकणारी, दीर्घकाळ होत असलेली संकर प्रक्रिया लक्षात येते. गेल्या शंभर वर्षांत बेसॉल्ट दगडाची बांधकाम शैली पारंपरिक उदाहरणांमध्येच सीमित राहिली आहे. बेसॉल्ट दगडाची खडी हे काँक्रीटमधील बांधकामांमध्ये मुख्य साहित्य झाले आहे! (ठोकळेबाज काँक्रीटच्या इमारती अनेकदा चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या - हीच सध्याची शैली प्रचलित झाली आहे... माझे निरीक्षण)
सौंदर्य, शैली आणि अनुभव ह्या विभागात तीन लेख आहेत. ऐतिहासिक काळापासून मिथके (पारंपरिक कथा) आणि आर्किटेक्चर ह्यांचा घनिष्ट संबंध प्रस्थापित झालेला आहे. सम्राट अशोकाच्या काळात बुद्ध तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी स्तंभ, स्तूप, लेणी अशा प्रकारच्या सौंदर्यपूर्ण वास्तुरचना करण्याची परंपरा भारतामध्ये सुरू झाली. त्यामधील शिल्पकलेचा वापर सौंदर्य निर्मितीसाठी, तसेच त्यांच्या तपशिलांद्वारे मिथकांचा वापर तत्त्वांच्या प्रसारासाठी केला जात असे. आधुनिक काळातील वास्तूंच्या रचनांवरही त्या काळातील काही आकारांचा असलेला प्रभाव पहिल्या लेखात अधोरेखित केला आहे. दुसऱ्या लेखामध्ये नैतिकता आणि सौंदर्य हा आर्किटेक्चरमधील आनंद निर्मितीचा गाभा असतो, ह्याबद्दल लेखकाने केलेले विवेचन मला विशेष भावले. मात्र असा आनंद मिळविण्यासाठी आर्किटेक्चरची भाषा केवळ आर्किटेक्ट्सनाच नाही तर अशा रचना करण्याचा इरादा असलेल्या प्रायोजकांनाही समजावी लागते. तशीच ती सामान्य नागरिकांनाही समजून घेतली तर आनंद द्विगुणित होतो. कारण अशा रचनेच्या प्रवर्तकांचा हेतू, नैतिक भूमिका आणि भावना ह्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते हेसुद्धा लक्षात घ्यावे लागते.
विविध आकार, त्यांचे प्रमाण, जोडणी ह्यांमधून निर्माण होणारे आकृतिबंध, आणि अवकाश ही वास्तुकलेची भाषा, तसेच त्यामागील नैतिक तत्त्वे आणि प्रेरणा काळाच्या ओघात बदलतात, विकसित होतात. दुर्देवाने आज भारतामधील बहुतेक वास्तुरचना बघता त्यातील नैतिकतेचा अभाव डोळ्यात भरणारा आहे. त्यामागील प्रच्छन्न राजकीय आर्थिक प्रेरणा लपून राहत नाहीत. त्यामुळेच त्यामधून क्वचितच आनंद मिळतो. नैसर्गिक परिसरातील तीव्र उष्णता, थंडी, वारे, वादळे आणि पावसापासून संरक्षण करणे ह्या सामान्य लोकांसाठी बांधलेल्या इमारतींच्या रचनेमागील मूलभूत मानवी प्रेरणा होत्या. आज मात्र नैसर्गिक परिसरांनाच आपल्या बांधकामाच्या अतिरेकापासून वाचविण्याची गरज निर्माण झालेली आहे. साहित्य, चित्रकला किंवा सिनेमा अशा कलांमध्ये केवळ सौंदर्याला महत्त्व देऊन आनंद निर्माण करता येतो. मात्र आर्किटेक्चरचा आनंद केवळ सौंदर्यशास्त्राच्या तत्त्वावर अवलंबून नसतो, तर त्यामागील नैतिक भूमिका तितकीच महत्त्वाची असते. तसे झाले तरच मानवी समाजाचे जीवनमान उंचावते.
ह्याच विभागातील तिसऱ्या लेखात महाराष्ट्रातील स्वातंत्र्योत्तर काळातील आर्किटेक्चरमागील प्रेरणा आणि प्रवाहांचा आढावा घेतला आहे. आधुनिक कलेच्या तुलनेत, आधुनिक आर्किटेक्चरचा स्वीकार समाजाने सहजपणे पण चुकीच्या पद्धतीने केलेला दिसतो. उदाहरणार्थ, विकासक बांधत असलेल्या उत्तुंग काँक्रीट आणि काचेच्या भिंती असलेल्या कार्यालयीन आणि निवासी इमारती ह्याला प्रगतीचे लक्षण मानले जाणे. गेल्या शतकात आधुनिक आर्किटेक्चरच्या विकासामध्ये सरळ रेषा, भूमितीय आकार, विवेकवादी, मानवी प्रमाणाशी सुसंगत प्रमाण आणि सामाजिक न्याय ह्यांना महत्त्व दिले जात असे. त्यापैकी सामाजिक न्यायाचा आज पूर्णपणे विसर पडलेला आहे. उत्तुंग इमारती आणि त्यांच्या पायाशी पसरलेल्या झोपडपट्ट्या हे सामाजिक अन्यायाचे दृश्य स्वरूप आहे हे लक्षातही घेतले जात नाही. विशेषतःआर्थिक सुधारणांच्या कालखंडानंतर बांधकाम व्यवसायात शिरलेला निव्वळ आर्थिक, धंदेवाईक दृष्टीकोन आधुनिक वास्तुरचनांच्या मूळ हेतूला हरताळ फासणारा आहे. उथळ, दिखाऊ आणि हीन अभिरुची दिमाखात मिरवणाऱ्या बेढब इमारती हीच आधुनिक आर्किटेक्चरची ओळख झाली आहे.
सामाजिक आणि खाजगी ह्या विभागात चार लेख आहेत. पहिल्या लेखात माहुली येथील संगमाच्या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक, धार्मिक देवळांच्या आणि घाटांच्या नियोजनामागील अवकाश निर्मितीची तत्त्वे सांगून त्यामागील धार्मिक आध्यात्मिक प्रेरणा विशद केल्या आहेत. हा लेख मला अवास्तव मोठा आणि क्लिष्ट वाटला. ह्या विभागात समाविष्ट करण्याचे प्रयोजन समजले नाही. परंतु त्यानंतरचा कोकणामधील लहान गावा-शहरांमधील सामान्य लोकांच्या विविध धार्मिक इमारतींचा आढावा घेणारा लेख मला विशेष भावला. विविध धर्मीय समूहांच्या भावनाचे प्रतिबिंब इमारतींच्या रचनांमध्ये दिसते. त्या धार्मिक इमारती एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत नाहीत. उलट त्यांच्या रचना एकमेकांना कशा पूरक आहेत ह्याचा ऊहापोह त्यात केला आहे. उदाहरणार्थ, साध्या कौलारू छप्पर असलेल्या, खुल्या वा विटांच्या भिंतींनी बंदिस्त असलेल्या इमारतींमधील कळस नसलेली हिंदू देवळे, पारशी समूहांची देवळे, मुसलमानांच्या मशिदी आणि ख्रिश्चन समाजाची लहान चर्चेस, ज्यू लोकांचे सिनेगॉग ह्यांची फोटोसकट वर्णन असलेली उदाहरणे मला महत्त्वाची वाटली. मोठ्या शहरातील भव्य धार्मिक इमारतींचा लोकांना अभिमान वाटत असतो. (काहींना त्यांची दहशत वाटत असते, आणि त्या पाडण्यासाठी चळवळी केल्या जातात तो भाग वेगळा.) ह्या उलट लहान गावातील लोकांच्या, समाजाच्या जवळ असलेल्या मानवी प्रमाणातील इमारतींबद्दल नागरिकांना आस्था, जवळीक आणि सहमती असते. त्यामुळे अशा समावेशक परंपरा समजून घेत, त्यांची वैशिष्ट्ये जपणे सामाजिक न्यायाच्या आधुनिक आर्किटेक्चरच्या प्रसारासाठी आवश्यक आहे हा दृष्टीकोन मला महत्त्वाचा वाटला.
ह्या विभागातील सार्वजनिकतेचा शोध घेणारा तिसरा लेख सर्व जणांसाठी खुल्या असलेल्या जागा, ठिकाणे, इमारती ह्यासंबंधात आहे. ह्यामध्ये मुख्यतः मुंबईमधील आधुनिक काळातील आनंददायी ठिकाणांची उदाहरणे देत त्यांचे सार्वजनिक स्वरूप अधोरेखित केले आहे. हाजी अली येथे समुद्रामध्ये असलेल्या सुप्रसिद्ध सुफी संताच्या कथेशी निगडित असलेला दर्गा, मंडपेश्वर लेणी, अशा ऐतिहासिक सार्वजनिक ठिकाणांचे महत्त्व त्यात अधोरेखित केले आहे. त्याचप्रमाणे मुंबई बेटावरील गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महापालिकेचे मुख्यालय, पोस्ट ऑफिस, वस्तुसंग्रहालयाच्या इमारती, तसेच मोठी मैदाने, बगिचे, पारशी कॉलनीतील उद्याने अशी ब्रिटिश शासन काळातील उदाहरणे आहेत. परोपकाराच्या जाणिवेतून, विश्वस्त भावनेतून श्रीमंत व्यापाऱ्यांच्या देणग्यांमधून बांधली गेलेली कारंजी अशीही उदाहरणे आहेत. दुर्दैवाने अलीकडच्या काळात रस्त्यांवर खाजगी वाहनांचे, तर समुद्रकिनाऱ्यांवर, मोकळ्या जमिनीवर होणारे खाजगी नफेखोरीचे आक्रमण ह्यामुळे सार्वजनिकतेचा अवकाश आक्रसत असल्याची लेखकाने घेतलेली नोंद आणि त्याबद्दलची खंत महत्त्वाची आहे.
ह्या विभागातील पुढच्या प्रकरणात मुंबईमधील घरांच्या बदलत गेलेल्या स्वरूपाचा लेखकांनी घेतलेला शोध सामान्य वाचकांसाठी महत्त्वाचा आहे. विशेषतः 1996 ते 2010 ह्या काळातीळ घटना, शासनाची बदलती धोरणे आणि त्यामुळे घरबांधणीच्या क्षेत्रात झालेले बदल ह्यांचा कालक्रम (Timeline) दाखवणारा ग्राफ महत्वाचा आहे. सुरुवातीच्या काळात मुंबईच्या किल्ल्याबाहेरच्या भागांमध्ये वेगवेगळे लोकसमूह 'जसे जमेल तसे' बांधकाम करीत असत. नंतरच्या काळात ह्या विभागातील दाटीवाटी, बकाली, अनारोग्य कमी करून मुंबई शहराचा मुख्य बेटांच्या पलीकडे नियोजनपूर्वक विस्तार केला गेला. विशेषतः 1910 मध्ये आलेल्या प्लेग महामारीच्या परिणामी ते करणे अनिवार्य झाले होते. त्या काळात गिरणगाव आणि गिरगावात खाजगी चाळी बांधल्या गेल्या. तर बीआयटी, बीडीडी अशी सार्वजनिक चाळींची बांधकामे झाली. दादरच्या विस्तारित भागांमध्ये खाजगी गुंतवणुकीतून हिंदू आणि पारशी कॉलनी, शिवाजीपार्क अशा निवासी वसाहती बांधल्या गेल्या. 1950 ते 1980ह्या स्वातंत्र्योत्तर काळात खाजगी क्षेत्राचे महत्त्व कमी करून सार्वजनिक संस्थांच्या घरबांधणीला प्राधान्य दिले गेले. त्या काळातील खाजगी सार्वजनिक सहभागातून निर्माण झालेला 'साईट आणि सर्व्हिसेस' हा जागतिक बँकेच्या मदतीने उभा राहिलेला चारकोप प्रकल्प गरीब आणि सामान्य नागरिकांसाठी यशस्वी ठरलेला प्रयोग होता. मात्र 1990 नंतर हे सर्व चित्र झपाट्याने पालटले. शासनाने नवीन कायदे, नियम करून, पुनर्विकासाची धोरणे आखून, खाजगी विकासकांना मुक्तद्वार करून देण्याची सुरुवात झाली. झोपडवस्त्यांच्या जागी दाटीवाटीने बांधलेल्या इमारती उभ्या राहिल्या. जुन्या चाळी पाडून श्रीमंत आणि गरीब मध्यमवर्गीयांसाठी विकतची आणि फुकटची घरे असलेल्या उत्तुंग इमारती उभ्या राहू लागल्या. अवास्तव आकाराच्या, अमानवी पद्धतीने दाटीवाटीने बांधलेल्या, अनारोग्याला आमंत्रण देणाऱ्या इमारती बांधल्या जाऊ लागल्या. आज तीच प्रथा वेगाने सुरू आहे...
निसर्गाशी नाते ह्या चौथ्या विभागात तीन लेख आहेत. निसर्गातील कमतरता आणि असुरक्षितता ह्यांना तोंड देत, आर्किटेक्चरची उत्क्रांती होत आधुनिक युगामध्ये त्याचे स्वरूप बदलते आहे. आता काही शतकांनंतर बांधकामांच्या अतिरेकातून निसर्गाचे रक्षण करण्यासाठी मानवी प्रयत्न अपरिहार्य झाले आहेत. निसर्गातील पाणी मानवी जीवनासाठी आणि शेती उत्पादनासाठी सर्वांत महत्त्वाचा घटक. त्यामुळे जगभरात प्रत्येक काळात त्यासाठी विविध प्रकारे तंत्रज्ञान विकसित होत आलेले आहे. बंधारे, पाट, तलाव, विहिरी, नदी किनाऱ्यावरील घाट बांधून त्यांची देखभाल, दुरुस्ती व्यवस्था महाराष्ट्रात सर्व प्रकारच्या भौगोलिक प्रदेशांमध्ये बघायला मिळते. पुण्यामधील पेशवेकाळातील पाणी व्यवस्थापनाचे वर्णन एका प्रकरणात आहे. पुढच्या प्रकरणात वसई-विरार येथील नैसर्गिक परिसराशी नाते राखत पारंपरिक वसाहतींनी केलेली शेती व्यवस्था, निवासी वस्त्या, कोळ्यांच्या वस्त्या आणि त्यातील घरांच्या रचना ह्या संबंधांतील शोध निबंध वाचायला मिळतो. तर तिसऱ्या प्रकरणात दाट लोकवस्ती असलेल्या मुंबई शहरातील, आक्रसत असलेल्या नैसर्गिक आणि शहरातील मोकळ्या जागांचा अभाव ह्या समस्येचा ऊहापोह, तसेच त्या संबंधात आर्किटेक्टने पुढाकार घेऊन केलेल्या जनजागृतीची माहिती दिली आहे.
शेवटच्या विभागातील 12 निबंध महाराष्ट्राच्या विविध विभागांतील खाजगी घरे, वाडे, किल्ले यासंबंधांत आहेत. तसेच देऊळ, मशीद, चर्च, ज्यू स्मशानभूमी, आणि महाबळेश्वर, माथेरान अशी पर्यटन शहरे, सातारा शहर विकास, रेल्वे स्थानकांच्या वैशिष्ट्यपूर्ण आर्किटेक्चरशी संबंधित आहेत. शेवटच्या लेखाचा विषय मुंबईमधील झोपडपट्टी विकास आणि परवडणाऱ्या घरांच्या संदर्भातील चळवळी असा आहे.
पुस्तकातील बहुतेक लेखांचे लेखक आर्किटेक्चरच्या व्यवसायात कार्यरत आहेत. काही जण आर्किटेक्चर शिक्षण संस्थांमध्ये अध्यापन आणि संशोधनाच्या क्षेत्रात कार्यरत असणारे आहेत. आज महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या 103 आर्किटेक्चर कॉलेजांमध्ये सर्व शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाते. त्यांच्या वाचनालयांमधील बहुतेक सर्व पुस्तके, मासिके, जर्नल्स इंग्रजी भाषेतील असतात. अलीकडे अनेक संस्थांमधील विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून शिकलेले असतात. काही थोडे विद्यार्थी मराठी माध्यमातून शिकलेले असतात. इंग्रजी भाषा सर्वांना समजत असली तरी आर्किटेक्चरचे शिक्षण घेत असताना त्या भाषेतील संकल्पना, घटकांची भाषा समजून घ्यावी लागते. सर्वांनाच त्या भाषेच्या अडचणी येतात. असे असूनही बहुतेक विद्यार्थी वाचनाला महत्त्व देत नाहीत, देऊ शकत नाहीत. मी स्वतः मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकले. मुंबईत आल्यावर आर्किटेक्चरचे शिक्षण घेत असताना हा अनुभव घेतला आहे. शिवाय अभ्यासक्रमामध्ये समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, कलाशास्त्र ह्याबरोबरच तांत्रिक चित्रकला, डिझाईन, बांधकामाची तंत्रे, पाणीपुरवठा आणि इतर तांत्रिक सेवा असे सर्व विषय शिकताना विद्यार्थ्यांची दमछाक होत असते. त्यामुळे महाराष्ट्रातील स्थानिक परंपरा आणि प्रवाह ह्याबद्दल शिकत असताना मराठी पुस्तकांचे महत्त्व नक्कीच आहे. परंतु आज शिक्षण घेणारे आर्किटेक्चरचे किती विद्यार्थी वाचनाचा आनंद घेऊ शकतील ह्याची मला शंका आहे. व्यावसायिक आर्किटेक्ट्स तर सहसा त्या वाटेला जातच नाहीत. सर्वसामान्य नागरिकांना अजूनही आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनिअर ह्यांच्या कामात आणि व्यवसायात असलेले फरक सहसा माहीत नसतात. तसेच त्यांच्या नैतिक आणि सामाजिक भूमिकेत असलेला फरक लक्षात येत नाही. तसाच मोठा फरक आर्किटेक्चर आणि नगररचना व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये आहे हे बहुतेक आर्किटेक्ट्सच्या लक्षात येत नाही. ते स्वतःला टाऊन प्लॅनर्स, अर्बन प्लॅनर्स, अर्बन डिझायनर्स म्हणवून घेतात. आज शहरांची होत असलेली दैना बघून आर्किटेक्चर कॉलेजमधील अनेक विद्यार्थी त्यांच्या शेवटच्या वर्षातील प्रकल्पासाठी एखाद्या इमारतीऐवजी शहरी समस्या निवडतात. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नियोजन शास्त्राचे ज्ञान असलेले प्राध्यापक नसतात.
आधुनिक काळात आर्किटेक्चरचे क्षेत्र मेडिकल व्यवसायाच्या क्षेत्राप्रमाणेच अफाट विस्तारले आहे. वैयक्तिक आरोग्यासाठी आधुनिक डॉक्टरी व्यवसायात स्पेशलायझेशनला खूप महत्त्व आले आहे. त्याचप्रमाणे आधुनिक समाजाच्या शहरी, निमशहरी सामूहिक तसेच सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात आर्किटेक्चर आणि नगर-रचनाशास्त्राला महत्त्व आले आहे. मेडिकल सायन्सप्रमाणेच ह्या क्षेत्रात स्पेशलायझेशन वाढते आहे. इस्पितळे, स्टेडियम्स आणि विविध खेळांसाठी असलेल्या इमारती, विमानतळ, रेल्वे स्थानके, हॉटेल्स, म्युझियम्स, कलादालने, रिसॉर्टस, निवासी वस्त्या, प्रयोगशाळा, शाळा, वसतिगृहे, वृद्धाश्रम, विविध उत्पादनांचे कारखाने, अशा प्रत्येक प्रकारच्या इमारतींसाठी विशेष शिक्षण, संशोधन आणि अनुभवांची आवश्यकता आहे. ते करताना मानसशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र ह्यांची ओळख असण्याची गरज वाढली आहे.
हे सर्व समजून घेण्यासाठी आर्किटेक्चरचे पाच वर्षांचे शिक्षण पुरेसे नाही. केवळ सौंदर्यदृष्टी पुरेशी नसते तर त्यासाठी सामाजिक आणि नागरी जाणिवा विकसित असाव्या लागतात. विसाव्या शतकाच्या मध्यावर नगर-नियोजन हा विषय आर्किटेक्चरच्या पोटातून विकसित झालेला असला, तरी तो पूर्णतः वेगळा विषय असल्याचे लक्षात येऊ लागल्यावर पाश्चिमात्य विद्यापीठांमध्ये त्याचे विशेष अभ्यासक्रम, संशोधन सुरू झाले. आज ते क्षेत्र आर्किटेक्चरपासून पूर्णतः वेगळे मानले जाते. गेल्या अर्धशतकात भारतामध्ये नागरीकरणाला वेग येत असताना त्याबद्दल शिक्षण, संशोधनाची आवश्यकता असूनही त्याची सुरुवात संथगतीने होत आहे. गेल्या पंचवीस वर्षांत आर्किटेक्चरच्या शिक्षण संस्था, व्यवसायात, शासनाच्या पातळीवर आणि सर्वसाधारण समाजातही नगरनियोजन शास्त्राची माहिती नाही. त्यामुळे नागरी विकासाच्या धोरणांकडे राजकीय आणि आर्थिक लाभाच्या दृष्टीने बघितले जाते. मुंबई प्रदेशात आणि त्या प्रभावामुळे तर नागरिकांना फुकट घरे, विकासकांच्या नफ्यासाठी अनिर्बंध चटई क्षेत्र, मोठ्या खर्चाचे आणि अल्प सार्वजनिक लाभाचे बांधकाम प्रकल्प म्हणजे नगर विकास अशी समजूत दृढ झाली आहे.
पारंपरिक शैलींमधील आधुनिक तंत्रांनी झटपट बांधलेली अयोध्येसारखी भव्य देवळे, स्मारके म्हणजे परंपरा जतन अशीही समजूत वाढली आहे. ह्या गदारोळात पर्यावरणाचा हास हा विषय तर केवळ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये चर्चिला जाणारा, पण भारतामध्ये सर्वांत हेळसांड होणारा विषय झाला आहे. अशी काही निरीक्षणे प्रस्तुत पुस्तकातील काही लेखांमधून मांडलेली असली तरी त्यावर ठोसपणे, स्पष्टपणे मते मांडलेली नाहीत. गुळगुळीत कागदावर आकर्षक मांडणी असलेले लेख, त्यातील चित्रे, नकाशे, फोटो उत्तम आहेत. शासकीय अनुदानातून, साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेले दोन खंड अल्प किमतीमध्ये, म्हणजे केवळ 200 रुपयांत उपलब्ध आहेत. त्यातून महाराष्ट्रातील आर्किटेक्चरच्या परंपरा ठळकपणे दिसतात. परंतु वर्तमान काळातील आणि वास्तवातील ह्या विषयासंबंधी सर्वसामान्य लोकांचे, वाचकांचे आकलन, जाणिवा वाढवायला ह्या खंडांची किती मदत होईल ह्याबद्दल मला शंका वाटते. तरीसुद्धा ह्या प्रयत्नाला दाद देणे आवश्यक आहे.
पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेसाठी नरेंद्र डेंगळे ह्यांनी महाराष्ट्रातील आर्किटेक्चरच्या परंपरा हा विषय निवडला आहे. पुढे इतिहास सादर करताना त्यात परंपरा; सौंदर्य, शैली आणि अनुभव; समाज आणि व्यक्तिनिष्ठता; निसर्गाशी नाते; महाराष्ट्रातील प्रादेशिक उदाहरणांच्या नोंदी असे पाच भाग केले आहेत. त्यामध्ये एकूण 25 लेख आहेत. त्यातील काही निबंधाच्या स्वरूपातले आहेत, तर काही संशोधन आणि अकॅडेमिक पद्धतीच्या चौकटीला अनुसरून लिहिलेले आहेत. सर्व लेखांत तळटिपा आणि संबंधित संदर्भाचा समावेश आहे. येथे सर्व लेखांचा आढावा घेतला नसला तरी त्यातील काही निवडक लेखांची तोंडओळख करून देणार आहे.
महाराष्ट्रातील वास्तुकला परंपरा आणि वाटचाल
संपादन : नरेंद्र डेंगळे
प्रकाशन : महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई
Tags: tradition and development home maharashtra marathi book sulaskhana mahajan maharashtra architecture architecture act 1972 weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या