डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मोठी बहीण विहिरीत सरसर खाली उतरते. लहान बहिणीच्या हाती एक प्लॅस्टिकचा डबा आहे. त्याला शेंदण्यासाठी एक दोरी. हा डबाही जागोजागी फुटलेला. पाच लिटर क्षमता असलेल्या या डब्यात अडीच ते तीन लिटर पाणी कसेबसे बसत असावे. विहिरीच्या तळाशी हा डबा नीट बुडणार नाही एवढंच पाणी शिल्लक आहे. खाली उतरलेल्या मोठ्या बहिणीने कष्टाने तो कसाबसा हाताच्या ओंजळीने भरला. वर असलेली लहान बहीण तो डबा शेंदते तेव्हा दगडाच्या कपारीला अनेक ठिकाणी ठेचकाळत वर आलेल्या डब्यातले अर्धे पाणी सांडून गेलेले असते. हळूहळू वरची तिन्ही भांडी भरतात. अर्धा-पाऊण तास त्यासाठी झटापट करावी लागते. मग मोठी बहीण पुन्हा सरसर वर चढू लागते. तिच्या चपळाईकडं आश्चर्यचकित होऊन पाहावं लागतं.

संगीता गरड ही नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातल्या हिंगणी या गावची महिला. गावात नळयोजनेचे पाणी नाही, विंधन विहिरी बंद आहेत. पैनगंगा नदीवर असलेल्या बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी ही बाई गेली. पाय घसरला, बंधाऱ्यात बुडाली. एका महिलेने पाहिले, लगोलग गावात बातमी पसरली. रात्री उशिरा मृतदेह आढळला.

दुसरी घटना बीड तालुक्यातील गुंजाळा या गावची. गावात पाणी नाही म्हणून अनुरथ घुगे आणि त्यांची पत्नी मीनाक्षी हे दोघे दुचाकीवरून पाणी आणत होते. शेतातील बोअरमधून पाणी भरून ड्रम घेऊन गावाकडे परतत असताना दुचाकी रस्त्यावरून घसरली. पाण्याने भरलेला ड्रम मीनाक्षीच्या अंगावर पडला आणि त्यात मीनाक्षीबाईंचा जागीच मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यातली आणखी एक घटना गेवराई तालुक्यातील चकलंबा गावची. 89 वर्षांच्या विमलबाई कान्होबा शिंदे या घरी एकट्या राहतात. मुलगा पुण्यात कामाला आहे. विमलबाई आडातून पाणी शेंदत होत्या. आडात पाय घसरला आणि त्यांना प्राणास मुकावे लागले.

बीड जिल्ह्यातल्याच वडवणी तालुक्यातल्या चिंचाळा या गावची घटना आणखी अस्वस्थ करणारी आहे. गावात पिण्याचे पाणीच नाही, लोक आपल्या शेतातून दररोज संध्याकाळी कामावरून घराकडे परतताना पाणी घेऊन येतात. बळीराम हरिभाऊ राठोड यांनी आपल्या बैलगाडीत पाण्याच्या दोन टाक्या भरल्या आणि ते गावात आले. घरासमोर बैलगाडी उभी केली. त्याच वेळी त्यांची दोन लहान मुले जयदेव (वय 8) आणि आविष्कार (वय 4) हे दोघे बैलगाडीच्या मागच्या बाजूस होते. अचानक गाडीच्या दांड्या उचलल्या गेल्या आणि क्षणात दोन्ही टाक्या कोसळल्या. या भरलेल्या पाण्याच्या टाकीखाली दबून गेल्याने जयदेव व आविष्कार या दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातील मैंदवाडीजवळ रूपसिंग तांडा आहे. सामका संतोष राठोड या नावाची मुलगी कृष्णा या चुलत भावासोबत तांड्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या रामचंद्र तांबे यांच्या विहिरीतून पाणी आणण्यासाठी गेली. घागरीने पाणी काढत असताना पाय घसरून पडली, सामका विहिरीत बुडाली. काठावर असलेल्या कृष्णाने आरडाओरडा केला, मात्र तोवर सामकाचा मृत्यू झाला होता.

भोकरदन तालुक्यातील (जिल्हा जालना) गोकुळ या गावची एक घटना. दीपाली विष्णू शिंदे ही मुलगी सकाळी पाणी आणण्यासाठी आईसोबत गेली. आई कपडे धूत होती आणि दीपाली आईला पाणी शेंदून देत होती. एका क्षणी दीपालीचा तोल गेला, ती विहिरीत पडली. डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाली. अठराशे लोकसंख्या असलेले हे गाव. टँकरद्वारे पाण्यासाठी विहीरही अधिग्रहित केलेली. तरीही गावातल्यांचे पाण्याविना हाल. तोल जाऊन विहिरीत पडलेल्या दीपालीचा अखेर मृत्यू झाला.

तीन वर्षांपूर्वी ज्या लातूरला रेल्वेने मिरजेहून पाणी आणावे लागत होते, त्याच लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातल्या आलमला या गावी अरुंद आडात गाळ काढण्यासाठी उतरलेल्या एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झाला. पाणी मिळत नाही म्हणून शेजारचा आड उपसण्यासाठी आणि आडातला गाळ व कचरा काढून टाकण्यासाठी सुरुवातीला सद्दाम फारुख मुलाणी हा तरुण उतरला. तो खाली गेला खरा, पण खाली गेल्यानंतर त्याची हालचाल थांबली. काय झाले म्हणून सद्दामचा चुलतभाऊ सय्यद दाऊद मुलाणी खाली उतरला. त्याचीही अवस्था तीच झाली. दोघेही गाळात रुतले की काय, असे फारुख खुदबुद्दीन मुलाणी यांना वाटले आणि तेही खाली उतरले. त्यांची हालचाल थांबली. मुलाणी कुटुंबातले तीन जण आडाच्या तळाशी गेल्यानंतर ऑक्सिजन न मिळाल्याने बेशुद्ध होऊन पडले. तिघांनाही दवाखान्यात हलविले गेले. डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केले.

सेलू तालुक्यातल्या (जि.परभणी) गुळखंड या गावात सात वर्षीय पायल शंकर आडे ही मुलगी आपल्या आईसोबत पाणी आणण्यासाठी गेली आणि विहिरीत पडली.

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा येथे मेहबूब पाशा अब्दुल करीम सौदागर हे 60 वर्षीय गृहस्थ पाणी भरण्यासाठी गेले आणि चक्कर येऊन विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. केवळ मराठवाड्यात घडलेल्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यातल्या काही घटना आहेत. याशिवाय आणखीही काही घटना नजरेतून सुटल्या असतील.

अलीकडे प्रसारमाध्यमांतून मराठवाड्याचा उल्लेख ‘टँकरवाडा’ असा केला जातो. कारण मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यांत मिळून 3163 टँकर धावत आहेत. आठ जिल्ह्यांतली 2231 गावे आणि 781 वाड्यांमधील 50 लाख 59 हजार नागरिकांची तहान टँकरवर भागवली जाते. हे चित्र मे महिन्याच्या अखेरीस होते. जून महिन्यात त्यात आणखी भर पडली. दर वर्षी पावसाळ्याला प्रारंभ झाला तरीही अनेक गावांतून टँकर हटत नाही, असा आजवरचा अनुभव आहे. वरील सर्व घटना ज्या गावी घडल्या, त्यातल्या अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा होतो. टँकर कधी येईल याचा नेम नसतो. अनेकदा मध्यरात्रीही टँकरभोवती गराडा पडलेला दिसतो. दिवसभर कष्टाच्या कामाने आंबून गेलेले शरीर, जमिनीला पाठ लावल्यानंतर दुसऱ्या क्षणात डोळा लागेल अशी स्थिती; तरीही सारा शिणवटा थोपवून टँकरची वाट पाहत रात्र जागून काढावी लागते.

केवळ टँकरवर सर्वांची तहान भागत नाही, म्हणून लोक मिळेल त्या वाहनाने आणि मिळेल त्या ठिकाणाहून कधी पायी तर कधी दुचाकीवर पाणी आणण्याचा प्रयत्न करतात. पाणीटंचाईची सर्वांत जास्त झळ महिला व लहान मुलांना सोसावी लागते. कारण मुलांना उन्हाळ्याच्या सुट्‌ट्या लागलेल्या असतात, घरातली मोठी माणसं कामावर गेलेली असतात. त्यामुळे लहान मुलांना पाणी आणण्यासाठी जुंपलेले असते.

मराठवाड्यात पाणी आणण्यासाठी म्हणून गेलेल्या ज्या जीवांचा मृत्यू झाला, त्यात सात वर्षांच्या मुलीपासून ते 89 वर्षांच्या वृद्ध महिलेपर्यंत सर्वांचा समावेश आहे. पाणीटंचाई केवळ भीषण असल्याच्या बातम्या आपण वर्तमानपत्रांतून वाचतो, मात्र घोटभर पाण्यासाठी प्राणास मुकावे लागण्याच्या या काही घटना प्रातिनिधिक आहेत. तोटी फिरवल्याबरोबर हवं तेवढं पाणी मिळणाऱ्यांच्या जगात या घटनांची दखल किती घेतली जाते, माहीत नाही; पण फेसाळणारे, पूर्ण दाबाने नळावाटे बाहेर पडणारे पाणी आणि खडकातून ओल पाझरावी तसे झिरपणारे पाणी यात नक्कीच फरक आहे.

दुष्काळग्रस्त भागात ‘केवळ पाणी भरणे’ हेच अनेक महिलांचे पूर्णवेळ काम असते. उन्हाळ्यात हाताला काम नसते, पाण्याचे सर्व स्रोत आटलेले असतात. अशा वेळी कुठं तरी एखाद्या विहिरीत झिरपणारं पाणी, नदीच्या पात्रात खड्डा खोदून उपसलं जाणारं पाणी, असा शोध चाललेला असतो. डोंगराळ भागात पाण्याचं दुर्भिक्ष आणखी भीषण असतं. गावात येणाऱ्या टँकरचे पाणी एखाद्या विहिरीत सोडले जाते, हे पाणी उपसण्यासाठी अक्षरशः झुंबड उडालेली असते. चार-दोन भांडं पाणी हाताला लागले तरी दिवस सार्थकी लागला, अशी परिस्थिती.

यवतमाळ जिल्ह्यातले सावरगाव बंगला हे गाव. लोकसंख्या जेमतेम तीन हजार आहे. गावात 50 टक्के बंजारा समाज राहतो. साखर कारखान्याच्या ऊस, तोडणीसाठी गेलेले मजूर गावी परतलेले आहेत. गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे. एक आश्रमशाळाही आहे. दुपारी 46 अंशांचा तापमानाचा पारा तडकलेला आहे. तरीही घरातली माणसं चिल्या-पिल्ल्यांसकट पाण्याच्या शोधात दिसतात. कुठं सायकलवर कॅन अडकवलेले, तर कुठं लहान मुली आणि महिलांच्या डोक्यावर रिकामे हंडे. जणू साऱ्या गावाच्याच घशाला कोरड पडलेली! प्रत्येकाच्या घरासमोर पाण्याच्या रिकाम्या टाक्या, बादल्या, प्लॅस्टिकच्या घागरी मांडून ठेवलेल्या दिसतात.

गाव ओलांडून जरा पुढं गेल्यानंतर घाटमाथा लागतो, तिथंच जारचं पाणी विकण्याचा एक प्लांट आहे. श्रावण गुलाबसिंग चव्हाण हे गृहस्थ या ठिकाणी भेटले. ‘साऱ्या गावात पाण्याची एवढी मोठी टंचाई आहे, तर तुम्ही पाणी कुठून आणता?’ असे त्यांना विचारलं. ते म्हणाले, ‘‘आम्हाला आता गावात पाणीच मिळत नाही, आम्ही बाहेरूनच फिल्टरचं पाणी आणतो आणि इथं फक्त कूलिंग करतो. गावात काही ठिकाणी जार विकले जातात, पण सगळ्यात मोठी ऑर्डर लग्नाची असते. आमच्याकडं लग्नाच्या सगळ्या तारखा बुक झाल्यात.’’

श्रावण गुलाबसिंग चव्हाण यांचं म्हणणं खरं आहे. कारण अलीकडे ग्रामीण भागात लग्नांमध्ये जारचे पाणी वापरणे हीसुद्धा प्रतिष्ठेची बाब झालीय. पूर्वी लग्नात एखादा टँकर पिण्याच्या पाण्यासाठी आणला जायचा, आता लग्नात येणाऱ्या वऱ्हाडीमंडळींची संख्या गृहीत धरून जार मागवले जातात.

सावरगाव बंगला आणि आजूबाजूच्या गावांसाठी ‘चाळीसगाव पाणीपुरवठा योजना’ अस्तित्वात आली, ज्या नदीवरून ही योजना कार्यान्वित करण्यात आली त्या पैनगंगा नदीचं पात्र कोरडंठाक. त्यामुळे पाणीपुरवठा योजनेचा केवळ सांगाडाच शिल्लक दिसतो. गावाबाहेर असलेल्या जलकुंभात अनेक दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट आहे. गावाबाहेरच्या माथ्यावर ‘विमुक्त जाती- भटक्या जमाती आश्रमशाळा’ आहे. या शाळेच्या जवळ गेलं तर इसापूर धरणाचं पाणी अक्षरशः नजरेच्या टप्प्यात दिसतं. जणू पाणी गावाच्या उशाला आहे, पण गावकऱ्यांचा घसा मात्र तहानलेला. हे डोळ्यांना दिसणारं पाणी आहे की, याला मृगजळ म्हणायचं- असा प्रश्न पडावा इतपत गावकऱ्यांना या पाण्याकडं दुर्लक्ष करावं लागतं.

‘‘गेल्या साली नागपंचमीनंतर पाऊसच नाही ना. दोन बॅग जेवारी पेरली, त्याला तीन पोत्यांचा उतार आला. मूग, उडीदाला तर काहीच नाही. शेंगा लागायचा टाइम की जागच्या जागीच होरपळून जळून गेलं सम्दं!’’ असं याच गावचे भारत संभाजी बरडे सांगतात. त्यांची जमीन आहे कोरडवाहूची सात एकर.

सावरगावची लोकसंख्या तीन हजार आणि दररोज सकाळी दहा हजार लिटर पाणी असलेला एक टँकर येतो, गावाबाहेरच्या विहिरीत रिचवला जातो. तीन हजार लोकांना दहा हजार लिटर पाणी कसं पुरणार, असा विचार तुमच्या मनात आला तरीही तो जागच्या जागीच जिरणार. कारण सकाळी टँकर येऊन गेलेला आहे, गावातल्यांनी पाणी उपसून झालंय. आता तळाशी जे काही पाणी उरलंय, ते शेंदून काढता येत नाही म्हणून शिल्लक राहिलंय. दोघी बहिणी या ठिकाणी आल्या आहेत. एकीच्या डोक्यावर प्लॅस्टिकची घागर आहे आणि दुसरीच्या डोक्यावर एकावर एक ठेवलेले स्टीलचे दोन हंडे. उन्हाची तीव्रता अक्षरशः माणसाची लाही फुटेल अशी. मोठी बहीण विहिरीत सरसर खाली उतरते. लहान बहिणीच्या हाती एक प्लॅस्टिकचा डबा आहे. त्याला शेंदण्यासाठी एक दोरी. हा डबाही जागोजागी फुटलेला. पाच लिटर क्षमता असलेल्या या डब्यात अडीच ते तीन लिटर पाणी कसेबसे बसत असावे. विहिरीच्या तळाशी हा डबा नीट बुडणार नाही एवढंच पाणी शिल्लक आहे. खाली उतरलेल्या मोठ्या बहिणीने कष्टाने तो कसाबसा हाताच्या ओंजळीने भरला. वर असलेली लहान बहीण तो डबा शेंदते तेव्हा, दगडाच्या कपारीला अनेक ठिकाणी ठेचकाळत वर आलेल्या डब्यातले अर्धे पाणी सांडून गेलेले असते. हळूहळू वरची तिन्ही भांडी भरतात. अर्धा- पाऊण तास त्यासाठी झटापट करावी लागते. मग मोठी बहीण पुन्हा सरसर वर चढू लागते. तिच्या चपळाईकडं आश्चर्यचकित होऊन पाहावं लागतं. ‘कुठून बळ गोळा करत असतील हे लोक?’ असाही प्रश्न पडतो. फक्त तीन भांडी भरण्यासाठी एवढा सारा खटाटोप. बरं, जे पाणी शेंदून काढलंय ते विहिरीच्या तळातलं असल्यानं कमालीचं गढूळ.

खाली पाणी भरून देणाऱ्या आणि आता वर आलेल्या मुलीला विचारलं, ‘‘हे सांडपाणी म्हणून, का धुण्या- भांड्याला?’’ तिने मान हलवली. ‘‘नाही. हे पिन्यासाठी चालविलंय!’’ असं तिचं उत्तर असतं. आपण पुन्हा एकदा त्या पाण्याकडे पाहतो.

ती मुलगी सांगत असते, ‘‘तीन ठिकाणाहून पाणी आणावं लागतं. गावाच्या तिकडल्या बाजूला घाट चढावा लागतो. दोन हंडे टकुऱ्यावर राहत्यात. घाट चढायला अवघड जाते. पाणी आनु-आनु दम लागते. तेबी पानी गढूळचंय. ते धुन्या-भांड्याला वापरतो हामी.’’ माथ्यावर ठेवायची चुंबळ गुंडाळीत म्हणजे ‘‘ते खालून जे पाणी आणतो हामी, ते हिरवंगारचंय. प्यायच्या कामाचं नाही, ते सांडाउंडीला कामा येतं. दुसरं कामच नाही ना काही. पान्यातच दिवस जाते.’’

‘गावात सध्या हाताला काय काम आहे?’ असं विचारलं. त्यावर तिचं उत्तर ‘नाही’ असं आलं. सहा महिने ऊसतोडीचं काम करायचं, कारखान्याचा पट्टा पडल्यानंतर गावी जायचं- असं बऱ्याच गावांमध्ये आढळतं. ‘‘आता काम नाही, पन बरसातीत लागते नं काम, खुरपनाटुरपनाचं.’’ असं उत्तर तिच्याकडून मिळतं. खाली पाय पोळत असतात. दोघीही बहिणींच्या पायांत काहीच नाही. मोठी बहीण स्टीलचं भांडं डोक्यावर ठेवते, त्यावर आणखी दुसरं. लहान बहीण प्लॅस्टिकची भरलेली घागर डोक्यावर घेते. इथलं पाणी भरल्यानंतर त्यांना गावाच्या दुसऱ्या बाजूला असलेला डोंगर उतरून पुन्हा आणखी पाणी आणायचंय. मोठ्या बहिणीला तिचं नाव विचारलं. तिनं सांगितलं, ‘‘वर्षा... वर्षा लखन जाधव!’’ भाजणारे पाय चटाचटा उचलले जातात आणि एवढ्या धगधगत्या उन्हातही ‘वर्षा’ हे नाव चराचरा पोळू लागतं.

Tags: Drought Asaram Lomate दुष्काळ आसाराम लोमटे sadhana archieve sadhana weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

आसाराम लोमटे
aasaramlomte@gmail.com

पत्रकार व लेखक.  आसाराम लोमटे यांचे आलोक (कथासंग्रह), इडा पिडा टळो (कथासंग्रह),धूळपेर (लेखसंग्रह) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. आलोक या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (2016) मिळाला आहे. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके