डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आमच्या मराठी शाळेचे मुख्याध्यापक गावकर गुरुजी गणपतीच्या मूर्ती घडवायचे. पहिल्या पाळीवरून ते चारपर्यंत घरी यायचे. आंघोळ, चहा-पान उरकून ते बाहेर  पडायचे. हातात एक पिशवी आणि त्यात त्यांचं रंगाचं साहित्य. त्यांच्या मागोमाग  मी! ज्या घरी चित्र काढायचे आहे तिथली भिंत आधीच ठरलेली असायची. दोन-तीन दिवस आधीच नीळ घातलेला पांढरा चुना त्या भिंतीला फासलेला  असायचा. पिशवीतून चित्रे काढून जमिनीवर पसरायचे. बहुतेक वेळा कुरुक्षेत्रावर  श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतोय आणि भोवताली युद्ध सुरू आहे असंच  चित्र असायचं. स्वामी त्या भिंतीवर मोजमाप घेत तशा रेघोट्या काढायचे. हे झालं  की चित्राची आऊटलाइन काढायचे आणि त्यातून जमिनीवर पसरलेल्या त्या  चित्रातील प्रतिमा भिंतीवर आकार घ्यायला लागायच्या. गावकर गुरुजींना मूर्ती घडवताना आSHOKASणि जिरय्या स्वामींना चित्र काढताना पाहणं यातून मी या दोन्ही कला शिकलो जरी नाही, तरी त्या घडतानाचा प्रवास त्या बालवयातलं कुतूहल पुरवत गेला. बालवय असं वयाच्या आणि कला  समजुतीच्या संदर्भात देखील म्हणता येईल!  

नाटकवाले जिरय्या स्वामी यांच्यात आणखी एक विलक्षण कलागुण होता. ते चित्र  काढायचे. मी जो पहिला चित्रकार पाहिला, तो त्यांच्याच रूपात! त्या काळी, खरं तर अजूनही, घराच्या भिंतींवर पुराणातले देखावे काढण्याची प्रथा आहे. मोठ्या शहरात नसेल, परंतु गावखेड्यांतून अजूनही हा कलाप्रकार प्रचलित आहे. जिरय्या  स्वामी अशीच चित्रे काढीत. मधूनच कधी तरी हे काम त्यांना मिळे. मी त्यांच्या आसपास सतत वावरत असल्यामुळे मला सहजच ते कळे. त्यांची या कामाची वेळ सायंकाळी पाच ते रात्री नऊ वगैरे असे. जेव्हा त्यांचे हे काम चाले, त्या दिवसांत मी सायंकाळी करायचा  अभ्यास दुपारीच करून ठेवीत असे. शिवाय संध्याकाळचा माझा एक आवडीचा खेळ असे. चाळीतल्या दोस्तमंडळींना जमवून पाठ्यपुस्तकातल्या कविता म्हणणे, गोष्टीच्या  पुस्तकातील गोष्टींचे वाचन करणे आणि कधी कधी स्वत:च रचून गोष्टी सांगणे. माझ्या या खेळात दोघे-तिघे सोडले तर बाकीचे निरुपाय झाल्यासारखे सामील व्हायचे. मला ते कळायचे. कधी तरी मी त्यांना या सर्वांचे महत्त्व पटवून द्यायचो. त्यांना पकडापकडी, लपाछपी असे खेळ खेळायचे असायचे. मला फक्त एकाच खेळात विशेष रुची होती... तो खेळ म्हणजे क्रिकेट!

चाळीच्या टीमचा मी कॅप्टन होतो. क्रिकेटचंदेखील वेड होतं  म्हणण्याइतका छंद! आणि हे पुऱ्या वस्तीला माहीत होतं. म्हणून मला लोक येता-जाता  चिडवायचे, ‘‘नरी काँट्रॅक्टर का चाचा..!’’ नरी काँट्रॅक्टर त्या वेळी भारताचे कॅप्टन होते आणि इतर अनेकांप्रमाणे माझेही ते हीरो  होते. क्रिकेटमध्ये माझा आणखी एक हीरो होता. नरीला प्रत्यक्ष खेळताना कधी पाहणं शक्यच  नव्हतं, परंतु या माझ्या हीरोला मी सातत्याने खेळताना पाहत होतो. त्याचं नाव काय, हे  आम्हाला कधीच कळलं नाही. त्याला सर्व जण ‘दाढीवाला’ म्हणायचे. ज्या गिरणीत माझे  वडील नोकरीला होते, त्या मफतलाल मिलच्या टीममध्ये तो  होता. त्याने त्या वेळी केवढ्या सेंच्युऱ्या मारल्या असतील  त्यांची गणतीच करता येणार नाही. अगदी सेंच्युरी नाही, तर हाफ सेंच्युरी ठरलेलीच.

एकदा तो असाच मस्त रंगात येऊन खेळत होता. पन्नाशी  पार केली होती. धडाक्यात खेळत होता. इतक्यात रस्त्याने  जाणाऱ्या वडलांनी मला पाहिलं. ‘केस कापून ये’ असं दोनतीन  दिवस ते मला बजावत होते. त्या दिवशी सकाळीही  त्यांनी दम दिला होता. आणि आता मी त्यांना मैदानात  दिसलो होतो. त्यांनी माझं बखोटं धरलं आणि दहाएक मिनिटांच्या अंतरावर असलेल्या सलूनमध्ये मला अक्षरश: फरफटत नेलं. जाता-जाता वळून-वळून बघता येईल  तोपर्यंत मी माझ्या हीरोची फटकेबाजी पाहत होतो आणि आज त्याची सेंच्युरी पाहता येणार नाही म्हणून खंतावत  होतो. सलूनमधल्या कारागिराच्या हाती मला सोपवत आणि ‘गोटा दिसला तरी चालेल- चांगले बारीक कर सगळे केस,’ असा आदेश देऊन वडील निघून गेले. कारागिराने डोक्यावर वाढलेलं जंगल एका बाजूने बऱ्यापैकी सफाचट केलं.

त्याच वेळी एक माणूस आला. कारागिराने मला बाजूच्या  बाकड्यावर बसायला सांगितलं आणि त्याची दाढी करायला  घेतली. मैदान गाजवीत असलेल्या माझ्या हीरोची सेंच्युरी  पाहायला मिळते की नाही, म्हणून आधीच माझा जीव कासावीस झालेला आणि त्यात हा असा वेळ चाललेला. कुणाचं माझ्याकडे लक्ष नाही, असं पाहत मी हळूच गळ्यातला पांढरा रुमाल सोडला आणि सटकलो. जीव  खाऊन धावत सुटलो. मैदान गाठलं. ‘दाढीवाला’ 112 वर  खेळत होता. सेंच्युरी पाहणं चुकलंच. चुटपूट लागली. पण गडी तुफान खेळत होता. त्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा  तो 168 वर नाबाद होता. मैदानाभोवती जमलेले बघे  टाळ्या, शिट्या वाजवून त्याला सलामी देत होते. तो आत जाताच काहींचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि जो-तो पोट धरून हसत सुटला. प्रथम मला कळेना? नेमकं काय झालं, मग लक्षात आलं माझे केस एकाच बाजूने कापलेले होते!

मी  भोट दिसत असणार. पण आता सलूनमध्ये कसा जाणार? हसणाऱ्या पोरांना चुकवत तसाच घरी गेलो. माझा अवतार पाहून आई खवळली. ‘‘डोक्यात एकदा काही घेतलं की तेच आणि तेवढंच  दिसतं. आरशात बघ जरा ध्यान तुझं...’’ थोरल्या भावाने जबरदस्तीनं सायकलवर टाकलं आणि  सलूनमध्ये नेलं. तिकडे हसं झालं ते वेगळंच!  सिनेमा, नाटक, क्रिकेट यांचं जरी हे असं थेट वेड होतं तरी अभ्यासाची तेवढीच गोडी होती. चित्रकला वगळता  सर्वच विषयांत जवळपास पैकीच्या पैकी गुण मिळायचे. माझे निबंध सर्व वर्गात वाचून दाखविले जायचे. गृहपाठ तर  वेळेआधी करायचोच, परंतु पाठ्यपुस्तकात सुचविलेला  तसंच माझा मलाही सुचलेला अतिरिक्त अभ्यासही मी  करायचो.

त्यातली एक गोष्ट म्हणजे, म्हणींचा आणि  वाक्प्रचारांचा साठा करणे. शिवाय एका वेगळ्या वहीत  कसली कसली माहिती लिहून ठेवणे. सिनेमा आणि नाटक पाहता पाहता ते करून पाहण्याचाही  उद्योग करायचो. सिनेमाचा फक्त खेळच! कुठून कुठून  फिल्मचे तुकडे जमवायचो. वडलांच्या जुन्या धोतराचा  वारभर लांबी-रुंदीचा तुकडा, एक आरसा आणि दुर्बिणीला  असते तशी काच- हे बाकीचं सामान जमवलं की, माझे  सिनेमाचे खेळ आमच्या जिन्याखालच्या अंधाऱ्या जागेत  सुरू व्हायचे. बाहेर उन्हात दगडाच्या साह्याने आरसा असा  उभा करायचा की, त्याचा कवडसा या जिन्याखालच्या  जागेत येईल. भिंतीवर धोतराचं फडकं पडदा म्हणून लावलेलं  असायचं. हा कवडसा दुर्बिणीच्या त्या काचेवर घ्यायचा  आणि त्याच्या पलीकडे फिल्मचा तुकडा उलटा धरायचा की  पडद्यावर त्याची सुलटी प्रतिमा उमटायची. हा माझा फिल्म शो!

मग एका मागोमाग एक फिल्मचे तुकडे धरत जायचो. पुढे-पुढे मी आणखीही एक प्रकार करू लागलो. जमेल तसा  त्या फिल्मच्या तुकड्यांचा क्रम लावू लागलो. त्यातून काही  तरी सलगपणे कळायचं. मग मी त्यावर बोलायचो आणि  मीच जुळवलेली कथा सांगायचो. माझा हा शो खूप  चालायचा. एका शोचं तिकीट म्हणजे पाटीवरच्या पेन्सिलीचे  दोन तुकडे! असे खूप तुकडे माझ्याकडे जमायचे, कारण मी नाटकही करायचो. पाठ्यपुस्तकात ‘गड आला पण सिंह गेला’ अशी एक  नाटिका होती. नाटकात रस असलेल्या, नसलेल्या पोरांना  गोळा करून मी ती करायचो. त्यासाठी लागणाऱ्या ढाली- तलवारी, मुकुट वगैरे ऐतिहासिक जामानिमा माझा मीच तयार  करायचो. कारण मलाच नाटक करायची हौस सर्वांत जास्त असायची. जिरय्या स्वामीसुद्धा स्वत:च सगळं करायचे. या  नाटिकेचे मी त्या वेळी किती तरी प्रयोग केले असतील. त्याचेही तिकीट- म्हणजे पाटीवरच्या पेन्सिलीचे  दोन तुकडे! सहावीत असताना तर मी माझं पहिलं नाटक लिहिलं. ‘चांदोबा’ तील एका गोष्टीवर ते आधारलेलं होतं. गोष्टीचं  नाव होतं- ‘पराक्रमी राजपुत्र’, पण माझ्या त्या चार प्रवेश  असलेल्या नाटिकेचं नाव होतं- ‘राजरत्न’!

नाटकात गाणं असतं म्हणून अखेरच्या प्रवेशात, ‘अजि मी राजरत्न  मिळविले’ असं एक गाणं मी लिहिलं होतं. दिग्दर्शक मीच  होतो. राजपुत्र चारही प्रवेशात असल्यामुळे आणि मुख्य  म्हणजे सर्वांत जास्त संवाद त्याचेच असल्यामुळे मलाच ती  भूमिका करावी लागली. ‘आपल्याला नाही एवढं पाठ  करायला जमणार’ म्हणत कुणी तयार होईना. एक पंचाईत  होती. मीच लिहिलेलं आणि मीच चाल लावलेलं गाणं मला म्हणावं लागणार होतं. सिनेमातली गाणी गुणगुणणं, म्हणणं  वेगळं आणि नाटकातल्या व्यक्तिरेखेसाठी गाणं म्हणणं  वेगळं, एवढं कसं काय ते मला कळलं आणि मग मी  उमाकांत राऊत या आमच्या ग्रुपमधल्या मुलाला गायक  बनवलं. चादरीच्या पडद्यामागे तो गात होता आणि मी ओठ  हलवत हातवारे करीत होतो. या नाटिकेची रिहर्सल आम्ही एका आडबाजूला करीत  असू. वाटेने जाणाऱ्यांचं लक्ष जाऊ नये, हा आमचा उद्देश!

एकदा अशीच आमची रिहर्सल चालली होती आणि रस्त्याने  जाणारे जिरय्या स्वामी पुढे न जाता आमच्या दिशेने वळले. आम्ही लगेचच रिहर्सल थांबवली आणि उगाच इकडे- तिकडे करीत राहिलो. ‘‘काय रे मुलांनो, नाटकासारखं काही तरी खेळत होता  नं? थांबलात का...? ’’ त्यांनी नेमकं ओळखलं होतं. पण आम्हीही नाटक  बसवतोय, हे त्यांना कसं सांगणार? आम्ही काहीसे  अवघडल्यासारखे उभे होतो. त्यांनी पुन्हा विचारलं. तेव्हा  आमच्यातल्या एकाने माहिती दिली. मग त्यांनी रिहर्सल सुरू  करायला सांगितली. काही वेळ थांबून त्यांनी ती पाहिली  आणि ते निघून गेले. त्याच दिवशी संध्याकाळी नवरात्र  मंडळाची मीटिंग होती. स्वामींनी मंडळाला सांगितलं, ‘यंदा या मुलांचं नाटक होईल आणि मग गरबा.’ इतकंच नाही तर त्यांनी, आपण या मुलांचा मेकअप करणार, असंही जाहीर  करून टाकलं आणि खरोखरीच त्यांनी आमचा मेकअप  केला!

आम्ही आपले कोळसा, खडू घेऊन रंगणार होतो  आणि त्या नटसम्राटाने स्वत:हून आम्हाला मेकअप केला! माझी ती पहिली कमाई, पहिला पुरस्कार- असं मी कायम  मानत आलो. यानंतर मी भारत-पाकिस्तानच्या युद्धात दिलीप गुप्ते या तरुणाने गाजविलेल्या पराक्रमावर ‘व्यर्थ न हो बलिदान’  ही नाटिका लिहिली. नंतर लगेचच ‘खुनी दारू’ अशी एक नाटिका लिहिली. आमच्या कामगार वस्तीत दारूचे  दशावतार मी पाहत होतोच. त्यातून मला ही नाटिका सुचली  होती. खुनाचा आरोप असलेला त्यातला नायक, ‘मी नाही, तर या दारूने खून केलाय’, असं कोर्टात सांगतो आणि दारू  कशी वाईट यावर भाष्य करतो. कोर्टाचं दृश्य लिहायला मला  सिनेमांची मदत झाली असणार. ‘आता मी आणखी एक  नाटिका लिहितोय’ असं मी आमच्या ग्रुपला सांगताच, आमच्यात सर्वांत थोराड दिसणारा आणि ज्याला आम्ही  निर्माता म्हणत असू, तो तुकाराम जवळपास खेकसलाच  माझ्यावर. ‘‘आधीच्या नाटिका केल्याशिवाय पुढची एवढ्यात लिहायची नाही.’’ सुचलेली नाटिका डोक्यात नीट शिजली नव्हती म्हणा की  तुकारामला घाबरून म्हणा- नेमकं माहीत नाही, परंतु मी ती  नाटिका लिहिलीच नाही. तोवरची माझी नाट्य कारकीर्द जवळपास तिथेच संपली. परंतु जिरय्या स्वामींनी आमची रिहर्सल पाहून आम्हाला  त्यांच्या नाटकाचा प्रोफेशनल मेकअप करणं ही माझ्यासाठी  मोठी गोष्ट होती.

हं, तर मी त्यांच्यातल्या चित्रकाराबद्दल  सांगत होतो. परंतु त्याआधी याच संदर्भातली आणखी एक गोष्ट सांगायला हवी. नवसारीच्या आमच्या एकमेव मराठी शाळेचे मुख्याध्यापक गावकर गुरुजी गणपतीच्या मूर्ती घडवायचे. लहान-सहान घरगुती गणपतीपासून ते सार्वजनिक मंडळांच्या  मोठ्या गणपतीपर्यंत ते नाना आकाराच्या आणि प्रकारच्या  मूर्ती करायचे. मला तेही पाहावंसं वाटायचं. पण ते अवघड  होतं. कारण त्या मूर्ती घडवताना त्यांच्या आसपास राहणं  शक्यच नव्हतं. कारण ते मुख्याध्यापक! ‘काय रे- शाळा, अभ्यास नाही का?’ असं ते खडसवायचे. तसा त्यांचा  दराराही होता शाळेवर! पण मला त्यांना मूर्ती घडवताना पाहायचंच असायचं. मग मी चोरून इथून-तिथून त्यांना  काम करताना पाहत रहायचो. एक दक्षता घ्यायचो की, त्यांची पाठ आपल्यासमोर राहील. अधून-मधून बाजूनेही ते  दिसायचे. पण मी त्यांच्या नजरेस पडायचो नाही. ते आपल्या  कामात मग्न असायचे. त्यांची छान तंद्री लागलेली असायची. ते ज्या पद्धतीने हलक्या हाताने मातीचा गोळा घेऊन  पुढ्यातल्या पाटावर वा हातावर मळायचे, तेव्हाची त्यांची  हालचाल विशेष वाटायची.

त्या वेळी मधेच कधी तरी आई  किंवा इतर बायका चपात्या किंवा भाकरीचं पीठ कसं जोर  लावून मळतात ते आठवायचं आणि मूर्ती घडवायची असेल  तर अशी नाजूकपणे हाताळली पाहिजे, असं काही तरी  कळायचं. मूर्ती घडवताना ते ज्या पद्धतीने बोटांचा वापर  करायचे आणि त्यातून मूर्ती जशी पाहता-पाहता आकाराला यायची ते सारं पाहत राहावंसं वाटायचं. नुसता एक मातीचा  गोळा आणि मग त्यातून आकाराला येत जाणारी मूर्ती- हे काही तरी अद्‌भुत दृश्य असायचं. आमच्या चाळीचा सार्वजनिक गणपती गुरुजीच करायचे. ते जेवढे ठेंगणे होते, तेवढीच ती मूर्ती असायची. आणखी  एक गमतीचा भाग म्हणजे किमान दोन-तीनदा तरी मी त्यांना  गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंडपात येऊन आजूबाजूचं  राहून गेलेलं रंगकाम करताना पाहिलंय. खूप काम असलं की  कलावंताला हे करावंच लागत असणार, असं काही तरी माझ्या मनात येत असावं; अन्यथा हा इतका बारीक तपशील  स्मरणात कसा राहिला असता? गावकर गुरुजींच्या घरात जाणं शक्य नसल्यामुळे आडोसा  धरून लांबून हे सारं अवघडल्या अवस्थेत पाहावं लागायचं. परंतु मला त्याची क्षिती नसायची. या गावकर गुरुजींनी वर्गात  एकदा एक गोष्ट सांगितली होती... एकदा श्रीकृष्णाने धर्मराजाला जग पाहून यायला  सांगितलं. धर्मराज जाऊन आला. श्रीकृष्णाने विचारलं, ‘‘कसं आहे जग?’’ धर्मराज म्हणाला, ‘‘सुंदर! माणसंही किती चांगली!’’ मग श्रीकृष्णानं दुर्योधनाला पाठवलं. तो आला. म्हणाला, ‘‘घाणेरडं आहे जग आणि माणसंही.’’ गोष्ट सांगून झाल्यावर गावकर गुरुजींनी आम्हाला विचारलं, ‘‘काय कळलं या कथेतून?’’ आमच्यातल्या कुणी काही धड काही उत्तर दिलं की नाही; आठवत नाही, परंतु त्यांनीही फोड करून सांगितलं  नाही. कथेचा अर्थबोध नंतर कधी तरी झालाच, परंतु पुढे मोठा झाल्यावर. आणखी एक गोष्ट कळली की, मास्तर  असावा तर असा. उत्तर न देणारा, परंतु उत्तर शोधण्याची  ओढ लावणारा!

तर, मी सांगत होतो जिरय्या स्वामीविषयी. पहिल्या पाळीवरून ते चारपर्यंत घरी यायचे. अंघोळ, चहा-पान उरकून ते अर्ध्या-पाऊण तासात बाहेर पडायचे. हातात एक पिशवी आणि त्यात त्यांचं रंगाचं साहित्य. त्यांच्या मागोमाग मी! ज्या घरी चित्र काढायचे आहे तिथली  भिंत आधीच ठरलेली असायची. दोन-तीन दिवस आधीच  नीळ घातलेला पांढरा चुना त्या भिंतीला फासलेला  असायचा. ती भिंत स्वामी आपल्याकडच्या फडक्याने साफ  करून घ्यायचे. पिशवीतून एक चित्र काढून जमिनीवर  पसरायचे. त्यात कुठला तरी पुराणातला प्रसंग असायचा. बहुतेक वेळा कुरुक्षेत्रावर अर्जुनाच्या रथाचं सारथ्य श्रीकृष्ण  करतोय आणि भोवताली युद्ध सुरू आहे, असंच चित्र  असायचं. त्या चित्रावर त्यांनी उभ्या-आडव्या प्रमाणशीर  रेघा मारलेल्या असायच्या. त्यातून छोटे-छोटे चौकोन तयार  झालेले असायचे. स्वामी मग त्या भिंतीवर मोजमाप घेत तशा  रेघोट्या काढायचे. हे झालं की चित्राची आऊटलाइन  काढायचे आणि त्यातून जमिनीवर पसरलेल्या त्या चित्रातील  प्रतिमा भिंतीवर आकार घ्यायला लागायच्या. मग त्यातले  बारकावे भरले जायचे आणि मग रंगांचा उत्सव सुरू  व्हायचा.

चित्रात रंग उतरायचे... आणि नमुना म्हणून समोर  ठेवलेल्या चित्रासारखं चित्र भिंतीवर हुबेहूब साकारायचं. अर्थात याला दिवसच्या दिवस लागायचे आणि तेवढे दिवस  मी तिथेच बसून असायचा. मुळातली कळकट, मळकट  भिंत- मग तो पांढरा चुना ते मग एकेक टप्पा पार करीत पुरं  होणारं चित्र- हा सारा प्रवास केवळ अचंबित करणारा नसायचा; तर जिथे काहीच नव्हतं तिथे सुंदर असं काही तरी  अवतरलं, असा भारावून टाकणारा अनुभव असायचा. गावकर गुरुजींना मूर्ती घडवताना आणि जिरय्या स्वामींना चित्र काढताना पाहणं यांतून मी या दोन्ही कला शिकलो जरी  नाही, तरी त्या घडतानाचा प्रवास त्या बालवयातलं कुतूहल पुरवत गेला. बालवय असं वयाच्या आणि कला समजुतीच्या संदर्भातदेखील म्हणता येईल!

Tags: अशोक राणे सिनेमा पाहणारा माणूस राजरत्न पराक्रमी राजपुत्र चांदोबा व्यर्थ न हो बलिदान खुनी दारू रंगकाम दुर्योधन धर्मराज श्रीकृष्ण कामगार ड्रामा नाटक क्रिव्केत गावकर गुरुजी जिरय्या स्वामी Rajratn Prakarami Rajputr Chadoba Vyrth N Ho Balidan Khuni Daru Rang Duryodhan Dharmraj Shrikrushn Kamagar Gavakar Guruji Drama Natak Cricket Jiraya Swami Ashok Rane Cinema Pahanara Manus weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक राणे
ashma1895@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके