डिजिटल अर्काईव्ह

वाजपेयी हे अॅसेट आहेत हे संघाला चांगलं ठाऊक होतं. संघानं बलराज मधोकना बाजूला केलं नि वाजपेयींना पुढे काढलं. नानाजी देशमुख तर आपणहून मागे झाले. त्यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून दिलं. त्यामुळे वाजपेयींचा मार्ग मोकळा झाला हे खरं; पण वाजपेयींवर नेहरूवियन काळाचा प्रभाव आहे हे त्यांच्या पक्षातल्या कडवट लॉबीला खटकायचं. वाजपेयींना याची किंमत मोजावी लागली. ती त्यांनी मोजली.

 

अटल बिहारी वाजपेयी यांची विनोदबुद्धी टिपू सुलतानाच्या तलवारीप्रमाणे तल्लख होती. एकदा त्यांनी लोकसभेत जोरकस भाषण केलं. समोर पंतप्रधान इंदिरा गांधी बसल्या होत्या. नंतर दोघांची संसदेच्या सेंट्रल हॉलपाशी अचानक गाठ पडली.
इंदिराजी म्हणाल्या, "भाषण छान झालं तुमचं. तुम्ही नेहमीच सुरेख बोलता; पण बोलताना हातवारे फार करता. सतत तुमचे हात हलत असतात".
वाजपेयी म्हणाले, "बोलताना पाय हलवणारा वक्ता तुम्ही पाहिलाय काय?" इंदिराजी खळखळून हसल्या.
इंदिराजींची विनोदबुद्धी सुरेख होती. के. नटवर सिंह हे परराष्ट्र सेवेतून निवृत्त झाले नि आठवड्याभरातच काँग्रेस पक्षाचे सदस्य झाले. रीतसर अर्ज भरला. भरतपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांना काँग्रेसचं तिकीटही मिळालं. निवडणुका लवकरच होणार होत्या.

पक्षप्रवेशाचा उपचार पार पडल्यानंतर इंदिराबाई नटवर सिंहांना म्हणाल्या, "आता सरकारी अधिकाऱ्याचा पोशाख नको, खादीचे कपडे विकत घ्या".
ते "येस, मॅडम," म्हणाले.
इंदिराजी पुढे म्हणाल्या, "थोडी गेंड्याची कातडी मिळाली तर विकत घ्या. राजकारणात ती कामी येते.

वाजपेयींची आणखी एक आठवण.
वाजपेयी 1984ची निवडणूक हरले. इंदिराजींची हत्या झाली होती. सगळी सहानुभूती काँग्रेसला मिळाली. भाजपचे फक्त दोनच खासदार निवडून आले. काही दिवसांनी अटलजींची मुंबईत सभा झाली. शिवाजी पार्कवर खच्चून गर्दी. अटलजी भाषणाला उभे राहिले. टाळ्यांचे कडाडकाड बार फुटत होते.
वाजपेयी दहा-बारा सेकंद उभेच. काही बोलेनात. मग शांतपणे, एकेका शब्दावर जोर देत म्हणाले : "हारा हुआ अटल कैसे दिखता है यह देखने के लिए आज शिवाजी पार्क पर इतने लोग आए हैं।" टाळ्याच टाळ्या. पुन्हा एक दीर्घ पॉज. मग म्हणाले, "मगर चुनाव के दिन आप सब कहां थे ?"
वाजपेयींच्या साठाव्या वाढदिवसाची जाहीर सभा. शिवाजी पार्कवरच. म्हणाले, "आज मैं साठ का पूरा हो गया हूं।"
टाळ्या.
"हिंदी में कहते हैं 'साठे सो पाठे'. म्हणजे माणूस टक्केटोणपे खाऊन छान परिपक्व झाला. मग पॉज. म्हणाले, "मराठी में कहते हैं, 'साठी बुद्धी नाठी'."
लोक हसून हसून पागल झाले.

1985 च्या सुमारास वाजपेयींची मुलाखत घेण्याचा योग आला. ते दोन दिवस मुंबईत होते आणि भाजपचे खजिनदार वेदप्रकाश गोयल यांच्या सायनच्या घरी उतरले होते. ते नेहमी तिथंच उतरायचे.

गोयल यांच्या पत्नी चंद्रकांताबेन गोयल या तेव्हा भाजपच्या नगरसेविका होत्या. बरीच वर्ष मुंबई महानगरपालिकेचं रिपोर्टिंग करत असल्यामुळे माझा चंद्रकांता बेनशी चांगला परिचय होता. त्या खूप प्रेमळ नि निगर्वी होत्या. तरुण बातमीदारांविषयी त्यांच्या मनात ममत्व. कारण आम्ही महापालिकेच्या जुन्या खोडांना भिडायचो.

मी चंद्रकांता बेनना मुलाखतीचं सांगितलं. 'मुलाखतीची वेळ मिळते का बघा ना', असं सतत त्यांना सांगत होतो. 'होय नाही' करता करता मुलाखतीची वेळ ठरली. ठरली म्हणजे चंद्रकांता बेननी आपणच ठरवली. त्या म्हणाल्या, "सकाळी साडेसातलाच तू आमच्या घरी ये. मी बघते पुढे काय करायचं".

चंद्रकांता बेन यांच्या सायन सोसायटीतल्या प्रशस्त अशा बैठकीच्या खोलीत मी बसलोय.
"तुम्हारा अखबार कौन सा?" असं वाजपेयी विचारतात. जरा घुश्शातच दिसताहेत.
मी पेपरचं नाव सांगतो.
समोरच्या टेबलावर दहा-बारा दैनिकांचा गठ्ठा आहे. नेमका माझाच पेपर अगदी वर 'द डेली'.
वाजपेयी 'द डेली' पाहू लागतात. मग उभे राहतात नि खोचकपणे म्हणतात, "तो यह है आप का अखबार". पहिल्या पानावरच मोठी चूक.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्रीपती मिश्र यांचा पान नंबर एकवर फोटो नि खालच्या ओळींत कॅप्शन लाइन श्रीपती मिश्रच्या ऐवजी कमलापती त्रिपाठी यांचं नाव. मला एकदम गरगरल्यासारखं झालं. मुलाखत हातची गेली असं वाटलं. "क्या करते हैं आप अखबारवाले ?" वृत्तसृष्टीचं हे जुनं दुखणं आहे 'उपसंपादकाच्या डुलक्या'.
एवढं म्हणून अटलजी आतल्या खोलीत गेले. मला काही समजेना. चंद्रकांता बेन लगबगीनं बैठकीच्या खोलीत आल्या. म्हणाल्या, "अटलजी अंघोळीला गेलेत. तू बसून रहा". मी त्यांना 'डेली'ची चूक थोडक्यात सांगितली. त्यांना इंटरेस्ट नव्हता. त्या न्याहारीच्या गडबडीत होत्या. मला म्हणाल्या, "ती चूक जाऊ दे. विसरतील ते. तू बसून रहा".
सैंपाकघरातून निरनिराळे सुवास येत होते. माझ्या डोळ्यांसमोर रात्रपाळीच्या उपसंपादकाचा चेहरा तरळत होता. तेवढ्यात आमचा फोटोग्राफर आला. चंद्रकांता बेननी शेजारचा रिकामा फ्लॅट उघडला. आम्हा दोघांची रवानगी तिथं झाली. तिथंच दिल्ली स्टाइलची न्याहारी आली. आलू के पराठे, गुलाबजाम, वगैरे. मुलाखत सुरू होण्यापूर्वी खाऊन घ्यायचं. मला अन्न गोड लागेना. अटलजी पलीकडे गोयल परिवाराबरोबर न्याहारीला बसले होते.

तास-दीड तासांनंतर वाजपेयी मुलाखतीसाठी आले. अंघोळ, न्याहारी झाली होती. चंद्रकांता बेननी माझी नि फोटोग्राफरची रीतसर ओळख करून दिली नि कौतुकाचे चार शब्द बोलल्या. फोटोग्राफरनं आपलं आयुध बाहेर काढलं. वाजपेयी म्हणाले, "फोटो बाद में।"
माझं नाव विचारलं. मी मिश्र आहे म्हटल्यावर ते गोड हसले. "अटलजींचं काहीतरी 'मिश्र' कनेक्शन आहे. बहुधा त्यांची लाडकी बहीण मिश्र कुटुंबात दिलीए," असं चंद्रकांता बेन मला नंतर म्हणाल्या.

मुलाखत सुरू झाली. चांगली तासभर चालली. जास्तच. वाजपेयी मुद्देसूद नि सफाईदार उत्तरं देत होते. पंजाब नि असामच्या प्रश्नावर वाजपेयींना बोलतं कर, असं वृत्त संपादकानं मला बजावलं होतं. शिवाय, काँग्रेसविरुद्ध सगळ्या विरोधी पक्षांची एक बडी आघाडी करावी असे व्ही. पी. सिंग, देवीलाल, करुणानिधी, ज्योती बसू, हरकृष्णसिंग सुरजित यांचे जोरदार प्रयत्न सुरू झाले होते. अटलजींनी सविस्तर उत्तरं दिली.

पेपरवाल्यांच्या भाषेत सांगायचं तर मला 'कॉपी' मिळाली.

एवढ्यात विख्यात डोग्री कवयित्री पद्मा सचदेव तिथं आल्या. त्यांनी रीतसर वेळ मागितली होती. त्यांना पाहून अटलजी प्रसन्न हसले. पद्माजी मुंबई आकाशवाणीत उद्घोषिका म्हणून काम करायच्या. छाप्यात येण्यापूर्वी मी मुंबई आकाशवाणीत बदली तत्त्वावर बरीच मोलमजुरी केली. महिन्याचे चौदा दिवस काम करायचो. बरे पैसे मिळायचे. शिवाय, रेकॉर्डिंग, डबिंग, संहिता लेखन, संगीत इ. गोष्टी शिकायला मिळाल्या.

मला पाहून पद्माजी म्हणाल्या, "तुम यहां क्या कर रहे हो? रेडियोपर आना नहीं होता क्या?"
मी काहीच बोललो नाही. अटलजी म्हणाले, "अखबार में हैं और फोटो की कॅप्शन्स लिखते हैं।"
सगळे हसले.

मी निघालो तेव्हा पद्माबाईंनी आपल्या बॅगेतून कवितेची वही काढली होती. कॉलेजात असताना वाजपेयी काव्यसंमेलनांना हजेरी लावायचे नि आपल्या कविता छंदात गाऊन दाखवायचे. बरोबर एक मित्रही असायचा. त्याचं नाव गोपालदास सक्सेना 'नीरज'.
पुढे 'नीरज'चं कवी म्हणून पुष्कळ नाव झालं. 'प्रेमपुजारी' चित्रपटातलं 'फूलों के रंग से दिल की कलम से लिक्खी तुझे रोज पाती', 'मेरा नाम जोकर'चं 'ऐ भाय, जरा देख के चलो' आणि 'शर्मिली'तलं 'मेघा छाए आधी रात बैरन बन गई निंदिया' ही गाणी 'नीरज'ची.

1990ची विधानसभा निवडणूक. वाजपेयींचा उत्तर महाराष्ट्राचा दौरा ठरला. विनोद तावडे, धरमचंद चोरडिया दौऱ्याचे मॉनिटर होते. मुंबईतून आम्ही काही बातमीदार गेलो.

जळगावला दुपारचं जेवण. वाजपेयींचा थोडा वेळ मिळाला तर बरं, असं मनात होतंच. एक्सक्लूजिव्ह. जेवणापूर्वी त्यांची वार्ताहर परिषद झाली. चोख नि व्यवस्थित. "अटलजींचं वेळापत्रक गच्च आहे; वेगळी
वेळ अजिबात मागायची नाही", असं प्रमोद महाजन आम्हाला सारखं बजावत होते.

प्रेस कॉन्फरन्स संपली. वाजपेयी व्यासपीठावरून खाली उतरले नि डुलत डुलत बाहेर जाऊ लागले. "अंबरीश, त्यांना हाक मारू नि भेटीसाठी दहा मिनिटं मागू', असं 'नवभारत टाइम्स'चा वार्ताहर मला म्हणाला. गर्दी चिरत आम्ही पुढं जाऊ लागलो.
दोन-तीन वेळा 'सर सर' अशी हाक मारली. वाजपेयींचं लक्ष नव्हतं.
आमच्या मागे एक वृद्ध, अनुभवी कार्यकर्ता उभा होता. तो म्हणाला, "आप 'पंडितजी' की पुकार लगाएं तो शायद सुनेंगे". मी आणि अनुराग त्रिपाठी ('नवभारत टाइम्स' वाला) एकदम ओरडलो, 'पंडितजी'. वाजपेयी थांबले नि मागे वळून पाहिलं.
"पंडितजी, आम्हांला दहा मिनिटं द्या, प्लीज. आम्ही मुंबईहून आलोय." असं घडाघडा सांगून टाकलं. ते हसले नि म्हणाले, "पहले आप भोजन कर लीजिए।"
जवळ बोलावलं नि म्हणाले, "आप से अलग बात करूंगा इसलिए कि आप मुंबई से आए हैं तो मुझपर क्षेत्रीय असंतुलन (प्रादेशिक असमतोल) का आरोप होगा।" वाजपेयींची दहा मिनिटं नाही मिळाली; पण त्या दिवशी वाजपेयी 'मिळाले'.
तो वृद्ध कार्यकर्ता म्हणाला, "अटलजींना 'पंडितजी' म्हटलेलं आवडतं. त्यांच्यावर पं. नेहरूंचा मोठा प्रभाव आहे".

वाजपेयींचा एकूण आवाका मोठा. भारदस्त व्यक्तिमत्त्व; इतर राजकीय पक्षांत मान आणि मान्यता; राजकीय डावपेचात चतुर आणि आकर्षक वक्तृत्त्वशैली. जॉर्ज फर्नांडिस एकदा म्हणाले, "मधु (लिमये), नाथ (बॅ. नाथ पै), भूपेश गुप्ता वगैरे आम्ही खासदार इंदिरा गांधींच्या सरकारचे गैरव्यव्हार बाहेर काढायचो. सरकारची अब्रू वेशीवर टांगायचो. त्यासाठी कागदपत्रं गुप्तपणे मिळव, रात्ररात्र जागून ती वाचा, टिपणं काढा वगैरे बऱ्याच कटकटी असायच्या. अटलजी यांत नसायचे. ते वेगळ्या पक्षाचे. पण आमची भाषणं झाली की, ते असा दमदार शेवट करायचे नि इतकं सुरेख बोलायचे की, सरकारची पाचावर धारण बसायची नि दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरांत अटलजींची लीड स्टोरी".

वाजपेयी हे अॅसेट आहेत हे संघाला चांगलं ठाऊक होतं. संघानं बलराज मधोकना बाजूला केलं नि वाजपेयींना पुढे काढलं. नानाजी देशमुख तर आपणहून मागे झाले. त्यांनी स्वतःला समाजकार्यात झोकून दिलं. त्यामुळे वाजपेयींचा मार्ग मोकळा झाला हे खरं; पण वाजपेयींवर नेहरूवियन काळाचा प्रभाव आहे हे त्यांच्या पक्षातल्या कडवट लॉबीला खटकायचं. वाजपेयींना याची किंमत मोजावी लागली. ती त्यांनी मोजली.

1999-2004 अशी पाच वर्षं वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते. या काळात पक्षातल्या हिंदुत्वनिष्ठ लॉबीनं त्यांच्या वाटेत काचा पेरल्या. असं अनेकदा घडलं. आज संघाला अटलजींची उणीव भासत असेल काय ?

काळ बिकट आलाय. लोकांना काहीही पडलेलं नाहीए. साहित्य, कलेची आवड असलेला पुढारी जनतेला नको आहे. संवाद-सामंजस्य ह्या जुन्यापुराण्या गोष्टी आहेत असा लोकांचा समज तयार करण्यात manufacture आलाय. नि लोकांना त्याचं काही वाटत नाहीए. जगभर हे सुरू आहे. ट्रम्पतात्यांना धड इंग्रजी बोलता येत नाही. साध्या साध्या वाक्यात ते चुका करतात. अमेरिकन लोकांना त्याचं काही वाटत नाही.

फाळणीच्या काळात पं. नेहरू एकदा पंजाबच्या दौऱ्यावर गेले होते. जाताना विमानानं गेले. परतीला ट्रेनचा प्रवास केला. प्रवासात ते पुस्तक वाचत होते. दुसरं, ब्रिटनच्या विन्स्टन चर्चिलला साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालाय वगैरे सांगून आज खरं वाटणार नाही. परंतु लोकांना ते ऐकायचं नाहीए. त्यांना दांडगेश्वर नेत्याच्या मागे लुगूलुगू चालायचंय.

लोकशाहीवर एक उर्दू शेर आहे :

जम्हूरियत एक तर्ज-ए-हुकूमत है कि जिस में वोटों को गिना जाता है, तोला नहीं जाता (लोकशाही एक अशा शासनपद्धती जी मतं मोजते, तोलत नाही.)

लोकशाहीला लोकशाहीपासून वाचवण्याची वेळ आली आहे.
एक आठवलं. वाजपेयींची मुलाखत संपली नि मी चंद्रकांता बेनचा निरोप घेतला.
त्यांचे आभार मानले. त्यांचा अठरा वीस वर्षांचा मुलगा कॉलेजला चालला होता.
"तुम्ही कसे जाणार?" त्या मुलानं मला विचारलं. "लोकल ट्रेननं", मी म्हणालो. "चला, मीपण चर्चगेटला चाललोय. एकत्र जाऊ". आम्ही निघालो.
पीयुष गोयल सध्या देशाचे व्यापारमंत्री आहेत.

 

1924 ते 2018 असे 94 वर्षांचे आयुष्य लाभलेले अटलबिहारी वाजपेयी यांचा 25 डिसेंबर जन्मदिवस असतो, त्या पार्श्वभूमीवर हा लेख वाचणे मननीय ठरेल.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी