ऑस्ट्रेलियाचा चित्रमय कोलाज करायचा झाला तर त्यात सर्वप्रथम पोटाच्या पिशवीतून डोकावणारे पिल्लू घेऊन पळणारे कांगारू दाखवावे लागेल. त्यापाठोपाठ सिडनीचा कमलाकृती ऑपेरा व त्यापुढील हार्बर ब्रीज येईल. उडू न शकणाऱ्या, पण पोहण्यात पारंगत असलेल्या ब्लॅक अॅन्ड व्हाइट पेंग्विन पक्ष्यांच्या थव्याचे चित्र त्यात येईल. नंतर पर्थ, मेलबॉर्न, सिडनी, ब्रिस्बेन ह्या शहरांतील क्रिकेट व लॉन टेनिसचे स्टेडिअम व डॉनाल्ड बॅडमन, डेनिस लिली, शेन वॉर्न, अॅडम गिलख्रिस्ट, ग्रेग चॅपेल, कीथ मीलर हे जागतिक दर्जाचे क्रिकेटर्स व 11 वेळा ग्रॅन्ड स्लॅम करणारा टेनिसपटू रॉड लेवर्स ह्याची छबी त्यात येईल. शेवटी, सर्वदूर पसरलेली माळराने व त्यांवर चरणारी मेंढरे, बकऱ्या, शेळ्या व म्हशी ह्यांचे चित्र असेल.
ऑस्ट्रेलिया हा प्रसन्न उन्हाचा उबदार प्रदेश आहे. उन्ह ! उन्हाचे किती प्रकार! उगवतीचे उन्ह, कोवळे उन्ह, ताजे उन्ह, धारोष्ण उन्ह, आरसपानी उन्ह, आटीव उन्ह, मध्यान उन्ह, हळदी उन्ह, पिवळे उन्ह, सोनेरी उन्ह, मावळतीचे उन्ह, मवाळ उन्ह, गोरज उन्ह, निवलेले उन्ह, शांत श्रांत उन्ह ! ऑस्ट्रेलिया हा सूर्यचुंबित (sun kissed) देश आहे. ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात असल्यामुळे आपल्याकडे हिवाळा असतो तेव्हा तिथे उन्हाळा असतो.
उजेड, वारा, पाणी, जमीन आणि आकाश ह्या पंचमहाभूतांचा वरदहस्त असलेला हा देश आहे. सूर्याच्या वस्त्रगाळ उजेडात सचैल भिजणारा हा देश. वाऱ्याची नाजूक झुळूक आणि घोंघावणारा वारा ह्यात डोलणारा हा देश. 40 डिग्री अक्षांशावरून वाहणाऱ्या वाऱ्याला roaring forties म्हणतात तर 50 डिग्री अक्षांशावरून वाहणाऱ्या वाऱ्याला screaming fifties म्हणतात. चोहोबाजूंनी पॅसिफिक आणि अंटार्क्टिक महासागराचे शांत, प्रशांत, निळे, निवांत पाणी, वर्षभर निवळशंख, आरसपानी पाण्याने दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि विस्तीर्ण तळी असलेला हा देश. ऑस्ट्रेलियात अपार जमीन आहे. युरोपच्या तुलनेत ऑस्ट्रेलिया दीड पट आहे. ऑस्ट्रेलियात अंतरिक्षातला अवकाश झुकलेला आहे. ह्या अवकाशाचा निळा गाभारा पिवळ्या उन्हाच्या खांबावर उभा आहे.
नुकतेच वसंतागमन झाले होते. पिवळ्या, सोनेरी फुलांनी गोल्डन व्हॅटलची झाडे गच्च, भरगच्च फुलली होती. 'कांगारू पोज' नावाचे वृक्ष लाल व हिरव्या रंगांनी पुष्पजडीत, पुष्पखचित झाले हाते. गडद निळ्या रॉयल ब्ल्युबेरीच्या फुलांची झाडे नखशिखांत बहरली होती. जांभळ्या फुलांनी फुललेला जॅकरान्डा म्हणजे निळी गुलमोहर किंवा नुपूर. जॅकरान्डाची फुले सकाळी फुलतात. पण ती अल्पजीवी असतात. दिवसभर त्यांच्या गर्द जांभळ्या फुलांचा सडा रस्त्यावर पडतो. पण नवी फुले फुलतात. निष्पर्ण झालेला जॅकरान्डा निष्फुल होत नाही. तो सदैव फुलांनी मोहरलेला असतो. फ्लेमस नावाचे पळसासारखी, लाल फुले असलेले वृक्ष रस्त्याच्या दुतर्फा होते.
ही रंगाची रंगपंचमी होती. हा रंगाचा वसंतोत्सव होता. हवा सुखद होती. वातावरणात प्रसन्न शांतता होती. अनामिक पक्ष्यांचे कूजन ही मात्र त्या शांततेची भरजरी किनार होती. ऑस्ट्रेलिया हा relaxed देश आहे. लॅड बँक देश आहे. सुशेगाद देश आहे. उबदार उन्हासारखीच ऑस्ट्रेलियन माणसे उबदार आहेत. मनमोकळी आहेत.
ऑस्ट्रेलियात भारतीय, भूतानी, नेपाळी, पाकिस्तानी, बांगलादेशी, श्रीलंकन ह्या देशांतील स्थलांतरितांचा भरणा आहे. जागोजाग, पावलोपावली हे अॅशियन्स भेटतात. अस्खलित हिंदीतून बोलतात. त्यामुळे ऑस्ट्रेलिया परका देश वाटत नाही. ह्या अॅशियन्स लोकांत आत्मीयता आहे. आपलेपणाची ओल आहे. एक पाकिस्तानी टॅक्सी ड्रायव्हर आम्हाला सकाळी ताजे, गरमागरम 'मूले के पराठे' घेऊन आला. क्रेडिट कार्ड न चालल्यामुळे कॅफेमधल्या नेपाळी मुलीने आम्ही सीनिअर सिटीझन्स आहोत हे पाहून आम्हाला 'कॅफे लाते' मोफत दिली. पत्ता विचारला तर आम्ही गोंधळू नये म्हणून एक श्रीलंकन माणूस अर्धा किलोमीटरपर्यंत आमच्याबरोबर चालत आला.
ऑस्ट्रेलियाचे गोड, गार कलिंगड प्रसिद्ध आहे. इथे वर्षाला 2 लाख टन कलिंगड पिकतात. ऑस्ट्रेलियात वर्षाला 30 लाख टन बीफ, 3 लाख टन मेंढीचे मटण, 9 लाख टन बकरीचे मटण, 50 लाख टन पोर्क आणि 90 लाख टन दुधाचे उत्पादन होते. दूधापासून लोणी, चीज, फ्लेवर्ड मिल्क, चॉकलेट्स हे पदार्थ बनवले जातात.
ऑस्ट्रेलियात 8 कोटी बकऱ्या आहेत. 5 लाख पेंग्विन पक्षी आहेत, तर 5 कोटी कांगारू आहेत. 1770 पर्यंत ऑस्ट्रेलिया शेष जगाला अज्ञात होता. 1770 मध्ये कॅप्टन कूक ह्या ब्रिटिश दर्यावर्दीने ऑस्ट्रेलियाचा शोध लावला. पण त्यापूर्वी क्रिस्तांव मेन्डोसा ह्या पोर्तुगीज दर्यावर्दीने सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर पाय ठेवला होता असे म्हणतात. तिमोर हा पोर्तुगिजांनी काबीज केलेला देश. तिथून ऑस्ट्रेलिया केवळ 650 किलोमीटर्सवर आहे. त्यानंतर इंग्लंडमधून गुन्हेगारास सजा म्हणून ह्या उजाड, निर्जन देशात लोकांनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 6500 वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या आदिवासी (aboriginal) लोकांचे शिरकाण केले. त्यांच्या जमिनी बळकावल्या.
हल्लीच काही आदिवासींना त्यांचे मूळ जमीन हक्क बहाल करण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियात 2021 च्या सर्वेक्षणाप्रमाणे 20 लाख aboriginal आहेत. ह्या लोकांना फारसे शिक्षण नाही, नोकऱ्या नाहीत, शेती नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकार दरमहा दर आदिवासीला 4000 ऑस्ट्रेलिया डॉलर्सचा भत्ता देते. त्यातून हे लोक व्यसनाधीनतेकडे वळत आहे.
ऑस्ट्रेलिया म्हणजे युरोप आणि अमेरिका ह्या देशांचा मिलाप आहे. इथले ब्रिस्बेन शहर लंडन व शिकागो शहरांचा संगम आहे. ब्रिस्बेन शहरातून ब्रिस्बेन नदी वाहते. ह्या नदीतून सकाळी आणि तिन्हीसांजेला क्रूज करता येते. ब्रिस्बेनला कांगारू व कोएला ह्या अस्तंगत होणाऱ्या प्राण्यांसाठी विस्तीर्ण अभयारण्य केले आहे. ब्रिस्बेन शहरात 1992 मध्ये ऑलिम्पिक्स भरले होते. 2032 चे ऑलिम्पिक्स ह्याच शहरात आहे. Walking tours, hop on hop off bus Trans ह्यामधून ब्रिस्बेन शहरातल्या अनोख्या वास्तुशिल्पाच्या वास्तू पाहता येतात.
सिडनी बंदरात प्रख्यात हार्बर ब्रीज आहे. हार्बर ब्रीज 1150 मीटर्स लांब आहे. 140 मीटर्स उंच आहे. हा ब्रीज बांधण्यासाठी 53000 टन स्टील लागले. 1932 मध्ये हा पूल बांधून तयार झाला. ऑस्ट्रेलियातले पूल देखणे असतात. ब्रिस्बेन शहरातल्या पुलाचे नाव Friendship Bridge असे आहे. पूल म्हणजे दोन टोकांना जोडणारा दुवा नसून, पूल हे एकमेकांना भेटणारे स्थळ - अशी संकल्पना इराणचा सुप्रसिद्ध वास्तुशिल्पज्ञ लैला आराधीन मांडतो. त्याच तबियत पेडेस्ट्रिअन ब्रीजवर दिवसभर असंख्य इराणी लोक येतात. युरोपमध्ये व ऑस्ट्रेलियात पुलाच्या लोखंडी गजांना प्रेमी युगुले कुलपे बांधतात व कुलपाच्या किल्ल्या पुलाखालील पाण्यात फेकून देतात. यामुळे प्रेम अखंड राहते अशा त्यांची श्रद्धा असते.
सिडनीतल्या हार्बर ब्रीजसमोरच सिडनीचा दिमाखदार कमलसदृश पाकळ्यांचा ऑपेरा आहे. युनेस्कोने ह्या देखण्या वास्तूला हेरिटेज वास्तूचे मानांकन दिले आहे. ह्या ऑपेराचे वास्तुशिल्प जॉन उटझन ह्या डेनीश वास्तुशिल्पज्ञाचे आहे, तर ओव्ह अरूप ह्या नॉर्वेजियन इंजिनिअरने ऑपेराची बांधणी केली आहे. हा ऑपेरा बांधायला 14 वर्षे लागली. 1973 मध्ये एलिझाबेथ राणीने ऑपेराचे उद्धघाटन केले.
सिडनी ऑपेरात 3 वेगवेगळ्या क्षमतेची थिएटर्स आहेत. प्रचंड कन्सर्ट हॉल आहे. त्याशिवाय स्टुडिओ, बार्स, कॅफेज व रिटेल आउटलेट्स आहेत. ऑपेराची एकूण क्षमता 5000 प्रेक्षक बसण्याची आहे. सिडनी ऑपेरात वर्षाकाठी सुमारे 1000 नृत्याचे, नाटकाचे, संगीताचे वा ऑपेराचे कार्यक्रम होतात. 'सिडनी ऑपेरा' ही मोजक्या शब्दांत लिहिलेली कविता आहे, असे आर्किटेक्ट हॅरी सेडलरला वाटते. सिडनी ऑपेरा हे ऑस्ट्रलियाचे प्रतीक आहे असे फ्रेंक गहेरी म्हणतात. फ्रँक लॉइड मात्र हा ऑपेरा म्हणजे एखाद्या सर्कसचा तंबू आहे अशी थट्टा करतो.
एका प्रसन्न सकाळी आम्ही सिडनी बंदरातून जलसफर केली. बोटीवरच ऑस्ट्रेलियन वाइन्स व शिम्पस व बारामुंडी नावाच्या स्वादिष्ट स्थानिक माशावर तावा मारला. सिडनी बंदरातील जुन्या पॅसेंजर लॉजचे आता मेरीएट हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. सिडनी बंदरातून डार्लिंग हार्बरपर्यंत ही जलसफर चालते. दुतर्फा जलसन्मुख वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. डार्लिंग हार्बरमध्ये ज्या जहाजातून कॅप्टन कूक 1770 मध्ये ऑस्ट्रेलियात आला, त्या जहाजाची प्रतिकृती ठेवली आहे. त्याशिवाय, डार्लिंग हार्बरमध्ये नेव्हल म्युझिअम आहे. ऑस्ट्रेलियाला नौकानयनाची जुनी परंपरा आहे. नेव्हल म्युझिअममध्ये आम्ही अद्ययावत पाणबुडी पाहिली. जुनी, नवी जहाजे पाहिली.
पूर्वी लंडनहून सिडनीला पोहोचायला जहाजाला 40 दिवस लागायचे. आता जेट विमानातून लंडनहून एका दिवसात सिडनीला पोहोचता येते. सिडनीला जागतिक दर्जाचे मत्स्यालय आहे. तिथे आम्ही पेंग्विन पक्षी पाहिले. पाठ काळी व पोट पांढरे असलेले हे पक्षी बर्फाच्या पांढऱ्या रंगाबरोबर कॅमोफ्लेज करतात व भक्ष्यापासून आपले संरक्षण करतात.
मेलबोर्न ही पार्क सिटी आहे. इथे विस्तीर्ण पार्क्स आहेत. मेलबोर्नमधून यारा नदी वाहते. इथल्या समुद्रकिनाऱ्यावर लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्या, जांभळ्या रंगांत रंगवलेले लाकडी चेजिंग रूम्स आहेत. ते पाहायला पर्यटक गर्दी करतात. मेलबोर्नच्या ACDC नावाच्या रस्त्यावरील भिंतीवर ग्राफिटी रंगवलेली आहे. स्ट्रीट फर्निचर, ग्राफिटी, फोटो पॉइन्ट्स ह्या शहराचे सौंदर्य द्विगुणित करणाऱ्या गोष्टी आपल्याकडे नाहीत. स्ट्रीट फर्निचर म्हणजे सामान्य माणसांचे वेगवेगळ्या पोजेसमधले पुतळे. प्रत्येक पुतळ्याशेजारी राहून आपण फोटो काढतो. असे हे कृत्रिम फोटो पॉइन्ट्स नगरनियोजकांनी कल्पकतेने शहरात केले आहेत. पर्थ शहरातून स्वान नदी वाहते. ब्रिस्बेन, सिडनी, मेलबोर्न, पर्थ ही सर्व शहरे नदीकाठी आहेत. सिडनी मेलबोर्नसारख्या शहरांना समुद्रसांगात आहे. ब्रिस्बेन नदीच्या पाण्यासारखा निळा रंग असावा. सिडनी शहराला सिडनी ऑपेराचा श्वेतधवल रंग आवडतो. मेलबोर्न शहराने हिरव्यागार वृक्षांचा हिरवा रंग परिधान केला आहे, तर पर्थ शहर पिवळ्या उन्हाच्या पिवळ्या रंगात माखून गेले आहे. प्रत्येक शहरातून संथ, मंद गतीने रंगीत ट्रॅम चालते. पर्थ शहरात ब्लॅक कॅट्स नावाच्या बसेसमधून मोफत प्रवास करता येतो. नागरिकांनी मोटर्स न वापरता सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे, ह्या हेतूने ही मोफत बससेवा देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या 3 कोटी आहे. त्यात 30 टक्के स्थलांतरित लोक आहेत. दरवर्षी ऑस्ट्रेलियाला 1 कोटी पर्यटक भेट देतात. ऑस्ट्रेलियाचा ग्रेट बेरीयर रीफ्ट आम्हाला पाहता आला नाही. फक्त चीनची भिंत व बेरीयर रीफ्ट दिसतो. गोल्ड कोस्ट हा 1500 मैलांचा सागरी मार्गही पाहण्याचे राहून गेले. एखाद्या नव्या देशात गेल्यावर सर्वच गोष्टी पाहू नयेत. काही गोष्टी न पाहता यावे म्हणजे त्या पाहण्यासाठी त्या देशात पुन्हा जाण्याची संधी घेता यावी.
टोकियोचा चेरी ब्लॉसम पाहण्यासाठी, हॉलंडमधले टूलीप्स पाहण्यासाठी आणि नॉर्वेमधले Northern lights पाहण्यासाठी मी पुन्हा ह्या देशात जाणार आहे. Northern lights म्हणजे उत्तर गोलार्धाच्या टोकाला सूर्यकिरणे परावर्तित होऊन दिसणारे रंगीबेरंगी आकाश ! ऑस्ट्रेलियातही असेच Southern lights दिसतात.
ऑस्ट्रेलियात आम्हाला कोणीच ओळखत नव्हते. आम्ही कोणाला ओळखत नव्हतो. अनोळखीपणाचे एक आगळे अप्रूप सुख आम्ही ऑस्ट्रेलियात चाखले. ऑस्ट्रेलियाची खाद्यसंस्कृती मूलतः फ्यूजनने म्हणजे अनेक खाद्यसंस्कृतींचा संगम होऊन झालेली आहे. इथले मीट पाय्स, लॅम्ब चौप्स, रोस्टेड बेक, पावलोन, लेमिंग्टन, स्ट्रॉबेरी-वॉटरमेलन पेस्ट्री हे फारच प्रख्यात आहेत. ऑस्ट्रेलियन माणूस वर्षातून 10 लिटर्स मध रिचवतो. 110 किलो मटण व 25 किलो मासे खातो.
इथले दर माणशी दर सालचे उत्पन्न 72000 ऑस्ट्रेलियन डॉलर आहे. एक ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजे सुमारे 55 रुपये. ऑस्ट्रेलियाचे फारसे औद्योगिकीकरण झाले नाही. यंत्रे, वाहने, औषधे, इलेक्ट्रिकल उपकरणे ह्यांची अन्य देशांतून आयात केली जाते, तर लोहखनिज, कोळसा, पेट्रोलिअम, नॅचरल गॅस, मद्ये, लोकर ह्यांची इथून निर्यात होते. ऑस्ट्रेलियात सदाकाळ सूर्यप्रकाश असल्याने सोलर एनर्जीचे उत्पादन करण्यात हा देश आघाडीत आहे. ऑस्ट्रेलियात आम्हाला अनेक जाडे लोक दिसतात. वजन कमी करणारे टॅब्लेट्स आल्या आहेत. त्या प्रचंड प्रमाणावर इथे खपतील. तुलनेने अनेक म्हातारे लोक, लहान मुले, त्यातही जुळ्या मुलांच्या जोड्या आम्हाला दिसल्या. ऑस्ट्रेलियात गरिबी आहे. रस्त्यावर भिकारी व घरे नसलेले होमलेस नागरिक दिसतात.
ऑस्ट्रेलियात मला एकही ट्रॅफिक पोलीस किंवा अन्य पोलीस दिसला नाही. ऑस्ट्रेलियात प्रचंड प्रमाणावर जुगार चालतो. दर शहरात अनेक कॅसिनोज आहेत. दर वर्षी ऑस्ट्रेलियन नागरिक 25 बिलियन डॉलर्स जुगारात गमावतो. ऑस्ट्रेलियन सरकारने हल्लीच कायदा करून 16 वर्षांखालील मुलांना सोशल मिडिया बंद केला आहे. असा कायदा करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिलाच देश आहे.
Australia is a land of freedom, opportunity and diversity असे म्हणतात. मार्क ट्रेन म्हणाला, 'Australian history is picturesque. It does not read like history, but like the most beautiful lies and all of a fresh new sort, no mouldy old, stale ones. Full of surprises and adventures and incongruities and contradictions and incredibilities but they are all true."
खोटा वाटावा असा ऑस्ट्रेलिया हा विचित्र, विसंगतीने भरलेला देश आहे. सुसंगतीपेक्षा विसंगती अधिक सुंदर असते. ऑस्ट्रेलियाचे आख्यान लाल व हिरव्या, जमीन व पाणी, समुद्र व आकाश, कोलाहल आणि प्रसन्न शांतता ह्या विसंगतीमुळे अधिक वाचनीय होते. पंधरा दिवसांच्या भेटीत जेवढे होईल तेवढे हे ऑस्ट्रेलिया आख्यान वाचले. ऑस्ट्रेलियात आकाश अधिक निळे होते. उन्ह अधिक पिवळे होते. पाणी अधिक आरसपानी होते.
ऑस्ट्रेलिया हा गडद रंगाचा देश आहे!
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या