डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

भाजपने 'सोशॅलिझम फॉर द रीच' आणलेला आहे!

साधारण अमर्त्यसेन यांच्या मताचा मी आहे. माझ्या मते, राष्ट्रीय उत्पादनाच्या सहा टक्के खर्च शिक्षण, सहा टक्के खर्च आरोग्य आणि सहा टक्के खर्च संशोधन (रिसर्च आणि डेव्हलपमेंट) यावर झाला पाहिजे. जो आपल्या देशात होत नाही, त्याला सोशल कॅपिटल फॉर्मेशन म्हणतात. दुसरं, मी भांडवलशाहीचा भाग असलो तरी माझा इस्टेट ड्युटीला पूर्ण पाठिंबा आहे, फक्त ती चांगल्या पद्धतीने हवी. माझी इस्टेट जेव्हा माझ्या मुलाला किंवा मुलीला जाईल, तेव्हा त्याचा विशिष्ट भाग सरकारला दिला पाहिजे. दुसरं मत असं की, 24 लाख रुपयांपर्यंत जे वार्षिक उत्पन्न आहे, त्यावर इन्कम टॅक्स ठेवू नका. लग्न समारंभांवर इनइक्वलिटी टॅक्स लावायला हवा.

प्रश्न : साधारणतः वयाच्या विशी-बाविशीदरम्यान तुम्ही वडिलांकडून परंपरेने चालत आलेला व्यापार-व्यवसाय करायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत अ‍ॅक्टिव्ह आहात. तर हा सगळा पन्नास वर्षांचा काळ, उद्योग आणि व्यवसाय या संदर्भातले तुमचे विचार, आम्ही जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुमच्या कुटुंबातील परंपरागत व्यवसाय काय होता हे कळणं आवश्यक वाटतं.

- आम्ही मूळ गोव्यातील शंखवाळ या गावचे. ज्या गावात आचार्य धर्मानंद कोसंबींचा जन्म झाला ते आमचं गाव. आमचं पूर्ण नाव नायक शंखवाळकर. आमच्या कौटुंबिक धंद्याची सुरुवात माझ्या शेणजोबांनी (त्यांचं टोपणनाव 'सुकडो' म्हणजे किडकिडीत) केली. ते नारळ घाऊक दराने घ्यायचे आणि किरकोळ दराने विकायचे. त्यानंतर त्यांनी थोडी मूल्यवृद्धी केली. नारळाचं खोबरं करून विकायचं. त्याची पुढची पायरी म्हणजे खोबऱ्याचं तेल करायचं, ते विकायचं.

माझ्या शेणजोबांच्या एका चुलत पुतण्याने आणखी एक मोठं पाऊल टाकलं, गव्हाचं पीठ करायची गिरण टाकली. ती बहुधा गोव्यातील पहिली गिरण असावी.

नायक कुटुंब म्हणजे जवळजवळ पन्नास-साठ लोकं होती आणि आमचे तीन व्यवसाय होते. एक, ज्याला आम्ही कोकणीत भुसारी म्हणतो. म्हणजे नारळ, तांदूळ, गहू, साखर, कडधान्य, मसाले यांचा व्यापार. भारतातून किंवा परदेशातून कापड आणून त्याची रिटेल विक्री हा दुसरा धंदा. तिसरा धंदा म्हणजे शिलाई मशीन्स, फॅन्स आणि मोटार गाड्या यांची एजन्सी. आणि त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे, त्या मोटार गाड्या दुरुस्त करण्यासाठी गॅरेज टाकली. असा धंदा सुकडो, त्यानंतर त्यांचे पुत्र दामोदर आणि त्यांचे पुत्र म्हणजे म्हणजे माझे आजोबा काशिनाथ दामोदर नायक यांनी केला. माझ्या आजोबांनी या धंद्याला संघटित रूप दिलं.

1961 पर्यंत गोवा पारतंत्र्यात होता. आम्ही सगळा माल आयात करत असू. कारण भारत हा वेगळा देश होता. माझे आजोबा बिस्किट्स, चॉकलेट्स, चहा अशा वेगवेगळ्या ग्राहकोपयोगी वस्तू आयात करायचे. आम्ही त्या वेळी 'दुकान' न म्हणता कोकणीत त्याला 'मांड' म्हणायचो. बैलगाड्या घेऊन लोक यायचे आणि नोंदणी करायचे. 1961 नंतर माझ्या वडिलांनी ब्रिटानिया बिस्किट्स, कॅडबरी, चॉकलेट, किसान जॅम्स, ब्रुक बॉन्ड चहा, पनामा सिगरेट्स, टाटा केमिकल्स, टाटा सोप, अशा एजन्सीज घेतल्या.

प्रश्न : म्हणजे तुमच्या आधीच्या तीन-चार पिढ्या व्यापारात होत्या. तुम्ही त्या अर्थाने पाचव्या पिढीचे. 1961 ला पोर्तुगीज राजवटीतून मुक्त होऊन गोवा भारतामध्ये विलीन झाला, तेव्हा तुम्ही सहा-सात वर्षांचे असाल, शाळेमध्ये नुकतेच जायला लागलेले असाल. पुढची साधारणतः बारा ते पंधरा वर्षं तुमचं शाळा-महाविद्यालयीन जीवन होतं. तुम्ही अर्थशास्त्र आणि गणित हे विषय घेतलेले होते. तर आपल्याला वडिलांकडून आलेला पारंपरिक व्यवसाय करायचा आहे असा निर्णय शालेय महाविद्यालयीन जीवनातच झाला होता, की काही वेगळा विचार होता?

- आमच्या घरातलं वातावरण सामाजिकच होतं, म्हणजे व्यापार-धंदा याविषयी फारशी चर्चा व्हायची नाही. समाजकारण, गोव्याचा स्वातंत्र्यलढा, साहित्य याविषयी चर्चा असायची. कितीतरी साहित्यिक घरी यायचे. त्यामुळे मी व्यापारी आहे किंवा श्रीमंत कुटुंबातून आलेलो आहे, मला हा धंदा करावा लागेल याची काही कल्पनाच नव्हती. मला साहित्याची, गणिताची, अर्थकारणाची आवड होती. गणितज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ व्हावं असं मी ठरवलं होतं. शिवाय माझ्या वडिलांनी 'तुला हा धंदा करावा लागेल' असं कधीच मला सांगितलं नव्हतं. मी बी.ए. झालो, तेव्हा माझे वडील वृद्ध झाले होते आणि धंदा अगदी मोडकळीला आला होता, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता. माझे वडील माझ्या चुलत्यांना बरेच पैसे देणे होते. त्यामुळे काकांनी माझ्यावर दबाव आणला की, 'तू पुढे शिकायचं नाही, आमचे पैसे द्यायचे.' म्हणून मी जवळजवळ अनिच्छेने व्यापारात गेलो. त्यानंतर मी स्वाध्यायाने हळूहळू व्यवस्थापन शास्त्र, अकाउंटन्सी अशी सगळी स्किल समजून घेऊन तो धंदा पुढे चालवला.

आयात करताना आधी आम्हाला 30, 40, 50 टक्के कमिशन मिळत होतं, मोठा नफा होता. भारतात आल्यावर या एजन्सी बिझनेसवर केवळ पाच टक्के कमिशन मिळू लागले, आणि नगद नफा एक टक्का. त्याशिवाय इन्कम टॅक्स लागला. मग ती पेढीची आणि बैलगाड्यांतून दुकानावर माल यायची व्यवस्था गेली. आम्ही गाड्या घेऊन लोकांना सामान पुरवायला लागलो. त्यामुळे माझे वडील कधीच या नव्या धंद्याशी सांगड घालू शकले नाहीत. शेवटी शेवटी ते निराशावादी झाले होते. ते 1985 मध्ये वारले.

माझ्या वडिलांशी माझं कधीच पटलं नाही, त्याला वेगवेगळी कारणं आहेत. माझे वडील 'हम करे सो कायदा' अशा विचाराचे होते. आमच्यात कधीच संवाद झाला नाही. (सबंध भारतीय इतिहास बघितला, तर वडील आणि मुलगा हे नाते बहुतांश वेळा संघर्षाचे राहिले आहे. हिरण्यकश्यपू व प्रल्हाद, शिवाजी महाराज व संभाजी महाराज आणि महात्मा गांधी व हरीलाल, अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला सापडतील.) आमची राजकीय मतंही जुळली नाहीत. ते मराठीवादी, महाराष्ट्रवादी आणि मी कोकणीवादी. राजकीय मतं विरोधी आणि आमची धंदा करण्याची पद्धतही वेगळी. त्यामुळे आमच्यात प्रचंड संघर्ष झाला. मला नैराश्य आलं. 1985 नंतर पूर्ण सूत्रे माझ्या हातात आली आणि मग मी एक-एक पाऊल पुढे टाकलं.

प्रश्न : साधारणतः 1975 च्या दरम्यान तुम्ही कुटुंबातल्या व्यवसायामध्ये सहभागी झालात आणि वडील 1985 मध्ये गेले, तर या 10 वर्षांच्या काळात तुम्ही आधीचा कोणता व्यवसाय वाढवला ? त्यात काय बदल केले ? आणि त्यामध्ये नवीन काही आणलं का?

- नाही, नवीन काही आणलं नाही. पण मी संघटित पद्धतीने सबंध धंद्याची व्यवस्था लावली. माझ्या लक्षात आलं की, धंद्यात भांडवल नव्हतंच. त्याची कारणं म्हणजे आम्ही स्वातंत्र्यलढ्याला भरपूर मदत केली होती; ज्या स्वातंत्र्यसैनिकांना अटक होत असे, त्यांच्या कुटुंबीयांना माझे वडील आणि आजोबा दरमहा काही रक्कम देत होते; पोर्तुगीजांच्या ब्लॅकलिस्टमध्ये आम्ही होतो, त्यामुळे आम्हाला मायनिंग लिझेस मिळाल्या नाही. मग महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला पैसे दिले; 'गोमंतवाणी' म्हणून एक मराठी वृत्तपत्र काढलं हे सगळे पैसे असे गेले.

त्यामुळे मी काही कौटुंबिक जागा विकून त्यातून भांडवलाची निर्मिती केली, धंद्याचा थोडा विस्तार केला, पण मला तो धंदा कधीच आवडला नाही. कारण त्यात आपण कोणाचे तरी एजंट आहोत, अशी भावना होती. कधीतरी या धंद्यातून बाहेर पडून लघु उद्योग करावा असं माझ्या मनात होतं, पण वडील असेपर्यंत ते शक्य नव्हतं.

प्रश्न : 1985 पासून आत्तापर्यंत म्हणजे जवळपास 40 वर्ष तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या एजन्सी चालवल्या, उत्पादन केलं, आणि आणखीही बऱ्याच उलाढाली केल्या, तर या 40 वर्षांतले टप्पे काय होते?

- यशस्वी उद्योजकाची मुलाखत घेतली जाते, तेव्हा आवर्जून त्याच्या यशाबद्दल बोललं जातं. पण मला आवर्जून माझ्या अपयशाबद्दल सांगायचं आहे. 1985 मध्ये मी कपडे धुण्याचा साबण आणि पावडरचा लघु उद्योग सुरू केला. त्या ब्रँडचं नाव होतं स्पीड आणि मीरा. तो एका वर्षात फसला, त्यात माझं नुकसान झालं. त्यानंतर मी ड्युक्स बॉटलिंग घेतलं ड्युक्स मँगोला, लेमनेड, सोडा, जिंजर, टॉनीक. ते सिंधुदुर्गचा भाग, गोवा, कर्नाटक इथे चांगलं चाललं होतं. पण 1991 मध्ये देशात आर्थिक उदारीकरण झाल्यामुळे ड्युक्स ब्रँड हा पेप्सीने घेतला आणि आमच्यावर एक्साइज ड्युटी आली. त्यांनी रॉयल्टी वाढवली. मी त्या वेळी काँग्रेसमध्ये होतो. संपर्काने मी अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्यापर्यंत गेलो. त्यांना माझी केस सांगितली. त्यावर ते म्हणाले, 'यंग मॅन, वी कॅन नॉट डू एनीथिंग फॉर मार्जिनल केसेस.' त्या वेळी मी ठरवलं की, हा धंदा बंद करायचा.

त्यानंतर, 2000 हे वर्ष माझ्या आयुष्यातील आणि उद्योजकीय आयुष्यातील वॉटर शेड वर्ष होतं. मी सगळा व्यापार-धंदा बंद केला. ब्रिटानिया, कॅडबरी यांसारख्या सगळ्या चांगल्या कंपन्यांचा राजीनामा दिला. त्यांचा फक्त सीएनएफ कॅरिंग आणि फॉरवर्डिंग धंदा -ठेवला. म्हणजे मी त्यांना वेअर हाउसिंग, गोडाऊन्स आणि गाड्या देतो. मग मी मॉन्जिनिजची मॉन्जिनिस केक आणि पेस्ट्री फ्रेंचाईज घेतली. त्या धंद्यात मला यश आलं. त्यापूर्वी मी माझ्या मेहुण्याला (जो सिव्हिल इंजिनिअर होता) घेऊन रियल इस्टेट म्हणजे कन्स्ट्रक्शनची कंपनी सुरू केली, त्यातही आम्हाला यश मिळालं. त्यासाठी आम्ही अपार कष्ट केले.

केकच्या धंद्यात भयंकर अडचणी असतात, पण इच्छाशक्ती व कठोर परिश्रमाच्या बळावर ते साध्य झालं. माझ्या वडिलांनी, आजोबांनी, शेणजोबांनी फारसे पैसे मिळवले नसतील, पण त्यांचं प्रचंड गुडविल सोबत आहे. विश्वासार्हता मी जपली आणि ते माझ्या यशाचं इंगित आहे, असं मला वाटतं.

प्रश्न : आता तुम्ही दोन महत्त्वाच्या उद्योगांबद्दल किंवा व्यवसायाबद्दल बोललात, जे गेली 25 वर्ष करत आलात. त्यातील रियल इस्टेटबद्दल लोकांना बऱ्यापैकी माहीत असतं. पण मॉन्जेनिजचा फक्त केक आमच्यापर्यंत येतो, त्या पलीकडे जाऊन तो कसा आणि कुठून येतो याबद्दल आम्हाला काहीच माहीत नसतं. आणि गोवा तर त्यासाठी खूपच महत्त्वाची इंडस्ट्री आहे, तर या मॉन्जेनीज बँडबद्दल काय सांगाल?

-पोर्तुगीजांनी 400-500 वर्षांपूर्वी भारतात बेकरीचा धंदा आणला. त्यांनी भारतीयांना पाव, बिस्किट्स करायला शिकवलं. त्या काळी हिंदू गृहस्थाने पाव खाल्ला किंवा पाव जर त्याच्या विहिरीत टाकला, तर त्याचं धर्मांतर व्हायचं. टिळकांची एक कॉन्ट्रोवर्सी म्हणजे, त्यांनी चहा आणि बिस्किटं खाल्ली, हे सर्वांना माहीत आहे. तेव्हा महाराष्ट्रात फार मोठा गदारोळ झाला. उत्तर भारतात मिठाईला जे स्थान आहे, ते दक्षिण भारतात म्हणजेच, केरळ, हैदराबाद, गोव्यात बेकरीला आहे.

तर मॉन्जिनीस हे इटालियन भाऊ. त्यांना 'मॉन्जिनी' म्हणायचे. पुढे 'स'चा उच्चार नाही. त्यांनी 1947 ला हा धंदा खोराकीवाल्यांना विकला. अकबर अली स्टोअर हे खोराकीवाल्यांचं सुपर स्टोअर. तिथं ती बेकरी होती. त्यांनी ती वाढवली. मी त्यांना भेटलो आणि त्यांनी मला ती फ्रेंचाईज दिली. फ्रेंचाईज म्हणजे मी त्यांचं नाव घेतलं. बेकरी सुरू करण्यासाठी काही खास कौशल्य असावं लागतं असं नाही, कुणीही बेकरी सुरू करू शकतं. फक्त ब्रँडनेम हवं. 'नायक' नावाची बेकरी सुरू केली तर कोण खाणार म्हणून मी 'मॉन्जिनीस' ब्रँड घेतला. आज मी एक कोटी रुपयांमागे 4 लाख रुपये म्हणजे 4 टक्के रॉयल्टी त्यांना देतो. सध्या, माझी वार्षिक विक्री जवळजवळ 30 कोटी रुपये आहे.

तसेच सिंधुदुर्ग, गोवा आणि कारवार या भागात मी लोकांना 25 टक्के नफ्याने 80 दुकानं चालवायला दिली आहेत. त्यात जवळजवळ 150 प्रॉडक्ट्स आहेत -बिस्किट, टोस्ट, खारी, पाव, पिझ्झा, पॅटीस, रोल्स, केक, पेस्ट्रीज, बर्थडे केक. अशा विविध पदार्थ रात्री तयार होतात. ते सकाळी सहा वाजता गाड्यांतून या 80 दुकानांमध्ये जातात. जो माल खपत नाही तो आम्ही परत घेतो आणि पूर्ण पैसे त्यांना देतो. साधारणतः पाच टक्के माल परत येतो.

या उद्योगात आम्ही अनेक छोटे छोटे प्रयोग केले. उदा. वाढदिवसासाठी आम्ही जवळजवळ 100 शाळांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेतो, त्यासाठी पारितोषिकं ठेवली आहेत. अशा उपक्रमांतून आम्ही ब्रँड बिल्ड केलेला आहे.

पण आता या धंद्यापुढे एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. कोविडमध्ये बरेच होम बेकर्स तयार झाले, विशेषतः स्त्रिया. त्या दिवसाला चार-पाच केक बनवतात. त्यांना एफडीए, जीएसटी, मिनिमम वेजेस असं काहीच लागू होत नाही. त्यामुळे त्या आता आमच्या प्रतिस्पर्धी आहेत. तसेच ई-कॉमर्समुळे लोक आता केक शॉपमध्ये जात नाहीत, तर ऑनलाईन मागवतात किंवा सुपर मार्केटमध्ये बेकरी असेल तर तिथून घेतात.

प्रत्येक धंद्याला एक्सपायरी डेट असतेच. पुढे माझा नातू जर या धंद्यात आला, तर मी त्याला सांगेन की बेकरीला भवितव्य नाही. आपण काही वेगळं केलं पाहिजे. त्या दृष्टीने आमचे विचार चालू आहेत.

प्रश्न : मॉन्जेनीज बेकरीसंदर्भात सांगताना तुम्ही आता 80 दुकानं, फ्रेंचायझी आणि त्याचे आकडेही सांगितलेत. पण मनुष्यबळ किती आहे आणि ते लोक काय स्वरूपाचं काम करतात ?

- यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार आहे. प्रत्यक्ष रोजगार साधारण 100 लोकांचा आहे. फॅक्टरीतील कामगार, गाड्यांचे ड्रायव्हर, लोडर्स यांच्यासाठी आम्ही 80 दुकानांत प्रत्येकी पाच म्हणजे 400-500 लोकांसाठी अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करतो. 18 टक्के जीएसटी देतो. मिठाईवर 5 टक्के जीएसटी आणि केकवर 18 टक्के का ? या संदर्भात आम्ही अर्थमंत्र्यांना निवेदने दिली, पण ते मान्य होत नाही.

प्रश्न : आता ह्या मॉन्जिनीजची गेल्या 25 वर्षांची वाटचाल पाहिली तर लक्षात येतं की, हा व्यवसाय तुमच्या आधीच्या खाद्यपदार्थांच्या काही व्यवसायांना समांतर होता. मात्र, याच 25 वर्षांत तुम्ही रियल इस्टेट या पूर्णतः वेगळ्या क्षेत्रामध्ये आलात आणि त्यातही यशस्वी झालात. आणखी एक महत्त्वाचा फरक असा की, सगळे खाद्यपदार्थांचे प्रॉडक्ट 100, 200, 500 रुपयांचे असतात आणि रियल इस्टेटमध्ये तर लाखांच्याच पुढच्या गोष्टी असतात. तर हे दोन मोठे विरोधाभास आहेत?

- मी साधारण 90 च्या दरम्यान एक रिपोर्ट वाचला होता. एका समाजशास्त्रज्ञाने एक प्रयोग केला. त्याने लोकांना विचारलं, 'तुम्हाला एक किंवा दहा कोटी रुपयांची लॉटरी लागली, तर तुम्ही काय कराल?' त्यांचं उत्तर होतं, 'घर बांधू आणि जगप्रवासाला जाऊ.' तर घर ही व्यावसायिक, सामाजिक गरज आहे. त्या दृष्टीने आम्ही सदनिका (अपार्टमेंट) काढण्याचं ठरवलं. धंदा करण्यापूर्वी आम्ही एक ठरवलं तुम्ही काय कराल यापेक्षा तुम्ही काय करू नये हे स्पष्ट पाहिजे. आम्ही ठरवलं की, आमच्या ऑफिसच्या आठ किलोमीटरच्या परिसरातच आम्ही हा व्यवसाय करणार, म्हणजे मांडवी नदी ओलांडणार नाही. पणजी आणि उत्तर गोव्यात जाणार नाही. त्यासाठी सिलेक्टिव्ह तीन गोष्टी महत्त्वाच्या 1. क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वास, 2. क्वालिटी दोन प्रकारची क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन आणि क्वालिटी ऑफ सर्विस, आणि 3. एस्थेटिक्स. लेखक असल्यामुळे या व्यवसायासाठी रूढपणे वापरली जातात तशी नावं न घेता आम्ही सीडी म्हणून नाव घेतलं. सीडी सिंफनी, सीडी फाउंटेनहेड, सीडी गुड अर्थ, सीडी कंट्री साईड, सीडी पिकासो, अशी छान नावं साहित्यातून घेतली आणि हा धंदा सुरू केला.

प्रश्न : तुम्ही आता रियल इस्टेटबद्दल बोललात. तो तुमच्या पारंपरिक व्यवसायापेक्षा पूर्णतः वेगळा होताच, परंतु तो जास्त आव्हानात्मक आहे का? कारण त्याचा संबंध राजकारणी लोकांशी, गाव परिसरातल्या गुंड लोकांशी आणि भ्रष्ट प्रशासनाशी येतो. न्यायालयीन प्रक्रियांचा सामना करावा लागतो. आर्थिक उलाढाल तर प्रचंड मोठी असते. त्यामुळे प्रचंड नफा होऊ शकतो, तसं प्रचंड नुकसानही होऊ शकतं.

- ह्या धंद्यात जाण्यापूर्वी यातील लोक कसे फसले याचा मी विचार केला होता. माझ्यावर बौद्ध धर्माचा प्रभाव असल्यामुळे मी समाधानी आहे. मी माझ्या मुलाला किंवा भागीदारांना सांगितलं की, आपण ग्रीड ट्रॅपमध्ये जायला नको. दुसरं आमचं इंगित म्हणजे, पैशाचं व्यवस्थापन ही यशाची किल्ली आहे. Success in real estate industry is not function of civil engineering skills. It is function of prudent financial management. कोणत्या गोष्टी करायच्या नाहीत ते आम्ही पूर्ण ठरवलं. पैसा दुसरीकडे वळवायचा नाही, तर यातच गुंतवायचा हे ठरवलं. पण या धंद्यालासुद्धा एक्सपायरी डेट आहेच. या धंद्यातही भ्रष्टाचाराचं विकेंद्रीकरण झालेलं आहे - मंत्र्यापासून सामान्यांपर्यंत. यामुळे आम्ही अतिशय कंटाळलेलो आहोत. म्हणून मी माझ्या नातवंडांना कन्स्ट्रक्शनमध्ये जाऊ देणार नाही.

त्यानंतर आम्ही पॉलिटिकली करेक्ट धंदा करावा म्हणून शेतीत गेलो. आम्ही नारळ, काजू, फणस, आंबे, सुपारी, भाज्या आणि फुलांचीसुद्धा शेती केली. 15 वर्षांपासून मी ही फळशेती म्हणजे हॉल्ट्रीकल्चर करतो. पण एक सांगावं वाटतं की, मी जर फक्त शेतकरी असतो, तर 15 वर्षांत 15 वेळा आत्महत्या केली असती. मी बिल्डर, लघुउद्योजक आहे म्हणून मी माझी शेती चालते. कारण त्यात नफा नाही. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जनावरांचा शेतीला होणारा त्रास. उदाहरणार्थ, उंदीर, माकड, रानडुक्कर, गवा, रेडे आणि मोर. दुर्दैवानं या शेतीप्रधान देशात आपण ज्याला राष्ट्रीय पक्षी बनवलं आहे, तो मोर शेतीसाठी अतिशय दुष्ट पक्षी आहे. मोर सगळ्या भाज्या खातो. खरं तर आपला राष्ट्रीय पक्षी कावळा असायला पाहिजे. जवळजवळ एकतृतीयांश उत्पादन प्राण्यांमुळे वाया जातं.

त्यासाठी उपाय म्हणजे सरकारने रानामध्ये फळझाडं लावली पाहिजेत, ती प्राण्यांना पक्ष्यांना तिथेच मिळाली पाहिजेत. दुसरं म्हणजे, पर्यावरण तज्ज्ञ माधव गाडगीळ यांचंही मत आहे की, वर्षातून काही महिने या उपद्रवी प्राण्यांची कत्तल करायला परवानगी द्यावी. ऑस्ट्रेलियातही ससे मारायला परवानगी आहे, नाहीतर फळशेती चालणार नाही. यावर उपाय म्हणून आम्ही जनावरांना न आवडणाऱ्या गोष्टी सुपारी, मिरी, हळद, लवंग, काजू शेतात लावल्या. आम्ही आता तिथं 20 कॉटेजेसचं इको रिसॉर्ट काढणार आहोत. तिथं मांडवी नदीची एक उपनदी वाहते.

प्रश्न : गेल्या 40 वर्षांत तुम्ही एका बाजूला कुटुंबातून आलेला खाद्यपदार्थ निर्मितीचा किंवा वितरणाचा व्यवसाय केला, दुसऱ्या बाजूला घर किंवा तत्सम वास्तू बनवणं हा रियल इस्टेटचा व्यवसाय आणि तिसरा व्यवसाय म्हणजे शेती करत आहात. तर हा विषमभुज त्रिकोण फार रोचक आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांत तुम्ही मुलगा चिराग याच्याकडे हे सगळं हळूहळू हैंडओव्हर केलेलं आहे. तर तुम्ही हे चिरागकडे सोपवताना किंवा त्याने यामध्ये रस घेताना दोघांमध्ये काय प्रकारचं कामाचं विभाजन झालं?

- माझे वडील आणि आजोबा यांचा संघर्ष होता, माझा आणि माझ्या वडिलांचाही संघर्ष होता. मात्र माझे चिरागशी अगदी सलोख्याचे, मैत्रीचे संबंध आहेत. माझी मुलं मला 'पप्पा, तू मूर्ख आहेस' असं सहज म्हणू शकतात. हे मी माझ्या वडिलांना कधीच म्हणू शकलो नसतो. मी किंवा चिराग एकाही चेकवर सही करत नाही. कोट्यवधी रुपयांचा चेक असला, तरी आमच्या तीन व्यवस्थापकांपैकी दोन व्यवस्थापकांची सही असेल तर तो चेक वटतो.

चिराग सिव्हिल इंजिनियर आहे. त्याने अमेरिकेत बेकरीचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळे सगळं ऑपरेशनल साईट्स, कन्स्ट्रक्शन, साईड फॅक्टरी तो बघतो. आणि मी फायनान्स, मार्केटिंग आणि लीगल ऍडमिनिस्ट्रेशन एवढं बघतो.

प्रश्न : तुमच्या दोघांमध्ये काय साम्यं आहेत आणि काय वेगळेपण आहे?

- साम्य म्हणजे काही गोष्टींबद्दल आमचं मत एकच असतं की, क्रेडिबिलिटी सांभाळली पाहिजे आणि क्वालिटीचा विचार केला पाहिजे. पण त्याची स्टाईल वेगळी आहे. त्याने व्यवसायात आउटसोर्सिंग प्रिन्सिपल आणलं. मी त्याला व्यवसायात नवीन प्रयोग करण्यासाठी वाव देतो. काही धंद्यांमध्ये त्याला अपयशही आलं. पण त्यामुळे मोठा गहजब करायचं कारण नाही. आमच्या व्यवसायाचं गुपित म्हणजे, मी माझ्या मुलाला, भागीदारांना आणि व्यवस्थापकीय टीमला पूर्ण निर्णयस्वातंत्र्य दिलंय, ज्याला व्यवस्थापन शास्त्रात एम्पावरमेंट म्हणतात.

यशस्वी होण्यासाठी तीनच स्किल्स पाहिजेत. उपलब्ध माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेणं हे पहिलं स्किल. निर्णयाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करणं हे दुसरं स्किल आणि लोकांशी कसं वागायचं हे तिसरं स्किल. मी एकत्र कुटुंब पद्धतीतून आलेलो आहे. माझे आजोबा एकत्र कुटुंबातले कर्ते होते. मी माझ्या विस्तारित एकत्र कुटुंबातला कर्ता म्हणून माझ्या कर्मचाऱ्यांशी वागतो. कर्मचारी आणि ग्राहकांशी चांगलं वागायला पाहिजे.

पत्रकार, राजकारणी आणि लेखक यांना या आर्थिक परिघातील अंतःप्रवाहांचं एक्सपोजर नसतं. त्यामुळे त्यांची अनेक विचित्र मतं असतात. उदा., सगळे श्रीमंत आरामात नफा काढतात, पैसे उधळतात. प्रत्यक्षात तसं नसतं.

प्रश्न : या देशामध्ये 1991 ला आर्थिक उदारीकरण पर्व अवतरलं आणि त्याच्या पाच-सहा वर्षांआधी तुमचे वडील गेले. तेव्हा व्यवसायाची पूर्णतः जबाबदारी तुम्ही खांद्यावर घेतली. त्या अर्थाने उदारीकरण पर्वाचा सामना तुम्ही खूप सजग अवस्थेमध्ये केलेला आहे आणि त्यानंतर 35 वर्षं तुम्ही तो करत आलाय. या 35 वर्षांत देशात वेगवेगळी केंद्र सरकारं आली, वेगवेगळी राज्यं सरकार आली. तर या संपूर्ण काळात आर्थिक धोरण आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित काय बदल झाले असं वाटतं?

- एक अनिष्ट परिणाम म्हणजे माझी ड्युक्स फॅक्टरी बंद करावी लागली. पण मी आर्थिक उदारीकरणाचा समर्थक आहे. मी कॉलेजमध्ये असताना पूर्ण मार्क्सिस्ट होतो. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की, समाजवादाने सगळे प्रश्न सुटणार नाहीत. आणि देशात योग्य वेळी उदारीकरण आलं. त्या वेळी लघु उद्योजकांना खूप त्रास द्यायचे, आज लघु उद्योजकाला कोणताच त्रास व्हायचा, तर रियल इस्टेटला त्रास आहे. तेव्हा आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरण हवं होतं.

काही लोक नेहरूंना दोष देतात, पण मी त्यांना दोष देत नाही. त्या वेळी समाजवाद आवश्यकच होता. आपल्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आपलं भाग्य हे की, नेहरूंसारखी विज्ञाननिष्ठ व्यक्ती आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभली. त्यांनी मिश्र अर्थव्यवस्था आणली. मी दोष इंदिरा गांधींना देतो. कारण अर्थव्यवस्था चालवायला दोन गोष्टी लागतात - पैसा आणि संस्थांची बांधणी. ही व्यवस्था इंदिरा गांधींनी मोडकळीला आणली.

आताच्या भाजपचं यश म्हणजे त्यांनी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर (एअरपोर्ट्स, बंदर, रस्ते) अतिशय चांगल्या प्रकारे केलं. पण त्यांचं अपयश म्हणजे, त्यांनी सोशल कॅपिटल फॉर्मेशन किंवा कल्चरल इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल काहीच केलं नाही. शिक्षण, आरोग्य, न्यायव्यवस्था आणि पत्रकारिता या सगळ्यांबाबत त्यांचं दारुण अपयश आहे.

निर्मला सीतारामन या अगदी सामान्य कुवतीच्या (mediocre) अर्थमंत्री आहेत. आता capitalismह हा socialism for the rich झालेला आहे. सरकारने टाटांच्या नॅनो प्रकल्पाला लाखो रुपयांचे अनुदान दिले. सेमी कंडक्टर धंद्याला कोट्यवधी रुपयांची सरकारी मदत मिळते. भागीदारी फर्मवरचा कर 30 टक्के आहे, तर नव्या औद्योगिक कंपन्यांवरचा कर केवळ 15 टक्के आहे. उद्योग फसला तर सरकार उद्योगाला बेल आउट करते. म्हणजे हा socialism for the rich आहे.

प्रश्न : तुमची एकूण जडणघडण आणि वाटचाल पाहिली, विशेषतः तुमचं लेखन, सामाजिक आणि राजकीय काम पाहिलं, तर तुमचा कल हा पारंपरिक अर्थाने नाही; परंतु या ना त्या प्रकारच्या सोशलिझमकडे आहे असं दिसतं. प्रत्यक्षातलं तुमचं काम कदाचित क्रोनी कॅपिटलिझम नाही, परंतु वेगळ्या प्रकारचं सौम्य कॅपिटलिझम असं आहे. तर तुम्ही स्वतःला सोशलिझम आणि कॅपिटलिझम या दोन्हीच्या मध्ये कुठे मानत आलाय ? पूर्वी आणि आता? कदाचित त्यात बदल झाला असेल.

- साधारण अमर्त्यसेन यांच्या मताचा मी आहे. माझ्या मते, राष्ट्रीय उत्पादनाच्या सहा टक्के खर्च शिक्षण, सहा टक्के खर्च आरोग्य आणि सहा टक्के खर्च संशोधन (रिसर्च आणि डेव्हलपमेंट) यावर झाला पाहिजे. जो आपल्या देशात होत नाही, त्याला सोशल कॅपिटल फॉर्मेशन म्हणतात. दुसरं, मी भांडवलशाहीचा भाग असलो तरी माझा इस्टेट ड्युटीला पूर्ण पाठिंबा आहे, फक्त ती चांगल्या पद्धतीने हवी. माझी इस्टेट जेव्हा माझ्या मुलाला किंवा मुलीला जाईल, तेव्हा त्याचा विशिष्ट भाग सरकारला दिला पाहिजे. दुसरं मत असं की, 24 लाख रुपयांपर्यंत जे वार्षिक उत्पन्न आहे, त्यावर इन्कम टॅक्स ठेवू नका. लग्न समारंभांवर इनइक्वलिटी टॅक्स लावायला हवा.

अर्थशास्त्रात दुसरा प्रवाह आहे जगदीश भगवती यांचा. ते म्हणतात, विकास करा आणि ते झिरपत जाईल. पण ते गरिबांत जात नाही. त्यामुळे आपल्याला आरोग्य, शिक्षण, कौशल्य निर्मितीवर पैसे घालायलाच हवेत, असे अमर्त्य सेन यांचे मत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन्स यांमुळे रोजगार निर्मिती कठीण होत आहे. युनिव्हर्सल इन्कम आपल्याला द्यावंच लागेल, त्यासाठी श्रीमंतांवर टॅक्स घालावेच लागतील.

धंद्यात दोन शब्द मला अतिशय महत्त्वाचे वाटतात. एक, नियत. नियतचे भाषांतर नैतिकता होऊ शकत नाही. आणि दुसरं, दानत.

तिसरी गोष्ट म्हणजे, आपला सबंध धर्माचा अप्रोच हा अँटी संपत्ती, श्रीमंत विरोधी आहे. फक्त एकाच धर्माचा अपवाद जो व्यापार स्नेही होता तो म्हणजे बौद्ध धर्म. आपली जी धनदेवता होती कुबेर, तो अतिशय कुरूप, विद्रूप, बुटका, ढेरपोट्या. बौद्धोत्तर हिंदू धर्माने श्रीमंतीबद्दल आपले विचार बदलले आणि लक्ष्मीचं प्रतीक आणलं. लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती हे व्यापारस्नेही देव आले. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुठल्याही व्यापाऱ्याच्या, उद्योजकाच्या ऑफिसमध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि गणपतीची चित्रं असतात.

मी गोव्यातली पहिलीपासून बारावीपर्यंतची टेक्स्टबुक्स बघितली, एकातही एकाही उद्योजकाचा धडा नाही. मी एक सर्वे केला होता. मेरीट लिस्टमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना 'मोठं होऊन कोण होणार?' हा प्रश्न विचारला. कुणी सिव्हिल इंजिनियर, कुणी चार्टर्ड अकाउंटंट, टेलीकम्युनिकेशन, असं सांगितलं. पण उद्योजक होणार असं कोणी सांगत नाही.

प्रश्न: ही उद्योजकता वाढण्यासाठी सरकारी पातळीवर, शिक्षण व्यवस्थेत आणि सामाजिक संस्था-संघटनांमध्ये काय करायला हवं?

- जर्मनीतील एक अतिशय चांगली स्कीम अप्रेंटिसिस आपण घेतली पाहिजे. ती म्हणजे कॉलेजचं शिक्षण चालू असताना जर एखाद्या विद्यार्थ्याला बेकरीमध्ये जायचं असेल, तर त्याला बेकरीत अप्रेंटिस म्हणून घेतात किंवा कन्स्ट्रक्शन साईटवर इंजिनियर म्हणून घेतात आणि ती स्किल्स डेव्हलप करतात. स्किल फॉर्मेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट.

प्रश्न: तो प्रकार आपल्या शिक्षणव्यवस्थेमध्ये वस्तुतः आहे, परंतु तो कागदावरच राहिलाय. आत्ताच्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये दोनच महत्त्वाच्या घटकांवर विशेष भर दिलाय एक, आंतरविद्याशाखीय अभ्यास आणि दुसरं, थिअरी आणि प्रॅक्टिकल यांची सांगड.

- मेघनाथ साहा हे शास्त्रज्ञ म्हणतात, जाती व्यवस्थेने मेंदू आणि हात यामधला पूल उद्ध्वस्त केला.

दत्ता नायक हा हुशार विद्यार्थी होता, कारण तो गणितात आणि भाषांमध्ये हुशार. पण त्याला एक चित्र काढायला सांगा, जमत नाही. गाणं म्हणायला सांगा, जमत नाही. फ्युज घालायला सांगा, जमत नाही. कारण माझ्याकडे या मेकॅनिकल स्किल्स नाहीत. आपण या ब्राह्मिनिकल, ज्ञातीय परिप्रेक्षातून गेलं पाहिजे. सचिन तेंडुलकर कदाचित इंग्लिशमध्ये फेल झाला असेल, पण क्रिकेटमध्ये तो इंटेलिजंट आहे. हा मल्टिपल इंटेलिजन्सचा प्रयोग केला पाहिजे.

शाळेमध्ये होत असणारी आत्मसन्मानाची पायमल्ली थांबायला हवी. दुसरं म्हणजे, विद्यापीठ आणि उद्योग यामधला सुसंवाद वाढला पाहिजे. गालब्रिथ हे प्राध्यापक इंडस्ट्रीमध्ये आले, इंडस्ट्रीतला माणूस विद्यापीठात जातो. हे इंटरॅक्शन वाढलं पाहिजे. आपल्यामध्ये खूप उद्योजकता आहे.

एक नव्या तऱ्हेचा सोशलिझम आलेला आहे, त्याला आपण पोस्ट कॅपिटलिझम सिस्टम म्हणतो. स्टीव्ह जॉब्ज, अजीम प्रेमजी, नारायण मूर्ती, मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स या सगळ्या मध्यमवर्गीयांचे आई-वडील श्रीमंत नव्हते. त्यांच्याकडे मालमत्ता नव्हती. आता knowledge economy आलेली आहे.

प्रश्न : आता हाच मुद्दा घेऊन मी मुलाखतीच्या या भागातला शेवटचा प्रश्न विचारतो. तुम्ही स्वतः चौथ्या-पाचव्या पिढीतील उद्योजक. तर पहिल्या पिढीतील उद्योजक आणि दुसऱ्या तिसऱ्या-चौथ्या-पाचव्या पिढीतले उद्योजक यात काय फरक असतो? दोन्हीला काय फायदे-तोटे असतात? आणि नव्याने उद्योग क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांना तुम्ही काय सांगाल.

- एक म्हण आहे, 'हवेली की उमर साठ साल.' कुठलाही कौटुंबिक धंदा तीन पिढ्यांनंतर चालत नाही. एक पिढी म्हणजे 20 वर्ष धरतात. म्हणजे पहिला जो संस्थापक असतो, तो अतिशय कष्ट करतो, बचत करतो आणि धंदा पुढे नेतो. त्याचा मुलगाही ते करतो. त्याचा नातू मात्र उधळ्या असतो. जगातील जवळजवळ 95 टक्के कौटुंबिक धंदे हे तिसऱ्या पिढीनंतर संपतात.

एक अतिशय दुर्दैवाची गोष्ट आपल्या लक्षात येत नाही, लहान व्यापारी संपत आहेत. मोठ्या उद्योगांनी त्यांना संपवलं आहे. कपडे विकणारे, पुस्तक विकणारे असे उद्योग बंद होत आहेत. कारण आता ऑनलाईन या सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणून पुढच्या पिढीने ते धंदे बदलले आहेत. नवी कौशल्यं शिकली नाहीत, तर आपण गोठून जाऊ.

प्रश्न : तुमच्या उत्तरातून असं पुढे येतंय की स्थल, काल आणि परिस्थिती हे बघून सर्वांनाच बदल करायची गरज असते. परंतु उद्योजकांना ती सर्वाधिक असते, असं आपल्याला म्हणता येईल?

- शेवटी एक सांगतो. आपण डार्विनच्या थिअरीची वेगळ्या पद्धतीने चिकित्सा करतो. डार्विन म्हणतो, 'सर्वाइवल ऑफ फिटेस्ट.' जो सगळ्यात स्ट्राँग तोच तगला, हे बरोबर नाही. डार्विन हे म्हणाला नाही. तर तो म्हणाला की, 'जे प्राणी, जे जीव अडॉप्ट करू शकले, परिस्थितीशी जुळवून घेऊ शकले, ते टिकले.' त्याचं अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे झुरळ. परिस्थितीशी कसं जुळवून घ्यायचं हे ज्याला जमेल तोच उद्योजक.

शब्दांकन : आरती सुमित

दत्ता दामोदर नायक यांच्या एक-एक तासाच्या चार मुलाखती साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेसाठी घेतल्या आहेत. पहिल्या भागात एक माणूस, दुसऱ्या भागात लेखक, तिसऱ्या भागात उद्योजक आणि चौथ्या भागात सामाजिक-राजकीय कार्यकर्ता. पहिली व दुसरी मुलाखत साधना साप्ताहिकाच्या 8 मार्च 2025 च्या अंकात शब्दांकन करून प्रसिद्ध केल्या आहेत. तिसरी मुलाखत या अंकात प्रसिद्ध करीत आहोत. चौथी मुलाखत पुढील महिन्यात प्रसिद्ध होईल. या चारही मुलाखतीचे व्हिडिओ साधनाच्या यु-ट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा ( 54 लेख )
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी