डिजिटल अर्काईव्ह

बापू, उद्या तर आमचा देश, शेतकऱ्यांची शर्यत, ट्रम्प साहेबांशी लावणार आहे, सुरुवातीपासून आपली हीच नीती राहिलेली आहे, तीच आता सर्वांना नागवं करायला निघालेली आहे. बापू, तुमचं हिंद स्वराज आज ट्रम्प स्वराज झालय. बापू, शेतावर येता येता स्वातंत्र्य परत गेलंय परदेशात. आमचे पूर्वज म्हणायचे लक्ष्मी आपल्यावर रुसून सातासमुद्रापार जाऊन बसलीय. संपत्ती तेव्हाच अशी रुसून जात असते, जेव्हा माणसाचीच किंमत माणसाला राहत नसते.


बापू 
तुमची कुटी पाहिली 
आणि मला 
तान्हाई मांगिणीचं घर आठवलं 
असंच होतं 
पांढऱ्या मातीनं सारवलेल्या 
सवान भिंती 
हिरव्या शेणानं सारवलेली भुई 
प्रसन्न वाटायचं तिच्या घरी गेलं की 
माय पाठवायची 
कधी निरोप घेऊन मला तिच्याकडं 
तिच्या घराचं ते चित्र 
माझ्या मनावर पक्क ठसलेलं आहे 
आज तुमची कुटी पाहिली 
आणि ते सगळं उचंबळून वर आलं 
तुम्ही स्वतःचं 
किती सामान्यीकरण केलं होतं 
ते दिसतंच सगळं या कुटीतल्या खाणाखुणांमधून

बापू
तान्हाई मांगिणीला 
तुमचं नाव माहीत असण्याची 
शक्यता नाहीच
पण स्वच्छतेविषयीची 
तुमची उपजत जाणीव 
तिच्यातही होती 
फार निर्मळ वाटायचं तिचं घर 
पण आता तिच्या नातवानं बांधलेलं
काँक्रीटचं घरकुलही 
तिच्या नातसुनेला
तितकं स्वच्छ ठेवता येत नाही 
बापूजी तुमच्या पिढीसोबतच 
हा निर्मळपणा संपला की काय?


बापू
तुमचा हा अडीच खोल्यांचा संसार 
कस्तुरबांनी किती निगुतीनं 
विश्वव्यापी केला 
सापाविंचवाच्या या जागेत 
तुम्ही राहायला आलात 
त्या सापाविंचवाशी खेळत
त्यांनी नेहरू सरदारांनाही 
इथेच हाताळलं 
जगभरातल्या तुमच्या चाहत्यांनाही 
त्या तितक्याच वैश्विक साधेपणानं 
सामोऱ्या गेल्या
ताडमाड उंचीचे 
खान अब्दुल गफार खान 
आणि वामनमूर्ती 
लालबहादूर शास्त्री 
कस्तुरबांना दोघंही सारखेच 

बापू 
तसं तर तुमच्या उंचीइतकं उंच 
जगातच नव्हतं कुणी 
तर मग या बाईला 
कुणाच्या उंचीची काय मातब्बरी 
तुम्ही जसे विश्वाचे बापू झालात 
तशाच कस्तुरबाही 
विश्वाच्या 'बा' झाल्या 
एक सुती साडी 
एक पोलकं जॅकेट 
एक सुती कांबळं 
एवढ्या मर्यादित वस्तूंसोबत जगत 
त्यांनीही तुमच्यासारखंच 
स्वतःचं सामान्यीकरण करून टाकलेलं होतं

बापू 
तुमची खादी 
आजन्म आहे माझ्या अंगावर 
तिचा पोत आणि पदर 
तिची रंगसंगती 
मला इतकी आवडते की 
खादीशिवाय काहीच 
ल्यावसं वाटत नाही अंगावर 
बापू 
या वस्त्रातून मी 
तुमचा स्पर्श अनुभवत असतो सतत 
अशी ही तुमची खादी 
वस्त्राचं तुम्ही केलेलं 
हे सामान्यीकरण 
आज 
एक अभिजात जग झालंय बापू 
किती पुस्तकांच्या मुखपृष्ठावर 
किती श्रेष्ठ चित्रांतून 
तुमची खादी विराजमान आहे

बापू 
पुस्तकं आणि खादीशिवाय 
मला कुठलीच वस्तू 
मौल्यवान वाटली नाही कधीच 
पुस्तकांच्या आणि खादीच्या दुकानाशिवाय 
इतर कुठल्याच दुकानात जाण्याचा 
मोह नाही झाला कधीच मला 
खादीचं आणि पुस्तकांचं दुकान पाहिलं की 
नाही आवरता आला मोह कधीच मला


बापू 
तुमची पत्रं लिहून घेणाऱ्या 
तुमच्या सेक्रेटरीला 
धुळीची अॅलर्जी होती 
तिच्यासाठी तुम्ही 
एका खोलीला काँक्रीट करून घेतलंत 
बळजबरी केली नाहीत तिला 
मातीसोबत जगण्याची 
आज संगमरवरी फरशीचीच 
अॅलर्जी होते आहे म्हणून 
डॉक्टर आपल्या रुग्णांना 
सारवणाच्या घरात राहण्याचा 
सल्ला देत आहेत 
तसं तर बापू तुम्हालाही 
खोकला वाढल्यामुळे 
शेवटच्या काळात 
शेजारच्या घरात राहावं लागलं होतं 
बालपण धुळीत बिनधास्त असतं 
पण बापू 
वृद्धपणी ही धूळ धास्ती निर्माण करतेच 
अनुभवानं सांगतोय बापू 
मी तुम्हाला हे सगळं

बापू 
किती कमी वस्तूंमध्ये तुमचं भागायचं 
एक पंचा एक काठी 
एक चश्मा आणि एक घड्याळ 
एवढीच तुमची संपत्ती होती 
चोरालाही चोरी करण्याची लाज वाटावी
इतक्या या वस्तू नगण्य 
पण तरीही 
एकदा तुमचा चश्मा गेलाच चोरीला 
तुमच्या जाण्यानंतर याच वस्तू 
राष्ट्राची संपत्ती ठरल्या 
आणि मग सभ्य चोरांनाही मोह झाला 
तुमचा चश्मा चोरण्याचा
देशाचा गृहमंत्री 
तुमच्या दवाखान्यात येऊन 
उपचार घ्यायचा 
मातीवर तुमचा एवढा विश्वास की 
तुम्ही मातीलाच औषधी बनवलंत 
आणि भल्याभल्यांच्या अंगाला 
माती लावून उन्हात झोपवलंत 
जीवनावर तुम्ही केलेले प्रयोग बापू 
कितीतरी शोधाचे जनक आहेत 
पण ते शोध आज कुणालाही नको आहेत 
सर्वांनाच मातीपासून दूर जायचंय 
बापू तुम्ही जिचं वर्णन 
'पगली दौड' असं केलंत 
त्या वेड्या शर्यतीत आज 
सगळ्यांनी रांगा लावलेल्या आहेत 
जे पोहोचलेत ईप्सित ठिकाणी 
त्यांना आता मूळ स्थानाकडं 
यायचे वेध लागलेले आहेत 
म्हणून चुलीवरची भाकर 
वरवंट्यावरचा मसाला 
खलबत्यातला खर्डा 
आणि दलियाचा भरडा 
आता सर्वांनाच हवाहवासा झालाय

बापू 
तुमचा चरखा 
सुताविना तसाच पडून आहे 
तुमच्या कुटीशेजारच्या रानातला 
अखंड फुटलेला कापूस 
वेचायला बाया मिळत नाहीत म्हणून 
तसाच उभा आहे
शेतकरी देत असलेला भाव 
वेचणाऱ्यांना परवडत नाही 
आणि वेचणारे मागत असलेला भाव 
शेतकऱ्याला परवडत नाही 
वेचणारे म्हणतात 
शेतकऱ्यानं दिलेल्या भावात 
काम करू लागलो तर 
आम्हाला नागवंच राहावं लागेल 
शेतकरी म्हणतात 
वेचणारे मागत असलेला भाव दिला तर 
आम्हाला नागवं व्हावं लागेल 
कुणी आणून ठेवला 
असा हा विपरीत काळ त्यांच्या पुढ्यात 
बापू 
एके काळी 
एकमेकांना झाकणारी ही माणसं 
आज नागवेपणाची भाषा 
का बोलू लागलीत ?

बापू 
तुम्ही म्हणालात गावाकडं चला 
बाबासाहेब म्हणाले शहराकडं चला 
आपापल्या ठिकाणी तुम्ही दोघंही 
बरोबरच होतात 
पण या गाव-शहराच्या संघर्षात 
मातीची मात्र राख होते आहे 
बापू 
तुम्हाला माहीतच आहे 
राखेतून काही उगवत नसतं 
या जाळभाजित मातीचं झडलेलं फूल 
पुन्हा यायचं असेल परत 
तर मातीला सृष्टीच्या गर्भात जावं लागतं 
त्यासाठी प्रलय व्हावा लागतो 
त्याला लाखो वर्षं लागतात 
तूर्तास मातीची राख होणं सुरू आहे 
ते थांबवता येतं का 
याची कोशिश व्हायला हवी 
मातीचा इतिहासच असा आहे बापू 
ज्यांच्या मनगटात जोर होता
त्यांनी माती मालकीची केली 
बाकी नुसतेच मातीत राबत राहिले 
कणी-कोंड्यावर जगत राहिले 
नंतर मालकी आनुवंशिक होत गेली 
तशी लेचीपेची मनगटेही 
मालकी गाजवत राहिली 
आणि दळदार मनगटे राबत राहिली 
तशीच कणी-कोंड्यावर 
पर्यायच नव्हता त्यांना दुसरा 
शहरानं दिला पर्याय 
तोच मार्ग बाबासाहेबांनी त्यांना दाखवला 
मग मातीच्या मालकांची अवस्था 
तेलही गेलं तूपही गेलं 
अन् हाती धुपाटणं आलं 
अशी झाली 
आता हे धुपाटणं धोपटीत 
ते आक्रोश करत आहेत 
पण आपापसांतल्या आकसामुळे 
सगळेच मातीला दूर सारत आहेत 
काळ्या मातीला दूर सारून 
कुणालाच जगता येणार नाही 
पांढऱ्या मातीच्या भरवशावर 
कुणाचंच भलं होणार नाही 
काळी मातीच फक्त 
जगवत असते जीवांना 
हे त्यांनाही कळायला हवं 
जे सोडून चाललेत गावांना

बापू 
उद्या तर आमचा देश 
शेतकऱ्यांची शर्यत 
ट्रम्प साहेबांशी लावणार आहे 
सुरुवातीपासून आपली 
हीच नीती राहिलेली आहे 
तीच आता सर्वांना 
नागवं करायला निघालेली आहे 
बापू 
तुमचं हिंद स्वराज 
आज ट्रम्प स्वराज झालय
बापू
शेतावर येता येता स्वातंत्र्य 
परत गेलंय परदेशात 
आमचे पूर्वज म्हणायचे 
लक्ष्मी आपल्यावर रुसून 
सातासमुद्रापार जाऊन बसलीय 
संपत्ती तेव्हाच अशी 
रुसून जात असते 
जेव्हा माणसाचीच किंमत 
माणसाला राहत नसते

बापू 
माहीत नाही 
किती पिढ्यांनंतर 
दुसरा बापू येईल 
आणि आपली संपत्ती 
आपल्या देशात परत आणेल 
आपलं स्वातंत्र्य 
आपल्या देशात परत आणेल 
बापू 
तुमची ही कुटीच 
तशी प्रेरणा देईल कुणालातरी 
सगळेच काही 
नुसतेच येऊन जात नसतात इथं 
कुणाच्यातरी मनात 
बापू 
तुम्ही जिवंत व्हालच 
कुठल्यातरी झाडावरचं बी 
वाऱ्यावर उडत 
कुठल्यातरी जागेत जाऊन 
रुजतच असतं बापू 
एकशे एक पापं झाल्यावर 
परिवर्तन अपरिहार्य असतं 
येईलच असं एखादं वादळ 
आणि तुमचा विचार 
पुन्हा विश्वव्यापी होईल बापू 
कोरोनानं ती झलक 
दाखवून दिलेलीच आहे

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी