डिजिटल अर्काईव्ह

चक दे इंडिया !... पडद्यामागचा हिरो...

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारतीय पोरींनी मैदान मारलं, ICC वर्ल्ड कपच्या ट्रॉफीवर पहिल्यांदाच नाव कोरलं. ज्या बॅटरला भारतीय संघात खेळण्याची संधी कधी मिळाली नाही, त्याने आता टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील या टीमच्या यशामध्ये मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांचा मोलाचा मोठा वाटा आहे. या विजयाचे शिल्पकार अमोल मुजुमदार आणि एकूणच टीमवर टाकलेला हा दृष्टीक्षेप...

कधीकधी इतिहास लिहिला जातो, आणि कधी तो घडवला जातो. भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025 मध्ये जे केलं ते दुसऱ्या प्रकारचं होतं. त्यांनी इतिहास घडवला. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेलं स्वप्न साकार झालं, आणि भारताच्या मुलींनी पहिल्यांदाच महिला क्रिकेट विश्वचषक आपल्या नावावर केला. हा विजय फक्त एका सामन्याचा किंवा एका ट्रॉफीचा नव्हता, तर तो होता संयम, एकता, मेहनत आणि आत्मविश्वासाचा परिपाक. या यशामागे उभे होते एक शांत, पण दृढ व्यक्तिमत्त्व ते म्हणजे प्रशिक्षक अमोल मुजुमदार. खेळाडू म्हणून त्यांनी रणजी क्रिकेटमध्ये पर्व निर्माण केले, हजारो धावा केल्या; पण आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी त्यांना कधीच मिळाली नाही. तरीही, त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या मनात क्रिकेटबद्दलचं प्रेम आणि ज्ञान भरभरून होतं. त्यांनी कोचिंगची वाट धरली. अनेक वर्षं घरगुती संघांसोबत, ज्यूनिअर क्रिकेटर्ससोबत काम करत त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. आणि अखेर 2023 मध्ये, बीसीसीआयने त्यांना भारतीय महिला क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमलं.

मुजुमदार यांच्या कोचिंगखाली संघात शिस्त आली, आत्मविश्वास वाढला, आणि महत्त्वाचं म्हणजे संघ एक कुटुंब झाला. या संघाचं नेतृत्व करत होती हरमनप्रीत कौर, ती अनेक वर्षांपासून भारतीय महिला क्रिकेटची चेहरा राहिली आहे. तिचं नेतृत्व म्हणजे संतुलन, धैर्य आणि प्रेरणा. तिच्या बाजूला होती स्मृती मंधाना, जिचं बॅटिंग म्हणजे सौंदर्य आणि सामर्थ्य यांचा संगम. पहिल्या षटकापासून खेळावर पकड घेणारी शफाली वर्मा, मधल्या फळीतील सातत्याचा आधार असणारी जेमिमाह रोड्रिग्स, सर्वगुणसंपन्न दीप्ती शर्मा, विकेटकीपर रिचा घोष व इतर टीममधील सगळ्या खेळाडूंनी मिळून संघाला एक प्रखर ओळख दिली. हा प्रवास मात्र सोपा नव्हता. सुरुवातीच्या टप्प्यात काही पराभव आले, काही समीक्षकांनी प्रश्न उपस्थित केले, काहींनी 'महिला क्रिकेट अजून तयार नाही', असंही म्हटलं. पण या संघानं एक गोष्ट कधीच गमावली नाही. ती म्हणजे आत्मविश्वास. अमोल मुजुमदार यांनी खेळाडूंना शिकवलं की पराभव म्हणजे शेवट नाही, तो शिकण्याची संधी आहे. त्यांच्या कोचिंग सत्रात तंत्राइतकंच मनोबलावर काम केलं गेलं.

2 नोव्हेंबर 2025 रोजी नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडिअमवर इतिहास घडला. समोर होती ताकदवान दक्षिण आफ्रिका. भारताने आधी फलंदाजी करत 298 धावा केल्या. स्मृती मंधानाने तिच्या सौंदर्यपूर्ण स्ट्रोक्सने अर्धशतक झळकावलं, शफाली वर्मानं तिच्या आक्रमक शैलीने सामना फिरवला, आणि शेवटी हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्माने शेवटच्या षटकांत संघाला मजबूत आधार दिला. प्रतिस्पध्र्थ्यांनी जबरदस्त सुरुवात केली होती; पण भारताच्या गोलंदाजांनी, विशेषतः रेणुका सिंग आणि स्नेहा राणा यांनी खेळाचा ताबा घेतला. एका टप्प्यावर सामना पूर्णपणे भारताच्या हातात आला आणि अखेर दक्षिण आफ्रिकेला 246 धावांवर रोखत भारताने 52 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्यानंतर मैदानावर दिसलेले अश्रू हे केवळ आनंदाचे नव्हते, ते सुटकेचे, अभिमानाचे आणि स्वप्नपूर्तीचे होते. खेळाडूंनी एकमेकींना मिठ्या मारल्या, प्रशिक्षक मुजुमदार यांच्या डोळ्यांत चमक होती. त्यांनी काही क्षण गप्प राहून फक्त आकाशाकडे पाहिलं, जणू वर्षानुवर्षांच्या प्रतीक्षेला उत्तर मिळालं होतं. या यशामागे फक्त खेळाडू नाहीत; अनेक अदृश्य चेहरे आहेत. फिटनेस प्रशिक्षक, व्हिडिओ विश्लेषक, फिजिओथेरपिस्ट, ट्रॅव्हल कोऑर्डिनेटर्स ज्यांनी प्रत्येक क्षणी संघाला सक्षम ठेवलं. या लोकांची नावे वृत्तपत्रांत झळकत नाहीत, पण त्यांच्याशिवाय असा विजय शक्यच झाला नसता. महिला क्रिकेटच्या दृष्टीने हा विजय सामाजिक अर्थानेही फार मोठा आहे. गेल्या काही दशकांत महिलांना क्रीडाक्षेत्रात समान संधी देण्याची लढाई सुरू होती. भारतभरातील हजारो छोट्या शहरांतील मुलींना आता एक उदाहरण मिळालं आहे की, स्वप्नं फक्त मुलांची नाहीत, ती प्रत्येक मेहनती मनाची असतात.

अमोल मुजुमदार यांचा प्रवासदेखील प्रेरणादायी आहे. रणजी क्रिकेटमध्ये 11,000 हून अधिक धावा करूनही त्यांना भारतासाठी एकही टेस्ट खेळता आली नाही; पण त्यांनी कधी कटुता बाळगली नाही. भारतीय क्रिकेटमधील काही महान खेळाडूंकडून खेळ शिकल्यानंतर मुजुमदारने आपला अनुभव देशाच्या ज्यूनिअर टीम्ससोबत शेअर केला. त्याने दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्सच्या ज्यूनिअर टीम्सलाही कोचिंग दिली आहे. अमोल मुजुमदारची फॅन फॉलोइंग कदाचित जास्त नसेल; पण त्याचा दृष्टीकोन अत्यंत स्पष्ट आहे : कोणताही गाजावाजा न करता, शांतपणे आणि सातत्याने टीममध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम तो करत असतो. कोणतीही विशेष ओळख किंवा सन्मान नसतानाही, कठोर परिश्रम करण्याची किंमत काय असते, हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच, त्याचे लक्ष गाजावाजा करण्याऐवजी ठोस निकाल देण्यावर असते. सध्याच्या वर्ल्ड कपमध्ये त्याच्या या शांत नेतृत्वाची खरी परीक्षा झाली. या वर्ल्ड कपमधील ग्रुप स्टेजमध्ये भारताला ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्या वेळी टीमवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. टीमच्या निवडीवर प्रश्न उठले. अमोलच्या शांत स्वभावावर टीका झाली. तो टीमची नौका पैलतीरावर नेईल का, असे प्रश्न विचारण्यात आले. पण अमोलनं या सर्व टीकेचा ड्रेसिंग रूमवर कोणताही परिणाम होऊ दिला नाही.

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी या स्टार जोडगोळीचा शालेय क्रिकेटच्या काळापासून दबदबा होता. त्यांचे एकत्र बॅटिंग करतानाचे असंख्य किस्से क्रिकेटरसिकांच्या स्मरणात आहेत. 1988 मध्ये या जोडीने हॅरिस शील्ड या मुंबईतल्या शालेय क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या विकेटसाठी 664 धावांची मॅरेथॉन भागीदारी रचली. सचिन तेव्हा शारदाश्रम शाळेसाठी खेळायचा. या विक्रमी भागीदारीमुळे सचिन विनोद ही नावं क्रिकेटच्या नभांगणात पहिल्यांदा झळाळून निघाली. एकेरी-दुहेरी धावा आणि चौकार-षटकार यांचा सुरेख मिलाप मैदानावरल्या चाहत्यांना पाहायला मिळाला.

सचिन-विनोद जोडीने जवळपास दोन दिवस बॅटिंग केली. तेव्हा या दोघांच्याच वयाचा एक मुलगा पॅड घालून आपल्याला बॅटिंग कधी मिळणार, याची वाट पाहत बसला होता. त्याचं नाव अमोल मुजुमदार. शालेय क्रिकेटमधल्या या ऐतिहासिक क्षणाचा अमोल साक्षीदार झाला; पण तेव्हापासूनच त्याच्या नशिबी प्रतीक्षा करणं चिकटलं. 'कृपया प्रतीक्षा करा', 'रांगेचा फायदा सर्वांनाच', 'समय से पहले और भाग्य से ज्यादा कुछ नहीं मिलता', 'श्रद्धा सबुरी', अशी वाक्यं आपण अनेकदा विविध ठिकाणी पाट्यांवर पाहिली आहेत. पण अमोलने कडवटपणा न बाळगता जवळपास वीसहून अधिक वर्ष नाउमेद न होता व्रतस्थ योग्याप्रमाणे धावा करण्याचं काम केलं.

अमोल मुजुमदार यांच्या आकडेवारीवर एक नजर टाकलीत तर असं होऊ शकतं यावर तुमचा विश्वास बसेल 171 फर्स्ट क्लास मॅचेस, 11,167 रन्स, अॅव्हरेज 48.13चा, 30 शतकं आणि 60 अर्धशतकं. मुंबई संघाला भारतीय क्रिकेटची नर्सरी म्हटलं जातं. मुख्य फलंदाज आणि नंतर कर्णधार म्हणून मुंबई संघाचा आधारवड म्हणून भूमिका. असा सगळा भारीभक्कम दस्तऐवज नावावर असूनही अमोलच्या भाळी भारतीय संघाचा टिळा लागला नाही. अमोल खेळत असताना टेस्ट आणि वनडे हे दोन फॉरमॅट प्रचलित होते. भारतासाठी 295 खेळाडू टेस्ट, तर 227 खेळाडू वनडे खेळले आहेत. या यादीत अनेक दिग्गज आहेत. मात्र, त्याच वेळी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच मॅचेस खेळलेले अनेक खेळाडू आहेत. मात्र, या दोन्ही याद्यांमध्ये अमोलचं नाव नाही. कोणत्या काळात जन्माला यायचं हे आपण ठरवत नाही. मात्र, दिग्गजांच्याच कालखंडात अमोल जन्मला, त्याच काळात खेळला, स्वतःला सिद्ध केलं. मात्र, भारतीय संघात पदार्पणाचं टायमिंग निवड समितीने आणि नशिबाने जुळवून आणलंच नाही. क्रिकेटविश्वात द्रोणाचार्य म्हणून प्रसिद्ध रमाकांत आचरेकर सरांकडे अमोलने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. 1993-94 मध्ये फरीदाबाद इथं अमोलने मुंबईसाठी पदार्पण केलं. पहिल्यात सामन्यात त्याने 260 धावांची खेळी केली. हा एका खेळीचा चमत्कार नव्हता, हे अमोलने पुढचे असंख्य हंगाम सिद्ध केले.

1996 मध्ये इंग्लंड दौऱ्यापूर्वी सौरव गांगुलीने वेस्ट झोनविरुद्ध शतकी खेळी केली होती. इंग्लंडमध्ये अमोलनं द्विशतकी खेळी साकारली. मात्र, निवड समितीने गांगुलीच्या नावाला प्राधान्य दिलं आणि सौरवच्या रूपात पुढे काय घडलं हे सर्वश्रुत आहे. या चौघांच्या समकालीन कालखंडात मुंबईकर प्रवीण आमरे आणि विनोद कांबळी यांनी राष्ट्रीय संघात स्थान पटकावलं. दोघांनीही खणखणीत सुरुवात केली. मात्र, क्षमतेनुरूप त्यांची कारकिर्द बहरलीच नाही. सचिन, राहुल आणि सौरव या तिघांनी कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात कर्णधारपदाचा मुकुटही सांभाळला. चौघेही पदार्पणापासून कर्तृत्वाने मोठे होत गेले आणि कसोटी संघात 3-4-5-6 या जागांसाठी दुसऱ्या कुणाचा विचार करण्याची वेळ निवड समितीवर आलीच नाही. या काळात निवड समितीने ओपर्नसच्या बाबतीत प्रयोग केले. अमोलकडे तंत्र होतं, स्थानिक क्रिकेटमध्ये धावा होत्या. मधल्या फळीत खेळणाऱ्या खेळाडूला ओपनर करण्याचा प्रयोग वीरेंद्र सेहवागच्या बाबतीत केला गेला. तो यशस्वी झाला. मात्र, अमोलच्या नशिबी ती संधीही नव्हती. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये अमोलने अनेकदा मॅरेथॉन खेळी साकारल्या. अशा खेळींसाठी संयम आणि तंत्रशुद्धता लागते. अमोलने ती वेळोवेळी दाखवली. कदाचित, यामुळे याचा फक्त लाँग फॉरमॅटसाठी विचार व्हावा असा ग्रह झाल्याची शक्यता आहे. 1993-94 ते 1999-2000 या कालावधीत अमोलचे आकडेवारी पाहून हा 'पुढचा तेंडुलकर' असं वर्णन केलं जायचं. तो धावा करत राहिला; परंतु राष्ट्रीय संघाचं स्वप्न दूरच राहिलं. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे अमोलकडे मुंबईचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. विकेटची किंमत जपणाऱ्या अमोलने ही जबाबदारीही समर्थपणे सांभाळली. त्याच्या कारकिर्दीत मुंबईला अनेकदा जेतेपद मिळवून दिलं. 2007 नंतर अमोलच्या कामगिरीत घसरण झाली आणि एका क्षणी मुंबई संघातून बाहेर होण्याची शक्यता निर्माण झाली. मुंबई आणि क्रिकेट या दोन गोष्टी अमोलसाठी श्वासासारख्या होत्या. या दोन्हींचा त्याग करून त्याने आसामसाठी खेळण्याचा निर्णय घेतला.

फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या दिग्गजांमध्ये गणना होणारा अमोल आसामसाठी खेळताना दिसला. दोन हंगांमानंतर त्याने आंध्रकरता खेळण्याचा निर्णय घेतला. अमोलच्या बॅटिंगइतकंच त्याच्या अनुभवाचा दोन्ही संघांना प्रचंड फायदा झाला. 2008 मध्ये देशभरात IPL चे वारे वाहू लागले. त्या वेळी अमोल मुंबई संघाचा कर्णधार होता. नावंही ठाऊक नसलेल्या अनेक खेळाडूंना IPLची दारं उघडी झाली. मात्र, आयपीएल संघांनी अमोलचं मूल्य जाणलं नाही. त्यानंतरही त्याने धावा करण्याचा वसा सोडला नाही. वाढतं वय आणि ढासळणाऱ्या फॉर्मच्या पार्श्वभूमीवर अमोलने 25 सप्टेंबर 2014 मध्ये क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला.

खेळाडू म्हणून निवृत्त झाला तरी अमोलचं क्रिकेटशी असलेलं सख्य कमी झालं नाही. भारताच्या U19 आणि U23 संघांना त्याचं मार्गदर्शन मिळालं. नेदरलँड्स संघाच्या प्रशिक्षणाचं काम तो पाहत होता. IPL स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा बॅटिंग कोच म्हणूनही त्यानं काम केलं. यादरम्यान अमोलनं समालोचनाचंही काम केलं. मधल्या काळात भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजदरम्यान अमोल दक्षिण आफ्रिका संघाचा बॅटिंग कोच होता. अमोल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही, याचा बाऊ करत बसण्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेने त्याच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, कर्तृत्वाचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं होतं.

एके काळी भारतीय क्रिकेटची नर्सरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईच्या प्रशिक्षकपदाची धुराही अमोलनं सांभाळली होती. आता देशाच्या महिला संघाला विश्वचषकाच्या फायनलपर्यंत पोहोचवण्यात मोलाचं योगदान देत अमोलनं त्याला हुलकावणी दिलेल्या ब्लू जर्सीला जगभरात मान मिळवून दिलाय.

 

गेल्या आठवड्यात महिला क्रिकेट विश्वचषक सामना भारताने जिंकला. त्या निमित्ताने त्या संघाच्या प्रशिक्षकावर लिहिलेला हा लेख आहे.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

आशिष निनगुरकर,  मुंबई ( 2 लेख )
ashishningurkar@gmail.com

लेखक चित्रपटसृष्टीत कार्यरत आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी