डिजिटल अर्काईव्ह

सर्वात मोठा तलाव बघून झाल्यावर सर्वात लहान तलाव बघायला आलो. फाईव्ह कलर पाँड आकाराने लहानसा असला, तरी त्यात रंगांच्या अनेक छटा होत्या. निळा, हिरवा, मोरपिशी, पिवळा, नारंगी रंगांची उधळण होती. हे जादुई रंग कसे तयार झाले ? बर्फ वितळून आणि जमिनीखालच्या झऱ्यापासून बनलेले चिऊचायकोचे तलाव अतिशय स्वच्छ आणि प्रदूषणविरहित आहेत. त्यामुळे ह्या पाण्यामधून सूर्यप्रकाश आरपार जातो, प्रकाशाचं विकिरण होऊन पाणी निळ्या रंगाचं दिसतं. खोल तलाव गडद निळ्या रंगाचे, तर उथळ तलाव फिकट निळ्या रंगाचे दिसतात. तलावांच्या तळाशी कॅल्शियम कार्बोनेटचे पांढऱ्या रंगाचे खनिजांचे साठे आहेत. त्यामुळे पाण्याचा निळा रंग आणखी आकर्षक आणि चमकदार दिसतो. इतकं नितळ, निळंशार पाणी की बघतच राहावंसं वाटतं.

 

 

नितळ निळंशार पाणी, निळ्या रंगाच्या इतक्या सुंदर छटा आधी फक्त चित्रातच पाहिलेल्या, हिरवीगार झाडं, हिरवेहिरवे डोंगर, स्वच्छ ताजी हवा, पांढरेशुभ्र फेसाळते धबधबे, निळ्या आकाशात तरंगणारे गुबगुबीत ढग, आणि निळ्या तळाच्या काठाशी बसलेल्या लालचुटुक तिबेटी पारंपरिक वेषातल्या दोन गोड तरुण मुली. 'पॅराडाईस ऑन अर्थ' 'चिऊचायको'च्या आठवणी खरंच स्वप्नवत वाटतात.

चीन हा आपल्या भारतासारखाच निसर्गसौंदर्याने नटलेला देश आहे. हिमालयाची उंच हिमशिखरं, गोबीचं विस्तीर्ण वाळवंट, खळखळणाऱ्या नद्या, समुद्रकिनारे, हिरवीगार कुरणं आणि पर्वतरांगा असं विविधतेने संपन्न असलेलं निसर्गसौंदर्य तिथे पाहायला मिळतं. भटकंतीची आवड असणाऱ्यांसाठी चीन म्हणजे पर्वणीच. त्यामुळेच चीनमध्ये शिकत असताना मनमुराद भटकंतीची एकही संधी मी चुकवत नाही. युनिव्हर्सिटीला सुट्ट्या लागल्या की लगेच सहलींचा हंगाम सुरू होतो. पण सुट्टीत पर्यटन स्थळांवर चिनी पर्यटकांची तुफान गर्दी असते. ट्रेन, विमान तिकिटांचे आणि हॉटेलचे दरही प्रचंड वाढलेले असतात. म्हणूनच मी आणि माझ्या विएतनामी मैत्रिणीने गर्दीचा पिक पिरीयड टाळून फिरायला जायचं ठरवलं. युनिव्हर्सिटीमधला खूप महत्त्वाचे लेक्चर्स, सबमिशन्स वगैरे नसलेला कालावधी निवडून आम्ही शिक्षकांकडून परवानगी घेतली आणि आठवडाभर सुट्टी घेऊन सट्वान सहलीला निघालो.

सच्चान (Schun) म्हणजे चीनच्या दक्षिणेमधील एक प्रोविन्स (राज्य). लाल मिरच्या घातलेल्या झणझणीत जेवणासाठी आणि तरतरीत नाकाच्या सुंदर तरुणींसाठी हे राज्य फेमस आहे. आपल्याकडे मिळणाऱ्या चायनीज जेवणामध्ये शेजवान फ्राईड राईस, शेजवान न्यूडल्स वगैरे जे पदार्थ असतात, त्यातला शेजवान हा शब्द 'सष्ट्वान'चाच अपभ्रंश. ह्या सवान प्रोव्हिन्समधे आहे अबा तिबेटन अँड छ्यांग ऑटोनॉमस प्रिफेक्चर (Aba Tibetan and Qiang Autonomous Prefecture). इथे तिबेटच्या पठाराच्या कडेला असलेल्या मिन डोंगररांगांमध्ये दडलाय एक परीकथेतला प्रदेश : चिऊचायको (Jiuzhaigou ह्या शब्दाचा अर्थ आहे दरीत वसलेली नऊ गावे). दडलाय असं म्हटलं, कारण 1975 पर्यंत बाहेरच्या जगाला ह्या जागेची माहितीच नव्हती. 1975 मध्ये वनविभागाची टीम सर्व्हे करत इथे पोहोचली, तेव्हा इथल्या अद्भुत निसर्ग सौंदर्याने आणि वन्य प्राण्यांच्या विविधतेने थक्कच झाली. 1980 मध्ये चीन सरकारने चिऊचायकोला नेचर रिझर्व्ह आणि नॅशनल पार्क म्हणून घोषित केलं, तर 1992 मध्ये ह्या जागेचा युनेस्को जागतिक वारसास्थळांच्या यादीत समावेश झाला.

इंटरनेटवर चिऊचायकोचे फोटो बघून मी आणि माझी मैत्रीण वेड्याच झालो. इतक्या सुंदर जागेतून लगेच पाय निघणार नाही म्हणून आम्ही आमच्या सहलीतले दोन दिवस चिऊचायकोसाठी खास राखून ठेवले. 19 मेच्या सकाळी साडेसात वाजता आम्ही छंगतु (Chngdk - सष्ट्वान प्रोव्हिन्सच्या राजधानीचं शहर) मधून हाय स्पीड ट्रेनमधे बसलो. ट्रेन दीड तासात 280 किलोमीटर अंतर पार करून चहूबाजूंनी उंचच उंच डोंगर असलेल्या चनचियांगक्वान (Zhnjinggun) स्टेशनला पोहोचली. दोनच प्लॅटफॉर्म असलेलं फारच चिमुकलं स्टेशन होतं ते. स्टेशनला उतरताच सगळ्या प्रवाशांनी अंगावर स्वेटर चढवले, हवेत चांगलाच गारवा होता. स्टेशनच्या बाहेर चिऊचायकोला जाणाऱ्या बऱ्याच छोट्या-मोठ्या बस उभ्या बघून आम्हाला आश्चर्यच वाटलं. कारण इंटरनेटवरती 'इथे फक्त दिवसातून दोनदाच बस सुटतात' असं लिहिल्यामुळे आम्ही साडेबाराच्या बसचं आधीच ऑनलाईन तिकीट काढून ठेवलं होतं. बरेच लोक 'आमच्या बसमधे चला' म्हणून मागे लागत होते. आम्ही मग बसच्या ड्रायव्हर काकांना फोन लावला. फोनवर बोलताना मी चायनीज भाषाच वापरत असल्याने ड्रायव्हर काका एकदम भराभर बोलत होते, त्यांना सांगावं लागलं की, 'जरा सावकाश बोलता का, आम्ही फॉरेनर आहोत.' त्यांनी मग स्टेशनबाहेरच्या खाऊच्या टपरीवरच्या ताईला 'बस येईपर्यंत ह्या दोन परदेशी पाहुण्यांना ठेवून घे' असं सांगितलं.

आमची बस यायला तीन तास वाट बघायची होती. मी आणि विएतनामी मैत्रीण मका, सॉसेज, कप न्यूडल्स वगैरे खाद्यपदार्थ विकणाऱ्या टपरीवर जाऊन बसलो. आजूबाजूच्या टपरीवरच्या ताई, काका, आज्या सगळे कुतूहलाने आणि कौतुकाने आमच्या भोवती गोळा झाले. विएतनामी लोकसुद्धा चिनी लोकांसारखेच दिसतात. त्यामुळे चिनी मुलगी परदेशी मैत्रिणीला फिरायला घेऊन आलीये असा सगळ्यांचा समज झाला. पण मी त्यांच्यासोबत चायनीज भाषेत गप्पा मारायला सुरुवात केली, तसं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. 'तू आमच्या चीनची भाषा काय छान बोलतेस', असं म्हणून शाबासकीपण मिळाली. (एकूणच चीनमध्ये लोकांना कौतुक करायला खूप आवडतं. नुसतं 'नी हाव' 'हॅलो' म्हटलं तरी भरभरून कौतुक करतात.) "आता मी काय बोलतोय समजतंय का तुम्हाला?" असं म्हणत एका काकांनी त्यांच्या स्थानिक भाषेत काही वाक्य म्हटली, अर्थातच एकही शब्द समजला नाही. गप्पा मारून झाल्यावर आम्ही म्हटलं, "चला, आता ह्या गावात एक फेरफटका मारू या." ह्यावर मात्र सगळ्यांनी नापसंती दर्शवली. "इथे काही नाही बघण्यासारखं, ह्या रस्त्याने सरळ चालत गेलात तरी 10 मिनिटांत सगळं बघून परत याल", काका म्हणाले.

चनचियांगक्वान गावातला मुख्य रस्ता रिकामाच होता. रस्त्याच्या बाजूला असलेल्या दिशादर्शक पाट्या आणि सलून, गॅरेज, मटणाच्या दुकानावरच्या पाट्या चिनी आणि तिबेटी अशा दोन लिपींमधल्या होत्या. सगळ्या हॉटेलांच्या वर 'हलाल' असा बोर्ड लिहिलेला होता, काही घरांच्या दारावर चंद्रकोर आणि चांदणी दिसत होती. फळांच्या दुकानातून मी पिशवीभर लिची विकत घेतल्या, फारच रसदार आणि गोड होत्या त्या. इथल्या माणसांचा तोंडावळा इतर ठिकाणच्या चिनी लोकांपेक्षा फारच वेगळा होता. सावळा चेहरा आणि गुलाबी गाल, लडाखमधल्या माणसांसारखीच दिसत होती ही.

गावात फेरफटका मारून आम्ही पुन्हा टपरीपाशी आलो. आमच्या टपरीवरची ताई बीफ आणि पालेभाजी स्टफ केलेला जाड पराठ्यासारखा दिसणारा पदार्थ हाताने थापत होती. चांगला धंदा होत होता तिचा. शेजारच्या टपरीवर याकच्या मटणाचे कबाब विकायला होते. मी कुतूहलाने दोन बारीक काड्या विकत घेतल्या. खूपच कडक होतं ते मटण, चावायला जरा कष्टच पडत होते. तेवढ्यात आमच्या बसचे ड्रायव्हर काका आले. आम्हाला बघून ते पटकन म्हणाले, "अरे! तुम्ही दोन बहिणी, एक एवढी गोरी आणि एक एवढी काळी कशी काय ?" मला फारच हसू आलं. "ती आफ्रिकेची आहे का?" दुसऱ्या ड्रायव्हरने विचारलं. "नाही भारताची, चायनीज मस्त बोलते ती", आमच्या ड्रायव्हर काकांनी उत्तर दिलं, त्यांना फोनवर झालेलं संभाषण आठवत होतं. ड्रायव्हर काका चांगलेच प्रेमळ होते. मी घातलेलं पातळ जॅकेट बघून म्हणाले, "तू एवढं एकच जॅकेट आणलंयस ? वरती डोंगरात थंडी असते चांगलीच. मागच्या वेळी एक मुलगी बसमध्ये तिचं फेदर जॅकेट विसरली होती, नवीनच दिसतंय आणि चांगल्यातलं आहे, शे-दीडशे युआनचं तरी असेल. तू घेऊन जा हे सोबत." मला फारच संकोचल्यासारखं झालं, पण विएतनामी मैत्रीण म्हणाली, "एवढ्या प्रेमाने देतायत तर घे की."

चनचियांगक्वान ते चिऊचायकोचा बसचा प्रवास साडेतीन-चार तासांचा होता. हिरव्यागार डोंगरांमधला वळणावळणाचा रस्ता, बाजूला खळखळत वाहणारी मिन नदी, हिरवी हिरवी शेतं, तिबेटी गावांमधल्या लाल-करड्या मॉनेस्ट्रीज आणि हवेत फडकणाऱ्या पंचरंगी पताका, स्वच्छ निळं आकाश आणि दूरवर दिसणारी हिमशिखरं. फारच सुंदर होता प्रवास. चिऊचायको समुद्रसपाटीपासून 4 हजार मीटर उंचीवर आहे. समुद्रसपाटीपासून जसे वर जाऊ तसा हवेतला ऑक्सिजन विरळ होत जातो. अशा वेळी अॅल्टिट्यूड सिकनेसचा त्रास होऊ शकतो. म्हणून ड्रायव्हर काकांनी सगळ्यांना तिबेटी लाल फुलांचं औषध घ्यायला सुचवलं. आम्ही वर्गात नुकतंच तिबेटबद्दलचं एक प्रवासवर्णन वाचून त्यावर चर्चा केली होती. त्यामुळे मला याकचं मटण, तिबेटी लाल फुलांचं औषध सगळं सगळं ट्राय करून बघायची उत्सुकता होती. छोट्या छोट्या बाटल्यांमध्ये असणारं औषध उत्साहाने प्यायला घेतलं, पण चांगलंच कडू लागलं.

चिऊचायकोला पोहोचल्यावर आम्ही पहिले हॉटेलमध्ये थोडा वेळ निवांत पहुडलो आणि मग सहाच्या सुमारास जेवायला बाहेर पडलो (चीनमध्ये संध्याकाळचे साडेपाच-सहा म्हणजे जेवणाची वेळ असते). मी ड्रायव्हर काकांनी दिलेलं पिवळं जॅकेट घालून घेतलं. माझ्या अगदी परफेक्ट मापाचं होतं ते. आम्ही गल्लीच्या कोपऱ्यावरच्याच एका छोट्या रेस्टॉरंटमध्ये शिरलो. तिथल्या ताईने आमच्यासमोर ताज्या पाण्याच्या जिवंत माशाचं वजन केलं आणि थोड्याच वेळात भरपूर लाल मिरच्या घातलेलं माशाचं सूप, उकडलेली पालेभाजी आणि भातावर आम्ही ताव मारला. जेवणानंतर पुन्हा शतपावली करत फिरलो. इथे आजूबाजूला उंचच उंच डोंगर होते. नदीचं पाणी खळखळत वाहत होतं. रस्त्याच्या कडेने चालत असताना मागून 'चाशिदेले' असा आवाज आला. एक ताई टोपलीमध्ये टपोऱ्या लाल चेरीज विकत होती. तिबेटी भाषेत चाशिदेले हा एकदम बहुउपयोगी शब्द. 'नमस्कार', 'धन्यवाद' आणि निरोप घेताना 'टाटा बाय बाय' म्हणण्यासाठीही तो वापरला जातो. आम्ही पण 'चाशिदेले' म्हणत त्या ताईकडून चेरी विकत घेतल्या.

आम्ही राहत असलेल्या ह्या भागात बरीच हॉटेलं, रेस्टॉरंट्स आणि तिबेटी पोशाख भाड्याने देणारी दुकानं होती. 'किती सुंदर कपडे आहेत' म्हणत आम्ही एका दुकानाबाहेर थांबलो, तर एका मध्यमवयीन तिबेटी मावशीने आम्हाला हसून आत बोलावलं. दुकानात तिबेटी पोशांखासोबतच, तिबेटी दागिने, प्रार्थना चक्र, मूर्त्या, तिबेटी औषधं बरंच काही विकायला होतं. "तू भारताची आहेस का?" तिथल्या काकांनी मला विचारलं. मी होकारार्थी मान डोलावल्यावर ते म्हणाले, "मी तुला बघून लगेचंच ओळखलं. तू शाहरूख खानला ओळखतेस?" "हो तर, माझा खास मित्र आहे तो", मी गमतीने म्हटलं. काका हसले, म्हणाले, त्यांनी बॉलिवूडचे खूप सिनेमे बघितलेत. आणि मग एक गाणंही म्हणून दाखवलं, "आँखे खुली हो या हो बंद..." शाहरूख खानच्या 'मोहब्बते' सिनेमातलं हे गाणं चीनमधे जरा जास्तच फेमस आहे (मागे एकदा थिएनचिनला फिरायला गेलो होतो, तेव्हा तिथल्या काकांनीही हेच गाणं गायलं होतं). दुकानात आम्ही बरेच ड्रेस बघितले. नंतर इतरही दुकानांत गेलो. एवढं फिरूनही खूप उशिरापर्यंत उजेडच होता. रात्री आठ वाजता सूर्यास्त बघून हॉटेलवर परत आलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही आमचा तिबेटी पारंपरिक पोशाख भाड्याने घ्यायला गेलो. काल रात्री पहिल्यांदा गेलो तेच दुकान बघून ठेवलं होतं (आणि विएतनामी मैत्रिणीने दिवसाचे प्रत्येकी 70 युआन असं बार्गेनिंगपण करून ठेवलेलं.) सकाळी दुकानात गेलो तेव्हा तिथल्या तिबेटी मावशींसोबत त्यांची सातवी-आठवीत शिकणारी मुलगी आमची वाट बघत होती. मुलीने पांढरा आणि निळ्या रंगाचा गणवेष (ट्रॅक पँट आणि जॅकेट) घातला होता. तिला थोड्याच वेळात शाळेसाठी निघायचं होतं. मायलेकी दोघींनी आम्हाला पटापट नटवायला सुरुवात केली. सर्वात पहिले लांब बाह्यांचा पांढरा शर्ट घातला. त्यावर लाल रंगाचा पायघोळ झगा चढवला. झग्याची फक्त डावी बाहीच हातात घातली. दुसऱ्या बाजूची बाही मागच्या बाजूला सोडून कमरेला बांधली. केसांमध्ये रंगीबेरंगी लोकर गुंफून वेण्या घातल्या. सोबत खोट्या केसांच्या वेण्याही जोडल्या. गळ्यात मोठाल्या लाल, पिवळ्या आणि निळ्या मण्यांची माळ घातली. डोक्यावर बिंदी लावली. गालाला चमकीची फुलपाखरं चिकटवून मेकअपही करून दिला. 'किती गं तुम्ही बारीक' असं म्हणत ओघळणारा ड्रेस कमरेला पुन्हा घट्ट बांधला, आणि 'काय सुंदर दिसताय' म्हणत आमचे फोटोपण काढले.

नट्टापट्टा करून आम्ही गाडीत बसलो. हॉटेलच्या दादाने आम्हाला गाडीने चिऊचायको सिनिक अँड हिस्टॉरिक इंटरेस्ट एरियाच्या प्रवेशद्वारापाशी सोडलं. हे युनेस्को जागतिक वारसास्थळ असल्यामुळे तिकीट बरंच महाग होतं, पण तिथल्या कर्मचाऱ्यांनीच विद्यार्थ्यांसाठीचं निम्या किमतीचं तिकीट काढा असं सुचवलं. आज सोमवार असूनही बरेच टुरीस्ट ग्रुप्स आलेले होते. प्रवास फारसा सोयीचा नसल्याने जवळपास सगळ्या चिनी प्रवाशांनी टुरीस्ट ग्रुप्ससोबत येणं पसंत केलं होतं. चिऊचायको नेचर रिझर्व्ह प्रचंड मोठं असल्यामुळे आतमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला इलेक्ट्रिक बस होत्या. बसमधे सगळे लोक आमच्याकडे कौतुकाने बघत होते. "तुम्ही तिबेटी आहात का?" एका काकांनी विचारलं. चायनीज बोलता येतंय म्हटल्यावर तर मग देश, वय, कुठे शिकता, काय शिकता, ड्रेस कितीला भाड्याने घेतला सगळी चौकशी झाली. "सुंदर दिसताय. आमच्या शांघायच्या भाषेत म्हणायचं झालं तर लिंग आ!" एका सहलीमध्ये किती नवीन बोलीभाषा आणि शब्द शिकायला मिळत होते आम्हाला! "आमच्या शांघायचाच मुलगा पाहून लग्न करा", असा सल्लाही काकू मंडळींकडून मिळाला.

चिऊचायको मधलं पहिलं प्रेक्षणीय स्थळ 'अॅरो बॅम्बू लेक' आलं तसे आम्ही सगळे बसमधून खाली उतरलो. बारीक बाणांसारखे टोकदार दिसणारे हिरवेगार बांबूचे कोंब लांबवर पसरलेले होते, काय सुंदर दिसत होते ते. डोंगरांमध्येही हिरव्याच्या असंख्य छटा दिसत होत्या. मी मोठा श्वास घेऊन स्वच्छ ताजी हवा छातीत भरून घेतली. तिबेटी पोषाखाच्या आत थर्मल कपडे घातल्यामुळे हवेतला गारवा सुखद वाटत होता. काय मस्त जागा आहे! मला एकदम ताजंतवानं वाटायला लागलं. विएतनामी मैत्रिणीची मात्र जरा चिडचिड होत होती. "काहीच खाऊ कसा सोबत आणला नाहीस तू?" ती वैतागून म्हणाली. नटण्याच्या नादात साफ विसरूनच गेलो होतो आम्ही. तेवढ्यात काही चायनीज मावश्या आमच्यासोबत फोटो काढायला आल्या. (चिऊचायकोमध्ये बऱ्याच सिनेमांचं आणि सिरियल्सचं शूटिंग झालंय असं ऐकलं होतं. आज आम्हीच सिनेमांमधले सेलेब्रिटी झाल्यासारखं वाटत होतं.) काकांच्या हातात मोठा कॅमेरा होता आणि त्यांनी आमचे एकदम प्रोफेशनल फोटो काढले. "तुम्ही काढलेले फोटो मलापण पाठवाल?" मी विचारलं. "चला, आपण एकत्रच फिरू या, काका तुमचे मस्त फोटो काढून देतील." मावशींनी सुचवलं.

वू दादा, श्याओ यिंग ताई, मावशी, काका नवीन मित्र-मंडळींसोबत फिरायला खरंच खूप मजा आली. सगळ्यात आधी आम्ही लाकडी पुलावरून चालत चालत पांडा लेकच्या दिशेने निघालो. वाटेत अॅरो बॅम्बू लेक वॉटरफॉल लागला. अगदी चित्रातलाच वाटत होता तो! हिरव्या शेवाळी दगडांवरून पांढरंशुभ्र पाणी निळ्या तलावात पडत होतं. धबधब्यासमोर थांबून आम्ही फोटो काढले आणि पुढे पांडा लेकला गेलो. निळाशार पांडा लेक अगदी विस्तीर्ण पसरला होता. निळ्या निळ्या आकाशात पांढरे गुबगुबीत ढग तरंगत होते. पण तळ्याची निळाई आकाशापेक्षा वेगळ्याच छटेची होती. चकचकीत हिरवट निळ्या रंगाची.

चिऊचायकोमध्ये असे शंभराहून अधिक लहान-मोठे तलाव आहेत. ते Rize Valley, Zechawa Valley आणि Shuzheng Valley अशा तीन दऱ्यांमध्ये पसरलेले आहेत. पांडा लेकनंतरच्या फाईव्ह फ्लॉवर लेकचं फिकट निळं पाणी अगदी काचेसारखं पारदर्शक होतं. तलावाच्या तळाशी पडलेले लांबच लांब लाकडी ओंडके त्यातून अगदी लख्ख दिसत होते. नितळ चंदेरी पाण्यावरचे हलके तरंग, हिरव्यागार झाडांची सळसळ मोबाईलवरच्या कॅमेऱ्यात बंदिस्त करताच येत नव्हती मुळी. पण तरीसुद्धा मोबाईलवर फाईव्ह फ्लॉवर लेकचा फोटो इतका सुरेख आला, की मी तो लगेच वॉलपेपरला लावून टाकला.

तिथून मग पर्ल शोल्स वॉटरफॉलला गेलो. लांबूनच पाण्याचा खळखळाट ऐकू येऊ लागला. जवळ गेलो तसे थंडगार पाण्याचे तुषार अंगाखांद्यावर पडले. इतकं मस्त वाटलं. पांढऱ्याशुभ्र फेसाळत्या धबधब्याने डोळ्यांचं पारणं फिटलं. धबधब्याच्या आसपास माकड आणि डुकराच्या गमतीशीर वेषातली काही माणसं दिसली. डुकराचं तोंड असलेल्या व्यक्तीचं पोट भोपळ्यासारखं गोल गरगरीत होतं. "ही 'जर्नी टू द वेस्ट' गोष्टीमधली पात्रं आहेत. 1986 मध्ये ह्या कादंबरीवर जो सिनेमा निघाला होता, त्यातल्या एका प्रसंगाचं शूटिंग ह्या जागी झालेलं आहे." श्याओ यिंग ताईने माहिती दिली. हा सिनेमा मी पाहिला नसला, तरी 'जर्नी टू द वेस्ट' कादंबरीबद्दल मी शिकले होते. बौद्ध धर्माच्या धार्मिक ग्रंथाच्या शोधात भारतात निघालेल्या चिनी बौद्ध भिक्षुची ही गोष्ट आहे. ऐतिहासिक घटनेवर आधारित असलेली ही रंजक कादंबरी चीनमध्ये 'फोर ग्रेट क्लासिकल नॉवेल्स' पैकी एक मानली जाते.

पर्ल शोल्स वॉटरफॉल पाहून झाल्यावर आम्ही इलेक्ट्रिक बसमध्ये बसून Zechawa Valley च्या एकदम शेवटच्या टोकाला असलेला लाँग लेक बघायला गेलो. 3060 मीटर उंचीवर असलेला लाँग लेक चिऊचायकोमधला सगळ्यात मोठा आणि खोल तलाव आहे. तलावाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला गडद हिरव्या रंगाचे घनदाट झाडी असलेले पहाड होते, तर मागच्या बाजूला बर्फाच्छादित हिमशिखरं होती. हिवाळ्यात संपूर्ण तलाव गोठून त्यावर दोन फूट जाडीचा बर्फ साचतो. तलावाचं पाणी मग आरशासारखं लख्ख बनतं आणि त्यात पडलेलं भवतालच्या निसर्गसौंदर्याचं प्रतिबिंब अप्रतिम दिसतं म्हणे. मे महिन्यामध्येदेखील इथली हवा थंडगार होती. हिवाळ्यात तर थंडीने हाडं गोठूनच जातील. लाँग लेक पाहून झाल्यावर पुन्हा लाकडी पायऱ्या चढून वर आलो. लाकडी जमिनीवर एक गुबगुबीत खारुताई बसली होती आणि तिचे फोटो काढायला मोठा घोळका जमला होता. कु दादा आणि श्याओ यिंग ताईदेखील मोबाईल घेऊन सरसावले. खारुताईचं कसलं एवढं कौतुक ? मला काही कळलं नाही.

सर्वात मोठा तलाव बघून झाल्यावर सर्वात लहान तलाव बघायला आलो. फाईव्ह कलर पाँड आकाराने लहानसा असला, तरी त्यात रंगांच्या अनेक छटा होत्या. निळा, हिरवा, मोरपिशी, पिवळा, नारंगी रंगांची उधळण होती. हे जादुई रंग कसे तयार झाले ? बर्फ वितळून आणि जमिनीखालच्या झऱ्यापासून बनलेले चिऊचायकोचे तलाव अतिशय स्वच्छ आणि प्रदूषणविरहित आहेत. त्यामुळे ह्या पाण्यामधून सूर्यप्रकाश आरपार जातो, प्रकाशाचं विकिरण होऊन पाणी निळ्या रंगाचं दिसतं. खोल तलाव गडद निळ्या रंगाचे, तर उथळ तलाव फिकट निळ्या रंगाचे दिसतात. तलावांच्या तळाशी कॅल्शियम कार्बोनेटचे पांढऱ्या रंगाचे खनिजांचे साठे आहेत. त्यामुळे पाण्याचा निळा रंग आणखी आकर्षक आणि चमकदार दिसतो. इतकं नितळ, निळंशार पाणी की बघतच राहावंसं वाटतं. सूर्यप्रकाशात चमकणारा झळझळीत निळा रंग, तळाशी असलेले लाकडी ओंडके स्पष्ट दिसतील असा पारदर्शक चंदेरी निळा रंग, चकचकीत हिरवट निळा रंग, डोंगराच्या सावलीतला गडद आणि ढगांच्या सावलीतला पांढरट निळा रंग. निळा माझा सगळ्यात आवडता रंग का आहे ह्याची चिऊचायकोला येऊन पुन्हा एकदा खात्री पटली. 'पॅराडाईस ऑन अर्थ'. चिऊचायकोमध्ये परीकथेतला एक दिवस कसा संपला काही कळलंच नाही.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून भाड्याने घेतलेले ड्रेस परत द्यायला गेलो आणि दुकानासमोरच बसची वाट बघत थांबलो. बसने चनचियांगक्वान स्टेशनला उतरल्यावर पुन्हा हाय स्पीड ट्रेनची वाट बघणं आलं. जवळच्याच टपरीवर आम्ही जेवून घ्यायचं ठरवलं. टोमॅटो आणि अंडी घातलेले न्यूडल्स आणि याकचं मटण घातलेला फ्राईड राईस खात मोबाईलमधले फोटो बघताना मला एकदम आठवलं, अरे, आज तर चीनच्या तरुण पिढीचा व्हॅलेंटाईन्स डे (पारंपरिक व्हॅलेंटाईन्स डे चिनी कॅलेंडरच्या सातव्या महिन्यात असतो. पण 5-2-0 ह्या आकड्यांचा उच्चार चिनी भाषेतल्या आय लव्ह यू वो आय नी wo ai ni सारखा होतो. त्यामुळे चीनमधली तरुण मंडळी मे महिन्याच्या 20 तारखेला व्हॅलेंटाईन्स डे साजरा करतात.) चिऊचायकोच्या निळ्याशार पाण्याच्या प्रेमात मी अखंड बुडलेलीच होते, डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा ते परीकथेतलं दृश्य तरळलं आणि मी प्रेमाची कबुली दिली : चिऊचायको वो आय नी !

 

(चीनमधील बीजिंग विद्यापीठात 'ट्रान्सलेशन स्टडीज'मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या सानिया कर्णिक या युवतीने साधना साप्ताहिकात मागील वर्षभरात आठ लेख लिहिले आहेत. ते सर्व लेख 'चीनमधील अनुभव व भ्रमंती' यांवर आधारलेले आहेत. हे लेख www.weeklysadhana.in या वेबसाईटवर वाचता येतील.)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी