‘साधना’चे अकरा अंक एका मागोमाग एक आक्षेपार्ह ठरले तरी ‘साधना’ने आपला बाणा सोडला नाही. तेव्हा न्यायालयात न जाता सजा करण्यासाठी सरकारने पंधरा दिवसांच्या आत हजार रुपयांचा जामीन भरण्याचा हुकूम काढला! एका मित्राने सुचविले, एक एक रुपयाप्रमाणे आपल्या चाहत्यांनाच जामिनासाठी पैसे मागावे. सरकार ‘साधना’ला शासन करायला निघाले होते. पण ‘साधना’च्या मागे अशा दडपशाहीच्या वातावरणातही हजार लोक आहेत, हे दाखवण्याची ही संधी नामी होती. सरकारने जामिनाची बातमीही वृत्तपत्रांत येऊ दिली नव्हती! ‘साधना’त ती छापली आणि लोकांची विनवणी केली. आश्चर्य म्हणजे प्रचंड भीतीने लोक ग्रासले आहेत, असे वातावरण असताना लोकांच्या मनात धगधगता स्वातंत्र्यस्फुल्लिंग अद्याप आहे, याचा पुरावाच मिळाला!

26 जून, 1975 रोजी भारतात आणीबाणी लागू झाली. वृत्तपत्रांवर प्रसिध्दीपूर्व तपासणी सक्तीची केली गेली. ‘साधना’कडे अर्थातच पोलिसांचा फेरा आला. ‘तुमचे काय ठरले?’, असे त्यांनी विचारले. ‘साधनाचे विश्वस्त निर्णय घेतील तेव्हा काय ते ठरेल’ यदुनाथजी म्हणाले. पोलीस परत गेले. त्यानंतर त्यांचा पुन्हा फेरा आला. ‘चोवीस तासांत तुमचा मजकूर तपासून मिळेल. मजकूर पोलीस कमिशनरांच्या कार्यालयात पाठवून द्या.’ ‘तपासून घ्यायचे ठरले म्हणजे पाठवू’, असे सांगून त्यांना वाटेला लावले. साधना विश्वस्तांची सभा झाली. एस. एम. जोशी पाटण्याहून निघून आणि दोन ठिकाणी मुक्काम करून पुण्याला येऊन पोचले होते. त्यामुळे परिस्थितीची स्पष्ट कल्पना आली. जयप्रकाश दोन वर्षांपासून जो इशारा देत होते तो खरा ठरला होता. हुकूमशाही चोरपावलांनी आणि लोकशाहीचे बेमालूम सोंग वठवीत देशात शिरू पाहात होती. माजी राष्ट्रपती गिरी यांचे एक पूर्वप्रसिद्ध पत्र छापायला सेन्सॉरने बंदी घातली होती. एका प्रसिद्ध लेखकाची ‘भूक’ नावाची गोष्ट नामंजूर झाली होती. ‘सध्या भूक वगैरे काही नाही. प्रत्यक्षात असली तरी ती वृत्तपत्रांतून उमटता कामा नये.’ त्याने दम दिला होता. संपादकाने त्या भुकेचा गोष्टीतील भुकेचा खऱ्या भुकेशी काही संबंध नाही, हे सांगण्याचा परोपरीने प्रयत्न केला, पण व्यर्थ! त्याच्या सत्तेपुढे हे सर्व शहाणपण निरुपयोगी ठरले होते. एका वृत्तपत्रात शासकीय अनुमतीने प्रसिद्ध झालेला लेख दुसऱ्या वृत्तपत्राला छापायला बंदी. नेत्यांची जुनी अवतरणे छापायला बंदी. पारतंत्र्याच्या काळातही कधी नव्हती एवढी जाचक बंधने स्वातंत्र्यात?
मराठी पत्रकारांना टिळक-आगरकरांच्या निर्भय पत्रकारितेचा केवढा जाज्ज्वल्य अभिमान! खरे म्हणजे केसरीनेच पत्रस्वातंत्र्याच्या लढ्याचे नेतृत्व करायचे; पण तसे झाले नाही. इतर पत्रांचेही तेच झाले होते. साधना विश्वस्तांनी स्वत:लाच प्रश्न विचारला, ‘आपण विश्वस्त कशाचे? मालमत्तेचे की ध्येयवादाचे?’ आणि विश्वस्तांचा एकमताचा निर्णय होता, आपण ध्येयवादाचे विश्वस्त आहोत. मालमत्ता हे त्या ध्येयवादाचे फक्त साधन आहे. तेव्हा साने गुरुजींनी जो अखेरचा संदेश दिला तो ध्यानी ठेवून ‘साधना’ने नेटाने आपली भूमिका अदा करावी. साने गुरुजींनी लिहिले होते. ‘लोकशाही समाजवाद हे ध्येय धरा. ते तारील. भारतात रक्तपात न होता समाजवाद येवो. व्यक्तिस्वातंत्र्यासह समाजवाद फुलो.’ आणि इथे तर शासनाची सर्व पावले याच्या विपरीत पडत होती आणि त्यावर टीका करणे क्रमप्राप्तच होते. या धोरणाने ‘साधना’ची आहुती पडण्याची शक्यता दर क्षणी होती; पण ध्येयवादासाठी मालमत्तेची राखरांगोळी झाली, तर त्यात वावगे काहीच नव्हते. राखेतून फिनिक्स पक्षी जसा पुन्हा जन्म घेतो तशी लोकशक्तीच्या बळावर ‘साधना’ उभी राहील, असा आत्मविश्वास विश्वस्तांमध्ये होता. ‘साधना’चा जन्मच मुळी लोकांच्या आधारावर झाला. ‘साधना’च्या सर्व अडचणींच्या प्रसंगी लोकच तिच्या पाठीशी उभे राहिले. ‘साधना’ मुंबईहून पुण्याला आणावी लागली तेव्हा लोकांनीच मदतीचा हात दिला होता. पानशेतच्या पुरात ‘साधना’वर जी भीषण आपत्ती आली, तेव्हाही मदतीसाठी जनताच तर धावून आली. मग जनतेबद्दल अविश्वास कशासाठी? ‘जन तोच जनार्दन’ हीच तर ‘साधना’ची निष्ठा राहिली.
प्रभूचे हेच हजार आधार गोवर्धन उचलायला उभे राहतात. विश्वस्तांनी ‘साधना’ आहे त्या स्वरूपात चालवायची असा निर्णय घेतला. निर्भय, निर्वैर, निष्पक्ष असा आपला बाणा ‘साधना’ने सोडायचा नाही. उद्दामही व्हायचे नाही आणि लाचार होऊन लोटांगणही घालायचे नाही. त्याचे जे परिणाम होतील, त्यांना सत्याग्रही बाण्याने तोंड द्यायचे असे ठरले. याचा अर्थ पहिला अंकही शेवटचा अंक ठरू शकतो, असा होत होता. त्याच वेळी बेचाळीसच्या क्रांतीतील एक अग्रणी श्री.अच्युतराव पटवर्धन पुण्यात होते. त्यांना सर्वजण भेटायला गेले. त्यांच्याशी विचारविनिमय केला. त्यांनी सांगितले, ‘जे घडले आहे त्याचा प्रतिकार केला पाहिजे; पण सौम्यतम पातळीवर सुरू करा. नंतर सौम्यतर करा. मग सौम्य करा आणि मग प्रखर करा. पण आपला निषेध आपण नोंदवलाच पाहिजे.’ हा लढा बराच काळ आणि नेटाने चालवावा लागणार आहे, याची जाणीव त्यांनी करून दिली आणि लोकांना भयमुक्त करणे हे पहिले पाऊल आहे, हेही त्यांनी सांगितले. ‘साधना’चा मार्ग स्पष्ट झाला. सेन्सॉरला न जुमानता ‘साधना’ प्रकाशित करायची हे ठरले. पण भडकपणा न करता हे करायचे होते. तेव्हा पहिला अंक फक्त चार पानांचा काढायचा असे ठरले.
पहिल्या पानावर निषेध दर्शक काळा ब्लॉक, आतल्या बाजूला ठसठशीत अक्षरात साने गुरुजींचा अखेरचा संदेश आणि त्यांचे एक रेखाचित्र आणि शेवटच्या पानावर इतर मजकूर असलेला हा अंक प्रकाशित झाला. सर्वत्र रवाना झाला. इतका सौम्यतम निषेधदेखील अन्य फारशा वृत्तपत्रांनी केलेला नव्हता. अंक रवाना झाला, ग्राहकांपर्यंत पोहोचला. त्यांच्या मनोभावना ‘साधना’त उमटल्या, असेच त्यांना वाटले. त्यानंतरच्या अंकाची रचना अशीच. पण अंकाची पाने आठ केली. दुसऱ्या पानावर विनोबांचे एक अवतरण दिले. 1963 च्या जुलै महिन्यात बंगालमध्ये विनोबांनी केलेल्या ह्या प्रवचनात विनोबांनी म्हटले होते, ‘शिस्तीचे लगाम लावून तोंडे बंद करण्यात लोकशाही नसून प्रत्येकाने आपल्या मनातली बात मोकळेपणाने बोलण्यात लोकशाही आहे. शिस्तीच्या नावाखाली मुस्कटदाबी होऊ लागली तर पाहता पाहता लोकशाहीचे रूपांतर एकतंत्री राज्यात होईल. त्यातून पुढे लष्करशाहीचाही अवतार होईल. लोकमताची अशी पायमल्ली होत राहिली की हाती राहते फक्त सैन्य... एका बाजूला तोंडाळ विरोधी पक्ष आणि दुसऱ्या बाजूला शिस्तीच्या नावाखाली तोंड शिवलेला सत्ताधारी पक्ष. अशी स्थिती झाली तर लोकांचा कोणावरच विश्वास राहणार नाही. ते मते देतील; पण त्यांचे सहकार्य मिळणार नाही आणि लोकांचे सहकार्य नसेल तर देश आपल्या पायावर उभा कसा राहील? ज्या पक्षाच्या हाती सत्ता आहे, त्या पक्षाच्या लोकांनीही सत्य-प्रिय बोलावे. पण मनात असूनही जर ते शिस्तीच्या नावाखाली बोलणार नसतील, तर त्यातून देशाचे भले होणार नाही.’
विनोबांचे ‘साधना’च्या जुन्या अंकातील वचन उद्धृत करण्यात फार मोठे रहस्य होते. पहिली गोष्ट म्हणजे ‘अनुशासन पर्व’ अशी आणीबाणीची भलावण करणाऱ्या विनोबांना त्यातून एक संकेत मिळत होता आणि आत्मसमर्थनार्थ विनोबांच्या वचनांचा उदोउदो करणाऱ्या काँग्रेसजनांनाही त्यात एक इशारा होता. याच अंकात अच्युतराव पटवर्धनांशी झालेली बातचीतही दिली होती. सेन्सॉरबोर्डाने अत्यंत काळजीपूर्वक ‘साधना’चा अभ्यास करून पाहिला. चार पानांचा अंक आक्षेपार्ह मजकुराचा म्हणून पंधरवड्याने जाहीर केला. इतरांना दहशत घालण्याचा त्यांचा उद्देश होता. पण दहशत बसलेल्यांना आणखी दहशत घालणे निरुपयोगी होते. अर्थात, स्वातंत्र्यवाद्यांना मात्र अंकाबद्दल उत्सुकता निर्माण झाली. आणि सरकारी छावणीतही ही मंडळी होती. लोक चोरून छपून ‘साधना’ प्रसृत करू लागले. ‘साधना’ वाचल्याने आपण आपली स्वातंत्र्याकांक्षा निर्भयपणे जतन करतो असा अनुभव त्यांना येऊ लागला. तुरुंगात ‘साधना’ची वाट मंडळी पाहू लागली. इतर प्रदेशांत भाषेच्या भिंती ओलांडून ‘साधना’ जाऊ लागली. तिचे सामुदायिक वाचन होऊ लागले. दर पंधरवड्याने अंक आक्षेपार्ह म्हणून जाहीर करण्याचा सपाटा सरकारने सुरू केला. अंकातले नेमके आक्षेपार्ह काय, ते त्यांना सांगता येईना आणि अंक तसाच लोकांना प्रसृत होऊ देणे परवडेना. अंकात काय आक्षेपार्ह आहे, ते ठरविण्याचा वकूब सरकारमध्ये नव्हता.
सर्वोच्च न्यायालयात काही लिखाणाबाबत दाद मागितली होती आणि त्यात सरकारला आपली बाजू सावरता आली नव्हती. त्यामुळे अंक आक्षेपार्ह ठरवण्याचा उद्योगच सरकार करीत होते, सरकारचा असला निर्णय कोण करते ते मंत्र्यांनाही अवगत नव्हते. एक मंत्री खासगीत म्हणाले देखील, ‘तुमच्या अंकात आक्षेपार्ह काय आहे, तेच समजत नाही. सरकारी धोरण चुकीचे वाटले तर ते तसे आहे असे म्हणणे हा लोकांना अधिकारच आहे’; पण आणीबाणीच्या नावाखाली इतके अफाट अधिकार नोकरशाहीने बळकावले होते, की भल्या भल्या मंत्र्यांनाही त्यांच्यापुढे हतबल झाल्यासारखे वाटत होते. सरकारने अंक आक्षेपार्ह म्हणून जाहीर करावे आणि लोकांनी ते वाटेल त्या खटपटी करून मिळवून वाचावे व त्याची दाद द्यावी, असे सुरू झाले. कुठल्याही स्वातंत्र्यप्रेमी समाजात हेच घडत असते. सरकारला आक्षेपार्ह वाटणारे साहित्य हर खटपट करून मिळवून वाचणे आणि इतरांना वाचायला देणे हा सुद्धा एक अभिमानाचा विषय ठरत असे. ‘साधना’ला ते महत्त्व चढले. आणीबाणी लागू झाली तेव्हा नानासाहेब गोरे अमेरिकेत गेले होते. तेथून ते परत आले आणि दिल्लीत त्यांनी एक फेरी केली. परतल्यावर यदुनाथजींनी त्यांच्याशी बातचीत केली, ‘आणीबाणी आपल्यासाठी नाहीच, असे समजून चालावे.’ असे त्यांनी सांगितले आणि त्याच बाण्याने ते वागत होते. तेव्हा 9 ऑगस्ट क्रांतिदिनाला ‘साधना’च्या आंतरभारती सभागृहात त्यांनी भाषण देण्याचे मान्य केले. साधनाच्या रस्त्यावरील फलकावर ते स्वच्छ लिहिले. वृत्तपत्रांच्या स्थानिक कार्यक्रमाच्या सदरात ‘क्रांतिदिनानिमित्त ‘साधना’च्या वाचकांची सभा-मुख्य वक्ते-नानासाहेब गोरे’ असे प्रसिद्ध केले. साधनाचे ‘ग्राहक’ न म्हणता ‘वाचक’ म्हटले होते. कारण ग्राहक नसणारादेखील वाचक असू शकतो.
साधनाच्या समोरच पोलीस चौकी आहे. 26 जूननंतर भरणारी ही पुण्यातली पहिलीच सभा होती. परिणाम काहीही होऊ शकत होता. सर्व सभेलाच अटक होऊ शकत होती. काही मंडळींनी येऊन विचारले देखील,‘बैठकीला पोलीस आले तर?’ त्यांना सांगितले, ‘ते वाचक असतील तर तेही येऊ शकतात.’ आणि आश्चर्य म्हणजे आंतरभारती सभागृह श्रोत्यांनी ओसंडले. प्रास्ताविक यदुनाथजींनी केले आणि नानासाहेब त्यांच्या नेहमीच्याच परखड शब्दांत बोलले. अत्यंत श्रवणीय आणि आत्म्याला हाक देणारे ते विवेचन होते. वातावरणात दाटलेल्या भीतीच्या भीषण काळ्याकुट्ट वलयाला त्यामुळे चीर पडली. नानासाहेबांच्या त्या भाषणाला धरून त्यानंतरच्या ‘साधना’त त्यांची एक मुलाखत छापली. तेजस्वी मुलाखत! तिच्यात एका प्रश्नाच्या उत्तरी नानासाहेब म्हणाले होते, ‘वृत्तपत्रांवर आजची राक्षसी बंधने आहेत, तशी इंग्रजांनी घातली असती तर महात्मा फुले आपला आसूड फटकारू शकले नसते. ‘केसरी’कार टिळक लोकमान्य पदवीला पोचले नसते. ‘हरिजन’ वाचून गांधी महात्मा गांधी आणि ‘नॅशनल हेराल्ड’ वाचून नेहरू, नेहरू होऊ शकले असते काय?’ आणीबाणीबद्दलचे विवेचन नेमके होते. अर्थात हा अंकही पुढे आक्षेपार्ह ठरला. ‘साधना’चा प्रत्येक अंक शेवटचाच ठरण्याचा संभव आहे, हे ओळखून तो अत्यंत कसोशीने काढण्याची धडपड होती आणि पहिले गांगरलेपण जाऊन सरकारच्या यंत्रणेवर मात करील आणि वार्ता मिळवील अशी यंत्रणा हळूहळू तयार होत आली. सरकारी गोटातल्या हालचालींचा देखील पत्ता लागू लागला. ‘साधना’तले बातचीत हे सदर म्हणजे माहिती व विचार यांचा कोशच बनला. एक चढ एक मुलाखती त्यात येऊ लागल्या. लोकसभेतील वृत्तांताच्या प्रकाशनावर चीफ सेन्सॉरने बंदी घातली, इतका उन्मत्तपणा त्यांचा वाढला होता. पण खासदार लोकसभेत काय बोलले ते मोठ्या खुबीने बातचीत म्हणून यदुनाथजी त्यांच्याकडून वदवून घेत होते. आणि ‘साधना’त देत होते.
खासदार पुरुषोत्तम मावळंकर, कविवर्य उमाशंकर जोशी, खासदार कृष्णकांत, छगला, इरा चेळीयन अशा एकाहून एक वरचढ मुलाखती बातचीत म्हणून ‘साधना’त येऊ लागल्या आणि इंदिराबार्इंनी उभा केलेला संसदेभोवतीचा पडदाही साधनाने चिंध्या करून टाकला. एव्हाना तुरुंगातील मंडळींशीही समयोग स्थापित झाला आणि गजांपलीकडूनची माहिती ‘साधना’त येऊ लागली. मधू लिमये, मधु दंडवते, हरिभाऊ कामत आणि इतरही कित्येकांची माहिती हाती येऊ लागली. इतरांची पत्रेही हाती येऊ लागली. ‘गजांपलीकडून’ सदरातून येणारी माहिती फार हृदयस्पर्शी असे. ‘साधना’बाबत सरकारने हाच खाक्या अवलंबला. ‘साधना’चे अकरा अंक एका मागोमाग एक आक्षेपार्ह ठरले तरी ‘साधना’ने आपला बाणा सोडला नाही. तेव्हा न्यायालयात न जाता सजा करण्यासाठी सरकारने पंधरा दिवसांच्या आत हजार रुपयांचा जामीन भरण्याचा हुकूम काढला. एका मित्राने सुचविले, एक एक रुपयाप्रमाणे आपल्या चाहत्यांनाच जामिनासाठी पैसे मागावे. सरकार ‘साधना’ला शासन करायला निघाले होते. पण ‘साधना’च्या मागे अशा दडपशाहीच्या वातावरणातही हजार लोक आहेत, हे दाखवण्याची ही संधी नामी होती. सरकारने जामिनाची बातमीही वृत्तपत्रांत येऊ दिली नव्हती. ‘साधना’त ती छापली आणि लोकांची विनवणी केली. आश्चर्य म्हणजे प्रचंड भीतीने लोक ग्रासले आहेत, असे वातावरण असताना लोकांच्या मनात धगधगता स्वातंत्र्यस्फुल्लिंग अद्याप आहे, याचा पुरावाच मिळाला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून तीस पैसे पोस्टेज खर्च करून लोकांनी शंभर-शंभर पैशांच्या मनिऑर्डरी केल्या. दिसायला लहान पण ही फार मोठी घटना होती. असे चार हजार रुपये लोकांनी पाठविले. भीतीचा पडदा टराटरा फाटल्यासारखा झाला. आश्चर्य म्हणजे सेन्सॉर ऑफिसात काम करणाऱ्या दहा लोकांनीही आपला एक एक रुपया जामिनासाठी पाठवला.
‘खरे खोटे राम जाणे’ हे एक नवे सदर याच वेळी ‘साधना’त सुरू झाले. सरकारी प्रचार यंत्रणेचा मुकाबला करू शकेल अशी प्रतिस्पर्धी आणि कार्यक्षम समनुयोग यंत्रणा एव्हाना उभी झाली होती आणि सरकारपेक्षाही अधिक गतीने खबरा ‘साधना’कडे पोहोचू लागल्या होत्या. ‘साधना’चे क्रमाने अकरा अंक आक्षेपार्ह ठरले. हजार रुपयांचा जामीन मागून तो जप्त करण्यात आला. ‘शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’ हा पायंडा सोडून ‘साधना’ बौद्धिक आघाडी लढवण्यासाठी कोर्टात गेली. आक्षेपार्ह अंक हातोहात वितरित होऊन चुकले होते. कोर्टात पुराव्यादाखल त्याच्या अठरा-अठरा प्रती द्यायच्या होत्या. त्या मिळवता मिळवता नाकीनऊ आले. दावा दाखल झाला तेव्हा वकिलांजवळ पुरेशा प्रती नव्हत्या. न्यायमूर्तींनी त्या प्रतींची चौकशी केली. वकील म्हणाले, ‘तुमच्या घरी पाठवून देतो.’ न्यायमूर्ती म्हणाले, ‘घरी पाठवू नका. त्या पुरावा म्हणून दाखल करा, म्हणजे मला त्या कायदेशीरपणे वाचता येतील.’ मॅटर सबज्युडीस म्हणजे न्यायालयाधीन झाली तेव्हा अधिकच निर्भयपणे अंकातील मजकुराची जुळवाजुळव करू लागलो. सरकार केव्हाही अंक बंद पाडील हे उघडच होते. मग नवे वृत्तपत्र काढायचा विचार सुरू झाला. मधु वाणी हे कामगार क्षेत्रातले एक कार्यकर्ते. त्यांच्या नावाने प्रेस रजिस्ट्रारकडे अर्ज पाठविला. साने गुरुजी पूर्वी ‘कर्तव्य’ नावाचे सायंदैनिक चालवीत असत. त्याच नावाने हिंदी-मराठी नियतकालिक काढायचा संकल्प केला आणि परवानगीसाठी पत्र गेले. ‘कर्तव्य’, ‘नवकर्तव्य’, ‘लोकशाही कर्तव्य’ अशा नावांना अनुमती मागितली. लता कामत नावाच्या, बिहारमध्ये जयप्रकाशांच्या चळवळीत असणाऱ्या एका भगिनीच्या नावाने एक पत्र गेले. श्री.जवाहर कोटेचा यांनी ‘उज्ज्वल उद्यासाठी’ नावाची परवानगी मागितली. पोलीस चौकशीत अर्थातच उगमस्थानांचा संशय आला आणि धडाधड नकार येऊ लागले.
‘साधना’चे अंक धडाकेबाजपणे सुरू होते. आता पहिल्या पानावर कविता येऊ लागल्या. वसंत बापटांच्या ह्या कविता मर्मावर प्रहार करणाऱ्या होत्या. अखेर दिवाळी आली. ‘साधना’चे दिवाळी अंक नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असतात. या अंकात ‘फॅसिझम’ वर एक विभाग होता. फॅसिस्टच फॅसिझमविरोधी परिषदा घेऊ लागले होते. त्यांचा पडदा टरकावणे भाग होते. प्रा.नरहर कुरुंदकरांनी अतिशय मार्मिक दीर्घ लेख लिहिला. इतरही चांगले लेख जमले. अंकाची छपाई सुरू असतानाच मुंबईहून सांकेतिक संदेश येऊ लागले की, सरकार ‘साधना’वर घाला घालणार. त्यात अनपेक्षित काहीच नव्हते. पण एवढ्या मेहनतीने तयार केलेला दिवाळी अंक तरी लोकांना पोचायलाच हवा होता. तेव्हा शक्य तेवढी चपळाई करून दिवाळी अंक पोस्टात टाकला गेला आणि ‘साधना’ला आठवडाभराची सुट्टी देऊन टाकली गेली. नंतर सरकारी धाड आली. सरकारने हुशारीने सर्व डाव रचला होता. हायकोर्टाला सुट्टी असताना एकदा प्रेसला टाळे ठोकले, की ते सुखासुखी उघडता येणार नाही आणि आपोआपच साप्ताहिक ‘साधना’ बंद पडेल असा होरा! दुसऱ्या दिवशी मुंबईच्या उच्च न्यायालयात श्री.सी.आर. दळवी यांनी स्टेचा अर्ज व्हेकेशन जज्जपुढे दिला. त्याची त्यांनी लगेच विल्हेवाट लावली. ‘साधना’ प्रेसला सरकारने टाळे लावू नये. कारण साठ-सत्तर लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे आणि ‘साधना’ प्रेसने ‘साधना’ साप्ताहिकाची छपाई आक्षेपार्ह असल्याने करू नये असा निर्बंध घातला. वाजवी असा निर्णय होता.
सरकार मनात मांडे खात बसले की, ‘साधना’ साप्ताहिक काही आता निघू शकणार नाही. सरकारची कल्पना अशी की हे विकतचे श्राद्ध घेतो कोण? पण समाजवादी मित्रच जनवाणी प्रेस चालवतात. त्यांनी हे संकट पत्करायची सिद्धता केली. झटकन नवे डिक्लरेशन केले गेले आणि अंक तसाच सुरू ठेवला. मध्यंतरीच्या काळात गंभीर आजारापायी जयप्रकाशांची सुटका झाली. त्यांना जसलोक रुग्णालयात आणले. डायलेसिस, म्हणजे यंत्राच्या साह्याने रक्तशुद्धीकरण करून जयप्रकाश सावरतील असा आत्मविश्वास डॉक्टरांना आला. लाखभर रुपये त्यासाठी लागणार होते. जयप्रकाशांच्या जिवासाठी एवढे पैसे चारदोन मंडळीही उभे करू शकली असती! पण रुपरुपाया करून हे पैसे जमवावे असे ठरले. दादा धर्माधिकारी, रविशंकर महाराज, केदारनाथजी यांच्या सहीने अपील काढायचे ठरले. पण हे पत्रक छापणार कोण आणि निधी गोळा करणार कोण? ‘साधना’ने ही जबाबदारी घ्यायचे ठरवले. उघडपणे हे सर्व करायचे होते. रुपयाच्यावर कोणाकडूनही अधिक रक्कम घ्यायची नव्हती. सरकारच्या अमानुष प्रचाराला हे सक्रिय उत्तर ठरणार होते. ‘साधना’ने रुपरुपयाची कुपने छापली. साधनात एकएक रुपयाची कुपने घेण्यासाठी ‘साधना’च्या प्रजासत्ताकदिन अंकात आजारी जयप्रकाशांच्या रंगीत चित्रासह एसेम(एस.एम. जोशी)च्या सहीचे एक पत्रक छापले. ‘जयप्रकाशांसाठी रुपयाप्रमाणे एक लाख’ ह्या सूचनेचा जादूसारखा प्रभाव पडला. त्या वेळी जयप्रकाशांची ती सुंदर कविता एस. एम. जोशींकडून हाती आली होती. ‘साधना’ने ती छापली. जयप्रकाशांची सारी थोरवी त्या एका कवितेत प्रकट झालेली आहे. मूळ कविता हिंदीत आहे. जयप्रकाशांची ती ‘हृदयस्पर्शी कविता’ वाचून ज्याचे डोळे पाणावले नसतील असा सहृदय माणूस विरळा.
जीवन विफलताओंसे भरा हैं
सफलताएँ जब कभी आयी निकट
दूर ठेला हैं उन्हें निज मार्गसे
तो क्या वह मूर्खता थी? नहीं
सफलता और विफलताकी
परिभाषाएँ भिन्न हैं मेरी
मुझे क्रांति शोध के लिये
कुछ अन्यही पथ मान्य थे, उद्दिष्ट थे।
पथ त्याग के, सेवा के, निर्माण के
पथ संघर्ष के, संपूर्ण क्रांति के
जग जिसे कहता विफलता थी।
थी शोधकी वे मंजिले
मंजिले वे अनगिनत है
गंतव्य भी अति दूर हैं
रुकना नही मुझको कही
अवरुद्ध कितना मार्ग हो।
निज कामना कुछ है नही
सब हैं समर्पित ईशको
विफलताओं पर तुष्ट हूँ अपनी
और यह विफल जीवन
शतशत धन्य होगा यदि
समानधर्मा प्रिय तरुणों का
कंटककीर्ण मार्ग यह
कुछ सुगम बन आये।
वर्षभर राजबंदी तुरुंगात राहिले. लोक आपापल्यापरी काही तरी मदतीची धडपड करीतच होते. पण उघडपणेच हे का करू नये? ‘साधना’नेच या कामी निर्भयपणे पुढाकार घ्यावा, असे यदुनाथांच्या मनात आले. अशा सर्व कामांत एस.एम. जोशींचा सदैवच पाठिंबा असे. आचार्य दादा धर्माधिकारी यांच्याशी बोलणे झाले. त्यांच्याकडून एक पत्रक तयार करून घेतले. दादांचे सारे सौजन्य आणि सहृदयता त्या पत्रात एकवटली होती. राजबंद्यांच्या परिवारांचा छळवाद का, असा सरळ प्रश्न होता. दादांच्या जोडीने केदारनाथजी, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, आचार्य वि.प्र. लिमये, गोविंदराव शिंदे, एस.एम. जोशी यांच्या सह्यांनी ते पत्रक प्रसिद्ध झाले. सर्व मराठी पत्रांकडे ते पाठवले. छापण्याची हिंमत कोणीच दाखविली नाही. ‘साधना’ने पावत्या छापल्या. सर्वत्र प्रसृत केल्या. ‘साधना’च्या फळ्यावर जाहीर रीतीने लिहिले गेले. पैसे जमा होऊ लागले आणि राजबंदी परिवारांच्या होणाऱ्या छळवादाची पत्रेही येऊ लागली. ‘साधना’वर सरकारने आघात केला, तरी लोकजागृतीचे काम बंद पडता कामा नये म्हणून एका बाजूला सहचिंतन सभांची प्रणाली ‘साधना’ने सुरू केली; दुसऱ्या बाजूला ‘जनबोध प्रकाशन’ म्हणून एक माला सुरू करण्याचीही आखणी केली. मृणाल गोरे यांना भूमिगत अवस्थेतच सरकारने अटक केली. त्यांना अकोल्याच्या तुरुंगात डांबण्यात आले. त्यांचा छळवाद मांडण्यात आला. महारोगी आणि वेडी यांच्या शेजाराला त्यांना ठेवले. प्रभुभाई संघवी व त्यांच्या मित्रांनी अकोल्याला जाऊन ही सर्व हकीकत आणली. मृणालतार्इंची ह्या काळातली डायरीही हातात आली. त्याची तपशीलवार हकीकत ‘साधना’ने दिली. तेव्हा सर्वत्र क्षोभाची आणि संतापाची एक लाट उसळली. दुर्गाताई भागवतांची तेजस्वी भाषणे मिळवून ‘साधना’ने छापली. आणीबाणीचे काळेकुट्ट वर्ष पूर्ण व्हायची वेळ आली. ‘साधना’चा एक विशेषांक काढायचे ठरले. मजकुराची जमवाजमव सुरू झाली.
जॉर्ज फर्नांडिस यांचे भूमिगत असतानाचे चिंतन, त्यांच्या भावाच्या छळवादाची कहाणी, लोकशाहीचा अन्वयार्थ समजून सांगणारा नरहर कुरुंदकरांचा लेख, नागपूरचे भास्कर भोळे यांचा लेख, सूचक असे आवरण, प्रत्येक लेख हा चेतवणारा एक स्फुल्लिंगच होता. पण अंकाची छपाई सुरू झाली आणि मुंबईहून पुन्हा सावधानतेचे इशारे सारखे येऊ लागले. हा अंक तर सरकारच्या हाती पडताच कामा नये; लोकांपर्यंत तो पोहोचलाच पाहिजे अशी चिंता निर्माण झाली. ‘साधना’च्या पानावरचा ‘साधना’ हा निर्देश कधीच बंद करून टाकला होता. सरकारने काही वांधा आणलाच तर नानासाहेब गोरे यांच्या वाढदिवसाची स्मरणिका म्हणून अंक प्रकाशित करायची तयारी ठेवली. जयप्रकाशांनी ‘साधना’ची पाठ थोपटणारे स्वत:च्या हस्ताक्षरातले पत्र पाठवले होते. पण त्याचा ब्लॉक तयार करून घेण्यालाही सायास पडले. शेवटी अंक पूर्ण तयार करून पोस्टात गेला. इतरत्रही प्रसृत झाला. ‘लोकशाही : अन्वय आणि अर्थ’ ही पुस्तिकाही तयार होऊन सर्वत्र रवाना झाली. सुटकेचा नि:श्वास सोडला. एक वर्षभर ‘साधना’ने स्वातंत्र्याची मशाल तेजाळत ठेवली होती. 26 जूनला पुन्हा एकदा धरपकडीचा एक फेरा झाला. वर्षातले एकूण एक अंक जप्त होणे हा वृत्तपत्रांच्या इतिहासातला बहुधा उच्चांक असावा. पुढच्या शनिवारी श्री. मधु वाणी यांच्या संपादकत्वाखाली अनियतकालिक म्हणून ‘कर्तव्य’ प्रकाशित झाले आणि रवानाही झाले. ‘कर्तव्य’ शीर्षकाची ‘साधना’च आहे. हे सहजच ध्यानी येण्यासारखे होते.
‘बुलेटिन’ काढण्याबद्दलचा महात्मा गांधींचा उतारा, राजबंदी परिवारांच्या छळवादाची मुखपृष्ठावर कहाणी, जनतंत्र समाजाच्या वार्षिक अधिवेशनाचा तपशीलवार कुठेच येऊ न शकलेला वृत्तांत, सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ वि.म. दांडेकर यांची सद्य:स्थितीबद्दलची परखड मुलाखत, सिंहाने मेष राशीत प्रवेश केल्यामुळे ‘केसरी’च्या आमंत्रणावरून लिहिलेला आणि परत आलेला नानासाहेब गोरे यांचा अमेरिकन स्वातंत्र्याच्या द्विशताब्दीनिमित्त लिहिलेला लेख, नागरिक स्वातंत्र्याचे लढे लढवणारे प्रसिद्ध कायदेपंडित श्री.चंद्रकांत दरू यांच्या बेमुर्वत अटकेची हकीकत, 26 जूनला ‘साधना’त भरलेल्या सहचिंतन सभेचा वृत्तांत, अजित कांबळे आणि डॉ.बाबा आढाव यांचे ‘दुबळ्या घटकांच्या मदतीच्या नावाने सरकारने चालवलेली फसवणूक’ दाखवून देणारे लेख, जुलैच्या दोन दिवसातली सरकारच्या वाणी-वर्तनातील ढोंगबाजी असा सगळा मजकूर होता. एकच गोष्ट झाली होती. दोन पैशांऐवजी वीस पैशांची तिकिटे लावून हा अंक पाठवावा लागला होता. मग ‘कर्तव्य’ अनियतकालिकच सुरू झाले. त्याची झळ जनवाणी प्रेसला पोचणार हे अपेक्षितच होते. त्याप्रमाणे जामीन मागणारा हुकूम सुटला. जनवाणी प्रेसचे संचालक श्री.शिरुभाऊ लिमये मिसात बंदच होते. त्यांच्या वतीने श्री.दळवी यांनी कोर्टातून स्टे मिळवला. मधल्या काळात अख्खा अंक आक्षेपार्ह ठरवणे आणि हजार रुपयांचा जामीन मागून जप्त करणे, याबद्दलची केस सुनावणीला निघाली. पंचवीस हजारांचा जामीन, साधना बंद करण्याचा हुकूम, साधना व जनवाणी प्रेसकडून जामीन या केसेसही दाखल केलेल्या होत्या. महाराष्ट्र सरकार इतके हुशार, की ‘साधना’च्या केससाठी त्यांनी मराठी न जाणणाराच कायदेपंडित मुख्य वकील म्हणून नेला. इंग्रजी भाषांतर सरकारला करून द्यावे लागले. सुनावणीच्या वेळच्या गमतींचा एक ग्रंथ होईल. ‘लोकशाही समाजवाद हे ध्येय धरा, ते तारील. भारतात रक्तपात न होता समाजवाद येवो. व्यक्तिस्वातंत्र्यासह समाजवाद फुलो!’ हे आणीबाणीनंतरच्या पहिल्या अंकातले वाक्य! साने गुरुजींच्या लालित्यपूर्ण, विचारप्रगल्भ शैलीचे भाषांतर करणे हा पोरखेळ नव्हे.
सरकारी विद्वानांनी ‘भारतात रक्तपात न होता समाजवाद येवो.’ याचे भाषांतर ‘लेट देअर बी ब्लडलेस सोशालिझम’ असे केले. वास्तविक भाषांतर पाहिजे होते, ‘लेट देअर बी सोशॅलिझम विदाऊट ब्लडशेड!’ पण सरकारी भाषांतरकारांनी त्याचा ब्लडलेस ॲनिमिक सोशालिझम करून टाकला. ‘साधना’च्या मुखपृष्ठावर काळा निषेधदर्शक ब्लॉक सतत काही महिने छापला. त्याचाही प्रश्न निघाला. त्यामुळे विध्वंस, हिंसा, अराजक कसे माजते ते काही सरकारी वकिलाला सांगता येईना. बारा दिवस खटल्याचे काम चालले. सरकारला आपल्या कृत्याचे कायदेशीर समर्थन करता आले नाही. उच्च न्यायालयात ‘साधना’च्या बाजूने निकाल लागला. ‘साधना’चा जप्त केलेला जामीन परत करण्याचा हुकूम झाला. साधनाच्या वकिलांचा खर्चही सरकारतर्फे देण्याला सांगितले गेले. सरकारने किती चुकीचे धोरण अवलंबले होते, ते वेशीवर टांगले गेले. ‘साधना’चा निवाडा झाला तरी पुण्याच्या एकाही वर्तमानपत्रात तो छापला गेला नाही. तेव्हा फार आश्चर्य वाटले. पण पुण्याच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी पुण्याच्या वृत्तपत्रांना तोंडीच आदेश दिला होता की, निवाडा ‘साधना’च्या बाजूने लागला हे छापता कामा नये. तोंडी दमदाटी करण्याचे हे प्रकार सर्रास सुरू होते. दोन संपादकमित्रांनी तशी पत्रे निर्भयपणे लिहून दिली. ती घेऊन सरकारच्या ह्या उद्दाम वर्तनाबद्दल दाद मागणारा अर्ज उच्च न्यायालयात दळवींनी दाखल केला. आठ-दहा दिवस त्यालाही लागले आणि शेवटी निवाड्याची वार्ता प्रसिद्ध करण्याला सरकारला कबूल व्हावे लागले.
पण ‘साधना’वरची बंदी एवढे झाले तरी सरकारने उठवली नव्हती. पंचवीस हजार रुपयांच्या जामिनाचा हुकूम परत घेतला नव्हता. ‘कर्तव्या’त दुधाची तहान ताकावर भागवीत होते. पण ‘साधना’ पुन्हा वाचकांना हवी होती. ‘साधना’च्या लढ्यात ‘साधना’ सेवकांचे कमालीचे सहकार्य होते. त्यांच्या सहकार्यावाचून हा लढा होऊच शकला नसता. पोलिसांनी सेवकांना फितवण्यासाठी आमिषांचा वापर करण्याचा केलेला प्रयत्न सर्वस्वी वाया गेला. जनवाणी प्रेस या लढ्यात आधी पणाला लावायचा असा निर्णय झाला, तरी त्या छापखान्याची सर्व कामे रेटून नेण्याची कुवत नव्हती. ‘साधना’ प्रेसलाच जनवाणी प्रेसची कामे अनेकदा करावी लागत आणि कुठल्याही प्रकारे कुरकुर न करता, ‘साधना’चे सेवक आनंदाने आणि हुशारीने हे सर्व कार्य पार पाडत. लोकशाही स्वातंत्र्याच्या या लढ्याशी तेही सर्वार्थी समरस झाले होते. ‘भाकरी की स्वातंत्र्य’ हा भ्रामकच प्रश्न असतो. भाकरी मिळवण्यासाठीदेखील स्वातंत्र्याची आवश्यकता असते. श्रीमंतांना राज्यकर्त्यांच्या कानाशी लागायला नोटांची ऊब पुरते. गरीबदुबळ्यांना तिथे प्रवेशच नसतो. आवाज उठवला तरच तो महालात सुखाच्या कडेलोट बंदोबस्तात बसणाऱ्यांच्या कानी गेला तर जाणार! ‘साधना’च्या सेवकांना ही जाणीव होती. दलितांची गाऱ्हाणी ‘साधना’ने लावून धरली होती. पांगरीफुट्याचे डॉ.वसंत गायकवाड आपल्या समतेच्या हक्कांसाठी लढत होते. त्यांना मिसा नं.2 म्हणजे गुन्हेगार म्हणून अडकवून ठेवले होते. त्यांनी अर्जविनंत्या करून सरकारची दारे ठोठावली, पण व्यर्थ. मग ‘साधना-कर्तव्या’तून त्यांचे गाऱ्हाणे वेशीवर टांगावे लागले. अशी किती तरी प्रकरणे या काळात घडली. राजबंदी परिवार-साहाय्य निधीतूनच त्यांना वेळीवेळी मदतही पोचती करण्यात आली. संधी अनेकदा संकटांच्या रूपानेही येते. हा चिंतेचा काळच मुळी ‘साधना’चा सुवर्णकाळ होता.
(‘साधना’च्या सुवर्णमहोत्सवी वर्ष विशेषांकात- 15 ऑगस्ट, 1998 च्या अंकात हा लेख प्रसिद्ध झालेला आहे.)
Tags: वृत्तपत्रस्वातंत्र्य यदुनाथ_थत्ते एसएमजोशी सदानंद_वर्दे जयप्रकाश नारायण इंदिरा_गांधी 40_वर्षांनी_आणीबाणी_पाहताना साधनाची_भूमिका आणीबाणी भारतीय लोकशाही Freedom of press Sadhana’s stand Yadunath_thatte SMJoshi Sadanand_varde Indira_Gandhi democracy Indian politics the_emergency weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या