डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

दत्ता दामोदर नायक यांची मुलाखत : भाग एक

मी धर्माविषयी खूप वाचन केलं. त्यामुळे मी धर्माविषयी चर्चा करू शकतो. मी नास्तिक असलो तरी अचानक हेलिकॉप्टरमधून पडलेलो नाही. ती एक फार प्रदीर्घ, कंटाळवाणी आणि त्रासदायक अशी प्रक्रिया असते. काही वेळा मात्र मला वाटतं की, आपण फार दुर्दैवी आहोत. खरं तर अज्ञानी लोक खूप सुखी आहेत. कुरुंदकरांचे शब्द आहेत, आपण जरी देव मानत नसलो, तरी देव मानणारी लोकं आहेत हे आपण मानलं पाहिजे. देवाचा एक विशिष्ट उपयोग आहे. धर्माचा 'प्लासिबो इफेक्ट' आहे. प्लासिबो इफेक्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या उपचारांमुळे ती बरी होत नाही, तर 'त्या उपचारांनी मी बरी होईन' या विश्वासातून ती बरी होते. पण हा प्लासिबो इफेक्ट तेवढ्यापुरताच ठीक आहे.

प्रश्न : दत्ता नायक सर, तुमच्याबरोबरचा संवाद औपचारिक असो किंवा अनौपचारिक, तो अतिशय क्रिस्पी असतो आणि काहीतरी वेगळं देऊन जातो. तुम्ही गोव्यामध्ये वाढलात, तुमचं बालपण, शिक्षण गोव्यात झालं. आयुष्यातल्या पहिल्या 40 वर्षांच्या काळात खूप वे वेगळ्या अंगानी तुमची घडण झालेली आहे. साधारणतः वयाच्या पाचव्या सहाव्या वर्षी आपण शाळेत जातो आणि तेव्हापासूनच्या आपल्या पुढच्या आठवणी जरा जास्त ताज्या राहतात. तर तुम्ही पहिली ते चौथी या काळात ज्या शाळेत जात होता, ती शाळा नेमकी कशी होती? तुमचं घर आणि तुमचा सभोवताल कसा होता?

- माझा जन्म 1954 चा. गोव्याला डिसेंबर 1961 मध्ये स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे पहिल्या सात वर्षांचा पोर्तुगीज काळ मला अंधुकपणे आठवतो. पण, 19 डिसेंबरला भारतीय जवान गोव्यात आले असताना माझ्या आईने मला तिथे नेलं होतं आणि मी त्यांच्याशी हस्तांदोलन केलं होतं हे मला आठवतं. माझ्या सुदैवानं मला चांगलं घर मिळालं. माझे आजोबा काशिनाथ दामोदर नायक हे सार्वजनिक व्यक्ती, इतिहास संशोधक आणि महत्त्वाचं म्हणजे समाजवादी विचारांचे होते. त्यांनी गोमंत विद्यानिकेतन ग्रंथालय आणि समाजसेवा संघाची महिला नूतन शाळा स्थापली होती. त्यांचं स्वतःचं ग्रंथालय, अभ्यासिका होती. सगळेच समाजवादी नेते बॅरिस्टर नाथ पै, नानासाहेब गोरे, एस.एम. जोशी, राममनोहर लोहिया आमच्या घरी आलेले आहेत. माडखोलकर, फडके अशा अनेक लेखकांच्या व्याख्यानमाला होत, तेव्हा ते आमच्या घरी राहत. याचा सगळा एक सामूहिक परिणाम माझ्यावर झालेला आहे.

आमच्या घरातलं वातावरण फारसं धार्मिक नव्हतं. समाजशास्त्राच्या दृष्टीने मी गौड सारस्वत ब्राह्मण या जातीतला. माझ्या आईने माझ्यावर चांगले संस्कार केले. माझ्या आत्मचरित्रात आईविषयी लिहिताना शेवटी मी लिहिलं आहे- 'भारतीय संस्कृतीची दोन प्रतीकं, एक जानवी आणि दुसरी जोडवी. एक तोडतात, दुसरी जोडतात. माझ्या आईचं मोठेपण हे की, तिने माझ्या गळ्यात जानवी घातली नाहीत, तर माझ्या हातात जोडव्यांची परात दिली.' माझे वडील, आजोबा नास्तिक नव्हते, पण घरात कर्मकांड नव्हते.

शाळेतही मला चांगले शिक्षक रामदास फेणे, माधव पंडित आणि श्रीरंग कदम, सगळे साधना किंवा साने गुरुजींच्या परिवारातले मिळाले. मला आठवतं, 1969-70 या वर्षी आमची सहल अजंठा-वेरूळला गेली होती. तेव्हा पंडित सरांनी मला सहलीवर निबंध लिहायला सांगितला होता. तेच माझं पहिलं प्रवासवर्णन. त्याला कोकणी बाज होता. त्यातील पहिलं वाक्य मला आठवतं, 'झुंजू मुंजू झालं नव्हतं. मडगावच्या प्रासावरून (बस स्टँड) म्हापशां, म्हापशां म्हणून जाणारी बस सुटली नव्हती.' झुंजू मुंजू हा शब्द मी कुठून तरी घेतला होता. ते वाचून सर 'छान झालं' म्हणाले. मग ते साधनाच्या कुमार अंकात छापण्यासाठी पाठवलं. हा माझा साधनेशी जमलेला पहिला योगायोग. आणि दुसरा योगायोग म्हणजे 1972 मध्ये माझं पहिलं पुस्तक 'रिपोर्ताज काणकोण एक सर्वांगीण अभ्यास' याचं प्रकाशन साधनाचे संपादक यदुनाथ थत्ते यांच्या हस्ते झालं होतं.

माझा शिक्षण शास्त्राविषयी एक नियम किंवा अनुभव आहे ज्या विषयाचे शिक्षक तुम्हाला आवडतात, तो विषय तुम्हाला आवडतो. शाळेत मला अरविंद येवले नावाचे गणित शिक्षक मिळाले. मला ते अतिशय आवडत होते आणि त्यांनाही मी आवडत होतो. एवढं की मी आठवीत असताना त्यांनी मला दहावीपर्यंतचं गणित शिकवलं आणि शिक्षक दिनाला नववीच्या वर्गात शिकवण्यासाठी आत्मविश्वासही दिला. त्यांचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. दुसरे चित्रकलेचे शिक्षक मला आवडत नव्हते, त्यांना मी आवडत नव्हतो. मी चित्रकलेत चक्क नापास झालो. माझा गणिताचा अभ्यास आजपर्यंत चालू आहे. तेव्हा घरातील आणि शाळेतील प्रागतिक वातावरण, घरातील ग्रंथालय आणि गोमंत विद्यानिकेतन या आमच्या संस्थेमुळे वाचनाची आवड, गणित आणि संस्कृत या विषयांवरचं माझं प्रेम, मराठी काव्याविषयीचं आणि एकूणच मराठी साहित्याविषयीचं प्रेम, आईला प्रवास आवडायचा त्यामुळे प्रवासातून येणारे अनुभव, या सगळ्यांतून मी घडलो.

प्रश्न: त्या शालेय वयात म्हणजे नववी-दहावी पर्यंतच्या कालखंडात तुम्ही गोव्याच्या बाहेर कुठे प्रवास केला होता?

- मी तेव्हा गोकाकचा धबधबा, अजंठा-वेरूळ, कोकण, सिंधुदुर्ग पाहिलं. त्यानंतर दक्षिण भारतात गेलो. अरविंद आश्रम, पॉन्डिचेरी, महाबलीपुरम, पक्षी तीर्थ, बँगलोर, म्हैसूर, उटी हे सगळं पाहिलं. माझ्या आईने मला पन्हाळगड, प्रतापगड, रायगड असे गडही दाखवले होते. मी तेव्हा भरपूर फिरलो आणि बाकीचा प्रवास कॉलेजनंतर झाला. मी नंतर परदेशातही गेलो.

प्रश्न : प्रवासातून तुम्ही माणसं, निसर्ग वाचणं हे करत होता आणि प्रत्यक्ष ग्रंथांमधून आणखी वेगळं वाचन करत होतात. तर त्या काळात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तकं वाचत होता? कोणती महत्त्वाची पुस्तकं, लेखक यांचा तुमच्यावर प्रभाव पडला?

- मी सगळी कथात्मक पुस्तकं वाचली. आणि मग मला ललित लेखनाचा नाद लागला. दुर्गाबाई भागवतांचं 'ऋतुचक्र' आणि 'व्यासपर्व', श्रीनिवास कुलकर्णीचं 'डोह', माधव आचवल यांचं 'किमया', ना. ग. गोरे यांचं 'डाली', लोहियांचं 'ललित लेणी' ही सगळी पुस्तकं वाचली. मग कादंबऱ्या वाचल्या. त्यात साने गुरुजींच्या कादंबऱ्या, भालचंद्र नेमाडेंची 'कोसला', रणजित देसाईंची 'स्वामी' आणि 'श्रीमान योगी', शिवाजी सावंतांची 'मृत्युंजय', व्यंकटेश माडगूळकरांची 'बनगरवाडी' (माझी आवडती कादंबरी) अशा अनेक कादंबऱ्या वाचल्या. जे हातात पडेल ते वाचलं. भारत सासणे सांगतात ना, फॅन्टसी महत्त्वाची असते. रहस्यकथा वाचल्या. भा.रा.भागवत, नाथ माधवांची 'वीर धवल' वाचली. टारझन, पंचतंत्र, कथा सरित्सागर वाचलं. असं बरंच काही वाचलं.

प्रश्न : हे सगळं वाचन, प्रवास आणि घरातलं अतिशय समृद्ध वातावरण गोवा मुक्तिसंग्रामाच्या काळात देशातले, राज्यातले, बाहेरचे अनेक रथीमहारथी घरात येऊन गेलेले - म्हणजे तुमची तिहेरी घडण चालू होती. तुमच्या घरात आधीच एक उद्योग व्यवसाय होता. तुम्ही साधारणतः हायस्कूल संपल्यावर पुढे पदवीपर्यंतचं शिक्षण प्रामुख्याने गणित आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन केलं. त्या वेळचं तुमचं नियोजन काय होतं -परदेशात जाऊन स्थायिक व्हायचं? आपला उद्योग व्यवसाय करायचा? की नोकरी करायची?

- मी कॉलेजमध्ये असताना गोव्यात मेरीट लिस्टमध्ये तिसरा आलो होतो. पण मी सायन्सला न जाता आर्ट्सला गेलो. मला गणित घ्यायचं होतं आणि गणितज्ञ किंवा अर्थशास्त्रज्ञ व्हायचं होतं. मग मी संस्कृत, मराठी आणि गणित घेतलं. त्याच वेळी मी जवळजवळ मार्क्सवादी झालो. राष्ट्रसेवा दलाचे कँप्स केले. 'युक्रांद' मध्ये कुमार सप्तर्षीची ओळख झाली. पुढे मी 'छात्र युवा संघर्ष वाहिनी' मध्ये ओढला गेलो. अशा त-हेने या सगळ्यांतून माझी जडणघडण होत गेली. मला पोस्ट ग्रॅज्युएशन आणि जमलं तर मॅथेमॅटिक्समध्ये पीएच.डी. करायची होती. पण मला नाइलाजानं व्यापार-उद्योगात यावं लागलं. माझे वडील वृद्ध झाले होते, धंदा व्यवस्थित चालत नव्हता. अनिच्छेने मी उद्योजक झालो.

प्रश्न : ग्रॅज्युएशनच्या अंतिम टप्प्यात असताना तुम्ही केलेल्या सत्तरी तालुक्याच्या अभ्यासाबद्दल, लिखाणाबद्दल जरा विस्तारने जाणून घ्यायला आवडेल.

- माझा एक मित्र मनोहर कोरगावकर यांनी पेडणे सत्तरी आणि काणकोण या गोव्यातील तीन मागासलेल्या तालुक्यांविषयी 'पेडणे मागे का' म्हणून एक पुस्तिका लिहिली. त्याचं अनुकरण म्हणून आम्ही पहिली अखिल भारतीय विद्यार्थी संघटना काढली आणि चळवळ उभी केली. आम्ही काणकोणमध्ये सात-आठ दिवसांचा कैंप घेतला. मी त्यावर 'काणकोणः एक सर्वांगीण अभ्यास' हे पुस्तक लिहिलं. त्याला जवळजवळ रिपोर्ताज म्हणतात. म्हणजे सोशिओ इकॉनॉमिक सर्वे ऑफ काणकोण तालुका आणि पुढे सत्तरी. त्यावर मला सत्तरीमधल्या महादेव शास्त्रींचं पत्र आलं. मला आठवतं, यदुनाथ थत्ते काणकोनच्या पुस्तक प्रकाशनावेळी आले असताना त्यांनी केलेल्या भाषणात पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या होत्या प्रबोधन, रचनात्मक काम, संघर्ष, सहिष्णुता, एकात्म.

प्रश्न : आता मला सत्तरी तालुक्याचा अभ्यास आणि कानकोण हा भाग तुमच्या पुढच्या सगळ्या लेखन कारकिर्दीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा वाटतो. सत्तरी तालुक्याचा अभ्यास तुम्ही कसा केला, हे मला खोलात जाणून घ्यायचंय. कारण आम्ही साधना साप्ताहिकाच्या वतीने तरुणांना 50 हजारांची अभ्यासवृत्ती आणि अभ्यासासाठी सहा महिन्यांचा वेळ देतो. तर तेव्हाचा तुमचाही तोच टप्पा होता.

- आम्ही मे 1972 मध्ये काणकोण तालुक्यात जवळजवळ आठ दिवसांचा कँप घेतला. आणि 1973 मध्ये सत्तरी तालुक्यातही कँप घेतला. केरळ राज्याचे माननीय राज्यपाल राजेंद्र आर्लेकर त्या कँपमध्ये होते. त्या कँपमध्ये बौद्धिकं चालायची, भाषणं व्हायची. आम्ही सकाळी उठून गावागावांत जायचो आणि सर्वेक्षण करायचो. त्या सगळ्या नोंदी मी घेतल्या. विशेषतः दोन्ही तालुक्यांतील लोकगीत-लोककथांचा कोकणीत आम्ही लोकवेद म्हणतो ज्याला बराच अभ्यास केला. मग ते सलग लिहून काढलं. माधव गडकरींच्या प्रोत्साहनाने 'दैनिक गोमंत 'मध्ये त्या लिखाणाचा कॉलम सुरू केला. मग नंतर त्याचं पुस्तक काढलं. तसंच सत्तरी तालुक्यावरही पुस्तक काढलं. आता त्या तिन्ही पुस्तकांचं संकलन करून, 'होते कुरूप वेडे' या नावाने नवीन पुस्तक येणार आहे. तो एक दस्तऐवज असेल.

प्रश्न : महाविद्यालयात असताना तुमचं स्वतःविषयीचं आणि एकूणच समाजाविषयीचं आकलन कशा प्रकारे आकाराला येत गेलं?

- त्याच वेळी 1972 मध्ये मी कॉलेजच्या इंटरमध्ये होतो. हे वर्ष म्हणजे, वॉटर शेड इयर इन माय लाईफ. या वर्षी दोन गोष्टी घडल्या. पहिली, मी पूर्णपणे बुद्धीप्रामाण्यवादी नास्तिक झालो. त्याचं कारण मी आगरकर वाचला, बाँड रसेल वाचला व्हाय आय अ‍ॅम नॉट ख्रिश्चन आणि मी पूर्ण नास्तिक झालो. नास्तिक होण्यासाठी माझ्या जीवनातली एक शोकांतिकाही कारणीभूत झाली, जी 'सावित्री' कादंबरीत आलेली आहे. माझी एक मोठी बहीण होती, दत्ती. ती सात-आठ वर्षांची होती. आमच्या घरासमोरच्या विठोबाच्या देवळात ती गेली आणि तिथल्या मारुतीच्या मूर्तीचा शेंदूर काढून ती आपल्या कपाळाला लावते, एवढ्यात तिच्या फ्रॉकला आग लागली. ती त्या आगीत होरपळून मेली. त्या दिवसापासून माझ्या आईने सगळी कर्मकांडं बंद केली. त्या गोष्टीचा एका वेगळ्या तन्हेने माझ्यावर परिणाम झाला. पण मी नास्तिक झालो ते एका वैचारिक प्रक्रियेतून.

दुसरी गोष्ट म्हणजे, आमचं घर पूर्णपणे मराठीवादी. गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हायला पाहिजे, सगळे या मताचे. कोकणी ही आपली भाषा आहे. कोकणी ही मराठी भाषेची बोली नाही. आणि तेव्हा ओपिनियन पोलने महाराष्ट्रवाद झुगारून लावला होता. त्याचं एक मोठं कारण असं की, 451 वर्षं गोवा पारतंत्र्यात होता. तिथे तीन हजार पोर्तुगीज सैनिक होते. गोव्यातले राणे, देसाई आणि सारस्वत एक झाले असते, तरी त्यांना त्या सैनिकांना फुसकावून लावता आलं असतं. महत्त्वाचं असं की, हिंदूवर अत्याचार झाले असताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा सन्मान्य अपवाद वगळता कुठल्याही मराठ्यांनी, पेशव्यांनी गोवा मुक्त केला नाही. उलट पोर्तुगीजांशी अतिशय सलोख्याचे संबंध ठेवले. त्यांच्याकडून दारूगोळा, तोफा घेतल्या. इथून मस्तानीला मद्य जायचं, मानकुराद कलमी आंबे जायचे. मग आमचा तर्कवाद असा की, 451 वर्षं तुम्ही गोवा घेतला नाही, आता तुम्ही गोव्यावर अधिकार कसा सांगता? साधना आणि समाजवादी नेत्यांवरही आम्ही थोडं दोषार्पण केलं. तुम्ही अँटीवसाहतवादी आहात तर हा महाराष्ट्राचा वसाहतवाद आम्हाला व विदर्भाला का, असा आमचा प्रश्न होता. म्हणून मी मराठीपासून दूर गेलो आणि कोकणीत लिहायला लागलो.

कोकणीत लिहायला लागल्यानंतर मला एक वेगळंच विश्व मिळालं. मी कोकणी शिकलो नव्हतो, नुसतं बोलत होतो. मराठी मात्र मी पूर्ण शास्त्रशुद्ध बी.ए. पर्यंत शिकलो. कोकणीचं नादशास्त्र वेगळं, व्याकरण वेगळं. आणि अशी गोड भाषा मृदू होते, बहु होते. कोकणीची सांस्कृतिक समृद्धी सांगतो. आता समजा, घरात साखर कमी झाली तर माझी आई कोणा शेजाऱ्याकडे 'साखर कमी झाली' असं न म्हणता 'साखर वाढली' असं म्हणते. 'कुंकू फासला नाही' तर 'कुंकू वाढला', 'नारळ फोडला' नाही तर 'वाढला'.

प्रश्न : तुम्ही आता म्हणालात की, घरामध्ये मराठी होतं, तुम्ही शास्त्रशुद्ध मराठी शिकलात, पण तरी कोकणीकडे वळलात आणि तुमचं नंतरचं लेखनही प्रामुख्याने कोकणीत होतं, त्याकडे आपण वळूच. पण तुम्हाला मराठीकडून कोकणीकडे वळण्यासाठी कोणती गोष्ट कारणीभूत ठरली आणि तुम्ही कोकणीकडे वळलात म्हणजे नेमकं काय झालं?

- कोकणीकडे वळलो त्याचं कारण म्हणजे माझी आई कोकणीवादी होती. माझ्यावर तिचा प्रभाव पडला. मग मला मिळालेले मित्र, कॉलेजमधले वातावरण आणि वाचनातून रवींद्र केळेकर, बाकी बोरकर, स्टालवर्ड यांचा प्रभाव होता. त्याचा माझ्यावर परिणाम झाला आणि मी कोकणीतून लिहू लागलो. पण कोकणीतून कसं लिहू लागलो? तर माझं पुस्तक 'जाय काय जूय?' वाचून माझा एक कवी मित्र म्हणाला, 'दत्ता, हे पुस्तक तू कोकणीतून नाही लिहिलंस. तू हे मराठीतून कोकणी पुस्तक म्हणून लिहिलं.' एवढी मराठीप्रचुर, संस्कृतप्रचुर भाषा. आणि पुढं ही शैली मी 'जोडवी' मध्ये प्रयत्नपूर्वक बदलली. माझे लेखनातले आदर्श दोन एक साने गुरुजी आणि रवींद्र केळेकर. साधं-सोपं लिहायचं, छोटी छोटी वाक्य. साने गुरुजींचं लिखाण वाचताना ते जसं काही बोलत आहेत असं वाटतं. You converse with the reader. सोपं, ओघवतं, वाचनीय असं लिहायचं.

प्रश्न : म्हणजे तुमच्यासाठी कोकणी भाषेसाठीचा एक आदर्श हा रवींद्र केळेकर आणि मराठीतील आदर्श म्हणजे साने गुरुजी.

- आणि मी गोष्टींचाही खूप अभ्यास केला. गोष्ट म्हणजे - स्टोरी समाजाच्या सामूहिक शहाणीवेचं गोठीव असं रूप असतं. आयर्न रँडने म्हटलंय की, 'Machine is a frozen form of a human intelligence.' तसंच कथा-कहाणी हे सोशल विजडमचं एक गोठीव रूप असतं. त्यामुळे मी गोष्टी खूप वाचल्या. गोष्टी लिहून ठेवल्या. गोष्टीरूपाने काही सांगणं- जे साने गुरुजी, रजनीश करायचे अ‍ॅनेकडोट - ही शैली मी 'आत्मदीपोभव' आणि माझ्या बऱ्याचशा पुस्तकांमध्ये घेतली. कारण लोकांना गोष्ट आवडते, नॅरेटिव्ह लोक विसरून जातात. ही गोष्ट माझ्या लक्षात आली.

प्रश्न : साधारणतः बाविशी पंचविशीच्या टप्प्यावर तुमचं शिक्षण संपलं, घरच्या उद्योग-व्यवसायात काम करण्याची वेळ आली. परंतु त्याच काळात तुम्ही पूर्णतः बुद्धिप्रामाण्यवादी झालात, त्याच काळात तुमचं राजकीय-सामाजिक आकलन पूर्ण आकाराला आलं असेल आणि गोव्याच्या व पोर्तुगीज राजवटीच्या संदर्भात जी ब्रिटिश राजवट मुंबई इलाक्यामध्ये होती, या संदर्भात तुमच्या अंतर्गत स्तरावर खूप वैचारिक घुसळण झाली असेल. त्यातून तुमचं आकलन कसं आकाराला आलं? 

- हो. 1975-85 मध्ये मी इमर्जन्सीत काम केलं. तेव्हा मी जेलमध्ये गेलो नाही कारण मुख्यमंत्री शशिकला ताईंचे आणि आमचे चांगले संबंध होते. नाहीतर मी पासपोर्टसाठी अर्ज केला, तेव्हा पोलिसांच्या ब्लॅकलिस्टमध्ये होतो. इमर्जन्सीत आणि त्यानंतरही जनता पक्षासाठी काम केलं. 1975 ते 1985 हा माझ्या जीवनातला काळा कालखंड. अर्नेस्ट हेमिंग्वे म्हणतो, 'Where are the wounds?' जखमा कुठे आहेत? तुम्हाला जखमा झालेल्या नसतील तर मग तुम्ही लिहू शकत नाही. मी जरी गर्भश्रीमंत, सुखवस्तू, सांस्कृतिकदृष्ट्या सुशिक्षित अशा घराण्यामध्ये जन्माला आलो, तरी माझं बालपण सोडलं तर त्या पुढचा काळ अतिशय वाईट गेला. त्याची दोन-तीन कारणं होती. एक, धंदा व्यवस्थित चालत नव्हता. जवळजवळ दिवाळखोर व्हायच्या उंबरठ्यावर होता. माझा आणि माझ्या वडिलांचा प्रचंड संघर्ष झाला, कारण आमची मतं वेगळी. ते मराठीवादी, महाराष्ट्रवादी आणि मी कोकणीवादी. व्यवसायामध्ये आमचं पटलं नाही आणि त्या भयंकर तणावाचं आम्हाला डिप्रेशन आलं. मला सांगायला लाज वाटत नाही की, अनेक वेळा मी या डिप्रेशनमधून गेलो. मी देव, बुवाबाजी मानत नाही. मी माझ्या पुस्तकात मला प्रभावित करणाऱ्यांविषयी अल्बर्ट एलिसची रॅशनल थेरपीविषयी लिहिलंय. त्यांच्या स्वाध्यायांमुळे आणि सायकियाट्रिस्ट समुपदेशनामुळे मी तगावलो. पण त्या काळात मी फारसं काही करू शकलो नाही.

1985 नंतर मी लिहिलं, पण त्या कालखंडात माझी वैचारिक घुसळण झाली. एका मनोरुग्ण तज्ज्ञाने मला सांगितलं की, 'तू वडिलांविषयी लिही.' म्हणून मी 'जोडवी' मध्ये वडिलांविषयी लिहिलं आणि माझा तो कडवटपणा गेला. ते एका प्रकारचं कॅथॉर्सिस झालं. माझ्या वडिलांनी माझ्या आईला खूप वाईट वागणूक दिली, बहिणींनाही चांगली वागणूक दिली नाही. आणि असे अनेक कडू प्रसंग होते. काकांसोबत संघर्ष झाला तेव्हा ते म्हणाले, 'अरे, तू आमच्या घराची इस्टेट घेतो, धंदे घेतो आणि तुला हे देवधर्म, कर्मकांड मान्य नाही?' मग मी आमच्या एका पूर्वजाचं नाव घेऊन त्यांना शुद्ध कोकणीत विचारलं, 'त्याची नायकीण (ठेवलेली स्त्री) होती, तर मी ती परंपरा चालू ठेवण्यासाठी आता नायकिणी ठेवू काय?' असं मी अतिशय फटकळ बोललो.

मार्क ट्रेन म्हणतात, 'If you are a hammer, you feel that others are nails.' जेव्हा तुम्ही ठरवता की तुम्ही हातोडा आहात, तेव्हा तुम्हाला सगळे खिळे दिसायला लागतात. मग वैचारिक लिहिताना मी ठोकत गेलो. आत्मप्रौढीचा दोष स्वीकारून माझा एक गुण सांगतो, तो म्हणजे निर्भयता, जो आईने मला दिला होता. काळोख, भूत, देव, आई-वडील यांपैकी मी कशालाच घाबरत नव्हतो. मी जेलमध्ये गेलो, माझ्या कारखान्यावर धाडी पडल्या, पण मी घाबरलो नाही. निर्भय बनलो. त्यामुळे मी वैचारिक प्रचंड लिहिलं. ज्या सारस्वत समाजातून मी आलो, त्या समाजावर मी कठोर टीका केली. पुढे दाभोलकरांशी संबंध आला. माझे 'नास्तिकाचा देव्हारा' हे पुस्तकं मी त्यांना अर्पण केलेले आहे. पण एक मुद्दा मी अधोरेखित करू इच्छितो, लेखकाचं चारित्र्य. मी माझं चारित्र्य शुद्ध ठेवलं. मी दोन गोष्टी - आर्थिक व्यवहारांत पूर्ण पारदर्शकता आणि लैंगिक गैरव्यवहार नाही पाळल्या. मी अनेक मराठी किंवा कोकणी साहित्यिकांचं साहित्य वाचतो आणि नंतर जेव्हा मला कळतं की हा चारित्र्यहीन माणूस आहे, तेव्हा तो माझ्या मनातून पूर्ण उतरतो. हे बरोबर आहे की चूक मला माहीत नाही, पण माझ्या मते लेखकाने आपलं चारित्र्य सांभाळलंच पाहिजे. आणि मी ते शुद्ध ठेवलं.

प्रश्न : तुमचं पहिलं कोकणीतलं पुस्तक - कालीघाट ते करुणाघाट - 1995 मध्ये आलेलं आहे. तर 1985 पासून तुम्ही तुमची सगळी अवस्था सुधारली. 1985 ते 95 या काळात तुमचं पुस्तक आलं नसलं, तरी 10 वर्षांत तुम्ही वेगवेगळ्या वृत्तपत्रांत, नियतकालिकांत लिहिलं असणार, ते काय स्वरूपाचं होतं?

- माझी सगळी पुस्तकं आधी वेगवेगळ्या सदरांतून आलेली आहेत. जुनाप्रांत, भांगर भूय हे कोकणी पेपर, तसेच लोकमत, गोमंतक, साधना, अंतर्नाद अशा वेगवेगळ्या माध्यामांतील सदरांतून आली. माझ्या वैचारिक लिखाणाच्या सदराचं नाव होतं, 'कळे आणि इंगळे'. म्हणजे कोमल आणि जहाल. तेव्हा मी हातोडा होऊन ठोकायचो. मी ललित लिहायला लागलो ते कुठून आलं मला माहीत नाही. विजय तेंडुलकर म्हणतात ना, हे कुठून येतं आपल्याला कळतच नाही. मी भारतभर फिरलो, मग युरोपमध्ये गेलो. प्रवासवर्णनं लिहिली. ती मला आता आवडत नाहीत, पण इकेबाना हे सुंदर पुस्तक आहे. 'कालीघाट ते करुणाघाट' या प्रवासवर्णनात विचार आहे. कालीघाट म्हणजे पूर्ण हिंसेचा, धर्माचा आणि करुणा घाट मदर तेरेसाविषयीचा आहे. पण मी त्यात त्यांचं उदात्तीकरण केलं नाही.

मी फक्त हिंदू धर्मावरच टीका केली नाही, तर ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मावरही कठोर टीका करायला मागे-पुढे बघितलेलं नाही. ख्रिश्चन धर्मातही किती अंधश्रद्धा आहेत - मदर मेरी व्हर्जिन होती इथपासून ते चेटकिणींना जाळलंपर्यंत. या 85 च्या दशकामध्ये मी प्रागतिक झालो. अजूनही माझी मुलगी आणि पत्नी म्हणते, स्त्रीमुक्तीच्या बाबतीत माझे विचार अजून तेवढे प्रागतिक नाहीत. मी सिमॉन बोवा यांचं 'सेकंड सेक्स' वाचलं, विद्या बाळ यांचं लेखन वाचलं. पण माझ्या लिखाणात आजूनही पुरुषी वृत्ती येते, हे मान्य केलं पाहिजे. मी नास्तिकता किंवा बुद्धिप्रामाण्यात कुणाकडूनच हरत नाही, पण त्या बाबतीत मात्र कुठेतरी कमी पडतो. एका समीक्षकानं माझ्या ललितलिखाणात येणाऱ्या पुरुषी प्रतीकांबद्दल मला झाडून लिहिलं होतं. आणि मला ते बरोबर वाटलं.

प्रश्न: कोणी लिहिलं ते आणि काय स्वरूपाचं लिहिलं होतं?

- किरण बुडकुले म्हणून माझी एक मैत्रीण आहे. तिने मला लिहिलं की, 'तू जे लिहितो ते पुरुषी आहे. तुझं स्त्रीभान योग्य नाही. तुला पुरुषभान आहे. तुझ्या लिखाणातील सहानुभूती किंवा दयेची भावना आम्हाला नको. आणि मला ते पटलं. त्यानंतर मी त्यावर खूप विचार केला, वाचलं, पण अजून मी तिथपर्यंत पोहोचलो नाही. काही लोक म्हणतात की, माझ्यात बौद्धिक अहंकार दिसतो. पण माझ्या अंतर्मनात एक बौद्धिक नम्रता आहे. मी तुम्हाला माझं एक वाक्य सांगतो 'ज्ञानाची मर्यादा आणि अज्ञानाचं सार्वभौमत्व मी मानतो आणि अज्ञानाच्या सार्वभौमत्वापुढे मी लीन होतो. पानगळीत एक-एक पान पडून निष्पर्ण झालेल्या वृक्षाची निष्पर्ण नम्रता माझ्यात येऊ दे. ज्याला मी ज्ञानाचा गर्भवास समजत होतो ते माझ्या अज्ञानाचं आंकवारपण होतं, हे मला कळलं.' आंकवारपण म्हणजे व्हर्जिनिटी. अशी बौद्धिक नम्रता आपल्यात हवी.

माझा जावई पंजाबी आहे. त्यांच्यात प्रत्येकाला आप म्हणून संबोधतात. माझ्या जावयाची आई नातीशी बोलताना 'आप दूध पियेंगे?' असं बोलते. किती गोड अशी ही उत्तर भारतीय पद्धती. ती आपल्यामध्ये नाहीये. आपण देवाशीसुद्धा तुसडेपणाने बोलतो. आमच्या कोकणीमध्येही देवाला तू म्हणतात. ते सगळं लक्षात आल्यावर वाटलं की आपलं खूप चुकतंय.

प्रश्न : आता तुम्ही विचारांबद्दल किंवा इंटेलेक्चुअल अ‍ॅरोगन्सबद्दल जे सांगत होता, त्यामुळे मला या क्षणी मराठीतले ज्येष्ठ समीक्षक दिवंगत रा. ग. जाधव यांची आठवण झाली. ते शेवटच्या काळामध्ये असं म्हणत होते की, मला 'विचारांचे प्रजासत्ताक' या शीर्षकाखाली एक लेखमाला लिहायची आहे. ती पुढे झाली नाही, पण ते जी त्याची संकल्पना मांडत होते आणि तुम्ही आता जे सांगताय, ते खूपच समांतर आहे.

- अगदी बरोबर. बुद्धाने अज्ञेयवाद सांगितला. मला वाटत होतं, काय आहे हा अज्ञेयवाद? बुद्ध चार्वाकांसारखी नास्तिकता का सांगत नाही? मग मला कळलं की, इट इज मोअर कॉस्टिक देंन नास्तिकवाद. कारण बुद्ध ईश्वराची चर्चाच करत नाही, तो त्याला रिडेंडंट करतो. असं आपल्यालाही करायला हवं.

खाद्यसंस्कृतीबद्दल बोलायचं तर, मी कनोसर ऑफ फूड (अन्नाचा जाणकार, मर्मज्ञ) आहे. माझ्या सगळ्या पुस्तकांत मी खाद्यसंस्कृतीविषयी लिहिलेलं आहे. मी सगळं खातो बीफ, पोर्क, दारू आणि मला सगळं आवडतंही. शाकाहारी आणि मांसाहारीही. दोन गोष्टी सांगतो सगळ्या भारतीय भाषांमध्ये माशाला काटा असतो, पण इंग्रजी भाषेत आणि परदेशी भाषांमध्ये त्याला हाड असतं. याचा अर्थ भारतीय संस्कृतीने माशाला जलवनस्पती मानलेलं आहे, म्हणून सारस्वत ब्राह्मण मासे खातात आणि इतर ब्राह्मण ते खाणाऱ्यांना हीन लेखतात. दुसरं म्हणजे, पद्मा नदीतला हिलसा मासा हा हुगळी नदीतल्या हिलसा माशापेक्षा अधिक रुचकर असतो. याचं कारण पद्मा नदीतला हिलसा मासा प्रवाहआड पोहतो. त्यामुळे मला कळलं की, प्रवाहआड पोहून विचारांत सखोलता, गहनता येईल.

लेखन करता करता मी सर्जनशीलतेवर खूप विचार केला. माझं नाव नसतानाही जर वाचकांनी कोकणीमधील माझं लेखन वाचलं, तर ते सांगतील की ही दत्ता नायकांची शैली आहे. एवढी विचारपूर्वक मी ती शैली, ते तंत्र घडवलेलं आहे. प्रवासवर्णनं दोन प्रकारची असतात एक व्हॅनिला आईस्क्रीम आणि एक ब्लॅक करंट. माझं प्रवासवर्णन हे ब्लॅक करंट आहे. त्यामध्ये विचार, खाद्यसंस्कृती, लोक आणि तत्त्वज्ञानही आहे.

प्रश्न : त्याकडे आपण थोडं अधिक विस्ताराने जाणारच आहोत. तुमचा 85 ते 95 हा कालखंड अधिक स्वस्थतेचा, अधिकाधिक जागृत होणारा होता. तर या 10 वर्षांच्या काळात तुम्ही गोवा राज्याबद्दल, पोर्तुगीज राजवटीबद्दल काय विचार करत होता? त्या वेळी तुमचा काहीतरी दृष्टीकोन आकाराला आला असेल, तो काय होता?

- एक विचार नक्कीच अस्वस्थ करायचा की, कसं सहन केलं हे आपल्या लोकांनी? एक गोष्ट जी शेष भारतीयांना माहीत नसते, ती म्हणजे पोर्तुगीजांनी गोव्याला आपली वसाहत मानली नाही. पोर्तुगीज भाषा, पोर्तुगीज संस्कृती आणि पोर्तुगीज लोक यांच्याशी आपलं काही वैमनस्य नाही. ती परंपरा पाँडिचेरीने जपली आहे. आपण रचू या. 85-95 च्या दशकात कितीतरी चळवळींचं नेतृत्व मी केलं किंवा कार्यकर्ता म्हणून वावरलो. एक-एक निवडणूक आम्ही जिंकलो. एका काँग्रेसच्या नेत्याला आम्ही मडगावमधून हरवलं. त्यानंतर बाबरी मस्जिदच्या घटनेनंतर आम्ही एकता यात्रा काढली, समता आंदोलनासारखं आंदोलन उभं केलं. कारण सारस्वत ब्राह्मण समाजाने न्यातीय संस्था उभारली. त्यांच्या मते, ज्ञातीय संस्था दलितांच्या, पददलितांच्या असाव्यात, तथाकथित उच्चवर्णीयांच्या नसाव्या. मग त्यानंतर घडणाऱ्या समता आंदोलन, लोक आंदोलन, लोकशक्ती, भाजपाला विरोध, गुजरात दंगल अशा अनेक घटनांमध्ये मी पूर्णपणे घुसळून गेलो. त्या घुसळणीतून आलेले विचार मग नुसते पुस्तकी राहत नाहीत. लेखकाला त्या अनुभवांचं अनुभूतीत रूपांतर करावं लागतं. ती एक फर्मेंटेशनची प्रक्रिया होते.

मी 70 वर्षांचा झालोय, पण निवृत्त झालो नाही. निवृत्त झालं की जीवनापासून संपर्क तुटतो. ते मला नकोय. जीवनात मला भेटणारे अनेक लोक, माझा व्यापार-उद्योग, त्यातील लोक, हे सगळं माझ्या लिखाणाचं रॉ मटेरियल आहे असं मी समजतो. मी माणसं वाचतो. प्रवासाबद्दलची एक गोष्ट म्हणजे, 98 percent of the travellers don't talk to their co-passengers. पण मी त्या उरलेल्या दोन ट्यांमध्ये येतो. मी बसमध्ये, टॅक्सीमध्ये, विमानात, रेल्वेत प्रवास करताना सहप्रवासी आणि ड्रायव्हर यांच्याशी बोलतो. मी म्युझियममध्ये जातो, तसा बाजारात, स्मशानभूमीत जातो. सगळ्या संभाषणांमधून मला अनेक गोष्टी कळतात आणि त्यांचा उपयोग होतो. नुसत्या पुस्तकांतून नाहीत, तर सबंध समाजातूनच आपण अशा गोष्टी टिपल्या पाहिजेत. माझ्या सत्तरीनिमित्त आयोजित कार्यक्रमात शशी थरूरांच्या भाषणातील एक वाक्य मी टिपलं होतं, 'Rightist forces succeeded in dividing the soil of India during partition, they are now dividing the soul of India.' हे मी पटकन लक्षात घेतलं. मी खूप वाचतो. पण आता मी कथा-कादंबऱ्या वाचत नाही, तर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम फिजिक्स, रिलेटिव्हिटी जेनेटिक्स वाचतो. आणि त्यातून माझ्या लक्षात आलं की, प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगवान काहीही नाही हे स्टेटमेंट खरं नाही. कारण space travels faster than speed of light. अशी काही नवी सत्यं आपल्याला कळतात.

प्रश्न : आता आपण वाचनाबद्दलच बोलतोय, तर या मुलाखतीच्या पहिल्या भागाचा समारोपाचा प्रश्न असा असेल की, आपण प्रवास करत होतात, राजकीय-सामाजिक, साहित्य वाचत होता आणि त्याच वेळी विज्ञान तंत्रज्ञानाबद्दलही वाचत होतात. परंतु या दरम्यानच्या काळात चाळिशीच्या उंबरठ्यावर असताना किंवा त्यापूर्वी तुम्ही काही धर्मग्रंथांचंही वाचन केलं असेल. कारण धर्माबद्दल तुमच्या ज्या भूमिका आकाराला आलेल्या आहेत, त्या काय स्वरूपाच्या होत्या आणि त्यातून तुम्हाला खऱ्या अर्थाने समजलेला धर्म नेमका कसा होता ? हे विचारताना मला तिन्ही धर्म अपेक्षित आहेत - हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन.

- मी उपनिषदं, स्वामी विवेकानंद, विनोबा भावे यांचं सगळं वाचलं. इंटरपूर्वीच्या एका वर्षात हे सगळं वाचत मी जवळजवळ त्याकडे झुकत होतो, अध्यात्मवादी होत होतो. मग आगरकर, फुले यांना वाचून मी त्यातून बाहेर आलो. आरएसएसनेही खूप प्रयत्न केला मला त्यात ओढायचा. पण साधना परिवार, साने गुरुजी, राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्यामुळे मी तरलो. या वैचारिक परिवाराचा मी खूप ऋणी आहे. मी बायबल, कुराण वाचलं नाही, पण त्यासंबंधीची अनेक पुस्तकं वाचली. खूप इंग्रजी पुस्तकंही वाचली. गोरा, पॉझिटिव्ह अथिजम, रिचर्ड डॉकिन्स वाचला आणि मग वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून मला धर्माची गरज का नाही हे समजलं. धर्म आणि नैतिकता यांची सांगड घालायची गरज नाही. नैतिकता ही स्वयंभू असते. नंतर माझा दाभोलकरांशी आणि अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंध आला. मी 'आत्मदीपो भवः' लिहिलं तेव्हा मी दाभोलकरांना म्हटलं, 'आपण अंधश्रद्धा निर्मूलन शिबिर न म्हणता व्यक्तिमत्त्व विकास शिबिर म्हणू या.'

अशा त-हेने मी धर्माविषयी खूप वाचन केलं. त्यामुळे मी धर्माविषयी चर्चा करू शकतो. मी नास्तिक असलो तरी अचानक हेलिकॉप्टरमधून पडलेलो नाही. ती एक फार प्रदीर्घ, कंटाळवाणी आणि त्रासदायक अशी प्रक्रिया असते. काही वेळा मात्र मला वाटतं की, आपण फार दुर्दैवी आहोत. खरं तर अज्ञानी लोक खूप सुखी आहेत. कुरुंदकरांचे शब्द आहेत, आपण जरी देव मानत नसलो, तरी देव मानणारी लोकं आहेत हे आपण मानलं पाहिजे. देवाचा एक विशिष्ट उपयोग आहे. धर्माचा 'प्लासिबो इफेक्ट' आहे. प्लासिबो इफेक्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या उपचारांमुळे ती बरी होत नाही, तर त्या उपचारांनी मी बरी होईन या विश्वासातून ती बरी होते. पण हा प्लासिबो इफेक्ट तेवढ्यापुरताच ठीक आहे. मंदिरांचं सकारात्मक योगदान आहेच, पण नृत्य, नाट्य, साहित्य हे खरा आधार देतात.

मी संवेदनशील आहे. मीरा बोरवणकर म्हणतात, समाजाला सेन्सिटाईज आणि सेन्सिबल केलं पाहिजे. या दोन्ही प्रक्रियांमधून मी आ.ह.साळुंखे, धर्मविरोधी चार्वाक आणि लोकायतचे देवीप्रसाद चट्टोपाध्याय यांना वाचलं. मॅनेजमेंटमध्ये 'कन्फर्मेशन बायस' अशी एक संज्ञा आहे. त्या कन्फर्मेशन बायसप्रमाणे जे मला पटलं ते मी सगळं जमवलं. विरोधी विचारांचंही खूप वाचलं. माझ्या दृष्टीने लेखक किंवा साहित्यिक तीन प्रकारचे असतात. एक, मुंगी. मुंगी जमवते तशी ते माहिती जमवतात. संचय आणि साठा यांच्यात फरक असतो. जाणीवपूर्वक आपण जमवतो तो साठा आणि अजाणीवपूर्वक जो जमत जातो तो संचय. दुसरा, कोळी. कोळी म्हणजे कोळीष्टक करणारा. तो आपल्या अंगातली रसायनं काढून सुंदर, तलम आणि मजबूत कोळीष्टक करतो. म्हणजे आपल्या अनुभवाचं अनुभूतीकरण, फर्मेंटेशन करून, त्या रसायनांतून तयार झालेलं ते वाचकांना देणं. आणि तिसरी मधमाशी. ती शेकडो फुलांपासून मध गोळा करून तो आपल्या अंगात पचवते. आणि रसायन प्रक्रिया करून तो साठवते. तर मी साधारणतः मधमाशी होण्याचा प्रयत्न करतो.

संवादक : विनोद शिरसाठ

शब्दांकन : आरती सुमित


दत्ता दामोदर नायक यांच्या व्यक्तिमत्त्वाला चार आयाम आहेत : एक माणूस, लेखक, राजकीय सामाजिक कार्यकर्ता आणि उद्योजक. त्यांच्यातील माणूस आणि लेखक मध्यवर्ती ठेवून, त्यांची दीर्घ व्हिडिओ मुलाखत (एकेक तासाचे दोन भाग) साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत घेतली आहे, साधनाच्या youtube चॅनेलवर ती पाहता येईल. त्या दोन भागांतील मुलाखतीचे शब्दांकन या अंकात प्रसिद्ध करीत आहोत. त्यांनी कोंकणी, मराठी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मिळून लिहिलेली वीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ती सर्व पुस्तके साधना मीडिया सेंटर (mob. 70582 86753/ph 02024459635) मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Tags: कालीघाट ते करुणाघाट आत्मदीपोभव वाचन साहित्य कोकणी गोवा मुलाखत आरती सुमित विनोद शिरसाठ दत्ता दामोदर नायक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा ( 54 लेख )
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी