डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

दत्ता दामोदर नायक यांची मुलाखत : भाग दोन

सर्जनाच्या दृष्टीने तीन प्रक्रिया महत्त्वाच्या असतात. एक, वितळणे-माझं व्यक्तिमत्त्व वितळलं पाहिजे, त्यातून रसायन आलं पाहिजे. दोन, विरघळणे. आणि तीन, ओतणे - ओतण्याची प्रक्रिया. 'जाय काय जूय?' नंतर मी काही कथा लिहिल्या. मी साहित्य अकादमीचा पुरस्कार घेतल्यानंतर जे व्याख्यान केलं, त्यात म्हटलं होतं, 'तमसो मा ज्योतिर्गमय. अंधारातून प्रकाशात नेणं मला मान्य नाही. लेखकाने उजेडातून अंधारात गेलं पाहिजे. गर्भाशयात, अंतरिक्षात अंधार असतो. अंधाराचं सार्वभौमत्व, अथांगपण मला आवडतं. लिओनार्डो दा विन्सी म्हणतात, 'embrace the ambiguity.' म्हणजे संदिग्धतेला आलिंगन द्या. बुद्धसुद्धा तसंच म्हणतो. आपण सगळं कप्प्यांमध्ये मांडतो, पण खरं तर संदिग्धता महत्त्वाची असते.

प्रश्न : सर, आता आपण तुमच्या वयाच्या पहिल्या 40 वर्षांपर्यंतचं आयुष्य समजून घेतलं. 'Life begins at 40' असं म्हटलं जातं. तुमच्याबाबत तर ते जास्तच खरं मानावं लागतं, विशेषतः तुमच्यातला लेखक म्हणून. तुमच्या एकूण लेखन कारकिर्दीमध्ये प्रवासवर्णन विशेष महत्वाची आहेत. 'खास दत्ता नायकांची प्रवासवर्णनं' असंही लेबल कदाचित भविष्यकाळात लावता येईल. तुमची तीन प्रवासवर्णने आहेत, मात्र त्या तिन्हींचाही विकास क्रमाक्रमाने होत गेलेला आहे. पहिलं प्रवासवर्णन पुस्तक 1995 मध्ये आले, 'कालीघाट ते करुणाघाट' या नावाने. यामध्ये भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये, शहरांमध्ये केलेला प्रवास आहे आणि परदेशातीलही काही प्रवास आहे. तर माझा पहिला प्रश्न असा की, कलकत्त्याच्या अनुभवावर आधारित एक लेख या पुस्तकात आहे, 'कालीघाट ते करुणाघाट' या शीर्षकाचा. तर त्या शीर्षकाबद्दल आणि लेखाबद्दल थोडंसं सांगा.

- कलकत्ता हे अतिशय सुंदर शहर आहे. तिथं कालीघाटावर काली मातेचं मंदिर आहे. तिथे भरपूर हिंसा चालते, सगळीकडे रक्त असतं. ते सगळं मी बघितलं. त्यानंतर मी दक्षिणेश्वरातील काली मातेच्या मंदिरात गेलो जिथं परमहंस प्रार्थना करत. त्यानंतर मदर तेरेसांच्या स्टॅच्यूला भेट दिली. मदर तेरेसांचं एक वचन माझ्या लक्षात आलं, 'give till it hurts.' तुम्हाला दुखेपर्यंत तुम्ही दुसऱ्यांना द्या. ती कुष्ठरोग्यांसाठी जे काम करते ते बघून मला वाटलं की, हा 'करुणाघाट' आहे. तर 'कालीघाट ते करुणाघाट' या माझ्या वैचारिक प्रवासातून लिहिलेला तो लेख आहे.

त्याच पुस्तकात माझा घरासंबंधीचा लेख आहे, तो समीक्षकांनी दुर्लक्षिला आहे. मला वाटतं, घर हे सगळ्यात पवित्र तीर्थस्थान आहे. प्रवास झाल्यावर कधी घरी येतो असं मला होतं. घरी आल्यानंतर अगदी छान वाटतं असा तो लेख आहे. त्यात असे वेगवेगळ्या विषयांचे लेख आहेत. ते सर्व लेख आधी सुनापरात्त या दैनिकात आधी प्रसिद्ध झाले होते. त्या वेळी लिहिताना मी टिपणं केली नव्हती. आठवलं ते लिहिलं. पुढे मी टिपणं, नोंदी ठेवल्या. त्यानंतर माझ्या लक्षात आलं, प्रवासवर्णन लिहिण्यासाठी व्हिज्युअल मेमरी पाहिजे. पॅरिसवर लिहीत असताना पॅरिस माझ्या डोळ्यांपुढे यायला पाहिजे. मला चित्रकला येत नव्हती, पण मी चित्रकलेचा जाणीवपूर्वक अभ्यास केला. मी पिकासो, व्हॅन गॉग, साल्वाडोर दाली आणि मॉने यांचे म्युझियम पाहिले. चित्रकला आणि वास्तुशिल्पांचा अभ्यास केला. चार्ल्स कोरिया तर माझे मित्रच होते.त्यामुळे माझी ती पुस्तकं प्रगल्भ होत गेली.

प्रश्न : तुमची पुढची पुस्तकं प्रगल्भ होत गेली असं तुम्ही म्हणा लात. परंतु तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासाची एक झलक पहिल्या पुस्तकातही दिसते. तुम्ही कलकत्त्याबद्दल जो लेख लिहिलेला आहे, त्याच्या सुरुवातीलाच तुम्ही लिहिलंय, फोन नंबर फिरवताना 100 हा पोलिसांचा, 101 अग्निशामक दलाचा आणि 102 हा मदर तेरेसांचा. तर हे खरं होतं का? आणि तो काय प्रकार होता?

- हो, ते खरं होतं. माझ्या एका मित्राने सांगितलं होतं, तो विमानाने प्रवास करत होता. तेव्हा अनाउन्समेंट झाली होती की, 'Mother Teresa is travelling on this flight. She wishes that you donate all the lunch packets to her missionary.' प्रत्येकाने ते पॅकेट दिलं. मी मदर तेरेसांविषयी आणि एकूणच ख्रिश्चन धर्माविषयी अतिशय सहृदयतेने लिहिलेलं आहे. 'ख्रिस्त जन्माचा उत्सव' हा माझा लेख वाचून एका माणसाने मला 'तू ख्रिश्चन आहेस का' असं विचारलं होतं. माझं एक वाक्य आहे - 'खुरसात (क्रॉस) मला द्वैत दिसतं.' अशा ख्रिश्चन इमॅजिनरी माझ्या पुस्तकांत खूप येतात. तसंच 'अरेबियन डेज' लिहिताना मी मुस्लिम धर्माविषयी लिहिलंय. ते एका ताटात का जेवतात, त्यांनी व्याज का बंद केलं, अशा अनेक गोष्टी त्यात येतात. मी तो सगळा अभ्यास केला. मी एकदा मिर्झा गालिबचं एक वाक्य वाचलं. तो म्हणतो, 'मला आंबे आवडतात आणि आंबे गोड असावेत आणि खूप असावेत.' मग माझ्या लक्षात आलं, आपण वाचनीय लिहावं आणि खूप लिहावं आणि मग मी भरपूर लिहिलं. मी बहुप्रसवा लेखक आहे. दुसरी गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे, मी मराठीच्या द्वेषातून मुक्त झालो. मग मी कोकणी, मराठी आणि इंग्लिश अशा तिन्ही भाषांत लिहिलं.

प्रश्न : 'कालीघाट ते करुणाघाट' हे तुमचं पहिलं पुस्तक कोकणीतलं आहे, दुसरं 'अरेबियन डेज' हे प्रवासवर्णनही कोकणीतील आहे आणि तिसरं प्रवासवर्णन 'इकेबाना' मात्र मराठीमध्ये आहे. साधना साप्ताहिकातून आधी ते लेखमाला स्वरूपात आले होते. त्याबद्दल आपण बोलूच. त्यापूर्वी मला जाणून घ्यायचंय की, तुमच्या पहिल्या पुस्तकाचं स्वागत कसं झालं होतं? त्याद्वारे तुमची ओळख निर्माण झाली ? त्याच्या काही आठवणी तुमच्या मनात असतील.

- त्याचं चांगलं स्वागत झालं होतं आणि एक ललित लेखक म्हणून मला प्रतिष्ठा मिळाली. खूप लोकांना ते आवडलं. माझ्या वाचकांत स्त्रिया, वृद्ध आणि गावातले लोक अधिक आहेत. एक बाई मला म्हणाल्या होत्या, 'माझ्या गरोदरपणात मी तुझी पुस्तकं वाचली आणि मला प्रसन्न वाटलं.' माझं एक मत बनलेलं आहे की, दुःखाचे देव्हारे मांडून दुःख साजरं करणं योग्य नाही. ती प्रक्रिया मला बरोबर वाटत नाही. 'मन करा रे प्रसन्न.' आपण आनंदाच्या अत्तरदाणीतून अत्तर उधळलं पाहिजे. लोक आधीच थकलेले, निराश झालेले आहेत. त्यांना आपलं लिखाण वाचून आनंद वाटायला हवा.

प्रश्न : त्या पुस्तकाच्या क्रेडिट पेजवर प्रत्येक आवृत्तीला (1995, 1996, 1997) त्याची किंमत किती होती ते लिहिलेलं आहे. तर ही कल्पना कोणाची होती?

- ती आमचीच कल्पना होती. आणि ते करायलाच पाहिजे. कारण तुम्ही ते पुढे नेत असता. तुम्हाला पुस्तकाविषयीचा एक नियम सांगतो, त्याला 50 percent rule असं म्हणतात. जगामध्ये जेवढे लोक पुस्तक लिहायचा विचार करतात, त्यांपैकी 50 टक्के लोक पुस्तक लिहितात. जेवढी पुस्तकं लिहिली जातात, त्यातली 50 टक्के प्रसिद्ध होतात. जेवढी पुस्तकं प्रसिद्ध होतात, त्यातली 50 टक्के पुस्तकं खपतात. जेवढी पुस्तकं खपतात, त्यातली 50 टक्के पुस्तकं लोक वाचतात. जेवढी पुस्तकं लोक वाचतात, त्यातल्या 50 टक्के लोकांना त्या पुस्तकांचा अर्थ समजतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या वाचकांना पुस्तकांचा अर्थ समजतो, पुस्तक आवडतं, त्यातले 50 टक्के लोक लेखकाला प्रतिसाद देतात. प्रतिसाद देणं खूप महत्त्वाचं आहे. लेखक काही संत नाहीत, ते स्वान्त सुखासाठी लिहीत नाहीत. मला प्रशंसा आवडते, हे मी अगदी प्रांजळपणे कबूल करतो. मी लिहिलेलं आवडलं किंवा नाही हे कळवलं तरी मला आवडतं, कारण त्यात दखल घेतली होती जाते. त्याला सायकॉलॉजिकल पॅडिंग असं म्हणतात. म्हणून तुम्ही, उदय भेंबरे, चंद्रकांत यांच्यासारखे संपादक मला मिळाले, ही खूप चांगली गोष्ट आहे.

प्रश्न : पण तुमच्या या प्रस्तुत संपादकांबद्दलचा सगळ्यात नकारात्मक भाग हा सांगितला जातो की, प्रशंसा करण्याच्या बाबतीत फार कंजूस आहे.

-नाही, तुम्ही चांगले संपादक आहात. तुमची सांगण्याची पद्धत मला आवडते. मला आठवतं, एकदा तुम्हाला माझा एक लेख आवडला नव्हता, तो तुम्ही प्रसिद्ध केला नव्हता. तुम्ही मला सांगितलं होतं की, 'वाचकांच्या मनातील तुमची जी प्रतिमा आहे, तिला बाधा येऊ न देणे, हे माझं काम आहे.'

'अंतर्नाद' चे संपादक भानू काळेही मला असं सांगायचे. माझा 'झाडे' म्हणून एक ललित लेख आहे. मी झाडांत माणसे पाहतो आणि माणसांत झाडे पाहतो, असा शहरांवर लेख आहे. तसे लेख लिहिताना मला खूप बरं वाटतं.

प्रश्न : तुमच्या पहिल्या पुस्तकानंतर जवळपास दहा वर्षांनी दुसरं पुस्तक अरेबियन डेज आलं. तर ह्या दोन पुस्तकांमध्ये तुमच्यातला लेखकात काही विकास झाला का? आणि तो कसा?

- 'कालीघाट' मध्ये तेवढी वैचारिक खोली नाही, जी 'अरेबियन डेज'मध्ये आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा लेख म्हणजे, 'अरेबियन डेज'. मी खूप दिवस अरबस्तानात राहिलो. माझे पुष्कळ मुस्लीम मित्र आहेत. मुसलमानांविषयीचं अज्ञान दूर करण्यासाठी मी मोहम्मद पैगंबर वाचला, त्याचे दोषसुद्धा काढले. त्याच्यामध्ये विचार आहे, संस्कृती आहे. माझी पुढची प्रवासवर्णनं ही थोडी इम्प्रेशनिस्ट स्टाईलने लिहिलेली आहेत. मी अनेक प्रवासवर्णनंही वाचली. त्यात रवींद्र केळेकर यांचं 'हिमालयात', पु.ल. देशपांडे यांचं 'पूर्वरंग', मीना प्रभूचीही प्रवासवर्णनं वाचली. पण मला मराठीतील प्रवासवर्णनं फारशी आवडली नाहीत.

प्रश्न : इंग्रजीमधली काही प्रवासवर्णनं तुम्ही वाचली?

- हो, मी इंग्रजीमधलीही प्रवासवर्णनं वाचली. मला प्रवासवर्णनाचं तंत्र आता खूप साधलेलं आहे. मला कोणत्याही प्रदेशावर प्रवासवर्णन लिहायला सांगा. तिथे स्वतः न जाताही, संशयही येणार नाही अशा पद्धतीने मी ते लिहू शकतो. खरं तर त्या तंत्रावर पकड पाहिजे. पण मग माझ्या लक्षात आलं की, आपण तर तंत्रात फसवतोय, शब्दांत फसवतोय. माझ्या लक्षात आलं की, मी माझंच अनुकरण करतो आहे आणि मग मी त्या सापळ्यामधून बाहेर जायचा प्रयत्न करू लागलो.

प्रश्न : आणि मग त्यातून तुमचं 'इकेबाना' आकाराला आलं?

- हो. इकेबानाचं मुखपृष्ठ बघितलं तर त्यात सगळीकडे मेंमेंटोज (स्मृतिचिन्हे) आहेत. त्यातली रिकामी जागा मी ज्या देशांत गेलो नाही, त्यासाठी आहे. मी कुठेतरी एक अतिशय सुंदर वाक्य वाचलं होतं 'इतर फुले फुलतात, हिरवा चाफा पिकतो.' तसंच मी इतर पुस्तकं लिहिली, इकेबाना पिकून आलं. ते पक्व फळाप्रमाणे माझ्या अंतरंगातून रसरसून पिकून आलं आहे.

प्रश्न : तुमच्या वरील प्रश्नाचं उत्तर आपले वाचक ऐकतील तेव्हा कदाचित त्यांच्या मनात एक प्रश्न येऊन जाईल की, तुम्हाला जर हे तंत्र एवढं साध्य झालंय तर तुमच्या लिखाणातला असा एखादा लेख आहे का जो तुम्ही लिहिलाय, पण तिथे गेला नाहीत?

- नाही, असा लेख नाहीये. पण मी तसं लिहू शकतो. दामोदर अच्युत कारेंच्या 'नंदादीप' पुस्तकाला वा.म. जोशींनी प्रस्तावना लिहिली. त्यात त्यांनी लिहिलंय, 'निसर्ग सुंदर आहे हे सत्य आहे, पण तो क्रूर, भयाणही असतो. याचं वर्णन तुम्ही करत नाही. प्रवासातील दगदग, त्रास हे वाचकांना सांगत नाही.' हे खरं असलं तरी वाचकांना आवडावं म्हणून मी तसं लिहितो.

प्रश्न : पण हे तंत्र असले, तरी ज्यांचे व्यक्तिमत्त्वच बहुरंगी, बहुआयामी नाही त्यांना ते शक्य नाही. तरीही अनेक माणसं, लेखक किंवा लिहिण्याचं अंग असणारी माणसं वेगवेगळ्या कारणाने प्रवास करतात. ती कदाचित तुमच्याइतकी बहुआयामी नसतील. तर व्यक्तिमत्वाला वेगवेगळे आयाम असणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगाल ? त्यांचे प्रवासवर्णनपर लेख चांगले व्हावेत यासाठी तुमच्या काही सूचना आहेत का?

- सूचना म्हणजे प्रवासवर्णनांत कुठे जाणार आहोत त्याची पार्श्वभूमी सांगत बसू नका. उदाहरणार्थ, विमानप्रवास, व्हिसाच्या गोष्टी, या अवांतर गोष्टी लिहिताना टाळायला हव्यात. थेट त्या शहराला हात घालायला हवा. कारण फर्स्ट इम्प्रेशन महत्त्वाचं असतं. पहिल्या काही सेकंदांमध्ये तुम्ही ग्रीप घेतली नाही, तर वाचक ते वाचायचं सोडून देतो, ते मला कळलं. मी ग्रीसवर लिहिताना ग्रीक मायथॉलॉजीचा, पुराण कथांचा, फिलॉसोफीचा अभ्यास केला. तुर्कस्तानावर लिहिताना केमाल पाशाचं चरित्र वाचलं. हे सगळं तुम्हाला 'इकेबाना 'मध्ये वाचायला मिळेल.

प्रश्न : तुम्ही असे प्रवास करायला जाता, तेव्हा पूर्वतयारी म्हणून काय असते?

- मला आंतरराष्ट्रीय प्रवासाचा फारसा अनुभव नव्हता, तेव्हा मी त्या-त्या देशातल्या कंडक्टेड टूर्सने जायचो. आता मी, पत्नी, माझा मुलगा किंवा सून आम्ही प्रवासाचा कार्यक्रम आखतो आणि त्याप्रमाणे मी जातो. माझ्या प्रवासाच्या बकेट लिस्टमध्ये आता इस्राईल, दक्षिण आफ्रिका, दक्षिण इटली, स्कॅन्डेवियन देशातील नॉर्थन लाईट, जपानमधील साकुरा चेरी ब्लॉसम, साऊथ कोरिया, ऑस्ट्रेलिया असे देश आहेत. मार्क ट्रेन म्हणतो, 'प्रवासाने तुमची क्षितिजं विस्तारतात, तुमचं अज्ञान जातं.' मी मुस्लीमबहुल देशांतही गेलो. इस्लामने काय करावं याचं मॉडेल तुम्हाला मोरोक्कोमध्ये पाहायला मिळेल.

प्रश्न : 'इकेबाना'मध्ये 22 देशांच्या संदर्भातले लेख आहेत. पूर्णतः पक्व असं रूप आपल्याला पाहायला मिळतं. हे प्रवासवर्णन खरं तर इंग्लिशमध्ये यायला पाहिजे. 

- भाषांतरात त्याचा तो प्क्लेवर येणार नाही. एका भाषेतून दुसऱ्या भाषेत जाताना त्यातील काही गोष्टी हवेत विरून जातात. मराठी भाषेतील काही शब्द पाहिले रूपलाघव, रंगवैभव, पुष्पजडित तर त्यांचा तोच अर्थ भाषांतरित करताना येईलच असे नाही.

प्रश्न : हाच फ्लेवर तुम्हाला कोकणीमध्ये आणता आला असता का?

- हो, मी तो 'फातोड पावली' या पुस्तकात आणला ना.

प्रश्न : नाही. मी 'इकेबाना'च्या लेखांबद्दल म्हणत आहे.

- मी ही मुलाखत गोव्यात असताना दिली असती, तर मी हे वाक्य बोललो नसतो. पण आता मी महाराष्ट्रात आहे म्हणून सांगतो. माझं स्वतःचं असं प्रांजळ मत आहे की, मी माझी मातृभाषा कोकणीपेक्षा मराठीत अधिक प्रभावी लिहितो. कारण मी ग्रॅज्युएशनपर्यंत मराठीत शिकलो.

प्रश्न : पण आता तुम्ही कोकणी चांगलंच लिहिता. तुमचं 'जाय काय जूय?' हे ललित निबंधाचं पुस्तक पहिल्यांदा कोकणी भाषेत आलं. त्याला 2006 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ते आता 2024 मध्ये मराठीत आलं आहे. त्या वेळीही काही लोकांनी तुमच्यावर काही आक्षेप घेतला होता? 'जाय काय जूय?' मधले ललित निबंध दोन-तीन पानांचे आहेत. तर या ललित निबंधाबद्दल, त्याच्या शैलीबद्दल सांगा.

- 'जाय काय जूय? 'मध्ये मी अगदी साधे विषय हाताळले होते. उदाहरणार्थ, दुपार. कारण लोक दुपारविषयी वाचायला, लिहायला फारसे उत्सुक नसतात. ख्रिस्त जन्माचा उत्सवावर मी लेख लिहिला. मग स्नान, अंघोळ, झोप या सगळ्या ऐहिक गोष्टींवर लिहिलं. 'सह नौ भुनक्तु' या लेखात खाद्य संस्कृतीवर लिहिलं. असे लहान, अतिशय ललित, संस्कृतप्रचुर, मराठीप्रचुर, काव्यात्मकता असलेले लेख मी लिहिले. सर्जनाच्या दृष्टीने तीन प्रक्रिया महत्त्वाच्या असतात. एक, वितळणे - माझं व्यक्तिमत्त्व वितळलं पाहिजे, त्यातून रसायन आलं पाहिजे. दोन, विरघळणे. आणि तीन, ओतणे ओतण्याची प्रक्रिया.

'जाय काय जूय?' नंतर मी काही कथा लिहिल्या. मी साहित्य अकादमीचा पुरस्कार घेतल्यानंतर जे व्याख्यान केलं, त्यात म्हटलं होतं, 'तमसो मा ज्योतिर्गमय. अंधारातून प्रकाशात नेणं मला मान्य नाही. लेखकाने उजेडातून अंधारात गेलं पाहिजे. गर्भाशयात, अंतरिक्षात अंधार असतो. अंधाराचं सार्वभौमत्व, अथांगपण मला आवडतं. लिओनार्डो दा विन्सी म्हणतात, 'embrace the ambiguity.' म्हणजे संदिग्धतेला आलिंगन द्या. बुद्धसुद्धा तसंच म्हणतो. आपण सगळं कप्प्यांमध्ये मांडतो, पण खरं तर संदिग्धता महत्त्वाची असते.

प्रश्न : 'जाय काय जूय?' हे कोकणीतलं पुस्तक 2024 मध्ये मराठीत त्याच नावाने आलं आहे, इतक्या लवकर त्याला मराठी वाचकांचा प्रतिसाद मिळणार नाही. परंतु, 2006 ला या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, त्याला आता 18 वर्षे झालीत. तर या ललित निबंधाच्या पुस्तकाला गोव्यातल्या आणि कोकणी भाषेतल्या समीक्षकांनी आणि वाचकांनी कसं स्वीकारलं?

त्याचं खूप कौतुक झालं, प्रशंसा झाली. एका समीक्षकानं सांगितलं की, 'यातून तुझं पुरुषधार्जीणत्व दिसतं. तुला स्त्रीभान नाही.' अशी टीकाही झाली. त्यानंतर मी 'फातोड पावली' लिहिलं. त्यात मी शिव, राम आणि कृष्ण या तीन लोकदैवतांवर ललित लेख लिहिले. त्यांचं तुफान कौतुक झालं आणि भयंकर टीकाही झाली. 'नास्तिक असूनही मी ते कसं लिहिलं', असे प्रश्न विचारले गेले. त्यांना उत्तरं देताना मी सांगितलं, 'लोहियांनी लिहिलेलं आहे. त्यांचं अनुकरण करूनच मी ते लिहिलेलं आहे.' पण फातोड पावलीनंतर मी ललित लेखन बंद केलं. कारण मला भीती वाटली की, ललित लेखक हे विशेषण मला लागू होईल.

माझ्या वैचारिक पिंडातून मी 'नास्तिकाचा देव्हारा' लिहिलं. ते मी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीला अर्पण केलेलं आहे. त्यामध्ये मी नास्तिक कसा झालो हे आलेलं आहे.

प्रश्न : तुमच्या दोन पुस्तकांची शीर्षकं 'फातोड पावली' आणि 'जाय काय जूय?' हे कोकणी भाषेतले शब्द आहेत. आणि या दोन्ही शीर्षकांचे लेखसुद्धा त्या पुस्तकांमध्ये आहेत. तर ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ आम्हाला समजून सांगा.

- 'जाय काय जूय? 'चा अर्थ सांगणं थोडं कठीण आहे. पण सांगतो. 'जाय' याचे दोन अर्थ आहेत. जाय हे एक फूल आहे. 'जाय'चा दुसरा अर्थ म्हणजे 'तुला हवंय का?' आता याचा संदर्भ सांगतो. लग्नात होम केला जातो. बहिणीच्या लग्नात भाऊ लज्जा होमामध्ये लाह्या घालतो आणि आपल्या भाऊजीला, बहिणीच्या होणाऱ्या पतीला विचारतो, 'जाय काय जूय?' त्याचा एक अर्थ म्हणजे, 'तुला जाईचं फूल पाहिजे की जुईचं?' पण खरा प्रश्न असतो, 'तुला माझी बहीण हवी आहे की नको?' मग त्या होणाऱ्या पतीने म्हणायचं, 'जाय'. या चालीला फार मोठा पुरातन संदर्भ आहे. एकेकाळी बहिणीचं आणि भावाचं लग्न व्हायचं - यम आणि यमी. तेव्हा या 'जाय काय जूय' रितीतून भाऊ आपला बहिणीवरचा अधिकार सोडतो, असा त्याचा अर्थ आहे.

'फातोड पावली' म्हणजे मॉर्निंग वॉक. मॉर्निंग वॉकसाठी कोकणीत शब्द नव्हता, म्हणून मी फातोड म्हणजे पहाट आणि पावली म्हणजे शतपावली, यावरून तो शब्द घडवला. असे मी खूप नवे शब्द घडवले. उदाहरणार्थ, चिट्पाकुले, रंगपात (fall colour).

प्रश्न : आता माझ्या मनात प्रश्न असा येतो की, संस्कृतवर तुमचं प्रभुत्व होतं. तुमची दोन्ही ललित निबंधाची पुस्तकं वाचायला घेतली तर त्यातील लेख पहिल्या वाक्यापासून पकड घेतात. त्यात काव्यमयता आणि गंभीर वैचारिक काव्य दिसतं. तर तुम्ही पूर्वी कधी कविता लिहिल्या आहेत की नाही?

- कविता लिहिल्या, पण खूप थोड्या. एक कविता अशी की, तू मागं वळून पाहूच नकोस. तू पाठमोरीच अधिक सुंदर दिसतेस. दुसरी कविता, सोमवारी तू जाईचं फूल माळून ये, मंगळवारी दुसरं आणि रविवारी एक मुक्त मोकळा रविवार माळून घे, अशा काही कविता लिहिल्या. नंतर मला कळलं तो आपला पिंड नाही. कवितेला एक वेगळी प्रतिभा लागते.

प्रश्न : तुम्ही ललित लेखन जाणीवपूर्वक थांबवलं आणि तुमचा कवितेचा पिंड नव्हता, तर वैचारिक पिंड होता. गेल्या दशकभरामध्ये आलेली तुमची पुस्तकं प्रामुख्याने वैचारिक आहेत. त्यातील अतिशय महत्त्वाचं पुस्तक म्हणजे 2016 मध्ये आलेलं 'एका नास्तिकाचा देव्हारा'. मुलाखतीच्या पहिल्या भागामध्ये तुमच्या नास्तिक होण्याच्या संदर्भातल्या काही घटनांचा-प्रसंगाचा आणि त्या प्रक्रियेचा तुम्ही थोडा उल्लेख केलात. पण या महत्त्वाच्या पुस्तकात तुमचा वैचारिक गाभा आला आहे. तो आम्हाला शीर्षकापासून सांगितलात तर जास्त आवडेल.

- या शीर्षकात विसंगती आहे 'नास्तिक' आणि 'देव्हारा'. आम्ही नास्तिक असलो तरी काही गोष्टी -नैतिकता, देशप्रेम मानतो. या पुस्तकात मानसशास्त्र, अर्थशास्त्र, साहित्य सर्जन या विषयांवर लेख आहेत. साहित्याच्या क्रिएटिव्हिटीवर मी खूप अभ्यास केला. नुसतं क्रिएटिव्ह लिहिणं ही प्रतिभा नाही, तर त्याची काही तंत्रं असतात. आपल्या राष्ट्रगीतात शेवटी 'जय हे' या शब्दांनी किती सौंदर्यनिर्मिती होते. ती पुनरावृत्तीमुळे आली.

प्रश्न : 'एका नास्तिकाचा देव्हारा' हे शीर्षक थोडंसं चकवणारं आहे. तशीच दोन शीर्षकं मला आठवली. एक, आ. ह. साळुंके यांचं 'आस्तिक शिरोमणीः चार्वाक' आणि दुसरं, नरहर कुरुंदकरांचा लेख 'मी अस्तिक का नाही'. तुमच्या तिघांच्याही शीर्षकांत समाजमनाला चकवणारं आणि जो मूळ मुद्दा आहे तो ठसवणारं एक इंटरेस्टिंग साम्य आहे. असो. तर 'सावित्री' ही तुमची पहिली कादंबरी कोकणीत लिहिली, गेल्या दशकातलीच आहे. तुमचा पिंड वैचारिक असल्याने तुम्ही तुमचा विचार मांडण्यासाठी त्या कादंबरीचा फॉर्म निवडलेला आहे. मराठीतील दोन मोठे कादंबरीकार वामन मल्हार जोशी आणि श्रीधर व्यंकटेश केतकर - खरं तर त्यांना कादंबरीकार मानलं जात नाही, लेखक मानलं जातं त्यांनी कादंबऱ्यांचे फॉर्म घेतले ते तत्त्वचर्चा किंवा वैचारिक चर्चा करण्यासाठीच. तर माझा प्रश्न असा की, 'सावित्री' कादंबरीमध्ये तुम्ही जो गाभा मांडलाय, तो तुम्हाला वैचारिक पुस्तक म्हणून करता आला नसता का? तुम्हाला कादंबरीचा फॉर्म का स्वीकारावा वाटला?

- 'सावित्री' आणि त्याचा स्वैर मराठी अनुवाद 'चाफेगाळ' आहे. मी इंटरमध्ये होतो तेव्हा ठरवलं होतं की, यापुढे फिक्शन नाही वाचायचं. मग नंतर माझ्या लक्षात आलं, ते चुकीचं आहे. माझी सगळ्यात आवडती कादंबरीकार म्हणजे आयन रँड. तिच्या 'फाउंटनहेड' आणि 'अ‍ॅटलास श्रग्ड' या कादंबऱ्या वाचल्या होत्या कादंबऱ्या दोन प्रकारच्या असतात. एक, कथनात्मक. उदाहरणार्थ, पर्ल बकची 'द गुड अर्थ'. 'अ‍ॅटलास श्रग्ड' आणि 'फाउंटेन हेड' या आयन रँडच्या कादंबऱ्या म्हणजे कादंबरीच्या फॉर्मेटमधून लिहिलेलं वैचारिक पुस्तक. ते वाचून म्हटलं असं लिहू या. 'सावित्री' आणि 'चाफेगाळ' पुस्तकांसाठी मी अतिशय श्रम घेतले. चार-पाच-सहा पाच-सहा वेळा पुनर्लिखाण केलं.

यामध्ये मी ज्या गौड सारस्वत ज्ञातीतून आलो, त्याचा बराचसा इतिहास आणि त्या बुद्धिमान ज्ञातीचं अधःपतीकरण कसं चाललेलं आहे, ते आलं आहे. बौद्ध धर्माचा विचार मांडणारी ती कादंबरी आहे. दुर्दैवानं तिचं फारसं स्वागत झालं नाही, याबद्दल मला दुःख नाही. पण तिची समीक्षा व्हायला हवी होती. मग मी तिचं नाटकात रूपांतर केलं. पण अनेकांनी ती सादरीकरणाचं मूल्य कमी आहे म्हणून नाकारली. त्यामुळे कादंबरी लिखाणात मी अपयशी झालो, असं मी समजतो. मधु मंगेश कर्णिक मला म्हणाले, 'या कादंबरीत तू तुझा बुद्धिजम थोपला आहेस. तू यात सांगतो आहेस. कादंबरीत असं सांगायचं नसतं, ते वाचकांना दिसलं पाहिजे. मलाही ते पटलं. पण ती कादंबरी अयशस्वी का झाली याचीसुद्धा समीक्षा करायला हवी.

प्रश्न : 'सावित्री' ही मूळ कोकणीमधील कादंबरी तुम्ही 'चाफेगाळ' या नावाने मराठीत आणली. यावरील नाटक कोकणीमध्येच आहे. तर नाटक आणि कादंबरी यातून तुम्ही खूप शिकलात आणि त्याची एक थोडीशी झलक आता दाखवली. आता पुढचा प्रश्न असा की, तुमच्या 'गांधारी' या पुस्तकात व्यक्तिरेखा किंवा कथा आहेत. त्यामध्ये बऱ्याचशा कथांना रामायण आणि महाभारतकालीन संदर्भ आहेत. त्या कथा आहेत तशा ठेवल्यात, पण त्यांना जरा ट्विस्ट दिलेला आहे, तर हा काय फिनोमॅना होता?

- त्या कथांना मी serendipity म्हणेन. त्या कथांना मी ट्विस्ट दिलेला आहे. धृतराष्ट्र आणि गांधारी जेव्हा वणव्यात सापडतात, तेव्हा धृतराष्ट्र गांधारीला म्हणतो, 'आता तू तुझ्या डोळ्यावरची पट्टी सोडव आणि आम्हाला वाचव.' तेव्हा ती सांगते, 'मी जन्मांधळी आहे.' त्यात मी उर्मिलेवरही लिहिलं. लक्ष्मण रामाबरोबर वनवासाला जातो. उर्मिलेला सोबत नेत नाही. तो निद्रादेवीची तपस्या करतो की, मला 14 वर्षं झोप येता कामा नये. ती म्हणते, 'पण कुणाला तरी झोप यायला पाहिजे.' मग ती झोप उर्मिलेला दिली जाते. ती 14 वर्षं झोपते. 14 वर्षांनी लक्ष्मण अयोध्येला जातो, तेव्हा उर्मिला जागी होते, पण लक्ष्मण 14 वर्षांसाठी झोपतो. तशीच एकलव्याची कथा लिहिलेली आहे. द्रोणाचार्यांना उजव्या हाताचा अंगठा काढून दिल्यावर एकलव्य म्हणतो, 'मला ब्राह्मणांचा कावेबाजपणा माहीत होता, म्हणून मी उजवा अंगठा दिला. पण मी डावखुरा आहे.' इथे असा ट्रिस्ट दिलेला आहे. लेखकाने मधले गॅप्स बघायला पाहिजे.

प्रश्न: आता आपण रामायण-महाभारत या दोन महाकाव्यांच्या जवळून जातोय, तर 'हितोपदेश', 'पंचतंत्र' आणि 'कथासरित्सागर' यांचा उपयोग करून तुम्ही 'आधुनिक हितोपदेश' आणि 'आधुनिक पंचतंत्र' ही दोन पुस्तकं गेल्या पाच-सहा वर्षांत खास मुलांसाठी इंग्रजीमध्ये लिहिलेली आहेत. तर ते तुम्हाला का करावसं वाटलं?

- 'पंचतंत्र', 'हितोपदेश', 'कथासरित्सागर', 'अरेबियन नाईट्स', 'टार्जन', 'सिंदबाद', 'अलीबाबा' आणि 'हिमागौरी आणि सात बुटके' या सगळ्या कथा वाचून मला वाटलं की, नैतिकता असणाऱ्या कथा लिहिल्या पाहिजेत. म्हणून मी ती दोन पुस्तकं लिहिली. 'जंगल बुक' सिनेमा पाहून मला जंगल स्कूलची कल्पना सुचली. आता मी 'अॅडवेंचर्स ऑफ आर फोर' ही कादंबरी लिहिली. त्या कादंबरीत माझी चारही नातवंडं आणि त्यांचे चार अ‍ॅनिमल फ्रेंड्स आहेत. बिंगो त्यांचा कुत्रा, चानी • म्हणजेच खार, लैताव डुकराचं पिल्लू, आणि मिटू. त्या लैतावच्या पात्राविषयी सांगतो. माझा नातू रणवीर एकदा गॅलरीत उभा होता. आणि त्याने एका डुकराच्या पिलाला बांधून नेताना पाहिलं. मग तो रडायला लागला. त्याने आईला विचारलं, 'त्याला शाळेत नेत आहेत, म्हणून तो रडतोय ना?' शाळेच्या संपूर्ण सिस्टमवर रणवीरचं हे विदारक भाष्य होतं.

प्रश्न : तुम्ही आता मघाशी बोलताना उल्लेख केलात की 'चिटपाकुली' हे तुमचं कोकणी मधलं पुस्तक आलेलं आहे. मुलगी आणि वडील यांच्यातला संवाद आणि ते तुमचं ऑटोबायोग्राफिकल म्हणावं असंच पुस्तक आहे. ते लवकरच मराठीतही येईल, तर पत्रांच्या फॉर्ममधल्या या छोट्या पुस्तकाची कल्पना कशी डेव्हलप झाली?

- हा एक वेगळा प्रकार मी आणला आहे. तुम्ही साधनेतून मुलाखतीला साहित्य प्रकारामध्ये रूढ केले आहे. माझ्या मते, भाषण हासुद्धा साहित्याचाच प्रकार असतो. भाषणांचीही पुस्तकं आलेली आहेत. तशीच माझ्यासमोर नेहरूंची, साने गुरुजींची पत्रं होती. पु. शि. रेगेंची 'सावित्री' ही कादंबरी होती. म्हणून मी कॅनडात राहणाऱ्या माझ्या मुलीला पत्रं लिहिली आणि तिने मला लिहिली. त्यांना मी छोटी छोटी पत्रपाकुली म्हणजे फुलपाखरं असं म्हटलं. त्यात मी खाद्यसंस्कृती, पुस्तकं, तंत्रज्ञान यांवर मुक्तपणे लिहिलं आहे. मी ते अतिशय आवडीने लिहिलं. आता ते पुस्तक मराठीत 'चिटपाखरे' या नावाने येणार आहे.

प्रश्न : आता शेवटचा प्रश्न. तुमच्या एका अतिशय महत्त्वाच्या पुस्तकाला येऊन आता दहाएक वर्ष झाली -'आत्मदीपो भव'. खरं तर ह्या एकाच पुस्तकावर एक स्वतंत्र मुलाखत करावी असं ते आहे. आताची ही संपूर्ण मुलाखत तुमच्यातला लेखक म्हणून आहे. तर 'आत्मदीपो भव' या पुस्तकाचं तुमच्या अन्य सर्व पुस्तकांपेक्षा काय वेगळेपण आहे?

- मी व्यापारात गेलो तेव्हा बी. कॉम. सुद्धा झालो नव्हतो. माझं बी.ए. आर्ट्स झालं होतं. मग मी अहमदाबाद, लखनऊ आय.आय.एम. मध्ये शिकलो, ग्रंथ वाचले आणि स्वाध्यायानं थोडासा मॅनेजमेंट एक्सपर्ट झालो. या पुस्तकामध्ये अतिशय छोट्या गोष्टींतून व्यवस्थापन शास्त्र आणि व्यक्तिमत्त्व विकास यांवर लिहिलेले निबंध आहेत. ते पुस्तक तुफान चाललं. त्याचे मराठी, इंग्रजी, कन्नड, हिंदी, अशा भाषांमध्ये अनुवाद झाले. खरं म्हणजे 'आत्मदीपो भव' ऐवजी 'अत्त दीपोभवः' सुद्धा म्हणता आलं असतं.

एकांतातील सुखात राहून मी व्यवस्थापन शास्त्र, व्यक्तिमत्त्व विकास, बौद्ध धर्म, उपनिषदे यांचं सारं काढून ते सूत्र रूपाने, गोष्टी रूपाने लिहिलं. माझ्यासमोर बेंचमार्कसाठी एक पुस्तक होतं 'द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअर'. ते मराठीत आलं पाहिजे.

प्रश्न : वाचकांना मला सांगायला आवडेल की, दत्ता नायकांची साधारणतः 20 पुस्तकं आलेली आहेत. त्यात किती विविध प्रकार आहेत हे आपण आता समजून घेतलंय. परंतु जर कोणाला दत्ता नायकांची तीन किंवा चारच पुस्तकं वाचून त्यांचा गाभा व आवाका समजून घ्यायचा असेल, तर मी म्हणेल की, 'एका नास्तिकाचा देव्हारा', 'इकेबाना', 'जाय काय जूय?' आणि 'आत्मदीपो भव' ही चार पुस्तकं वाचावी. मग उरलेल्या पुस्तकांकडे आपोआपच वळावंसं वाटेल. सर, तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्या, याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

- तुम्हालाही धन्यवाद, कृतज्ञता व्यक्त करतो.

शब्दांकन : आरती सुमित

संवादक : विनोद शिरसाठ


दत्ता दामोदर नायक यांच्या व्यक्तिमत्त्वाला चार आयाम आहेत : एक माणूस, लेखक, राजकीय सामाजिक कार्यकर्ता आणि उद्योजक. त्यांच्यातील माणूस आणि लेखक मध्यवर्ती ठेवून, त्यांची दीर्घ व्हिडिओ मुलाखत (एकेक तासाचे दोन भाग) साधना साप्ताहिकाच्या 'ऐवज' या व्हिडिओ मालिकेत घेतली आहे, साधनाच्या youtube चॅनेलवर ती पाहता येईल. त्या दोन भागांतील मुलाखतीचे शब्दांकन या अंकात प्रसिद्ध करीत आहोत. त्यांनी कोंकणी, मराठी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये मिळून लिहिलेली वीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ती सर्व पुस्तके साधना मीडिया सेंटर (mob. 70582 86753/ph 02024459635) मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Tags: इकेबाना जाय काय जूय आत्मदीपो भव एका नास्तिकाचा देव्हारा सावित्री कालीघाट ते करुणाघाट आरती सुमित विनोद शिरसाठ दत्ता दामोदर नायक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा ( 54 लेख )
kdnaik@cdhomes.com

मराठी, कोंकणी व इंग्रजी या तिन्ही भाषांमध्ये लेखन करणारे, कोकणीसाठी साहित्य अकादमी प्राप्त झालेले दत्ता नायक हे मूलतः उद्योजक असून, राजकीय व सामाजिक क्षेत्रांतही सक्रिय आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी