डिजिटल अर्काईव्ह

मोकरी यांनी पठडीतला सिनेमा कधीच बनवलेला नाही. 2013 मध्ये या इराणी दिग्दर्शकाने 'फिश अँड कॅट' नावाचा सिनेमा केला होता. तोही रहस्यमय होता. विद्यापीठातले काही विद्यार्थी पतंग उडवायच्या स्पर्धेसाठी जातात. तलावाच्या बाजूला त्यांचे तंबू पडतात. बाजूलाच असलेल्या रेस्टॉरन्टमध्ये खायला- प्यायला जाऊ लागतात. इराणच्या उत्तरेच्या भागात एका रेस्टॉरन्टमध्ये मानवी मांस दिलं जात असे, या सत्य घटनेवर हा सिनेमा आधारलेला होता. इथेही दिग्दर्शकाने आपली गोष्ट नॉन लिनिअर, म्हणजे अरेषीय पद्धतीने सांगितलेली होती. त्यांच्या 2020च्या 'केअरलेस क्राइम'मध्ये 1978 मध्ये इराणच्या अबादान इथे एक संपूर्ण सिनेमागृह जाळलं गेलं त्याची गोष्ट होती. चार इस्लामी दहशतवाद्यांनी संपूर्ण थिएटरला लावलेल्या या आगीत साडेचारशे माणसं मृत्युमुखी पडली होती.

 

कोणत्याही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रयोग करणारे काही सिनेमे बघायला मिळतात. आणि तसे ते मिळावेत अशी प्रेक्षकांची अपेक्षाही असते. या वर्षीच्या इफीमधल्या अशा वेगळ्या आणि प्रभावी सिनेमांविषयी -

एखाद्या गंभीर विषयावरची डॉक्युमेंटरी त्यातलं गांभीर्य कायम ठेवून विनोदी पद्धतीने कशी करायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे दिग्दर्शक इगॉर बेझिनोविच यांची 'फुईमे ओ मॉर्ते' किंवा इटॅलिअनमध्ये 'रिहेका ऑर डेथ'. म्हटलं तर हा डॉक्युड्रामा आहे. एका व्यक्तिरेखेच्या आयुष्यातली काही वर्षं त्यात रेखाटली गेली आहेत. पण त्या वेळचे फोटो जसे आपल्याला दिसतात, त्या व्यक्तीविषयी आजची माणसं बोलताना दिसतात त्याचप्रमाणे तेव्हाच्या एखाद्या घटनेचं आज केलेलं चित्रणही पाहायला मिळतं. इगॉर यांनी डॉक्युमेंटरी करण्याची एक आगळीच पद्धत स्वीकारली आहे आणि ती अतिशय परिणामकारक आहे. अशा प्रकारची डॉक्युमेंटरी किंवा डॉक्युड्रामा मी तरी आजवर बघितलेला नाही.

जनरल गॅब्रिएल डनुनझिओ हा एक इटालिअन कवी, नाटककार, वक्ता आणि पत्रकार होता. पहिल्या महायुद्धामध्ये तो रॉयल इटालिअन आर्मीमध्ये अधिकारीही होता. 1889 ते 1910 या काळात इटलीच्या साहित्यवर्तुळात त्याला मोठं मानाचं स्थान होतं. आणि 1914 ते 1924 या काळात राजकीय वर्तुळात त्याला अनन्यसाधारण महत्त्व मिळू लागलं होतं. युद्धातला हिरो म्हणून त्याच्याकडे बघितलं जात होतं. तरुण बेनितो मुसोलिनीही त्याचा चाहता होता. खाजगी आयुष्यात त्याला चैनीत राहणं पसंत होतं आणि त्याचे अनेक स्त्रियांशी संबंध असल्याचं सांगितलं जातं.

1918 मध्ये क्रोएशियातल्या आजच्या रिहेका या बंदराचं नाव फुईमे असं होतं; कारण स्थानिक इटालिअन तिथे मोठ्या प्रमाणावर होते. युद्धानंतर मात्र फुईमेचा ताबा इटलीकडे न जाता सर्बिया, क्रोएशिया आणि स्लोव्हाकिया (नंतर हे नाव चेकोस्लोव्हाकिया झालं) यांच्या नियंत्रणाखाली दिला गेला. या विश्वासघातामुळे चिडलेल्या डनुनझिओने 186 सैनिकांना घेऊन फुईमेवर स्वारी केली आणि हे शहर ताब्यात घेतलं. जणू तो या शहराचा अनभिषिक्त सम्राटच झाला. इटलीमधून अनेक सैनिक आपणहून त्याच्यासाठी काम करायला फुईमेमध्ये दाखल झाले. डनुनझिओकडे हा ताबा फार काळ राहिला नाही. 1920 मध्ये इटलीनेच त्याला जबरदस्तीने फुईमेमधून परत जायला लावलं.

या काळात डनुनझिओ एखाद्या हुकूमशहासारखाच वागत होता. स्थानिक नागरिकांचा आपल्याला मोठा पाठिंबा आहे असं भासवत होता. जनमत घ्यायच्या वेळेस पारडं आपल्या विरोधात जातंय हे लक्षात आल्यावर त्याच्या सैनिकांनी मतदान केंद्रांची तोडफोड केली. बिगर इटालिअन व्यावसायिकांच्या उद्योगधंद्यांवर हल्ले केले.

फुईमेमधल्या डनुनझिओच्या वास्तव्यावर बेझिनोविच यांचा हा डॉक्युड्रामा आधारलेला आहे. 1919 मध्ये व्हेनिसहून डनुनझिओ निघाल्यापासून ते पुढचे पंधरा महिने त्याने फुईमेवर केलेलं राज्य, त्याची झालेली मानहानी, त्याचं इटलीला परतणं हा काळ इथे आपण पाहतो. दिग्दर्शक क्रोएशिअन आहे. रिहेका हे त्यांचं जन्मगाव आहे. त्यामुळे इथल्या इतिहासामध्ये त्यांना अर्थातच रस आहे. पण नुसता रस नाही, तर त्याकडे पाहण्याची एक आगळी दृष्टीही आहे.

सुरुवातीलाच, पडद्यावर आपल्याला ब्लॅक अँड व्हाइट फोटो पकडलेला एक हात दिसतो आणि कॉमेंटरी सुरू होते. फोटोमधला पडझड झालेला पूल पाहताना मध्येच फोटो बाजूला होतो आणि मागे तोच पूल आपल्याला दिसतो. आजच्या काळातला. डागडुजी केलेला, आधुनिक. डनुनझिओ सर्व हुकूमशहांप्रमाणेच स्वतःच्या इतक्या प्रेमात होता की, त्याने आपले असंख्य फोटो काढलेले होते. स्वतःबरोबर तो कायम फोटोग्राफर्स आणि लघुपट दिग्दर्शक यांची टीम घेऊन फिरत असे. त्याचे दहा हजारांच्या वर फोटो उपलब्ध आहेत. फुईमेमधल्या त्या काळातल्या अनेक घटनाही फोटोंमध्ये बंदिस्त झालेल्या आहेत. आणि काही चित्रफितीही उपलब्ध आहेत. बेझिनोविचने या सगळ्यांचा उपयोग करून डनुनझिओचा तो काळ आपल्यासमोर उभा केलाय; पण अतिशय अनोख्या पद्धतीने.

फुईमेचे तेव्हाचे आणि आजचे फोटो दाखवून झाल्यावर दिग्दर्शक तिथल्या रस्त्यावरून फिरू लागतो. येणाऱ्या-जाणाऱ्यांना डननुझिओचं नाव ऐकलंय का, हा एकच प्रश्न विचारतो. बहुतेक तरुण मंडळी नकारार्थी मान डोलावतात. काही जण प्रश्न टाळून पुढे जातात. एक बाई म्हणते, "माझा नवरा म्युझिअममध्ये काम करतो, त्याने नक्कीच हे नाव ऐकलेलं असणार".

अशा रीतीने डनुनझिओला ओळखणारी काही माणसं सापडतात. कोण होता तो? या प्रश्नाचं उत्तर मात्र सरसकट, 'तो फॅसिस्ट होता', असं येतं.

आपण त्याच्यावर एक डॉक्युमेंटरी करत आहोत आणि त्याची भूमिका साकारण्यासाठी तुमच्यापैकी काहींची निवड मला करायचीये, म्हटल्यावर अनेक जण ऑडिशन द्यायला येतात. अनेक डनुनझिओच्या ऑडिशन्स, त्यांच्याशी होणाऱ्या गप्पा ऐकत-पाहत आपण पुढे जातो आणि बेझिनोविच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करताना दिसतात. म्हणजे काय करतात ?

डनुनझिओने फुईमेमध्ये नेमकं काय केलं, हे दाखवताना दिग्दर्शक काही प्रसंग आजच्या लोकांकडून करवून घेतो. म्हणजे, एका क्लिपमध्ये डनुनझिओचे हातात बंदुका घेतलेले सैनिक आपल्याला समोरून धावत येताना दिसतात. मग तेच दृश्य बेझिनोविच आजच्या त्यांनी निवडलेल्या कलाकारांकडून करवून घेतात. मात्र, हे कलाकार तो काळ उभा करत असताना त्यांच्या आजूबाजूला वावरणारं जग आजचं आहे. रस्त्यावरून नेहमीप्रमाणे माणसं चालताहेत. दुकानं उघडी आहेत. सगळ्यांचे सगळे व्यवहार सुरू आहेत. आणि या सगळ्याच्या मध्येच काही माणसं तो जुना काळ अभिनीत करताहेत.

हे सगळं बघताना मजेशीर वाटतं. हसायला येतं; पण तेवढंच परिणामकारक असल्याचंही लक्षात येतं. डनुनझिओची भूमिका तर फुईमेमध्ये राहणाऱ्या आजच्या अनेक पुरुषांनी साकारलेली आहे. आता अमुक तमुक व्यक्ती यापुढे डनुनझिओ म्हणून आपल्यासमोर येईल असं दिग्दर्शक कॉमेंटरी करताना आपल्याला स्वच्छपणे सांगतो. यातल्या एका माजी लष्करी अधिकाऱ्याची ओळख करून देताना दिग्दर्शक म्हणतो, "क्रोएशिआच्या स्वातंत्र्यलढ्यात यांचा सहभाग होता."

ही डॉक्युमेंटरी पाहताना पदोपदी हसायला येतं. पण हुकूमशहा काय करतात, कसे असतात यावरचा दिग्दर्शकाचा फोकस मात्र कायम राहतो. हे वाक्यच पहा ना. आजच्या रिहेकाची तुलना तेव्हाच्या फुईमेबरोबर करताना दिग्दर्शक म्हणतो, "माझ्या विषयाची ओळख करून देताना 'फॅसिझम' हा शब्द जास्त वापरू नकोस असं माझ्या इटालिअन सहकाऱ्यांनी मला सांगितलंय. तेव्हा माझ्या इटालिअन प्रेक्षकांसाठी मी इथेच थांबतो." या वाक्यातला उपहास आपल्यापर्यंत पोहोचतोच.

रिहेकामधल्या सुमारे तीनशे नागरिकांना घेऊन बेझिनोविचने ही डॉक्युमेंटरी केलेली आहे. तिथल्या बहुतेक लोकांना डनुनझिओ हा फॅसिस्ट वाटत असला तरी इटलीमध्ये मात्र आजही त्याला देशभक्त समजलं जातं. रिहेकामध्ये त्याची आठवणही राहणार नाही याची काळजी घेतली गेलीये. सरकारी इमारती, रस्ते, चौक यांवरचं त्याचं नाव पुसून टाकण्यात आलंय. तिकडे, डनुनझिओला परत बोलावल्यानंतरही मुसोलिनीने त्याचा सन्मान केलेला आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये असलेल्या उल्लेखानुसार, मुसोलिनीने म्हटलं होतं, "डननुझिओ म्हणजे किडलेल्या दातासारखा आहे. एक तर तो उपटून काढावा लागतो किंवा त्यावर सोन्याचा दात बसवावा लागतो".

बेझिनोविचच्या मनात मात्र डननुझिओ कोण होता याविषयी पूर्ण स्पष्टता आहे आणि ती त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये लख्ख उतरलेली आहे. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे, जगभरात आज अनेक ठिकाणी उजव्या विचारसरणीचा प्रभाव वाढत असल्याचं दिसत असताना फॅसिस्टांवर अशा प्रकारे विनोदी डॉक्युमेंटरी करणं, त्यांच्यावर हसणं हे एक परखड भाष्यच आहे.

दिग्दर्शक : इगॉर बेझिनोविच 
लेखक: इगॉर बेझिनोविच 
छायाचित्रण : ग्रेगॉर बोहिक 
संकलन : होस्लावा ब्रुक्युझिक
कलाकार : सेनान बेलजुलजी, तिहोमिर ब्युतेरिन, अॅन्ड्रिआ मारसानिच, इझेत मेदोसेविच, मॅसिमो रोनॉनी, मिलोवान सिको, आलबानो व्युसेतिक


रस्त्यावर साचलेलं पाणी. कॅमेरा त्या पाण्याच्या खाली. वरून येणारे दोन लहान पाय धपकन पाण्यात उडी मारतात. आजूबाजूला उडालेले पाण्याचे थेंब. मग आणखी एक उडी. आता दुसऱ्या दोन पायांचं प्रतिबिंबही आपल्याला दिसतं. कॅमेरा आता रस्त्यावरचं दृश्य दाखवू लागलाय. पावसाचं पाणी अंगावरून झटकणारा कुत्रा आणि त्याच्या पुढे नेम धरून साचलेलं पाणी उडवत उड्या मारत चाललेल्या दहाबारा वर्षांच्या तीन मुली. कोणाही लहान मुलांप्रमाणेच पावसाच्या पाण्यात खेळणाऱ्या, पाणी उडवण्यात मजा वाटणाऱ्या. आणि तरीही वेगळ्या.

'मस्किटोज' हा निकोल आणि व्हॅलेंटिना बर्तानी या दोन बहिणींनी दिग्दर्शित केलेला सिनेमाही असाच वेगळा आहे. नुसताच वेगळा नाही, तर विचित्रही आहे. इटलीमधल्या फेरारा गावातल्या माणसांप्रमाणेच. इथे काहीच नॉर्मल नाही. आपल्या गावी परतलेली इव्हा तर नाहीच नाही.

या सिनेमाची गोष्ट अशी साधी-सरळ सांगता येणार नाही. काळ आहे 1997चा. स्वित्झर्लंडमध्ये श्रीमंत आईचं प्रशस्त घर सोडून ही इव्हा आपल्या आठ वर्षांच्या मुलीला, लिंडाला घेऊन फेरारा या आपल्या जन्मगावी यायचं ठरवते. 'तू भटक्यासारखी राहतेस; पण मुलीला तरी एक स्थिर आयुष्य जगू दे, तिला माझ्याकडे ठेव', हे आईचं म्हणणं धुडकावून लावते. लिंडाही आजीकडचा सगळा ऐशो-आराम मागे ठेवते आणि आईबरोबर निघते.

फेरारामध्ये लिंडाला भेटतात अझुरा आणि मार्ता या दोन बहिणी. तिच्यापेक्षा थोड्या मोठ्या; पण त्यांचे पालकही विचित्र. आई नर्स आहे; पण तिला बाहुल्या बनवण्याचा छंद जोपासायचाय. वडील डॉक्टर आहेत, पण ते काही न बोलता नुसतेच सिगरेट फूंकत असतात. अझुरा आणि मार्तासाठी घरी एक बेबी सिटर येत असतो. कार्लिनो. हा गे आहे. या दोघींच्या शेजारी राहणारं जोडपं अतिशय धार्मिक वृत्तीचं आहे. त्यांतली बाई आगाऊ, आक्रमक आणि अधिकारवाणीने बोलणारी, सतत आपण दत्तक घेतलेल्या आपल्या मुलीला कसे स्वतःचीच मुलगी असल्यासारखे वाढवतोय आणि वागवतोय हे ठासून सांगणारी. बाजूच्याच एका इमारतीमधल्या घराच्या खिडकीतून आपल्याला दोन तरुण जुळे भाऊ दिसत राहतात. कोणतंही वाक्य एकाच सुरात म्हणणारे. आपल्या बिल्डिंगच्या पायऱ्या उतरून कधीही खाली न आलेले.

यांतलं कुणीच कसं नॉर्मल नाही, असा प्रश्न आपल्या मनात येत नाही. कारण दिग्दर्शकांना मुळी नॉर्मल माणसांची गोष्टच सांगायची नाही. पहिल्या काही मिनिटांमध्येच सिनेमा वास्तववादी नाही, त्यात सररिअल एलिमेंट्स आहेत याची जाणीव आपल्याला करून दिली जाते आणि मग या सिनेमाकडे वेगळ्या दृष्टीने बघायला हवं, याचं भानही.

इव्हा आणि लिंडामध्ये एक कनेक्शन आहे. काही न बोलताच एकमेकींच्या मनात काय चाललंय हे त्यांना समजतं. एक खास ड्रेस घातल्यावर अझुराला वाऱ्याच्या वेगाने धावता येतं. लिंडा, अझुरा आणि मार्ता एकमेकींच्या मैत्रिणी होणं स्वाभाविक असतं; कारण त्यांच्यासाठी एरवी कुणीच नसतं. फेराराला येताक्षणी इव्हाला तिचा जुना मित्र भेटतो आणि त्याच्याबरोबर ती आपल्या जुन्या अमली पदार्थांच्या जगात गुंगून जाते. लिंडाची तिला काळजी नसते असं नाही; पण ड्रग्सची ओढ तिला बेपर्वा बनवते. इतकी की, अनेकदा लिंडाला तिची आई बनून तिची काळजी घ्यावी लागते. म्हणून तर या तीन मुलींना घेऊन एका डान्स पार्टीला गेल्यानंतर इव्हा त्यांना पूर्ण विसरून आपल्या जगात रमून जाते. घरापासून दूर, रस्ता माहीत नसलेला आणि आजूबाजूला कुणीही ओळखीचं नाही. तिघी रात्रभर नुसत्याच भटकत राहतात. गोंधळलेल्या, घाबरलेल्या.

एकूणच संपूर्ण सिनेमाचं वातावरण हे अस्वस्थ करणारं, काही वेळा नकोसं वाटणारं आहे. या सगळ्याला साजेशी भडक रंगसंगती दिग्दर्शकांनी वापरलीये. तीच गोष्ट संगीताचीही. एक क्षणही आपल्याला मानसिक शांतता मिळणार नाही याची काळजी दिग्दर्शकांनी घेतलीये. अशा सिनेमांमधून लहान मुलांकडून एवढा चांगला अभिनय कसा करून घेतला जात असेल, असा विचार मात्र मनात आल्यावाचून राहत नाही.

या तीन मुलींभोवती काहीच नॉर्मल नाहीये. त्यांच्यातलं बालपण करपून गेलंय; पण मधूनच त्यांच्या वागण्यातून ते डोकावतं. रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्यात उड्या मारताना, आपल्या कुत्र्याने आईच्या बाहुलीचा डोळा गिळल्यानंतर त्याच्या विष्ठेमध्ये तो डोळा शोधताना, गावातल्या आइसक्रीमच्या दुकानात बसून आइसक्रीम खाताना त्यांच्यातलं निरागसपण दिसतं. आणि त्यांचं वास्तव जाणवून त्यातली दाहकता अधिकच त्रास देऊ लागते. पण एकाही क्षणी दिग्दर्शकांनी त्यांना 'बिचाऱ्या' केलेलं नाही. आपल्या परिस्थितीतून त्या जमेल तसा मार्ग काढतात. कधी चुकतात. कधी भांडतात. कधी एकमेकींचा हात धरतात. आयुष्य बिघडलंय; पण म्हणून जगायचं कसं थांबणार ?

निकोल आणि व्हॅलेंटिना बर्तानी या बहिणींनी एकत्र दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा. सिनेमातल्या अझुरा आणि मार्ताच्या वयाच्या असताना त्यांनी आयुष्यात जे पाहिलं आणि भोगलं त्याचा बराचसा भाग इथे आलाय. 'कमिंग ऑफ एज' या जुन्याच थीमकडे इतक्या वेगळ्या नजरेने बघणारे, इतक्या आगळ्या मांडणीचे सिनेमे बघायला मिळतात म्हणून तरी चित्रपट महोत्सवांना जायलाच हवं, असं वाटतं.

दिग्दर्शक : निकोल बर्तानी, व्हॅलेंटिना बर्तानी
लेखक : मारिया सोल लिमोदियो, निकोल बर्तानी, व्हॅलेंटिना बर्तानी
छायाचित्रण : मार्को बस्सानो, लुका कॉस्तानतिनी
संकलन : मार्चलो सावरिनो
कलाकार : मिआ फेरिचेली, अॅग्नेस स्काझा, पेत्रा शेगिआ, क्लारा त्रामोन्तानो, जेसिका व्हॅलेरानी, मातिओ मारतारी


'ब्लॅक रॅबिट व्हाइट रॅबिट' हा सिनेमा पूर्ण समजायचा तर तो किमान दोन-तीन वेळा तरी बघायला हवा. ही एक रहस्यकथा आहे. त्यात नाट्य आहे. एकात एक घटनांची गुंतागुंत आहे. हे खरं की खोटं, असं चकवणं आहे. सिनेमातला सिनेमा आहे. नाही, एक नाही, दोन सिनेमे आहेत. दिग्दर्शक शाहराम मोकरी यांचा हा सिनेमा म्हणजे मेंदूला खाद्य आहे. सिनेमा संपल्यानंतरही आपण त्याचा अर्थ लावत राहतो. दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचंय याचा विचार करू लागतो. आपल्याप्रमाणेच इतरांनाही तेच वाटतंय का, हे तपासून पाहू लागतो.

सिनेमाच्या सुरुवातीलाच पडद्यावर नाटककार ॲन्तोन चेकॉव्हचं विधान आपल्याला वाचायला मिळतं, 'गोष्टीमध्ये बंदुकीचा उल्लेख असेल तर तिच्यातून गोळी सुटायला हवी'.

मात्र, ही गोळी पहिल्याच दृश्यात सुटेल अशी आपली अपेक्षा नसते. जुन्या वस्तू विकणाऱ्या एका दुकानात एक तरुण मुलगा जुनी रायफल विकू पाहत असतो. त्याच प्रकारची, तशीच दिसणारी एक खोटी रायफलही तिथे असते; पण ही रायफल खास आहे असं या मुलाचं म्हणणं असतं. आणि अचानक त्या रायफलमधून गोळी सुटते. दुकानाच्या बाहेरून, बंद काचेआड आपल्याला या गोळीमुळे एक मृत्यू झाल्याचं लक्षात येतं.

त्यानंतरच्या घटनेचा या घटनेशी काहीही संबंध दिसत नाही. निदान वरवर तरी नाही.

कारण आपल्याला भेटते सारा. चेहऱ्याला, हाताला बँडेज बांधलेली. तिच्या गाडीचा अपघात झालाय हे आपल्याला कळतं, या अपघातामुळे घरातल्या वस्तूंशी तिला बोलता येऊ लागलंय हेही समजतं. चालताना तिच्या पायाभोवती एक वलय तयार होऊ लागलंय. तिच्या नवऱ्याशी तिचं पटेनासं झालंय, हा अपघात त्यानेच घडवून आणलाय, असंही तिच्या मनात आहे. आणि एक दिवस एक कुरिअरवाला तिच्या बंगल्याच्या बाहेर येतो. एका मृत व्यक्तीने विकत घेतलेली एक वस्तू तिच्यासाठी पाठवलेली असते आणि ती तिने स्वीकारावी असं त्या कुरिअरवाल्याचं म्हणणं असतं.

मग आपण एका मोठ्या स्टुडिओमध्ये जातो. इथे दोन निरनिराळ्या सेट्सवर दोन वेगवेगळ्या सिनेमांचं चित्रीकरण चालू असतं. एक रशियन भाषेतला सिनेमा आणि दुसरा पर्शियन. 'हेजार दास्ताँ' नावाच्या एका इराणी क्लासिक टीव्ही मालिकेचा हा रिमेक आहे आणि बाबक करीमी तिथे प्रॉपर्टी सांभाळण्याचं काम करतोय. शेवटच्या खुनाच्या दृश्यात लागणारं पिस्तुल खरं आहे आणि त्यात खऱ्या गोळ्या आहेत असं वाटून तो सेटवर जायचा प्रयत्न करतो. दिग्दर्शकाला, म्हणजेच 'ब्लॅक रॅबिट, व्हाइट रॅबिट'च्या दिग्दर्शकाला शाहराम मोकरी यांना शोधतोय; पण त्याचं आयकार्ड हरवल्यामुळे त्याला आतमध्ये प्रवेश मिळत नाहीये. तो गोंधळून गेलाय आणि आता काय होणार म्हणून घाबरलाय. त्याच्या भीतीमागे भूतकाळात घडलेल्या घटनेचा संदर्भ आहे.

इथे नायिका बनण्याचं स्वप्न पाहणारी; पण सध्या एक्स्ट्रा म्हणून काम मिळवलेली एक मुलगीही आहे. घरी न सांगताच ती आलीये.

प्रॉपर्टी ठेवलेल्या गोडाउनमधल्या बाहुल्या अचानक एकमेकांशी बोलू लागल्यात. आता पुढे काय होणार, हा त्यांच्या गप्पांचा विषय आहे.

हे सगळं नुसतंच एकमेकांमध्ये गुंतलेलं नाही, तर अनेक दृश्यं आपण पुनःपुन्हा पाहतो. वेगवेगळ्या अँगल्समधून बघतो. वेगवेगळ्या दृष्टीकोनांमधून बघतो. प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं, काहीतरी अधिक दिसेल याची काळजी दिग्दर्शकाने घेतलेली असते. सिनेमातलं का असेना; पण वास्तव काय आहे आणि काल्पनिक काय आहे याची सरमिसळ होऊ लागते. एक मात्र खरं, सिनेमामध्ये तीन भाषा बोलल्या जातात. ताजिक, पर्शियन आणि रशियन. आपण या तीनही भाषा इंग्लिश सबटायटल्समधून वाचतो. त्यामुळे त्यांतले भाषिक बारकावे आपल्याला समजत नाहीत. किंवा मग, त्यांच्या लोककथांमधले संदर्भ आलेले असतील तर तेही कळत नाहीत. या दिग्दर्शकाचं वेगळेपण मात्र अधोरेखित होतं.

मोकरी यांनी पठडीतला सिनेमा कधीच बनवलेला नाही. 2013 मध्ये या इराणी दिग्दर्शकाने 'फिश अँड कॅट' नावाचा सिनेमा केला होता. तोही रहस्यमय होता. विद्यापीठातले काही विद्यार्थी पतंग उडवायच्या स्पर्धेसाठी जातात. तलावाच्या बाजूला त्यांचे तंबू पडतात. बाजूलाच असलेल्या रेस्टॉरन्टमध्ये खायला-प्यायला जाऊ लागतात. इराणच्या उत्तरेच्या भागात एका रेस्टॉरन्टमध्ये मानवी मांस दिलं जात असे, या सत्य घटनेवर हा सिनेमा आधारलेला होता. इथेही दिग्दर्शकाने आपली गोष्ट नॉन लिनिअर, म्हणजे अरेषीय पद्धतीने सांगितलेली होती. त्यांच्या 2020च्या 'केअरलेस क्राइम' मध्ये 1978 मध्ये इराणच्या अबादान इथे एक संपूर्ण सिनेमागृह जाळलं गेलं त्याची गोष्ट होती. चार इस्लामी दहशतवाद्यांनी संपूर्ण थिएटरला लावलेल्या या आगीत साडेचारशे माणसं मृत्युमुखी पडली होती. या घटनेमुळे 1979च्या इराणी क्रांतीला चालना मिळाली आणि शहाविरुद्धच्या चळवळीने जोर धरला असं मानलं जातं.

अशा या दिग्दर्शकाचा 'ब्लॅक रॅबिट व्हाइट रॅबिट' हा नवा कोरा सिनेमा परत एकदा बघता आला तर मला नक्की बघायचाय. कदाचित तेव्हा तो थोडा जास्त समजेल. एक मात्र खरं, हे असे सिनेमे पाहून झाल्यानंतर प्रत्येकाला एकमेकांशी बोलावं वाटतं. आपल्याला काय वाटतंय ते सांगावं वाटतं. समोरच्याला काय आकलन झालंय ते जाणून घ्यावं वाटतं.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं हेही एक फलितच म्हणायला हवं !

दिग्दर्शक : शाहराम मोकरी 
पटकथा : नसीम अहमदपोर, शाहराम मोकरी 
छायाचित्रण : मोर्तेझा घेईदी
संकलन : शाहराम मोकरी
कलाकार : बाबक करीमी, हस्ती मोहम्माई, किबरियो दिलियोबोवा, बेझान दावल्यतोव

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मीना कर्णिक,  मुंबई ( 82 लेख )
meenakarnik@gmail.com

पत्रकार, चित्रपट समीक्षक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी