पुढची गोष्ट कुठल्या वळणाने जाणार याची आपल्याला कल्पना येते. आणि तसंच होतं. हळूहळू आजोबा आणि नातीमधली दरी कमी होऊ लागते. एकमेकांबरोबर वेळ घालवायला त्यांना आवडू लागतं आणि आपण गोष्टी विसरायला लागलोय याची जाणीव मॅन्युएलला होते. घरभर त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठया आपल्याला दिसू लागतात. आपली ही अवस्था कस्टडी देणाऱ्या न्यायाधीशांना सांगणं भाग आहे हे त्याच्या लक्षात येतं. नातीची कस्टडी जाणार, त्याला पर्याय नाही हेही त्याला समजतं.
ब्राझील, पोर्तो रिको, तैवान अशा तीन वेगवेगळ्या देशांचे सिनेमे पाहताना तिथल्या संस्कृतींमधलं वैविध्य आपल्या लक्षात येतं. दोन गोष्टी वृद्धांच्या, तर दोन लहान मुलींच्या. पण अगदी वेगळ्या.
यूट्यूबवर एक व्हिडिओ आहे. एकमेकांशी लढणाऱ्या आक्रमक सयामीज माशांची पैदास करण्यासाठी छोटे पर असलेली मादी आणि मोठे पर असलेला नर यांची निवड केली जाते. मग त्या मादीच्या पोटावर हलकासा जोर देऊन तिच्या शरीरातील अंडी एका ट्रेमध्ये काढली जातात. नर-माशाचे स्पर्मही मग त्याच ट्रेमध्ये दाबून काढले जातात. मादीचं प्रत्येक अंडं फर्टिलाइज व्हावं म्हणून अनेक माशांच्या स्पर्म्सचा उपयोग केला जातो. फर्टिलाय झालेली अंडी त्यानंतर स्वच्छ पाण्यात ठेवली जातात. कोणताही संसर्ग होऊ नये म्हणून औषधांचा उपयोगही केला जातो. यातून जन्माला येणारे मासे हे अतिशय आक्रमक असतात, ते एकमेकांवर हल्ला करून जीवही घेऊ शकतात. तसं होऊ नये याकरता, प्रत्येक माशासाठी एक वेगळी बाटली वापरली जाते. असं केल्यामुळे वेगवेगळ्या, अत्यंत दुर्मीळ अशा रंगांच्या माशांचा उपयोगही त्यांच्या जातीचे मासे निर्माण करण्यासाठी होऊ शकतो. या माशांच्या रंगांत प्रचंड वैविध्य असतं, ते नजरेत भरणारे असतात, आकर्षक असतात, सुंदर असतात. काही काही देशांमध्ये या माशांच्या झुंजी लावल्या जातात. आणि त्यावर जुगार खेळला जातो. हा खेळ अतिशय लोकप्रिय असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर त्यात पैसा ओतला जातो.
हे सगळं इथे सांगायचं कारण काय ?
'द ब्लू ट्रेल' या इफीच्या ओपनिंग फिल्ममधल्या अत्यंत महत्त्वाच्या दृश्यामध्ये ही झुंज पाहायला मिळते. लाल, पिवळ्या, निळ्या रंगांतल्या माशांचं एकमेकांवर हल्ला करणं, एकमेकांना मारण्याचे त्यांचे प्रयत्न पाहताना क्षणभर श्वास रोखून धरावा लागतो. आणि त्यातलं सौंदर्य अवाकही करतं.
मुळातच ब्राझीलचे दिग्दर्शक गॅब्रिएल मास्कारो यांचा हा सिनेमा म्हणजे डोळ्यांना मेजवानी आहे. मग ती अॅमेझॉनच्या जंगलातून केलेली बोटीची सफर असो, डोळ्यांमध्ये निळ्या गोगलगाईच्या शरीरातले थेंब टाकल्यानंतर मेंदूत होणाऱ्या बदलांमुळे मनाने केलेला मुक्त विहार असो की, खराब झालेल्या टायर्सचे डोंगरच्या डोंगर. ओसाड पडलेल्या बागेतली ग्लास फायबरची स्मशानभूमी असो की, रंगीबेरंगी माशांची झुंज. मात्र, ही सगळी दृश्यं केवळ आपली फ्रेम सुंदर दिसावी म्हणून नाही, तर गोष्टीच्या ओघात येतात त्यामुळे ती कुठेही विसंगत वाटत नाहीत.
ही गोष्ट आहे 77 वर्षांच्या टेरिझाची. सिनेमाच्या सुरुवातीलाच आपल्याला आकाशातून एक छोटं विमान जाताना दिसतं. त्यावर 'द फ्यूचर इज फॉर एव्हरीवन' असा फलक लटकावलेला दिसतो. सगळ्यांसाठी म्हणजे अर्थातच तरुणांसाठी. देश आर्थिक सुस्थितीत न्यायचा तर देशातल्या म्हाताऱ्यांची जागा, त्यांच्या नोकऱ्या तरुणांना मिळायला हव्यात. शहरभर फिरणाऱ्या या विमानाचा फलक आपल्याला दिसतो न दिसतो तोच एका घराच्या दरवाजावर एक तरुण मुलगी सजावट करताना दिसते.
"हे काय करतेयस तू?" घरी येणारी टेरिझा तिला विचारते.
"सरकारने तुमचा सन्मान करायचा ठरवलंय. सगळ्या वृद्ध माणसांच्या घरावर आता ही मखरं लावली जाणारेयत."
"थोडक्यात, इथे म्हातारी माणसं राहतात हे तुम्ही जगजाहीर करणार आहात. आणि वय वाढणं ही सन्मानाची गोष्ट कधीपासून झालीये?" टेरिझाच्या स्वरात वैषम्य असतं.
सरकारची मुळी तशी योजनाच असते. देशातल्या वृद्धांचं संरक्षण करण्याच्या नावाखाली सरकार 80 व्या वर्षी त्यांची रवानगी खास त्यांच्यासाठी बांधलेल्या कॉलनीमध्ये करणार असतं. हे केंद्र कसं आहे याची कुणालाही माहिती नाही; कारण आजवर मुळी कुणी तिथून परतच आलेलं नाही. दरम्यान, 75 वर्षांवरच्या नागरिकांना आपले सगळे निर्णय आपल्या मुलांच्या संमतीने घेणं बंधनकारक असतं. ही वयोमर्यादा अचानक कमी केल्यामुळे आपल्यापाशी कॉलनीमध्ये जाण्याकरता केवळ तीनच वर्षं शिल्लक आहेत आणि आता यापुढे आपल्याला सगळं आयुष्य मुलीच्या मर्जीने घालवावं लागणार आहे याची जाणीव होऊन टेरिझा दचकते. त्यातून मैत्रिणीने 'बकेट लिस्ट पूर्ण करायची हीच वेळ आहे,' असं म्हटल्यानंतर तर पक्कंच ठरवते आणि थेट नोकरीचा राजीनामा देऊन टाकते.
एकटं राहणाऱ्या, आर्थिकदृष्ट्या पूर्ण स्वतंत्र असलेल्या टेरिझाला विमानातून प्रवास करायचाय. खरं तर वरवर पाहता यात कठीण काहीच नाही. पण आता टेरिझाच्या वतीने हा निर्णय तिच्या मुलीने घ्यायचाय. न ऐकणाऱ्या वृद्धांना एका पिंजऱ्याच्या गाडीत घालून त्यांच्या घरी सोडलं जात असल्याचं दृश्य दाखवून दिग्दर्शकाने यातली मानहानीही स्पष्ट केलीये.
टेरिझा एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये जाऊन विमानाचं तिकीट काढायचा प्रयत्न करते; पण मुलगी नकार देते. आता काय करायचं? इटाकोटिओरा नावाचं एक ठिकाण आहे. तिथे खाजगी वैमानिक वजनाने कमी विमानं चालवतात हे कळल्यावर टेरिझा तिथे जायचं ठरवते. मात्र, आता मुलीची परवानगी घेण्याचा वेडेपणा ती करत नाही. थेट निघतेच. चोरून, घरातून पळून.
तो प्रवास म्हणजे हा सिनेमा आहे. टेरिझाइतकाच आपल्यासाठीही विस्मयकारक. इटाकोटिओराला जाण्याचा मार्ग अॅमेझॉनच्या जंगलातून आहे. काडू नावाच्या नावाड्याच्या बोटीतून टेरिझा जाते. त्याच्याशी मैत्री झाल्यावर बोट चालवायला शिकते, त्याने दिलेले गोगलगाईच्या शरीरातले थेंब डोळ्यांत टाकायचं धाडस करून एका वेगळ्याच जगात वावरून येते. मग इलेक्ट्रॉनिक बायबल विकणाऱ्या रॉबर्टाला भेटते. रॉबर्टाचा एक फंडा आहे, 'आय वॉन्ट टु बाय माय फ्रीडम बिफोर आय गेट अरेस्टेड', आपलं स्वातंत्र्य विकत घ्यायचं. पुढे जुगाराचं व्यसन लागलेला लुदेमिर तिला सापडतो जो तिच्यासाठी एक कमी वजनाचं, एका माणसाला घेऊन जाणारं विमान बनवून द्यायला तयार होतो. टेरिझाला भेटणारी प्रत्येक व्यक्ती तिला काही ना काहीतरी देते. आर्थिकदृष्ट्या नाही, तर असोशीने जगण्याचे धडे देते. आपल्या पंखांतलं बळ कमी झालेलं नाही याची जाणीव करून देते. 'डोन्ट लेट एनीवन ब्लॉक युअर पाथ... कोणालाही तुझ्या मार्गातला अडथळा बनू देऊ नकोस.
तरीही टेरिझाच्या या प्रवासात अनेक अडथळे आहेतच. एकदा ती पोलिसांच्या ताब्यात सापडते. आणि कॉलनीमध्ये जाणाऱ्या स्त्री-पुरुषांबरोबर तिची रवानगी केली जाते. तिथे प्रत्येक माणसाला सरकारतर्फे एक बॅग दिली जाते. यात म्हाताऱ्यांना लागणाऱ्या काही वस्तू आहेत ज्यांत डायपर्सचा समावेश आहे.
"मला नाही वापरायचे डायपर्स, टेरिझा समोरच्या तरुण मुलीला सांगते.
"तुम्ही वापरा किंवा नका वापरू, ते घालावे लागणारच. तसा नियमच आहे. आणि तो पाळला तर ते तुमच्यासाठीही बरं असेल आणि माझ्यासाठीही," थंडपणे ती मुलगी म्हणते.
सरसकट सगळ्या माणसांना वयानुसार एका गटात बसवायचं, त्यांच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य हे ठरवून तसे नियम बनवायचे आणि आविर्भाव तर असा की, आपण त्यांचा सन्मान करतोय ! यातला विरोधाभास दिग्दर्शक छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून ठसठशीतपणे आपल्यासमोर आणतो. पण तरीही वृद्धांवर होणारा अन्याय एवढ्यापुरतीच ही गोष्ट राहत नाही. यात टेरिझाची स्वप्नं आहेत, तिचं मुक्त होणं आहे, आयुष्य जगण्याची तिची ऊर्मी आहे. कोणत्याही वयात आपल्याला जे हवंय ते मिळवण्याची जिद्द आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या जिद्दीला वयाचं बंधन नाही.
लेखक दिग्दर्शक : गॅब्रिएल मास्कारो
पटकथा : गॅब्रिएल मास्कारो, टिबीरिओ अझुल
छायाचित्रण : गुलेर्मो गारझा
संकलन : ओमार गझमान, सेबेस्टियन सेपुलवेदा
कलाकार : डेनिस वेनबर्ग, रॉड्रिगो सान्तोरो, मिरियम सोकारास
'दे ताल पालो' या पोर्तो रिकोसारख्या चिमुकल्या देशाच्या सिनेमामध्येही आपण एका वृद्धाची गोष्ट पाहतो. पण इथे आजोबांच्या जोडीला एक आठ-नऊ वर्षांची इरीन नावाची नातही आहे. सिनेमाचे दिग्दर्शक आहेत इव्हान दारिएल ओत्रिज.
अगदी साधीसुधी गोष्ट. तितक्याच साधेपणाने सांगितलेली. बरीचशी संथ. इथला आजोबा, मॅन्युएल अजिबातच टेरिझासारखा नाही. म्हणजे, तिच्यासारखाच स्वतंत्र आहे. एकटा राहतोय. काम करतोय; पण त्याची अशी काही स्वप्नं नाहीत. त्यालाही एक मुलगी आहे. लग्न करून घरातून निघून गेलेली. नवरा या मुलीला तुफान मारहाण करतो. बेशुद्धावस्थेत तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. ती बरी कधी होणार, होणार की नाही याविषयी डॉक्टरांना काहीच स्पष्टपणे सांगता येत नसतं. मग आता प्रश्न येतो तिच्या लहान मुलीचा. नवऱ्याचे आईवडील उपलब्ध नसल्यामुळे आईच्या वडिलांकडे, मॅन्युएलकडे इरीनची कस्टडी येते. तोवर नातीला कधीही न भेटलेला मॅन्युएल तिला घेऊन आपल्या घरी येतो खरा; पण पुढचा प्रवास सोपा असणार नाही याची जाणीव त्याला असते.
इरीनसाठी तर सगळंच बदलून जातं. घर वेगळं, शाळा निराळी, वर्गातली मुलं अनोळखी, आई जिवंत राहील की नाही याची अनिश्चितता आणि सर्वांत भयंकर म्हणजे वडिलांच्या सततच्या हिंसक वागण्यामुळे झालेले आघात. एवढ्या लहान वयात आलेल्या या अनुभवांमुळे इरीनचं बोलणं बंद झालंय. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पार हरवून गेलाय.
पुढची गोष्ट कुठल्या वळणाने जाणार याची आपल्याला कल्पना येते. आणि तसंच होतं. हळूहळू आजोबा आणि नातीमधली दरी कमी होऊ लागते. एकमेकांबरोबर वेळ घालवायला त्यांना आवडू लागतं आणि आपण गोष्टी विसरायला लागलोय याची जाणीव मॅन्युएलला होते. घरभर त्याने लिहून ठेवलेल्या चिठ्ठया आपल्याला दिसू लागतात. आपली ही अवस्था कस्टडी देणाऱ्या न्यायाधीशांना सांगणं भाग आहे हे त्याच्या लक्षात येतं. नातीची कस्टडी जाणार, त्याला पर्याय नाही हेही त्याला समजतं.
दोघांचं नातं आता नेमकं उलट झालंय. नात आजोबांची काळजी घेऊ लागलीये. ते औषधं वेळेवर घेतील हे पाहू लागलीये. आजोबांना सोडून जाण्याची कल्पनाही तिला सहन होत नाहीये. यातून मार्ग कसा काढणार? मुळात मार्ग आहे का?
'दे ताल पालो' म्हणजे लाइक फादर, लाइक सन. किंवा लाइक मदर, लाइक डॉटर. जशी आई, तशी मुलगी. एका दृश्यात आजोबा नातीला तिच्या आईच्या बालपणातले फोटो दाखवत असतात. त्या वेळी ते तिला सांगतात, 'आठवणी आणि फोटो म्हणजे केवळ नॉस्टॅल्जिया नसतो, ते जतन केलेलं आयुष्यही असतं.' या फोटोंचा आणि इरीन काढत असलेल्या चित्रांचाही दिग्दर्शकाने खूप छान वापर केलाय. एका परीने इरीनचं वयात येणं आपण पाहतो. आजोबांची काळजी घेता घेता तिच्या चेहऱ्यावर येणारी प्रगल्भता आपल्याला दिसते. दुसऱ्या बाजूला, आपल्या आजाराचं ओझं बाळगणाऱ्या आजोबांच्या चेहऱ्यावर हरवलेपणाची भावना अधिकाधिक गडद होताना दिसते. या दोन्ही नटांनी अशक्य महान अभिनय केलाय.
इफीला 'दे ताल पालो'चा वर्ल्ड प्रीमिअर झाला. तेव्हा दिग्दर्शक इव्हान दारिएल ओत्रिज आणि आजोबांची भूमिका करणारे होसे फेलिक्स गोमेझ हजर होते. इरीनची भूमिका करणाऱ्या मिलेनाविषयी दोघेही भरभरून बोलले.
होसे म्हणाले, "मी प्रत्यक्ष आयुष्यात आजोबाची भूमिका निभावली आहे. माझ्या दोन नातवंडांना मी मोठं केलंय. त्यांना आजी नव्हती. माझे नातू कधी भांडतात, काय खातात, त्यांना काय आवडतं, त्यांना कधी काय द्यायचं असतं हे मी केलेलं असल्यामुळे सिनेमात त्याबाबतीत मला फारसा त्रास झाला नाही; पण या मुलीला मी ओळखत नव्हतो. त्यामुळे सेटवर पहिल्याच दिवशी मी तिला म्हटलं, 'आजपासून तू मला आजोबा म्हणायचं आहेस.' मिलेना खूप हुशार मुलगी आहे. लहान मुलं सहसा उत्स्फूर्तपणे काम करतात. पण इथे तिला आपल्या भावना उघड करायच्या नव्हत्या. ती बोलत नाही, रडत नाही. हे खूप कठीण असतं. तिच्यासाठी एक अभिनयाचे प्रशिक्षक होते. मात्र, तिने अप्रतिम काम केलं हे कुणीही मान्य करेल".
इव्हानचं म्हणणं होतं, "लहान मुलांबरोबर काम करणं नेहमीच आव्हानात्मक असतं. तेही इतक्या संवेदनशील व इमोशनल सिनेमामध्ये. त्या प्रक्रियेमध्ये दिग्दर्शक म्हणून आपणही प्रगल्भ होतो. मिलेनाला एखादं दृश्य समजावताना तिला ते संदर्भ समजायचे नाहीत. काय खरं काय खोटं हे कळायचं नाही. आम्ही एखाद्या दृश्याविषयी चर्चा करायला बसायचो तेव्हा जाणीवपूर्वक मिलेनाला त्यातून वगळायचो. तिची अभिनयाची शिक्षिका मात्र तिथे असायची".
आपल्या देशातल्या एकूणच समाजव्यवस्थेविषयीही आपण भाष्य केलंय असंही ते म्हणाले. 'समाजामधलं आजीआजोबांचं महत्त्व मला जाणवलं. आमच्या देशात निवृत्तीनंतरही ते काम करत राहतात. त्यांनी आपल्या नातवंडांकडे लक्ष द्यावं, घरखर्चात सहभागी व्हावं अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते. या लोकांच्या स्वतःच्या अशा काही गरजा असतात, त्यांना होणारे आजार असतात; पण त्याकडे कुणाचं फारसं लक्ष जात नाही. किंवा कुणी लक्ष देत नाही.'
हा सिनेमा ग्रेट आहे का, या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल. पण तरी तो खूप काही देऊन जातो. स्वतः दिग्दर्शक एक सिनेमॅटोग्राफर असल्यामुळे सिनेमाच्या फ्रेम्स नितांत सुंदर आहेत हे तर झालंच; पण त्याहीपेक्षा दिग्दर्शकाने ही गोष्ट अगदी मनापासून सांगितलीये, कोणताही आव न आणता पेश केलीये. छोटंसं गाव, तिथली सर्वसामान्य माणसं, त्यांचे एकमेकांमधले नातेसंबंध, मैत्री, छोट्या छोट्या स्तरांवरही कायद्याचं पालन करण्याचा आग्रह, या सगळ्यात आपण भावनिकदृष्ट्या गुंतून जातो. त्यातला गोडवा हृदयाला स्पर्श करतो. प्रेक्षक म्हणून आपल्याला बांधून ठेवतो. आणि चांगल्या सिनेमाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करतो.
लेखक -दिग्दर्शक : इव्हान दारिएल ओत्रिज
पटकथा : इव्हान दारिएल ओत्रिज
छायाचित्रण : जेमी कॉस्टास
संकलन : विल्फ्रेडो मालडोनेंडो, इव्हान दारिएल ओत्रिज
कलाकार : होसे फेलिक्स गोमेझ, मिलेना सोलतेरो
'डाव्या हाताने जेवायचं नाही, उजवा हात वापर बघू,' हे वाक्य कितीतरी डावखुऱ्या माणसांच्या कानांवर पडलेलं असणार. अगदी गेल्या वीसपंचवीस वर्षांपर्यंत आपल्याकडे डाव्या हाताने जेवणं अयोग्य मानलं जायचं. आपल्याकडेच नाही, तैवानमध्येही हेच होतं. (बहुधा ही आशियाई संकल्पना असावी.) शी शिंग त्सूही त्याला अपवाद नव्हती. लहान असताना आजोबांकडून तिने डावा हात वापरल्याबद्दल बोलणी खाल्ली होती. उजव्या हाताने गोष्टी करण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती केली गेली होती. थोडी मोठी झाल्यावर तिने आपल्या आईकडे मन मोकळं केलं. आईचं उत्तर होतं, 'मीसुद्धा तर डावरीच होते. मलाही हे डावरेपण झाकून टाकायला लावलं होतं.'
शी शिंग त्सू मोठी झाली, तैवान सोडून न्यू यॉर्कला राहू लागली, सिनेमाची निर्माता बनली, पण मनात कुठेतरी बालपणी घडलेल्या गोष्टी दडून बसल्या होत्या. सिनेमा शिकत असताना ऑस्कर विजेता दिग्दर्शक शॉ बेकरशी तिची मैत्री झाली. त्याने दिग्दर्शित केलेल्या सिनेमांची निर्मिती शी शिंग त्सूने केली. (टेक आउट, टॅन्जेरिन, फ्लोरिडा प्रोजेक्ट). 2010 मध्ये तिने आपल्या लहानपणीच्या अनुभवावर एक कथा लिहिली. त्या सिनेमाचं दिग्दर्शन स्वतःच करायचं ठरवलं. पण तिला आणि बेकरला अर्थसाहाय्य मिळत नव्हतं. अखेर 2022 मध्ये सगळे प्रश्न सुटले आणि तिने आयफोनवर आपला नवीन सिनेमा दिग्दर्शित केला. तोच, 'लेफ्ट हँडेड गर्ल.'
'दे ताल पालो'मधल्या इरीनसारखीच इथेही एक लहान मुलगी आहे. पण इरीनच्या अगदी विरुद्ध स्वभावाची. अवखळ, निरागस, डोळ्यांत कुतूहल साठवलेली. हा अख्खा सिनेमा आपण आय-जिंग या पाच वर्षांच्या मुलीच्या दृष्टीकोनातून पाहतो. जबाबदारीच्या ओझ्याने वाकलेली शू-फेन आपल्या दोन मुलींना घेऊन ताइपेई शहरात नव्याने जम बसवण्यासाठी येते, इथून सिनेमाची सुरुवात होते. शू-फेनच्या चेहऱ्यावर अनिश्चितता आहे. तिची मोठी विशीतली मुलगी आय अॅन बंडखोर दिसतेय. आणि धाकटी पाच वर्षांची आय-जिंग उत्साहाने भोवतालच्या नव्या जगाकडे बघतेय. भाड्याने घेतलेल्या छोट्याशा घरात हे कुटुंब आपलं नवीन आयुष्य सुरू करतं. आय-जिंग नव्या शाळेत जाऊ लागते. आय-अॅन एका दुकानात नोकरी करू लागते. आणि शू-फेन ताइपेईच्या भल्या मोठ्या मार्केटमध्ये एका गाळ्यात एक छोटी टपरी सुरू करते.
शू-फेनची आई त्याच शहरात राहतेय. तिच्या दोन बहिणीही तिथेच आहेत. भाऊ दुसऱ्या शहरात आहे. शू-फेनला आईकडून अनेकदा पैशांची मदत घ्यावी लागते. ते देताना आई प्रत्येक वेळी कटकट करते. तिचा सगळा जीव मुलामध्ये अडकलाय. 'लग्न झालेल्या मुली म्हणजे ओतून टाकलेलं पाणी,' असं तिचं म्हणणं आहे. पैसे कमावण्यासाठी तिची काही रॅकेट्सही चालू आहेत. कामाच्या निमित्ताने शू-फेन काही वेळा आय-जिंगला आजी-आजोबांकडे ठेवून जाते. आजी आपल्या कामात मग्न आणि आजोबा पूर्ण बिनकामाचे. आपली नात सगळ्या गोष्टींसाठी डावा हात वापरतेय हे लक्षात येताच ते तिला झापतात, 'हा दुष्ट हात आहे. तो नाही वापरायचा.'
आणि मग सुरू होते आय-जिंग आणि या डाव्या हाताची झुंज. हा डावा हात तिच्या मनाविरुद्ध मार्केटमधल्या दुकानांमधून छोट्या छोट्या वस्तू उचलण्यासारख्या नको नको त्या गोष्टी करायला भाग पाडू लागतो. आपण चांगले आहोत, आपल्याला हे काहीच करायचं नाही असं तिचा मेंदू तिला सांगतो. आणि आवडलेल्या; पण न परवडणाऱ्या गोष्टी चोरायला डावा हात पुढे सरसावतो.
हे सगळं घडत असताना आपण शू-फेन आणि आय-अॅनच्या आयुष्यातही डोकावतो. या मायलेकींचा संघर्ष, महिन्याचा खर्च भागवताना शू-फेनची होणारी ओढाताण, लग्न झालेल्या आपल्या बॉसबरोबर आय-अॅनचं अफेअर असणं अशा अनेक घटनांमधून मार्ग काढत आय-जिंगची ही गोष्ट पुढे सरकते.
डाव्या हाताविषयी असलेल्या अंधश्रद्धेविषयी दिग्दर्शक बोलू पाहतेच; पण त्याचबरोबर ती आपल्या सगळ्यांमध्येच असलेल्या चांगल्या-वाइटाच्या द्वंद्वाविषयी सांगू पाहते. आणि हे सांगताना पार्श्वभूमीला असलेलं ताइपेई शहर रसरशीतपणे आपल्याला दाखवते. रात्री गजबजणाऱ्या मार्केटमध्ये येणारी माणसं, विविध रंगांनी नटलेले रस्ते, मोठमोठी दुकानं, उंचच उंच इमारती. एका बाजूला भावना नसलेलं जिवंत शहर आणि दुसऱ्या बाजूला श्वास कोंडलेली जिवंत माणसं.
गोष्ट लहान मुलीच्या दृष्टीकोनातून सांगितलेली असली तरी ती मोठ्यांची आहे. त्यांच्या समस्यांची आहे. त्यांच्या कुटुंबाची आहे. त्यातल्या हेव्यादाव्यांची आणि गुंतागुंतीची आहे. आय-जिंगमुळे त्यात एक निरागसता आलीये हे मात्र खरं. त्या व्यक्तिरेखेमुळे आणि ती साकारणाऱ्या सहा वर्षांच्या निना या अभिनेत्रीमुळेही.
'लेफ्ट हँडेड गर्ल' सध्या नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. नक्की बघा.
दिग्दर्शक : शी शिंग त्सू
लेखक : शी शिंग त्सू, शॉ बेकर
छायाचित्रण : को-चिन छन
संकलन : शॉ बेकर
कलाकार : निना ये, यानेल त्साई, शी-युआन मा, ब्रँडो हुआंग
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या