निरोप घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो, तेव्हा ह्या चारही कसोट्यांत आपण पुरेपूर उतरलो आहोत, असं मला वाटलं. आणि मग प्रत्येक महिन्यातून एक-दोन वेळा मी 'सत्याग्रही' कार्यालयात चक्कर टाकू लागलो. पुढच्या प्रत्येक भेटीतून नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत होत्या. आपण अधिक प्रगल्भहोत आहोत असं बाहेर पडताना वाटायचं. डळमळीत असलेल्या काही विचारांवर तिथली चर्चा ऐकल्यावर 'कन्फर्म' असा शिक्का मारत होतो. साऱ्या इझम्सची (कम्युनिझम, सोशॅलिझम, फॅसिझम इत्यादी) तोंडओळख होत गेली.
नोव्हेंबर 1989 मधील पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातील एक दिवस. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक छोटे गाव. भर दुपारची वेळ. गावातील कर्ती माणसं शेतात गेलेली. काही रिकामटेकडे लोक देवळाच्या चौथऱ्यावर चकाट्या पिटत बसलेले. पारावर म्हाताऱ्या माणसांचा पत्त्यांचा डाव रंगात आलेला. तर दहा-बारा वर्षांची काही मुलं विटी-दांडूच्या खेळात दंग झालेली. त्यांपैकी मी एक.
अशा वेळी एक जीप गावात घुसली. तिच्या दोन्ही बाजूला कापडी बॅनर आणि समोर झेंडे लावलेले. टपावरील भोंगा लक्ष वेधून घेत होता. जीप धुरळा उडवीत गावाला चक्कर मारत होती. ध्वनिक्षेपकावरून आवाज येत होता... "अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून, जनता दलाचे अधिकृत उमेदवार, डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करा... विजयी करा... विजयी करा... विजयी करा ! त्यांची खूण आहे... चक्र... चक्र... चक्र !"
जीपच्या मागच्या दरवाजात बसून एक तरुण पत्रकं वाटत होता. पण गावातली मोठी माणसं हात बांधून उभी होती. त्यांना पत्रकं घेण्यात रस नव्हता. आम्ही मुलं ती पत्रकं मिळविण्यासाठी जीपच्या मागे पळत होतो. पण आम्हाला पत्रकं देण्यात त्या कार्यकर्त्याला रस नव्हता. गावाला दोन चकरा मारून जीप गावाबाहेर निघाली तेव्हा त्या कार्यकर्त्याने पत्रकं, बिल्ले व झेंडे यांचा एकेक जुडगा आम्हा मुलांकडे फेकला. ते गोळा करण्यासाठी झुंबड उडाली. दोन-तीन मुलं आपटली. पोरांचा हा गलका, चावडीतील, पारावरील माणसं कौतुकानं पाहात होती.
माझ्या हातातही दोन कागद आले. दाढीधारी माणसाचा रुबाबदार फोटो, 'चक्र' हे निवडणूक चिन्ह आणि 'उमेदवार परिचय' असलेला एक कागद होता. दुसऱ्या कागदावरचा मजकूर माझ्या आकलनापलीकडचा होता... पण मी तो वाचून काढला.
रंगीबेरंगी पत्रकं, बिल्ले व झेंडे मिळालेली मुलं आनंदाने नाचत होती. ते पाहून, पत्त्याच्या डावावर बसलेला एक जण म्हणाला, "बघू या रे, काय हाये ते!" पत्ते पिसता-पिसता दुसरा म्हणाला, "पोरांनो, वाचा रे ! काय म्हणतोय ह्यो गडी?" पत्रक वाचून दाखवण्यासाठी पोरांची 'मी, मी, मी' सुरू झाली. त्यानंतर पत्त्याच्या डावासोबत रंगलेला आधीचा विषय संपला आणि 'इलेक्शन' हा नवा विषय सुरू झाला. एक म्हातारबुवा म्हणाले, "आरं, ह्यो गडी काम्हून धडपड करतोय ? त्या गडाक आन् फरांद्यापुढं ह्याचा निभाव लागतुय व्हय?"
"असं कसं म्हणताय नाना, ह्योबी लई मोठा मानूस हाय. पुन्या मंबईकडे लई नाव झालंय याचं. मानूस नेकीचा हाय!"
"ते सारं खरं हाय, पन दुनिया खऱ्याची राह्यली नाय!"
"सांगता येत न्हाई, नाना. आजकालची जनता भल्या भल्याला पानी पाजीत असती. त्या दोघांच्या टकरीत, ह्यो निवडून येईन!"
"शिवा, तू येडा का खुळा ? याचं डिपाजीट वाचलं तरी लई झालं! अशी मानसं निवडून यायला पाईजेत हे खरं. पण लोकांचं काय, जिकडं गर्दी तिकडंच पळतेत !"
दुसऱ्या एकाने मध्येच प्रश्न केला, "शिवा, आपल्या गावातून किती मतं मिळतेन बरं याला?"
इतका वेळ शांत असलेला एक बेरकी माणूस म्हणाला, "एक मत तरी हमखास मिळंन याला!"
"कोनाचं ? तुपलं काय ?"
"छ्या... छ्या! आपुन थोडंच मत वाया घालवाया बसलोय. हक्काचं मत मिळंन... कॉम्रेड का.वा.चं!"
त्याच्या ह्या नर्मविनोदावर थोडी खसखस पिकली. आमच्या गावातून केवळ कॉम्रेड का.वा. त्या वेळी सप्तर्षीचा प्रचार करीत होते. त्यांची अशी ख्याती होती की, 'निवडून येण्याची अजिबात शक्यता नसलेल्या उमेदवाराचा ते प्रचार करतात'.
त्याच दिवशी संध्याकाळी आमच्या घरासमोरच्या कट्ट्यावर कॉम्रेड का. वा. बोलत होते. मी, तो संवाद ऐकत होतो.
'समाजवादी विचारांचा माणूस आहे. तरुणांची मोठी संघटना बांधली होती. आंदोलने करून अनेक वेळा तुरूंगात जाऊन आलाय. एकदा आमदारही होता.' असं बरंच काही सांगत होते.
दिवसभरातले ते दोन संवाद आणि ती पत्रकं यामुळे कुमार सप्तर्षी हे नाव लक्षात राहिलं.
त्या निवडणुकीचा निकाल नाना म्हणत होते तसाच लागला. लोक उपहासानं विचारायचे, 'कॉम्रेड, काय झालं तुमच्या उमेदवाराचं?' कॉम्रेड का. वा. म्हणायचे, आमच्या उमेदवाराला निवडणूक जिंकण्यात यश आलं नाही.'
'सप्तर्षीचा पराभव झाला' असे ते म्हणत नसत. ही 'भाषा' त्या वेळी अनेकांप्रमाणे मलाही वेडेपणाची वाटत होती. (ते विधान समर्पक असल्याचं ध्यानी यायला काही वर्षे लोटावी लागली.)
निवडणूक संपल्यानंतरही काही दिवस आमच्या व आसपासच्या गावांतील भिंतींवर रंगवलेली 'डॉ. कुमार सप्तर्षी यांनाच विजयी करा' ही पोस्टर्स नजरेस पडायची. काहीच कारण नसताना त्या नावाबद्दल आकर्षण वाटायचं. कदाचित ते नाव 'कॅची' असावं म्हणून ! कारण तशा प्रकारचं नाव आणि आडनाव आमच्या सभोवताली कोणाचंच नव्हतं म्हणून, पण नावावरूनच हा माणूस मोठा असेल असं वाटायचं.
त्यानंतर तीन-चार वर्षांनी त्या कॉम्रेडच्या घरी 'सत्याग्रही' नावाचं मासिक मला दिसलं. वाचण्यासाठी त्यातील लेख आवाक्याबाहेरचे वाटत होते. पण एका लेखाने मात्र लक्ष वेधून घेतलं 'येरवडा विद्यापीठातील दिवसः कुमार सप्तर्षी.' हाच तो माणूस जो आपल्याकडे निवडणुकीला उभा होता, हे पटकन् ध्यानी आलं. म्हणून तो लेख वाचला. शिवाय लेखाचं शीर्षकही थोडं वेगळं वाटलं. कारण, तोपर्यंत येरवड्याला इस्पितळ आणि कैद्यांसाठी तुरुंग आहे एवढीच माहिती होती. वेड्यांना किंवा गुन्हेगारांना भरती केलं जातं ते ठिकाण म्हणजे 'येरवडा', हा परिचय मनात इतका पक्का होता की, 'येरवड्याला पाठवणे' हा वाक्प्रचारच रूढ झाला होता. त्या पार्श्वभूमीवर 'येरवडा विद्यापीठ' हा शब्दप्रयोग अनोखा वाटत होता.
त्यानंतरही अधून-मधून ते मासिक मला तिथे पाहायला मिळायचं. मग मिळतील तसे लेख वाचले. वाचलेले सगळेच समजत होते असे नाही. पण वाचावेसे वाटायचे. कारण तुरुंगातील जीवन आणि गमती-जमती असा काही मनोरंजक भाग त्या लेखमालेत होता.
दरम्यान हायस्कूलसाठी अहमदनगर शहरात आलो. तेव्हा कुमार सप्तर्षी हे नाव वृत्तपत्रांतून दिसू लागलं. मी नुकताच वृत्तपत्रं वाचायला लागलो होतो. त्या वेळी दै. 'लोकसत्ता'तून 'राम राम पावणं' नावाचं साप्ताहिक सदर सप्तर्षी लिहीत असत. काही लोक तर मंगळवारचा 'लोकसत्ता' केवळ 'राम राम पावणं' वाचण्यासाठी घेत असत. (मंगळवार हा बाजारचा दिवस असल्याने, आसपासच्या गावांतील लोक नगर शहरात येत असत, म्हणून त्या दिवशी हे सदर प्रसिद्ध होत असे.) त्यात, राजकारण व समाजकारणाचे प्रचलित विषय हाताळले जात होते. तत्कालीन परिस्थितीवर मार्मिक भाष्य केले जात असे. पुढाऱ्यांना टिचक्या, टपल्या मारल्या जात. पारावरच्या गप्पांच्या स्वरूपातील ते लेख खुमासदार होते. माझी राजकारणाची जाण त्या वेळी थोडी फार वाढली ती त्या सदरामुळेच !
पारावरच्या गप्पांतच सप्तर्षीचं नाव पहिल्यांदा ऐकल्यामुळे मला त्या सदराबद्दल विशेष आपुलकी वाटत होती. अस्सल ग्रामीण बोलीत ('नगरी' म्हणा हवे तर) लिहिलेलं ते 'संवाद' खूपच परिचयाचे वाटत होते. “ब्राह्मण माणूस, पण अस्सल ग्रामीण भाषेत लिहितोय" असे कौतुक काही वडीलधाऱ्यांकडून ऐकायला मिळे, तेव्हा सप्तर्षांबद्दलचा आदर वाढत होता. अनेक साहित्यिकांचा असा (गैर) समज असतो की, 'अशुद्ध' मराठी लिहिणं म्हणजे 'ग्रामीण' भाषा लिहिणं ! फसतात बिचारे. सप्तर्षीचं मात्र असं झालं नाही. त्यांची भाषा तर खेडुताला आपली वाटत होतीच, पण त्यातला आशयही !
त्याच काळात कुठल्या तरी एका लेखात, सप्तर्षीनी आपल्या ब्राह्मण्याचा कसा त्याग केला, याची माहिती मिळाली. मुलाचे नाव शाळेत घालताना कसा संघर्ष करावा लागला तेही त्यात आले होते. शाळेच्या दाखल्यावर, मुलाचे नाव 'कबीर उमा कुमार', धर्म 'मानवता' व जात 'भारतीय' अशा नोंदी केल्या होत्या. मुलाच्या आडनावाला रजा दिली होती. मुलाचा/मुलीचा संबंध आईशी जास्त जवळचा, म्हणून अगोदर आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे. मुलाचे नाव कबीर मुद्दाम ठेवले असावे (संत कबीराला हिंदू व मुस्लीम या दोन्ही संप्रदायातले लोक आपला मानतात म्हणून.) शेजारच्या आजोबांना हे सारं मोठ्या उत्साहाने सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, "असा अभिनव प्रयोग करणारा माणूस 'दिलदार' असला पाहिजे किंवा 'विक्षिप्त' असला पाहिजे!" पण, असला विक्षिप्तपणा करणारी माणसं मला आपली वाटू लागली होती.
बारावीनंतर कॉलेजसाठी पुण्यात आलो तेव्हा अटलबिहारी वाजपेयी, सचिन तेंडुलकर, टी. एन. शेषन प्रसिद्धीच्या सर्वोच्च शिखरावर होते. विरोधी पक्षनेते असलेले वाजपेयी देशाचे आवडते नेते होते. त्या वेळच्या अनेक तरुण मुलांप्रमाणे मीसुद्धा वाजपेयींचा (भाजपचा नाही) 'फॅन' झालो होतो. त्यांच्याविषयी 'राईट पर्सन इन राँग पार्टी' असे त्या वेळी सर्रास बोलले जात असे. नेमक्या त्याच वेळी 'लोकसत्ता'च्या रविवार पुरवणीत सप्तर्षीनी लिहिलेला दणकेबाज लेख आला 'तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म ?'
त्या लेखामुळे वाजपेयींबद्दलचे 'प्रेम' कमी झाले नाही, पण सप्तर्षीबद्दलचे 'आकर्षण' वाढले. त्यानंतर त्यांचे हाती लागतील ते लेख वाचू लागलो. एका दिवाळी अंकातून 'वाडा संस्कृती' हा लेख वाचला. त्यातल्या एका परिच्छेदाला मी अधोरेखित केलं होतं...
"मी कधी काळी नवा राजकीय पक्ष काढला, तर संघटना बांधणीचा कार्यक्रम म्हणून दर पौर्णिमेला आपापल्या घरून जेवण आणून अंगतपंगत करणं सक्तीचं करीन. त्याला पक्षनिष्ठेची कसोटी मानीन. दुसऱ्याच्य ताटातलं खावंसं वाटत नाही अशा माणसाला पक्षातच घेणार नाही!"
त्याच दरम्यान अनिल अवचटांचे 'स्वतःविषयी' पुस्तक वाचताना, कुमार सप्तर्षीचा उल्लेख अनेक वेळा आला होता. आणीबाणीचा कालखंड व त्यानंतरच्या पाव शतकातील राजकीय, सामाजिक चळवळींचा अभ्यास करताना अनेक संदर्भ 'युवक क्रांती दला'शी निगडित होते. माझ्या त्या वेळच्या आवडत्या लेखकांपैकी एक असलेले डॉ.पु.ग. सहस्रबुद्धे युक्रांदचे पहिले अध्यक्ष होते, हे कळल्यावर युक्रांद जाणून घेण्याची इच्छा अधिक तीव्र झाली. नंतर लवकरच, 'येरवडा विद्यापीठातील दिवस' ह्या लेखमालेचे संकलन असलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला हजर राहण्याचा योग आला. सभागृहाला सुन्न करून सोडणाऱ्या जॉर्ज फर्नांडिसांच्या भाषणानंतर 'सप्तर्षी' आणि 'युक्रांद' समजून घेतल्याशिवाय 1960 ते 1980 ह्या कालखंडातील महाराष्ट्राचे नीट आकलन होणार नाही, याची खात्री पटली.
'येरवडा विद्यापीठातील दिवस' वाचताना मला नॉस्टॅल्जियाचा अनुभव येत होता. आपण काही वर्षांपूर्वी 'सत्याग्रही विचारधारा'तून वाचलेले लेख कोणते याचा शोध घेत होतो. आता मात्र बहुतेक सर्व संदर्भ माहीत असल्याने त्यांची खुमारी वेगळीच होती. ते पुस्तक वाचताना अनेक वेळा अंगावर रोमांच उभे राहात. कोणाही सहृदय माणसाचे डोळे पाणावतील असेही काही प्रसंग त्यात होते. चळवळी, आंदोलने, तुरुंगवास, कौटुंबिक कलह, मित्रांशी संघर्ष, तुटणारे भावनिक बंध हे सारं दाखवणारा चित्रपट डोळ्यांसमोरून सरकत जात होता. 'संकल्प' आणि 'बिहारचा दुष्काळ माझा गुरू' हे सप्तर्षीच्या 'यात्री' पुस्तकातील लेख तर हृदयद्रावक चित्रणाचे उत्तम नमुने आहेत. व्यक्तिगत जीवनातील कसोटीचे क्षण आणि सामाजिक जीवनातील वादळांना सामोरे जाताना हा माणूस ज्या पद्धतीने वागला ते थक्क करणारं होतं.
कार्यकर्त्याचे 'जीवनचरित्र' वाचताना आक्रस्ताळेपणाचा अनुभव चाखावा लागतो. पण येथे तसा प्रकार नव्हता. भाषेची सभ्यता सर्वत्र पाळली होती. तरीही ती भाषा 'टोकदार' होती. क्वचित प्रसंगी भल्या भल्यांवर 'आसूड' ओढणारी होती. विशेष म्हणजे त्या पुस्तकातील कार्यकर्ता अभ्यासू होता. त्याची निरीक्षणशक्ती जबरदस्त होती. एकाच घटनेकडे अनेक बाजूंनी पाहण्याची 'दृष्टी' त्याच्याकडे होती. यातले अनेक लेख लिहिताना सप्तर्षीना भयानक क्लेश झाले असतील. अगदी अलीकडे 'सत्याग्रही'मध्ये प्रसिद्ध झालेला अनिल गोटे यांच्यावरील लेखही याचे उदाहरण म्हणून देता येईल. समाजवाद्यांसकट सध्याच्या सर्वच राजकीय पक्षांचे विश्लेषण करणारा 'वरुनी चिंतन आतुनी संभ्रम' सारखा लेख 'विचार कसा करावा' याची झलक दाखवतो.
पाच-सहा वर्षे पुण्यातील अनेक सभा-समारंभांतून सप्तर्षीना पाहात होतो, ऐकत होतो. भाषणांतून तर हा माणूस फारच लोभस वाटत होता. दिलखुलासपणे श्रोत्यांशी संवाद साधण्याची त्याची शैली वेधक होती.
सप्तर्षीना भेटायची इच्छा होत होती. पण एवढ्या मोठ्या माणसाशी आपण काय बोलणार? अशी माणसं ऐकण्यातच मौज असते. म्हणून भेटणे टाळत होतो. नंतर 'युवक क्रांती दलाचे' पुनरुज्जीवन झाले. त्यानंतर 'युवक शांती दलाची' स्थापना झाली. तेव्हा मात्र ह्या माणसाकडून पुस्तकांच्या जगाबाहेरील अनेक गोष्टी कळतील याची प्रकर्षाने जाणीव झाली. त्यासाठी का होईना ह्या माणसाला भेटलं पाहिजे असं वाटू लागलं.
तशी संधी लवकरच आली. ज्या कॉम्रेड का.वा. सरांकडून सप्तर्षांबद्दल मला पहिल्यांदा माहिती मिळाली. ज्यांच्या घरी पहिल्यांदा 'सत्याग्रही विचारधारा' मासिक वाचायला मिळालं. त्याच का.वा. सरांच्या मुलाला सप्तर्षीना भेटायची इच्छा होती. पण, त्याची अडचण वेगळीच होती. ऐन तारुण्यातील जडणघडणीची सहा वर्षे त्याचे वास्तव्य रशियात होते, त्यामुळे त्याचा इथल्या सामाजिक, राजकीय वातावरणाशी संपर्क राहिला नव्हता. पण, संघटित होऊन गावासाठी काही तरी करावं, अशी त्याची मनापासून इच्छा होती. त्यासाठी काही मोठ्या लोकांचं मार्गदर्शन घ्यावं असं त्याला वाटत होतं. त्याच्याशी बोलताना सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांबरोबर कुमार सप्तर्षीचाही उल्लेख मी करायचो. त्यामुळे, 'आपण सप्तर्षीना भेटायला जाऊ' असा आग्रह त्याने धरला.'
आणि मग एका कार्यक्रमाला आम्ही दोघेही गेलो. कार्यक्रम संपल्यावर सप्तर्षी यांच्या समोर जाऊन मी म्हणालो, "सर, पाथर्डीच्या कॉम्रेड का.वा. सरांना तुम्ही ओळखता ना?"
"अरे, ओळखतो म्हणजे काय, तो माझा चांगला मित्र आहे!"
"हे त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव, प्रल्हाद."
सप्तर्षीचा चेहरा खुलला, कोणत्याही नव्या तरुणाची ओळख करून घेताना तसा तो खुलतोच ! त्यांनी प्रल्हादची विचारपूस केली आणि मग त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, "तू सहा-सात वर्षे पुण्यात आहेस आणि 'काका'ला भेटायला आला नाहीस ? आता कारणं सांगू नकोस, उद्या संध्याकाळी 'सत्याग्रही'च्या ऑफिसवर ये!"
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही दोघे सत्याग्रहीच्या ऑफिसवर गेलो. मी तर रोमांचित झालो होतो. मोठ्या माणसांना जवळून पाहणं आणि ऐकणं हा एक वेगळाच अनुभव असतो. आपण 'उत्तम श्रोता' असल्याचा मला सार्थ अभिमान ('गर्व' म्हणा पाहिजे तर) असल्याने, शांत बसून फक्त ऐकण्याचे ठरवले. गरज पडलीच तर एखादा प्रश्न विचारायचा. तोसुद्धा त्यांना अडविण्यासाठी नाही तर त्यांची भूमिका अधिक स्पष्ट करण्यासाठी किंवा अधिक माहिती मिळविण्यासाठी !
आत प्रवेश केल्याबरोबर, एका हॉलमध्ये भिंतीला टेकून दरवाजाकडे तोंड करून वेताच्या खुर्चीवर बसलेले सप्तर्षी दिसले. उंच मूर्ती, उभट चेहरा, राखलेली दाढी (वाढविलेली नाही), पांढरे स्वच्छ खादीचे कपडे असे आकर्षक व्यक्तिमत्त्व. समोर अगदी छोटासा टेबल, त्यावर डायरी, चहाचा कप, फोन आणि 'कुमार सप्तर्षी' अशी नेम प्लेट. डाव्या बाजूला सोफा, समोर आणि उजव्या बाजूला वेताच्या खुर्च्छा. सप्तर्षी पाठ टेकून बसतात त्या भिंतीवर 'सत्याग्रही विचारधारा' मासिकाचा फलक लावलेला. त्यावर लिहिलेली प्रतिज्ञा लक्ष वेधून घेणारी होती :
सच्चेपणाला माझा पाठिंबा असतो.
लुच्चेपणाला माझा विरोध असतो.
प्रामाणिकपणाचे मी कौतुक करतो.
ढोंगीपणाचा मी निषेध करतो.
कायद्याचा आदर करणे मला आवडते.
भ्रष्टाचाराचे समर्थन मला शिसारी आणते.
राजकारणाविषयी जागरूक राहणे मी कर्तव्य मानतो.
राजकारणाविषयी उदासीन राहणे मला घातक वाटते.
आशावादी असणे आरोग्याचे लक्षण.
निराशावाद हे आजारीपण.
जातीयवाद समाजात फूट पाडतो.
धर्मांधता देशाचे तुकडे करते.
विचारांच्या डबक्याला दुर्गंधी असते.
विचारांचे उन्मुक्त झरे खळखळ वाहात राहिले तर मला प्रसन्न वाटते.
दुसऱ्यांच्या वेदनेने मला पीडा होते.
असा मी असा मी !
भेटायला येणाऱ्यांच्या मनात आदर आणि दबदबा निर्माण करण्याचे अर्धे काम ही प्रतिज्ञा करीत असावी.
आम्ही गेलो तेव्हा पाच-सहा जण त्यांच्या समोर बसले होते. एक जण बायकोशी असलेला वाद सांगत होता, दुसरा आपल्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी सांगत होता. दोन कार्यकर्ते पुढील अधिवेशनाच्या तयारीबद्दल माहिती देत होते. दोघे जण निव्वळ गप्पा ऐकण्यासाठी थांबले होते. एकेक विषय घेऊन डॉक्टर बोलत होते.
मधूनच फोन येत होते. कोणी 'सत्याग्रही'तील संपादकीय लेखाबद्दल अभिनंदन करतोय, कोणी भेटीची वेळ मागतोय, तर कोणी कार्यक्रमाचे आमंत्रण देतोय. फोनवरचे संभाषण मात्र थोडक्यात उरकले जात होते. फोन ठेवल्यावर मूळ विषयावरचे संभाषण पुढे चालू होत होते. सत्याग्रहीचा एक सहकारी आठवण करून द्यायला येतो, "सर, संपादकीय लेख आजच व्हायला पाहिजे. किती पानं राखून ठेवू ?"
"तुला किती पानं पाहिजेत ते सांग!"
हे चालू असताना सोलापूरला झालेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या गमती जमती सांगत होते. 'द्वेष आणि देश एकत्र नांदू शकत नाहीत' ह्या वाक्यावर किती टाळ्या पडल्या याचं रंगतदार वर्णन करीत होते. तेवढ्यात, गुजरातमधील दंगलग्रस्त भागाला भेट देऊन आलेले अन्वर राजन प्रवेश करतात. त्यांची विचारपूस करून पुन्हा पहिला विषय. थोडा वेळ गेला नाही तोच अभय पडिले हा कार्यकर्ता येतो, "डॉक्टर, अधिवेशनासाठीच्या पोस्टरवर 'घोषवाक्य' काय टाकायचं?"
उपस्थित असलेल्यांकडे विचारणा होते. वेगवेगळ्या कल्पना सुचवल्या जातात. नंतर डॉक्टर म्हणतात, "चल, दे टाकून : द्वेष आणि देश एकत्र नांदू शकत नाहीत!"
अधून-मधून प्रल्हादशी बोलतात. 'काय चाललंय आमच्या मित्राचं?' असं म्हणून कॉम्रेडची विचारपूस. नंतर कम्युनिस्ट लोकांच्या त्यागाबद्दल, सच्चेपणाबद्दल सांगतात. पण 'वर्गलढा' ही संकल्पना कशी अपूर्ण आहे हेही स्पष्ट करतात. समाजवाद्यांच्या बौद्धिक क्षमतांबद्दल आदराने बोलतात, पण 'प्रबोधना'च्या मर्यादा दाखवून देतात. संघर्षाचे महत्त्व अधोरेखित करतात. भारताचे प्रश्न समजावून घेताना जात व धर्म हे दोन घटक दुर्लक्षून चालणार नाहीत, हे बजावून सांगतात.
"आता हेच पाहा ना, ब्राह्मणांची नावं श्रीधर, श्रीपाद, पुरुषोत्तम अशी देवांशी संबंधित. क्षत्रियांची नावं विजयसिंह, रणजित, विक्रमादित्य अशी पराक्रमाचे वर्णन करणारी. वैश्यांच्या नावांतून श्रीमंतीचे प्रदर्शन माणिकचंद, मोतीराम, हिरालाल. आणि शूद्रांची नावं मात्र केरू, कचरू, धोंडू, दगडू, लहानू, बारकू अशी न्यूनत्व दर्शविणारी."
सप्तर्षीनी केलेली ही नावांची मीमांसा सर्वांनाच हसवून गेली. पुढे ते म्हणाले, "ब्राह्मणांना वाटतं, आपण कधी चुकत नाही. आपण सोडून इतरांनी सुधारावं असं त्यांना वाटत असतं. म्हणून ब्राह्मण असलेल्या नवीन कार्यकत्याला मी होमवर्क देत असतो, 'माझं चुकलं' म्हणण्याचा! मराठा समाज पावर आणि वावर यातच रमत असतो. बौद्धिक चर्चा सुरू झाली की, मराठा असलेला कार्यकर्ता डोळे झाकायला लागतो. पण 'खविसं'चं काय चाललंय असं म्हटलं की कान टवकारतो (खविसं म्हणजे खरेदी विक्री संघ)."
वेगवेगळ्या जातींची वैशिष्ट्ये अशी गंमतीदार पद्धतीने सांगितल्यावर सप्तर्षी म्हणाले, "कोणताही माणूस आपला आहे की नाही हे ओळखण्यासाठी मी चार कसोट्या लावतो. त्याला 'लिटमस पेपर टेस्ट' म्हणतो.
1. निःशंक मनाने गांधींना राष्ट्रपिता मानता की नाही ?
2. आणीबाणी ही ऐतिहासिक घोडचूक होती की नाही ?
3. बाबरी मशीद पाडली हे कृत्य देशविघातक होते असे मानता का ?
4. अणुबाँब शांततेला मारक आहेत असे वाटते का?
या चारही टेस्ट 'पॉझिटीव्ह' आल्या तर बाकी कितीही वैचारिक मतभेद असले तरी तो माणूस आपलाच आहे असे मी मानतो."
निरोप घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो, तेव्हा ह्या चारही कसोट्यांत आपण पुरेपूर उतरलो आहोत, असं मला वाटलं. आणि मग प्रत्येक महिन्यातून एक-दोन वेळा मी 'सत्याग्रही' कार्यालयात चक्कर टाकू लागलो.
पुढच्या प्रत्येक भेटीतून नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत होत्या. आपण अधिक प्रगल्भ होत आहोत असं बाहेर पडताना वाटायचं. डळमळीत असलेल्या काही विचारांवर तिथली चर्चा ऐकल्यावर 'कन्फर्म' असा शिक्का मारत होतो. साऱ्या इझम्सची (कम्युनिझम, सोशॅलिझम, फॅसिझम इत्यादी) तोंडओळख होत गेली. जयप्रकाश, एस. एम., अण्णासाहेब सहस्रबुद्धे यांच्याबद्दल बरीच रोचक माहिती मिळत गेली. प्रचलित राजकारणावर, घडणाऱ्या घटनांवर त्यांचं 'भाष्य' विचार करायला लावणारं होतं.
तिथं बसताना मनावर कसलेही दडपण नसायचे. केव्हाही या, पाहिजे तोवर बसा, जावेसे वाटेल तर जा. असा तो सारा खुशीचा मामला असायचा. प्रत्येक तासाला मावशी चहा आणून देतात. जास्त वेळ बसल्यावर चहाही जास्त वेळा घ्यावा लागतो. एखादा कार्यकर्ता चहाला नकार देतो तेव्हा डॉक्टर म्हणतात, "घे रे! काही होत नाही. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षांपर्यंत मी चहा घेत नव्हतो. तुरुंगात असताना भाई वैद्यांनी सांगितलं, 'राजकारणात काम करायचं असेल तर सुरुवात चहापासून करावी लागते'."
स्त्रियांच्या संबंधात त्यांचा दृष्टीकोन उदार असतो. विद्यार्थ्यांना सांगतात, "स्त्रियांना सुरक्षितता हवी असते. घर बायकोच्या नावावर करा, कुटुंबातले अर्धे वाद निकालात निघतील."
"मुलींना शिकवणारे आई-वडील प्रेमळ असतात, त्यांच्यात कितीही दोष असले तरी मी ते क्षम्य मानतो !" हा त्यांचा ठोकताळाही मला आवडतो.
कार्यकर्त्यांशी बोलताना अहिंसक आंदोलनाच्या गांधीप्रणीत पाच अवस्था ते नेहमी सांगतात : उदासीनता, उपहास, निंदा, दडपशाही आणि यश.
एका चर्चेच्या ओघात त्यांनी सांगितलेले तीन मुद्दे मला सर्वाधिक जवळचे वाटले.
1. राजकीय भूमिका 'लेफ्ट टू द सेंटर'
2. 'प्रामाणिकपणा' हीच सर्वश्रेष्ठ दीर्घकालीन रणनीती असते.
3. 'प्रोसेस'ने होत नाही ते टिकाऊ नसते.
एका भेटीच्या वेळी, माझ्या सोबत हॉस्टेलवर राहणारा मित्र देविदासला घेऊन गेलो. आंदोलने, चळवळी यात विशेष रस नसलेला हा मित्र सप्तर्षीच्या पहिल्याच भेटीत खुलला. नवीन काही तरी सापडल्याचा आनंद त्याला झाला दुसऱ्या दिवशी 'येरवडा विद्यापीठातील दिवस' त्याने माझ्याकडून चाळायला म्हणून घेतले. आणि एक पान, आणखी एक पान, असे करत तो त्या पुस्तकात गुंतत गेला. पुढचे दोन दिवस तो ते पुस्तक वाचत होता, निवडक परिच्छेद येणाऱ्या-जाणाऱ्या मित्रांना वाचून दाखवत होता. वाचत असताना अनेक ठिकाणी हसत होता, हळहळत होता, आश्चर्य व्यक्त करत होता. चारशे पानांचे ते पुस्तक त्याने हातावेगळे केले, तेव्हा तो सप्तर्षीच्या प्रेमात पडला होता. त्यानंतर सत्याग्रहीच्या कार्यालयात त्याच्या चकरा वाढल्या. 'हा माणूसच अफाट आहे' हे वाक्य, प्रत्येक भेटीचा वृत्तान्त सांगताना मला तो ऐकवत होता.
त्यानंतर काही महिन्यांनी युक्रांदच्या कार्यकर्त्यांचे दोन दिवसीय शिबिर साताऱ्याला पार पडले, तेव्हा देविदास आणि मी गेलो होतो. जावेद अख्तर उद्घाटनाला येणार होते. पण अद्याप पाहोचले नव्हते. दुपारची वेळ होती. प्रवास करून आल्याने कार्यकर्ते थकले होते. जेवणं झाल्यामुळे सुस्तावलेले होते. बाहेर पाऊस पडत होता आणि ध्वनिक्षेपकाचाही आवाज नीट येत नव्हता. असे मरगळलेले वातावरण असल्याने तरुणांकडून व्यासपीठावरून दिल्या जाणाऱ्या घोषणांना प्रतिसाद मिळत नव्हता. तेवढ्यात, बाह्या मागे सावरत, हसरा चेहरा घेऊन डॉ. सप्तर्षी समोर आले. ध्वनिक्षेपक हातात घेऊन गोड व स्नेहपूर्ण आवाजात त्यांनी छोटी प्रस्तावना केली. 'हल्ला बोल' म्हणजे खरोखर हल्ला करायचा नसून, निषेध व्यक्त करण्याचा तो एक मार्ग आहे, अशा आशयाची ती प्रस्तावना होती.
मग थोडंसं पुढे झुकून, हळू आवाजात डॉक्टर म्हणाले... "हल्ला बोल."
श्रोत्यांतून हलकासा आवाज आला, "हल्ला बोल."
मग हातवारे करत समोर बसलेल्या मुला-मुलींना सरळ आवाहन करू लागले...
"बोल गं ताई । हल्ला बोल
बोल गं राधा। हल्ला बोल
बोल रे राजू । हल्ला बोल
बोल युवका । हल्ला बोल
अन्याय पर । हल्ला बोल
भष्टाचार पर । हल्ला बोल
भांडवलशाही । हल्ला बोल
शिक्षणसम्राट । हल्ला बोल
जातियवाद । हल्ला बोल
धर्मांध शक्ती । हल्ला बोल
जरा जोर से । हल्ला बोल
और जोर से । हल्ला बोल
और भी जोर से। हल्ला बोल
समोर बसलेल्या मुला-मुलींना, ताई, राधा, राजू असे संबोधन वापरून, हाताने खुणावून सरळ आवाहन केल्यावर, अवघ्या दोन-तीन मिनिटांत सभागृहातील वातावरण चैतन्यमय झाले. सर्व जण एका लयबद्ध सुरात 'हल्ला बोल' म्हणत होते. 'और भी जोर से' असे आवाहन केल्यावर कार्यकर्त्यांनी मुठी आवळून हात हवेत उंचावत 'हल्ला बोल' म्हणताना सभागृह दणाणून सोडले.
सप्तर्षीनी ध्वनिक्षेपक खाली ठेवला तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कटकडाट झाला. सारी मरगळ कोठल्या कोठे पळून गेली. बासष्ट वर्षांच्या तरुणाने, पंचविशी-तिशीतील वृद्धांच्यात 'तारुण्य' ओतले होते.
'घोषणा कर्णकर्कश आवाजात द्यायची असते' असा (गैर) समज सर्वच पक्ष व संघटनांनी करून घेतला आहे. सप्तर्षांनी दिलेली ही घोषणा कर्णमधुर तर होतीच, पण कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास जागृत करणारी होती.
तो तीन मिनिटांचा प्रकार 'जादू' सारखा होता. गर्दीचे मानसशास्त्र तर त्यात होतेच, पण नेत्याचे 'नैतिक बल' अधिक होते. गेली चाळीस वर्षे ह्या माणसाने जे काही केलं, त्याचा तो 'प्रतिध्वनी' होता. त्यांनी केलेली पूर्वीची आंदोलने किती रोमांचकारी झाली असतील, याची झलक त्या क्षणी पाहायला मिळाली !
कुमार सप्तर्षी यांच्या 'येरवडा विद्यापीठातील दिवस' या पुस्तकाला महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका यांचा अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार डिसेंबर 2003 मध्ये जाहीर झाला, त्या निमित्ताने लिहिलेला हा लेख जानेवारी 2004 मध्ये 'पडघम' या मासिकात प्रसिद्ध झाला होता. ते मासिक तेव्हा नुकतेच सुरू झाले होते, प्रामुख्याने तरुणाईने लिहिलेले लेख त्यात प्रसिद्ध होत होते. राजा कांदळकर हा तरुण त्या मासिकाचा संपादक होता, त्याच्या सांगण्यावरून हा लेख लिहिला होता. कारण त्यापूर्वी राजा आणि प्रस्तुत लेखक अनेक वेळा 'सत्याग्रही' च्या कार्यालयात कुमार सप्तर्षी यांच्या भेटीला जात असत. हा लेख लिहिताना 1989 ते 2003 हा दीड दशकाचा काळ समोर होता. हा लेख लिहिला तेव्हा अगदीच नवखा असलेला लेखक त्यानंतर दहा वर्षांनी साधनाचा संपादक झाला.
22 वर्षांपूर्वीचा हा लेख इथे पुनर्मुद्रित करण्याचे कारण, 18 जुलै 2026 रोजी कुमार सप्तर्षी यांचे वयाच्या 85 व्या वर्षी, पुणे येथे निधन झाले. मागील आठवड्याच्या साधना अंकात 'स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील युवकांचा सर्वांत मोठा नेता' हे संपादकीय प्रसिद्ध झाले आहे. त्या लेखाला पूरक म्हणून हा लेख वाचता येईल. कुमार सप्तर्षी यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !
- संपादक
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
Milind Nikalje- 07 Aug 2026
तरुण भारताचे विद्यापीठ म्हणजेच कुमार सप्तश्री
save