14 जानेवारी 1896 ते 2 ऑक्टोबर 1982 असे 86 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या चिंतामणराव द्वारकानाथ उर्फ सी.डी. देशमुख यांची ठळक ओळख भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर आणि 1950 ते 56 या काळात भारताचे अर्थमंत्री अशी आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या मुद्द्यावरून त्यांनी अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. ते दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्षही राहिले. 'द कोर्स ऑफ माय लाईफ' हे त्यांचे आत्मकथनात्मक पुस्तक 1976 मध्ये प्रकाशित झाले. त्याचा मराठी अनुवाद 1977 मध्ये ओरिएंट लाँगमन प्रकाशनाकडून "माझा जीवन प्रवाह" या नावाने आले, त्याचा अनुवाद वि.वा. पत्की यांनी केला. पन्नास वर्षांपूर्वी प्रकाशित झालेले ते पुस्तक दीर्घकाळ आउट ऑफ प्रिंट होते, त्याची नवी आवृत्ती साधना प्रकाशनाकडून फेब्रुवारी 2026 मध्ये येत आहे. त्या पुस्तकातील एक प्रकरण (अंशतः संपादित करून) येथे देत आहोत.
1907 च्या अखेरीस माध्यमिक शाळेतले माझे शिक्षण संपले आणि रोह्याला हायस्कूल नसल्यामुळे तात्यांनी मला पुढील शालेय शिक्षणासाठी मुंबईला पाठविले. अण्णामामा (शंकर महागावकर) आणि त्यांचा पुतण्या द्वारकानाथ असे टोपीवाल्यांच्या चाळीतील एका खोलीत राहत असत. लॅमिंग्टन रोडवर सरस्वती, लक्ष्मी, गंगा आणि यमुना अशा चार चाळी आहेत, त्यांपैकी एका चाळीत ते होते. अण्णामामा एलएल.बी. चा अभ्यास करीत होते आणि द्वारकानाथ जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये अभ्यास करीत होता. माझे नाव त्या वेळी गिरगावातील आंग्र्यांच्या वाडीत असलेल्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये घालण्यात आले. आमच्या चाळीपासून सहज चालत जाण्याइतकी ही शाळा जवळ होती. या शाळेत चांगले शिक्षक होते आणि शाळेची परंपराही चांगली होती.
शाळेतील अभ्यासाची सुरुवात अर्धा तास भगवद्गीतेच्या वाचनाने होई. वर्गशिक्षक गीतेतल्या एक-दोन श्लोकांचे निरूपण करीत. यांतले बहुतेक आमच्या डोक्यावरून जाई, पण या अर्ध्या तासाच्या धार्मिक शिक्षणाने आमच्या मनावर चांगले संस्कार होत असे मला वाटते. आमच्यापैकी बहुतेकांची संस्कृत हीच 'दुसरी भाषा' असल्यामुळे ती सुधारण्यासही याचा उपयोग होई.
चिपळूणकर नावाचे शिक्षक आम्हाला संस्कृत शिकवीत. ते मोठे कार्यक्षम तर होतेच, पण विद्यार्थ्यांच्या मानेवर खडा ठेवून अभ्यास करून घेत आणि कोणी काही चूक केली की संस्कृत भाषेतल्या अनुच्चरणीय अशा शेलक्या शब्दांत त्याची संभावना करीत. अशा शब्दांत 'बलिवई' (बैलोबा) हा एक त्यांचा आवडता शब्द होता. मी आठ वर्षांचा असल्यापासून 'अमरकोशा'शी माझा परिचय झालेला असल्यामुळे संस्कृतबद्दल माझ्या मनात एक विलक्षण गोडी निर्माण झाली होती आणि माझा चुलतभाऊ सखाराम याचे प्रोत्साहन मला होतेच. आमच्या घरातले सारे वातावरण श्लोक, पोथ्या, पुराणे यांच्या पठनाने भारलेले असे आणि ती बहुधा मराठीत असली तरी त्यांत संस्कृत शब्द फार मोठ्या प्रमाणात असत. याशिवाय प्राथमिक शाळेत असताना मी जे 'नवनीता'मधील कवितेचे पाठांतर केलेले होते, त्यात संस्कृतमिश्रित शब्द फार मोठ्या प्रमाणात असत. यामुळे माझे संस्कृत चांगले होण्यास मदत झाली. मात्र यासाठी काही खास परिश्रम मी केल्याचे मला तरी आठवत नाही. आमच्या शिक्षकांमध्ये चिपळूणकरांच्याइतकेच कार्यक्षम असे गोखले नावाचे शिक्षक होते. मात्र ते चिपळूणकरांच्यापेक्षा स्वभावाने अधिक आनंदी आणि मनमिळाऊ होते. ते आम्हांला भूगोल विषय शिकवीत. त्यांच्या शिकविण्याने या विषयाबद्दल माझ्या मनात गोडी निर्माण झाली. त्यामुळेच दहा वर्षांनंतर केंब्रिज येथे पदविका परीक्षेत या विषयात मला चांगले गुण मिळाले आणि नंतर लंडनमधील आय.सी.एस.च्या परीक्षेतही या विषयात सुमारे 75 टक्के गुण मिळाले. संस्कृतबद्दलच बोलायचे तर माझ्या वर्गात या विषयात पारंगतता मिळविणारे भाटिया, साने आणि मी असे तीन प्रमुख विद्यार्थी होतो. आम्ही लवकरच एकमेकांचे मित्र झालो. या विषयात पहिला येणाऱ्याला कसलेही बक्षीस किंवा शिष्यवृत्ती नव्हती. त्यामुळे स्पर्धेचा प्रश्नच आला नाही. पण अखेर पाचवीची वार्षिक परीक्षा झाली तेव्हा संस्कृत विषयात मी पहिला आलो.
आमच्या वर्गात पस्तीस ते चाळीस विद्यार्थी होते. अभ्यासाच्या वर्षाची सुरुवात नोव्हेंबरमध्ये व्हायची अशी त्या वेळी पद्धत होती. सहावीत असताना विद्यार्थ्यांचे जे वय असावे त्यापेक्षा मी दोन वर्षांनी लहान होतो आणि नम्रपणे पाठीमागच्या बाकावर बसत असे. आमचे नवे वर्गशिक्षक रामचंद्र कृष्ण लागू हे संस्कृत विषय घेऊन एम.ए. झालेले आणि उत्तम शिक्षक अशी कीर्ती मिळविलेले होते. त्या काळी शिक्षक प्राध्यापकांमध्ये अद्ययावत समजला जाणारा मानेपर्यंत बटणे असलेला लांब कोट आणि विजार असा पोषाख लागूंचा असे. ते दिसायला उग्र होते, पण मध्येच कधी हसले की त्यांची सुंदर, रेखीव दंतपंक्ती दिसे. अभ्यासू विद्यार्थ्यांबद्दल त्यांच्या मनात असलेल्या आपुलकीचे दर्शनही त्यांच्या वागण्यातून घडे.
वर्गात शिकवू लागण्यापूर्वी प्रथम लागू म्हणाले, "मला वर्गप्रमुख (मॉनिटर) नेमायचा आहे. गेल्या वार्षिक परीक्षेत संस्कृत विषयात जो पहिला आला असेल त्याला वर्गप्रमुख नेमायचा अशी माझी पद्धत आहे. गेल्या वर्षी संस्कृतमध्ये कोण पहिला आला होता, उभा राहा पाहू?"
मी उठून उभा राहिलो. मी पुढच्या बाकावर येऊन बसावे असे लागूंनी मला सांगितले आणि आजपासून मी वर्गप्रमुख आहे असे साऱ्या वर्गाला सांगितले. आलेली जबाबदारी पार पाडणे ही गोष्ट साधीसुधी नव्हती. कारण विद्यार्थ्यांत मी सर्वांत लहान होतो. पण या बाबतीत वर्गातल्या माझ्यापेक्षा वडील असलेल्या एका मुलाकडून मधूनमधून मला चांगली मदत होत असे. तो विद्यार्थी म्हणजे एम.एन. तळपदे, ते पुढे मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक झाले.
मी लागूंना फार आवडू लागलो. सुटीत वाचण्यासाठी ते मला पुस्तके देऊ लागले. मी सुटी बहुधा रोह्याला घालवीत असे. लागूंनी दिलेली पुस्तके भराभर वाचून काढण्यात मी रंगून जाई. या पुस्तकांत बहुधा ग्रीक आणि स्कैंडिनेव्हियन पुराणातल्या कथा असत. सुटी संपवून परत आल्यानंतर त्यांनी दिलेली सर्व पुस्तके वाचल्याचे त्यांना सांगितले की, लागू मास्तरांना फार आनंद होई. 1911 किंवा 12 मध्ये लागू मास्तरांनी तात्यांना लिहिले की, चिंतामणीला माझ्याजवळ राहायची परवानगी द्या म्हणजे मी त्याचे संस्कृत आणि इंग्रजी हे विषय चांगले करून घेईन. मुलांना शिकविणे ही गोष्ट लागूंना फार आवडत असे आणि जी मुले त्यांना आवडत असत त्यांना पैसे न घेता ते खाजगी रितीने शिकवीत. पण 1909 च्या अखेरीस शाळेच्या व्यवस्थापकांशी किंवा शाळेतील सहकाऱ्यांशी मतभेद झाल्यामुळे ते आमच्या शाळेतून बाहेर पडले आणि एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकवू लागले. पुढे महामहोपाध्याय आणि भारतरत्न झालेले पां. वा. काणे त्या शाळेत संस्कृत शिकवीत. म्हणून लागू मास्तर इंग्रजी शिकवू लागले. लागू मास्तरांनी सुचविल्याप्रमाणे तात्यांनी मी सहावी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर एल्फिन्स्टनमध्ये माझे नाव घातले. 1911 च्या नोव्हेंबर-डिसेंबरपासून गिरगाव बैंक रोडवर असलेल्या एका चाळीत लागूंच्याच खोलीत मी राहू लागलो.
आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील काळ सुखाचा होता. अण्णामामांच्या घरापासून शाळा अगदी जवळ असल्यामुळे ती मला सोयीची होती. 1908 मध्ये अण्णामामा आणि द्वारकानाथ यांची लग्ने झाली आणि सरस्वती इमारतीच्या पाठीमागे असलेल्या यमुना चाळीत मोठी जागा घेऊन ते राहू लागले. त्या घरातल्या दोन्ही गृहिणींनी केलेले पदार्थ मोठे स्वादिष्ट असत. मी मधूनमधून मलेरियाने आजारी पडत असे. आता बंद केलेल्या अनेक विहिरी त्या वेळी उघड्याच होत्या. त्यामुळे सर्व मुंबईकरांच्या नशिबी मलेरियाचा हा आजार येत असे. तथापि तात्यांनी लागूंच्याकडे राहण्याची माझी सोय केली होती. मीही न कुरकुरता माझ्या या दुसऱ्या गुरूच्या घरी राहावयास गेलो होतो.
या नव्या शाळेतला जीवनक्रम जुन्या शाळेइतकाच आनंददायक होता, मात्र त्यासाठी थोडे लांब जावे लागे. त्या काळी वयाची सोळा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय कोणाही विद्यार्थ्याला मॅट्रिकच्या परीक्षेला बसता येत नसे आणि मी तर 1910 च्या नोव्हेंबरमध्ये म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षी सातवीचा अभ्यास पूर्ण केला होता. मला त्यामुळे त्या वर्षी किंवा त्यानंतरच्या वर्षीही मॅट्रिकला बसता येत नव्हते. म्हणून नोव्हेंबर 1912 पर्यंत, म्हणजे तब्बल तीन वर्षे मला त्याच वर्गात राहावे लागले. पण लागू मास्तरांची शिकवणी मिळाल्यामुळे हेही एक वरदानच ठरले. संस्कृत आणि इंग्लिश हे विषय मला सुधारता आले. लागू मास्तरांच्या शिवाय एक शास्त्रीही आम्हाला संस्कृत शिकवीत असत. त्यांना तर वाटू लागले की मी, पहिली जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती सहज मिळवू शकेन. त्या काळी संस्कृतच्या विद्यार्थ्यांना ती शिष्यवृत्ती हे एक मोठेच भूषण वाटे. मला पुष्कळच वेळ असल्यामुळे मी आपण होऊन संस्कृतचा अभ्यास करू लागलो. कालिदासाचा रघुवंश मुखोद्रत केला, इतर संस्कृत महाकाव्यांशी माझा चांगलाच परिचय झाला; व्याकरणाचा अभ्यासही चांगला झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की, मी संस्कृतमध्ये काव्यरचना करू लागलो. यातली बहुतेक रचना इंग्रजी कवितांचे संस्कृतमध्ये केलेले भाषांतर असे. लागू मास्तर हे सारे काळजीपूर्वक वाचीत आणि मधूनमधून दुरुस्त्याही करीत. माझ्या या कवितांच्या वह्या माझ्या नकळत लागू मास्तरांनी जपून ठेवल्या होत्या आणि पुढे तीस वर्षांनंतर मी रिझर्व्ह बँकेत आल्यानंतर त्यांनी त्या मला परत दिल्या. त्या अजूनही माझ्याजवळ आहेत. त्यांतल्या कविता 'संस्कृत काव्यमालिका' या शीर्षकाने 1969 मध्ये 'मोतीलाल बनारसीदास' या प्रकाशन संस्थेने प्रसिद्धही केल्या.
माझ्याप्रमाणेच इतरही काही विद्यार्थ्यांना लागू मास्तर शिकवीत असत. या विद्यार्थ्यांत जी. एस. राजाध्यक्ष, आर.एन. वेलिंगकर, जी.एम. धुरंधर, ए.एच. कीर्तिकर, व्ही. व्ही. गुप्ते आणि एक-दोन विद्यार्थी होते. लागू मास्तरांच्या घरी त्यांचा स्वतःचा खाजगी ग्रंथसंग्रह होता आणि त्यात ते नेहमी नव्या नव्या पुस्तकांची भर घालीत असत. या पुस्तकांपैकी काही मी वाचीत असेच, पण साहित्यमीमांसेवरील काही पुस्तकेही मी वाचली होती. याशिवाय मोकळा वेळ मिळाला की, आम्ही दोघेही गंमत म्हणून फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकत असू. या अभ्यासातही आम्ही इतकी प्रगती केली की, मोलियरची नाटके आणि अलेक्झांडर ड्यूमाचे ग्रंथ आम्हाला मुळातून वाचता येऊ लागले.
मी कोणत्याही खेळांत विशेष प्रवीण नव्हतो आणि खरे म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींत लक्ष घालायला मला वेळही नव्हता. हिंदू जिमखान्यावरील एका क्लबात मी जात होतो आणि कधीकधी क्रिकेटही खेळत होतो. तरी लागू मास्तर आणि मी मिळून संध्याकाळी फिरावयास जाणे हा आमचा मुख्य कार्यक्रम असे. आम्ही दोघे एका खाणावळीतून जेवणाचा एक डबा आणीत होतो. त्यातले अन्न फारसे चांगले नसेच. अगदी तेच ते कंटाळवाणे असे. दूध, पाव आणि कधीकधी एखादे केळे खाऊन ही उणीव मी भरून काढीत असे, पण तारुण्यातल्या या विकसनशील काळात असले निकृष्ट अन्न खावे लागले, त्याचा वाईट परिणाम माझ्या प्रकृतीवर झाला आणि सुटीत मग कितीही सकस आणि स्वादिष्ट अन्न मिळाले तरी पुरेशी भरपाई झाली नाही.
1912 च्या अखेरीस मुंबई विद्यापीठाच्या मॅट्रिकच्या परीक्षेला मला बसता आले. मॅट्रिकबरोबर स्कूल फायनलच्या परीक्षेलाही मी बसावे असे त्यांना वाटले, कारण कॉलेजचे शिक्षण मला किती घेता येईल कुणास ठाऊक, स्कूल फायनलची परीक्षा पास झालो तर निदान कारकुनाची नोकरी तरी खचित मिळेल असा त्यांचा सरळ हिशेब होता !
1912 च्या डिसेंबरमध्ये मी रोह्याला मजेत सुटी घालवीत असताना एके दिवशी तात्यांना (माझ्या वडिलांना) लागू मास्तरांची तार आली की, मी मुंबई विद्यापीठात मॅट्रिकच्या परीक्षेत पहिला आलो असून, मला पहिली जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती आणि इतर दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या आहेत. एवढे भरघोस यश मिळेल असे मला वाटले नव्हते, आणि पुढे अनेक वर्षांनी मी तसे (त्यानंतर प्राध्यापक झालेल्या) लागूंना म्हणालो, तेव्हा ते रागाने म्हणाले, "तू जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवणार आणि विद्यापीठात पहिला येणार हे मला चांगले माहीत होते!"
सुप्रसिद्ध मराठी कवी आणि नाटककार राम गणेश गडकरी यांची आणि माझी ओळख नव्हती, तरी माझे हे सुयश बघून त्यांना स्फूर्ती आली आणि माझ्या अभिनंदनपर त्यांनी 'अभिनंदनपर वर्धापन' या नावाची कविता 19 डिसेंबर 1912 रोजी लिहिली. ती आता त्यांच्या 'वाग्वैजयंती' या संग्रहात समाविष्ट झालेली आहे. (ही संपूर्ण कविता परिशिष्ट 1 मध्ये उद्धृत केली आहे. मा. जी. प्र....2) अशा प्रासंगिक कविता जशा क्षणभंगुर असतात तशी ही नाही. तिची प्रासादिक शैली तर लक्षात भरण्याएवढी चांगली आहेच, पण तिच्यात जो सदुपदेश आहे तो त्यांची दूरदृष्टी दाखविणाराही आहे. गडकरी हे त्यानंतर प्राध्यापक लागू यांना भेटले होते आणि माझा फोटोही त्यांनी लागूंच्याकडे मागितला होता. पण अशा प्रसंगी मुलांचे फोटो काढू नयेत असे लागूंचे मत होते. त्यामुळे गडकऱ्यांना विन्मुख जावे लागले. त्या प्रसंगी मी हजर होतो. गडकऱ्यांना फोटो द्यायला हवा होता असे मला वाटले, पण मी तोंड उघडू शकलो नाही.
यानंतर मी गोविंदाग्रजांना कधीही पाहिले नाही. 1919 मध्ये ते निर्वतले. अखेरच्या आजारपणात ते नागपूरजवळच्या सावनेर या गावी होते. योगायोगाची गोष्ट अशी की, त्याच सुमारास वऱ्हाडमधील अमरावती येथे माझी नेमणूक झाली होती आणि सावनेर हे अमरावतीहून अवघ्या एकशेवीस मैलांवर असल्यामुळे गडकरी अधिक जगते तर तेथे जाऊन मी त्यांना भेटू शकलो असतो.
मॅट्रिकच्या परीक्षेबद्दल थोडे अधिक सांगायचे, तर ते असे की, एल्फिन्स्टन हायस्कूलचे प्रमुख खानबहादूर कॉन्ट्रॅक्टर यांना माझ्या यशाने विलक्षण आनंद झाला, तरी खगोलशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांचे पारितोषिक मला मिळाले नाही याचे त्यांना वाईट वाटले. कारण 'शास्त्र' हा त्यांचा विषय होता. पण त्यानंतर पाच वर्षांनी केंब्रिज येथे नॅचरल सायन्सेस ट्रायपॉजच्या परीक्षेत वनस्पतिशास्त्र या विषयात फ्रैंक स्मार्ट पारितोषिक मिळवून मी या अपयशाची भरपाई केली.
1912 च्या मॅट्रिक परीक्षेत दुसरी जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती पी.एल. वैद्य यांना मिळाली होती. तेही रोह्याचेच होते. आता तर ते संस्कृत, पाली आणि अर्धमागधी या भाषांचे नामवंत पंडित म्हणून सुविख्यात आहेत. पुणे येथील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळ काढीत असलेल्या महाभारताच्या आवृत्तीचे ते प्रमुख आहेत. कोणीतरी त्यांना सांगितले होते की, तू विद्यापीठीय शिक्षण घे. विद्यापीठात प्रवेश मिळविण्याचे एक साधन म्हणून ते 1912 मध्ये मॅट्रिकला बसले होते, त्या वेळी त्यांचे वय सामान्य विद्यार्थ्यांपेक्षा बरेच होते. त्यांचे माझ्यापेक्षा संस्कृत भाषेवर पुष्कळच अधिक प्रभुत्व होते आणि 1912 च्या मे महिन्याच्या सुटीत अभ्यासाबाहेरचे काहीतरी संस्कृत आपण वाचू या, असे मी त्यांना म्हटले, तेही त्यांनी आनंदाने कबूल केले. आम्ही वाचले ते पुस्तक म्हणजे 'महाभारत चंपू'. पण त्या काळच्या परीक्षेसाठी इंग्रजी भाषेचेही उत्तम ज्ञान आवश्यक असे आणि वैद्यांकडे ते नव्हते. मी जेव्हा पहिली जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळविली तेव्हा अभिनंदनपर पत्रात वैद्यांनी मला लिहिले, "शिष्यादिच्छेत् पराभवम्."
माझे संस्कृतचे पेपर मी किती चांगले लिहिले होते, हे नंतर मला लागूंच्याकडून कळले. त्यांनी मला सांगितले की, प्राध्यापक पानसे आणि प्राध्यापक ध्रुव या परीक्षकांनी आपापल्या पेपरांत मला 50 पैकी 50 गुण दिले होते. पण त्यापूर्वी मॅट्रिकच्या परीक्षेत कोणीही संस्कृतमध्ये शंभर टक्के गुण मिळविलेले नव्हते. ही परंपरा टिकविण्यासाठी ह्या दोघांनीही आपापल्या पेपरांत दोन-दोन गुण कमी करायचे ठरविले, त्यामुळे माझे एकूण गुण 96 झाले. तरीही ते सर्वांत अधिक होतेच आणि मला शिष्यवृत्तीही मिळत होतीच.
मॅट्रिकच्या परीक्षेत मला 700 पैकी 583 म्हणजे 83 टक्क्यांहून थोडे अधिक गुण मिळाले होते. पण त्यानंतर अनेक वेळा अनेक जणांना याहूनही अधिक मार्क मिळालेले आहेत.
मॅट्रिकच्या परीक्षेत पहिला आल्यामुळे नंतरच्या परीक्षांतही पहिला क्रमांक टिकेल की नाही अशी धास्ती मला वाटत असे. अहंकाराने किंवा महत्त्वाकांक्षेने मी प्रेरित झालो होतो असे नव्हे, तर आपली कुचेष्टा होईल अशी भीती मला वाटत होती. या भीतीमुळेच मी सतत अभ्यास करण्याचे ठरवले आणि आपला पहिला क्रमांक कायम ठेवण्यासाठी सतत धडपडलो.
1913 च्या प्रारंभी लागू एल्फिन्स्टन कॉलेजात लेक्चरर म्हणून काम करू लागले होते. आणि मुंबई विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट कॉलेज अशीही एल्फिन्स्टन कॉलेजची ख्याती होती. त्या कॉलेजच्या स्थापनेला त्या वेळी ऐंशी-ब्याऐंशी वर्षे झाली होती. मोजके हुशार विद्यार्थीच या कॉलेजात घेतले जात. त्या काळी कॉलेजचे प्राचार्य आणि बहुतेक प्राध्यापक ब्रिटिश असत. मी या कॉलेजात आलो तेव्हा आपल्या विनोदबुद्धीविषयी प्रसिद्ध असलेले शार्प हे प्राचार्यपदावरून गेले होते आणि त्यांच्या जागी कॉव्हर्नटन हे प्राचार्य झाले होते. आम्हाला प्राध्यापक सिसन हे इंग्रजी, प्राध्यापक मार हे तर्कशास्त्र, प्राध्यापक मुल्लर हे इतिहास आणि प्राध्यापक जॉर्ज अँडरसन हे 'भारतीय प्रशासन' शिकवीत. सुप्रसिद्ध संस्कृत पंडित डॉ. सर रामकृष्ण भांडारकर यांचे चिरंजीव प्रा.डी.आर. भांडारकर हे आम्हाला संस्कृत आणि प्राध्यापक विल्किनसन हे गणित शिकवीत. 1914 मध्ये र. धों. कर्वे हे गणिताचे प्राध्यापक म्हणून आले. यांच्या अगोदर गोडबोले हे गणित आणि पटवर्धन आणि भडकमकर हे संस्कृत शिकवीत. हे सर्व 'फेलो' होते. पदार्थविज्ञान कोण शिकवीत ते मला आता आठवत नाही. गजेंद्रगडकरशास्त्री हे इंटरला संस्कृत शिकवीत.
शाळेतून कॉलेजात जाणे म्हणजे एक महत्त्वाचा बदल होता. आजपर्यंत नसलेला मोकळेपणा आणि जबाबदारी ही तर येतातच; पण शाळेतल्यापेक्षा कितीतरी अधिक समवयस्कांमधून मित्र निवडण्याची संधी मिळते. आमच्या प्रीव्हियसच्या वर्गात अवघ्या चार मुली होत्या आणि त्या काळच्या पद्धतीप्रमाणे त्या कधी कोणात मिसळत नसत. त्यांच्यापैकी कु. रुस्तुमजी नावाची एक मुलगी गणितात हुशार होती आणि पुढे ती शाळांची इन्स्पेक्टर झाली. कु. देसाई हिने एक-दोघांच्या अंतःकरणात खळबळ निर्माण केली. माझा मित्रपरिवार अगदी मर्यादित होता आणि जी. एस. राजाध्यक्ष हे त्या सर्वांत निकटचे होते. जी. डी. टिल्लू आणि मी संस्कृत विषयामुळे अधिक निकट आलो आणि कधीकधी तर संस्कृतमधून कविता करून एकमेकांना पाठविल्या. पुढे शिक्षणखात्यात गेलेले सयानी नावाचे गृहस्थ माझ्याशी अत्यंत खेळीमेळीने वागत. पर्शियन काव्यातील सौंदर्याशी त्यांनीच माझा परिचय घडवून आणला. 1914 मध्ये आमच्या कॉलेजात आलेले सी. एम. पटेल हे गणितात हुशार होते. त्यांची आणि माझी मैत्री जन्मभर टिकून आहे. सी.एम. त्रिवेदी, व्ही. जी. देसाई आणि एन. एम. शहा हे आमच्या बरेच पुढे होते. त्यांच्या हुशारीचे आम्हाला नेहमी कौतुक वाटे. 1911 मध्ये जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवणारे व्ही. पी. जोशी माझ्याबरोबर इंटरला आले. मधले एक वर्ष त्यांच्या आजारीपणामुळे फुकट गेले होते. सुप्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ शेजवलकर आणि एम.डी. भट हेही माझे समकालीन होते. नाणावटी, मोदी, गुंजीकर, एस.बी. जोशी हीही आणखी काही नावे आता मला आठवतात.
प्रीव्हियसच्या वर्गात मला कोणताच विषय फारसा कठीण वाटला नाही आणि वर्गात शिक्षक जी टिपणे देत, त्यांत मधल्या सुटीत लायब्ररीतून आणलेल्या पुस्तकांचे वाचन करून मी भर घालीत असे. गणित या विषयाबद्दल मात्र फारशी खात्री वाटत नसे आणि म्हणून माझा पहिला क्रमांक टिकविण्यासाठी गणिताच्या अभ्यासाची मी थोडी अधिक काळजी घेत असे, प्रीव्हियसच्या परीक्षेत मी पहिल्या वर्गात पहिला आलो आणि संस्कृतची शिष्यवृत्ती व इंग्लिश विषयासाठी असलेले ह्यूलिंग्ज प्राइझही मिळविले. कॉलेजच्या पूर्वपरीक्षेत मी गणितात 200 पैकी 200 मार्क मिळवून कॉलेजमधील एक बक्षीसही मिळविले होते.
इंटरच्या वर्गात आल्यानंतर तर्कशास्त्र की गणित घ्यायचे असा पर्याय माझ्यापुढे होता. मी गणितच घ्यायचे ठरविले. पदार्थविज्ञान हा विषय तर सक्तीचाच होता. शिवाय, इंग्रजी, संस्कृत, इतिहास आणि भारतीय प्रशासन हेही विषय होतेच. मी जोमाने अभ्यास चालू ठेवला. दुपारच्या सुटीतसुद्धा जादा वाचन करीत असे. माझी ही सवय इतरांच्याही लक्षात आली. प्राध्यापक जॉर्ज अँडरसन हे तर वर्गात एकदा म्हणाले, "इंडियन अॅडमिनिस्ट्रेशन विषयावरचे सर्वात उत्कृष्ट पुस्तक म्हणजे जॉर्ज अँडरसन यांचेच, पण तुम्हांला या विषयावरची इतर पुस्तके हवी असतील तर त्यांची नावे देशमुखला विचारा, कारण त्याने ती सर्व वाचली आहेत." इंटरच्या परीक्षेतही मी पहिल्या वर्गात पहिला आलो आणि संस्कृत व इतिहास या विषयांतील बक्षिसे मिळविली. कॉलेजने ठेवलेले गणित विषयातील पहिल्या क्रमांकासाठी असलेले बक्षीसही मला मिळाले. पण आता प्रीव्हियसच्या ऐवजी इंटरच्या परीक्षेत ठेवण्यात आलेले इंग्रजी विषयाचे ह्यूलिंग्ज प्राइझ मात्र व्ही. पी. जोशी यांनी पटकावले होते. आता माझा धाकटा भाऊ पंढरीनाथ हाही मुंबईत शिकण्यासाठी आला होता आणि आम्ही एकत्र राहावे असे ठरले. अशा रितीने लागूंच्याबरोबरचे माझे राहणे संपुष्टात आले.
1915 मध्ये मुंबई विद्यापीठाने आपल्या शैक्षणिक वर्षात बदल केला. वार्षिक परीक्षा नोव्हेंबरच्या ऐवजी एप्रिल महिन्यात होऊ लागल्या. ज्युनिअर बी.ए.साठी मी गणित हा मुख्य विषय का निवडला हे मला नीट आठवत नाही, पण लवकरच माझ्या लक्षात आले की, या विषयातला माझा रस कमी झाला होता. याशिवाय टेनिस कोर्टावर खेळायला जागा मिळावी म्हणून मी मधूनमधून गणिताचे तास चुकवू लागलो होतो. पण 1915 च्या पहिल्या तिमाहीस लागूंच्या रूपाने माझ्या भविष्याला नवे वळण लागले. एस.बी. ढवळे आणि एम.व्ही. भिडे यांच्यासारखे त्यांचे समकालीन आय.सी.एस.मध्ये प्रविष्ट झाले होते. तेव्हा त्यांना वाटले की जी.एस. राजाध्यक्ष आणि मी या दोघांचेही परीक्षेतील यश अपूर्व असल्यामुळे आम्हा दोघांना जर संधी मिळाली, तर आम्हांलाही आय.सी.एस होता येईल. राजाध्यक्षांचे वडील सेवानिवृत्त इंजिनियर होते आणि त्यांच्याजवळ पैसाही होता. परंतु छोट्याशा गावात वकिली करणाऱ्या आणि मोठ्या कुटुंबाचे पालनपोषण करणाऱ्या तात्यांकडे तसा पैसाअडका नव्हता. प्रा. लागूंची आम्हांला आय.सी.एस.ला पाठविण्याची कल्पना आम्हा दोघांच्या पालकांना आकर्षक वाटली. पण पैसे कसे उभारायचे हा प्रश्न तात्यांपुढे होता.
तात्या स्वतः सुमारे पाच हजार रुपये देऊ शकले असते आणि आणखी पाच हजार रुपये आपल्या मित्रांकडून आणि नातेवाइकांकडून उसनेही घेऊ शकले असते. पण इंग्लंडातील माझ्या चार ते पाच वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी आणि वास्तव्यासाठी जे आणखी दहा हजार रुपये लागणार होते ते कसे उभारायचे? तात्यांनी ठाणे येथील 'चांद्रसेनीय कायस्थ प्रभू एज्युकेशनल असोसिएशन'कडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. पण बहुधा संस्थेजवळ पैसेच नसल्यामुळे, आणि अभ्यासात उच्चांक मिळविलेला असूनही मी आय.सी.एस. पास होईन की नाही, याची खात्री वाटत नसल्यामुळे त्या संस्थेच्या कार्यकारी मंडळाने मदत देण्याचे नाकारले. माझ्या आजोबांकडील एक श्रीमंत नातेवाईकही माझ्या कर्तृत्वाबद्दल साशंक होते. माझ्या वडिलांनी हात टेकले. पण लागूंनी आपले परिश्रम सोडले नाहीत. हिंदू एज्युकेशन सोसायटीकडून मदत मिळविता येईल का याबद्दल त्यांनी चौकशी केली. तेव्हा त्या संस्थेने सर्व चाचणी करून सहा टक्के दराने 10 हजार रुपयांचे कर्ज देण्याचे मान्य केले. त्यासाठी तेवढ्याच रकमेच्या आयुर्विम्याच्या पॉलिसी घेऊन त्या सोसायटीच्या नावे करून देणे आवश्यक होते. हेही सर्व करण्यात आले. या बाबतीत अनेकांची मदत झाली. पण वागळे नावाचे माझ्या वडिलांचे कुलाबा जिल्ह्यातील एक सधन अशील, ठाण्याचे सर गोविंदराव प्रधान, आणि माझ्या मावसबहिणीचे माईचे यजमान आर. आर. जयवंत यांची पुष्कळ मदत झाली.
इंग्लंडला आय.सी.एस. परीक्षेला बसण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद झाली, तसे आणखी दोन प्रश्न सोडविणे आवश्यक झाले. केंब्रिज येथील एखाद्या कॉलेजात प्रवेश मिळविणे हा पहिला, आणि आय.सी. एस. साठी विषय कसे निवडावे हे कोणातरी 'ज्येष्ठा'च्या सल्लल्यावरून ठरविणे हा दुसरा. पहिला प्रश्न सोडविण्यासाठी प्राध्यापक मुल्लर आणि अँडरसन यांनी मदत करण्याचे कबूल केले. प्राध्यापक मुल्लर यांनी केंब्रिजमधील आपल्या 'जीझस' या कॉलेजला लिहिले आणि त्यांच्याकडून होकारही आला. अँडरसन यांनी आपल्या हार्डी या मित्राला केंब्रिजमधीलच 'ट्रिनिटी' या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्याबद्दल लिहिले होते आणि तसा प्रवेश मिळालाही होता, पण आधीच 'जीझस' कॉलेमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही कळविला असल्यामुळे हा प्रश्न येथेच संपला. अँडरसन यांनी वाईट वाटून घेतले नाही; उलट, पुढे मला लिहिलेल्या एका पत्रात, तुम्हाला यदाकदाचित आय. सी. एस. होता आले नाहीच तर तुम्हाला नॅचरल सायन्सेस ट्रायपॉजमध्ये मिळालेल्या पहिल्या वर्गाच्या आधारे आपण तुम्हाला इंडियन एज्युकेशनल व्हिसमध्ये नक्की घेऊ असेही मला कळविले होते.
अनुवाद : वि. वा. पत्की
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या