नमाज संपली. लोक आपापसात एकमेकांना भेटत आहेत. तेव्हाच मिठाई आणि खेळण्याच्या दुकानांवरही लोकांनी गर्दी केली आहे. या मुलांची टोळीही इथे मागे नाहीये. हा झोका, एक पैसा देऊन यात बसता येते. कधी आभाळात गेल्यासारखे वाटेल तर कधी जमिनीवर फेकल्यासारखे वाटेल. ही चक्री, लाकडाचे हत्ती, घोडे, उंट सगळे या चक्रीच्या गोलात लटकवलेले आहेत. एक पैसा देऊन त्यावर बसा आणि पंचवीस चकरा मारा. महमूद आणि मोहसिन, नुरे आणि सम्मी त्या घोड्यावर, उंटावर बसून चकरा मारतात. हमीद दूर उभा आहे. त्याच्याकडे तीन पैसे तर आहेत. आपल्या खजिन्यातील तिसरा हिस्सा तो जराशा चकरा मारण्यात खर्च करू इच्छित नाही.
रमझानचे तीस दिवस उलटल्यावर आज ईद आली आहे. किती प्रसन्न सकाळ आहे. वृक्षावर हिरवाई आहे, शेतामध्ये चैतन्य सळसळते आहे, तर आकाशातील लालिमा काहीतरी वेगळीच भासतेय. आजचा सूर्यदेखील किती शांत वाटतोय. जणू तो ईदनिमित्त बधाई देतोय. गावात किती गडबड आहे. ईदगाहला जाण्याची तयारी चाललीय. कुणाच्या कुडत्याला बटन नाहीये. तो शेजारच्या घरातून सुई-धागा आणण्यासाठी धावपळ करतो आहे. कुणाचे जोडे कडक झाले आहेत. त्याला तेल देण्यासाठी तो तेल्याच्या घरी जाण्याच्या गडबडीत आहे. बैलांना चारापाणी देण्याची घाई चालली आहे. ईदगाहवरून परतताना दुपार होऊन जाणार. तीन कोसांची वाट. शेकडो माणसांना भेटावे लागणार. त्यामुळे दुपारच्या आधी परतणे अवघड आहे. लहान मुले सगळ्यात जास्त खूश आहेत. कुणी एक रोजा ठेवला आहे, तोही दुपारपर्यंतच. कुणी कुणी तर तोही ठेवलेला नाहीये, पण ईदगाहला जाण्यातला आनंद लुटायला मात्र सगळे जण सज्ज झालेले आहेत. रोजे मोठ्या माणसांसाठी असतात. त्यांच्यासाठी तर ईद आहे. ते रोजच ईदची वाट पाहत होते आणि आज तो दिवस उगवला आहे. तरीही लोक ईदगाहला जायला घरातून लवकर का निघत नाहीत, असा प्रश्न मुलांना पडलाय. त्यांना घरातील अडचणींची काळजी करण्याचे कारण काय? घरात शेवयांसाठी दूध आणि साखर आहे की नाही याची काळजी मोठ्या माणसांनी करायची. मुलांना शेवया खायला मिळाल्याशी मतलब आहे.
मुलांच्या खिशात कुबेराचे धन भरलेले आहे. आपल्या खिशातील पैसे काढून वारंवार मोजण्यातच आनंद वाटतो आहे. महमूद मोजतोय... एक, दोन, ...दहा, बारा... त्याच्याजवळ बारा पैसे आहेत. मोहसिनच्या जवळ एक, दोन, तीन... आठ, नऊ... पंधरा पैसे आहेत. या पैशातून ते खूप गोष्टी खरेदी करू शकतील. खेळणी, मिठाई, बिगुल, चेंडू आणि अजून काही काही; पण सगळ्यात जास्त हमीद आनंदात आहे. तो चार-पाच वर्षांचा गरीब मुलगा आहे. अंगाने दुबळा. त्याचे वडील गेल्या वर्षीच साथीच्या आजारात मरण पावले आणि आईदेखील पिवळी पडत गेली. तिच्यावर जे आभाळ कोसळले होते ते तिने चुपचाप सहन केले आणि दुःख सहन होईना तेव्हा ती मरून गेली.
आता हमीद आपल्या म्हाताऱ्या आजीच्या, अमिनाच्या कुशीत झोपतो; पण तो आनंदात आहे. त्याचे वडील रुपये कमावून आणण्यासाठी गेले आहेत, ते खूप पिशव्या भरून पैसे आणणार आहेत आणि अम्मीजान अल्लाहमियाँच्या घरून त्याच्यासाठी छान छान गोष्टी आणण्यासाठी गेली आहे, अशी त्याची समजूत घालण्यात आली आहे. आशा मोठी वाईट गोष्ट आहे आणि ही तर लहान मुलाला वाटणारी आशा. लहान मुलाच्या कल्पनेत तर राईचा पर्वत होतो. हमीदच्या पायात चप्पल नाही, डोक्यावर एक जुनी पुराणी टोपी आहे. त्या टोपीचा काठ काळा पडलाय; पण तरीही तो आनंदात आहे. त्याचे अब्बाजान पिशव्या भरभरून पैसे कमावून आणतील आणि अम्मीजान खूप साऱ्या वस्तू, पक्वान्न घेऊन येईल, तेव्हा तो त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करून घेणार आहे. तेव्हा महमूद, मोहसिन, नुरे आणि सम्मी इतके पैसे कुठून आणतील हे तो बघणार होता.
कमनशिबी अमिना मात्र घरात बसून रडत आहे. कारण आज ईद आणि घरात अन्नाचा कण नाहीये... आज अबिद असता तर ईद अशी असती? या अंधारलेल्या परिस्थितीमुळे ती निराश झाली होती. या काळतोंड्या ईदला कुणी बोलावणे पाठवले होते? या घरात ईदचे काहीच काम नाही; पण हमीद ! त्याला कुणी मेले काय किंवा जगले काय काहीच घेणेदेणे नाही. त्याच्या मनात आशेचा किरण आहे. त्यामुळे संकटे कितीही जोरात आली तरीही त्याच्या आशादायी वृत्तीमुळे त्या संकटांवर मात केली जात होती.
हमीद आत जाऊन आजीला म्हणाला, "तू घाबरू नकोस अम्मा, मी लवकर परत येईन. तू बिलकूल घाबरू नकोस."
पण अमिनाला भीती वाटतेय. तिच्या मनात विचार घोळतोय. गावातील मुले आपल्या आपल्या वडिलांबरोबर चालली आहेत. हमीदला माझ्याशिवाय कुणीच नाही. त्याला एकटेच मेळ्यामध्ये कसे जाऊ द्यावे. त्या गर्दीत पोरगे हरवले तर काय करणार? वयाने तो खूपच लहान आहे. तीन-चार कोस चालणार कसा? पायाला छाले पडतील. त्याला पायात घालायला चपलाही नाहीत. ती बरोबर असती तर थोडा वेळ कडेवर तरी घेऊ शकली असती... पण इथे शेवया कोण करेल? पैसे असते तर येताना सगळ्या वस्तू जमा करून आणल्या असत्या आणि आल्यावर झटपट शेवयांची खीर बनवली असती. पण इथे सगळ्या वस्तू जमा करायला खूप वेळ लागणार. कुणाच्या तरी समोर हात पसरावा लागणार. त्या दिवशी फहमिनचे कपडे शिवले होते. त्याचे आठ आणे मिळाले होते. ते आठ आणे ईदसाठी जपून ठेवले होते. पण काल दूधवाली बोडक्यावर बसली. मग काय करणार? हमीदसाठी इतर काही नाही तरी दोन पैशाचे दूध हवेच. आता केवळ दोन आणे आहेत. तीन पैसे हमीदच्या खिशात आणि पाच पैसे माझ्या बटव्यात आहेत आणि ईदचा सण आलाय. अल्लाच यातून मार्ग दाखवेल. धोबीण, न्हावीण, महारीण आणि कासारीण सगळ्या जणी येतील. सगळ्यांना शेवयांची खीर द्यावी लागेल. वर्षातून एकदा येणारा सण. आयुष्य सुरळीत जावे इतकीच इच्छा आहे. पण नशिबात असेल तसे घडेल. हमीदला मात्र आपण संभाळावे... हेही दिवस जातील.
गावातून लोक जथ्याजथ्याने निघाले. इतर मुलांबरोबर हमीदही निघाला. कधी सगळे जण धावत पुढे निघून जात. मग एखाद्या झाडाखाली थांबून मागून येणाऱ्यांची वाट पाहत... हे लोक इतके हळूहळू का चालताहेत ? हमीदच्या पावलांना जणू पंख फुटले आहेत. तो कधीच थकायची शक्यता नाही. शहराची हद्द आली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना श्रीमंतांचे बगिचे आहेत. बागेच्या भोवती पक्क्या भिंती बांधलेल्या आहेत. झाडांना आंबे आणि लिचीची फळे लगडलेली आहेत. कधी कधी एखादा मुलगा दगड उचलून त्यावर नेम धरतो आहे; पण आतून माळी येतो. मुले त्याच्यापासून फर्लांगभर अंतरावर आहेत. माळ्याला पाहून ती खूप हसताहेत. माळ्याला कसे उल्लू बनवले असा भाव त्यांच्या हसण्यात आहे. मोठमोठ्या इमारती लागल्या... हे कोर्ट, हे क्लब हाऊस... इतक्या मोठ्या कॉलेजात किती मुले शिकत असतील ? क्लब हाऊसमध्ये जादूचे खेळ होतात. कुणाला आत जाऊ देत नाहीत. संध्याकाळी तिथे मोठमोठी माणसे खेळतात दाढीमिश्यावाली आणि बायकाही खेळतात... आमच्या आयांना बॅट द्या, त्या ती घट्ट पकडूदेखील शकणार नाहीत... खेळताना नक्की धडपडणार...
ते बोलत बोलत पुढे निघाले. हलवायांची दुकाने सुरू झाली. ही दुकाने आज खूप सजवली होती... इतकी मिठाई कोण खाते? बघ ना, एकेका दुकानात मण मण मिठाई असेल. रात्री भुते येऊन खरेदी करतात असे ऐकले आहे. अब्बा सांगत होते की, अर्ध्या रात्री एक माणूस प्रत्येक दुकानात जातो आणि उरलेली सगळी मिठाई खरेदी करतो. अगदी खरेखुरे रुपये देऊन...
हमीदचा या गोष्टीवर विश्वास बसेना.
ते पुढे निघाले... ही पोलीस लाईन. इथे पोलीस कवायत करतात. रात्री बिचारे पहारा देतात. चोऱ्या होऊ नये म्हणून रात्रभर हिंडत असतात.
मोहसिनने मध्येच अडवत म्हटले, "ते पहारा देतात ? मग तुला खूपच माहिती आहे असे म्हणावे लागेल. अरे राजा, हे चोऱ्या करायला मदत करतात. शहराकडे सगळे चोर-डाकू यांना मिळालेले असतात. रात्री हे लोक चोरांना एका गल्लीत चोरी करायला सांगतात आणि हे मात्र दुसऱ्या गल्लीत 'जागते रहो!' म्हणून पहारा देतात. म्हणून तर त्यांच्यापाशी इतके रुपये असतात. माझे मामा एका पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल आहेत. वीस रुपये महिना पगार आहे; पण पन्नास रुपये घरी पाठवतात. अल्ला कसम, मी एकदा विचारले होते, "मामा, इतके पैसे कुठून येतात?" तर हसून म्हणाले, "बेटा अल्ला देतो." मग स्वतःच म्हणाले, "लोक दिवसात लाख लाख रुपये मिळवतात. मी मात्र ज्यातून बदनामी होणार नाही की नोकरीही जाणार नाही इतकेच पैसे मिळवतो."
हमीदने विचारले, "हे लोक चोऱ्या करायला मदत करतात, मग यांना कुणी पकडत नाही?"
मोहसिन त्याच्या बुद्धीची कीव करीत म्हणाला, "अरे वेड्या, यांना कोण पकडेल? पकडणारे तर ते स्वतःच आहेत ना! पण अल्ला मात्र यांना खूप शिक्षा देतो. हरामचा माल असाच जातो बाबा."
आता घरांची दाटी होऊ लागली होती. ईदगाहकडे जाणारे घोळके नजरेस पडू लागले. लोकांनी रंगीबेरंगी कपडे घातलेले होते. कुणी बैलगाडीतून तर कुणी टांग्यातून चालले होते. कुणी मोटारीतून जात होते. सर्वत्र अत्तराचा घमघमाट सुटला होता. सगळ्यांच्या मनामध्ये उत्साह होता. खेडेगावातून आलेली ही मुलांची टोळी जवळ पैसे नसूनही आनंदात होती. या मुलांसाठी शहरातील प्रत्येक गोष्ट नवीन होती. ते एखाद्या गोष्टीकडे बघत राहिले की बघतच राहत. मागून हॉर्नचा आवाज आला तरी त्याची त्यांना शुद्ध राहत नव्हती. हमीद तर मोटारीखाली सापडता सापडता वाचला होता.
ईदगाह दिसू लागले. त्या जागेवर चहूबाजूने चिंचेच्या झाडांची सावली पडलेली होती. खाली पक्की फरसबंदी केलेली आहे. त्यावर जाजम टाकलेले आहे. रोजे करणारे लोक एका ओळीने उभे आहेत. अशा ओळीमागे ओळी लांबवर गेलेल्या आहेत. फरशीच्या खालीदेखील लोक उभे आहेत. तिथे जाजमदेखील टाकलेले नाही. नंतर येणारी माणसे मागच्या ओळीत उभी राहत आहेत. पुढे जागाच शिल्लक नाहीये. इथे गरीब, श्रीमंत, उच्च-नीच असे बघितले जात नाही. इस्लामच्या नजरेत सगळे सारखेच आहेत. या ग्रामीण मुलांनीही हात-पाय धुतले आणि ते मागच्या ओळीत जाऊन उभे राहिले. किती सुंदर व्यवस्था आहे. लाखो माणसे एकसाथ अल्लापुढे दुवा मागण्यासाठी झुकतात, गुडघ्यावर बसतात. ही क्रिया कित्येक वेळा केली जाते. विजेचे दिवे एकसाथ पेटले आणि एकसाथ विझले की जसे वाटते तसाच काहीसा क्रम इथेही असतो. यामुळे तुमचे हृदय श्रद्धेने, गर्वाने आणि आनंदाने भरून येते. बंधुभावाची भावना या समस्त लोकांना जणू एका सूत्रात बांधून टाकते.
2
नमाज संपली. लोक आपापसात एकमेकांना भेटत आहेत. तेव्हाच मिठाई आणि खेळण्याच्या दुकानांवरही लोकांनी गर्दी केली आहे. या मुलांची टोळीही इथे मागे नाहीये. हा झोका, एक पैसा देऊन यात बसता येते. कधी आभाळात गेल्यासारखे वाटेल तर कधी जमिनीवर फेकल्यासारखे वाटेल. ही चक्री, लाकडाचे हत्ती, घोडे, उंट सगळे या चक्रीच्या गोलात लटकवलेले आहेत. एक पैसा देऊन त्यावर बसा आणि पंचवीस चकरा मारा. महमूद आणि मोहसिन, नुरे आणि सम्मी त्या घोड्यावर, उंटावर बसून चकरा मारतात. हमीद दूर उभा आहे. त्याच्याकडे तीन पैसे तर आहेत. आपल्या खजिन्यातील तिसरा हिस्सा तो जराशा चकरा मारण्यात खर्च करू इच्छित नाही.
सगळे जण त्या चक्रीवरून उतरतात. आता खेळणी घेऊयात. एका बाजूला खेळण्याच्या दुकानांची रांग लागलेली आहे. तर्हत-हेची खेळणी आहेत... शिपाई आणि गौळणी, राजा आणि वकील, धोबीण आणि साधू... वा! किती सुंदर खेळणी आहेत. जणू आता बोलतील असे वाटते आहे. महमूद शिपाई घेतो. खाकी ड्रेस आणि लाल पगडीवाला. खांद्यावर बंदूक असलेला. जणू तो शिपाई आत्ताच कवायत करून आलाय असे वाटते होते. मोहसिनला पखालीने पाणी वाहणारा पसंत पडला. कमरेत झुकलेला, पाठीवर पखाल ठेवलेली. पखालीचे तोंड एका हाताने धरलेले.
किती प्रसन्न दिसत होता तो. जणू एखादे गाणे म्हणतोय. नुरेला वकील आवडला. चेहऱ्यावर किती विद्वत्ता झळकते आहे. काळा कोट, त्याच्या खिशात घड्याळ, त्याला सोन्याची साखळी, हातात कायद्याचे पुस्तक, जणू न्यायालयात केस लढवण्यासाठीच चालले आहेत वकीलसाहेब.
ही सगळी खेळणी दोन-दोन पैशांची आहेत. हमीदजवळ केवळ तीन पैसे आहेत. इतकी महागडी खेळणी तो कशी घेणार? हातातून पडले की, त्या खेळण्याचे तुकडे तुकडे होणार. जरासे पाणी पडले की रंग उडून जाणार. अशी खेळणी घेऊन तो काय करणार? ती त्याच्या काय कामाची ?
मोहसिन माझा पखालवाला रोज सकाळ-संध्याकाळ पाणी देऊन जाईल.
महमूद आणि माझा शिपाई घराचे रक्षण करेल. कुणी चोर आला तर लगेच बंदुकीने त्याला गोळी घालेल.
सम्मी - आणि माझी धोबीण रोज कपडे धुवून आणेल.
हमीद त्या खेळण्यांना नावे ठेवत होता... मातीची तर आहेत. पडली की फुटून जाणार; पण आशाळभूतपणे त्या खेळण्यांकडे पाहत होता. त्या खेळण्यांना हात लावून पाहावे असेही त्याला मनापासून वाटत होते. त्याने तसा प्रयत्नही केला. पण कुणी त्याला खेळण्याला हात लावू दिला नाही.
खेळण्याच्या दुकानानंतर मिठाईची दुकाने होती. कुणी रेवड्या घेतल्या, तर कुणी गुलाबजाम, तर कुणी हलवा. ते मजेने मिठाई खाताहेत. हमीद त्यांच्यापासून वेगळा पडलाय. त्या बिचाऱ्याकडे तीनच पैसे आहेत... पण तो काही घेऊन खात का नाहीये? तो फक्त आशाळभूतपणे सगळ्यांकडे पाहतोय.
मोहसिन म्हणतो, "हमीद, रेवडी घे. बघ किती छान वास येतोय."
मोहसिन इतका उदार नाहीये हे हमीदला माहिती आहे. त्यामुळे त्याला संशय आला. कदाचित तो क्रूर चेष्टा करण्याच्या विचारात असेल असेही त्याला वाटले. तरीही तो पुढे सरसावला. मोहसिनने दोन रेवड्यांमधील एक रेवडी हमीदपुढे धरली. हमीदने ती घेण्यासाठी हात पुढे केला; पण त्याच वेळी मोहसिनने रेवडी झटकन तोंडात टाकली. महमूद, नुरे आणि सम्मी यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला.
मोहसिन - अच्छा हमीद, या वेळी नक्की देतो. अल्ला कसम! ही घे रेवडी.
हमीद - तुझ्याकडेच ठेव. माझ्याकडे पैसे नाहीत असे वाटले की काय तुला?
सम्मी तीन पैसे तर आहेत. तीन पैशांत काय काय घेशील?
महमूद माझ्यातला गुलाबजाम घे हमीद. मोहसिन बदमाश आहे.
हमीद - मिठाईत असे काय ठेवलेय ? पुस्तकात त्याबद्दल किती वाईट लिहिलेले असते?
मोहसिन पण मनातून मिळाली तर खावी असेच वाटत असेल ना! तुझे पैसे का काढत नाहीस?
महमूद - याची चलाखी मला माहिती आहे. जेव्हा आपल्याकडचे पैसे खर्च होतील तेव्हा आपल्याला वाकडे दाखवत हा काहीतरी घेऊन खाईल.
मिठाईच्या दुकानानंतर काही दुकाने लोखंडाच्या वस्तूंची आहेत. काही सोन्याचा मुलामा दिलेल्या नकली दागिन्यांचीही आहेत. मुलांना आकर्षण वाटण्यासारखे यात काहीही नाही. ती सगळी मुले पुढे निघून गेली. हमीद लोखंडी वस्तूंच्या दुकानासमोर थांबला. दुकानात कितीतरी प्रकारचे चिमटे ठेवलेले होते. आजीकडे चिमटा नाही हे त्याला आठवले. तव्यावरून रोटी उचलताना तिची बोटे नेहमी भाजतात. जर हा चिमटा घेऊन गेलो तर आजीला किती आनंद होईल ? मग तिची बोटे भाजणार नाहीत, घरात एक कामाची वस्तू होईल. रोट्या तव्यावरून काढा, मग चुलीतला विस्तव उचलून द्या. आजीला बाजारात जायला वेळ तरी कुठे मिळतो, आजीकडे पैसे तरी कुठे असतात. ती रोज आपली बोटे भाजून घेते... हमीदचे मित्र पुढे निघून गेले होते. कोपऱ्यावर सगळे जण सरबत पीत उभे होते. सगळे जण किती आपमतलबी आहेत. इतकी मिठाई घेतली पण मला कुणी काही दिली नाही. आजवर मी त्यांच्याशी खेळावे म्हणून मागे लागतात. आपले हे काम कर, ते काम कर म्हणून... आता कुणी काही काम सांगितले तर विचारीन की, मिठाई खाताना कसे वाटले? हमीद विचार करीत होता. त्याला असेही वाटले की... आजी चिमटा बघून धावत येईल. आजी आपल्या हातातून चिमटा घेऊन आनंदाने म्हणेल... माझ्या लेकराने माझ्यासाठी चिमटा आणला... तोंडाने आशीर्वाद देईल. मग शेजारपाजारच्या स्त्रियांना चिमटा दाखवेल... मग सगळ्या जणी हमीदने चिमटा आणला म्हणून माझे कौतुक करतील... किती चांगला मुलगा आहे असे म्हणतील. यांची खेळणी बघून यांना कोण दुवा देईल? मी गरीब आहे; पण कुणाकडे काही मागायला तर जात नाही ना? अब्बाजान कधीतरी येतीलच ना! अम्मादेखील येईल... मग यांना किती खेळणी हवीत असे मी विचारीन... एकेकाला टोपली भरून खेळणी देईन आणि मित्राशी कसे वागतात ते दाखवून देईन... एका पैशाच्या रेवड्या घ्यायच्या आणि एकट्यानेच खिजवत खायच्या, याला काय मित्र म्हणतात... मी चिमटा घेतला म्हणून सगळे खूप हसतील. हसू दे. मला काय त्याचे?...
त्याने दुकानदाराला विचारले, "हा चिमटा केवढ्याला दिला?"
दुकानदाराने त्याच्याकडे बघितले आणि दुसऱ्या गिऱ्हाइकाकडे बघत तो म्हणाला, "तो तुझ्या कामाचा नाही बाळ."
"विकायचा नसेल तर इथे का ठेवलाय?"
"विकायचा आहे तर, कुणी सांगितले नाही म्हणून?"
"मग केवढ्याला देता ते सांगत का नाही?"
"सहा पैसे लागतील."
हमीद नाराज झाला.
"ठीक आहे. पाच पैशाला देतो. घ्यायचा असेल तर घे, नाहीतर पुढे चालू लाग."
हमीदने हिंमत करून विचारले, "तीन पैशांत द्याल?" असे म्हणून तो दुकानदाराचे बोलणे ऐकायला नको म्हणून पुढे सरकला; पण दुकानदार रागावला नाही. त्याने त्याला बोलावले आणि चिमटा दिला. हमीदने बंदूक खांद्यावर ठेवावी तशा थाटात चिमटा खांद्यावर ठेवला आणि तो मित्रांजवळ आला... सगळे जण काय म्हणताहेत ते बघू या तरी, असा विचार त्याच्या मनात आला.
मोहसिन हसून म्हणाला, "वेड्या, हा चिमटा कशासाठी आणलास? त्याने काय करणार?"
हमीदने चिमटा जमिनीवर टाकला. म्हणाला, "जरा तुझ्या पाखालवाल्याला जमिनीवर टाकून बघ. सगळे तुकडे तुकडे होतील."
महमूद म्हणाला, "चिमटा म्हणजे काय खेळणे आहे?"
हमीद म्हणाला, "खेळणे का नाही? खांद्यावर ठेवला की बंदूक झाली. वाटले तर त्याच्यातून आवाज काढता येतो. फकीर काढतात तसा. हातात घेतला की, फकिराचा चिमटा झाला. चिमटा एकदा फिरवला की, एका फटक्यात तुमच्या खेळण्यांची जान जाऊ शकते. तुमच्या खेळण्यांनी काहीही ठरवले तरी ते माझ्या चिमट्याचे काहीही नुकसान करू शकणार नाहीत. माझा चिमटा वाघासारखा बहादूर आहे."
सम्मीने खंजिरी घेतली होती. तो म्हणाला, "माझ्या खंजिरीबरोबर बदलतोस? खंजिरी दोन आण्याची आहे."
हमीदने खंजिरीकडे तुच्छतेने पाहिले.
"माझा चिमटा खंजिरीचे पोटच फाडून टाकू शकेल. हे काय खेळणे आहे?... एक चामड्याचा तुकडा लावला की, ढबढब वाजू लागते. जरासे पाणी लागले की संपलेच. माझ्या बहादूर चिमट्याला ना आगीचे भय ना पाण्याचे..."
चिमट्याने सगळ्यांना मोहवून टाकले. पण पैसे कुणाकडेच उरले नव्हते आणि सगळी मुले मेळ्यापासून दूरही आलेली होती. घरी पोहोचण्याची सगळ्यांनाच घाई झाली होती. त्यामुळे वडिलांकडे हट्ट धरला तरी आता चिमटा कुणालाच मिळणे शक्य नव्हते... हमीद चलाख आहे. यासाठीच त्याने आपले पैसे वाचवून ठेवले होते...
आता मुलांचे दोन गट झाले. मोहसिन, सम्मी आणि नुरे एका बाजूला आणि हमीद एकटाच दुसऱ्या बाजूला. वाद सुरू झाला. सम्मी हमीदला जाऊन मिळाला. मोहसिन, महमूद आणि नूर हे हमीदपेक्षा एक-दोन वर्षांनी मोठे आहेत. हमीदच्या बोलण्याने ते दुखावले गेले; पण वादात हमीद वरचढ ठरतो आहे. एका बाजूला माती आहे आणि दुसऱ्या बाजूला लोखंड... जर एखादा वाघ आला, तर पखालवाल्याची भीतीने गाळण उडेल, शिपाई मातीची बंदूक टाकून पळून जाईल. आपल्या झग्यामध्ये तोंड लपवत वकीलसाहेब जमिनीवर पडतील; पण हा चिमटा रुस्तुमे-हिंद आहे. तो झटकन वाघाच्या मानगुटीवर बसेल आणि त्याचे डोळेच फोडेल...
मोहसिनने केविलवाणा प्रयत्न केला. "अच्छा तुझा चिमटा पाणी तर भरू शकणार नाही."
हमीदने चिमटा सरळ उभा केला आणि तो म्हणाला, “पखालवाल्याला नुसता दम दिला तरी तो पाणी आणून माझ्या अंगणात सडा टाकेल, तू आहेस कुठे?"
मोहसिनला एक नवी खोडी सुचली, "तुझ्या चिमट्याचे तोंड रोज आगीमध्ये भाजेल.'
त्याला वाटले की, हमीद यावर काहीच उत्तर देऊ शकणार नाही; पण असे झाले नाही. हमीदने लगेच उत्तर दिले, "आगीत बहादूर लोकच उडी घेतात बच्चमजी ! तुमचे हे वकील, शिपाई किंवा हा पखालवाला घरात घुसून बसतील. आगीमध्ये उडी रुस्तुम-ए-हिंदच घेऊ शकतात."
महमूदने अजून एक प्रयत्न केला. "वकीलसाहेब खुर्चीवर बसतील. तुझा चिमटा स्वयंपाकघरात पडून राहील."
महमूदच्या या तर्कामुळे सम्मी आणि नूर पुन्हा एकदा सजीव झाले... किती मुद्द्याची गोष्ट बोलला महमूद. चिमटा स्वयंपाकघरात पडून राहण्याशिवाय काय करू शकतो?"
हमीदला त्याच्या तोंडावर फेकण्यासाठी काही उत्तर सुचले नाही. त्याने गडबडून जाऊन काहीतरीच बोलायला सुरुवात केली.
"माझा चिमटा स्वयंपाकघरात पडून राहणार नाही. वकीलसाहेब खुर्चीवर बसतील तर तो त्यांना जमिनीवर ढकलून देईल आणि त्यांचा कायदा त्यांच्याच पोटात घालेल."
खरे म्हणजे हे उत्तर काही बरोबर जमलेले नव्हते; पण तरीही कायदा पोटात घालेल ही धमकी जमून गेली.
एखाद्या आठ आण्याच्या छोट्या पतंगाने मोठ्या पतंगाला काटल्यानंतर जसे आश्चर्याने बघत राहतात, तसे ते तिघे जण हमीदच्या तोंडाकडे पाहतच राहिले. हमीदने मैदान जिंकले होते. त्याचा चिमटा रुस्तुम-ए-हिंद ठरला होता. मोहसिन, महमूद, नुरे आणि सम्मी यांनीही हे कबूल केले होते.
विजेत्याला हरणाऱ्याकडून जो मानसन्मान मिळायला हवा तोही हमीदला मिळाला. त्या चौघांनी तीन-तीन, चार-चार आणे खर्च केले; पण कुणीही उपयोगी वस्तू आणलेली नव्हती. हमीदने तीन पैशांत बाजी मारलेली होती. आणि खरेच आहे, खेळण्याचा काय भरवसा. ते तुटणार, फुटणारच. हमीदचा चिमटा वर्षानुवर्षे तसाच राहणार. त्यांच्यात कराराच्या अटी ठरू लागल्या. मोहसिन म्हणाला, "तू तुझा चिमटा आम्हाला बघू दे आणि तू माझा पखालवाला बघ."
महमूदने आणि नुरेनेही आपली खेळणी हमीदला पाहण्यासाठी देऊ केली
.
हमीदला त्यात काहीच गैर वाटले नाही. चिमटा प्रत्येकाने हातात घेऊन बघितला आणि त्यांची खेळणीही हमीदने हातात घेऊन बघितली... खेळणी किती सुंदर आहेत!
हमीदने हरणाऱ्यांचे अश्रू पुसले. "मी तुम्हाला उगीच चिडवत होतो. हा लोखंडी चिमटा तुमच्या खेळण्यांशी बरोबरी करूच शकणार नाही... ही खेळणी बघा, किती जिवंत वाटताहेत. असे वाटते आहे की, आत्ता आपल्याशी बोलू लागतील."
पण मोहसिनच्या गटाला या गोष्टीमुळे दिलासा मिळाला नाही. चिमटा त्यांच्या मनात पक्का बसला.
3
अकरा वाजता सगळ्या गावात गडबड झाली. मेळ्यावरून लोक परत आले होते. मोहसिनच्या छोट्या बहिणीने पळत पळत येऊन त्याच्या हातातून पखालवाला ओढून घेतला आणि ती आनंदाने घरभर नाचत सुटली. नाचण्याच्या नादात तो पखालवाला तिच्या हातातून सुटला आणि जमिनीवर पडून फुटला. त्यावरून बहीण-भावात मारामारी झाली. दोघे जण रडू लागले. त्यांचा गोंगाट ऐकून त्यांची अम्मी चिडली आणि तिने दोन-दोन धपाटे त्यांच्या पाठीत घातले.
मियाँ नुरेच्या वकिलाचा अंत त्यांच्या प्रतिष्ठेप्रमाणे गौरवशाली झाला. वकील कोनाड्यात किंवा जमिनीवर तर बसू शकत नाही. त्यांच्यासाठी भिंतीमध्ये दोन खिळे ठोकले गेले. त्यावर एक फळी ठेवली गेली. मग वकीलसाहेब राजा भोजप्रमाणे सिंहासनावर विराजमान झाले. नुरेने त्याला पंख्याने वारा घालायला सुरुवात केली. पंख्याच्या हवेने किंवा त्याचा धक्का लागून कसे कुणास ठाऊक, पण वकीलसाहेब स्वर्गलोकातून मृत्युलोकात आले. त्यांचा मातीचा झगा मातीत मिसळला. खूप रडारड झाली आणि वकीलसाहेबांच्या अस्थी कचराकुंडीत टाकल्या गेल्या.
आता महमूदचा शिपाई राहिला होता. त्याला गावाच्या पहाऱ्याचे काम दिले गेले; पण पायी चालायला हा शिपाई साधा माणूस नव्हता. तो पालखीतून हिंडणार. म्हणून एक टोपली आणली गेली. त्यात लाल रंगाच्या कापडाचे तुकडे भरले गेले. त्यावर शिपाईसाहेब आरामात पडले. महमूद कशात तरी अडकून पडला. त्याच्या हातातील टोपली जमिनीवर पडली आणि शिपाई आपल्या बंदुकीसह जमिनीवर कोसळला. त्याचा एक पाय तुटला.
आता हमीदच्या घरात काय चालले आहे ते बघूयात. अमिना त्याचा आवाज ऐकून धावत आली आणि तिने त्याला प्रेमाने उचलून घेतले. त्याच वेळी त्याच्या हातातील चिमटा बघून ती चमकली.
"तू हा चिमटा कुठून आणलास?" "मी तो विकत आणलाय.."
"केवढ्याला?"
"तीन पैशाला."
अमिनाने कपाळावर हात मारून घेतला, "किती वेडा मुलगा आहे. दुपार होत आली. काही खाल्लेपिल्ले नाही. हा चिमटा घेऊन आला. मेळ्यात तुला इतर काहीच दिसले नाही?"
हमीद अपराधीपणे म्हणाला, "तुझी बोटं रोटी तव्यावरून तव्याव काढताना भाजतात म्हणून मी चिमटा आणला."
म्हातारीच्या रागाचे रूपांतर प्रेमात झाले. तिला शब्दच सुचेनात. या मुलाच्या मनातील त्यागाची भावना बघून तिला गलबलून आले... दुसरी मुले खेळणी घेताना पाहून किंवा मिठाई घेताना पाहून याचे मन लालचावले नसेल का? कसे आवरले याने आपल्या मनाला?... तिथेही त्याला माझ्या म्हातारीची आठवण यावी ना!... ती गहिवरली.
आणि एक विचित्र गोष्ट घडली. या चिमट्यापेक्षाही विचित्र. हमीद मोठा झाला आणि अमिना लहान मुलगी. ती रडू लागली. पदर पसरून ती हमीदला दुवा देत होती आणि रडत होती.
हमीदला यामागचे रहस्य मात्र समजले नाही.
अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ
ही उर्दू कथा प्रथम 'इस्मत' वार्षिक अंकात 1933 मध्ये प्रकाशित झाली. हिंदी अनुवाद मासिक पत्रिका 'चांद'च्या ऑगस्ट 1933 च्याअंकात प्रकाशित झाला.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या