डिजिटल अर्काईव्ह

आइन्स्टाईन, आंबेडकर, टागोर

आंबेडकरांचे स्वतःचे विचार, भूमिका व दृष्टिकोन समजून घेण्याच्या दृष्टीने हे भाषण विशेष महत्त्वाचे आहे. त्यामुळे, गेल्या वर्षी आम्ही अवधूत डोंगरे यांच्याकडे असा प्रस्ताव दिला होता की, आंबेडकरांचे हे भाषण आणि 'वेटींग फॉर वीजा' हा त्यांचा आत्मचरित्रामक दीर्घ लेख यांचे नव्याने अनुवाद करावेत आणि त्यांच्या छोट्या व आकर्षक पुस्तिका तरुणाईला भेट देण्यासाठी साधना प्रकाशनाकडून आणाव्यात. तेव्हा अवधूतने असे सांगितले की, "या भाषणाचा अनुवाद करून, त्याला सविस्तर टिपा यांचे शे-दिडशे पानांचे पुस्तक त्याच्या मनात आधीपासून आहे." त्याचा तो प्रस्ताव आम्ही तात्काळ स्वीकारला. प्रत्यक्षात अवधूतने ते काम संपवून आमच्याकडे पुस्तकाची संहिता पाठवली, तेव्हा भाषण पन्नास पानांचे आणि त्यावरील टिपा दीडशे पानांच्या, असे झाले आहे. हा मराठीतील एक अफलातून प्रयोग आहे. केवळ भाषण वाचणे हा बौद्धिक आनंदच असेलच, पण त्यावरील अगदी नेमक्या व अर्थपूर्ण टिपा यामुळे या भाषणातून मिळणारा बौद्धिक आनंद अनेक पटीने वाढेल.

साधनाचा हा मिनी विशेष अंक आहे, यात पाचच दीर्घ लेख आहेत. पण अनेक दालने खुली करणारे आहेत. कारण तीन व्यक्तींच्या संदर्भातील लेख यात आहेत आणि तिन्ही व्यक्ती विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जागतिक पातळीवर ठसा उमटवून गेल्या आहेत. शिवाय, मृत्यूनंतरच्या पाऊण शतकात भारतावर आणि जगातील अनेक समूहांवर गारुड करून राहिल्या आहेत. दिवसेंदिवस ते गारुड अधिक ठळक होत चालले आहे. त्या तिघांचीही कालसुसंगतता अधिकाधिक अधोरेखित होत चालली आहे, त्यांचे नित्य स्मरण जगभर वेगवेगळ्या ठिकाणी होत आले आहे. त्यामुळे, तिघांनाही 'महामानव' असे संबोधले जाते आहे.

आइन्स्टाईन यांची ओळख एक वैज्ञानिक अशी आहे, पण त्यांचे संशोधन (विशेषतः सापेक्षतावादावरील) विश्वाच्या रचनेचा अर्थ लावण्याच्या संदर्भात कलाटणी देणारे ठरले, मानवाच्या विचार करण्याच्या पद्धतीलाही त्यामुळे वेगळी दिशा मिळाली. 'काळ' ही चौथी मिती त्यांनी बहाल केली. परिणामी, सार्वजनिक चर्चाविश्वात स्थलसापेक्ष, व्यक्तिसापेक्ष, कालसापेक्ष असा त्रिस्तरीय विचार सर्वसंमत मानला जाऊ लागला. त्यामुळे, राजकीय असो व सामाजिक-सांस्कृतिक जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आइन्स्टाईन या व्यक्तिमत्त्वाला वेगळे ग्लॅमर प्राप्त झाले आहे. कलेच्या क्षेत्रात आणि त्यातही नाटक व सिनेमा क्षेत्रांतही आइन्स्टाईन यांच्याविषयी नेहमीच आदरयुक्त दबदबा राहिला. ऊर्जा, वस्तुमान आणि प्रकाशाचा वेग या सूत्रासाठी तर त्यांना जगभरातील शालेय मुलेही ओळखतात. त्यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांत मांडला तेव्हा ते वयाच्या पंचवीशीत होते, पुढील पन्नास वर्षे जागतिक स्तरावर त्यांची प्रतिष्ठा भूमितीच्या वेगाने वाढत गेली. त्यांचा मृत्यू होऊनही सात दशके उलटली तरी ती वाढ थांबलेली नाही. त्याला आणखीही काही कारणे आहेत. त्यांचे संशोधन अणुबाँब निर्मितीला कारणीभूत ठरले आणि त्याचा वापर दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने जपानविरुद्ध केला तेव्हा त्यांना प्रचंड धक्का बसला. 'युद्ध नको, शांतता हवी' या संदर्भात त्यांनी सातत्याने भूमिका घेतली. त्यासाठी जगभरातील वैज्ञानिक, कलावंत, मुत्सद्दी यांच्यासोबत प्रयत्न केले. जन्माने ज्यू धर्मीय असल्याने, हिटलरच्या राजवटीत त्यांना अमेरिकेत स्थलांतर करावे लागले. 1950 मध्ये इस्रायल हे ज्यूसाठीचे नवे राष्ट्र स्थापन झाले, तेव्हा त्या देशाचे अध्यक्षपद स्वीकारावे हा प्रस्ताव आइन्स्टाईन यांच्याकडे आला होता, पण त्यांनी तो नाकारला. आइन्स्टाईन यांच्या अभ्यासिकेत न्यूटन, फॅरेडे व अन्य काही वैज्ञानिकांच्या फोटो फ्रेम असणे साहजिक होते. मात्र अखेरच्या दशकभरात त्यांच्या अभ्यासिकेत महात्मा गांधी यांची फोटो फ्रेम लावलेली असे. गांधींना ते स्वतः कधी भेटलेले नव्हते. पण ते दोघे समकालीन होते. काही प्रमाणात त्यांचा पत्रव्यवहार झालेला होता. मात्र 1939 मध्ये गांधीजींच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आइन्स्टाईन यांनी पाठवलेले पत्र अजरामर ठरले. त्याच पत्रात, 'अशा प्रकारचा हाडामासाचा माणूस या पृथ्वीतलावर होऊन गेला यावर भावी पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत.' हे वाक्य आहे.

अशा या आइन्स्टाईन यांच्यावर जगभरातील विविध भाषांमध्ये अनेक नाटके, सिनेमे आले. त्यातीलच एक छोटे नाटक म्हणजे 'आइन्स्टाईन'. गॅब्रियल इमॅन्युअल या कॅनडामधील नाटककाराने ते 1985 मध्ये लिहिले. त्याचा इंग्रजी प्रयोग भारतातील प्रख्यात अभिनेते नसीरुद्दीन शहा हे मागील दशकभर करत आले आहेत. ते प्रयोग पुणे, मुंबई व भारतातील प्रमुख शहरांत होतात. त्यामुळे इतर ठिकाणच्या रसिकांना त्यापासून वंचित राहावे लागते. अर्थात, नाटक हे रंगभूमीवर पाहण्याचे माध्यम आहे. आइन्स्टाईनसारखा विषय तर मूळ इंग्रजी भाषेतच पाहायला हवा. त्यामुळे नसीरुद्दीन शहा यांचा प्रयोग पाहणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र विविध भाषांमध्ये त्याचे अनुवाद यायला हवेत. त्याचा मराठी अनुवाद विश्वास सहस्रबुद्धे यांनी केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी त्या नाटकाच्या मराठी अभिवाचनाचे व सादरीकरणाचे हक्कही मिळवले आहेत. त्यामुळे, त्या नाटकाची मराठी संहिता (40 ते 50 पानांचे छोटे पुस्तक) साधना प्रकाशनाकडून आणत आहोत. 18 एप्रिल 2026 रोजी आइन्स्टाईन यांच्या 71 व्या स्मृतिदिनी ते प्रकाशित करीत आहोत. त्याच्या पूर्वसंध्येला साधना साप्ताहिकाच्या कार्यालयात, त्या नाटकाचे अभिवाचन स्वतः विश्वास सहस्रबुद्धे निवडक 25 ते 30 जणांच्या उपस्थितीत करणार आहोत. त्या निमित्ताने, या नाट्यसंहितेमधील सुरुवातीचा एकतृतीयांश भाग प्रस्तुत अंकात घेतला आहे. उर्वरित दोनतृतीयांश भागाची उत्कंठा यामुळे वाढेल. हे नाटक विचारप्रधान व संकल्पनाप्रधान आहे. आइन्स्टाईन हा विषय प्रचंड मोठा आहे. त्यातील अगदी छोटासा भाग या नाटकातून पुढे येणार आहे. त्यामुळे, अशा नाटकातून प्रत्यक्षात काय मिळाले यापेक्षा आइन्स्टाईनकडे पुन्हा एकदा नव्याने पाहता येणार आहे. युद्ध आणि शांती, विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्याकडे लक्ष वेधण्यासाठी हे नाटक काही अंशी तरी उपयुक्त ठरेल.

साधना साप्ताहिक व प्रकाशनाकडून गेल्या दशकभरात 'दलपतसिंग येति गावा' (माहिती अधिकार कायदा व अरुणा रॉय), 'सत्यशोधक' (महात्मा फुले व सावित्रीबाई) आणि 'भूमिका' (डॉ. आंबेडकर व आरक्षण) या नाटकांवर विशेषांक काढले होते, नंतर त्यासंदर्भात काही पुस्तकेही आणली होती. त्याची पुढची कडी म्हणून आइन्स्टाईनच्या नाट्यसंहितेकडे आम्ही पाहतो आहोत. हे एवढ्यावर थांबणार नाही. आइन्स्टाईन आणि सापेक्षतावाद यांच्या संदर्भात आणखी काही लेखन व पुस्तके साधना प्रकाशनाकडून आगामी काळात विचाराधीन आहेत.

या अंकातील दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 101 व्या जन्मदिनी (18) जानेवारी 1943 रोजी) पुणे येथे "रानडे, गांधी अँड जीना" या विषयावर इंग्रजीत दिलेले भाषण. तेव्हा डॉ. आंबेडकर यांची राजकीय कारकीर्द शिखरावर होती, भारतातील सर्वोच्च नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. मात्र गांधी आणि जीना यांचे ते प्रखर टीकाकार होते. अशा पार्श्वभूमीवर त्यांनी केलेले हे भाषण सर्वदूर वाचले गेले आहे. इंग्रजीत तर ते उपलब्ध आहेच, पण भारतातील अन्य भाषांमध्येही गेलेले आहे. आणि मराठीतही त्याचे दोन किंवा तीन अनुवाद वेगवेगळ्या काळात झालेले आहेत. गांधी आणि जीना यांच्याविषयी त्यात अगदी थोडे आहे. आंबेडकरांचे स्वतःचे विचार, भूमिका व दृष्टिकोन समजून घेण्याच्या दृष्टीने हे भाषण विशेष महत्त्वाचे आहे. त्यामुळे, गेल्या वर्षी आम्ही अवधूत डोंगरे यांच्याकडे असा प्रस्ताव दिला होता की, आंबेडकरांचे हे भाषण आणि 'वेटींग फॉर वीजा' हा त्यांचा आत्मचरित्रामक दीर्घ लेख यांचे नव्याने अनुवाद करावेत आणि त्यांच्या छोट्या व आकर्षक पुस्तिका तरुणाईला भेट देण्यासाठी साधना प्रकाशनाकडून आणाव्यात. तेव्हा अवधूतने असे सांगितले की, "या भाषणाचा अनुवाद करून, त्याला सविस्तर टिपा यांचे शे-दिडशे पानांचे पुस्तक त्याच्या मनात आधीपासून आहे." त्याचा तो प्रस्ताव आम्ही तात्काळ स्वीकारला. प्रत्यक्षात अवधूतने ते काम संपवून आमच्याकडे पुस्तकाची संहिता पाठवली, तेव्हा भाषण पन्नास पानांचे आणि त्यावरील टिपा दीडशे पानांच्या, असे झाले आहे. हा मराठीतील एक अफलातून प्रयोग आहे. केवळ भाषण वाचणे हा बौद्धिक आनंदच असेलच, पण त्यावरील अगदी नेमक्या व अर्थपूर्ण टिपा यामुळे या भाषणातून मिळणारा बौद्धिक आनंद अनेक पटीने वाढेल. अशा प्रकारचे प्रयोग मराठीत मोठ्या प्रमाणात व्हायला हवेत, त्यातूनच सार्वजनिक चर्चाविश्व अधिक गतीने पुढे जाईल. महान व्यक्तींवरील आपल्याकडील चर्चा (गांधी, नेहरू, आंबेडकर इत्यादी) पुन्हा पुन्हा त्याच त्याच वर्तुळात, त्याच त्या परिघात फिरत राहतात. त्यातून एक प्रकारचे साचलेपण येते. त्यामुळे, महान व्यक्तींचे विचारकार्य प्रवाहित राहण्यासाठी असे अभ्यास आवश्यक आहेत. त्यांना मुळापासून समजून घेण्यासाठी आणि आपली आजची उद्याची वाटचाल अधिक सुसह्य करण्यासाठीही. त्यामुळेच आंबेडकरांच्या भाषणातील सुरुवातीचा एकपंचमांश भाग आणि भाषांतरकाराची प्रस्तावना प्रस्तुत अंकात घेतली आहे.

या पुस्तकाला निमित्त न्यायमूर्ती रानडे यांचे झाले आहे. त्यांचे 125 वे स्मृतिवर्ष नुकतेच संपले. गेल्या वर्षी आम्ही न्यायमूर्ती रानडे यांच्या तीन इंग्रजी ग्रंथांचे (प्रथमच केलेले) मराठी अनुवाद एकाच वेळी प्रकाशित केले आहेत. येत्या 1 मे रोजी त्याच मालिकेतील रानडे यांचे चौथे पुस्तक (इंडियन स्टेट्स) प्रकाशित करणार आहोत. या चारही पुस्तकांचे अनुवाद अवधूत डोंगरे यांनीच केले आहेत. न्यायमूर्ती रानडे हे भारताचे प्रबोधन पुरुष मानले जातात. 19 व्या शतकाची अखेरची साडेतीन दशके त्यांनी केवळ महाराष्ट्राला नाही तर भारतातील राजकीय, सामाजिक वर्तुळाला प्रभावित केले होते. त्यांचा वैचारिक वारसा विस्मृतीत गेला असे वरवर पाहताना दिसते आणि त्यांचे नाव घेणारे लोकही कमी झालेत असेही वाटते. मात्र त्यांचे विचार, कार्यपद्धती व दृष्टिकोन यांचा अंतर्भाव अनेक लहान-थोरांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात केलेला आहे. त्यामुळे रानड्यांची स्वीकारार्हता मानली जाते त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.

या अंकातील तिसरा विषय म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांनी एप्रिल व मे 1924 मध्ये चीनला दिलेली भेट. साहित्याचे नोबेल मिळाल्यामुळे जागतिक स्तरावर त्यांना बोलावणे येत होते. पूर्व व पश्चिम संस्कृतीचा संगम करण्याची गरज, हे त्यांचे मध्यवर्ती प्रतिपादन होते. तेव्हा पहिले महायुद्ध होऊन गेले होते. भारतीय स्वातंत्र्यलढा गांधींच्या नेतृत्वाखाली तळपत होता. रशियात लेनिनच्या नेतृत्वाखाली क्रांती झाली होती. चीनमध्ये माओचे आगमन झालेले नव्हते, पण क्रांतीचे वारे वाहात होते. या पार्श्वभूमीवर चीनमध्ये टागोरांना बोलावले गेले होते. त्या काळात चीनमध्ये 'शांती आणि क्रांती' अशा दोन प्रवाहांचे नेते कार्यरत होते. साहजिकच, टागोरांच्या भेटीमुळे वादळ निर्माण झाले. त्या भेटीत त्यांनी 30 पेक्षा अधिक ठिकाणी इंग्रजीतून भाषणे दिली, ती सर्व भाषणे आठ विभागांत संकलित करून 'टॉक्स इन चायना' या पुस्तकात आली आहेत. त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद साधनाकडून प्रकाशित करावा असा विचार मागील दशकभरापासून आमच्या मनात होता. 2013 मध्ये रामचंद्र गुहा यांनी चीनला भेट दिली आणि त्यावर आधारित दीर्घ लेख साधनाकडे पाठवला, त्याचा अनुवाद प्रसिद्ध करताना 'टॉक्स इन चायना' या पुस्तकातील एक भाषणही अनुवादित (अनुवाद : सुमन ओक) करून घेतले. गुहा व टागोर यांच्या त्या दोन दीर्घ लेखांचा अनुवाद असलेला तो अंक होता.

मात्र दीड वर्षांपूर्वी सानिया कर्णिक या युवतीचा एक लेख पहिल्यांदा साधनाकडे आला. चिनी भाषेच्या स्पर्धेत भारतातून प्रथम क्रमांक मिळाला, म्हणून तिला चीनभेटीचे निमंत्रण मिळाले होते, त्या भेटीवर आधारित तो लेख होता. 2024 साधना युवा दिवाळी अंकात तो प्रकाशित केला. त्याच दरम्यान 'ट्रान्सलेशन स्टडीज'मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी तिची निवड बीजिंग विद्यापीठात झाली होती. त्यानंतर तिचे आणखी सात-आठ लेख साधनातून प्रसिद्ध झाले. ते सर्व लेख चीनमधील तिच्या भ्रमंतीवर व अनुभवावर आधारित आहेत. गेल्या वर्षी युवकदिनाच्या निमित्ताने 'दोन युवतींचा संवाद' हा कार्यक्रम साधनाने आयोजित केला, त्यात ती सहभागी झाली (तेव्हा गौरी देशपांडे व सानिया यांनी परस्परांच्या मुलाखती घेतल्या). तेव्हा तिचे मराठी, इंग्रजी व चिनी या तिन्ही भाषांवरील प्रभुत्व लक्षात आले. म्हणून तिला 'टॉक्स इन चायना' या पुस्तकाचा अनुवाद करण्याचा प्रस्ताव दिला. त्यासाठी ग.प्र. प्रधान संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने अभ्यासवृत्ती दिली. तिने त्या पुस्तकाचा अचूक व प्रवाही अनुवाद तर केलाच, पण टागोरांच्या त्या चीन भेटीत काय काय घडले याचाही अभ्यास केला. त्यासाठी चिनी भाषेतील लेखन मिळवले. चिनी माध्यमांमध्ये आलेले वाद संवाद समजून घेतले. आणि त्या भेटीच्या निमित्ताने झालेल्या वाद संवादाचा परामर्श घेणारा दीर्घ लेखही लिहिला. हा सर्व ऐवज 'टॉक्स इन चायना' या अनुवादित पुस्तकात समाविष्ट करणार आहोत. त्या पुस्तकातील टागोरांचे पहिले भाषण आणि वादसंवादावरील लेख प्रस्तुत अंकात प्रसिद्ध करीत आहोत. त्या भेटीला आता 102 वर्षे पूर्ण होत असताना. त्यामुळे, पुढील महिन्यात साधना प्रकाशनाकडून येणाऱ्या त्या पुस्तकाविषयीचे कुतूहल जाणकार वाचकांच्या मनात बरेच वाढले तर आश्चर्य वाटायला नको. मात्र चीन विषयी सतीश बागल यांनी चार वर्षांपूर्वी साधना साप्ताहिकातून लिहिलेली लेखमाला आणि नंतर त्याचे साधना प्रकाशनाकडून आलेले गंभीर वैचारिक पुस्तक, या ऐवजाकडेही या निमित्ताने लक्ष जावे अशी आमची अपेक्षा आहे.

तर आइन्स्टाईन, आंबेडकर व टागोर यांच्या संदर्भातील अनुवादित लेखन आणि त्यांची पार्श्वभूमी सांगणारे लेखन या अंकात दिले आहे. हे लेखन वाचून वाचकांना मूळ पुस्तकांकडे, मूळ विषयांकडे वळावेसे वाटेल अशी आम्हाला आशा आहे. आणि अर्थातच, अधिक सजग, अधिक चिकित्सक व अधिक निकोप दृष्टीने त्याकडे पहावे अशीही आमची विनंती आहे.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी