डिजिटल अर्काईव्ह

मुस्लिम मनाचा शोध: एक यात्रा.. आठवणींची...बदलांची 

त्या लहान वयातही मला स्पष्ट आठवतंय की ओकारीचं कारण माझ्या मनात मुस्लिम लोकांबद्दल असलेली अढी आहे, हे मला कळून चुकलं होतं. मुख्य म्हणजे माझ्या वडिलांच्या मनामध्ये अशी अठी नाही; आणि माझ्यात आहे, असंही प्रकर्षाने जाणवलं. एक प्रकारची अपराधी भावना निर्माण करून गेला तो अनुभव. 

कारण तो विषयच तसा असतो. एखादं पुस्तक आपल्या मनावर का ठसा उमटवून जातं, याचं दुसरं काही उत्तर मला मिळालं नाही, आजपर्यंत माझ्या माहितीतील इतरांनाही मिळालं नाही. विषयाच्या मांडणीचे अनेक प्रकार असू शकतात, पण जोपर्यंत पुस्तकात जे लेखकाला सांगायचंय त्याची आणि वाचकाच्या संवेदनांची व अनुभवांची सांगड घातली जात नाही, तोपर्यंत कोणताही विषय मनावर आघात करू शकत नाही. म्हणूनच अनेक पुस्तकप्रेमींना वाटत आलं आहे की, प्रत्येक पुस्तकाची त्याच्या आयुष्यात यायची एक वेळ असते. असं टायमिंग धलेलं पुस्तक बरंच काही देऊन जातं. हिंदू-मुस्लिम तेढ हा अनेक पुस्तकांचा, चित्रपटांचा विषय आहे. वर्षानुवर्षे चघळलेला विषय आहे, त्यात नवे काय असणार? पण महत्त्वाची बाब अशी की हिंदू-मुस्लिम तेढ, एकमेकांबद्दल असलेल्या तीव्र आणि अत्यंत नकारात्मक भावना, आकस आणि अढी पिढ्यान् पिढ्या दोन्ही समाजांनी आपापल्या मनावर, मुलाबाळांच्या मनावर कळत-नकळत बिंबवली आहे. फाळणीला पंचावन्न वर्षं होऊन गेली तरीही सल कायम आहे. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मुस्लिम समाजाबद्दल माझी मानसिकता बरीचशी गोंधळलेली, सुस्पष्ट नसलेली अशीच होती. लहानपणी माझे कित्येक मित्र मुस्लिम होते आणि त्यांतले काही अगदी जवळचेदेखील होते. 

नाव ठेवण्याजोगे त्यांच्यात काही नव्हते. काही अभ्यासात, तर काही खेळामध्ये पुढे येत होते. त्यांची भाषा शुद्ध नसली तरी न पटण्यासारखे ते काही बोलत नव्हते. एकीकडे असा चांगला अनुभव तर दुसरीकडे शिवाजीच्या गोष्टींवर व पुस्तकावर वाढणारा मी आणि माझे हिंदू मित्र, त्यातला मोगल हा शत्रू आहे, तो औरंगजेबासारखा आपल्या वडीलधाऱ्यांनादेखील कपाटाने मारणारा असतो; आया-बहिणींवर अत्याचार करणारा असतो, असे वाचत होतो. मुस्लिम समाजाची एक प्रतिमा मनात तयार होत होती. प्रत्यक्ष अनुभवाशी सांगड घालण्याची ना कुवत होती; ना पात्रता. अनुभवाचं विश्व वेगळं होतं, आणि पुस्तकातल्या गोष्टीतून नकळत एक वैर निर्माण होत होतं. पण एखादा अनुभव असा येतो की, असा दुभंग अचानक समजून येतो.मी सातवी आठवीतच असेन. माझ्या वडिलांच्या बरोबर त्यांच्या मित्राकडे जेवायला गेलो होतो. माझे वडील होते डॉक्टर, सुधारक आणि काहीसे पाश्चात्य विचारांचे. त्यांच्या मुस्लिम मित्राने जेवायचे आमंत्रण दिले होते आणि आम्ही दोघे सायंकाळी हजर झालो. हे मुस्लिम कुटुंब अलाहाबादजवळ गाव असलेलं. मिठ्ठास नबाबी भाषा आणि अगत्याने आदरातिथ्य करणारं. माझे वडील त्यांच्या गप्पात रंगून गेले तरी मला अस्वस्थता जाणवत होती. जेवताना ताटात कित्येक अनोळखी पदार्थ होते, चांगले लागले असतीलही, पण नकोसे वाटत होते. आम्ही दोघे घरी परतल्यावर मी भडाभडा ओकलो. माझ्या वडिलांना जेवण गोड लागलं, पण मला ते पचलंच नाही. त्या लहान वयातही मला स्पष्ट आठवतंय की ओकारीचं कारण माझ्या मनात मुस्लिम लोकांबद्दल असलेली अढी आहे, हे मला कळून चुकलं होतं. मुख्य म्हणजे माझ्या वडिलांच्या मनामध्ये अशी अढी नाही; आणि माझ्यात आहे, असंही प्रकर्षाने जाणवलं. एक प्रकारची अपराधी भावना निर्माण करून गेला तो अनुभव. अपराधी मन परतफेड करायला बघत असतं, त्यासाठी संधी शोधत राहतं. आपण एका मुस्लिम कुटुंबाला विनाकारण वाईट समजली. त्यांना समजून घेतलंच नाही. असं मला सारखं वाटत राहिलं. अशी भावना घरात फिरणाऱ्या उंदरासारखी असते ती जाणवत राहते, त्रास देत राहते, काढून टाकणं कठीण असतं.
000

एशियन पेंटसमध्ये काम करताना कित्येक वर्ष मी वर्षातील शंभर दिवस फिरतीवर असे. एअर पोर्टवर पुस्तक विकत घ्यायचं आणि प्रवासात ते संपवून टाकायचं असं मी सतत करीत होतो. मुंबईच्या सांताक्रूझ विमानतळावरील दुकानात मी 'अंडरस्टेंडिंग द मुस्लिम माईंड' बघितलं आणि सर्वप्रथम लेखकाचं नाव शोधलं. राजमोहन गांधींचं हे पुस्तक बऱ्यापैकी नावाजलेलं, पण मी त्याबद्दल ऐकलं नव्हतं. राजमोहन गांधी ऐकून ठाऊक होते. सी राजगोपालाचारी व महात्मा गांधी ह्या दोन्ही टोलेजंग व्यक्तिमत्त्वांचा नातू हा राजमोहन गांधी! मी तात्काळ पुस्तक तिकत घेतलं. आठ सुप्रसिद्ध मुस्लिम नेत्यांचं चरित्र त्यात होतं. या आठ व्यक्तींचा शक्य तितक्या प्रामाणिकपणे आणि योग्य रीतीने अभ्यास करून, आणि त्याच्यातून मुस्लिम मानस समजून घेण्याचा तसंच जे मला समजलं, ते इतरांपर्यंत पोचवण्याचा उद्देश या ग्रंथाचा आहे, असा प्रस्तावनेतच खुलासा आहे. उत्तम चरित्रकाराला त्याचा नायक कसा होता ते व्यवस्थित पेश करावं लागतं. त्याचे स्वभावविशेष, त्यांच्या जीवनातील कलाटणीचे क्षण, परिस्थितीचा त्याच्यावर आणि त्याचा परिस्थितीवर होणारा प्रभाव असे अनेक पैलू लेखकाला अचूक पकडावे लागतात. केवळ नेता मोठा होता म्हणून त्याचं चरित्र, त्यातील प्रसंग भडकपणे रंगवता येत नाहीत, आणि तसं केलं तर वाचक प्रतिसाद देत नाहीत. ज्या आठ मुस्लिम नेत्यांची संक्षिप्त चरित्रं पुस्तकात आहेत, म्हणजे सईद अहमद खान, मुहम्मद इक्बाल, मुहम्मद अली, मुहम्मद अली जीना, फाजल उलहक, अबुल कलाम आझाद, लियाकत अली खान, झाकीर हुसेन. पाकिस्तानच्या निर्मितीत जीनांचा सहभाग वेगळा सांगायला नकोच तो सर्वश्रुत आहे. लियाकत अली पाकिस्तानचे पंतप्रधान होते तर झाकीर हुसेन भारताचे राष्ट्रपती होते, हे सर्वांना माहीत असेलच. पण पुस्तकाबद्दल बरंच काही थोड्या अवकाशाने. 
000

अकरा जानेवारी 1994 रोजी आपल्याच कंपनीतील नझीम अली कादरीच्या घरी काही जण छप्पराचा पत्रा फोडून आले. बाहेर काहीजण दरवाजा ठोठावीत होते. कादरीने दरवाजा उघडला नाही. हिंदू-मुस्लिम दंग्यांनी मुंबईत भयंकर वळण घेतलं होतं. जरी ती आग शमत आली होती तरी कादरी कुटुंबियांना भीती वाटतच होती. ती भीती त्यादिवशी खरी ठरली होती. कादरीने मुलीला बाजूच्या खोलीत दडवले आणि बाहेरून कडी घातली. मारेकऱ्यांनी तलवारी व चाकूचे अनेक वार केले. कादरीची पत्नी मध्ये पडली. तीदेखील मारेकऱ्यांच्या हल्ल्यातून सुटली नाही. कादरीच्या मुलाला त्यांनी भोसकले, त्यांच्यावर वार केले. रक्तबंबाळ मुलाला घेऊन कादरी बडवाईक हॉस्पिटलकडे धावला. वाटेत रिक्षावाला चांगला भेटला, त्याने हॉस्पिटलला दोघांना नेले, कारण कादरी स्वतःही रक्तबंबाळ होता. बडवाईक हॉस्पिटलमधून सरकारी हॉस्पिटल आणि तेथून सायन हॉस्पिटल अशी परवड कादरीची आणि त्याच्या कुटुंबियांची झाली. पतीच्या काळजीने कादरीच्या पत्नीने त्याला हॉस्पिटलमध्ये देखील सोडलं नाही. त्याच्या खाटेच्या जवळपास ती राहिली. एक प्रकारची भयंकर भीती दोघांनाही ग्रासून राहिली हॉस्पिटलमधून कादरी आपल्या मुलांसकट नायगावला पोलीस क्वॉर्टर्समध्ये मुक्कामाला गेला. त्याचा भाऊ पोलिसात आहे. मला कळल्यावर मी कादरीला भेटायला गेलो. आयुष्यात मी कधीही विसरू शकणार नाही असा प्रसंग. पोलीस कॉर्टर्समध्ये दुसऱ्या की तिसऱ्या मजल्यावरच्या खोलीत कादरी राहत होता. साधारणसाच प्रकाश असलेली खोली, फर्निचरही विशेष काही नव्हतं. एकूण वातावरण उदास होतं. कादरी खाली चटईवर बसला होता लुंगी आणि अंगावर टॉवेल घेऊन. मल पाहून त्याला गहिवरून आलं, कित्येक मिनिटं तर तो काही बोलूच शकला नाही. मलाही काय बोलायचं सुचत नव्हतं. कादरीची अवस्था बघवत नव्हती. आम्ही दोघेही कितीतरी वेळ नुसतेच बसलो होतो. एक शब्दही न बोलता दोघांच्याही डोळ्यांत पाणी होतं. 

मी जी काही खंबीर मनाची माणसं बघितली आहेत, त्यात कादरी एक आहे. "फार मारलं साहेब." तो म्हणाला आणि त्याने पाठ फिरवून वार दाखवले. उकडलेल्या बटाट्यामध्ये जशा भेगा दिसतात तशी वीस पंचवीस तरी - आणि यात अतिशयोक्तीचा अजिबात भाग नाही. त्याच्या पाठीव दिसत होत्या. काही डोक्यावरही दिसत होत्या. कादरी कसा काय वाचला, अल्लाच जाणे. कल्याणमध्ये राहून हिंदू-मुस्लिम दंगलीचं स्वरूप फार जवळून बघितलं आहे. घरं जाळताना पाहिली आहेत. भिवंडीच्या दंगलीनंतर माणसं घर सोडून जाताना बघितली आहेत, पण माझ्या माहितीतील कुणालाही मारलं गेलं नव्हतं. दंगलीची झळ आपल्यापर्यंत पोचत नाही तोपर्यंत, मला वाटतं, आपल्याला एका बेफिकिरीने, त्रयस्थपणे अशा घटनांकडे बघता येतं. (किंवा आपण तसं सोयीनं बघतो आणि ही दुर्दैवाची बाब आहे.) कादरीची पत्नी घरात नव्हती. शेजाऱ्यांकडे गेली होती. मी आल्याचं कळल्यावर तीदेखील लगेच आली. कादरीच्या आणि माझ्यामध्ये एक पाण्याचा तांब्या आणि ग्लास ठेवून जायला लागली. " थांब " कादरी म्हणाला. "बघा तिला किती लागलंय." कादरीच्या पत्नीने मानेजवळच्या, गळ्याजवळच्या जखमा दाखवल्या. तिच्या गालावर आणि कपाळावर जखमा त्या. चॉपरचे वार होते. भांडूप कारखान्याच्या संपाच्या वेळी मी 'हाफ मर्डर' असा एक विचित्र शब्द ऐकला होता. मर्डर हाफ कसा काय असेल? असं विचारून हसलो होतो. इथं तर डोळ्यांसमोर हाफ मर्डर दिसत होता. पुन्हा भांडूपच्या त्याच घरात जायला कादरीच्या पत्नीने नकार दिला. कादरीने तिचं म्हणणं मानलं, दुसरीकडे जागा शोधायला लागला. कादरीची परवड बघून मला वाटलं की, त्याला वेळी आर्थिक मदत करायला हवी. मी त्यावेळच्या युनियन कमिटीशी बोललो. आपण सर्व वर्गणी काढू म्हटलं. कोणी स्पष्ट शब्दांत नाही म्हटलं नाही री कुणीही उत्तरच दिलं नाही. स्टाफ व कामगारांनी काही विशिष्ट रक्कम गोळा केली असती तर मॅनेजमेंटकडूनही तशीच रक्कम मिळवता आली असती. पण युनियनचे कमिटी मेंबर्स मूग गिळून होते. कादरी वर्षानुवर्षे त्याच युनियनचा सभासद होता आणि कित्येकदा त्याच्या खात्याचा प्रतिनिधी देखील. सहकर्मचाऱ्याच्या मदतीला राजकीय पक्षाचा पवित्रा आडवा आला होता. कंपनीकडून पन्नास हजार रुपयांची तात्कालिक मदत झाली, पण युनियन कमिटी मेंबर्सना आर्जवे करूनही त्यांचे मन वळवू शकलो नाही, ह्याची खंत मला नेहमीच राहिली. 
000

मुस्लिम समाज दुरावायला जी अनेक कारणं आहेत, त्यांतील एक म्हणजे एक प्रकारची एक्सक्लूजनची भावना. म्हणजे आम्ही तुमच्यातलेच आहोत ना. असं सतत वाटत राहतं. द मग अगदी आपल्यातलाच कादरी ज्या युनियनचा वर्षानुवर्षे सभासद असतो. त्या युनियनकडून दुर्लक्षिला जातो, उपेक्षिला जातो. 'अंडरस्टैंडिंग मुस्लिम माइंड' वाचताना (एकतर आठ मुस्लिम नेत्यांची माणूस म्हणून ओळख तर होतेच) पण हा उपेक्षेचा खेळ अनेकदा दिसतो. डॉ. झाकीर हुसेनबद्दल पुस्तकातील उतारे इथे देतो आहे. (स्वयं भाषांतर) " आणि ते उपराष्ट्रपती असल्याने त्यांना अनेक ठिकाणांहून आमंत्रणे येत असत. स्वभाव विनम्र असल्यामुळे ते त्यांतील बरीचशी स्वीकारत असत. आणि जर ओळखीच्या जागी गेले तर ते तेथील त्यांच्या ओळखीच्या माणसांना जरूर भेटत असत. शिपाई, माळी, ड्रायव्हर, वगैरे मंडळी जी भारताच्या उपराष्ट्रपतींना भेटायला चाचरत असत, त्यांना आठवणीने बोलावून घेऊन, त्यांचा हात हातात घेऊन कधी गळाभेट करून त्यांची चौकशी करत. आणि जर का अशा मंडळींनी त्यांची विचारपूस केली, ख्याली-खुशाली विचारली, तर झाकीर हुसेनना कृतज्ञता वाटत असे. मनुष्य स्वभावावरील माझा विश्वास अशाच माणसांमुळे टिकून राहतो असं ते मुजीबला (झाकीर हुसेन यांचा चरित्रकार) म्हणत.नेहरू गेल्यानंतर वर्षभरातच भारत-पाकिस्तान युद्ध झालं. जेव्हा ह्या शेजाऱ्यांत युद्धाचा भडका उडतो, तेव्हा भारतातील मुस्लिम जनतेला असे प्रश्न भेडसावतात, जे त्यांच्या हिंदू बांधवांना सतावत नाहीत. मुस्लिमांना वाटतं की त्यांच्या निष्ठेबद्दलच संशय घेतला जात आहे, आता भारतात हिंदू-मुस्लिम संबंध धोक्यात येतील, असं त्यांना वाटत राहतं. झाकीर हुसेनच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या प्रश्नाला तिसरी बाजू होती. त्यांचे बंधू डॉ.युसूफ हुसेन हे तर पाकिस्तानातच प्राध्यापक होते. पासष्टच्या युद्धापूर्वी झुल्फिकार अली भुट्टो दिल्लीत आले होते. त्यावेळी ते प्रेसिडेंट आयुब खान यांचे सल्लागार होते. इंटरनॅशनल सेंटरला आयोजित केलेल्या भोजनासमयी भुट्टो आणि एका आय.सी.एस. अधिकाऱ्यांच्या मधोमध झाकीर हुसेन बसले होते. 

भुट्टोंनी आय.सी.एस. ऑफिसरबरोबर सतत संभाषण केलं. चांगला चरित्रकार त्याच्या नायकांना माणसांसारखंच त्यांच्या गुणदोषासहित चितारतो. मला 'अंडरस्टैंडिंग मुस्लिम माईंड' पुस्तकात आठ मुस्लिम नेते तर दिसलेच पण त्यांच्यातला मोठेपणा-कोतेपणा दिसला. त्यांच्या प्रश्नाची अधिक चांगली आणि सर्वंकष जाणीव झाली. कुठेतरी मनातली अढी हळूहळू लोप पावली. पण अशी अढी मनात आलीच का होती? शिवाजीची पुस्तकं वाचून की आजूबाजूंच्यांचे विचार ऐकून? मला वाटतं की त्याचं नक्की असं उत्तर देता येणार नाही. ही सर्व कारणं आहेत, पण कोणतंही एकच कारण जबाबदार नाही. कदाचित मुस्लिम बांधवांविषयीची अढी मनातून जाण्याचीही अशीच अनेक कारणं असतील. पण एकदा एखादा विचार तुम्हांला पटला की, तशाच विचारांचे लेख, पुस्तकं, आपण वाचतो. हाच लेख लिहिताना 'अक्षर दिवाळी' अंकातील एका पाकिस्तानी आणि भारतीय पत्रकारांचे भारत आणि पाकिस्तानी भेटीवरचे लेख वाचले. माझ्या नव्या मानसिकतेला अधिक घट्ट करून गेले. पण 'अंडरस्टैंडिंग.' पुस्तकाचा मनावर झालेला परिणाम ठळक आणि स्पष्ट होता. बाबरी मशीद तोडली. त्यानंतरच्या तुतारीच्या अंकात मी 'अंडरस्टॅडिग'. पुस्तकाची प्रस्तावना मराठीत भाषांतर करून तात्काळ छापली. आणि माझ्यातील बदलाचं मलाच एक प्रकारचं समाधान वाटलं. 11 जानेवारी 2004 रोजी योगायोगाची गोष्ट अशी की, कादरी मला भेटायला घरी आला होता. मी दोन महिने आजारी असल्याचं त्याला कळलं होतं. साहजिकच जुन्या गप्पा निघाल्या. दिवस बरे-वाईट कसे होते, ते एकमेकांना सांगत होतो. अचानक "आजच आमच्यावरच्या हल्ल्याला अकरा वर्षे झाली" कादरी म्हणाला आमच्या भेटीची आठवण झाली. "तुझ्यावर हल्ला करणारे तुझ्या ओळखीचे होते का रे?" मी विचारले. आणि अत्यंत अनपेक्षित उत्तर आले. "ते लोक आमचे शेजारी पाजारी नव्हते मी तर त्यांना ओळखतही नव्हतो." कादरी सांगू लागला, "पण तुम्हांला माहित्येय की मी दादर नायगावला मुक्काम हलवला होता. एक दिवशी लोकलने कंपनीत कामावर येत होतो आणि माझ्या समोरच्या सीटवर बसलेल्या माणसाला मी ओळखलं. तोच होता आमच्यावर हल्ला करणारा! त्याने माझ्याकडे बघितलं आणि तो एकदम चमकला. माझ्या समोरून उठून गेला तो; बसूच शकला नाही, माझ्या नजरेला नजर देत." मी स्वतःशीच बोललो, 'पण मी आता कुठच्याही मुस्लिम माणसाशी नजर भिडवून बोलू शकतो.' 

Tags: हिंदू  युसूफ हुसेन पाकिस्तान भारत मुस्लिम बाबरी मशीद विवेक पटवर्धन Hindu Yusuf Hussain Pakistan India Muslim Babri Masjid Vivek Patwardhan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी