साधना साप्ताहिकाने 26 एप्रिल 2025 चा विशेष अंक 'दृष्टीकोन आकाराला येईपर्यंतचे वाचन' ही थीम समोर ठेवून प्रकाशित केला होता. त्या अंकावर नंतर 'परिचय नव्हे परीक्षण' ही स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला, राज्यातील 25 जिल्ह्यांतून मिळून 95 परीक्षण लेख आले. त्यातून पाच उत्तम लेख प्रत्येकी पाच हजार रुपयांची (साधना प्रकाशनाची पुस्तके) पारितोषिके म्हणून देण्यासाठी निवडले गेले. त्यापैकी एक लेख रयत शिक्षण संस्थेत श्रीरामपूर येथे प्राध्यापक असलेले भागवत शिंदे यांचा होता. स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यावर त्यांची इयत्ता आठवीत असलेली कन्या भक्ती हिने त्यांना उत्स्फूर्तपणे एक पत्र लिहिले. ते पत्र त्यांनी सहज वाचायला म्हणून आमच्याकडे पाठवले. त्या पत्रात दिसलेली भक्तीची अभिव्यक्ती वाचकांपर्यंत पोहोचवावी असे वाटले, म्हणून ते पत्र तिने लिहिले तसेच इथे प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक
प्रिय पप्पा / मित्रा,
सप्रेम नमस्कार!
पत्रास कारण तुझे कालचे कौतुकास्पद यश. सर्वप्रथम तुझे 'साधना'कडून घेण्यात आलेल्या वाचन अंक परीक्षणाच्या स्पर्धेत क्रमांक मिळवल्याबद्दल मनापासून अभिनंदन...!
तुझे कालचे यश साधेसुधे नव्हते. कारण तुझी निवड एका परीक्षकाकडून नसून सात परीक्षकांकडून झालेली आहे. मला तुझ्या या यशाचा खूप अभिमान, हेवा वाटतो; हा अभिमान फक्त या यशामुळेच नव्हे तर तू या यशासाठी घेतलेली मेहनत. कारण नेमके याच काळात आपल्याला गाबी जावे लागलेले. तरीसुद्धा तू लेखाची तयारी करत होतास. स्पर्धेसाठी लेख पाठवण्याची अंतिम मुदत व आपला गावावरून परतण्याचा दिवसही एकच होता. आपण सकाळी चार तासांचा प्रवास करून, दमून, कंटाळून आलो होतो, मी तर आल्यावर झोपी गेले होते. पण तू आवरून, कंटाळा न करता 11 बाजताच कॉलेजला गेलास आणि कॉलेजची इतरही कामे करून, लेख पाठवायचा शेवटचा दिवस असल्याने लेख पूर्ण करून घरी आलास तेही रात्री 8.30 वाजता. कॉलेजमधील लाईट गेलेली असून, मोबाईल डिस्चार्जड झालेला असून, सकाळच्याच नाष्ट्यावर असूनही, तू उत्तम लेख लिहिलास.
मला तुझ्या आणखी एका गोष्टीचे नवल वाटते की, या स्पर्धेत तुझ्या मित्रांनीदेखील सहभाग घ्यावा यासाठी तू प्रयत्न करत होतास. मला त्या क्षणी वाटलं की तू स्वतः स्पर्धक का वाढवून घेत आहेस? तुझ्या मनात असा विचार का नाही आला की, या स्पर्धेत तुझा क्रमांक न येता तुझ्या मित्रांचा आला असता तर... मी तुला याबद्दल विचारले की, 'तुला वाईट वाटेल का?' तर तू म्हणालास, 'अजिबात नाही.'
आता हे होतं लेखाविषयी, पण एरवीही तू नेहमी निःस्वार्थी भावनेने सगळ्यांना मदत करतोस, कॉलेजमध्ये अगदी मन लावून काम करतोस, आजूबाजूच्या त्रासदायक लोकांकडे लक्ष न देता तुझे काम पूर्ण करतोस आणि निश्चितच याचे फळ तुला मिळतेच. वर्षाच्या सुरुवातीला कुठेही सहलीला न जाता तू जातोस NSS च्या कॅम्पला. एक नाही, दोन नाही, तर सात दिवस. तेथे तुझ्या सर्व विद्यार्थ्यांची तुझ्यावर मोठी जबाबदारी असते. त्यामुळे तू कधी घरीही येत नाहीस, तेव्हा आईच आमची काळजी घेते व आमच्या गरजा पूर्ण करते. मला कधी कधी बाटायचे की, माझेच पप्पा असं का करतात, पण तेव्हा तू आमची समजूत काढायचास... आणि हो, तू आपल्या तालुक्याचा NSS चा Co-ordinator आहेस याचा हेवा वाटतो, भारीपण वाटते...
तुझ्याकडचा एम.ए. एज्युकेशनचा विभागही तू खूप छान सांभाळतोस. सुरुवातीला या विभागात खूप कमी विद्यार्थी प्रवेश घ्यायचे, पण जेव्हापासून तू या विभागाचे काम पाहतोस तेव्हापासून ही संख्या वाढत चालली आहे आणि आता ती 80-85 दरम्यान आहे. पण या सर्व गोष्टी तू आम्हाला कधीच सांगत नाहीस, कळू देत नाहीस. पण जेव्हा या गोष्टी मला दुसऱ्यांकडून समजतात, तेव्हा तुझा आणखी अभिमान वाटतो. या सर्व विद्यार्थ्यांसाठी तू सतत कार्यरत असतोस आणि सुट्टीतही ऑनलाईन / ऑफलाईन कार्यरत असतोस. तुझ्या सुट्टया असून नसल्यासारख्याच असतात. म्हणून आम्हाला त्या सुट्ट्या वाटतंच नाहीत.
तू तुझ्या कॉलेजच्या वार्षिक अंकाचा संपादक असतोस. तेदेखील काम तू मनापासून करतोस आणि यामुळेच तुझ्या या अंकाला पारितोषिकेही मिळतात. कारण तू या कामासाठी भरपूर वेळ देतोस. बऱ्याचदा तू रात्री बारा वाजता प्रेसवरून यायचास, याचा मला कधी-कधी रागही यायचा, पण तो फार काळ टिकायचा नाही.
वाचनासाठी तर तू नेहमीच जागृत असतोस. वाचायला बसलास की पाच-सहा तास उठत नाहीस, आवडतं पुस्तक असल्यावर तर संपवूनच उठतोस. आणि वाचनासाठी जनजागृतीही करतोस, आत्ताचा तू सुरू केलेला आठ पुस्तकांच्या संचाचा उपक्रमही अप्रतिम आहे. मला सुरुवातीला या उपक्रमाचे महत्त्व कळले नव्हते, पण तू मला ते समजावून सांगितलेस, मी तुला विचारले, 'पप्पा, तुला यातून काहीच नफा मिळत नाही, उलट तोटा होतो. तरी तू हा उपक्रम आणि साधना बालकुमार दिवाळी अंकासाठी एवढी धडपड का करतोस?' तर तू म्हणालास, 'आपण माणसे आनंदाचे परिमाण करण्यात चुकतो, पैसा म्हणजेच आनंद नसतो, त्यातून मिळणारे समाधान महत्त्वाचे असते.' आणि आता लवकरच तुझे शिक्षकांसाठीच्या पुस्तकांचे 100 संच विकले जातील ही खात्री मला आहे...
याबरोबरच तू तुझ्या आरोग्याची छान काळजी घेतोस हे मला आवडते आणि नेहमीच घेत जा. तू रनिंगदेखील करतोस, तेही दहा राऊंड, खूपच ग्रेट आहे हे. योगादेखील छान करतोस... तू असाच छान योगा मलाही शिकव.
ही पत्राची कल्पना आईची हं... मजकूर लिहिला मी, पण कल्पना आईची आणि सहकार्य छकुलीचे... आता माझ्या दोन इच्छा ऐक. एक म्हणजे, आईशी कमी भांडत जा. कारण तुझ्या प्रत्येक गोष्टीत, यशात तिचे सहकार्य आहे. आणि दुसरे, आम्हा सर्वांना वर्षातून एकदा तरी Long Trip ला नेत जा. या दोनच खंत आहेत. मी कधी रागाच्या भरात काही चुकीचे बोलले, तर ते विसरत जा. कारण माझा स्वभाव तुला माहीतच आहे. असेच यश सदैव तुला मिळो.
तुझीच लेक, भक्ती
Tags: college online coordinator NSS school teacher vinod shirsath writng reading special issue weekly sadhana letter bhakti bhagwan shinde weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या