माझ्या मनात आले, हे सगळे मॉडर्न कसे? हा तर मुघलांचा जनानखाना दिसतोय. अनेक बेगमा आणि शहजादे. सर्वच पुरुषसत्तांमध्ये एका पुरुषाच्या अनेक बायका असतात. आणि पुरुषांसाठी सगळे सोपे असते. मग मी विचार केला, त्या बेगमा आयुष्यभर हेवेदावे, संशय, कटकारस्थाने यांत अडकलेल्या असत. एका पुरुषाशी बांधलेल्या आणि त्याचे प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नांत. निदान इकडे बायकाही स्वतःचे आयुष्य जगतात. इतर पुरुषांबरोबर असेल किंवा एकटे असेल, त्यांचे आयुष्य आणि निर्णय त्यांचे स्वतःचे असतात. अर्थात, या संकल्पनेमध्येदेखील एक स्त्री आणि तिथे अनेक पुरुष, अशी कुटुंबे अभावानेच दिसतात.
2024 च्या उन्हाळ्यात मी तीन महिने संचिता बासू यांच्या घरी राहिले. 2023 मध्ये आम्ही भेटलो आणि ताबडतोब मैत्रीत पडलो. 70 वर्षांची असली तरी संचिताचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता. दिवसभर कामात आणि घाईत. कितीतरी चालेल, भाषणे करेल, संध्याकाळी मैत्रिणींना भेटायला जाईल. तिचा मोठा भाऊ बिपलाप बासू जर्मनीतील नामांकित कार्यकर्ता होता. वंशवादाच्या विरोधात अनेक लढे, कायदेशीर खटले चालवणारा. मी त्यांच्या रंजक, इंद्रधनुषी कुटुंबाचा भाग बनून गेले.
मागच्या ऑगस्टमध्ये एक दिवस आम्ही सर्व जण संचिताच्या भाचीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र जमलो. उन्हाळा असल्यामुळे घरात भेटण्याऐवजी एका सुंदर पार्कमध्ये पिकनिक. खाणेपिणे, खेळ, पुस्तके सगळे काही जमवून. तिथे एकाच वेळी अनेक भाषांत संभाषण चालू होते. बासू कुटुंब एकमेकांशी बंगाली बोलतात. अगदी जर्मनीमध्ये वाढलेली त्यांची मुलेदेखील. एक चुलत भाऊ भारतातून आला होता. तो बंगाली, इंग्रजी आणि गुजराती बोलत होता. बासू मुलांची आई गुप्ता होती. म्हणजे आजोबा हिंदी भाषक आणि आजी जर्मन. त्यामुळे त्यांना हिंदीदेखील समजत होती आणि बॉलीवूड गाणी माहीत होती. त्यांची एक मावशी ऑक्सफर्डमध्ये राहते. तिची मुलगी सध्या बर्लिनमध्ये आपल्या मोठ्या कुटुंबाबरोबर असते. तिचे
वडील स्वित्झर्लंडचे. त्यामुळे ती ऑक्सफर्ड अॅक्सेंटमध्ये इंग्रजीत फ्रेंच आणि जर्मन बोलते. एका मावशीचा नवरा इराणी आहे. तो आपल्या मुलांशी फारसी बोलतो, इराणी गाणी वाजवून त्यांच्याबरोबर नाच करतो. मुलांची नावे मात्र 'जया' आणि 'सूर्या' आहेत. वेगवेगळ्या रंगांचे म्हणजे एकदम गोरे ते एकदम काळे - आणि वेगवेगळ्या चेहरेपट्ट्याचे हे सारे जण एकत्र जमले की एक नॉर्मल कुटुंब बनतात. अनेक वर्षांच्या आठवणी, गप्पागोष्टी, चेष्टा आणि मस्करी याला ऊत येतो.
बर्लिनमध्ये अशी अनेक संमिश्र कुटुंबे भेटतात, वेगवेगळ्या वंशांचे लोक एकत्र येऊन बनलेली. मला यात काहीच नवल वाटत नाही. आमचे कुटुंबदेखील असेच हिंदू-मुस्लीम, ख्रिश्चन मराठी, तेलुगू-हिंदी, कोकणी-चिनी. अनेक भाषा आणि धर्म. मोठे आणि छोटे डोळे, गोरा निमगोरा सावळा रंग. लोकांना बघून फार आश्चर्य वाटते. हे लोक कसे काय एकत्र राहत असतील बुवा? आम्हाला ते केवळ कुटुंब असते. सर्व प्रकारचा ड्रामा असलेले.
बर्लिनमध्ये 'जोडीव कुटुंबे 'देखील खूप भेटतात. म्हणजे दोन वेगवेगळी कुटुंबे एकत्र येऊन बनलेले कुटुंब. घटस्फोटानंतर पालक परत लग्न करतात, तेव्हा त्यांची मुलेही भेटतात, सुट्ट्यांसाठी एकत्र जातात. छोटी मुले तर एकत्र राहून भावंडे बनतात. माझी मैत्रीण अनुजा पाटील मुंबईहून एका फ्रेंच संगीतकाराशी लग्न करून प्रथम
पॅरिसला राहायला गेली आणि नंतर बर्लिनला. मराठी, फ्रेंच, जर्मन, इंग्लिश या सर्व भाषा ते सगळेच सहज बोलतात. लग्नानंतर 12 वर्षांनी नवऱ्याला घटस्फोट हवा झाला. या प्रतारणेमुळे अनुजा खूप दुखावली, पण तिने धीराने आपले स्वतःचे आयुष्य उभारले. नवऱ्याबरोबर मुलांची कस्टडी विभागून घेतली. मुलांच्या शाळेच्या जवळ दोघांचीही घरे. त्यामुळे एक आठवडा आईकडे आणि एक आठवडा बाबांकडे राहणे मुलांना शक्य झाले. मला हे कौतुकास्पद वाटले. घटस्फोट झाल्यानंतर भांडणे करत बसायचे नाही. आपल्या नात्यातले ताण तणाव संपवायला तर आपण विभक्त झालो ना! आपापले स्वतंत्र आयुष्य जगायचे. मुलांकरता संवाद कायम. पण संपर्क नेमकाच. अशी काही वर्षे गेल्यानंतर अनुजाला दुसरा जोडीदार भेटला. तेव्हा मुलांची घडी न विस्कटता तिने हळुवारपणे सर्वांना सामील करून घेतले. आता क्रिसमसला सगळे एकत्र भेटतात, चार दिवस मोठे एकत्र कुटुंब बनतात.
लग्नाशिवाय बनलेली अनेक कुटुंबे आपल्याला बर्लिनमध्ये भेटतात. माझ्या घरमालकिणीचा 20 वर्षांपासूनचा पार्टनर नामांकित वकील आणि कायदेतज्ज्ञ आहे. एका शनिवारी त्याच्या हॉलिडे होमला मी राहायला गेले. एका सुंदर तलावाशेजारी जमीन घेऊन त्याने काचेचे घर बांधले होते. घरात कुठेही बसले तरी अतिशय सुंदर देखावा दिसे. त्याने सांगितले की, त्याला दोन मुलगे आणि नातवंडे आहेत. परंतु त्याने आयुष्यात कधीच लग्न केले नाही. दोन मुलांच्या आयादेखील वेगवेगळ्या. त्यांच्याशी चांगली दोस्ती आहे. स्वतःच्या सत्तराव्या वाढदिवसासाठी त्याने या सगळ्यांना घेऊन क्रूज आणि पार्टी केली.
माझ्या मनात आले, हे सगळे मॉडर्न कसे ? हा तर मुघलांचा जनानखाना दिसतोय. अनेक बेगमा आणि शहजादे. सर्वच पुरुषसत्तांमध्ये एका पुरुषाच्या अनेक बायका असतात. आणि पुरुषांसाठी सगळे सोपे असते. मग मी विचार केला, त्या बेगमा आयुष्यभर हेवेदावे, संशय, कटकारस्थाने यांत अडकलेल्या असत. एका पुरुषाशी बांधलेल्या आणि त्याचे प्रेम मिळवण्याच्या प्रयत्नांत. निदान इकडे बायकाही स्वतःचे आयुष्य जगतात. इतर पुरुषांबरोबर असेल किंवा एकटे असेल, त्यांचे आयुष्य आणि निर्णय त्यांचे स्वतःचे असतात.
अर्थात, या संकल्पनेमध्येदेखील एक स्त्री आणि तिथे अनेक पुरुष, अशी कुटुंबे अभावानेच दिसतात.
माझी मैत्रीण सानिका हे असे जगण्यात यशस्वी झाली. दुसऱ्या नवऱ्याबरोबर संसार मांडताना ती आपल्या पहिल्या मुलीला घेऊन इंग्लंडला गेली. त्याने तिला सहाव्या वर्षापासून बाबाचे प्रेम दिले. पण तिचे आडनाव आणि तिच्या वडिलांबरोबरचे तिचे नाते सानिकाला अबाधित ठेवायचे होते. सानिकाला नंतर दुसरा मुलगाही झाला. तिची मुलगी मग इंग्लंडमध्ये आईबरोबर वाढले खरी, पण प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत भारतात आसाममध्ये वडिलांकडे जाऊन राहत असे. दोन्ही घरांमध्ये ती लाडकी मोठी मुलगी बनली. दोन्ही ठिकाणी लहान भावांशी तिचे अतिशय प्रेमाचे नाते होते. सानिकाने मानवी संबंधांमधला असाध्य दुवा साधला असे मला नेहमी वाटायचे.
हल्लीच पुण्याची एक मैत्रीण भेटली, वैभवी. सांगू लागली की, धाकट्या बहिणीने चक्क आयव्हीएफ करून मुलगी जन्माला घातली. त्या दोघी आईवडिलांकडेच राहतात, तिघे मिळून छोटीला सांभाळतात. मी म्हटले, 'दोन्ही मुलींनी लग्न केले नाहीत तर तुमचे पालक हैराण झाले नाहीत का?' तर खास पुणेरी ठसका, "कशाला? आम्ही मजेत आहोत ते दिसतंय ना. काम करतो, खातो पितो, फिरायला जातो. नाहीतरी पालकांना आपली संपत्ती जपायची असते. उगाच नातेवाइकांनी येऊन खायला नको. आता नात आल्यामुळे वारसही झाली."
मी म्हटले, 'छान'. आमच्या लहानपणी समाजात सतत 'मुलांवर संस्कार' असे पालुपद लावलेले असे. आता आमच्या पिढीने आईबापांनापण निगुतीने वाढवायला घेतले आहे. नव्या युगाचे संस्कार घेऊन पालकही शहाणे होत आहेत आणि कुटुंबाच्या रंगीबेरंगी छटा दिसू लागल्या आहेत.
'बर्लिनमधील दिवस' ही लेखमाला समीना दलवाई यांनी गेल्या वर्षभरात साधना साप्ताहिकात लिहिली. त्या मालिकेतील हा शेवटून दुसरा लेख आहे. यापूर्वीचे सर्व लेख साधनाच्या वेबसाईटवर वाचता येतील.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या