डिजिटल अर्काईव्ह

15 ऑगस्ट 2016 चा साधना साप्ताहिकाचा विशेष अंक "तीन मुलांचे चार दिवस" या विषयावर काढला होता, त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये तो संपूर्ण अंक साधना प्रकाशनाकडून पुस्तक रूपाने आला. बी.ए.च्या तृतीय वर्षात असताना तीन विद्यार्थ्यांनी केलेल्या सायकल प्रवासाचे अनुभवकथन त्यात आहे. त्यानंतर, 2021 ते 26 ही पाच वर्षे ते पुस्तक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.ए. तृतीय वर्ष अभ्यासक्रमात (ललित गद्य: प्रवास वर्णन) होते. त्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे यांना त्या संदर्भात लेख लिहिण्याची विनंती आम्ही केली होती. कारण आता ते पुस्तक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या बी.ए. तृतीय वर्ष अभ्यासक्रमासाठी (ललित गद्य अनुभवकथन) पुढील तीन ते पाच वर्षांसाठी राहणार आहे.

आदर्श पाटील, विकास वाळके व श्रीकृष्ण शेवाळे यांनी लिहिलेले 'तीन मुलांचे चार दिवस' हे पुस्तक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करताना पुढील उद्देश ठेवले होते. प्रवासवर्णन : या साहित्यप्रकाराचे स्वरूप, प्रेरणा, प्रयोजन, वैशिष्ट्ये आणि वाटचाल समजून घेणे. हे पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट झाले, त्या वेळी सगळे जण लॉकडाऊनमधून सावरत होते. त्यानुसार शैक्षणिक अध्ययन, अध्यापन, मूल्यमापनामध्ये काही बदल झाले होते. आता शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात नव्याने पुस्तक येते, तेव्हा त्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची पार्श्वभूमी आहे. या अभ्यासक्रमांमध्ये कौशल्य, प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. मूल्यमापन प्रक्रियेमधील प्रश्नोत्तरांच्या ठरावीक साचेबंदपणाचे स्वरूप बदलून विविध पद्धती आल्या आहेत.

हे पुस्तक अनुभवकथन, प्रवासवर्णन की आठवणी; अशा कोणत्या साहित्यप्रकारात समाविष्ट होते? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या पुस्तकाचा समावेश प्रवासवर्णन म्हणून केला होता. लघुनिबंध, आत्मकथन, प्रवासवर्णन, व्यक्तिचित्रण, शब्दचित्र, आठवणी या साहित्यप्रकारांमध्ये लेखकाचे व्यक्तिनिष्ठ अनुभव हा एक समान दुवा असतो. त्यामुळे या सर्व प्रकारांचा समावेश ललितगद्यामध्ये केला जातो. 'तीन मुलांचे चार दिवस' मध्ये तीन लेखकांचे प्रवासविषयक अनुभवकथन येते. हे एक प्रवासवर्णन म्हणून मानले तर त्याचे प्रवासवर्णन या साहित्यप्रकाराच्या वाटचालीतील स्थान, पूर्वपरंपरेशी साम्य-विरोध, आकृतिबंधाचा संकोच-विस्तार यातून शोध घेता येतो. उदाहरणार्थ, गोडसे भटजींच्या 'माझा प्रवास' या सन 1887 मधील प्रवासवर्णनाशी 'तीन मुलांचे चार दिवस' काय नाते सांगते? प्रवासाचे मूळ उद्देश आणि निष्पत्ती, दस्तऐवज आणि ललित लेखन अशाही काही मुद्द्यांतून हे उत्तर शोधता येते. किंवा दि.बा. मोकाशी यांच्या 'अठरा लक्ष पावले' या प्रवासवर्णनाशी काय साम्य-भेद दिसतात ? 'अठरा लक्ष पावले'तील आंदोलन, त्यामधील अंतर्गत संगती विसंगती, लेखकाची शैली आणि वाचकाला येणारा प्रत्यय; या सर्वांची 'तीन मुलांचे चार दिवस'शी तुलना करता येते का? एकाच साहित्यप्रकारामध्ये समाविष्ट होणाऱ्या दोन साहित्यकृतींची तुलना विद्यार्थ्यांची साहित्यविषयक समज वाढण्यास साहाय्यभूत होतात.

या पुस्तकाची आणखी काही वैशिष्ट्ये सहजपणे नजरेसमोर येतात. एक पुस्तक, तीन लेखक, कमी पृष्ठसंख्या, मोठा आशय, लेखकांची पहिली निर्मिती, लेखकांचा युवा वयोगट, प्रवासाचे प्रयोजन, साहस, धैर्य यांमुळे हे प्रवासवर्णन अन्य मराठी प्रवासवर्णनांहून वेगळे ठरते. उदाहरणार्थ, उज्ज्वला धर यांच्या 'किनारा तुला पामराला'शी अशी तुलना करता येईल का? एक महिला अन्य पुरुष खलाशांबरोबर शिडाच्या जहाजातून पृथ्वी प्रदक्षिणा करते. यामध्ये साहस, धैर्याची कसोटी आहे. अशा प्रवासवर्णनातील अनुभव आणि 'तीन मुलांचे' मध्ये काय भेद आहेत? यातील साहस, धैर्य यांची तुलना करता येईल का? यामध्ये कोणते मूल्यात्मक भेद आहेत ? अशा तुलना संहितेच्या आकलनाला अधिक मूल्यगर्भ करू शकतात.

या पुस्तकाचे तीन लेखक हे एकत्र प्रवास करणारे तीन सहप्रवासी आहेत. त्यांना येणारे अनुभव सारखे असल्यामुळे वर्णनात सारखेपणा-वेगळेपणा, संगती-विसंगती, पुनरुक्ती येऊ शकते. असे काही मुद्दे घेऊन पुस्तकाचा विचार करता येतो. उदाहरणादाखल, या तिन्ही लेखकांच्या लेखनातील शेवटचा परिच्छेद पाहू.

आदर्श पाटील म्हणतात, "हमारे देश को आजादी आधी रात को मिली थी... सबेरा अभी तक हुआ नहीं. आता हा सबेरा कधी होणार आहे ते माहिती नाही; पण तो होणार, हे नक्की. उषःकाल होता होता काळरात्र झाली असे आपण अनेक वेळा म्हणत असतो, पण निसर्गाच्या नियमानुसार काळोख्या रात्रीनंतर पहाट येतेच, गरज असते ती क्रियाशील शांततेने प्रतीक्षा करण्याची."

विकास वाळके म्हणतात, "आम्हाला एका पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने 'पुढील दौरा कोणता?' असं विचारलं होतं. त्यावर आम्ही लगेचच 'पूर्वेकडील राज्ये' असं सांगितलं होतं. सध्या तरी लगेच दौरा आखण्याची व तिकडे जाण्याची वेळ नाही. तसा संपूर्ण भारतच पिंजून काढण्याची मनात प्रबळ इच्छा आहे. पण प्रत्येक गोष्टीची वेळ-काळ ठरलेली असते. अभ्यास करून, स्वतःला घडवून तसंच स्वतःच्या पायावर उभं राहून प्रशासनातून किंवा शिक्षणातून किंवा समाजसेवेतून देशाची सेवा करणं हे आम्ही आयुष्याचं आद्य कर्तव्य व ध्येय समजतो. माणूस बनण्याचा, त्याला समजून घेण्याचा प्रवास असाच कायम सुरू राहावा, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत... अशीच आमची इच्छा आहे."

श्रीकृष्ण शेवाळे म्हणतात, "जंगलामध्ये असताना आम्ही पोलीसवाले किंवा पोलीसखबरे नाहीत हे सिद्ध करण्यासाठी संघर्ष करावा लागला आणि जंगलाच्या बाहेर आल्यानंतर आम्ही नक्षलवादी किंवा नक्षलवाद्यांचे मदतनीस नाहीत, हे पटवण्यासाठी संघर्ष करावा लागला. तेथील आदिवासींचाही संघर्ष असाच दुहेरी आहे."

हे तीन परिच्छेद तीन लेखकांच्या प्रवासवर्णनाच्या शेवटी येतात. हे सारखे नाहीत. प्रत्येक जण वेगळे काहीतरी सांगतो. त्यामुळे त्यात पुनरावृत्ती नाही. पहिल्यामध्ये तात्त्विक पातळीवरून केलेल्या चिंतनातून येणारा संयम दिसतो. दुसऱ्यामध्ये अगोदर अभ्यास करून स्वतःला उभे केल्यानंतर माणूस जाणण्याचा प्रवास सुरू ठेवायचा आहे; असा व्यावहारिकपणा दिसतो. तिसऱ्यामध्ये दोन समाजांच्या विचारपद्धतीमध्ये तुलना करून समाजाच्या वास्तविक मानसिकतेविषयीचा निष्कर्ष येतो.

लेखकांचे वेगवेगळे निष्कर्ष येतात, तसे वाचकांचेही वेगवेगळे प्रत्यय येऊ शकतात. या भिन्नतेमागे प्रत्येकाचा वेगळा दृष्टीकोन आहे. यातून साहित्याची बहुअर्थसूचकता लक्षात येते.

आज चॅट जीपीटीच्या तत्काळ, साचेबंद, तयार उत्तरे मिळण्याच्या काळात या पुस्तकातून वेगळी उत्तरे मिळतात. ही वेगवेगळी उत्तरे झापडबंद अनुभव आणि साचेबंद उत्तरांना छेद देतात. वर्गामध्ये शिकलेले सिद्धान्त जीवनानुभवात तपासण्याचे प्रात्यक्षिक देतात. म्हणून हे प्रवासवर्णन एक केस स्टडी, अहवाल, प्रकल्प, प्रात्यक्षिक आणि ललितलेखनही आहे. मुक्त अनुभव घेणे आणि आपापली स्वतंत्र उत्तरे शोधण्याची एक दिशा या प्रवासवर्णनातून मिळते.

महाविद्यालयांमध्ये सुट्टी-सत्रातील सहली, अभ्यास-शैक्षणिक-पर्यटन सहली, उद्योगव्यवसायांना भेटी असे अनेक प्रकार असतात. अभ्यासक्रमातील हे अभ्यासक्रमपूरक उप्रकम गुणांशी, आनंद, मौजमजेशी निगडित असतात. त्याच वेळी सहल, प्रवास, प्रत्यक्ष अनुभव असा हा अभ्यासाचा भाग असतो. त्याचे महाविद्यालय, विद्यार्थी असे संयुक्त किंवा स्वतंत्र नियोजन असते. महाविद्यालयातील या नियमित प्रक्रियेला हे पुस्तक छेद देते. ही मुले, विद्यार्थी स्वतंत्रपणे त्यांच्या सहलीचे, प्रवासाचे नियोजन करतात. ठिकाणे ठरवतात. उद्देश ठरवतात. गुण मिळविण्यापेक्षा माणूस समजून घेणे महत्त्वाचे मानतात. यातून या मुलांच्या, लेखकांच्या निवडीचे स्वातंत्र्य दिसते. वेगळेपण दिसते. त्यांच्या कृतीतून काय करावे आणि काय करू नये, याचा मूल्यविवेक दिसतो.

'तीन मुलांचे....' मधून या मुलांचे उद्देश, नियोजन आणि बारकावे दिसतात. त्याच वेळी त्याचे प्रात्यक्षिकही दिसते. माणसाची कसोटी आणि त्याचा कस असाधारण परिस्थितीत लागतो. ही मुले पश्चिम महाराष्ट्रातील नागर-ग्रामीण अशा संमिश्र वातावरणातील आहेत. ही मुले महाराष्ट्राच्या पूर्व भागातील आदिवासी प्रदेशात माणूस समजून घेण्यासाठी जातात आणि नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडतात. साधारण परिस्थितीतून असाधारण परिस्थितीत जातात. नियोजित उद्देशापासून त्यांचे वेगळेच प्रात्यक्षिक सुरू होते. अशा वेळी त्यांच्यातील धैर्य, समयसूचकता, परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी, सहनशीलता आणि समन्वय या सर्वांची कसोटी लागते. त्यांच्या या प्रात्यक्षिकाची ही परीक्षा त्यांना जीवनातील एका समस्येचे उत्तर शिकविते. तसेच ती वाचकालाही शिकविते.

ही परीक्षा या मुलांवर लादलेली नाही; तर तो त्यांनी स्वतःहून निवडलेला मार्ग आहे. हा मार्गही बहुसंख्य विद्यार्थी निवडत असलेल्या मार्गापेक्षा वेगळा आहे. त्यामागे आपला भवताल जाणण्याची जिज्ञासा आहे. मुलांच्या शारीरिक, मानसिक क्षमतांचे आव्हान, परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता, धैर्याची परीक्षा आहे. इथे फक्त परीक्षा नाही, तर या परीक्षेचे उत्तरही मिळते. हा वेगळा मार्ग रुळलेला नाही. म्हणून हे न मळलेल्या वाटांचा शोध घेणारे, जगण्याची दिशा दाखविणारे प्रवासवर्णन आहे.

हे पुस्तक अभ्यासक्रमात पाचव्या सत्राला असल्यामुळे ऑक्टोबरमध्ये नियमित, तर एप्रिलमध्ये पुन्हा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिका काढल्या. यातील पहिली प्रश्नपत्रिका बहुपर्यायी प्रश्न (MCQ) प्रकारची ऑनलाइन परीक्षा ऑक्टो 21 मध्ये झाली. त्यानंतरच्या चार प्रश्नपत्रिका दीर्घोत्तरी प्रश्नोत्तरांच्या प्रत्यक्ष स्वरूपातील झाल्या. या 70 गुणांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तीन घटक होते. पहिला, मुद्रित माध्यमांसाठी लेखनकौशल्य. दुसरा, प्रवासवर्णन साहित्यप्रकार तात्त्विक विवेचन. या दोन घटकांना 35 गुण होते, तर तिसरा घटक 'तीन मुलांचे चार दिवस' या पुस्तकाला 35 गुण होते. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये वीस गुणांसाठी तीनपैकी दोन प्रश्नांची उत्तरे 200 शब्दांपर्यंत, तर पंधरा गुणांसाठी दोनपैकी एका प्रश्नाचे उत्तर 300 शब्दांपर्यंत लिहायचे होते. या प्रश्नपत्रिकांमध्ये विचारले गेलेले काही प्रश्न असे होते 'तीन मुलांचे चार दिवस' या प्रवासवर्णनाच्या आधारे आदिवासी भागातील शिक्षणाच्या दुरवस्थेचे चित्रण करा.

- सफर माणुसकीच्या आधारे आदिवासी भागातील प्रवासाच्या प्रेरणांचे वर्णन करा.

-आदिवासी जीवनातील अंधश्रद्धा व बुवाबाजीचे वर्णन करा.

-'तीन मुलांचे चार दिवस' या प्रवासवर्णनाच्या आधारे आदिवासी भागातील वैद्यकीय दुरवस्थेचे चित्रण करा.

- आदिवासी गोंडवाना भागातील 'सी.जी. नेटस्वरा' या नेटवर्कच्या कार्याची ओळख करुन द्या.

- आदिवासी गोंडवाना भागातील सांस्कृतिक जीवनाचे चित्रण करा. किंवा दुसऱ्या प्रश्नपत्रिकेत 'प्रवासः समृद्ध करणारा' मधील प्रवासाचे वर्णन करा.

-आदिवासी भागातील नक्षलवादाविषयी मुलांना आलेल्या अनुभवाचे वर्णन करा.

- भारताच्या व्यवस्थेबद्दल 'कन्ना मडावी' यांनी कोणते विचार स्पष्ट केले आहेत ?

-'तीन मुलांचे चार दिवस' या प्रवासवर्णनात आलेल्या व्यक्तिरेखांचे वर्णन करा.

-'तीन मुलांचे चार दिवस' या प्रवासवर्णनातील आदिवासी लोकांच्या संस्कृतीबद्दल सविस्तर माहिती लिहा.

मागील पाच वर्षांत बी.ए. तृतीय वर्षाला (सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे) नेमके किती विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते, याची नेमकी संख्या माझ्याजवळ उपलब्ध नाही. हे पुस्तक अभ्यासक्रमात समाविष्ट झाल्यानंतर काही शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देणारे, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी निगडित असणारे, विद्यार्थ्यांना काय करावे आणि काय करू नये, हे सांगणारे पुस्तक आहे. अशा काही प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचे आठवते.

हे पुस्तक सुरुवातीला मी गुगल मीटवरून शिकवले होते. या पुस्तकाची साधनाच्या अर्काइव्हजवर असणारी पीडीएफ माझ्या गुगल क्लासरुमवर टाकलेली होती. विद्यार्थ्यांना त्यांच्या तासिकेनुसार लिंक दिलेल्या असायच्या. त्या लिंकवर विद्यार्थी जॉईन व्हायचे. ऐकायचे. कधी प्रश्न विचारायचे. हे असे शिकवणे कितपत चांगले? अशी शंकाही यायची. पुढे परीक्षेत मुलांना चांगले गुण मिळाल्याने समाधान वाटले. पण या प्रश्नाचे उत्तर मला दीड-दोन वर्षांनंतर अचानक मिळाले. एकदा या वर्गाची विद्यार्थिनी तिच्या आईसोबत महाविद्यालयात आली. गप्पा मारता मारता ती सहजपणे म्हणून गेली. "सर, तुम्ही शिकवायचे. मी ऐकायचे. त्या वेळी माझी आईही काम करता करता तुमचे लेक्चर ऐकायची बरं का." आभासी क्लासरुममध्ये असेही विद्यार्थी असू शकतात, याची मी कल्पना केली नव्हती. मी उत्सुकतेने तिच्या आईकडे पाहिल्यावर त्या मोजकेच बोलल्या, "सगळं वेगळं असल्यानं ऐकायला भारी वाटायचं." पुढे ती विद्यार्थिनी म्हणाली, "सर, सगळे जण घरातच असायचे. टीव्हीवर त्याच त्या बातम्या पाहून भीती वाटायची. या पुस्तकातील मुले, त्यांचा प्रवास, आदिवासींचे जीवन पाहून वाईट वाटायचे आणि आपणही असं काही करावं असे वाटायचे."

पुढे नियमित तासिका सुरू झाल्या. मुलांना पुस्तक प्रत्यक्ष शिकवले. शिकवण्यात माझा नेहमी प्रयत्न असायचा की, मुलांनी मूळ पुस्तक वाचावे. पुस्तक वाचताना महत्त्वाच्या मुद्द्यांवर पेन्सिलने अधोरेखित करावे. त्यानंतर अधोरेखित केलेले पुन्हा एकदा वाचावे. विद्यार्थी सांगितलेले ऐकतात की नाही, हे मी सत्राच्या शेवटी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जाऊन पुस्तक तपासायचो. काही पुस्तके वाचलेली, थोडी खराब व्हायची. काही तशीच असायची. अधोरेखित केलेले पाहून विद्यार्थ्यांना काय महत्त्वाचे वाटते, हे समजून घ्यायचो. विद्यार्थी आयत्या नोट्स किंवा आयती उत्तरे देणाऱ्या पुस्तकांपेक्षा अभ्यासाला नेमलेले पुस्तक वाचतात, याचे समाधान वाटायचे. त्याच वेळी पटसंख्येच्या तुलनेत वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याचे दुःखही वाटायचे.

विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचा मी अध्यक्ष होतो. या मंडळात चौदा सदस्य आणि उपसमितीत चार निमंत्रित सदस्य असायचे. आमचा कालावधी वर्ष 2018 ते 2022 होता. या काळात आम्ही 'विठ्ठल तो आला आला', 'हंडाभर चांदण्या', 'रारंग ढांग', 'प्रकाशवाटा', 'तीन मुलांचे चार दिवस' अशा साहित्यकृती अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या. या व्यतिरिक्त काही संपादित पुस्तकांतून विद्यार्थ्यांना साहित्य प्रकारांतील निवडक प्रकार अभ्यासक्रमात दिले. यामागे विद्यार्थ्यांना उत्तम साहित्यकृतींची ओळख व्हावी, त्यांचे अध्ययन अधिक संपन्न व्हावे, हे प्रयत्न होते. ते सगळेच पूर्ण झाले, असे म्हणता येत नाही. काही बाबी राहून गेल्या. यामध्ये प्रत्येक साहित्यकृतीवर चर्चासत्र घेऊन अध्यापनाच्या दिशा देणे राहून गेले. लेखक, शिक्षक, प्रकाशक आणि विद्यार्थी यांचे संयुक्त चर्चासत्र; तसेच अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका निर्मितीविषयक चर्चासत्र घेण्याचे राहून गेले. अभ्यासक्रमात स्वतंत्रपणे भाषाविषयक घटक समाविष्ट करणे, राहून गेले.

घटते विद्यार्थी-वाढत्या अपेक्षा, व्यापक धोरण-अंमलबजावणीच्या मर्यादा आणि विद्यार्थ्यांच्या नोकरी-व्यवसायविषयक अपेक्षा जाणून घेत अभ्यासमंडळ काम करते. सगळ्या अपेक्षा पूर्ण होतात असे नाही; पण 'तीन मुलांचे चार दिवस'च्या निमित्ताने एक वेगळे पुस्तक विद्यार्थ्यांपुढे ठेवता आले, याचे समाधान अभ्यास मंडळाला मिळाले.

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शिरीष लांडगे,  पो. भेंडे ता. नेवासा जि. अहिल्यानगर ( 1 लेख )

जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय, ज्ञानेश्वरनगर येथे प्राध्यापक आहेत.




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके