डिजिटल अर्काईव्ह

मित्रा, अगदी नको त्या वेळी गेलास (साधना : 9 मार्च 1974)

मी औरंगाबाद-आंदोलन आटोपून एक महिन्यानंतर पुण्यात आलो. एक महिन्यापूर्वी पुणे सोडताना प्रदीर्घ चर्चा झाली होती ती शहाद्यामधील भिल्ल नेते श्री. अंबरसिंग सुरवंती यांच्याबरोबर. एक आंदोलन चालू असतानाच मनात पुढील संघटनात्मक कामाच्या आंदोलनाची दिशा घोळत असते. औरंगाबादला दलित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवाढीचे आंदोलन चालू असताना अंबरसिंग यांच्याबरोबर झालेली चर्चाच मनात घोळत होती. युक्रांदच्या आदिवासींमध्ये काम करण्याच्या योजनेचा आराखडा स्पष्ट होत होता. आदिवासींमध्ये कार्य करण्याचे संकल्पात्मक चित्र रेखाटतानाही अंबरसिंगांसारख्या नेत्याचे सहकार्य, हाच केंद्रबिंदू पुनःपुन्हा राहायचा. अंबरसिंगांसारख्या नेत्याशिवाय चित्र सुरूही व्हायचे नाही आणि पुरेही व्हायचे नाही.

 

 

पुण्यात आलो आणि पहिली बातमी कळली -अंबरसिंग हॉस्पिटलमध्ये गंभीर आजाराने अॅडमिट झालेले आहेत, प्रकृती सीरियस आहे. मी भेटलो तेव्हा ते बेशुद्धावस्थेतच होते. बोलणे झालेच नाही. डॉक्टर असल्यामुळे भवितव्य कळून चुकले ! पुन्हा त्यांच्याबरोबर चर्चा होणार नव्हती. 4 मार्चला अंबरसिंग गेल्याची बातमी कळली! ही बातमी ऐकावी लागणार होती. अनपेक्षित नव्हती. पण असह्य होती. मनातल्या चित्राचा केंद्रबिंदू नष्ट झाला. एखाद्या सुंदर चित्रावर अजाण बालकाने शाई सांडून कष्टाने निर्माण केलेली कला एक क्षणात नष्ट करावी त्याप्रमाणे निसर्गाने खेळ केला !

ज्या मातीमधून अंबरसिंगांचा देह निर्माण झाला होता, तेथे तो परत नेण्यात आला. शहादे तालुक्यातल्या पाडदळे गावी. पाडदळ्याला जायची तीव्र इच्छा होती. पण बातमी उशिरा कळली होती. बाकी मंडळी सायंकाळीच मोटारीने पुण्याहून तिकडे गेली होती. कोणत्याही एस.टी.ने वेळेवर पोहोचणे नव्हते. खूप रुखरुख लागून राहिली; तगमग होण्याइतकी. आता अंबरसिंगांना समजावून घेण्याशिवाय, त्यांच्या नेतृत्वाचा अभ्यास करण्याशिवाय हाती दुसरे काही उरले नव्हते! एक सच्चा मित्रांसाठी धडपडणारा एक समंजस सहकारी गेल्याने भयंकर पोकळी निर्माण झाली होती. मनाने, बुद्धीने त्याला समजावून घेऊन जवळ ठेवणे एवढेच शक्य होते. पोकळी भरून काढण्याची एक धडपड !

औरंगाबादच्या आंदोलनात दलित जातीच्या नेतृत्वाची फार जवळून ओळख झाली होती. सामान्य दलित विद्यार्थ्यांचा कैवार घेण्याचा गुन्हा आमच्या हातून घडल्यामुळे दलित जातीचे तथाकथित नेते युक्रांदवर तुटून पडले होते ! शोषितांमधून वर आलेल्या या नेतृत्वाची आणि अंबरसिंगांसारख्या नेतृत्वाची मनात कळत-नकळत तुलना होत होती. अनुभव अगदी ताजे होते. आपण दलित जातीमध्ये जन्माला आलो याचे प्रचंड भांडवल करणारे, कंगोऱ्याचे व्यक्तिमत्त्व असलेले, राजकीय नीतिमत्ता राजकीय चारित्र्य यांच्या अभावाने तळपणारे नेतृत्व एका पारड्यात आणि अंबरसिंगांसारखे दलित जातीपेक्षा अधिक शोषित असलेल्या समाजस्तरामधून आलेले नेतृत्व दुसऱ्या पारड्यात ठेवून राजकीय अभ्यासाला उत्तम विषय लाभू शकतो. अंबरसिंगाने आपण भिल्ल जातीमध्ये जन्माला आल्याचे कधीही भांडवल केले नाही. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या कंगोऱ्याने कोणाला दुखावले नाही. राजकीय नीतिमत्ता, चारित्र्य हा तर त्याचा आत्मा होता. ही दोन माणसांच्या व्यक्तिगत स्वभावांची तुलना नाही. शोषितांच्या हाती सत्ता येण्यासाठी जी भारतीय क्रांती घडवायची ती कोणत्या नेतृत्वाच्या प्रकाराने पुढे जाईल? असे नेतृत्व तयार कसे झाले? का झाले? अंबरसिंगांसारख्या नेतृत्वाचे सामर्थ्य कशात आहे ?

शहादे भागातील भिल्ल बांधव अंबरसिंगांना 'महाराज' म्हणून संबोधायचे. 'महाराज' ही उपाधी राजकारणाचा शास्त्रशुद्ध अभ्यास करणाऱ्या कोणालाही खटकते. एका माणसाला सामान्य जनतेपेक्षा अधिक कळते, ही संकल्पना 'महाराज' या राजकीय उपाधीमागे असते. अंबरसिंग कोणत्याही सत्तापदावर नव्हते. सतेच्या सामर्थ्याने ही संकल्पना त्यांनी लादलेली नव्हती. शेकडो वर्षांच्या शोषणाने दुबळा झालेला, भारतीय समाजाच्या परिघाबाहेर फेकला गेलेला निराधार आदिवासी ! या आदिवासी समाजाला समर्थ बनवून आधार देणारे अंबरसिंग. त्यांच्या नेतृत्वाच्या साहाय्याने आपल्या समस्या, आपली दुःखे समाजप्रवाहाच्या गाभ्यात आणून हा आदिवासी समाज पुरुषाला गदगदा हालवत होता, जागृत करत होता. महाराष्ट्रात विविध विचारसरणीच्या राजकीय प्रवाहांना, वृत्तपत्र संपादकांना, तरुणांना, तरुणांच्या संघटनांना, शासनाला आपल्या धीरगंभीर पण प्रखर वाणीने, शांत पण कणखर व्यक्तिमत्त्वाने अंबरसिंग आदिवासींच्या शोषणाची जाण देऊन जात होते, पण सगळ्यांना जागृत करण्याची गुरुकिल्ली, आदिवासींच्या प्रश्नांत खेचण्याची खुबी अंबरसिंगांना ठाऊक होती. आदिवासींचे प्रश्न पटवून देण्याची शुद्ध बौद्धिक कसरत निष्फळ ठरली असती. त्यांना ताठ उभे करून संघर्षाला सज्ज करणे हाच त्यांच्या प्रश्नाचे महत्त्व पटवून देण्याचा एकमेव मार्ग आहे. म्हणून अंबरसिंग आपल्या समाजात ठाण मांडून बसले. भिलाटीमधून सतत संचार. रोज रात्रीचा मुक्काम नव्या भिलाटीमध्ये. भिलाटी जागवू लागले. त्यांचे हत्यार होते भजन ! एकतारी, ढोलक, खंजिरीच्या नादातालात आदिवासींना दुबळे बनवणाऱ्या दुर्गणाबरोबर, रसाळ सुरांच्या माध्यमातून संघर्ष करू लागले. समर्थ बनवण्यासाठी त्यांच्याच बरोबर संघर्ष ! भिल्लांची मानसिक आंदोलने सुरू झाली. मरगळ झडू लागली. आपल्या मधल्या दोषांचा त्याग करून भिल्ल उठू लागला. स्वसामर्थ्याची जाणीव होऊ लागली आणि त्या जाणिवेबरोबर अंबरसिंगांना भिल्ल नेता मानू लागला. भजन म्हणणारा नेता म्हणून अंबरसिंग-दादाचा अंबरसिंग महाराज झाला !

अबरसिंगांना हा मार्ग कसा सुचला ? आत्मसात करता आला ? पाडळद्याला त्यांच्या घरी मी एक दिवस राहिलो होतो. आई-वडील अजूनही शेतमजुरीचे काम करतात. वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंबरसिंगांच्या व्यक्तिमत्त्वावर जबरदस्त प्रभाव होता. वडील म्हणजे ताठ कण्याचा माणूस ! त्यांनी मुलाला स्वाभिमान, अस्मिता, कणखर शिस्त दिली. स्वतः काबाडकष्ट करून शिक्षण दिले. पोरवयात वयपरत्वे शिस्त सुटू लागल्याबरोबर माया कठोर केली. मायेपोटी पोराला लाडाने बिघडू दिले नाही. डोक्यात संतापाने राख घालून घेतली नाही. साधी चापट कधी मारली नाही. पण त्याचबरोबर डोक्यावरून दगड वाहण्याच्या कामाला पाठवून शिस्तही आणली.

कणखर व्यक्तिमत्त्वाचा, कष्टाला मागे न पडणारा, सगळ्यांचे मन मायेने जिंकून घेणारा अंबरसिंग तयार झाल्याबरोबर, वडिलांनी सर्वोदयाच्या ऑफिसवर त्याला नेऊन समाजकार्याला देऊन टाकले ! तेथे त्याने म. गांधीची तत्त्वप्रणाली आत्मसात केली, पण सर्वोदयाचा भाबडेपणा, संघर्षविहीनता यांचा स्पर्श होऊ दिला नाही. गुलामहाराजांनी 30-40 वर्षे आदिवासींमध्ये सांस्कृतिक चळवळ करून परिवर्तन केले होते. म. गांधींबरोबर गुलामहाराज आत्मसात करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास अंबरसिगांनी केला. त्यामुळे आदिवासींबरोबरची नाळ तुटली नाही. दारूचे व्यसन सोडा, भांडू नका, स्त्रियांना मारहाण करू नका, स्वच्छता पाळा, हा संदेश ते भजनामधून देऊ लागले. आदिवासींचे जमीनदारांकडून शोषण, सावकारांकडून लुबाडणूक, शारीरिक अत्याचार, स्त्रियांवरील बलात्कार यांच्या कहाण्यांनी ते अस्वस्थ होऊ लागले. त्यांच्या जीवनाचे जिवंत संघर्षदेखील व्यक्तिमत्त्वात आत्मसात झाले. व्यक्तिमत्त्व संघर्षशील बनू लागले. संघर्षाला उभा राहू लागल्याबरोबर दुबळेपणाची जाणीव होऊ लागली. स्थानिक शक्तींमधून दुबळेपणा जाणार नाही, मग स्थानिक कामाबरोबरच सामर्थ्य संपादनासाठी बाहेर संचार होऊ लागला. बाहेरच्या शक्ती आदिवासींच्या मागे उभ्या करण्यासाठी अंबरसिंग झटू लागले. जीवनाला गुरू करून अंबरसिंग रोज शिकत होते. नित्य नवीन बनत होते, मोठे होत होते.

बाहेर फिरताना गांधीवादाचा, सर्वोदयाचा संस्कार उपयुक्त ठरला. भिल्लपणातून मुक्त व्हायला या संस्कारांची खूप मदत झाली. मागास माणसाची दबलेली अस्मिता जागृत झाली की, प्रथमतः अस्मितेचे रूपांतर अहंकारात होते. शेकडो वर्षे दबलेली अस्मिता अहंकारात रूपांतरित होणे स्वाभाविक असले, तरी शेवटी त्यामुळे मुक्तीच्या प्रक्रियेचा शेवट होतो ! दलित जातीमध्ये काम करताना, पुढारलेल्या दलित जातीच्या नेतृत्वाचा अहंकार त्यांची मुक्ती कशी रोखून धरतो आहे हे स्पष्टपणे लक्षात आणून देतो. जातीय अहंकार अन्य कोणाला जवळ येऊ देत नाही. आत्मरक्षणाची जाणीव (सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम) निर्माण झाल्यामुळे कोणी सावलीला येते अशी शंका आल्याबरोबर त्यावर हल्ला करण्याची प्रवृत्ती बळावते. नवा विचार, नवी शक्ती तोडण्याच्या या प्रवृत्तीमुळे सामर्थ्य वाढत नाही. एका टप्प्यापर्यंत आल्यावर मुक्ती संपते. अंबरसिंगांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये भिल्लपणाचे भांडवल करण्याच्या प्रवृत्तीचा, भिल्लांपासून अन्य अलग ठेवण्याच्या वृत्तीचा, भिल्लपणाच्या जातीय अहंकाराचा लवलेशदेखील नव्हता. त्यामुळे ते निरंतर शक्ती जोडत गेले.

भिल्लांच्या दुनियेतून अंबरसिंग बाहेर पडले व मोठ्या दुनियेत फिरू लागले तेव्हा ते राजकीय पक्षांच्या शास्त्रशुद्ध अशास्त्रीय विचारसरणीच्या, पुरोगामी प्रतिगामीपणाच्या, अहिंसेच्या निष्ठेच्या जंजाळातून शाबूत कसे राहिले? नाही तर नेहमीचा अनुभव उलटा असतो. आपापल्या चष्म्यातून पाहून कसबी लोक आपापल्या हितसंबंधासाठी अशा नेत्याचा वापर करतात. वापर जमला नाही तर त्यांच्याविरोधी अपप्रचार करून त्याला नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. ह्या सगळ्यामधून प्रवास करून अंबरसिंग चक्रव्यूहात अडकले तर नाहीतच, पण सगळ्यांची सर्कस घेऊन ते आदिवासींत परतले. कधीही कोणावर चाबूक न उगारणारा रिंगमास्टर बनले. येथे त्यांचे मोठेपण, आगळेपण आहे. या त्यांच्या अजब कौशल्याचा राजकीय मीमांसकांनी सखोल अभ्यास करावयास पाहिजे. निदान भारतात क्रांती व बांधिलकी मानणाऱ्यांत तरी सूक्ष्म अभ्यास करणे जरुरी आहे. कारण शोषितांमधून नेतृत्व उदयास आल्याशिवाय भारतीय क्रांती सफल होणार नाही. भारतीय कांतीला अत्यावश्यक असणाऱ्या शोषितांच्या नेतृत्वाचा नमुना म्हणजे अंबरसिंग !

सगळ्यांना पुरून उरणाऱ्या शाबूत अंबर सिगांचे सामर्थ्य कशात होते? पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे ते अजिबात पुस्तकी किंवा पढिक पंडित नव्हते, त्यामुळे पोथीनिष्ठ भांडणांतून ते कोणालाही तोडीत नसत. पुस्तकी वादात त्यांना कोणी जबरदस्तीने ओढू लागला, तर ते उत्तर द्यायचे, "मला हे काही कळत नाही. मला विनोबांनी सांगितले की कार्य करायचे असेल तर पुस्तके वाचत जाऊ नकोस!" भिन्न विचारसरणीच्या लोकांना पोकळीतली चर्चा बंद करून प्रत्यक्ष नम्र कामात येण्याचे आवाहन ते करत असत. या नम्र आवाहनाने एकदा तो माणूस कामात आला की, त्याचे त्यालाच वास्तवाचे भान येई. काय शास्त्रीय आणि काय बिगरशास्त्रीय याचा साक्षात्कार ज्याचा त्यालाच होई. गांधीवादाला भोंगळ विचारसरणी म्हणून नाके मुरडणारे, गांधींच्या नावाचा वास आला की नाकाला रुमाल लावणारे तेथे, यत्किंचितही हिंसा न होता शास्त्रशुद्ध सत्याग्रह कसा करावा यावर व्याख्याने करू लागतात! या किमयेचा आत्मविश्वास असल्यामुळे सावरकरवाद्यांपासून मार्क्सवाद्यांपर्यंत सर्वांना अंबरसिंगाचे शहाद्याला येण्याचे कायमचे निमंत्रण असायचे !

ध्येयात्मक (आयडॉलॉजिकल) शुद्ध स्पष्टतेमुळे किंवा बुद्धिकौशल्याने अंबरसिंग हे करत नव्हते. त्यांना हे साधत होते याची तीन-चार महत्त्वाची कारणे आहेत. भूमिपुत्राचा उपजत व्यवहारचतुरपणा (साउंड कॉमन सेन्स) त्यांच्याकडे पुरेपूर होता. आपल्या स्थानिक कामावर त्यांची जबरदस्त पकड असल्याने ते निर्भय व आत्मनिर्भर होते. बुद्धीऐवजी मानवी ऊबेचा (ह्यूमन वार्थ) आविष्कार त्यांच्या संघटनकर्त्यांत अधिक होता. 'पुस्तके' वाचत नसले तरी ते सदैव माणसे वाचत होते. माणसे वाचताना त्यांच्या डोक्यात असलेल्या पुस्तकाचा भाग आपोआपच त्यांच्याकडून वाचला जाई. काटेकोर शास्त्रीय अभ्यास करणारी माणसे फार रखरखीत बनतात. पुस्तकीपणात मानवीपण गमावतात. बोथट संवेदना घेऊन वावरू लागतात. अंबरसिंग अतिसंवेदनशील माणूस होता.

विशिष्ट विचारसरणीची माणसे एकांगी बनतात. अंबरसिंगांच्या कामात बहुअंगीपणा असल्याने ते अधिक बुद्धीच्या माणसापुढे फिके पडले नाहीत. मी त्यांच्याबरोबर चार-पाच दिवस शहाद्यात फिरत होतो. ते जमिनीचा, शोषणाचा, सावकारीचा आर्थिक प्रश्न तर बोलायचेच, पण त्याचबरोबर मुलींना भिल्ल वेष टाकून गोल पातळ नेसा, भिलोरी भाषेऐवजी मराठी भाषा बोला, दारू पिऊ नका, अशा अनंत गोष्टी सांगत असायचे. जीवनाची एकच एक बाजू (डायमेन्शन) घेऊन काम करणारी माणसे नंतर खोड्यात (फिक्स) किंवा बंद गल्लीमध्ये अडकतात. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैयक्तिक अशा सर्वांगाने जीवनाचे उत्थान करणाऱ्यांची ती अडचण होत नाही. अंबरसिंगांच्या जीवनाकडे बघण्याच्या या सम्यक् दृष्टिकोणामुळेच त्यांच्यामध्ये आततायीपणाऐवजी सामर्थ्यशील आत्मविश्वासपूर्ण शांतता होती, आत्मघातकी हिंसा नव्हती. भ्याडपणाचा बुरखा म्हणून वापरलेली अहिंसा नव्हती किंवा वैफल्याला झाकण्यासाठी हिंसेच्या भाषेचा वापर नव्हता. त्यांचा लढाऊपणा, सामर्थ्य आणि अहिंसा ही एकाच गोष्टीची अनेक रूपे होती !

अंबरसिंग आदिवासी नेता म्हणून माझ्या डोळ्यांसमोर येत नाही, तर भारतात येऊ घातलेल्या सम्यक् सर्जनशील क्रांतीच्या प्रक्रियेतील विकास पावत चाललेले नेतृत्व म्हणून मला त्याचे महत्त्व वाटते. निवडणुकीचा सौदेबाजीचा प्रकार हा भारतीय क्रांतीमधील सर्वात मोठा अडथळा आहे. हुकूमशाही न मानणारा, लोकशाहीवर श्रद्धा ठेवणारा, पण स्वतःला सौदेबाजीच्या निवडणुकांच्या राजकारणापासून अलिप्त राखणारा माणूस म्हणून अंबरसिंगांचे महत्त्व फार आहे. सत्तारूढ पक्षासहित कोणत्याही पक्षाने, त्यांच्यामागे भिल्लांचे गड्डठ्ठा मतदान येईल या होऱ्याने आपले तिकीट निवडणुकीत त्यांना दिले असते! पण कोणाला त्यांनी आपले इमान विकले नाही. अशा राजकीय चारित्र्याचा देशभर दुष्काळ आहे! मागास समाजाच्या नेत्याने हजारो वर्षांची सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठेची भूक भागवली तर त्यात त्यांचा उपभोग घेऊन अजीर्ण झालेल्यांनी गहजब करण्यासारखे काहीही नाही. प्रामाणिकपणा, अव्यभिचारी जननिष्ठा यातून अंबरसिंगांचे राजकीय चारित्र्य घडले होते म्हणूनच ते सर्वांना टक्कर देऊन शाबूत राहिले.

अंबरसिंग माझे वैयक्तिक मित्र होते. मित्राबरोबर सम्यक् क्रांतीला बांधिलकी मानून मार्गक्रमणा करणारे श्रेष्ठ सहकारी होते. नेमकी आज ज्या प्रकारच्या साथीची गरज होती त्याचा उत्तम आदर्श त्यांच्यामध्ये होता. अशा निकडीच्या वेळी आणि वयाच्या अवघ्या तेहतिसाव्या वर्षी काळाने अंबर सिंगांना जीवनाच्या रणांगणावरून ओढून नेले. मित्रा, अगदी नको त्या वेळी तू गेलास !

साधना : 9 मार्च 1974

52 वर्षांपूर्वी कुमार सप्तर्षीनी हा लेख लिहिला तेव्हा ते 33 वर्षांचे होते. 18 जुलै 2026 रोजी त्यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले.
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

कुमार सप्तर्षी ( 18 लेख )
mgsnidhi@gmail.com

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, युवक क्रांती दलाचे संस्थापक व राजकीय लेखक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके