डिजिटल अर्काईव्ह

गांधींना पत्र लिहिण्याची दांडगी हौस. एके दिवशी बसल्या बसल्या 54 पत्रं लिहून टाकली, असं त्यांचे अभिन्न सहकारी किशोरीलाल मश्रुवाला यांनी 'गांधी अॅज आय सॉ हिम' या पुस्तकात नमूद केलंय. पत्रलेखनातही कमालीची काटकसर. थोडक्यात लिहायचे झाल्यास आलेल्या पत्रांच्या पाकिटांचे नि लिफाफ्यांचे छान चौरस तुकडे कापून त्यांवर दोनेक ओळी लिहायच्या की झालं. प्रसंगी ताराही पाठवायचे. गांधी बहुधा पेननं लिहायचे; एकेकदा पेन्सिलीनं. उजवा हात कुरकुर करू लागला तर डाव्या हातानं लिहायचे नि त्या हातानंही असहकार आंदोलन सुरू केलं तर पत्र डिक्टेट करायचे. खरं तर भारतीय तार आणि टपाल खात्यानं आपला ब्रँड अँबॅसॅडर म्हणून मागेच गांधींची नेमणूक करायला हवी होती.

'द सिलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा गांधी' (नवजीवन पब्लिशिंग हाऊस, अहमदाबाद; पुनर्मुद्रण 1993-1994) या महाग्रंथाच्या पाचव्या खंडातली ही काही निवडक पत्रं. संक्षिप्त. नि मराठीत. मूळ पत्रं इंग्रजीत आहेत.

29 जुलै, 1918, नडियाद

प्रियतम कस्तुर,
माझ्याबरोबर राहण्यासाठी तुझं मन तळमळत्येय हे मला ठाऊकाय. पण आपण (आपापल्या ठिकाणी राहून) आपापलं काम करत राहावं असं मला वाटतं. सध्या तू जिथं आहेस तिथंच तू राहावंस हे योग्य. तिथल्या लहान मुलांना तू आपलं समजून राहशील तर लवकरच तुला (स्वतःच्या) मुलांची उणीव भासणार नाही. वाढत्या वयात माणसानं किमान एवढं तरी करायला हवं. दुसऱ्यांवर प्रेम करू लागशील नि त्यांची सेवा करशील तर तुझ्या मनात आनंद उफाळून येईल. सकाळच्या प्रहरी रुग्ण लोकांना भेटण्याचा क्रम ठेव; त्यांची शुश्रूषा कर. ज्यांना विशेष आहाराची गरज असेल त्यांच्यासाठी तशी सोय करण्यास शिक. महाराष्ट्रीय महिलांना खास भेट; त्यांच्या मुलांशी खेळ किंवा त्यांना फिरायला बाहेर घेऊन जा. आपण उपरे नाही असं (तुझ्या वर्तनामुळे) त्यांना वाटलं पाहिजे. त्यांची तब्येत सुधारली पाहिजे.

दुसऱ्यांच्या सेवेत मन रमवशील तर तुझं मन आनंदानं तुडुंब भरेल.

- मोहनदास


7 जून 1916 रोजी विनोबा आणि गांधी यांची कोचरब आश्रमात प्रथम भेट झाली.
त्याच दिवशी गांधींनी नरहर शंभू भाव्यांना (विनोबांचे वडील) पत्र लिहिलं.
मायना नाही.
तुमचा मुलगा विनोबा माझ्याबरोबर आहे. एवढ्या कोवळ्या वयात तुमच्या मुलानं उच्च कोटीचं चैतन्य आणि वैराग्य आत्मसात केलंय. हे करायला मला अनेक वर्ष संयमपूर्वक परिश्रम करावे लागले.

- एम. के. गांधी

मायनाबिगरच्या एका पत्रात (10 फेब्रुवारी 1918) गांधी विनोबांना म्हणतात :

कोणत्या शब्दांत तुमची वाखाणणी करू समजत नाहीए. चारित्र्य, स्नेहशीलता आणि आत्मपरीक्षणाची शक्ती या तुमच्या सदुणांमुळे मी भारावून गेलोय. तुमचं मूल्य जोखण्याची माझी योग्यता नाहीए. तुम्ही स्वतःचं केलेलं मूल्यमापन मी स्वीकारतो आणि तुमच्या पित्याची भूमिकासुद्धा. माझी अनेक वर्षांची इच्छा तुम्ही पूर्ण केलीए. पुत्र जेव्हा सगुणात वडिलांच्या पुढं जातो तेव्हा पिता हा खऱ्या अर्थानं पिता ठरतो.

तुम्ही जे मिळवलंय ते सर्वस्वी तुमच्या बळावर. त्यात माझे काहीही प्रयत्न नाहीएत. तेव्हा तुम्ही मला जी भूमिका (पित्याची) देऊ केलीए ती प्रेमाची भेट आहे असं मानून मी ती स्वीकारतोय. या भूमिकेला लायक ठरावं म्हणून मी कसोशीनं प्रयत्न करेन; जर मी दुसरा हिरण्यकश्यपू झालो तर तुम्ही प्रल्हाद होऊन मला आदरपूर्वक विरोध करा.

- बापूंचे आशीर्वाद

(विनोबांना लिहिलेलं हे पत्र गांधींचे सचिव आणि पुत्रवत सहकारी महादेवभाई देसाई यांनी लिहून काढलं. महादेवभाईंनी म्हटलंय की, पत्र डिक्टेट करून झाल्यावर गांधी म्हणाले, "विनोबा हे थोर आहेत. मी भाग्यवान की, महाराष्ट्रीय आणि मद्रासी (तामीळ) लोकांशी माझं छान जुळलं. मद्रदेशीय आता फारसे माझ्यापाशी नाहीत. परंतु, एकाही महाराष्ट्रीयानं आजवर माझा विरस केलेला नाहीए. यांत विनोबा हे तर प्रशंसेच्या पलीकडे गेलेत.")

नंदी हिल्स, बंगळूरजवळ / हरमान कॅलनबॅख / 13 मे 1927

मायना नाही.

पलंगावर पडल्या पडल्या जुनी पत्रं चाळत असताना तुमचं 27 फेब्रुवारीचं पत्र मिळालं आणि कैक आनंददायी नि पवित्र आठवणी जाग्या झाल्या. गेल्या दोन वर्षांत तुम्ही मला फारशी पत्रं लिहिली नाहीएत. जी काही थोडीबहुत लिहिलीएत त्या पत्रांचा सूर निराशेचा आहे; स्वतःवर वैतागलेला असा. असं असलं तरीही तुमच्या ठायी माझा जो विश्वास आहे तो मी हयात असेस्तोवर संपणार नाहीए. अवतीभवती घडणाऱ्या नि तुम्हाला तात्पुरतं सुख देणाऱ्या रोमांचक घटनांचा केव्हातरी तुम्हाला थकवा वाटू लागेल आणि तुम्ही भारतात जुन्या मित्राला भेटायला याल आणि जुन्या ओळखी पुन्हा नव्या होतील. तुम्ही तसं तात्पुरतं आश्वासन मला दिलंय. पुढच्या सप्टेंबर वा ऑक्टोबरात तुम्ही भारतात येणार आहात. जमलं तर जरूर या आणि तुम्हाला पाहिजे तेवढा दीर्घ काळ किंवा अल्प काळ रहा. तुमच्या मर्जीनुसार...

अलीकडच्या काळात बुद्धीला खूप ताण पडला. यातून काहीतरी विपरीत घडेल अशी भीती मनाला ग्रासत होतीच आणि कार्यक्रमांना थोडा आवर घालावा असं मी म्हणत असतानाच आजारी पडलो. देव मला सांगत होता, 'तुझा हा वेडेपणा तुझ्या लक्षात येण्यापूर्वी मी तुझ्या गर्वाचा चुराडा करणार आहे. मी हे सगळं चांगल्या कार्यासाठी करतो आहे असा तुझा समज होता ना. मूर्खा, तुला वाटलं की, तुझ्या हातून मोठा चमत्कार घडणारेय. आता चांगला धडा मिळाला तुला. मोठाली कामं देवच घडवून आणत असतो. तोच आपल्या मर्जीनुसार माणसांचा उपकरण म्हणून उपयोग करत असतो.' परमेश्वरानं दिलेली ही तंबी मी विनम्रपणे स्वीकारतोय.

(हरमान कॅलनबॅख: गांधीजींचे द. आफ्रिकेतले अभिन्न मित्र आणि सहकारी.)

25 जुलै 1918, नवागाम


चि. मगनलाल,

भारतात काही कटू अनुभव मिळाले असले तरीही माझी मूळ भूमिका कायम आहे. पाश्चात्त्य देशांकडून आपल्याला फार शिकण्यासारखं नाहीए. भारतातलं वाईट पाहिल्यानंतरसुद्धा पाश्चात्त्य देशांची ओळख आपल्याला झाली पाहिजे असं मला अजिबात वाटत नाही. आपल्याला मांसाहार किंवा मद्यपानाची गरज नाहीए.

मनापासून सांगायचं तर स्वामीनारायण किंवा वल्लभाचार्य यांनी समाजाकडून पौरुष हिरावून घेतलं. आपण स्वसंरक्षण करण्यासही असमर्थ ठरलो. या मंडळींमुळे लोकांनी मद्यपान, धूम्रपान सोडलं हे चांगलंच झालं म्हणायचं. पण हे साध्य नसून साधन असतं. धूम्रपान करणारा माणूस जर बुद्धिमान असला तर त्याचा सहवास हवाहवासा वाटतो. दुसरीकडे, एकही विडी न फुंकणारा माणूस जर (अन्नात) भेसळ करत असेल तर तो समाजाची काय सेवा करणार?

स्वामीनारायण आणि वल्लभाचार्य पंथांनी प्रेमाची शिकवण दिली; परंतु तो भावविवशपणा होता. माणसाला खऱ्या प्रेमाचं मूल्य समजलं नाही. या पंथांनी अहिंसेचा मूळ स्वभाव ओळखला नाही. अहिंसा म्हणजे चित्तात जाग्या होत असलेल्या प्रबळ ऊर्मांवर ताबा मिळवणं. याचा संबंध दोन माणसांच्या आपसातल्या व्यवहाराशी नि वागण्याशी असतो.

मूल्यपतनाच्या सध्याच्या काळात जन्माला आलेल्या आणि सभोतालच्या वातावरणापासून अलिप्त न राहू शकलेल्या या दोन पंथांचा गुजरातवर चुकीचा परिणाम झाला; तुकाराम आणि रामदासांच्या बाबतीत असं घडलं नाही. तुकारामांच्या अभंगांत आणि रामदासांच्या श्लोकांत मनुष्याच्या प्रयत्नांना भरपूर वाव आहे. नि हे दोन्ही संत वैष्णव होते. वैष्णव परंपरा आणि वल्लभ-स्वामीनारायण यांच्या शिकवणुकीची गफलत करू नका.

वैष्णव परंपरा हे प्राचीन सत्य आहे. अहिंसेत हिंसा असते हे मला समजू लागलंय. पूर्वी हे माझ्या लक्षात आलं नव्हतं. हा (माझ्यात घडून आलेला) फार मोठा बदल आहे. दारुड्याच्या हातून काही वाईटसाईट घडू नये म्हणून त्याला आवरणं हे आपलं कर्तव्य आहे (नि यात छुपी हिंसा आहे. कारण अशा वेळी बळाचा प्रयोग करणं अपरिहार्य ठरतं.)

दुसरं, वेदनेनं कण्हणाऱ्या किंवा पिसाळलेल्या कुत्र्याला मारून टाकणं हेही आपलं कर्तव्य आहे. या उदाहरणांत हिंसा ही अहिंसा आहे हे लक्षात येईल. हिंसा शरीराच्या कार्याचा एक भाग आहे. ब्रह्मचर्य म्हणजे वासनेचा मोह टाळणं. पण म्हणून आपण आपल्या मुलांना नपुंसक म्हणून वाढवत नसतो. भरपूर शारीरिक बळ असूनदेखील वासनेवर ताबा मिळवणं याचा अर्थ ब्रह्मचर्याचं पालन करणं. आपली मुलं सुदृढ असली पाहिजेत. हिंसेवर पूर्ण ताबा मिळवणं त्यांना शक्य नसेल तर त्यांना हिंसेची सूट दिली पाहिजे. लढण्यासाठी आपल्या शक्तीचा उपयोग करता करता त्यांना अहिंसेकडे वळवता येईल. एका क्षत्रियानं दुसऱ्या क्षत्रियाला अहिंसेचा पाठ शिकवला होता.

बापूचे आशीर्वाद.

मगनलाल गांधी हे गांधींचे चुलत भाऊ आणि जिवलग सहकारी. वल्लभ आणि स्वामीनारायण : दोन प्रमुख वैष्णव संप्रदाय.
2 सप्टेंबर 1924, मुंबई

प्रिय मोतीलालजी (नेहरू),

मागच्या पत्राप्रमाणेच हे पत्रदेखील जवाहरलालची कैफियत मांडण्यासाठी आहे. ते माझ्या ओळखीतले सगळ्यांत एकाकी तरुण आहेत. तुम्ही मानसिकरीत्या त्यांना दूर लोटताहात हे मला खुपतं. शारीरिक त्याग तर अशक्यच आहे. मी आणि मंझर अली (स्वातंत्र्यसैनिक आणि गांधींचे जवळचे सहकारी मंझर अली 'सोख्ता') येरवडा तुरुंगात एकत्र होतो आणि नेहरू मंडळींविषयी आमच्यात कैकदा चर्चा होत असे. तुम्ही जवाहरलालसाठी जिवंत आहात, असं मंझर अली एकदा म्हणाले होते. त्यांचा अभिप्राय खरा आहे. त्या सुंदर स्नेहाला माझ्यामुळे, थेट वा अप्रत्यक्ष, किंचितसुद्धा तडा पडावा असं मला वाटत नाहीए.

आपला प्रामाणिक,
- एम. के. गांधी

17 जानेवारी 1928, साबरमती

प्रिय जवाहरलाल,

आपल्या दोघांच्या विचारशैलीत काही तफावत आहे अशी शंका मला येऊ लागली होती; परंतु आपले मतभेद इतक्या थराला पोचतील याचा अजिबात अंदाज मला नव्हता. तुम्ही राष्ट्राचा विचार करून आपलं मन मारत होतात आणि माझ्याबरोबर आणि माझ्या सूचनांप्रमाणे काम करत होतात. थोडक्यात, एका कृत्रिम ओझ्याखाली कण्हत होतात. मनाची अशी अवस्था असताना तुम्ही माझ्या काही गोष्टींकडे काणाडोळा करत होतात. माझ्या त्याच गोष्टी आज तुम्हाला दोषास्पद वाटताहेत.

तुम्हाला माझ्याकडून स्वातंत्र्याची अपेक्षा असल्यास मी तुम्हाला आवश्यक ते स्वातंत्र्य देत आहे. एवढी सगळी वर्षं तुम्ही एकही प्रश्न नि विचारता माझ्याशी एकनिष्ठ राहिलात. तुमच्या विनम्र निष्ठेचं मोल मला कळतंय खास करून तुमची द्विधा मनःस्थिती लक्षात घेता. या पुढं मी आणि माझ्या विचारांविरुद्ध तुम्ही उघड लढा सुरू केला पाहिजे असं मला स्पष्ट दिसतंय. कारण जर मी चूक असेन तर मी देशाचं अपरिमित नुकसान करतोय आणि हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर तुम्ही माझ्याविरुद्ध बंड पुकारलं पाहिजे. तुमच्या निष्कर्षांविषयी तुमच्या मनात संशय असेल तर तुमच्याशी व्यक्तिशः चर्चा करण्यास मला आनंदच होईल.

आपल्यातले मतभेद इतके व्यापक आणि मूलभूत आहेत की, सामंजस्याची शक्यता मला दिसत नाहीए. तुमच्यासारखा धैर्यशील, एकनिष्ठ, कर्तृत्ववान आणि प्रामाणिक मित्र मी गमावून बसणारेय याचं अर्थातच दुःख आहे आणि ते मी तुमच्यापासून लपवून ठेवू शकत नाही. परंतु, एका विशिष्ट ध्येयासाठी काम करत असताना मैत्रीचा त्याग करावा लागतो. मूळ ध्येयापुढे इतर विचार गौण ठरतात. परंतु मैत्री संपली याचा अर्थ व्यक्तिगत स्नेहही आटला असं नाही. तीव्र राजकीय मतभेद असले तरीही आपण बरीच वर्षं एकाच कुटुंबाचे सदस्य आहोत.

स्नेहपूर्वक,
- बापू


9 ऑक्टोबर 1945, आनंद भवन, अलाहाबाद 

प्रिय बापू,

सत्य विरुद्ध असत्य किंवा अहिंसा विरुद्ध हिंसा हा प्रश्न आपल्यापुढं आहे असं मला वाटत नाहीए. सहकार्याची खरीखुरी भावना आणि शांततामय मार्ग या विचारांना बळ देणारा समाज घडवणं हे आपलं उद्दिष्टं असलं पाहिजे. सत्य नि अहिंसा हे विचार गावंच धारण करू शकतात हे माझ्या लक्षात येत नाहीए. सर्वसाधारणपणे गावं ही बौद्धिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेली असतात आणि मागासलेल्या वातावरणात प्रगती शक्य नाही. कोत्या विचारांची माणसं खोटी आणि हिंसक असण्याची शक्यता जास्त.

अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणं; वस्त्र, घर, शिक्षण, स्वच्छता या प्रत्येकाच्या मूलभूत गरजा आहेत. ही उद्दिष्टं त्वरेने पूर्ण झाली पाहिजेत. वाहतुकीची आधुनिक साधनं अनिवार्य आहेत; तसंच आधुनिक विकासाचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. हे आपल्याला टाळता येणार नाहीए. यामुळे काही प्रमाणात आपल्याला मोठी कारखानदारी स्वीकारावी लागेल. पूर्णपणे ग्रामीण समाजात हे सगळं व्यवस्थित बसू शकेल काय ?

जोवर आपण तांत्रिक प्रगती करत नाही तोवर भारत खऱ्या अर्थानं स्वतंत्र झाला असं म्हणता येणार नाही.

या घडीला सैन्य आणि वैज्ञानिक प्रगती एवढाच विचार माझ्यासमोर नाहीए. जगाची सध्याची मांडणी लक्षात घेता वैज्ञानिक संशोधनाचा भक्कम पाठिंबा नसेल तर भारत सांस्कृतिकदृष्ट्यादेखील पुढं जाऊ शकणार नाहीए.

'हिंद स्वराज्य' वाचलं त्याला बरीच वर्षं झालीएत. परंतु, वीस वर्षांपूर्वी वाचलं तेव्हादेखील ते मला पूर्णपणे अवास्तव वाटलं. तुम्ही तुमच्या मूळ भूमिकेच्या पुढं जाऊ पाहताहात असं तुमच्या नंतरच्या काळातल्या भाषणांवरून आणि लिखाणावरून वाटू लागलं. वाटलं की, तुम्ही आधुनिक प्रवाह समजून घेताहात. मात्र, तुमच्यासमोर अद्याप जुनंच चित्र ('हिंद स्वराज्य' पुस्तिकेत रेखाटलेलं) जसंच्या तसं आहे असं तुम्ही आम्हाला म्हणालात आणि मी चकित झालो.

काँग्रेसनं ते चित्र स्वीकारणं तर सोडा, ते विचारातसुद्धा घेतलं नाहीए हे तुम्हाला ठाऊक आहे. या मूलभूत प्रश्नांचा विचार करणं हे काँग्रेससाठी कितपत योग्य ठरेल हे तुम्ही ठरवा. अशा मुद्यांवर वाद घालून काँग्रेस आपला मार्ग हरवून बसेल नि लोकांच्या मनाचा गोंधळ उडेल.

'हिंद स्वराज'ला अडतीस वर्षं झालीएत. या काळात जग पूर्णपणे बदललंय. कदाचित जग चुकीच्या दिशेनं जात असेल. वस्तुस्थिती, तथ्य, (देशातले) प्रवाह आणि मनुष्यबळ या गोष्टी लक्षात ठेवून सगळ्या परिस्थितीचा विचार करावा लागेल. नाहीतर वास्तवापासून आपण फारकत घेऊ. जगातला एक मोठा भाग आत्मनाशाकडे झुकलाय हे तुमचं म्हणणं खरं आहे. कदाचित संस्कृतीत जे विषारी बी रुजलंय त्याचा हा अपरिहार्य परिणाम असावा.

अभावितपणे सुचलेले विचार घाईघाईत लिहून काढलेत. त्यामुळे मूलभूत आणि गंभीर मुद्यांवर अन्याय होत असेल असं वाटतं. माझ्या या विस्कळीत मांडणीबद्दल आपण मला क्षमा कराल अशी आशा आहे. पुढच्या काळात माझं म्हणणं स्वच्छपणे लिहून तुम्हाला कळवावं असा विचार आहे.

तुमचा स्नेहार्द्र, 
जवाहरलाल

 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके