डिजिटल अर्काईव्ह

सगळ्या गोष्टी नशिबावर सोडायच्या म्हणजे मनुष्यावर कसलीच जबाबदारी नाही. आपल्या प्रमादांकडे बघण्याचं कारणच नाही, असं मला वाटायचं. एकदा मी त्यांना तसं विचारलं. त्यांनी माझा एकही प्रश्न कधी धुडकावून लावला नाही. माझ्या प्रश्नांच्या आरशात ते स्वतःचा भूतकाळ पाहात असावेत. आम्ही बॅकबेच्या बाकड्यावर बसलो होतो. रात्रीचे दहा वगैरे वाजले होते. समोर समुद्र. मलबार हिलच्या वळणापर्यंत दिव्यांचा रत्नहार झगमगत होता.

'अंब्रीश, तुम्हारी बात बराबर है, यार...' ओपी म्हणाले नि समोरच्या लाटांकडे स्थिर नजरेनं पाहू लागले. आता ओपी रात्रभर आपल्या चुकांचा विचार करत तळमळत राहतील की काय, असं वाटलं नि माझं मन गलबललं. दुसऱ्याच क्षणी शेख मुख्तारचा एक किस्सा सांगून ते खळखळून हसले.

ओंकारप्रसाद (ओपी) नय्यर अवलिया होते. सिनेमा-संगीतातला मोठा मातब्बर माणूस. एक काळ गाजवला. पण वर्तन नि व्यवहारात संगीतकाराचं एकही लक्षण किंवा बाह्य खूण नाही. ना अंगात झुळुझुळू धोतर, ना कुर्ता; ना हातात पानाचा डबा. उगा उगा सिगरेटच्या डब्यावर ठेका धरून गुणगुणणं नाही. ओपी स्टॉक मार्केटवाले दिसायचे. किंवा शाह, मेहता असं नाव धारण केलेला हिंदी चित्रपटांचा धनाढ्य वितरक.

जुन्या काळी सिनेमातल्या संगीतकारांना प्रतिष्ठा नव्हती. त्यांना बाजामास्टर म्हणायचे. दुसऱ्या महायुद्धानंतर सगळं बदललं. हिंदी सिनेमे गाण्यांवर चालू लागले. संगीतकारांना मान मिळू लागला. मास्टर गुलाम हैदर सुटाबुटात असायचे, हातात 555 सिगरेटचा डबा. ओपींवर गुलाम हैदरचा प्रभाव होता.

गुलाम हैदरनी हिंदी सिनेमात पंजाबी ठेका आणला. बंगाली वळणाची धीरगंभीर गाणी काहीशी फिकी पडू लागली. फाळणीनंतर गुलाम हैदर पाकिस्तानला गेले. राज कपूरनं 'बरसात'ला पंजाबी ठेक्यानं सजवलं. ओपीनं तो ठेका पुढे चालवला. नि काय सुरेख चालवला. ओपींनी गुलाम हैदरच्या पंजाबी ठेक्यावर पाश्चात्त्य बीटचा टाका मारला.

मुखड्याला ढोलक-तबला नि अंतऱ्याला पाश्चात्त्य बीट असा स्वरमेळ ओपी छान बसवायचे. मुखड्यावर परत येताना पुन्हा ढोलक तबला. एकेकदा हा क्रम उलटही असायचा. ओपींचा हा बाज गाजला. पेपरवाले त्यांना रिदम किंग म्हणायचे.

'बाबूजी धीरे चलना / प्यार में जरा संभलना' हे गाणं ऐका. अंतऱ्याला भारतीय तालवाद्य नि मुखड्याला वेस्टर्न बीट. गीता दत्तचं हे गाणं झोकदार, डौलदार लयीत चालतं. 'सवेरे का सूरज तुम्हारे लिए है' (चित्रपट : 'एक बार मुस्कुरा दो'. किशोरकुमारचं गाणं आहे.) हे गाणं त्यांनी झपतालात बांधलं. हिंदी सिनेमात झपताल फार ऐकू येत नाही.

ओपींना शास्त्रोक्त संगीताची रीतसर तालीम मिळाली नव्हती. अन् तरीही 'फागुन' (1956. मधुबाला नायिका.) चित्रपटातली सगळीच्या सगळी गाणी त्यांनी पीलू रागात कशी काय बांधली? पीलू कोणत्या थाटातला राग, आरोह-अवरोह काय ते माहीत नाही.

मुंबईत बेगम अख्तर, उस्ताद अमीरखां, बडे गुलाम अली खां, केसरबाई केरकर, पं. भीमसेन जोशी यांच्या मैफलींना नौशाद, एस. डी. बर्मन, रोशन, मदनमोहन वगैरे संगीतकार आवर्जून हजर असायचे. ओपी नाही. ते एकटे राहिले नि एकांडेपणातून बळ घेत जगले.

ओपी मूळचे लाहोरचे. ते 'लॉहोर' म्हणायचे. जन्मः 1924. वयाच्या पंधराव्या वर्षी ते लाहोर रेडिओ स्टेशनच्या कार्यक्रमात गाऊ लागले. शाळा, शिक्षण, अभ्यास वगैरे सभ्य मुलांचे उद्योग त्यांना कधी जमले नाहीत. 'मी कुटुंबातला black sheep (वाया गेलेलं द्वाड पोर) होतो', असं ते म्हणायचे. कुटुंबीयांच्या आठवणी कधी सांगितल्या नाहीत. आपल्या आईविषयी एक-दोनदा बोलले. बालपणी वाट्याला एक चमत्कारिक तुटलेपण आलं. ते त्यांना कायमचं चिकटलं.

लाहोर तेव्हा कला नि संगीताचा केशरमळा होता. ब्रिटिश लोक लाहोरला भारताचं पॅरिस म्हणायचे. नाटक कंपन्यांना बरकत होती; भटके गायक नि पीर-फकीर साधू सकाळी सकाळी गावभर गात गात फिरत असायचे. खानदानी कलावंतिणींच्या कोठ्यांवर जाऊन गाणं ऐकणं हे प्रतिष्ठेचं मानलं जायचं. तवायफांना साहित्याची उत्तम समज होती. शमशाद बेगम, उमराजिया बेगम, वहीदन, कज्जन, नूरजहां लाहोरच्या. मग हिंदी सिनेमात आल्या.

अशा या रंगेल नि रगेल लाहोरात दलसुख पंचोली नावाचा गुजरातचा नागर ब्राम्हण काय करत होता? गुजरातला 'आवजो' करून तो पोटापाण्यासाठी लाहोरला आला. तिथं एका स्टुडिओत हमालाची नोकरी मिळाली. सिनेमाच्या रिळांचे डबे थेटरला पोहोचवायचे. खूप मेहनत केली. सिनेमाचा धंदा शिकून घेतला आणि स्वतःची फिल्म कंपनी काढली 'पंचोली आर्ट्स'.

'जमीनदार', 'खानदान', 'खजांची', 'दासी' वगैरे पंचोलींच्या चित्रपटांवर रसिकांनी पैशाच्या थैल्या रिकाम्या केल्या. पंचोलींकडे काम मिळावं अशी ओपींची इच्छा होती. ती पूर्ण झाली, परंतु फाळणीनंतर. ऑगस्ट 1947.

फाळणी झाल्या झाल्या ओपींच्या कुटुंबानं दिल्लीची वाट धरली. ओपी एकटेच लाहोरला राहिले. दोनेक महिन्यांनंतर तेही दिल्लीला आले. दरम्यान, दलसुख पंचोली लाहोर सोडून मुंबईला डेरेदाखल झाले. त्यांनी 1951 मध्ये 'नगीना' काढला. शंकर-जयकिशनचं संगीत.

ओपींनी आपल्या एका मित्रामार्फत पंचोलीशेठकडे संधान जुळवलं. शेठजींनी आपल्या पुढच्या सिनेमाचा संगीतकार म्हणून ओपींची निवड केली. खरंतर लाहोरला असताना ओपींनी दलसुखभाईंच्या स्टुडिओच्या किती खेपा केल्या. पण फाळणीमुळे पंचोली-ओपी एकत्र आले. नियती तरी काय फासे टाकते.

'आसमान' हा ओपींचा पहिला हिंदी सिनेमा. तो पडला. पुढचा 'छमछमाछम' नि त्या पुढचा गुरुदत्तचा 'बाज' पडला. गाशा गुंडाळून दिल्लीला परत जावं का असा विचार ओपींच्या मनात घोळत असताना गीता दत्तनं आपल्या नवऱ्याकडे शब्द टाकला नि ओपींना 'आरपार' मिळाला. 'आरपार' सुपरहिट झाला.

-पिक्चर चालला तर नवी गाडी देईन, असं गुरूदत्तनं ओपी, वहिदाबाई आणि राज खोसला या तिघांना शब्द दिला होता. त्याप्रमाणे राज खोसला नि वहिदाबाईंना नवीकोरी गाडी मिळाली ओपींना नाही. ओपी गुरुदत्तच्या ऑफिसात गेले नि त्याला भिडलेच. 'राज खोसला तुझा पित्त्या आणि वहिदा तुला आवडते म्हणून दोघांना नवी गाडी. माझं काय? खोटारड्या...' वगैरे बराच राडा केला.

गुरूदत्तनं ओपींना गाडी दिली की नाही, ठाऊक नाही. मात्र, पुढचा सिनेमा दिला 'मिस्टर अॅण्ड मिसेस 1955. खूप चालला. गुरूचा तिसरा सिनेमाही ओपींकडेच आला 'सीआयडी'. नि तोही चालला. लागोपाठ तीन हिट सिनेमे. आधीच ओपींचा स्वभाव तापट. तीन-तीन हिट सिनेमांची नशा थेट मेंदूच्या डाव्या भागात गेली. एकदा एस. मुखर्जीशी तंटा झाला. पैशावरून काहीतरी. मुखर्जी हे हिंदी सिनेमातलं अग्रगण्य नाव. 'फिल्मिस्तान'चे सर्वेसर्वा. अगोदर नक्की केलेली रक्कम मुखर्जीनी दिली नाही की असंच काहीतरी झालं.

ओपी मुखर्जीना म्हणाले, 'दिलेला शब्द तुम्ही पाळत नाही. आप अपनी बात से मुकर जाते हो. इसलिए आप का नाम मुकर्जी है.' ओपी सटासट वाग्बाण सोडायचे.

बी. आर चोप्रांनी 'नया दौर'वर बख्खळ पैसा कमावला. ओपींचं संगीत. एकूणेक गाणी चालली. चोप्रांनी शानदार पार्टी दिली. दिलीपकुमार ओपींना म्हणाले, 'हा चित्रपट माझ्यामुळे यशस्वी झाला'. ओपी उखडले. म्हणाले, 'युसूफ, तू 'नया दौर'चा हिरो नाहीएस. हीरो आहे घोडा. माझ्या गाण्यांमुळे आणि घोड्यामुळे सिनेमा चालला.'

माणूस विरुद्ध यंत्र हे 'नया दौर'चं कथाबीज. दिलीपकुमार हा गाडीवान. दिवसभर घोडागाडी हाकून आपलं पोट भरतो. गावात बसवाहतूक सुरू करायची असं ठरतं. दिलीपकुमार विरोध करतो. शेवटी बस विरुद्ध घोडा अशी शर्यत लागते. घोडा जिंकतो. ओपींचं चोप्रा आणि दिलीपकुमारशी वाकडं आलं ते कायमचं.

गुरूदत्त, एस. मुखर्जी, शक्ती सामंता, नासीर हुसैन, बी. आर. चोप्रा अशा नाणावलेल्या निर्मात्यांबरोबर नय्यरांनी सिनेमे केले; पण बड्या धेंडांच्या फार मागे लागायचं नाही असं ठरवलं. शेख मुख्तार, मास्टर भगवान, के. अमरनाथ, नानूभाई भट्ट या छोट्या निर्मात्यांबरोबर काम करायला ते खूश असायचे. त्यांच्या सिनेमांची नावंही मजेशीर असायची 'बाप रे बाप', 'मंगू', 'मिस्टर लंबू', 'भागमभाग', 'मिस्टर कार्टून एम. ए.' आणि 'जॉनी वॉकर'.

पिटातल्या प्रेक्षकांना असे कॉमेडी सिनेमे फार आवडायचे. आणि नय्यरांची गाणी तर माशाल्ला होतीच. एकच उदाहरण देतो : 'पिया पिया पिया मोरा जिया पुकारे'. 'बाप रे बाप'चं आशा-किशोरनं गायलेलं हे ड्यूएट आज क्लासिक मानलं जातं. तीन वर्षांपूर्वी या गाण्याला तीन लाख व्ह्यूज मिळाले. आता नक्कीच वाढले असतील. 'मेरे नींदों में तुम मेरी ख्वाबों में तुम' हे शमशाद बेगम-किशोरकुमारचं ड्यूएटही गोड आहे. विविध भारतीवर रात्री 'बेला के फूल'ला ही गाणी लागायची.

'नया अंदाज'मध्ये शमशाद बेगमचं एक अतिशय मधुर गाणं आहेः 'तू आ जा रे के दिल है बेकरार, डोले रे मन में तेरा प्यार.' रुपेरी पडद्यावर कुमकुम, जॉनी वॉकर आणि किशोरकुमार गाताहेत. गाण्याचा एकूण टोन जिप्सी आहे.

तंबूच्या बाहेर मोकळ्या मैदानात सगळे गाताहेत आणि अचानक किशोरकुमार आणि जॉनी वॉकर बैलगाडी घेऊन तिथं हजर होतात. मस्त सिच्युएशन आहे. किंवा 'उस्ताद' चित्रपटातलं गीता दत्तचं 'चोर लुटेरे डाकू' हे गाणं. गोड नि मादक.

गुरूदत्तनं ओपींना 'आरपार' दिला, पण एका अटीवर : नव्या शैलीची गाणी करायची. गुरुदत्तनी बिग क्रॉसबी, एल्विस प्रिस्ले यांच्या रेकॉर्ड्स ओपींच्या पुढ्यात ठेवल्या नि म्हणाला, 'ओपी, लोकांची पावलं थिरकतील अशी गाणी दे. तुझी गाणी खूप धिम्या गतीची असतात.'

ओपींवर कलकत्त्याच्या 'न्यू थिएटर्स'च्या बंगाली शैलीचा मोठा प्रभाव होता. याला कारण पंकज मलिक, के. सी. डे आणि कुंदनलाल सैगल. तेव्हा अख्खा बंगाल सैगलला डोक्यावर घेऊन नाचत होता नि सैगल पंजाबी होता म्हणून 'न्यू थिएटर्स'चे सिनेमे पंजाबात पुष्कळ गाजायचे. 'आरपार', 'मिस्टर अॅण्ड मिसेस 1955 आणि 'सीआयडी' हे गुरुदत्तचे तीन सिनेमे गुन्हेगारी वळणाचे होते. युरोप-अमेरिकेत अशा चित्रपटांची एक स्वतंत्र श्रेणी मानली जाते noir films - काळोखाची धुरकट काजळी असलेले सिनेमे. गुन्हेगारांचे छुपे अड्डे, पोलिसांचा ससेमिरा, दारूचे गुत्ते, रस्त्यावर सांडलेला पिवळ्या गॅसबत्तींचा धूसर उजेड, ओलसर रस्ते... नि गुत्त्यात गाणारी सुंदरी. ओपींना हे गणित छान जमलं. तिन्ही सिनेमांची गाणी म्हणजे मद्याचे फेसाळते चषक.

या पुढचा ओपींचा प्रवास निर्वेध झाला. सुपरहिट सिनेमांचा हंगाम सुरू झाला. 'नया दौर', 'कल्पना', 'रागिणी', 'फागुन', 'हावडा ब्रिज', 'तुमसा नहीं देखा', 'फिर वही दिल लाया हूं', 'बहारें फिर भी आएंगी', 'कश्मीर की कली'... काय बहार उडवून दिली ओपींनी. लता मंगेशकरांना एकही गाणी न देता ओपींनी फिल्मसृष्टीत आपला जम बसवला. काळानं 1960 हे आख्खं दशक ओ.पी. नय्यर आणि शंकर-जयकिशन यांना आंदण दिलं होतं.

लाहोरच्या नादान, पण मनस्वी मुलाला सुखाचे दिवस दिसले. सुरुवातीची काही वर्षं ओपी बायको-मुलांसह कुलाब्याजवळच्या एका हॉटेलात राहायचे. पुढे त्यांनी चर्चगेटला पाच खोल्यांचा प्लॅट घेतला; केम्प्स कॉर्नरला प्रशस्त म्युझिक रूम होती. तिथं संध्याकाळच्या धुंदकुंद पार्ट्या, नोकरचाकरांना रीतसर गणवेष; स्वतःच्या मालकीच्या तीन आलिशान गाड्या पैकी एक ओल्ड्समोबील; हातात 'क्रेवन-ए' सिगारेटचा डबा, अंगात सिल्कचा शर्ट नि पायात पांढरे बूट.

'नया दौर' नंतर आशाताई ओपींकडे नियमित गाऊ लागल्या. स्त्रीमनाच्या अनेक भावच्छटा ओपींनी सुरांत ओवल्या नि आशाताईंच्या मधुर आवाजामुळे ती गाणी लोकप्रिय झाली. जवळजवळ पंधरा-सोळा वर्षं हा भावबंध अभंग राहिला. कुणी कितीही प्रयत्न करू देत ओपी-आशा अद्वैत लोकस्मृतीत कायमस्वरूपी ठाण मांडून बसलंय. जोवर ही गाणी आहेत तोवर नय्यर -आशा मिथकाला मरण नाही :

'आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूं'; 'मैं शायद तुम्हारे लिए अजनबी हूं'; 'यही वह जगह है, यही वह फिजा है'; 'जरा हौले हौले चलो मोरे साजना, हम भी पीछे हैं तुम्हारे'; 'जाईए आप का कहां जाएंगे'; 'यह है रेशमी जुल्फों का अंधेरा न घबराईए'; 'कोई कह दे जमाने से जाके के हम घबरा के मुहब्बत कर बैठे'; 'अकेली हूं मैं पिया आ'; 'छोटा-सा बालमा अँखियन नींद चुराए ले गयो'; 'वह हसीन दर्द दे दो'; 'आज कोई प्यार से दिल की बात कह गया'; 'आईए मेहेरबां, बैठीए जान-ए-जां'... जगबुडीपर्यंत ऐकत राहावी अशी गाणी.

-2-

1987-88-89 या काळात मी ओपींकडे जायचो. सकाळी बरोब्बर साडे नऊला चर्चगेट परिसरातल्या 'शारदा' इमारतीच्या पायऱ्या मी चढत असे. ओपी अंघोळ करून बैठकीच्या खोलीतल्या अर्धवर्तुळाकार कोचावर बसून वहीत काहीतरी लिहीत असायचे. अंगात सिल्कची लुंगी, सिल्कचा कुर्ता नि डोक्याला क्रोशाकाम केलेली टोपी, हज यात्रा करून आलेले मुसलमान भाविक घालतात, तशी.

एवढं काय लिहीत असतील ?

एकदा मी त्यांना विचारलं. ते म्हणाले, 'देवाचं नाव लिहितो.' 'जय राम श्रीराम जय जय राम'. उर्दूत. देवाला सगळ्याच भाषा आवडतात.

ओपी आपल्या आठवणी सांगतील नि त्या मी लिहून घ्याच्या असं आमचं ठरलं होतं म्हणजे त्यांनीच ठरवलं होतं. रोज दीड-दोन तास ते बोलायचे. मी ऐकायचो. आस्ते आस्ते ते खुलत गेले. मला थोडंबहुत गाणं येतं नि समजतं हे त्यांनी हेरलं होतं.

ओपी आपल्या कुटुंबापासून तुटून अलग पडले होते. मनमोकळं बोलायला कुणी नव्हतं. हाताशी वेळ भरपूर. ते माझी वाट पाहायचे. करता करता माझ्या 'शारदा'च्या फेऱ्या वाढल्या.

ओपींच्या घरी फोन होता; पण ते स्विच काढून ठेवायचे. फोन करायचा तर स्विच लावायचा. बोलून झालं की, स्विच काढून ठेवायचा.

बैठकीच्या खोलीत सोफा होता नि दोन मोठ्या खुर्चा. समोर एक टेबल. त्यावर बाज्याची पेटी. कोपऱ्यात पियानो. नि डिनर टेबल. ओपी सोफ्यावर ऐसपैस बसायचे. समोरच्या भिंतीवर श्रीकृष्णाची मोठी तस्बीर. अर्जुनाचा रथ हाकताहेत, वगैरे.

एखादी नमुनेदार आठवण सांगताना ओपी मध्येच उभे राहायचे आणि दोन्ही हात फैलावून 'ओ लॉर्ड क्रिष्णा...' असं पुटपुटायचे. हरे रामा हरे कृष्णा चळवळीचं प्रचार साहित्य त्यांनी वाचलं असावं. हरे राम हरे कृष्ण संस्थेचा एक गोसावी अधूनमधून त्यांच्या घरी पुस्तकं, जपमाळ वगैरे घेऊन यायचा. तो गेला की, ओपी अध्यात्मावर बोलायचे. मला ते उथळ वाटायचं.

सगळ्या गोष्टी नशिबावर सोडायच्या म्हणजे मनुष्यावर कसलीच जबाबदारी नाही. आपल्या प्रमादांकडे बघण्याचं कारणच नाही, असं मला वाटायचं. एकदा मी त्यांना तसं विचारलं. त्यांनी माझा एकही प्रश्न कधी धुडकावून लावला नाही. माझ्या प्रश्नांच्या आरशात ते स्वतःचा भूतकाळ पाहात असावेत.

आम्ही बॅकबेच्या बाकड्यावर बसलो होतो. रात्रीचे दहा वगैरे वाजले होते. समोर समुद्र. मलबार हिलच्या वळणापर्यंत दिव्यांचा रत्नहार झगमगत होता.

'अंब्रीश, तुम्हारी बात बराबर है, यार... ओपी म्हणाले नि समोरच्या लाटांकडे स्थिर नजरेनं पाहू लागले. आता ओपी रात्रभर आपल्या चुकांचा विचार करत तळमळत राहतील की काय, असं वाटलं नि माझं मन गलबललं. दुसऱ्याच क्षणी शेख मुख्तारचा एक किस्सा सांगून ते खळखळून हसले.

एकदा असेच आम्ही समुद्राकाठी बसलो होतो. "माझ्या नि आशाजींच्या आठवणी तुला ऐकायच्या नाहीएत?" तोवर मी त्यांना आशा भोसल्यांविषयी एकही प्रश्न विचारला नव्हता. नंतरही नाही.

"ती तुमची खाजगी 'स्पेस' आहे."

"मग तू कसला बातमीदार ?"

"मी बातमीदारी करतो, बाजारगप्पा नाही."

"मला एक सांग. तुला माझ्या आयुष्यातल्या कोणत्या गोष्टींत रस आहे?'

"तुमच्या गाण्याची पद्धत, तुम्ही गाण्याचा ढाचा कसा बनवता ते."

"म्हणजे?"

"म्हणजे 'चल अकेला, चल अकेला... तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला' ('चित्रपटः संबंध') या गाण्यात तुम्ही दोन कडव्यांची स्पेस कोरसनं भरून काढता. तो गाण्याचा हाय पॉइंट आहे, असं मला वाटतं, मी म्हणालो. वाटलं जास्त बोललो. खरं तर तोवर माझी भीड चेपली होती.

"तसं नाहीए ते. गाण्याचा स्पेस कोरसनं भरून काढू असं ठरवलं नव्हतं. झालं असं की, मुकेशचा श्वास पुरत नव्हता. गाण्याची ओळ लांबच्या लांब होती. मुकेश म्हणाला, 'मला श्वास घेण्यापुरती जागा सोडा.' म्हणून मला तिथं कोरस द्यावा असं वाटलं."

आम्ही 'शारदा'कडे निघालो. इमारतीच्या दारात मी त्यांना वाकून नमस्कार केला. 'गाणं ऐकणार?' ओपींनी विचारलं. त्यांच्या डोळ्यांत बारीकशी चमक दिसली.

"दादा, इतनी देर रात को..."

"अरे, अकराच वाजलेत. घरातले सगळे आपापल्या खोलीत असतील... ये. गाणं ऐक."

ओपींकडे घराची चावी होती. दार उघडलं नि पियानोपाशी बसले. चार-पाच वेळा स्वरपट्टीवरून सरसर बोटं फिरवली. अवतीभवती फुलपाखरांचे थवे समूहनृत्य करताहेत की काय असं वाटलं. ओपी पियानोवर सूर छेडू लागले 'तेरा मेला पीछे छूटा राही चल अकेला... चल अकेला... चल अकेला... चल अकेला...' 

ती आमची 'शारदा'तली शेवटची भेट.

नय्यरसाहेबांची वेळ पाळ, ते कडक आहेत, असं मला दोन-तीन सिनेमावाल्यांनी बजावलं होतं. सकाळी साडेनऊ हा नियम मी कसोशीनं पाळत होतो. एकदा उशीर झाला. पावणेदहा वाजले. नय्यरांनी दार उघडलं. घुश्शात होते. आतल्या खोलीत निघून गेले. त्यांच्या पत्नी चहा घेऊन आल्या.

"तुला उशीर का झाला?"

मी कारण सांगितलं. ट्रेन मध्येच अडकून राहिली. ते त्यांनी नय्यरना सांगितलं असावं.

नय्यर बैठकीच्या खोलीत आले. म्हणाले, "मला उशीर चालत नाही. तुला मी आधीच सांगितलं होतं."

माझी जीभ घशात अडकलेली. ती सुटेना. मग म्हणाले, "उशीर झाला म्हणून मी मोहम्मद रफीला 'फेमस'मधून (रेकॉर्डिंग स्टुडिओ) हाकलून लावलं आणि 'लाखों हैं यहां दिलवाले'साठी (चित्रपट : 'किस्मत': 1968) महेंद्र कपूरला बोलावलं. रफी एकतर उशिरा आला नि वर म्हणाला, 'नय्यरसाहेब, शंकर-जयकिशनचं गाणं होतं. रिटेक करावं लागलं'." शंकर-जयकिशनमुळे मला उशीर झाला नव्हता या विचारामुळे मला हायसं वाटलं. उभं राहून 'ओ...लॉर्ड क्रिष्णा..' असा आनंदातिशयानं चीत्कार करावा असं मनात आलं.

परवा अरविंद हळदीपूर फोनवर सांगत होतेः 'नय्यरसाहेब वेळेचे पक्के होते. सकाळी साडेनऊला 'फेमस'चं दार बंद. उशीर झाला तर वादकाला प्रवेश नाही कितीही नामांकित असो. हळदीपूरांचे वडील परशुराम हे नय्यरांचे वादक. त्यांच्या खास मर्जीतले. बालवयात असताना अरविंद एकेकदा वडलांबरोबर रेकॉर्डिंगला जायचे. नय्यरांचं काम अगदी काटेकोर आणि आटोपशीर. दुपारी एक वाजता गाणं रेकॉर्ड करून स्पूल निर्मात्याच्या हाती सुपुर्द करायचे नि बीयर प्यायला बसायचे. सगळं काम वेळेत नि काटेकोर. निर्माता खुश. पैसे वाचायचे.

अखेरची वीसेक वर्षं नय्यर ठाण्याच्या नाखवा कुटुंबाबरोबर राहायचे. सात जानेवारीचा दिवस. वर्षः 2007. रविवार होता. ओपी नेहमीप्रमाणे सकाळी उठले. रोजची कामं उरकली. दुपारी बीयर घेतली नि जेवले. थोडं इकडे-तिकडे केलं, पेपर चाळले नि राणी नाखवांना म्हणाले, 'तासभर झोपतो. बरोब्बर साडेतीनला उठव मला. उशीर नको.'

झोपेतच गेले. मृत्यूला उशीर चालत नाही.

 

16 जानेवारी 2026 रोजी ओपी नय्यर यांचे जन्मशताब्दी वर्ष संपत आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी