डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

महाराजांच्या कुत्र्याला अर्पण केलेले विलक्षण नाटक

हल्ली अनेक व्यक्तींचे पुतळे व छायाचित्रे गावोगावी असतात. त्या पुतळ्यांमुळे व छायाचित्रांमुळे त्या व्यक्तींची नावे तेथील लोकांना क्षणभर माहीत होतात. ते पुतळे व छायाचित्रे दृष्टिआड होताच लोक त्या व्यक्तींना विसरून जातात. गडकरी मात्र त्यांच्या साहित्यामुळे अजरामर झाले आहेत. त्यांना पुतळ्यांची गरज नाही. त्यांचे पुतळे भग्न करण्याबद्दलच्या बातमीमुळे लोक त्या भंजकांची नावे वाचतील व विसरूनही जातील. गडकऱ्यांचे नाव मात्र अजरामर राहणार आहे.

व्हर्जिनिया वुल्फ हिने एका कुत्र्याच्या दृष्टीतून शहरातील जीवन दाखविणारी ‘फ्लश’ नावाची चरित्रवजा सुंदर कादंबरी लिहिली आहे. पण कुत्र्याला आपली नाट्यकृती अर्पण करणारा लेखक क्वचित सापडेल. ते लेखक होते राम गणेश गडकरी आणि नाटक राजसंन्यास.

त्या नाटकाची प्रत हाती घेतल्यास प्रारंभीच अर्पणपत्रिका दिसते. त्या अर्पणपत्रिकेची सुरुवात होते, ‘इतिहास छातीला हात लावून पुढील कथा सांगतो आहे, तेव्हा विश्वासाने ती मुकाट ऐकून घ्यायला हवी.

थोरल्या छत्रपतींचा एक आवडता कुत्रा होता. ते ‘समर्थाघरचे श्वान’ खरोखरीच सर्वांनी मान देण्यासारखे होते. हा इमानी जीव खरोखरीच आबासाहेबांना कधीही विसंबत नसे. अखेर, प्रभूचे शुभावसान झाल्याबरोबर त्या मुक्या इमान्यानेही त्यांना स्वर्गापर्यंत सोबत केली. आज रायगडावर त्यांची भाग्यशाली समाधी राजांच्या समाधीशेजारी मांडीला मांडी लावून बसलेली तिन्ही लोक डोळ्यांनी पाहात आहेत. त्या समाधीवर त्या चतुष्पाद पशूची पूजा बांधण्यासाठी, नरदेहाचा नसता अभिमान सोडून, माझ्या या ‘राजसंन्यासा’च्या पामर बोलांशी डोंगरपठारीवरच्या या रासवट रानफुलांची पंखरण करून ठेवित आहे. - राम गणेश गडकरी

‘राजसंन्यास’ या नाटकाच्या अर्पणपत्रिकेत ‘इतिहास छातीला हात लावून पुढील कथा सांगत आहे’, असे नाटककार राम गणेश गडकरी सांगतात, हे वाक्य आजच्या वादळी दिवसांत महत्त्वाचे म्हटले पाहिजे. म्हणजे गडकरी यांनी दंतकथा, सांगोवांगी कथा ऐकून राजसंन्यास लिहिले नाही, असा अर्थ होतो. मात्र वादळ माजवून गडकऱ्यांचा पुतळा फोडणारे लोक असा इतिहासाचा पुरावा देताना दिसले नाहीत.

या नाटकाच्या अगदी शेवटी संभाजीराजांचे आत्मपरीक्षणात्मक स्वगत आहे. ते बरेच प्रदीर्घ आहे. त्या स्वगतासंबंधीच्या काही आठवणी आहेत. सन १९३० नंतरच्या काळात मुंबईत साहित्य संघात मराठी नाटकांना प्रोत्साहन देण्याचे सक्रिय प्रयत्न होत होते. पार्श्वनाथ आळतेकर हे पुरोगामी विचारांचे दिग्दर्शक होते. त्यांनी एका परदेशी दिग्दर्शकाचे मत सांगितले होते की- प्रदीर्घ संवाद म्हणायचे तर कलावंताची छाती भरदार हवी, म्हणून छातीचा व्यायाम हवा. मात्र पुढे कित्येक वर्षांनी एकदा बैठकीत हा विषय निघाला असता पु.ल. देशपांडे म्हणाले की, त्यांना तो प्रकार खरोखरच अनावश्यक वाटला. कारण ते म्हणाले की, आपले पूर्वीचे नट अनेक दीर्घ संवाद म्हणत, पण त्यांना कधी छातीच्या व्यायामाची संथा मिळाली नव्हती. हे सांगत असता उदाहरण म्हणून पु.लं.नी ‘राजसंन्यास’मधील संभाजीचे स्वगत एका दमात सहजपणे म्हटले. पुढे एकदा पु.ल., वसंतराव देशपांडे व मी गाडीने पुण्याला जात असता वसंतरावांच्या आग्रहामुळे पु.लंनी संभाजीचे ते स्वगत परत म्हटले. मी त्या वेळी डोंबिवलीत राहत असे. नंतर तीन-चार दिवसांनी पु.भा. भावे यांचा निरोप आला- अण्णा माडगूळकर (ग.दि.मा.) आले आहेत, तेव्हा आलात तर आनंद होईल. मी गेलो. बैठक चालू झाली. थोड्या वेळात माडगूळकर म्हणाले, तुम्हा दोघांना एक ऐकवायचे आहे, असे म्हणून त्यांनी संभाजीचे ते स्वगत म्हटले. त्यातील ‘राजा हा उपभोग्यशून्य स्वामी आहे’ या वाक्यापर्यंत नाटकाची नशा फारच वाढते. समोरच्या ग्लासातील पेयापेक्षा गडकऱ्यांच्या भाषेची नशा अधिक व अविस्मरणीय होती.

अण्णा माडगूळकर अगदी गंभीर झाले होते. त्यांच्या तोंडून ते स्वगत ऐकल्यावर भावे व मी गंभीर झालो. ते ऐकताना आपल्याभोवती दिव्य वलय तयार झाले आहे आणि आपण एका वेगळ्याच विश्वात आहोत, असे मला वाटले.

गेले ते दिवस! भावे यांना मी त्याबद्दल विचारले नाही. पण ज्या नाटकातील स्वगतामुळे माझी ही मन:स्थिती झाली... आता त्या नाटकामुळे माथे फिरून गडकऱ्यांचा पुतळा जे फोडतात त्यांचे मत वेगळे, माझ्यासारख्यांचे वेगळे. नाटकाचे अंक एकामागोमाग एकाच प्रकारचे असले तर नाटक एकसुरी व कंटाळवाणे होऊ शकते. राजसंन्यास तसे नाही. पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात संभाजीच्या अनिर्बंध वैषयिकतेचे दर्शन होते. दुसऱ्या प्रवेशात जिवाजीचा बेबंद सर्वतुच्छतावाद (सिनिसिझम) उद्विग्नता निर्माण करतो. पण नंतर तिसऱ्या प्रवेशाच्या आरंभीच मुळी ज्ञानेश्वरीतला ‘माझा मराठाचि बोल निके! परी अमृतातेही पैजा जिंके! ऐसी एकेक अक्षरे रसिके! मेळवीन।’ हा श्लोक साबाजी वाचतो. त्यासंबंधी त्याचा हिरोजीशी जो संवाद होतो, त्यातून दोन परमस्नेह्यांमधील आपुलकी प्रकट होते. मग साबाजी हिरोजीला म्हणतो- ‘‘ज्ञानोबाची मराठी वाणी, शिवबाची मराठी करणी- दिगंत उजळून दोघांनी ऐन मराठी हाकेने भूमंडळ गाजविले.’’ हा प्रवेश मला वाचायला वा ऐकायला फार आवडतो. मन कसे शांत होते. आचार्य अत्रे म्हणतात की, हा संवाद ऐकून महाराष्ट्राचा सारा देदीप्यमान इतिहास एखाद्या विद्युल्लतेसारखा आपल्या डोळ्यांपुढे चमकून जातो.

कविता, नाटक व विनोद या तीन क्षेत्रांत गडकरी वावरले आणि तिन्हींत ते अग्रभागी राहिले. शिवाजी महाराजांच्या दरबारी वातावरणात वावरणाऱ्या त्यांच्या स्त्री-पुरुषांची भाषा दरबारी आहे, तर ‘एकच प्याला’ नाटकातील सिंधू व इतर पात्रांची अगदी साधी आहे. भक्तिभाव हा गडकऱ्यांच्या वृत्तीचा भाग दिसतो.

गडकरी स्वत: बरेच भक्तिमान होते. फर्ग्युसन कॉलेजचा परिसर हा त्यांना तीर्थक्षेत्रासारखा वाटत असे. एका नाटकात लोकमान्य टिळक व गोपाळ कृष्ण गोखले यांच्यामधील मतभेदाबद्दल त्यांचे एक पात्र म्हणते की- त्या दोघांच्या मतभेदांबद्दल आपण काय बोलणार? आकाशात रोज ताऱ्यांची चढाओढ चालते. आपण काय करणार?

परंतु इतका भक्तिमान असा लेखक ‘राजसंन्यास’मध्ये जिवाजी कलमदाने याच्यासाखी कमालीची सर्वतुच्छतावादी व्यक्ती निर्माण करतो, हे केवढे आश्चर्य! राजदरबारी महत्त्वाची जागा मिळवणाऱ्या जिवाजीने आपल्या पित्यालाच अडचणीत पकडून त्याची जागा स्वत:साठी पटकावली होती. महाराणी सईबाईसाहेब वारल्यावर त्यांच्या देहास अग्नी देण्यात आला. त्या वेळी सव्वा खंडी चंदन वापरण्याचा हुकूम झाला होता व त्याप्रमाणे ते वापरले गेले, असे लोकांत मत होते. पण हा जिवा म्हणतो की, ‘‘सव्वा शेर चंदनाच्या उटीने सव्वा खंडी बाभळीचे चैत्री हळदी-कुंकू आटोपले आणि पंधरा मोहरांची बचत केली. गडावर धूम बोलवा की, सव्वा खंडी चंदनाने मातोश्रींना मुक्ती दिली म्हणून; पण खरी गोष्ट एक देवाला ठाऊक, त्या जळत्या जिवाला ठाऊक, की या जिवाला ठाऊक!’’

गडकरी जसे भक्तिमान होते, तसेच अत्रेही होते. ते गडकऱ्यांना गुरू मानीत. ‘गडकऱ्यांच्या जे पायी आहे, ते आमच्या ललाटी नाही,’ असे अत्रे यांनी लिहिले आहे. पण गडकऱ्यांच्या कवितेचे विडंबन करण्यात ही भक्ती आड आली नाही. त्या काळात व नंतरही अनेक मराठी नाटकांना शेक्सपिअरच्या नाटकांपासून प्रेरणा मिळत असे. ‘एकच प्याला’चा नायक सुधाकर व नायिका सिंधू यांच्या मागे ऑथेल्लोची प्रेरणा होती, असे अत्रे यांनी लिहिले आहे.

‘राजहंस माझा निजला’ या कवितेत गडकऱ्यांनी आईचे वैशिष्ट्य काय, हे सांगताना लिहिले-

ते हृदय कसे आईचे

मी उगाच सांगत नाही

जे आनंदेही रडते

दु:खात कसे ते होई?

या ओळी कधी विसरणेच शक्य नाही. सन १९२६मध्ये व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूसाहेब पेंढ़ारकर यांनी गायिलेले ‘पुण्यप्रभाव’मधील ‘बोल ब्रिजलाला’ हे गाणे एका बाजूला व ‘राजहंस माझा निजला’ ही कविता दुसऱ्या बाजूला, अशी ग्रामोफोनची ध्वनिमुद्रिका निघाली. ही कविता गाऊन  बापूसाहेब हे मराठी भावगीत ध्वनिमुद्रित करणारे पहिले गायक ठरले.

खिडकीसमोर पिंपळाचे पान वाऱ्याने फडफडताना पाहून गडकऱ्यांची कल्पनाशक्ती जागृत झाली. परमेश्वराच्या इच्छेवाचून पानसुद्धा हालत नाही, या लौकिक श्रुतीवरून त्यांनी ‘हालत्या पिंपळपानात’ ही एक अतिशय सुरेख कविता रचली.

‘निजनादब्रह्मीं गुंग होऊनी डुलसी?--

'मज गाऊं दे, मज नाचूं दे,

तुजसंगे, सुखदु:ख सारखें सेवूं मानसरंगे!’

अशी आध्यात्मिक सुरुवात करून गोविंदाग्रज नवबाला हृदयीच्या प्रेमासाठी ‘सुखेंच होईन मी ही पिंपळपान!’ असा वेगळाच हृद्य शेवट करतात. ‘वाग्वैजयंती’ला न.चिं. केळकरांनी लिहिलेल्या प्रस्तावनेत म्हटले आहे की, गडकऱ्यांनी नाटकाच्या बाबतीत जशी रा. श्रीपाद कोल्हटकरांकडून स्फूर्ती मिळविली, तशीच काव्याच्या बाबतींत त्यांची स्फूर्ती केशवसुतांपासून मिळाली आहे, हे खालील पंक्तींवरून उघड दिसते.

‘कुणी मनाचा असेल कच्चा

करील त्यालाही मनशूर

या गाण्याचे गाऊनि सूर

केशवपुत्राचा महशूर

गोविंदाग्रज चेला सच्चा!’

ह्या सच्च्या चेल्याने आपला नम्रभाव खालील ओळींत व्यक्त केला आहे.

‘‘शिवरायाच्या मागे आम्ही लाल महाली फिरणे

तसेच तुमच्या मागे आम्ही नवीन कविता करणें

असेच कांही करून जीवित त्याला गणणें,

गोविंदाग्रज म्हणे असें हें आम्हां लाजिरवाणे ’’

गडकऱ्यांनी शाहिरांच्या काव्याचा अभ्यास फार केला होता. त्यांनी आपल्या कवितांतून काही नवे शब्दसांप्रदाय निर्माण केलेले आहेत.

शिवाजीमहाराजांचा कारभार लोकाभिमुख होता. दसऱ्यानंतर मराठे सरदार स्वाऱ्यांवर निघायचे. त्यांना उद्देशून महाराजांनी काही आदेश प्रसृत केले होते. त्यांतील काही दि.वि. काळे यांच्या ‘शिवचरित्र’ या पुस्तकाच्या अखेरीस आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे ते असे- लोकांचे दाणा वैरण लुटू नका. उन्हाळ्यात रात्री गप्पागोष्टी करत बसाल, विडीकाडी प्याल; पण अर्धी वा सगळी विडीकाडी कोठेही फेकू नका. असे वागाल तर आगी लागून घरे बसतील. मग मोगलांपेक्षा हे मराठे अधिक दुष्ट असे लोक म्हणू लागतील. तसे होता कामा नये- असे ते आदेश.

गडकऱ्यांचे गद्य व पद्य साहित्य महाराष्ट्राला वेडे करत होते, ते गडकऱ्यांचे पुतळे व छायाचित्रे बघून नव्हे. हल्ली अनेक व्यक्तींचे पुतळे व छायाचित्रे गावोगावी असतात. त्या पुतळ्यांमुळे व छायाचित्रांमुळे त्या व्यक्तींची नावे तेथील लोकांना क्षणभर माहीत होतात. ते पुतळे व छायाचित्रे दृष्टिआड होताच लोक त्या व्यक्तींना विसरून जातात. गडकरी मात्र त्यांच्या साहित्यामुळे अजरामर झाले आहेत. त्यांना पुतळ्यांची गरज नाही. त्यांचे पुतळे भग्न करण्याबद्दलच्या बातमीमुळे लोक त्या भंजकांची नावे वाचतील व विसरूनही जातील. गडकऱ्यांचे नाव मात्र अजरामर राहणार आहे.

शिवाजीमहाराजांसारखे राजे तथा गडकऱ्यांच्या तोलाचे साहित्यिक हे कोणत्या एका समाजाचे, जातीचे वा प्रांताचे नसतात; सर्व समाजाचे असतात, देशकालाच्याही मर्यादा त्यांना नसतात. संभाजीनेसुद्धा जो त्याग केला व धैर्य दाखविले, त्यामुळे तोही मोठा राजा होता आणि तोही सर्वांचा होता व आहे. एखाद्या जातीच्या शृंखलेत थोर व्यक्तींना अडकविणे, हा त्यांचा अपमान आहे.

Tags: राम गणेश गडकरी गोविंद तळवलकर राजहंस माझा निजला एकच प्याला अमृतातेही पैजा जिंके पु.भा. भावे वसंतराव देशपांडे पु.ल. नाटक व्हर्जिनिया वुल्फ पुतळे राजसंन्यास verjeniya wolf amrutatahi paija jinke raajhans maza nijala ekach pyala Pu. Bha. Bhave Vasantrao Deshpande P L Deshpande Drama Natak Putale Rajsanyas Raam Ganesh Gadkari Govind Talwalkar Paramarsh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

गोविंद तळवलकर

1925 - 2017

लेखक, संपादक

लोकसत्ताचे बारा वर्षे उप-संपादक, तर महाराष्ट्र टाइम्सचे 27 वर्षे संपादक होते. 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके