इंग्रजी पत्रकारितेत दोन दशके (प्रामुख्याने इकॉनॉमिक टाइम्स आणि द टाइम्स ऑफ इंडिया) आणि नंतर मराठी पत्रकारिते दोन दशके (महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, लोकमत व दिव्य मराठी यांचे संपादक) अशी देदीप्यमान कारकीर्द असलेल्या कुमार केतकर यांनी 2015 नंतरची सहा वर्षे काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार म्हणूनही काम केले आहे. लेखक आणि वक्ता या दोन्ही रूपात ते सातत्याने गेल्या पाच दशकांहून अधिक काळ महाराष्ट्राच्या समाजजीवनात वैचारिक हस्तक्षेप करीत आहेत. 8 जानेवारी 2026 रोजी ते वयाची 80 वर्षे पूर्ण करीत आहेत, त्या निमित्ताने त्यांच्यावरील हा लेख प्रसिद्ध करीत आहोत. अतुल देऊळगावकर लिखित 'विवेकियांच्या संगती' या पुस्तकाची नवी आवृत्ती रोहन प्रकाशनाकडून येत आहे, त्यातून हा लेख घेतला आहे.
राज कपूरचा 'श्री 420' सिनेमा आला तेव्हा 1955 मध्ये जपान उद्ध्वस्त झालेला होता. फाटलेला बूट हे त्याचे प्रतीक होते. साम्राज्यावरचा सूर्य ढळू लागला होता, तरीही इंग्रजांचा तोरा आणि प्रतिष्ठा कायम होती, म्हणून अंगावरचा पेहराव इंग्लिशस्तानी झाला. त्या वेळी जगातच सोविएत युनियनने साम्यवादी क्रांतीचे स्वप्न पेरले होते. तो जगातला शिखरावरचा देश होऊ पाहत होता. भारताने लोकशाही समाजवाद स्वीकारला होता. म्हणून त्याचं स्थान माथ्यावरचं म्हणून 'सर पे लाल टोपी रूसी !' आणि 'फिर भी दिल है हिंदुस्थानी', म्हणजे भारत आपलं स्वत्व जपून जगाचा स्वीकार करू पाहात होता.
कुमार केतकर 'मेरा जूता है जपानी'ची अशी उकल करून सांगतात. तेव्हा गीतकार शैलेंद्र यांनी व्यक्त केलेलं वर्तमान आणि त्यांचा साम्यवादी दृष्टीकोन लक्षात येतो. बहुपेडी केतकरांच्या पोतडीतून बहुविध संदर्भ येत राहतात आणि ते भूतकाळ व वर्तमान यांतील संवाद उलगडून दाखवत जातात.
'इन्फोटेनमेंट' ही संकल्पना 2002ची. त्यापाठोपाठ 2006 मध्ये 'पॉलीटेनमेंट' (पॉलिटिक्स एंटरटेनमेंट) ही संज्ञा आली. आता आपण ती अनुभवत आहोत. राजकीय भाषणे म्हणजे मनोरंजन झालं आहे. तासभर ऐकावं, विनोदावर हशा व टाळ्या मिळतात. हाताला काही लागत नाही, हेच राजकीय भाषणांचं स्वरूप झालेलं आहे. 'न्यू यॉर्कर'च्या बहुतेक 2006, ऑगस्टच्या अंकात तुम्हाला यावर सविस्तर लेख मिळेल. त्यानंतर ते ठाण्यामधील त्यांच्या सातशे चौरस फुटांच्या घरातून, सुमारे आठ हजार पुस्तकांच्या साम्राज्यातून काही मिनिटांत नेमकं मासिक हातात ठेवतील.
त्यांच्या सुमारे 7,000 ग्रंथसाम्राज्यात किमान दोनशे पुस्तकं दोन महायुद्धं आणि हिटलरवर आहेत. तो विषय निघाला तर दर वेळी नवीनच काही सांगून जातात. ते एकदा, हिटलरचा काळ आणि त्या काळातील कला याविषयी शेखर देशमुखला म्हणाले, 'महायुद्धाच्या काळात साहित्य आणि चित्रकलेप्रमाणेच चित्रपटांतूनही राजकीय भाष्य सामर्थ्याने व्यक्त झालं होतं. प्रचंड विनाश सहन केलेल्या कलावंतांनी त्यांचं जगणंच चित्रपटांतून मांडलं. हिटलरच्या काळात घराघरांतील नातेसंबंध बिघडून गेले होते. नवरा हिटलरच्या बाजूने, तर बायको त्याच्या विरोधात, अशी उभी फूट तयार झाली. याचं तपशीलवार आणि टोकदार वर्णन गुंथर ग्रास यांच्या 'द टिनड्रम' या कादंबरीत आलं आहे. त्या कादंबरीवर दिग्दर्शक व्होल्कर श्लोंडॉर्फ यांनी 'द टिनड्रम' हा चित्रपट केला. त्यात दृक्श्राव्य माध्यमावर त्यांची हुकुमत दिसून येते. ते सत्ता, सत्तेची विविध रूपं, सत्तेच्या वर्तनाचे पैलू दाखवतात. देशाच्या राजकारणापासून वैयक्तिक नात्यापर्यंत सत्ता कशी व्यक्त होते? हे बारकाईने सादर करतात. त्यात, हिटलर सत्ता ताब्यात घेतो. त्याच वेळी म्हणजे 1933 मध्ये चित्रपटाचा निवेदक ऑस्कर मॅझरेथ याची शारीरिक वाढ थांबते. तेव्हा तो सांगतो, 'तिसऱ्या वर्षी झालेल्या छोट्या अपघाताने माझी वाढ थांबली, असं सगळे समजतात. ते सपशेल चूक आहे. त्या वेळी मीच माझी वाढ थांबवण्याचा निर्णय घेतला. सगळं जग मला लहान समजत होतं. मात्र, माझी मानसिक वाढ व्यवस्थित होत असल्यामुळे मला सर्व काही व्यवस्थित कळत होतं. हिटलर 30 एप्रिल 1945 रोजी आत्महत्या करतो. त्या दिवशी आणखी एका अपघातानंतर मॅझरेथची वाढ पुन्हा सुरू होते. असं तोच सांगतो. त्यातील एकेक पात्रावर दिग्दर्शक श्लोंडॉर्फने किती काम केलं आहे, हे पडद्यावरच समजतं.'
केशव चिंतामण उर्फ कुमार केतकर यांची वाणी आणि लेखणी यांचा अवकाश आणि काळ हा अतिशय व्यापक असतो. अनेक ज्ञानशाखांना एकत्रित आणून ते आपल्या हाती निरूपण ठेवत असतात. ते बुद्धी आणि भावना, नवता आणि परंपरा, पौर्वात्य आणि पाश्चात्त्य विचार यांचा अप्रतिम संगम आणि समन्वय घडवतात. त्यांची घडण झाली तेव्हा जगात आणि देशात तसंच वातावरण होतं.
त्या वेळी पं. जवाहरलाल नेहरू यांनी मध्ययुगीन भारत देश चालवण्याचे शिवधनुष्य उचललं होतं. तेव्हा भारतीय समाज विखंडित अवस्थेत होता. देशात अज्ञानाचा अंधकार होता. देशाची भूक भागवायची कशी ही विवंचना होती. अशा ऐतिहासिक कठीण काळात नेहरूंनी लोकशाही जोपासणाऱ्या तिन्ही खांबांची उभारणी केली. आधुनिक विचारांचे कट्टर पुरस्कर्ते नेहरू हे वैज्ञानिक, तंत्रज्ञ, लेखक आणि कलावंत यांचे स्फूर्तिस्थान होते. त्यांनी जनतेला, विज्ञान व लोकशाही या आयुधांच्या साहाय्याने जग बदलून टाकण्याची उमेद दिली.
अशी पार्श्वभूमी असलेल्या काळात केतकर हे नेहरूविचारांशी सहजगत्या आणि कायमचे जोडले गेले. त्यांच्यावर एस. के. लिमये, भाऊ फाटक आणि कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्यामुळे मार्क्सवादाचे संस्कार झाले. परंतु त्यांनी कम्युनिस्ट पक्षाला किंवा विचारांना जखडून घेतले नाही. त्यांना 'हे करा व हे करू नका' ही आचारसंहिता अजिबात मंजूर नाही. उलट त्यांनी 'कुठल्याही व्यक्ती अथवा प्रसंगाकडे पूर्वग्रह ठेवून पाहू नका.' हा जे. कृष्णमूर्ती यांचा विचार मनोमन स्वीकारला. त्यांचं आचार्य विनोबा भावे यांच्या तर्कशुद्ध विचारांवर मनस्वी प्रेम आहे. त्यांची, विज्ञान आणि आध्यात्म ह्या दोन्हींमधील उत्तुंग आणि उदार विचारांवर गाढ श्रद्धा आहे. तसंच त्या दोन्हींनाही मर्यादा आहेत. अंतिम सत्य हाताला गवसत नाही, याची सुस्पष्ट जाणीव आहे.
त्यामुळे केतकर यांना व्यक्तीचा द्वेष करताच येत नाही. त्यांच्या वागण्यातून नेहमीच खुलेपण व उदारमतवादाची प्रचिती येते. ते, आप पर, जवळचे वा दूरचे असा भेद न करता कोणत्याही विचारांच्या व्यक्तीशी संवादासाठी तयार असतात.
केतकर यांनी शाळेत शिकत असतानाच रेडिओ दुरुस्तीचे काम केलं आहे. तर कॉलेजमध्ये असताना त्यांनी कामगार चळवळीसाठी पडतील ती कामं केली आहेत. त्यांच्या तांत्रिक अनुभवामुळे त्यांना पहिल्या पिढीतील कंप्यूटरच्या देखभालीची संधी मिळाली. जग बदलू पाहणारी विचारसरणी ऐकताना, वाचताना ते हाताने काम करत राहिले. त्यांनी गिरण्या, कामगार व गरिबी जवळून अनुभवली. त्यांना यंत्रांची देखभाल करण्यासाठीचे सूक्ष्म अवधान व कौशल्य यांची जाण आली. यामुळेच त्यांना रोजंदारीवरील कामगार ते धनाढ्य असं निरनिराळ्या ग्रहांवरील जीवन दिसत गेलं.
मुंबईच्या आय.आय.टी.मध्ये खूप मोठी खोली व्यापणारा कम्प्यूटर 1964 मध्ये आला. तेव्हापासून 1971 पर्यंत केतकर हे तो कम्प्यूटर सांभाळत होते. या काळात तिथे प्रफुल्ल बिडवई, सुधीर बेडेकर, सुहास परांजपे, विश्वास काकडे व जावेद आनंद हे शिक्षण घेत होते. डाव्या विचारांच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी केतकर यांनी नेटाने प्रयत्न केले होते. त्यांनी अनेक विषयांवर चर्चासत्रे व अभ्यासवर्ग सुरू केले. तेव्हा 'लिट्ल मॅगेझिन'ची चळवळ सुरू झाली होती. केतकर 'सत्यचित्र'मधून जगातील साहित्य व कला ते अर्थकारण राजकारण यांचा ऊहापोह करत होते. दुसरीकडे त्यांना आय.आय.टी.तील ग्रंथालयामुळे विश्वरूप दर्शन घडत होते. तेथील अनेक ग्रंथांवर ते अधाशासारखे तुटून पडले. मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच बाहेरच्या जगातून अनेक विषयांना समजावून घेत होते. त्यांनी विविध कलांपासून निरनिराळ्या तंत्रज्ञानापर्यंत आणि जागतिक चित्रपटांपासून फुटबॉल व गिर्यारोहणापर्यंत कुठलाही विषय वर्ज्य मानला नाही.
भारत नेमका कसा आहे? तो कसा घडतोय ? त्याला कोण आणि का बिघडवत आहेत ? त्या प्रक्रियेत आपली भूमिका काय असावी? याची स्पष्टता असणारे केतकर 1972 मध्ये वृत्तपत्र जगात दाखल झाले.
केतकर यांनी 1979 मध्ये 'ज्वालामुखीच्या तोंडावर' ह्या पुस्तकातून इंदिरा गांधींच्या राजकीय जीवनाचा विशाल पट सादर केला. अतिशय गाजलेल्या या पुस्तकामुळे त्यांची अवघ्या महाराष्ट्राला ओळख झाली. त्या काळात इंदिरा गांधींचं आणि त्यांनी लादलेल्या आणीबाणीचे समर्थन करणं ही महाभयंकर जोखीम होती. समस्त मध्यम वर्गीयांसाठी इंदिरा गांधी या 'लोकशाहीच्या खलनायिका' होत्या. देशातील अग्रगण्य पत्रकार, साहित्यिक आणि कलावंत हे इंदिरा गांधींचे कडवे विरोधक बनले होते. अशा वातावरणात केतकर यांनी जागतिक राजकारणाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत घटना तपासल्या. वैयक्तिक टीकेला महत्त्व न देता गांधी यांची आर्थिक धोरणं आणि त्यांतून दिसणारी विचारसरणी दाखवून दिली. तसंच राजकारणाकडे पाहण्यासाठीचा कॅन्व्हास व्यापक केला.
केतकर वाचकांना विचारतात, 'दक्षिण आशियातच एवढ्या राजकीय हत्या का होत आहेत?' अमेरिकेला दक्षिण आशियात शांतता नांदू द्यायची नाही. स्थिर होणारे आणि प्रगती करणारं लोकप्रिय नेतृत्व टिकू द्यावयाचे नाही. त्याकरिता असंतुष्टांना हाताशी धरून अशांतता माजवायची. हे अमेरिकी कारस्थान इंदिरा गांधी ओळखून होत्या. त्यानुसार, त्या जागतिक व राष्ट्रीय राजकीय धोरणे आखत गेल्या. जागतिक घटनांचा विशाल पट त्यावर दक्षिण आशिया व भारतीय विश्लेषण करण्याची पद्धत 'ज्वालामुखी' मधून केतकर यांनी रूढ केली.
नेहरू यांच्याप्रमाणेच इंदिरा गांधींवरही जोरदार टीका झाली आहे. मात्र, तेव्हा गांधींची धोरणे आणि त्यामागील विचार यांची दखल न घेता वैयक्तिक हल्ले केले आहेत. केतकर यांनी याकडे वाचकांचं लक्ष वेधलं. अमेरिकेने दरिद्री व्हिएतनामवर युद्ध लादून तेवीस वर्षे निघृण हल्ले केले. त्या वेळी आपल्याला अमेरिकेकडून गहू आयात करावा लागत असे. तेव्हा ती आयात अडवून अमेरिकेने व्हिएतनामवर 'युद्धात' पाठिंब्याची मागणी केली. ती धुडकावून लावण्याचं धैर्य गांधी दाखवत होत्या. अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना 'बेताल अन् मूर्खपणाची बडबड करू नका', असे सुनावत होत्या. इंदिरा गांधी या खाजगी बँकांचे आणि विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिकांचे तनखे बंद करणं, सरकारने देशाची आयात-निर्यात ताब्यात घेणे व जमीन सुधारणा करणं, असे मूलभूत बदल घडवत होत्या. अशा वेळी भारतातील विरोधी पक्षांनी कोणती भूमिका घेणे अपेक्षित होतं? त्या वेळी ते 'बिगर काँग्रेसी एकजुटीकरण' असा नारा देत होते. त्यातून सिंडिकेट काँग्रेस, प्रजा समाजवादी पक्ष, जनसंघ आणि स्वतंत्र पक्ष हे 'समविचारी' पक्ष एकत्र आले होते. सर्व विरोधक त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले करीत होते. वृत्तपत्रे व प्रतिष्ठित वर्ग सभ्यतेची मर्यादा ओलांडून टीका करायचे. त्यामागे सुप्त पुरुषी अहंकार होता.
मराठी साहित्यात नवीन लेखन व्हावं. ते वाचकांपर्यंत किफायतशीर दरात जावं आणि वाचनसंस्कृती वाढावी, या उद्देशाने 1974 मध्ये 'ग्रंथाली' प्रकाशनाची स्थापना करण्यात आली. त्यात दिनकर गांगल, अशोक जैन, अरुण साधू, कुमार केतकर, श्रीकांत लागू आणि दिलीप महाजन ही मंडळी अग्रभागी होती. त्यामुळे दया पवार, लक्ष्मण माने, दीनानाथ मनोहर, अरुण साधू, वसंत नरहर फेणे, डॉ. अरुण लिमये आणि डॉ. आनंद नाडकर्णी आदींची विविध विषयांवरची पुस्तकं आली. 'ग्रंथयात्रा', 'ग्रंथमोहोळ' आणि 'बालझुंबड' हे उपक्रम महाराष्ट्राच्या गावोगावी गेले. त्यात विविध सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले. 'ग्रंथाली'ने नावाजलेल्या लेखकांपासून ते नवख्या लेखकांपर्यंत सर्वांना वाचकांपर्यंत नेऊन संवाद घडवण्याचा पायंडा पाडला. ह्या कार्यक्रमांत सुमारे 15 वर्षे पुस्तकांच्या संपादनापासून ते गड्ढे उचलण्यापर्यंत सगळी कामे करण्यात केतकर सहभागी असत. कुठल्याही कामाला ते कमीपणाचं मानत नाहीत.
केतकर 'इकॉनॉमिक टाइम्स'मध्ये 22 वर्ष पत्रकारिता करत होते. त्यामुळे त्यांना आयात-निर्यात, उत्पादन व सेवा, व्यापार व शेअर बाजार आदी बाबी जवळून दिसत होत्या. राजकारण आणि अर्थकारण कसं चालतं? हे अनेक बाजूंनी उमजत होतं. त्यांच्या वैचारिक धारणा घडत होत्या आणि त्या त्यांच्या लेखनातून व्यक्त होत राहिल्या. ते मराठी नियतकालिकांमधून सातत्याने लिहीत होते. त्यांचा व्यासंग पाहून महाराष्ट्र सरकारने त्यांना भारतीय स्वातंत्र्यसंग्राम आणि त्यातील महाराष्ट्राची भूमिका याविषयी पुस्तक लिहिण्याची विनंती केली. त्यानुसार, केतकर यांनी 'कथा स्वातंत्र्याची' हे पुस्तक लिहिलं. त्यात टिळक, गांधी आणि नेहरू युगांचा चिकित्सक व बहुआयामी अभ्यास आहे. या काळात महाराष्ट्रात आणि देशात सामाजिक वातावरण कसं होतं? ते साहित्यातून कसं व्यक्त झालं ? स्थानिक, राज्य आणि राष्ट्रीय पातळींवरील तत्कालीन कोणते नेते कोणता व कसा विचार करत होते? त्यांची मूल्ये कोणती होती? बदलांच्या बाजूने आणि बदलांच्या विरोधात कोण होते? त्यातून कोणते हितसंबंध दिसतात? अशा बहुविध प्रश्नांची उत्तरे शोधत केतकर वाचकांना इतिहासाकडे पाहण्याची समग्र दृष्टी देतात.
केतकर यांचा अनेक ज्ञानशाखांचा दांडगा व्यासंग आहे. त्यांनी विज्ञान, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र, मानसशास्त्र व कला आदी विषयांवर सघन लेखन केलं आहे. मात्र, ते व्याख्यानात व लेखनात राजकीय मुद्द्यांवर अधिक भर देत आले आहेत. त्यांनीच त्यांच्या इतर पैलूंकडे दुर्लक्ष केलं असल्यामुळे 'केतकर म्हणजे राजकीय विश्लेषण' हे समीकरण ठसत गेलं.
'विश्वामित्राचे जग' या पुस्तकात त्यांचे विज्ञानविषयक लेख आहेत. कोणतीही गोष्ट ही परिपूर्ण नसते. आपल्या विचारांना विज्ञान व तर्क यांचा आधार असला पाहिजे. मात्र, केतकर विज्ञान व तर्क ह्या दोन्हींच्या मर्यादादेखील दाखवून देतात. ते म्हणतात, 'मला 'आत्मिक सामर्थ्य' नावाची बाब अनुभवता आलेली नाही आणि ती विज्ञानाने सिद्ध न झालेली बाब आहे. ते पटत नसलं तरीही गांधीजी खोटं बोलत असतील असं मात्र मला अजिबात वाटत नाही. फासावर जाणारे स्वातंत्र्यसैनिक आणि हिटलरच्या पाशवी अत्याचाराविरुद्ध लढणारे लोक यांच्याकडे ती शक्ती होती असे मी मानतो.' ते विचाराने नास्तिक व विज्ञानाचा पुरस्कार करणारे असले तरीही ते कुठल्याही पठडीत बसत नाहीत. ते म्हणतात, 'मी स्वतःला विज्ञानवादी म्हणवून घेताना बराचसा संकोचतो. मी स्वतःला अध्यात्मवादी समजतो असं मात्र नव्हे. खरं तर 'विज्ञान विरुद्ध अध्यात्म' असा वादच असता कामा नये. विज्ञान आणि अध्यात्म यांनी एकमेकांना तुच्छ लेखणं, हे त्यांच्या क्षुद्रतेतून येतं. करुणा, आनंद आणि सर्जनशीलता यांचं 'वैज्ञानिक' स्पष्टीकरण कठीण आहे. प्रसारमाध्यमे नसताना गांधीजींचा संदेश काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पोहोचणं हे गूढ आहे.'
त्यांनी 1985 पासूनच पर्यावरणवादासमोरील आव्हानांचा विचार केला होता. त्यांना व्यक्ती आणि समाज, निसर्ग आणि मानव, यांचं ध्रुवीकरण मान्य नाही. त्यांतील द्वंद्व बाजूला सारून ते विचारांमधील अद्वैतता साधतात. ते लिहितात, 'सर्व माणसांना अधिक सुखी (म्हणजे भोगवादी नव्हे) जीवन जगायचे तर तो प्रश्न भौतिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक आहे. निसर्गात जे काही आहे तेच न्याय्य, असा निवाडा करता येणार नाही. निसर्ग हा अनेकांना भासतो तसा नैतिक नाही. तर तो नैतिकतेच्या पलीकडे 'न-नैतिक' आहे. आपलं प्रत्येक पाऊल त्यात ढवळाढवळ करणारं आहे व असणार. त्यासाठी तारतम्याने समन्वय साधणे आवश्यक आहे. कार्ल मार्क्सच्या 'थिसिस, अँटिथिसिस आणि सिन्थेसिस' या सिध्दान्तामधील सिन्थेसिस पर्यावरणवादात घडवणे निकडीचं आहे, असा विचार त्यांनी मांडला.
केतकर हे 'दै. महाराष्ट्र टाइम्स', 'दै. लोकमत', 'दै. लोकसत्ता' आणि 'दै. दिव्य मराठी' या मराठी वृत्तपत्रांचे 1995 ते 2013 या काळात संपादक राहिले. या काळात त्यांनी मराठी पत्रकारितेला नवे आयाम दिले. त्यांनी पत्रकारितेतील 'वार्ता ही सत्यच असली पाहिजे आणि लेखातून स्वातंत्र्य!' हे ब्रीद काटेकोरपणे जपलं. सर्व प्रकारच्या विचारांचे लेख प्रसिद्ध करायला ते तत्पर होते. त्या मांडणीचे खंडण करण्याचे स्वातंत्र्य त्यांना होतंच. विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, शेती, कला व क्रीडा या विविध विषयांवर त्यांनी अनेकांना लिहितं केलं. स्टीफन हॉकिंग, चंद्रशेखर, रामन आणि भाभा या वैज्ञानिकांवर, तर कार्ल सगान, आयॉक असिमोव्ह या विज्ञानलेखकांवरील त्यांचे अग्रलेख आजही संदर्भासाठी उपयोगी पडतात. त्यांच्या चतुरस्र वाचनामुळे कित्येक इंग्रजी ग्रंथ आणि त्यांचे लेखक मराठी वाचकांपर्यंत आले. त्यांचे इंग्रजी व मराठी भाषांवर कमालीचं प्रभुत्व आहे. त्यांचा शब्दसंग्रह थक्क करणारा आहे. त्यांच्या लेखनात तसेच भाषणांत इतिहासातील दाखले, त्याला जोडून इतरही महत्त्वाचे संदर्भ येत असतात. त्यांची तर्कशुद्ध मांडणी तार्किकदृष्ट्या खोडून काढणे कठीण होते.
महाराष्ट्रात 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांच्या संपादक पदाच्या कारकिर्दीत अनेक वेळा पदोन्नतीचे प्रसंग आले. त्या वेळी ती व्यक्ती कोणत्या विचाराची आहे, हा निकष त्यांनी लावला नाही. प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमता पाहून त्यांनी पदोन्नती दिली. त्यांचा हा उमदेपणा नेहमीच अलक्षित राहिला आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ वा भारतीय जनता पक्षावर तुटून पडणाऱ्या केतकर यांनी बाळासाहेब देवरस यांच्या मृत्यूनंतर त्यांचे योगदान स्पष्ट करणारा अप्रतिम मृत्युलेख लिहिला होता. त्यात त्यांनी संघाची ब्राह्मणी प्रतिमा पुसून बहुजनांना सहभगी करून घेण्याच्या देवरसांच्या आग्रहामुळेच संघ व भाजपचा देशभर विस्तार झाल्याचे म्हटलं आहे. त्यांनी प्रमोद महाजन यांच्या निधनांनतर सर्वाधिक लेख प्रसिद्ध करून आदरांजली वाहिली होती.
केतकर यांची ख्याती केवळ आपल्या देशापुरती मर्यादित नाही. त्यांना युरोपमधील अनेक देशांतून होणाऱ्या दहशतवादावरील परिषदांकरिता आमंत्रित केले जातं. अमेरिकेतील 'फर्ले डिकसन' आणि 'न्यू जर्सी' तसेच हाँगकाँग, शांघाय, पॅरिसमधील विद्यापीठांमध्ये त्यांना विशेष व्याख्याते म्हणून पाचारण केलं जातं. भारतातील घडामोडींचे विश्लेषण करताना 'द इकॉनॉमिस्ट' व 'बी.बी.सी. 'सारखी अग्रगण्य नियतकालिकं, केतकर यांना त्यांचे मत विचारतात.
कॅनडा येथील चित्रपट दिग्दर्शक टेरी मॅक्नुहन (मार्शल मॅक्नुहन यांच्या कन्या) ह्या त्यांच्या 'फ्रंटिअर गांधी: बादशहा खान अ टॉर्च फॉर पीस' ह्या वृत्तपटासाठी तब्बल एकवीस वर्षे काम करत होत्या. त्यांनी अफगाणिस्तान, पाकिस्तान व भारत ह्या देशांत जाऊन मोठ्या कष्टाने व जिद्दीने प्रचंड संशोधन केलं. अफगाणिस्तानमध्ये दहाशतवाद्यांचे क्षेपणास्त्रांचे हल्ले सुरू आहेत. कधी अचानक धुळींचे वादळ येते. अशा भयाण परिस्थितीतही त्यांनी त्यांचे काम थांबवले नाही. विलक्षण आक्रमक म्हणून ख्याती असणाऱ्या वायव्य सरहद्द प्रांतात खान अब्दुल गफार खान यांच्यासारखा शांतिदूत कसा निर्माण झाला? त्यांनी त्यांच्या भागातील पठाणी जनतेला गांधीजींच्या अहिंसक मार्गाची महत्ता कशी पटवून दिली? ते, 'भारताने स्वातंत्र्य प्राप्त करताना आम्हाला लांडग्यांसमोर टाकले.' असे का म्हणाले? त्यांना पाकिस्तानने कायमस्वरूपी 'शत्रू' मानून कसा छळ केला? टेरी मॅक्कुहन यांनी हे सारे अतिशय विस्ताराने मांडले आहे. या वृत्तपटाचं प्रदर्शन करण्यासाठी त्या भारतात आल्यावर 2008 मध्ये म्हणाल्या, 'केतकर यांच्या सहकार्याविना मला भारतात दिल्ली, मुंबई, चेन्नई व कोलकातामध्ये हा वृत्तपट दाखवता आला नसता.' केतकर अनेक वेळा सोविएत युनियनच्या दौऱ्यांवर गेले होते. त्यांनी 'सोविएत युनियनचा डोलारा पोकळ असून त्याची कधीही शकले उडू शकतात.' असं भाकीत लिहून ठेवलं आणि त्यानंतर वर्षभरात ते खरं ठरलं. तेव्हा त्यांचे कम्युनिस्ट मित्र व कार्यकर्त्यांनी, 'केतकर हे भांडवलदारांचे हस्तक' असल्याचे आरोप केले होते. वर्षानुवर्षांचे मित्र दुरावतील व शत्रू होतील, ही शक्यता असताना ते त्यांच्या लेखनातून वारंवार सुस्पष्ट भूमिका घेत आले.
केतकर यांनी मराठीमधील वैचारिक निबंध परंपरेला काळानुरूप प्रगल्भ रूप आणण्याचं कार्य केलं आहे. त्यांनी एकविसाव्या शतकाच्या आरंभी ह्या शतकाचा कौल कसा असेल, याचा अदमास घेणारे अनेक निबंध लिहिले. त्यांतील काही निबंध 'बदलते विश्व' या पुस्तकात घेतले आहेत. उदा., 'उत्क्रांतीकडून संस्कृतीकडे', 'कुटुंबव्यवस्थेतील सुरुंग', 'स्वच्छंद जीवनाचे मृगजळ', 'मी कोण व कोणाचा?', 'व्यक्तिवादाच्या सापळ्यात', 'ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया', 'विषमतेमधील विविधता', 'विज्ञानाचा धर्म', 'आता सायबरात्मके देवे', 'जगण्यावर हेतूचे कलम झाले आणि..', 'बुद्ध ओक्साबोक्शी रडला', 'वॉटरगेट कांड: वृत्तपत्र सामर्थ्याचा उत्तुंग साक्षात्कार', 'मोनालिसाचे मोल' आणि 'ज्ञानयात्रेचा वारकरी' या मथळ्यांवरूनच केतकर कालावकाशव्यापी व वर्तमान कवेत घेणाऱ्या शैलीचा अंदाज येतो. त्यांच्या मांडणीचा आणि शैलीचा दोन पिढ्यांवर प्रभाव आहे.
केतकर यांच्या बहुआयामी आणि विशाल पैलूंची माहिती व जाणीव मराठी वाचकांना होत नाही. त्यामुळे त्यांचे मूल्यमापन हे केवळ त्यांच्या राजकीय भूमिकांवरून केले जाते आणि ते पूर्णपणे गैर आहे. केतकर यांच्यामुळे महाराष्ट्रातील दोन पिढ्यांना विचार करण्याची दिशा मिळाली आहे. कित्येक संपादक, पत्रकार आणि लेखक घडत गेले. अनेकांना पुस्तक लिहिण्याची ऊर्मी मिळाली. त्यांच्या लेखन व वक्तृत्वशैलीचा प्रभाव किती क्षेत्रांतील किती जणांवर आहे, हे सांगता येणं कठीण आहे. त्यांच्या उदारपणाचे लाभार्थी असणारे कित्येक जण पाठीमागे त्यांना दूषणे देत स्वतःची टिमकी गाजवत असतात. केवळ त्यांचे विचार भिन्न आहेत म्हणून त्यांची यथेच्छ बदनामी करण्याची असंस्कृत व असहिष्णू वृत्ती महाराष्ट्रात वाढत आहे. पण याचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही. त्यांच्या घरावर 2007 मध्ये हल्ला करण्यात आला. त्याच वर्षी परभणी येथील 'ब्राह्मण संमेलना'त त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर सोशल मीडियातून नेहमीच गरळ ओकली जाते. तरीही त्यांच्यात यत्किंचितही कडवटपणा येत नाही. त्यांनी मनाची विशालता मनोभावे जपली आहे. ठाण्यात राहून जगातील स्पंदनांचा ठाव घेणाऱ्या केतकरांचा संचार जगभर असतो. त्यांच्या सहवासात काही क्षण गेले तरी जगाचा आणि जगण्याचा अर्थ नव्याने ध्यानात येतो, असे म्हणणारे असंख्य तरुण आजही त्यांच्या संपर्कात असतात. (माझ्या वाचनाला व लिखाणाला त्यांच्यामुळे दिशा मिळाली.)
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या