तिन्ही वर्षीचे आलेले एकूण फॉर्म 2300 पेक्षा जास्त आहेत. या सर्व फॉर्म्सचा अधिक वेगळ्या पद्धतीने अभ्यास करून, आणखी काही वेगळे निष्कर्ष काढता येणे शक्य आहे. विशेषतः साप्ताहिक व प्रकाशन या दोन्हींमधला संबंध अधिक स्पष्ट करण्यासाठी. शिवाय, दर वर्षी अशा प्रकारचा एक सर्व्हे यापुढील काळातही करण्याचा विचार आता बळकट झाला आहे. या तीनही वर्षांच्या सव्र्व्हेमधून लक्षात आलेली गोष्ट अशी की, अतिशय दीर्घ प्रश्नावली असून व कमी कालावधी दिलेला असूनही असंख्य वाचकांनी अतिशय मनापासून हे फीडबॅक फॉर्म भरले आहेत. साधना या संस्थेशी असलेली त्यांची बांधिलकी यातून प्रतिबिंबित होते आहे
साधना साप्ताहिकाचे व साधना प्रकाशनाचे अमृत महोत्सवी वर्ष 15 ऑगस्ट 2023 रोजी संपले, तेव्हा पुढील 25 वर्षाच्या वाटचालीसाठी काही एक नियोजन करण्याच्या दृष्टीने आम्ही पावले टाकायला सुरुवात केली. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून आत्मनिरीक्षण आणि आत्मपरीक्षण करणे आवश्यक वाटत होते. त्यासाठी वाचकांचा फीडबॅक घेणारा सव्र्व्हे करणे गरजेचे वाटले. म्हणजे आपले वाचक कोण, ते कोणत्या वयोगटातील, त्यांच्या आवडीनिवडी काय हे समजून घेणे एका बाजूला; तर त्यातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दिसणारी साधनाची बलस्थाने व मर्यादा हे दुसऱ्या बाजूला घडणार होते. आणि अर्थातच, त्यामुळे आगामी काळातील आव्हाने व संधी यांच्याशी अवगत होता येणार होते. त्यानुसार लेखन, संपादन, वितरण, व्यवस्थापन व अर्थकारण यात बदल करण्याच्या संदर्भात काही अंदाज घेता येणार होता. फीडबॅक सव्हें चे अनेक प्रकार आहेत, प्रत्येक प्रकारच्या काही मर्यादा आहेत आणि बलस्थानेही. त्यांचा एकत्रित विचार अक्षय जोशी या तज्ज्ञ तरुणाच्या मार्फत सलग तीन वर्षांत तीन सव्र्व्हे करण्याचे ठरवले.
आणि मग, डिसेंबर 2023 मध्ये साधना साप्ताहिकाच्या वाचकांचा सर्व्हे करण्यात आला. त्यासाठी 24 प्रश्न असलेल्या फॉर्मची लिंक दहा हजार लोकांना पाठवण्यात आली, 1250 लोकांनी तो फॉर्म भरून पाठवला. त्याचे विवेचन-विश्लेषण करणारे संपादकीय निवेदन आणि ग्राफिक्स 30 डिसेंबर 2023 च्या अंकात प्रसिद्ध केले. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये साधना साप्ताहिकाच्या बालकुमार व युवा दिवाळी अंकांचा सव्र्व्हे करण्यात आले, त्यासाठी 24 प्रश्नांचा फॉर्म दहा हजार वाचकांना पाठवण्यात आला, 444 लोकांनी तो फॉर्म भरून पाठवला. त्याचे विवेचन विश्लेषण करणारे संपादकीय निवेदन आणि ग्राफिक्स 10 फेब्रुवारी 2025 च्या साधना अंकात प्रसिद्ध करण्यात आले. आणि यावर्षी म्हणजे डिसेंबर 2025 मध्ये साधना प्रकाशनाच्या वाचकांचा फीडबॅक सव्र्व्हे करण्यात आला, त्यासाठीही 24 प्रश्नांचा फॉर्म दहा हजार वाचकांना पाठवण्यात आला, 590 वाचकांनी तो फॉर्म भरून पाठवला. त्याचे विवेचन विश्लेषण करणारे निवेदन आणि ग्राफिक्स प्रस्तुत अंकात (3 जानेवारी 2026) प्रसिद्ध केले आहे.
तीनही वर्षी जास्तीत जास्त वाचकांच्या पर्यंत फीडबॅक फॉर्म जाण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. साप्ताहिक अंकातून, सोशल मीडियाद्वारे, व्हाट्सअॅपवरून आणि इमेलद्वारेही हे फीडबॅक फॉर्म सर्वदूर पोहोचवण्यात आले. अनेकांना दोन-तीन मार्गांनी लिंक गेली, तरीही पुनरावृत्ती वगळूनही किमान दहा हजार लोकांपर्यंत हे फॉर्म गेले. दहा हजार लोकांपर्यंत फॉर्म जातो तेव्हा 98 टक्के या (जास्तीत जास्त) कॉन्फिडन्स इंटरव्हलसाठी 543 अर्ज यावे लागतात. साप्ताहिकासाठी भरून आलेले फीडबॅक फॉर्म 543 या आकड्यापेक्षा दुपटीवरून अधिक होते. प्रकाशनाचे फीडबॅक फॉर्म 543 आकड्यापेक्षा थोडे जास्त आले. साहजिकच ते दोन्ही सव्हें 98 टक्के कॉन्फिडन्स इंटरव्हलसाठी पात्र ठरले. बालकुमार व युवा दिवाळी अंकासाठी आलेले फीडबॅक फॉर्म मात्र 543 पेक्षा 100 ने कमी आले, त्यामुळे तो फीडबॅक सव्र्व्हे 95 टक्के कॉन्फिडन्स इंटरव्हलसाठी पात्र ठरला होता (हा आकडा कमी येण्याचे कारण बालकुमार व युवा या दोनच प्रकारच्या मिळून केवळ 28 अंकांसाठी तो सव्र्व्हे होता आणि ते अंक वाचणाऱ्या खूप मोठ्या बालकुमार व युवा समूहापर्यंत फीडबॅक फॉर्मची लिंक पाठवता आलीच नव्हती).
तिन्ही वर्षीचे आलेले एकूण फॉर्म 2300 पेक्षा जास्त आहेत. या सर्व फॉर्म्सचा अधिक वेगळ्या पद्धतीने अभ्यास करून, आणखी काही वेगळे निष्कर्ष काढता येणे शक्य आहे. विशेषतः साप्ताहिक व प्रकाशन या दोन्हींमधला संबंध अधिक स्पष्ट करण्यासाठी. शिवाय, दर वर्षी अशा प्रकारचा एक सर्व्हे यापुढील काळातही करण्याचा विचार आता बळकट झाला आहे. या तीनही वर्षांच्या सव्र्व्हेमधून लक्षात आलेली गोष्ट अशी की, अतिशय दीर्घ प्रश्नावली असून व कमी कालावधी दिलेला असूनही असंख्य वाचकांनी अतिशय मनापासून हे फीडबॅक फॉर्म भरले आहेत. साधना या संस्थेशी असलेली त्यांची बांधिलकी यातून प्रतिबिंबित होते आहे, त्या सर्व वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद !
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या