डिजिटल अर्काईव्ह

प्रेक्षक म्हणून दिग्दर्शक एक प्रकारे आपलीही परीक्षा पाहतो. फतिह अकीन हिटलरच्या बाजूने असणाऱ्या कुटुंबामधल्या मुलाची गोष्ट सांगतात. त्याच्या नजरेतून आजुबाजूचं जग दाखवतात. त्याच्याविषयी आपल्या मनात आस्था निर्माण करतात. हिटलरविरोधी सिनेमामध्ये आपण अगदी सहजी गुरफटून जातो. पण इथे न पटणाऱ्या राजकारणामध्ये दिग्दर्शक आपल्याला गुंतवतो. महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनात कणभरही अपराधीपणाची भावना येऊ न देता तो हे साध्य करतो. कारण फतिह अकीन कोणाच्या बाजूने आहे हे आपल्याला नेमकं जाणवत राहतं.

फतिह अकीन आणि पार्क छन उक हे अनुक्रमे जर्मनी आणि दक्षिण कोरियाचे दिग्दर्शक. जागतिक स्तरावर महत्त्वाचे मानले गेलेले. इफीमध्ये दाखवण्यात आलेल्या त्यांच्या सिनेमांविषयी...

फातिह अकीन हा तुर्कस्तानमध्ये जन्माला आलेला जर्मन दिग्दर्शक सोपे सिनेमे बनवत नाही. त्यांचे सिनेमे मेंदूला त्रास देत राहतात. काही वेळा नकोसेही वाटतात. 2019 च्या इफीमध्येच त्यांचा 'द गोल्डन ग्लोव्ह' हा सिनेमा मी बघायला गेले होते. रात्री आठ वाजताचा शो होता. दिवसभरात किमान तीन सिनेमे बघून झालेले होते. मेंदू शिणलेला होता. खरं म्हणजे फातिह अकीनचे सिनेमे पाहण्यासाठी या सगळ्या गोष्टी अगदीच चुकीच्या होत्या. पण इलाज नव्हता. त्या वर्षीच्या बर्लिन चित्रपट महोत्सवातल्या स्पर्धेसाठी 'द गोल्डन ग्लोव्ह'ची निवड झालेली होती.

फ्रिट्झ होन्का नावाच्या जर्मनीमधल्या सिरियल किलरची गोष्ट त्यात सांगितलेली होती. 1970 ते 1975 या काळात या माणसाने चार मुलींचे खून केले आणि त्यांच्या शरिराचे काही भाग आपल्या घरात लपवून ठेवले. हमॅबर्गमधल्या ज्या पबमध्ये होन्काने या मुलींना हेरलं त्याचं नाव होतं, द गोल्डन ग्लोव्ह. होन्काचं कुरुप दिसणं, त्याचं वागणं, बोलणं, खून केल्यानंतर शरिराचे काही भाग सुटकेसमध्ये कोंबणं... या सगळ्या गोष्टी अकीन इतक्या तपशीलाने दाखवत होते की सिनेमा सुरू होऊन जेमतेम पंधरा मिनिटं झाली नाहीत तोवर अस्वस्थ वाटून मी थिएटरमधून बाहेर आले होते.

या वर्षी त्यांचा 'आमरुम' सकाळी नऊ वाजता होता. सिनेमाविषयी जाणीवपूर्वक फार काही वाचलेलं नव्हतं. अगदी सिनॉप्सिसही. फतिह अकीन एवढं नाव काफी होतं. आणि खरोखरच पुढचा दीड तास खुचला खिळवून ठेवणारा अनुभव पदरी पडला.

आमरुम हे जर्मनीच्या उत्तरेकडे वसलेलं बेट. आजच्या घडीला तिथे केवळ अडीच हजारांची वस्ती आहे. लांबच लांब समुद्रकिनारे, त्यावर पसरलेले वाळूचे डोंगर आणि सभोवताली हिरवीगारं शेतं. सिनेमा घडतो दुसरं महायुद्ध संपत आलेलं असताना.

अगदी पहिल्याच दृष्यात आमरुमचं सौंदर्य आणि युद्धाचं सावट या दोन्ही गोष्टी आपल्या नजरेत भरतात. लाँग शॉटमध्ये कॅमेरा आपल्याला जमिनीवर पसरलेली शेतं दाखवू लागतो, शेतात उभे असलेले दोन मुलगे आणि शेजारी एक बाई दिसते. तिघांचीही नजर आकाशाकडे. आणि आकाशातून झेपावणारी विमानं...

नजरेत सामावणार नाही अशा पडदा व्यापून टाकणाऱ्या या दृष्याने पहिल्या क्षणाला आपण आमरुमच्या भोवतालामध्ये गुंतून जातो ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत.

ही गोष्ट आहे बारा वर्षाच्या नॅनिंगची. या पहिल्याच दृष्यात तो आणि त्याचा मित्र आपल्याला टेसाच्या शेतात काम करताना दिसतात. त्यांचं काम चालू असतानाच एक घोडागाडी गावात प्रवेश करते. आतमध्ये माणसं खच्चून भरलेली. बर्लिनहून आलेले हे निर्वासित रशियात जन्मलेले जर्मन असल्याचं आपल्याला कळतं. युद्धामुळे जीवनावश्यक वस्तूंची भासणारी कमतरता टेसा आणि तिच्यासारख्या आमरुममधल्या सगळ्या रहिवाशांना जाणवू लागलेली असते. युद्ध आता एकदाचं लवकरात लवकर संपू दे हे टेसाचं वाक्य नॅनिंगच्या कानावर पडतं.

गावातल्या बहुतेक घरांसारखंच नॅनिंगचं कुटुंबही दरिद्री आहे. त्याच्या आईला नववा महिना लागलाय. त्याला दोन लहान भावंडंही आहेत. आणि सोबत त्याची मावशीसुद्धा राहतेय. टेसाच्या बटाट्यांच्या शेतात काम करण्याबरोबरच नॅनिंग लाकूड तोडून आणण्यासारखी इतर काम करून घराला हातभार लावायचा प्रयत्न करतोय. आईची काळजी घेतोय. मात्र, गावातल्या बहुतांश घरांपेक्षा हे घर काही बाबतीत वेगळं आहे. नॅनिंगचे वडील नाझी जर्मनीसाठी लढायला गेलेत. आई हिटलरची भक्त आहे. आणि नॅनिंगही स्वतःला नाझी सैनिक म्हणवून घेतोय.

टेसाच्या तोंडून युद्ध संपण्याची भाषा नॅनिंग ऐकतो आणि घरी येऊन आईला वडील आता परत कधी येणार असा बालसुलभ प्रश्न विचारतो. त्याच्या या प्रश्नाने आई चिडते. नाझी अधिकाऱ्यांकडे टेसाची तक्रार करते आणि नॅनिंगवर चुगलीखोर म्हणून शिक्का बसतो. गावातले नाझी विरोधी गरीब शेतकरी आणि नाझींविषयी सहानुभूती असलेली गावातलीच काही नॅनिंगसारखी कुटुंबं यांची ओळख या छोट्या घटनेमधून आपल्याला होते. गावातली माणसं नॅनिंगशी अजिबातच दुष्टपणे वागत नाहीत, त्याच्या वडिलांच्या नाझी असण्याचं ओझं त्याच्यावर लादत नाहीत. मात्र, आईवर प्रखर निष्ठा असलेल्या नॅनिंगचं वय यातला विरोधाभास कळण्याचं नसतं.

हिटलर युद्ध हरतोय यामुळे अस्वस्थ झालेली आई एका हताश क्षणी या बेटावर आपल्याला किमान पांढरा ब्रेड, बटर आणि मध एवढं तरी एखाद्या दिवशी खायला मिळावं अशी इच्छा व्यक्त करते आणि लहानगा नॅनिंग ते जणू आपल्याला आयुष्याचं ध्येय बनवून टाकतो. सिनेमाभर या तीन गोष्टी मिळवण्यासाठी नॅनिंगचे अथक प्रयत्न आपण पाहतो. मुख्य म्हणजे, त्याला कोणतीही गोष्ट मोफत नको असते. त्यासाठी मेहनत करायची, काम करायची, घाम गाळायची त्याची तयारी असते. यासाठी तो गावातल्या मच्छिमारासाठी समुद्रकिनाऱ्यावर सील माशाला आकर्षित करण्याकरता पोटावर झोपून पाय हलवत राहणं मान्य करतो. समोरून येणाऱ्या सीलकडे पाहणाऱ्या नॅनिंगचा चेहरा आपल्याला दिसतो. मच्छिमार काका गोळी कधी मारणार, की तो मासा थेट आपल्याला येऊन भिडणार अशा अनेक भावना आपण त्याच्या चेहऱ्यावर बघत असतो आणि अचानक त्याचं पाय हलवणं थांबतं. चेहऱ्यावरचे भाव बदलतात. तो शांत होतो. सील माशाला गोळी लागलीये हे आपल्याला गोळीचा आवाज किंवा प्रत्यक्ष गोळी मारणं न दाखवताही कळतं.

आईसाठी ब्रेड, बटर आणि मध यांची जमवाजमव करत असताना नॅनिंग बेटावरच्या मूळ रहिवाशांच्या अधिक जवळ जातो. आपल्याच सख्ख्या काकाला नाझींनी दिलेल्या वागणुकीविषयी त्याला कळतं. दुसऱ्या बाजूला हिटलरविषयी प्रचंड अभिमान बाळगणारी आई आणि हिटलरसाठी काम करणारे वडील आहेत. आईवर जिवापाड प्रेम असलेल्या नॅनिंगचं गोंधळलेपण अगदीच समजण्यासारखं असतं. दोन्ही बाजूचे संस्कार त्याच्यावर होत राहतात. बारा वर्षाचं वय, अशा निरागस वयात मुलं जे समोर येईल ते टिपत जातात. नॅनिंग याला अपवाद कसा असणार?

नॅनिंगची भूमिका करणाऱ्या जॅस्पर बिलरबेक या मुलाने अक्षरशः कमाल केलीये. आईसाठी वाटेल ती संकटं अंगावर घेणारा नॅनिंग जितका खरा वाटतो तितकाच सशाची शिकार करताना निर्दयी होणारा. त्याच्या मनातला गोंधळ, भीती, प्रेम, निग्रह, त्याचं स्वाभिमानी असणं, त्याचा प्रामाणिकपणा सगळं त्याच्या डोळ्यांमधून जाणवतं. कमिंग ऑफ एज-वयात येणाऱ्या नॅनिंगचा हा प्रवास पाहताना आपण गलबलून जातो.

प्रेक्षक म्हणून दिग्दर्शक एक प्रकारे आपलीही परीक्षा पाहतो. फतिह अकीन हिटलरच्या बाजूने असणाऱ्या कुटुंबामधल्या मुलाची गोष्ट सांगतात. त्याच्या नजरेतून आजुबाजूचं जग दाखवतात. त्याच्याविषयी आपल्या मनात आस्था निर्माण करतात. हिटलर विरोधी सिनेमामध्ये आपण अगदी सहजी गुरफटून जातो. पण इथे न पटणाऱ्या राजकारणामध्ये दिग्दर्शक आपल्याला गुंतवतो. महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनात कणभरही अपराधीपणाची भावना येऊ न देता तो हे साध्य करतो. कारण फतिह अकीन कोणाच्या बाजूने आहे हे आपल्याला नेमकं जाणवत राहतं.

या सिनेमाचं दिग्दर्शन खरं म्हणजे हार्क बॉम करणार होते. जर्मनीचे हे प्रसिद्ध दिग्दर्शक, नट, पटकथा लेखक, नाटककार, कादंबरीकार आणि सिनेमाचे अभ्यासक होते. या वर्षीच्याच नोव्हेंबर महिन्यात त्यांचं निधन झालं. फतिह अकीन बॉम यांना आपला गुरू मानतात. हार्क बॉम यांचा जन्म हॅमबर्गचा, मात्र त्यांचं बालपण आमरुमच्या बेटावर गेलं. दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या काळातल्या त्यांच्या आठवणींवरच आमरुमची कथा बेतलेली आहे. सिनेमाची पटकथा बॉम यांचीच आहे. बॉम आणि अकीन यांनी एकत्र येऊन या सिनेमाला आकार दिलाय. म्हणूनच, सिनेमाच्या टायटल्समध्ये 'हार्क बॉम फिल्म बाय फतिह अकीन' असं वाचायला मिळतं.

दिग्दर्शक: फतिह अकीन
लेखक: हार्क बॉम, फतिह अकीन
छायाचित्रण : कार्ल लिंडनलॉब
संकलन : ॲन्ड्रयू बर्ड
कलाकार : जॅस्पर बिलरबेक, लॉरा टॉन्क, लिसा हॅगमेइस्टर, डियान क्रुगर



पार्क छन उक हे नाव दक्षिण कोरिआच्या महत्त्वाच्या दिग्दर्शकांमध्ये घेतलं जातं. चित्रपट समीक्षक म्हणून कारकीर्द सुरू केलेल्या या दिग्दर्शकाकडे आपल्या भोवतालच्या विसंगतींकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी आहे. त्यांच्या सिनेमांमधून गुन्हेगारी असते, प्रश्नावर थेट घाव घालणं असतं, ब्लॅक ह्युमर असतो, थ्रिलर, रहस्य अशा अनेक घटकांचा, शैलीचा वापर ते कमालीच्या परिणामकारकतेने करतात. 2022 मध्ये आलेल्या त्यांच्या 'डिसिजन टु लिव्ह' या सिनेमाने कान चित्रपट महोत्सवामध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळवून दिला होता.

वैयक्तिकदृष्ट्या 'डिसिजन टु लिव्ह' मला जास्त आवडला होता, पण 'नो अदर चॉईस' हा त्यांचा नवीन सिनेमाही खास पार्क छन उक पठडीतला आहे. खरं म्हणजे 1997 मध्ये डॉनल्ड वेस्टलेक यांच्या 'द अॅक्स' या कादंबरीवर हा सिनेमा आधारलेला आहे. याच कादंबरीवर 2005 मध्ये कोस्ता गॅवहास यांनीही सिनेमा केलाय आणि पार्क यांनी आपला सिनेमा त्यांनाच अर्पण केलाय. महत्त्वाचं म्हणजे जवळपास तीस वर्षांनंतरही 'नो अदर चॉईस' आजच्या काळाचा आहे असं वाटतं. त्यात आजच्या परिस्थितीबाबत परखड भाष्य आहे, गुंतागुंत आहे, एका कथानकाच्या बरोबरीने काही उपकथानकं आहेत आणि हे सगळं 'दुसरा पर्यायच नाही' यावर येऊन थांबलंय.

सिनेमाच्या सुरुवातीलाच आपली भेट होते मान- सु आणि त्याच्या कुटुंबाशी. हा टिपिकल पुरुष, आपल्या कर्तेपणाचा अभिमान बाळगणारा. मि-रि त्याची बायको. दोघेही एकमेकांच्या कमालीचे प्रेमात आहेत. मि-रिला आधीच्या लग्नापासून झालेला एक मुलगा आहे, सी-वन. आणि दोघांना आता एक मुलगी आहे, रि-वन. शिवाय, दोन देखणे लॅबॅडोअर पण आहेत. थोडक्यात, हे चौकोनी कुटुंब आपल्या भल्यामोठ्या घरात आनंदाने राहतंय. नाही म्हणायला, रि-वन थोडी वेगळी आहे. चेलो वाजवण्यात हुशार, पण तोंडातून अवाक्षरही न काढणारी.

मान-सु एका कागद बनवणाऱ्या कंपनीत कामाला आहे. आयुष्यभर त्याने हेच काम केलंय आणि हेच त्याचं जग आहे. सर्वोत्कृष्ट कर्मचाऱ्याचा पुरस्कारही त्याने पटकावलेला आहे. त्यांची कंपनी अमेरिकेन उद्योगपती विकत घेतात. त्यांनी भेट दिलेले मासे मानसु आपल्या कुटुंबासाठी तळताना दिसतो. ते आग्रहाने वाढताना दिसतो. इतकं सगळं छान छान चाललेलं असताना काहीतरी अरिष्ट येऊ घातलंय हे कळायला आपल्याला वेळ लागत नाही.

कंपनी विकत घेतल्यानंतर अमेरिकन मालक अनेक कर्मचारी काढून टाकतात. असं करण्यावाचून आपल्यासमोर 'दुसरा पर्यायच नाही' असा नव्या मालकांचा दावा असतो. आणि त्यात मान-सुचा समावेश असतो. त्याच्यावर तर कुऱ्हाडच कोसळते. एवढ्या मोठ्या घराचे हप्ते, उंची राहणी, श्रीमंतीत जगण्याची झालेली सवय आणि घरातला पुरुष म्हणून या सगळ्याची आलेली जबाबदारी. कसं तोंड देणार या संकटाला? त्यातून आपल्या मनातल्या भावना शब्दांमधून व्यक्त करणंही त्याला धड जमत नाही. युनियनचा नेता म्हणून भाषण द्यायचं तर ते एखाद्या चिटोऱ्यावर लिहून घ्यायचं ही त्याची व्यक्त होण्याची पद्धत.

मग अर्थातच सुरू होते नवीन काम शोधण्याची मान-सुची धडपड. मात्र, हे काम कागदाच्याच व्यवसायात मिळायला हवं हा त्याचा आग्रह असतो. 'माझ्यापुढे दुसरा पर्यायच नाही,' त्याचं म्हणणं असतं. कागद बनवणाऱ्या इतर कंपन्यांमध्ये तो अर्ज करू लागतो. एक दिवस बायकोबरोबर त्याच्या बरोबरीने अर्ज करणाऱ्यांची यादी पहात असताना त्याचं मनोधैर्य वाढवण्यासाठी ती म्हणते, 'माझ्या नवऱ्याशी तुलना केली तर हा माणूस कुठेच नाही. त्याच्यावर वीज नाही का पडू शकत?' आणि मान-सुचा चेहरा बदलतो. एक कल्पना त्याच्या मनात आकार घेऊ लागते. त्याच्यासारख्याच, त्याच्याच जागेवर, त्याच्याच स्पर्धेत असलेल्या इतर पुरुषांचा काटा काढण्याची. माझ्या कुटुंबाला अन्नपाणी पुरवण्यासाठी मी करू शकत नाही असं काहीच नाही. माझ्यापुढे दुसरा पर्यायच नाही, तो स्वतःला सांगतो.

स्पर्धा चांगली की वाईट? ती निकोप कधी असते आणि जिवघेणी कधी होते? की स्पर्धा म्हटल्यावर त्यात निकोप असं काहीच नसतं? केवळ जिंकणं अभिप्रेत असतं ? कोणत्याही मार्गाने ? आणि मग ही स्पर्धा जर आपल्या जगण्यामरण्यापाशी येऊन ठेपली तर ? जिंकण्यासाठी जे काही करणार त्या सगळ्याचं 'दुसरा पर्यायच नाही,' असं म्हणून समर्थन करायचं ? स्वाभाविकच मान-सुची ही गोष्ट सरळसोट मार्गाने जात नाही.

पैसे कमवावेत म्हणून मि-रि एका डेन्टिस्टकडे सहाय्यक म्हणून काम करू लागते. अत्यंत देखणा असा हा डॉक्टर पाहून आधीच हवालदिल झालेल्या मान-सुच्या मनात नको नको ते विचार येऊ लागतात. त्याला स्वतःला दातदुखीचा त्रास होऊ लागतो ज्यावर इलाज करून घेणं तो नाकारत राहतो. त्याच्या मुलाला नेटफ्लिक्स आणि आयफोनशिवाय जगणं माहीत नाहीये. त्यामुळे वडिलांनी घरात पैसे न देणं त्याला परवडणारं नाही. मुलगी चेलो इतका उत्तम वाजवतेय की तिला आता अधिक मोठी शिकवणी लावण्यावाचून दुसरा पर्याय नाही. त्यांच्या त्या भल्यामोठ्या या वडिलोपार्जित घरात त्याच्या अनेक आठवणी वसलेल्या आहेत, त्याला एक इतिहास आहे. घराच्या आवारात एक ग्रीन हाऊस आहे. झाडं कापून कागद तयार करण्याच्या व्यवसायात असलेल्या मान-सुचं झाडांवर अतिशय प्रेम आहे. त्यांची काळजी घेणं हा त्याचा श्रमपरिहार आहे. तिथली बोनसाय झाडंही काही विधान करू पाहणारी आहेत. दुसऱ्या बाजूला मान-सुच्या प्रतिस्पध्र्थ्यांचीही स्वतःची अशी एक कहाणी आहे.

'लूझिंग अ जॉब इज नॉट माय चॉईस.'
'इट इज टेरिबली लोन्ली अँड स्केअरी टु कमिट अ क्राईम ऑल अलोन.'
'आय वुईल कॉन्टॅक्ट यू टु टेल व्हेन आय गो मिसिंग.'

यासारखे संवाद एकाच वेळी विनोद निर्मितीही करतात आणि हार्ड हिटिंगही आहेत. सिनेमातली हिंसाही तशीच. त्यातून विनोद निर्मिती होते आणि ती पाहून धसकायलाही होतं. एका दृष्यात समोरच्या माणसावर बंदुक रोखलेला मान-सु आपल्याला दिसतो. मग तो आपल्या हातामधले ग्लोव्हज काढू लागतो. त्यात एक सॅन्टाक्लॉजचा हातमोजाही आहे. तीनेक हातमोजे काढल्यानंतर त्याच्या हाताला बांधलेलं प्लॅस्टिक आपण पाहतो आणि त्यात पकडलेली बंदुक. हे सगळं अतिशय हास्यास्पद वाटलं तरी त्या दृष्याची धार कुठेही बोथट होत नाही. सिनेमाभर एक गडद काळी सावली आपल्याबरोबर वावरत राहते. सिनेमाचा शेवट म्हटलं तर सुखी आहे, आणि म्हटलं तर नाहीही.

यंत्रांमुळे जगभरात जात असलेल्या नोकऱ्या, भांडवलशाहीमध्ये माणुसपणाला नसलेलं महत्त्व आणि अवतीभोवती वाढत चाललेली हिंसक वृत्ती या सगळ्याबाबत पार्क छन उक ठामपणे आपलं म्हणणं
मांडतात. खास त्यांच्या शैलीत. आणि एक उत्कृष्ट सिनेमा आपल्यासमोर ठेवतात.

या वर्षी इफीमध्ये जाफर पनाही, योआकीम ट्रिअर, जिम जारमुश, फतिह अकीन आणि पार्क छन उक या आजच्या मास्टर्सचे सिनेमे पहायला मिळाले. आणि महत्त्वाचं म्हणजे यातल्या प्रत्येकाने समृद्ध करणारा अनुभव दिला. खरं तर एवढ्यावरच 2025 च्या इफीचं यश मोजायला हरकत नाही. पण फक्त मास्टर्सच्या सिनेमांवर बोलून चालणार नाही. इतरही दिग्दर्शकांच्या चांगल्या सिनेमांची दखल घ्यायला हवी. ती पुढच्या अंकात.

दिग्दर्शक : पार्क छन उक
पटकथा : पार्क छन उक, ली क्योंग-मी, डॉन मॅककेलर, ली जाह-हे
छायाचित्रण : किम वू-हचुंग
संकलन : किम सांग-बो, किम हो-बिन
कलाकार : ली ब्युयांग हून, सून ये-जीन, पार्क ही-सून, ली सुंग-मीन
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मीना कर्णिक,  मुंबई ( 82 लेख )
meenakarnik@gmail.com

पत्रकार, चित्रपट समीक्षक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी