कार्यशाळेच्या समारोपाच्या सत्रात मनोगत व्यक्त न करू शकलेल्या हेरंब कुलकर्णी यांनी (परतीचा प्रवास करण्यासाठीची गाडी सायंकाळी 6 वाजता असल्याने) गाडीत बसल्याबरोबर टाइप करून पाठवलेली प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे होती - "एकेकाळी महाराष्ट्रात राजकीय पक्ष व सामाजिक संघटना कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आयोजन करत होत्या. पण ते प्रमाण कमी होत गेले. त्या दृष्टीने या प्रशिक्षण संस्थेचा पुढाकार महत्त्वाचा आहे. या कार्यशाळेने सामाजिक प्रश्न अर्थशास्त्राच्या चौकटीत मांडता येऊन विचार करण्याची गरज वाटू लागली, गरिबांचे प्रश्न सुटण्यासाठी बजेटच्या चौकटीतच विचार करावा लागेल, हे भान दिले. केवळ भावनेने बोलण्यापेक्षा बजेटच्या भाषेत मागण्या मांडल्या पाहिजे हे भान आले, ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे. जागतिक बँक, उदारीकरण याबाबतचे पूर्वग्रह तपासून बघण्याची गरज वाटते आहे. आदिवासी विभाग व समाजकल्याण विभागाचे अर्थसंकल्प या समजेतून तपासावे असेही आता वाटते आहे."
ग. प्र. प्रधान संशोधन व प्रशिक्षण केंद्राची पहिली कार्यशाळा जानेवारी 2026 अखेर करण्याचे ठरले, तेव्हा पहिला निर्णय हा होता की, या कार्यशाळेची सर्व प्रक्रिया (पहिले निवेदन प्रसिद्ध करण्यापासून कार्यशाळा पूर्णत्वास जाण्यापर्यंतची) एकाच महिन्यात पूर्ण झाली पाहिजे. त्यानुसार, कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी अर्ज मागवणारे निवेदन 1 जानेवारीला साधना साप्ताहिकातून प्रसिद्ध केले. ते साधनाच्या तिन्ही वेबसाइट्स व सर्व सोशल मीडियावरून वापरले होते. एका पूर्ण पानाच्या त्या निवेदनात कार्यशाळेच्या संदर्भातील आवश्यक ते सर्व तपशील नेमकेपणाने दिले होते. अर्ज मागवण्याची मुदत 15 जानेवारीपर्यंत दिली होती. फक्त 20 लोकांना प्रवेश दिला जाणार आहे हे स्पष्ट केले होते आणि तीनही दिवस पूर्ण वेळ उपस्थित राहणे शक्य असेल तरच अर्ज करावा अशी पूर्वअट ठेवली होती. स्वतःचा बायोडेटा आणि 'ही कार्यशाळा मला का करायची आहे व या कार्यशाळेतून मला काय शिकायला आवडेल?' यासंदर्भात 500 शब्दांपर्यंतचे टिपण, अशा स्वरूपात ते अर्ज मागवले होते. या निवेदनामुळे, पूर्ण वेळ व पुरेशा गांभीर्याने कार्यशाळा करू इच्छिणाऱ्या लोकांनीच अर्ज केले. साहजिकच, तुलनेने कमी म्हणजे 50 + अर्ज आले, पण जे आले त्यातील बहुतांश अर्ज चांगलेच होते. शिक्षण, साहित्य, उद्योग, व्यापार, समाजकारण, प्रशासन, अर्थकारण इत्यादी क्षेत्रांतील ते लोक होते. त्यातून निवड करताना दोन प्रमुख निकष लावले. अर्थकारण या विषयाची पार्श्वभूमी व पूर्वतयारी असलेल्या लोकांचीच निवड करायची आणि त्यातही 25 ते 50 वर्षे या वयोगटाला प्राधान्य द्यायचे.
बरेच काटेकोर निकष लावूनही असे लक्षात आले की, आपण 20 लोकांची निवड करायची ठरवले असले तरी आलेल्या अर्जातून निश्चित निवडावेत असे 25 लोक तरी आहेत. त्या सर्वांना 16 जानेवारीला निवड झाल्याचे कळवले. आणि पुढील सात दिवसांत त्यांच्याशी माफक व नेमका संपर्क ठेवताना कार्यशाळेची उत्सुकता वाढत राहील आणि गांभीर्य निर्माण होईल याची काळजी घेतली. कार्यशाळेचे वेळापत्रक, साधन व्यक्ती (रिसोर्स पर्सन) चा परिचय आणि कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या सर्वांचा प्रत्येकी एक परिच्छेदात परिचय हे सर्व मेलद्वारे सर्वांना कळवले. शिवाय, फोन व मेसेजद्वारे साधनाचे सहकारी त्या सर्वांशी संपर्क ठेवून होते. प्रवास, निवास, भोजन यांबाबत आवश्यक ती माहिती दिली गेली. त्यामुळे, पहिल्याच दिवशी ठरल्याप्रमाणे बरोबर 10 वाजता कार्यशाळा सुरू झाली आणि कुणी कुणाची ओळख करून न देताही सर्व जण सहजतेने वावरू लागले. त्या सर्वांच्या सोबत साधनाचे कार्यालयीन सहकारी व अन्य निमंत्रित असे आणखी दहा लोक होते. म्हणजे एकूण 35 लोक त्या कार्यशाळेत तीन दिवस उपस्थित होते. कार्यशाळा पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी (एस. एम. जोशी फाउंडेशन) सर्व सोयींनी युक्त व पुरेशा मोठ्या हॉलमध्ये होती. खडू-फळा, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन व ऑडिओ-व्हिडिओ साठी स्क्रीन इत्यादी सुविधा होत्या. चहा-पाणी व जेवण यांच्या वेळा व जागा ठरलेल्या होत्या. त्यामुळे, तीनही दिवस ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे ठरलेली सत्रे झाली.
जेवणापूर्वी दोन आणि जेवणानंतर दोन अशी चार सत्रे रोज झाली. प्रत्येक सत्र सव्वा तासाचे होते, त्यात साधारणतः 50 ते 60 मिनिटे रिसोर्स पर्सनची मांडणी आणि 15 ते 20 मिनिटे प्रश्न-उत्तरे अशी रचना होती. सर्वच लोक रोज सकाळी साडेनऊ वाजता येत होते, दिवसभर थांबत होते, चहाचा किंवा जेवणाचा ब्रेक अजिबात लांबवला गेला नाही. प्रश्न-उत्तरांमध्ये अनेक लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत होते. रिसोर्स पर्सनही नेमकेपणाने त्या सर्वांच्या प्रश्नांना उत्तरे देत होते. कार्यशाळेच्या तिसऱ्या दिवशी समारोपाच्या सत्रात बारा-पंधरा लोकांनी आपली मनोगते व्यक्त केली. तेव्हा कार्यशाळेचे नियोजन आणि सादरीकरण व चर्चा यांचा दर्जा याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त करणे स्वाभाविक होते. पण महत्त्वाचे म्हणजे, अशा कार्यशाळा याच प्रकारे व सातत्याने घेतल्या पाहिजेत, असे संयोजन करणारे व रिसोर्स पर्सन यांनाही तीव्रतेने वाटले. ही कार्यशाळा सर्वांसाठी विनामूल्य होती. कार्यशाळेचा एकूण खर्च दीड लाख रुपये आला. साधनाला पूर्ण अपरिचित (कार्यशाळेला आलेल्या) विश्वास सहस्रबुद्धे यांनी 50 हजार रुपये देणगी पाठवली. आणखी दोघांनी काही रक्कम पाठवली.
कार्यशाळेच्या समारोपाच्या सत्रात मनोगत व्यक्त न करू शकलेल्या हेरंब कुलकर्णी यांनी (परतीचा प्रवास करण्यासाठीची गाडी सायंकाळी 6 वाजता असल्याने) गाडीत बसल्याबरोबर टाइप करून पाठवलेली प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे होती - "एकेकाळी महाराष्ट्रात राजकीय पक्ष व सामाजिक संघटना कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आयोजन करत होत्या. पण ते प्रमाण कमी होत गेले. त्या दृष्टीने या प्रशिक्षण संस्थेचा पुढाकार महत्त्वाचा आहे. या कार्यशाळेने सामाजिक प्रश्न अर्थशास्त्राच्या चौकटीत मांडता येऊन विचार करण्याची गरज वाटू लागली, गरिबांचे प्रश्न सुटण्यासाठी बजेटच्या चौकटीतच विचार करावा लागेल, हे भान दिले. केवळ भावनेने बोलण्यापेक्षा बजेटच्या भाषेत मागण्या मांडल्या पाहिजे हे भान आले, ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे. जागतिक बँक, उदारीकरण याबाबतचे पूर्वग्रह तपासून बघण्याची गरज वाटते आहे. आदिवासी विभाग व समाजकल्याण विभागाचे अर्थसंकल्प या समजेतून तपासावे असेही आता वाटते आहे."
कार्यशाळेचे तीनही दिवस डॉ. सुरेश गोरे व विनोद शिरसाठ (ग. प्र. प्रधान संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आणि निमंत्रक) पूर्णवेळ उपस्थित होते. उद्घाटनाच्या व समारोपाच्या सत्रात त्या दोघांनी प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करताना, या कार्यशाळेच्या आयोजनामागची भूमिका सांगितली. या कार्यशाळेतील सर्व चर्चासत्रांचे संचलन करणे, प्रत्येक वक्त्याच्या आधी आणि नंतर गरजेनुसार निवेदन, प्रास्ताविक व सूचना करणे हे सर्व अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी केले. सुदाम सानप व जयदीप कर्णिक या दोघांनी कार्यशाळेच्या आधी आणि प्रत्यक्ष कार्यशाळेचे तीन दिवस सर्व कार्यवाही व्यवस्थित होईल याची काळजी घेतली. साधनाचे सहकारी गोपाल नेवे यांनी त्या तीन दिवसांतील जेवण, चहा-पाणी व अन्य सुविधांची जबाबदारी चोख पार पाडली. निकिता सातपुते, सेजल मायने व साधनाच्या अन्य सहकाऱ्यांनी रजिस्ट्रेशन व अन्य तांत्रिक बाबींची पूर्तता केली. या कार्यशाळेत फक्त 35 लोक सहभागी झाले असे दिसत असले तरी, या संपूर्ण कार्यशाळेचे व्हिडिओ चित्रीकरण झालेले असल्याने, सर्व व्हिडिओ यू-ट्यूबवर उपलब्ध केले आहेत. आणि त्यातील निवडक सत्रांचे शब्दांकन व संपादन करून साधना साप्ताहिकाचा हा संपूर्ण अंक काढला आहे. त्यामुळे, या कार्यशाळेचा कमी-अधिक लाभ काही हजार लोकांना होतो आहे, पुढेही होणार आहे.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या