डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आणखी एक गंमत सांगायची राहिली. मुंबईहून पाहिले तर, ध्रुवतारा क्षितिजाच्या वर, उत्तरेस साधारण 19 अंश उंचीवर दिसतो. पुण्याहून साधारण 18 अंशांवर. खोका तेवढ्याच कोनात तिरकाकरून, काही उपयोग होईल का? आपण जिथे राहतो. तेवढ्याच अक्षांशाचा कोन ध्रुवतारा क्षितिजरेषेशी करतो, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. शिवाय ध्रुवताऱ्याकडे रोखलेला आपला खोका पूर्व-पश्चिम दिशेने स्वतःभोवती फिरता ठेवता आला तर? उगवणे, मावळणे, आकाशातले ताऱ्यांचे भ्रमणमार्गसुद्धा पाहता, दाखवता येतील की... जुन्या ग्रामोफोनचा आजच्या सीडींच्या जमान्यात याहून चांगला उपयोग तो काय?

“मी पाहू कशाला नभाकडे?” घरातल्या माळ्यावर पडलेला जुना ग्रामोफोन, रंगकामाच्या निमित्ताने खाली उतरवला होता. मधुकाका आणि मी. दोघांनी बऱ्याच खटपटी करून तो चालू केला होता, तो वाजवून पाहायला हाती मिळाली ती ही तबकडी. पुन्हापुन्हा एकच गाणं, त्यातही, त्याच त्याच ओळी वाजत होत्या!

पण गाणं नीट वाजायला लागलं नि आईबाबा एकदम खुशीत आले. जुन्या आठवणी सांगू लागले. फिरकीच्या चावीच्या ग्रामोफोनच्या. त्या काळच्या जुन्या गायकांच्या. त्यांच्या खास लकबींच्या. तोपर्यंत गाणं संपत आलं. आईने अगदी लताच्या बरोबरीनं शेवटची ओळ गायली आणि नंतर ‘टॅs टॅs टॅs’ असा शेवटही! आम्ही सगळेच खो खो हसू लागलो. पण बाबा जरा गंभीरच. “याच गाण्यानं माझं डोकं फिरलंय, आणि मग... नसते उद्योग करतोय असा मागे तूच आरोप केला होतास... आठवतंय ना?” ...अर्थात हे सारे आईकडे पाहत. वाटलं, काही भलत्याच विषयाकडे जात चाललीय गाडी... मी मधुकाकाकडे नजर मारली तर तोही जरा बुचकळ्यात पडल्यासारखा. पण आईने पटकन टाळीच मारली, म्हणाली, “पण काय हो. आनंदाला कधी दाखवलं नाहीत त्यातलं काही? कुठे ठेवलं बरं ते?” एका कोपऱ्यात माळ्यावरून काढून ठेवलेली, झाकलेली अडगळ आई उसकू लागली. थोड्याच वेळात तिच्या हातात चार-पाच जाडसर ब्राऊनपेपरचे चौरस तुकडे होते. त्यांना ठिकठिकाणी लहानलहान भोके पाडलेली होती. पाहताक्षणी ते रांगोळीचे कागद असावेत असं मला वाटलं. बाजारात असे तयार रांगोळीचे कागद मिळतात, पण त्यातून निघणारी चित्रे यथातथाच असतात, त्यामुळे मी थोडा नाराजच होतो.

ते कागद आईच्या हातात बघितल्यावर, बाबा तडक उठले आणि एक चिकटपट्टी घेऊन आले. पाहता पाहता त्या चौरस कागदांमधून एक खोका आकार घेऊ लागला... मधुकाकाच्या कानात तेवढ्यात बाबा काहीतरी कुजबुजले. अन् तो त्याच्या खोलीत निघून गेला. आईही गेली स्वयंपाकघरात. मी आपला ग्रामोफोनशी एकटाच बावळटासारखा उभा. वाटले, मैफल संपली... पण तेवढ्यात मधुकाका बॅटरी घेऊन आला. मोठी, तीन सेलची... बॅटरीची वरची काचेची टोपी फिरवून त्याने काढून टाकली. मग बल्ब काढला फिरवून आणि खिशातून एक गोल आकाराचा बल्ब घेऊन तिथे बसवला. दोन बाजूंनी पुस्तकांचा आधार देऊन, ती बोडकी बॅटरी त्याने टेबलावर उभी ठेवली, पेटवून. बाबांच्या हातांत ते कागद जोडून तयार झालेला खोका होता. सर्व बाजूंनी मात्र तो बंद नव्हता. एका बाजूला एक कागद जोडलेलाच नव्हता बाबांनी. बाबांनी तो खोका अलगद त्या उभ्या केलेल्या बॅटरीवरून टेबलावर ठेवला. आतल्या बॅटरीच्या प्रकाशामुळे तो छानसा ‘कंदील’ दिसायला लागेल अशी माझी अपेक्षा मात्र फोल ठरली. ब्राऊनपेपर जाड असल्याने बॅटरीचा मंद प्रकाश कणभरही बाहेरून दिसत नव्हता. खोका पक्का चौरसांचा. ना रंग ना रूप; आणि भोकांमधूनही कसलेच डिझाईन दिसून येत नव्हते.

“अब आएगा मजा!” म्हणत मधुकाकाने घरातले दिवे घालवायला सुरुवात केली. मधुकाकाला उगाचच हिंदीत डायलॉग मारायची जुनी खोड आहे. आईनेही येतायेता स्वयंपाकघराचा दरवाजा लावून घेतला. अन् शेजारच्या खिडक्याही. काय चाललंय, मला कळेना दारावरच्या काचेच्या शटरवर तर मधुकाकाने एक चादर आणून झाकली. बाबांनी अखेर फॅन आणि ट्यूबही बंद केली. एकदमच गुडूप अंधार झाला. टेबलावरचा ‘कंदील’ सोडल्यास काहीच दिसेना.

बाबा म्हणाले, “क्षणभर डोळे मिटा... हं... आता उघडा.” पाहतो तो काय? आमच्या घराचे चक्क ‘नेहरू तारांगण’ बनले होते. चक्क आकाशच, त्यातल्या ताऱ्यांसकट घरात अवतरले होते. फक्त एक मात्र झाले  होते, ते म्हणजे, ध्रुवतारा चक्क माथ्यावर आणि सार्‍या बाराच्या बारा राशी. त्यातल्या नक्षत्रांसकट माझ्या सभोवार दिसत होत्या. चार भिंतींवर... 360 अंशात! तुम्हांला असे तारांगण करावेसे वाटत असेलच...

मग काय करा, शेजारी दिलेली सहा चित्रे नीट पाहा. याच तारकामंडलाची चित्रे आहेत ती. मीच नीट काढून ठेवली आहेत. ही चित्रे फक्त तुम्हाला थोड्या मोठ्या आकारात, प्रमाणात करून घ्यावी लागतील. 15 इंच*15 इंच एवढ्या आकाराचे चौरस कागद यासाठी वापरावेत. त्यावर गुणोत्तर प्रमाण पद्धतीने शेजारच्या आकृती काटेकोरपणे रेखाटाव्या. आकृतीतले लहानमोठे तारे कोणते ते ओळखून, लहानांसाठी करकटकाच्या किंवा सुईच्या टोकाने, तर मोठ्या ताऱ्यांसाठी उदबत्तीच्या जळत्या टोकाने भोके पाडावी. पण कागद जळून भोके फार मोठीही होता उपयोगाची नाहीत.

रेखाटनाची बाजू आतमध्ये येईल अशा प्रकारे, आणि एका चौरसाची ‘ए’ बाजू दुसऱ्या चौरसाच्या ‘ए’ बाजूला. ‘बी’ बाजू ‘बी’ला चिकटवून खोका बनवा. बॅटरीचा दिवा या खोक्याच्या बरोबर मध्यावर आला पाहिजे. बल्ब अगदी साधा, गोल हवा. निमुळता, पुढे टोकदार होणारा नेहमीच्या बॅटरीत असतो तसा नको. दिवाळीत दिव्यांच्या माळांमध्ये वापरतात तसला गोल बल्ब हवा. नेहमीच्या बल्बमधली प्रकाशणारी तारच नाहीतर ताऱ्यांच्या जागी दिसायला लागेल भिंतीवर. योग्य बल्ब मिळवण्यासाठी थोडे प्रयास घ्यावे लागतील कदाचित, पण हे बल्ब खूपच स्वस्त असतात, त्यामुळे शोधाशोध वाया न गेल्याचे समाधानही मिळते.

आणखी एक गंमत सांगायची राहिली. मुंबईहून पाहिले तर, ध्रुवतारा क्षितिजाच्या वर, उत्तरेस साधारण 19 अंश उंचीवर दिसतो. पुण्याहून साधारण 18 अंशांवर. खोका तेवढ्याच कोनात तिरकाकरून, काही उपयोग होईल का? आपण जिथे राहतो. तेवढ्याच अक्षांशाचा कोन ध्रुवतारा क्षितिजरेषेशी करतो, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. शिवाय ध्रुवताऱ्याकडे रोखलेला आपला खोका पूर्व-पश्चिम दिशेने स्वतःभोवती फिरता ठेवता आला तर? उगवणे, मावळणे, आकाशातले ताऱ्यांचे भ्रमणमार्गसुद्धा पाहता, दाखवता येतील की... जुन्या ग्रामोफोनचा आजच्या सीडींच्या जमान्यात याहून चांगला उपयोग तो काय? समजलं ना मी काय म्हणतो ते?

Tags: क्षितिजरेषा अक्षांश चौरस लता मंगेशकर डोंबिवली नेहरू तारांगण ध्रुव तारा पुणे मुंबई सीडी ग्रामोफोन Horizon Lata Mangeshkar Dombivali Pole Star Nehru Planetarium Pune Mumbai CD #Gramaphone weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके