माझा कुलगुरू म्हणून कार्यकाळ संपेल, तेव्हा मला फक्त इमारती किंवा पदव्यांची संख्या वाढलेली आहे हे पाहून समाधान मिळणार नाही. मला हे पाहायचे आहे की, ज्या कारागृहातील कैद्यांनी आमच्याकडे पदवी घेतली, ते जेव्हा बाहेर येतील तेव्हा समाजात त्यांनी मान ताठ करून नोकरी मिळवली आहे का? ज्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रवेश घेतला, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाची वागणूक मिळाली आहे का? माझे समाधान हे या मानवी बदलांमध्ये आहे. 'महा ज्ञानदीप 'सारख्या प्लॅटफॉर्मवरून जेव्हा एका दुर्गम भागातील विद्यार्थी कोडींग शिकेल किंवा डेटा सायन्सचा कोर्स करेल तेव्हा खऱ्या अर्थाने या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य 'ज्ञानगंगा घरोघरी' हे सत्यात उतरेल.
महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावर 'ज्ञानगंगा घरोघरी' हे ब्रीदवाक्य घेऊन उभे राहिलेले यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) आज खऱ्या अर्थाने 'लोकविद्यापीठ' (Mass Varsity) बनले आहे. 1 जुलै 1989 रोजी महाराष्ट्र विधानमंडळाच्या कायद्याद्वारे स्थापन झालेले हे विद्यापीठ आज केवळ एक संस्था राहिलेले नाही, तर ती महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेली एक ज्ञानगंगा आहे. आज हे विद्यापीठ देशातील पाचवे आणि महाराष्ट्रातील एकमेव मुक्त विद्यापीठ आहे. नाशिकच्या गोदाकाठी, गंगापूर धरणाच्या सानिध्यात 147 एकरच्या नयनरम्य 'ज्ञानगंगोत्री' परिसरात या विद्यापीठाची मुहूर्तमेढ रोवली गेली. औपचारिक शिक्षणाच्या चौकटीत न बसू शकणाऱ्या, वयोगटाची अट ओलांडलेल्या आणि दुर्गम भागातील शेवटच्या घटकांपर्यंत उच्च शिक्षण पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे विद्यापीठ गेल्या साडेतीन दशकांपासून अविरतपणे करत आहे.
आज या लोकविद्यापीठाचे नेतृत्व करत आहेत प्रा. संजीव अर्जुनराव सोनवणे. 23 मे 2023 रोजी त्यांनी कुलगुरुपदाची सूत्रे हाती घेतली. शिक्षणशास्त्र (Education), सर्वसमावेशक शिक्षण (Inclusive Education) आणि शारीरिक शिक्षण या क्षेत्रांतील तब्बल 36 वर्षांहून अधिक काळ लाभलेला प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्र-कुलगुरू, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता आणि शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी अत्यंत मोलाची आहे.
प्रा. सोनवणे हे केवळ प्रशासक नसून दूरदृष्टी असलेले संशोधक आहेत. त्यांचे 32 हून अधिक विद्यार्थी पीएच. डी. धारक असून, त्यांनी स्वतः अनेक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध आणि पुस्तके प्रकाशित केली आहेत. स्वीडन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि नॉर्वे यांसारख्या देशांतील विद्यापीठांशी त्यांचा शैक्षणिक देवाणघेवाणीचा सक्रिय संबंध राहिला आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना 'हेलन केलर पुरस्कार' आणि पुणे महानगरपालिकेचा 'आदर्श शिक्षक पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले आहे.
मुक्त विद्यापीठ हे केवळ पदव्या देणारे केंद्र नाही, तर ते 14 विद्याशाखांच्या (Schools) माध्यमातून कृषी विज्ञान, शिक्षणशास्त्र, संगणकशास्त्र, वाणिज्य आणि व्यवस्थापन अशा विविधांगी 138 विषयांत उपलब्ध शिक्षणक्रमात ज्ञानदान करत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांत पसरलेली 8 विभागीय केंद्रे आणि तब्बल 1684 अभ्यासकेंद्रे (Study Centres) यांच्या माध्यमांतून हे विद्यापीठ 'लास्ट माईल लर्नर 'पर्यंत म्हणजेच समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले आहे. गृहिणी असोत, शेतात राबणारे शेतकरी असोत किंवा नोकरी सांभाळून शिक्षण घेणारे कष्टकरी; या सर्वांसाठी वयाची आणि वेळेची अट शिथिल करून 'शिकायचे वय कधीच सरत नाही' हे या विद्यापीठाने सिद्ध केले आहे. चार लाख वीस हजारांच्या घरात विद्यार्थी संख्या आहे.
प्रा. संजीव सोनवणे यांच्याशी साधलेला हा संवाद केवळ एका विद्यापीठाच्या कामकाजापुरता मर्यादित नाही, तर तो 'मुक्त शिक्षण' (Open and Distance Learning) या संकल्पनेचा सखोल वेध घेणारा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (NEP 2020) च्या पार्श्वभूमीवर पारंपरिक शिक्षणाला मुक्त शिक्षणाची जोड कशी देता येईल? तंत्रज्ञानाच्या (ICT) साहाय्याने शिक्षणाचे लोकशाहीकरण कसे करता येईल? आणि जागतिक स्तरावर 'कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग' (कॅनडा) कडून दोनदा गौरविल्या गेलेल्या या विद्यापीठाची पुढची वाटचाल काय असेल ? या आणि अशा अनेक प्रश्नांवर कुलगुरूंनी आपली मते अत्यंत परखडपणे आणि आत्मीयतेने मांडली आहेत.
प्रश्न - मुक्त विद्यापीठासारख्या एका अवाढव्य संस्थेचे नेतृत्व आपण करत आहात, पण या प्रवासाची सुरुवात कुठेतरी एका छोट्या गावात किंवा शाळेत झाली असेल. 'संजीव सोनवणे' नावाचा तो लहान मुलगा, ज्याने शिक्षणाची पहिली पावले टाकली, तो काळ आणि पाहिलेली स्वप्ने आजच्या या पदाशी कशी जोडली गेली आहेत ?
- माझा हा प्रवास म्हणजे एका पिढीचा सामाजिक आणि शैक्षणिक प्रवास आहे. माझे मूळ गाव अहिल्यानगर जिल्ह्यातील टाकळी खादगाव. वडील ग्रामसेवक होते. त्यांची पोस्टिंग पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे होती. योगायोगाने वडिलांच्या कार्यालयाच्या खालीच शाळा भरायची. मी लहान असताना तिथे गोंधळ घालायचो, तेव्हा वडिलांनी मला 'शहाणे गुरुजीं'च्या वर्गात नेऊन बसवले. मी रडायचो, पण शहाणे गुरुजींनी माझ्या मनात शिक्षणाबद्दलची गोडी निर्माण केली. त्यांनी फळ्याच्या कोपऱ्यात गाईचे चित्र काढले आणि सांगितले, 'ही बघ तुझी गाय, हिच्याकडे लक्ष दे आणि मी काय शिकवतो ते ऐक.' विद्यार्थ्याच्या आवडीची शिक्षणाशी कशी सांगड घालायची, याचे ते पहिले धडे होते.
पुढचा प्रवास पारनेरचे न्यू इंग्लिश स्कूल, अहिल्यानगरचे रेसिडेन्शिअल हायस्कूल आणि न्यू आर्ट्स कॉमर्स अँन्ड सायन्स कॉलेज असा झाला. बी.एस्सी. (पदार्थविज्ञान) पूर्ण केल्यावर मी शिक्षक झालो. खरा वळणबिंदू पुण्याच्या चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयातील मुलाखतीच्या वेळी आला. माझ्या मनात भीती होती की, पुण्यासारख्या शहरात ओळखीशिवाय नोकरी कशी मिळणार ? पण वडिलांनी मला पन्नास रुपये दिले आणि बजावले, 'पैसे वाया गेले तरी चालतील, पण पुण्याचे लोक मुलाखत कशी घेतात ते पाहून ये.' मी तिथे निवडला गेलो आणि 1987 मध्ये महाराष्ट्रीय मंडळाच्या चंद्रशेखर आगाशे महाविद्यालयात अधिव्याख्याता पदावर रुजू झालो. महाराष्ट्रीय मंडळ या संस्थेत मला काम करण्याची संधी मिळाली व होतकरू वयातील खूप अनुभव माझे व्यक्तिमत्त्व घडण्यास कारणीभूत ठरले. वडिलांनी मला शहरातच राहून वाचन, व्याख्याने ऐकणे आणि पीएच. डी. पूर्ण करण्याचा सल्ला दिला; तोच सल्ला माझ्या जीवनाची 'शेती' ठरला. पुढे मुंबई विद्यापीठातून पीएच. डी. आणि पुणे विद्यापीठातील 18 वर्षांचा प्राध्यापकी आणि प्रशासकीय अनुभव मला या पदापर्यंत घेऊन आला. माझ्या बालपणीच्या त्या शाळेत मिळालेले शिक्षण आणि आजच्या मुक्त विद्यापीठाचे स्वरूप यात मला एक सुंदर साम्य दिसते. त्यात गुरुजींनी जसे माझ्या आवडीला शिक्षणाशी जोडले, तसेच आमचे विद्यापीठ आज ट्रान्सजेंडर, कारागृहातील बंदी, किंवा नोकरी करणारे तरुण यांच्या 'गरजेला' शिक्षणाशी जोडत आहे. माझ्या आयुष्यातील गरिबी आणि संघर्षाने मला हे शिकवले की, शिक्षणाची दारे जेव्हा सर्वांसाठी उघडी असतात, तेव्हाच समाजाचे खरे उत्थान होते. त्या लहान मुलाने पाहिलेली स्वप्ने आज चार लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करताना अधिक प्रगल्भ झाली आहेत.
प्रश्न - आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या पारंपरिक आणि प्रतिष्ठित चौकटीत प्रदीर्घ काळ काम केले आहे. आता आपण 'मुक्त' शिक्षणाचे नेतृत्व करत आहात. वैयक्तिक स्तरावर या दोन भिन्न जगात वावरताना तुमच्या विचारसरणीत कोणता बदल झाला ? हे स्थित्यंतर केवळ व्यावसायिक होते की मानसिकसुद्धा ?
- हा बदल व्यावसायिकपेक्षा अधिक मानसिक आणि वैचारिक होता. पुणे विद्यापीठात असतानाच माझा संपर्क डॉ. राम ताकवले सरांशी आला, जे दूरशिक्षणाचे भीष्मपितामह मानले जातात. त्यांच्यासोबत नॅकच्या एका प्रकल्पावर काम करताना माझी दूरशिक्षणाची वैचारिक बैठक तयार झाली. ताकवले सरांच्या सल्ल्यानुसार मी स्वतः मुक्त विद्यापीठातून 'एम.एस्सी. एज्युकेशनल कम्युनिकेशन' आणि 'एम.ए. डिस्टन्स एज्युकेशन' पूर्ण केले. त्यामुळे मुक्त विद्यापीठात कुलगुरू म्हणून येण्यापूर्वीच मी या व्यवस्थेचा 'विद्यार्थी' म्हणून भाग होतो. पारंपरिक विद्यापीठ हे शिस्त आणि चौकटीचे असते, तर मुक्त विद्यापीठ हे लवचीकता आणि पोहोच (Reach) यांवर भर देते. पुणे विद्यापीठात 'स्कूल ऑफ ओपन लर्निंग' सुरू करण्याचा अनुभव माझ्या पाठीशी होताच, त्यामुळे येथे आल्यावर कामाचा वेग वाढवणे मला सहज शक्य झाले.
प्रश्न - या विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नव्हे, तर शिक्षण व्यवस्थेचे अभ्यासक म्हणून मुक्त शिक्षणाकडे पाहण्याची तुमची दृष्टी कशी घडत गेली ?
- उच्च शिक्षणाकडे पाहताना मला नेहमी ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मरण होते. शिक्षणाचे लोकशाहीकरण म्हणजे केवळ संख्या वाढवणे नव्हे, तर शिक्षणाची दालने सर्वसामान्यांसाठी सताड उघडी करणे होय. मी पुणे विद्यापीठात अधिष्ठाता म्हणून काम करत होतो तेव्हा अनेक विद्यार्थी माझ्याकडे येत ज्यांना नोकरी सांभाळून शिक्षण घ्यायचे होते. पण पारंपरिक नियमांमुळे त्यांना प्रवेश नाकारला जात असे. त्या वेळी मला जाणवले की, आपली शिक्षण व्यवस्था वर्गातील उपस्थितीला जास्त महत्त्व देते आणि ज्ञानाला कमी. म्हणूनच मुक्त विद्यापीठात आल्यावर मी लवचीकता हा केंद्रबिंदू ठेवला. आजची शिक्षण व्यवस्था ही केवळ पदवी देणारी फॅक्टरी न राहता ती केवळ एक कौशल्य विकास केंद्र बनली पाहिजे. जो विद्यार्थी सायकल दुरुस्त करतो किंवा शेतात काम करतो, त्याच्याकडे असणाऱ्या अनुभवाच्या ज्ञानाला शैक्षणिक मूल्य प्राप्त करून देणे हेच आधुनिक मुक्त शिक्षणाचे खरे आव्हान आणि यश आहे.
प्रश्न - पण हे चित्र आव्हानात्मक आहे !
- आज आपल्या देशात उच्च शिक्षणाचे चित्र आव्हानात्मक आहे. स्वातंत्र्यावेळी केवळ 35 हजार विद्यार्थी उच्च शिक्षणात होते, आज ती संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. पण अजूनही एकूण नोंदणी प्रमाण (GER) 28 ते 32 टक्केच आहे. आपल्याला 5 कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे असेल, तर पारंपरिक विद्यापीठांच्या इमारती, ग्रंथालये आणि प्रयोगशाळा उभारण्यासाठी लागणारा पैसा आणि अध्यापक वर्ग आपल्याकडे नाही. म्हणूनच यूजीसीने दूरशिक्षण आणि ऑनलाइन पदवीला नियमित पदवीच्या समकक्ष मानले आहे. खर्च आणि व्याप्तीचा विचार करता, 50 टक्के GER चे उद्दिष्ट गाठण्यासाठी मुक्त आणि ऑनलाइन शिक्षणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय देशासमोर नाही. शिक्षण व्यवस्थेचे अभ्यासक म्हणून मला जाणवते की, 'मुक्त' शिक्षण म्हणजे केवळ अंतराचे शिक्षण नसून ते 'अथांग शक्यतांचे' शिक्षण आहे. ज्याप्रमाणे एखादी नदी प्रवाहातून बाहेर पडते, तेव्हा ती अनेक उपनद्यांना जन्म देते, तसे मुक्त शिक्षण हे पारंपरिक विद्यापीठाच्या मर्यादा ओलांडून समाजात पोहचते. तंत्रज्ञानाच्या युगात, माहितीचे केंद्रीकरण होण्यापेक्षा त्याचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे आणि मुक्त विद्यापीठे हेच काम प्रभावीपणे करत आहेत. ही दृष्टी मला केवळ पुस्तकी अभ्यासातून नाही, तर जगभरातील शिक्षणपद्धती पाहून आणि समाजाच्या शेवटच्या घटकांचे प्रश्न ऐकून मिळाली आहे.
प्रश्न - 'मुक्त शिक्षण' ही संकल्पना मुळात कोणत्या सामाजिक गरजेतून जन्माला आली आहे असे तुम्हाला वाटते ?
- शिक्षण ही देशाच्या विकासाची गुरुकिल्ली आहे, पण प्रत्येकाला एका विशिष्ट वयात आणि वेळेत ते घेता येत नाही. कोणाचे आर्थिक कारण असते, तर कोणाचे सामाजिक. मुक्त शिक्षण हे अशा लोकांसाठी 'दुसरे दालन उघडते. जेव्हा एखादी व्यक्ती प्रौढ होते, तेव्हा ती स्वयंप्रेरित (Self-motivated) असते. तिला शिक्षणाचे फायदे समजलेले असतात. अशा लोकांसाठी त्यांच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार शिकण्याची व्यवस्था म्हणजे मुक्त शिक्षण. ही एक अशी व्यवस्था आहे जी जागतिक स्तरावर यशस्वी ठरली आहे आणि भारतातील उच्च शिक्षणापासून वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ती अपरिहार्य आहे.
प्रश्न - मुक्त शिक्षण म्हणजे केवळ 'डिस्टन्स लर्निंग' की शिक्षणाबद्दलची एक वेगळी मूल्यदृष्टी? आपण कशा पद्धतीने याकडे पाहता ?
- माझ्या मते ही एक वेगळी 'मूल्यदृष्टी' आहे. मुक्त विद्यापीठात 80 टक्के विद्यार्थी असे आहेत जे काम करत शिकत आहेत. 10 टक्के विद्यार्थी 60 वर्षांच्या वरचे आहेत, जे निव्वळ आवडीपोटी शिकत आहेत. येथे रोज वर्गात जाण्याची, हजेरी देण्याची बंधने नाहीत. चौकटीबाहेरील शिक्षणाची ओढ असणाऱ्यांसाठी हा मोठा आधार आहे. केवळ पदवी देणे हा आमचा उद्देश नाही, तर 'आजीवन शिक्षण' (Lifelong Learning) ही वृत्ती रुजवणे हे आमचे मूल्य आहे.
प्रश्न - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची आजची सद्यःस्थिती आपण थोडक्यात पण प्रामाणिकपणे कशी मांडाल ?
- हे खऱ्या अर्थाने 'लोकांचे विद्यापीठ' झाले आहे. 'ज्ञानगंगा घरोघरी' हे ब्रीदवाक्य आम्ही सार्थ ठरवले आहे. आज 7,200 बंधीजन तुरुंगात बसून आमची पुस्तके वाचत आहेत, नक्षलवादी भागातील 10 हजार तरुण पोलीस ठाण्याच्या आवारात बसून पदवी घेत आहेत. जवान, गृहिणी, ट्रान्सजेंडर आणि ड्रायव्हर्स- हे सर्व जण पदवीधर होतात, तेव्हा या संस्थेचे यश दिसते. महात्मा फुले यांनी पाहिलेले 'शिक्षणाचे लोकशाहीकरण व सार्वत्रीकरण' प्रत्यक्षात आणण्याचे काम या विद्यापीठाने केले आहे. नॅकची 'ए' ग्रेड आणि समाजातील प्रत्येक स्तरावरील स्वीकारार्हता, ही आमची आजची स्थिती आहे.
प्रश्न - विद्यापीठाची प्रशासकीय आणि आर्थिक परिस्थिती कशी आहे? आपण स्व-अर्थसाहाय्यावर (Self-finance) असूनही इतके मोठे कार्य कसे सांभाळता ?
- विद्यापीठाचे प्रशासन तंत्रज्ञानावर आधारित आहे. आम्ही महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ आहोत ज्यांनी 'ऑन स्क्रीन' मूल्यमापन सुरू केले. आर्थिक बाबतीत आम्ही पूर्णपणे स्वयंपूर्ण आहोत. शिपायापासून कुलगुरूंपर्यंतचे पगार आम्ही विद्यार्थ्यांचे शुल्क आणि आमच्या गंगाजळीवरील व्याजातून देतो. आमचे वार्षिक बजेट 720 कोटी रुपयांचे आहे. आम्ही खर्चात कपात करण्याचे अनेक प्रयोग केले; जसे की 560 किलोवॅटची सोलर सिस्टिम बसवून वीज बिल जवळ जवळ शून्य केले. सर्व गाड्यांवर जीपीएस बसवून इंधन खर्च कमी केला. शासन अनुदान देत नसूनही हे विद्यापीठ महाराष्ट्रातील एक यशस्वी स्वयंपोषित आर्थिक मॉडेल आहे.
प्रश्न - विद्यापीठाने 'एकीकृत यश कार्ड' (Integrated Yash Card) ही संकल्पना आणली आहे. 4.20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या कार्डद्वारे कोणत्या सुविधा एकाच ठिकाणी मिळणार आहेत ?
- 'यश कार्ड' हे विद्यार्थ्यांसाठी एक डिजिटल ओळखपत्र तर आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन ते एक शैक्षणिक 'कवच' आहे. यामध्ये आय-कार्ड, बोनाफाईड सर्टिफिकेट, हॉल तिकीट आणि मार्कशीट यांसारख्या 17 महत्त्वाच्या शैक्षणिक सुविधांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, दीक्षांत समारंभ संपल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत विद्यार्थ्याला त्याच्या मोबाईलवर पदवीची सॉफ्ट कॉपी मिळते. आमच्याकडे आज 35 लाख माजी विद्यार्थ्यांचा डेटा उपलब्ध असून, या कार्डाद्वारे तो अधिकृतपणे जोडला जात आहे.
प्रश्न - कुलगुरू म्हणून प्रशासकीय जबाबदाऱ्या अधिक असतात. बैठका, फाईल्स, नियोजन या सगळ्या गराड्यात तुमच्यातील शिक्षक किंवा विद्यार्थी हरवला आहे असे वाटते का ?
- अजिबात नाही. मी सातत्याने संवाद साधत असतो. विद्यापीठात मी स्वतः रिसर्च मेथोडोलॉजीची व्याख्याने देतो. आय.सी.एस.एस.आर. च्या रुपये 2.9 कोटींच्या संशोधन प्रकल्पाचा मुख्य संशोधक म्हणून
काम करतो. दर आठवड्याला होणाऱ्या सेमिनार आणि कार्यशाळांमध्ये मी सक्रिय सहभागी होतो. प्रशासक म्हणून काम करताना माझ्यातला 'शिक्षक' मला अधिक चांगल्या प्रकारे निर्णय घेण्यास मदत करतो.
प्रश्न - 'मुक्त' या शब्दाचा अर्थ केवळ प्रवेश खुला असणे इतकाच मर्यादित आहे का ?
- नाही, प्रवेश हा केवळ एक भाग झाला. खरी 'ओपननेस' ही आर्थिकदृष्ट्या परवडणारे आणि गुणवत्तेच्या हमीत आहे. पहिलीला 100 मुले असतील तर पदवीपर्यंत केवळ 10-15 पोहोचतात; उरलेले 80 टक्के कुठे जातात ? त्यांच्यासाठी प्रवेश सुलभ करणे, फी कमी ठेवणे (आम्ही ट्रान्सजेंडर आणि अनाथांना 10 रुपयांत प्रवेश देतो) आणि त्यांना त्यांच्या सोयीने शिकू देणे, ही खरी 'मुक्त' संस्कृती आहे.
प्रश्न - डिजिटल तंत्रज्ञानामुळे मुक्त शिक्षणाला नवसंजीवनी मिळाली की नव्या अडचणी वाढल्या ? ऑनलाईनमुळे डिजिटल दरी (Digital Divide) वाढते आहे का ?
- तंत्रज्ञानामुळे आम्हाला नवसंजीवनीच मिळाली आहे. डिजिटल तंत्रज्ञान ही आता मूलभूत गरज आहे. आम्ही 'ब्लॉकचेन' तंत्रज्ञानाचा वापर करून बोगस पदव्यांना आळा घातला आहे. 'इंटिग्रेटेड यश कार्ड' दिले. दरी कमी करण्यासाठी आम्ही दुर्गम भागांत अभ्यास केंद्रांचे जाळे विणले आहे. समाज ज्या लहरींवर आरूढ आहे, त्याच लहरींवर (डिजिटल) शिक्षण नेल्याशिवाय ते परिणामकारक होणार नाही.
प्रश्न - आज मागे वळून पाहताना, मुक्त शिक्षणाने तुमच्या शिक्षणाविषयीच्या मूलभूत समजुतींना आव्हान दिले का ?
- आव्हान हे दोन स्तरांवर असते विद्यार्थ्याला शिक्षणाशी जोडणे आणि त्याने काय शिकले याची तपासणी करणे. मुक्त शिक्षणात आमचे 'स्वयं अध्ययन साहित्य' (Self-learning Material) हाच आमचा आत्मा आहे. शिक्षक समोर नसताना पुस्तकाने विद्यार्थ्याला खिळवून ठेवणे, हे मोठे आव्हान असते. आमचे साहित्य इतके दर्जेदार आहे की, स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थीही ते संदर्भ म्हणून वापरतात. हे शिक्षण 'स्वयंअध्ययन' (Heutagogy) म्हणजेच स्वयंनिर्धारित शिक्षणावर आधारित आहे, जिथे विद्यार्थी स्वतःची ध्येये
स्वतः ठरवतो.
प्रश्न - मुक्त शिक्षणाबद्दल अजूनही 'दुय्यम दर्जाचे शिक्षण' असा ठपका आहे. तो पूर्णपणे अन्यायकारक आहे की काही अंशी वास्तववादी ?
- हा निव्वळ गैरसमज आहे. आज कोणत्याही मोठ्या नोकरीसाठी किंवा पदव्युत्तर प्रवेशासाठी 'सीईटी' द्यावी लागते. आमचे विद्यार्थी तिथे बसतात आणि यशस्वी होतात. आयएएस अधिकारी, नेट-सेट उत्तीर्ण विद्यार्थी आणि परदेशात स्थायिक झालेले माजी विद्यार्थी आमची गुणवत्ता सिद्ध करतात. जेव्हा नोकरीसाठीची निवड व उच्च शिक्षण प्रवेशाच्या परीक्षा आणि पात्रता निकष सर्वांना समान आहेत, मुक्तचे विद्यार्थी हे निकष पार करतात, तेव्हा दर्जाचा प्रश्न उरत नाही.
प्रश्न - प्रवेश सुलभ झाला, पण शिकण्यात टिकाव (Retention) ठेवणे ही आज मुक्त शिक्षणासमोरील मोठी अडचण नाही का? 20-22 टक्के विद्यार्थी परीक्षेला बसत नाहीत, याची कारणे काय ?
- हो, हे मोठे आव्हान आहे. गळतीचे मुख्य कारण कौटुंबिक आणि वैयक्तिक अडचणी हे आहे. कोरोनानंतर सर्वच विद्यापीठांची विद्यार्थी संख्या घटली आहे. दुसरे म्हणजे, यूजीसीने वाय.सी.एम.ओ.यु.चे 'पूर्वतयारी अभ्यासक्रम' (Preparatory course) बंद केल्यामुळे बारावी नापास असलेले अडीच लाख विद्यार्थी कमी झाले. आम्ही शासनाला हा कोर्स पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
प्रश्न - ही गळती रोखण्यासाठी विद्यापीठाने कोणत्या प्रकारची 'प्रतिसाद यंत्रणा' (Feedback Mechanism) उभारली आहे ?
- विद्यार्थ्याने प्रवेश घेतला पण तो परीक्षेला बसला नाही, तर त्यामागची कारणे शोधणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही आता थेट विद्यार्थ्यांशी फोनद्वारे संपर्क साधण्याची आणि त्यांना एसएमएस पाठवण्याची पद्धत सुरू केली आहे. सन 2022 ते 25 या काळात जे विद्यार्थी परीक्षेला बसले नव्हते, अशांपैकी 25 हजार विद्यार्थी आमच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा मुख्य प्रवाहात परतले आहेत. अभ्यास केंद्रांच्या समन्वयकांशी आम्ही दर दोन महिन्यांनी ऑनलाइन चर्चा करून विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यावर भर देत आहोत.
प्रश्न- राज्यात अनेक ठिकाणी अभ्यास केंद्रे ही 'खाजगी दुकानांप्रमाणे' चालवली जातात असे दिसते. गुणवत्तेची ही गळती रोखण्यासाठी आपल्याकडे कोणती यंत्रणा आहे ?
- आम्ही अत्यंत कडक पावले उचलली आहेत. आमच्या निकषांवर न उतरणारी 50 केंद्रे आम्ही बंद केली, ज्यामुळे 40 हजार प्रवेश कमी झाले, पण आम्ही गुणवत्तेशी तडजोड केली नाही. आता आम्ही प्रत्येक विद्यापीठ प्रशालेला 'व्हर्चुअल क्लासरूम' आणि स्टुडिओची सुविधा दिली आहे, जेणेकरून थेट मुख्यालयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल.
प्रश्न - ग्रामीण परीक्षा केंद्रांवर होणारी सामूहिक कॉपी किंवा 'तडजोडी' हा चिंतेचा विषय आहे. यावर आपण काय उपाययोजना करत आहात ?
- आम्ही प्रश्नपत्रिकांचे स्वरूपच बदलले आहे; आता 50 टक्के प्रश्न 'उपयोजित' (Applied) स्तरावर असतात, ज्याची उत्तरे पुस्तकात जशीच्या तशी मिळत नाहीत. संवेदनशील केंद्रांवर सीसीटीव्ही आणि बैठे पथक नेमले आहे. काही केंद्रांनी सीसीटीव्हीला विरोध केल्यावर आम्ही ती केंद्रेच बंद केली. आम्ही ए.आय. (AI) आधारित सीसीटीव्ही मॉनिटरिंग में 2026 परीक्षेत अवलंबली आहे.
प्रश्न - परंपरागत आणि मुक्त शिक्षण यांच्यात काही ठिकाणी सुप्त संघर्ष जाणवतो. काही विद्यापीठांच्या सिनेटमध्ये मुक्त विद्यापीठाची केंद्रे बंद करण्याबाबत चर्चा झाली. हा संघर्ष शैक्षणिक गुणवत्तेचा आहे की सत्ता आणि संसाधनांचा ?
- हा संघर्ष प्रामुख्याने 'असुरक्षिततेतून' आला आहे. खाजगी आणि विनाअनुदानित महाविद्यालयांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे, म्हणून त्यांना वाटते की 'मुक्त'मुळे आमचे विद्यार्थी कमी होत आहेत. पण आमचा विद्यार्थी हा वेगळा आहे. तो नोकरी करणारा आहे, गृहिणी आहे. मुळात आता पारंपरिक विद्यापीठेच दूरशिक्षण आणि ऑनलाइन कोर्सेस सुरू करत आहेत. जर हा संघर्ष गुणवत्तेचा असता, तर त्यांनी हे मॉडेल का स्वीकारले असते ? आजची पिढी व्यवहारी आहे; जिथे परवडणारे आणि दर्जेदार शिक्षण मिळेल, तिथे ती जाणारच.
प्रश्न - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी (NEP 2020) तुमचे मत काय आहे? ते मुक्त शिक्षणाला कशी मदत करेल ?
- हे धोरण देशासाठी मोठी भेट आहे. यात 'मल्टिडिसिप्लिनरी' दृष्टीकोन आहे. भविष्यात 'डिझाईन डिग्री' येईल, जिथे विद्यार्थी स्वतःचे विषय स्वतः निवडेल. काही विषय पारंपरिक कॉलेजमध्ये, तर काही मुक्त विद्यापीठात. य.च.म.मु.वि. 'आर.पी.एल.' (Recognition of Prior Learning) धोरण आणले आहे, ज्यामध्ये अनुभवातून कौशल्य मिळवलेल्यांना (उदा. पैठणी विणकर किंवा मेकॅनिक) अधिकृत प्रमाणपत्र मूल्यमापनानंतर दिले जाईल.
प्रश्न - आपण आता अशा युगात आहोत जिथे 'गिग इकॉनॉमी' (Gig Economy) वेगाने विस्तारते आहे. करिअरमध्ये 'स्किल शिफ्ट्स' आणि 'ब्रेक्स' आता सामान्य झाले आहेत. विशेषतः महाराष्ट्रात येणाऱ्या 'वाढवण बंदर' (Vadhvan Port) सारख्या महाकाय प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर, उद्योगांना लागणारे मनुष्यबळ आणि मुक्त शिक्षणाची लवचीकता यांची सांगड आपण कशी घालत आहात ?
- 'गिग इकॉनॉमी' म्हणजे केवळ अर्धवेळ काम नव्हे, तर ती कौशल्यांवर आधारित एक नवी आर्थिक व्यवस्था आहे. या व्यवस्थेत एखादी व्यक्ती आयुष्यभर एकाच नोकरीत राहील, ही धारणा आता मोडीत निघाली आहे. म्हणूनच, उच्च शिक्षणाची भूमिका आता केवळ 'पदवी देणे' इतकी मर्यादित न राहता, सतत 'रि-स्किलिंग' (Re-skilling) आणि 'अप-स्किलिंग' (Up-skilling) करणारी यंत्रणा झाली आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात बोलायचे झाले तर, वाढवण बंदर (Vadhvan Port) हा केवळ एक प्रकल्प नसून ते जागतिक व्यापाराचे नवे प्रवेशद्वार ठरणार आहे. अशा महाकाय बंदरासाठी केवळ इंजिनिअर्स लागत नाहीत, तर तिथे लॉजिस्टिक तज्ज्ञ, व्यवस्थापन कुशल मनुष्यबळ आणि तांत्रिक साहाय्यकांची मोठी फौज लागणार आहे. आम्ही या संधीचा वेध घेऊन उद्योगांना हवे असलेले मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी काही धाडसी पावले उचलली आहेत. वाढवण बंदराची गरज ओळखून आम्ही बी.बी.ए. पोर्ट मॅनेजमेंट हा विशेष अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) आणि संबंधित यंत्रणांशी करार करून, बंदराच्या प्रत्यक्ष कामकाजासाठी लागणारे मनुष्यबळ विद्यापीठ तयार करत आहे. हा अभ्यासक्रम 'हायब्रीड मोड'मध्ये असेल, जेणेकरून विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभवातून शिकतील. आम्ही उद्योगांशी चर्चा केली आणि त्यांच्या लक्षात आले की, पदवीधरांकडे तांत्रिक ज्ञान असले तरी 'व्यावसायिक कौशल्ये' कमी पडतात. हे अंतर भरून काढण्यासाठी विद्यापीठ 'करिअर तयारी व प्रशिक्षण केंद्र' संकल्पना राबवत आहोत, जिथे 10 दिवसांच्या सखोल उद्योगतज्ज्ञांच्या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्याला उद्योगांसाठी तयार केले जाते. गिग इकॉनॉमीचा मोठा हिस्सा डिजिटल क्षेत्राशी संबंधित आहे. त्यासाठी आम्ही 'बी.एस्सी. डाटा सायन्स' आणि 'ए. आय. प्रॉम्ट' सारखे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. जे विद्यार्थी इतर क्षेत्रात काम करत आहेत पण त्यांना तंत्रज्ञानाकडे वळायचे आहे, त्यांच्यासाठी हे अभ्यासक्रम मोठे वरदान ठरत आहेत. पालघर आणि डहाणू पट्ट्यातील स्थानिक तरुणांना वाढवण प्रकल्पात सन्मानाने रोजगार मिळावा, यासाठी आम्ही तेथील महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाची विशेष कौशल्य केंद्रे विकसित करत आहोत. पोलिसांसाठी 'सायबर क्राईम इन्वेस्टीगेशन' कोर्स सुरू केला आहे.
प्रश्न - कुणीही स्वतःहून 'मला रेग्युलर कॉलेजला न जाता मुक्त विद्यापीठात शिकायचे आहे' अशी पहिली पसंती (First Choice) देताना दिसत नाही. हे चित्र कधी बदलेल ?
- आमचे गुणवत्तेचे निकष वेगळे आहेत. ज्या वाड्या-तांड्यावर बस जात नाही, तिथल्या वंचितांना शिक्षण देणे हीच आमची गुणवत्ता आणि 'फर्स्ट चॉईस' आहे. तरीही, लवचीकता आणि तंत्रज्ञानामुळे आता अनेक तरुण जाणीवपूर्वक हा पर्याय निवडत आहेत. आगामी काळात आम्ही प्रत्येक जिल्ह्यात 'मुक्त महाविद्यालय' (Open College) सुरू करणार आहोत. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या धोरणानुसार आता एकाच वेळी नियमित पदवीबरोबर अधिक एक दुसरी पदवी करता येते. त्यामुळे या दुसऱ्या पदवीसाठी मुक्त विद्यापीठास पसंती मिळत आहे.
प्रश्न - 'मुक्त महाविद्यालय' (Open College) ही संकल्पना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे तुमचे नियोजन काय आहे?
- आम्हाला प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी दोन एकर जागेत एक अद्ययावत 'मुक्त महाविद्यालय' उभे करायचे आहे. दहा जिल्ह्यांमध्ये आम्हाला जागा मिळाली असून, तिथे सुसज्ज ग्रंथालय, संगणक प्रयोगशाळा आणि वाचन कक्ष असतील. विशेषतः स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र मोठे वरदान ठरेल. आमचा पुढचा प्रवास 'ऑन डिमांड एक्झाम' (On Demand Exam) असा असेल, जिथे विद्यार्थी त्यांच्या सोयीनुसार केंद्रावर येऊन ऑनलाइन परीक्षा देऊ शकतील.
प्रश्न - कुलगुरू पदाचा कार्यकाळ पूर्ण होईल तेव्हा विद्यापीठाच्या कार्यसंस्कृतीत कोणता बदल पाहून तुम्हाला सार्थक वाटेल ?
- माझा कुलगुरू म्हणून कार्यकाळ संपेल, तेव्हा मला फक्त इमारती किंवा पदव्यांची संख्या वाढलेली आहे हे पाहून समाधान मिळणार नाही. मला हे पाहायचे आहे की, ज्या कारागृहातील कैद्यांनी आमच्याकडे पदवी घेतली, ते जेव्हा बाहेर येतील तेव्हा समाजात त्यांनी मान ताठ करून नोकरी मिळवली आहे का? ज्या ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी आमच्याकडे प्रवेश घेतला, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाची वागणूक मिळाली आहे का ? माझे समाधान हे या मानवी बदलांमध्ये आहे. 'महा ज्ञानदीप'सारख्या प्लॅटफॉर्मवरून जेव्हा एका दुर्गम भागातील विद्यार्थी कोडींग शिकेल किंवा डेटा सायन्सचा कोर्स करेल तेव्हा खऱ्या अर्थाने या विद्यापीठाचे ब्रीदवाक्य 'ज्ञानगंगा घरोघरी' हे सत्यात उतरेल. 'दिव्यांग भवन' उभे राहील. तंत्रज्ञान आणि माणुसकी यांचा मेळ घालून, येणाऱ्या काळात आपण महाराष्ट्राला एक असे 'शिक्षण मॉडेल' देऊ, जिथे शिक्षणाचे वय नसते, सीमा नसतात आणि प्रवेशाचे अडथळेही नसतात. हीच माझी या विद्यापीठासाठीची खरी कमाई असेल.
संवादक : सुनील पाटील
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
Shriniwas Bhong- 12 Jul 2026
वाढवण बंदराविषयी यापूर्वी साधनेच्या अंकात लेख आला आहे का?असल्यास कोणत्या?
save