डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मुंबईतील के.सी. कॉलेजचा इतिहास विभाग आणि सेवाग्राम कलेक्टिव्ह यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘इज गांधी पॉसिबल?’ (गांधी शक्य आहेत का?) या दोन दिवसीय परिषदेतून ३० व ३१ ऑगस्ट 2019 रोजी महात्मा गांधीजींच्या अनेक अलक्षित पैलूंवर चर्चा करण्यात आली. ‘गांधी १५०’ निमित्त वर्षभरापासून आयोजित होत असलेल्या परिषदा, चर्चासत्रे यांमध्ये ‘गांधी शक्य आहेत का?’ ही बहुरूपी गांधींच्या व्यक्तिमत्वातील दुर्लिक्षित पैलूंचा, विचारांचा वेध घेणारी परिषद वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती विषयांमुळे आणि वक्त्यांमुळे. या परिषदेचे आयोजन करून गांधीजींची १५०वी जयंती खऱ्या अर्थाने साजरी केल्याबद्दल निमंत्रक डॉ.श्याम पाखरे आणि के.सी. कॉलेजचे गांधी अभ्यासकांनी आभार मानायला हवेत.

महात्मा गांधी यांच्या जयंतीला १५० वर्षे होत असल्यामुळे देशभर विविध कार्यक्रम, परिषदांची रेलचेल पाहायला मिळत आहे. गांधीजींविषयी जुजबी माहिती नाही, असा मनुष्य या देशात औषधालाही सापडणार नाही. त्यामुळे गांधीजींविषयीच्या अशा कार्यक्रमांची संख्या प्रचंड असली, तरी अनेकदा सर्वश्रुत आणि लोकप्रिय माहितीचाच पुनरुच्चार करण्यात बऱ्याच कार्यक्रमांचा वेळ खर्ची पडतो. त्यामुळे या ‘अशा परिषदांची फलनिष्पत्ती काय?’ असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

गांधीच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू असले, तरी बऱ्याचदा त्यातील अनेक अज्ञात आणि अलक्षित पैलूंकडे लक्ष देता यावे यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमधून ते साध्य होईलच याची शाश्वती नसते. मात्र या भाऊगर्दीतही काही कार्यक्रम व परिषदा अनेक कारणांमुळे वेगळ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. त्यात सहभागी होणाऱ्या मंडळींनाही गांधीजींविषयी नवीनच काही तरी हाती लागल्याचा आनंद होत असतो. ‘युरेका, युरेका’ म्हणतच ही मंडळी परिषदेतून बाहेर पडतात. ‘गांधी १५०’ निमित्ताने आयोजित केलेल्या अशाच दोन दिवसीय परिषदेला उपस्थित राहण्याची संधी आणि गांधीबाबाच्या व्यक्तिमत्त्वातील बहुविध पैलूंना समजावून घेण्याची संधी मिळाली.

निमित्त होते ३० आणि ३१ ऑगस्ट  २०१९ रोजी मुंबईमधील प्रसिद्ध के.सी. कॉलेजच्या इतिहास विभागाने आणि सेवाग्राम कलेक्टिव्ह यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘इज गांधी पॉसिबल?’ (गांधी शक्य आहेत का?) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे. ‘द हैदराबाद (सिंध) नॅशनल कॉलिजिएट बोर्ड’ या 1921 मध्ये स्थापन झालेल्या संस्थेद्वारे फाळणीनंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात जवळपास अनेक शैक्षणिक संस्था उभारण्यात आल्या; आजच्या घडीला त्यांची संख्या २१ आहे. प्रसिद्ध समाजसेवक शेठ किशीनचंद चेल्लाराम (के.सी.) यांच्या देणगीतून उभे राहिलेले महाविद्यालय म्हणजे चर्चगेट येथील के.सी. कॉलेज.

या महाविद्यालयाच्या ‘सुंदरी आणि रमा वाटुमूल’ सभागृहात ‘इज गांधी पॉसिबल?’ या विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. चारशे ते पाचशे लोक सहजपणे मावतील असे ते भव्य दुमजली सभागृह होते. उद्‌घाटन सत्राच्या आधीपासूनच सर्व जण (यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या साहजिकच अधिक होती) सभागृहात उपस्थित होते. परिषदेच्या उद्‌घाटनासाठी तिबेटी निर्वासित सरकारचे माजी पंतप्रधान समधोंग रिंगपोचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक आशिष नंदी हे मुख्य वक्ते होते. त्यांच्यासोबत सेवाग्राम कलेक्टिव्हचे डॉ.सुगन बरंठ, संस्थेचे पदाधिकारी आणि महाविद्यालयाच्या प्रा.डॉ. हेमलता बागला उपस्थित होत्या.

डॉ.बागला यांनी या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, ‘‘देशात शांतता प्रस्थापित करावयाची असेल, तर विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकांच्याच नव्हे तर अशा परिषदांच्या माध्यमातून ज्ञान मिळायला हवे.’’

सहभाग झालेल्यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्याच ‘टेक-सॅव्ही’ भाषेत समजावून सांगत संस्थेचे ट्रस्टी अनिल हरीश यांनी गांधींचे आयुष्य आणि कर्तृत्व सोशल मीडियातील उदाहरणाद्वारे समजावून दिले. ते म्हणाले, ‘‘ज्याप्रमाणे आपण ख्रिस्तपूर्व काळ म्हणतो, तसे गांधी यांच्या काळाला आपण इंटरनेटपूर्व म्हणू. त्या काळात गांधीजींचे फेसबुक पेज असण्याचा प्रश्नच नव्हता, मात्र संपूर्ण विश्वच जणू त्यांचे फॉलोवर्स होते. त्यावर फेक अकाउंट्‌स नव्हते आणि कोट्यवधी लाइक्स होते, जे आजतागायत वाढतच आहेत.’’ साहजिकच या वाक्यावर तरुण विद्यार्थ्यांच्या टाळ्या पडल्या. 

प्रमुख पाहुणे समधोंग रिंगपोचे यांनी मार्टिन ल्युथर किंगचे वाक्य उद्‌धृत करत इशारा दिला, ‘‘सध्या आपल्यासमोर अहिंसा की अस्तित्वाचा नाश हे (nonviolence and non-existence) हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.’’ पुढे ते म्हणाले की ‘गांधी शक्य आहेत का?’ याऐवजी ‘गांधीना असे शक्य करून दाखवू’ यावर चर्चा करणे आवश्यक आहे. सर्वांचीच उत्सुकता लागून राहिली होती ती मुख्य वक्ते आशिष नंदी यांना ऐकण्याची. वृद्धापकाळाकडे झुकलेले नंदी यांनी बसूनच बोलणे पसंत केले आणि माईक समोर आल्यावर चांगले पाऊण तास बोलले. भाषणात सुसूत्रता नसली आणि बोलताना अनेकदा संदर्भ विसरत असले, तरी नंदी यांचे भाषण दर वेळीप्रमाणेच ‘चमचमीत’ झाले.

गांधींविषयी तीन दृष्टिकोन त्यांनी आपल्या भाषणात मांडले. गांधींच्या उद्याच्या पूर्वीच रवींद्रनाथांनी आपल्या साहित्यातून गांधींसारख्या महापुरुषाचा राजकीय पटलावर उदय होईल, याचे भाकीत केल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी ‘रवींद्र साहित्याचे’ दाखले त्यांनी दिले. रवीन्द्रनाथांचे राष्ट्रवादाविषयीचे मत सांगतानाच त्यांनी राष्ट्रवाद आणि देशभक्ती यांच्यामधील फरक व अंतर समजावून सांगितले. परस्परांचा आदर, सहसंबंध आणि सामाईक गोष्टींचा सततचा शोध हीच भारतीय संस्कृती असल्याचे सांगत, भारतावर घोंगावनाऱ्या ‘मर्दानी राष्ट्रवादाचे’ धोके त्यांनी आपल्या भाषणातून पटवून दिले. महाराष्ट्रात बोलत असल्यामुळे सावरकरांचा उल्लेख करत असल्याचे त्यांनी सांगितले आणि सावरकरांच्या विचारधारेवर जहरी टीका केली.

नंदींच्या भाषणात साहित्याचे अनेक दाखले आले होते. तत्कालीन राजकीय विचारधारा, त्यामुळे तयार झालेली परिस्थिती यांवर त्यांनी दिलखुलास भाष्य केले होते. त्यातच पुढच्या सत्राचा विषय आणि पाहुणे पाहता, हे सत्रही ‘पोलिटिकली चार्ज्ड’ राहणार होते. ‘खरी भारतीय संस्कृती पुन्हा रुळावर आणण्यासाठी’ हा पहिल्या सत्राचा विषय होता. त्यात सहभागी झालेले अशोक वाजपेयी, मल्लिका साराभाई, प्रा. अपूर्वानंद आणि गणेश देवी हे आपल्या राजकीय-सामाजिक भूमिका व जाणिवांसाठी प्रसिद्ध असणारी मंडळी होती.

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक अशोक वाजपेयी यांनी भारतीय संस्कृतीत विरोधी  विचारांचा आदर करण्याच्या परंपरेचा उल्लेख केला. राजकीय व सामाजिक पटलावर खोटारडेपणाला जागा मिळाली असून तिथे सत्याची स्थापना करायला हवी, असे आवाहन त्यांनी केले. सामाजिक सौहार्द हा गांधींच्या आयुष्यातील अविभाज्य घटक होता, त्यासाठीच ते लढले आणि प्राणार्पण केले याची आठवण त्यांनी या वेळी करून दिली. उपस्थितांनी पहिल्यांदाच इतकी सुंदर आणि अस्खलित हिंदी ऐकली असावी. सभागृहात ‘हिंग्लिश’ बोलणाऱ्यांची संख्या अधिक असूनही वाजपेयी यांच्या खुमासदार भाषणाला उत्तम प्रतिसाद मिळाला.

प्रसिद्ध नृत्यांगना आणि समाजसेविका मल्लिका साराभाई पुढच्या वक्त्या होत्या. देशात हिंदीचा अवाजवी आग्रह धरला जातोय, मी मात्र जाणीवपूर्वक इंग्रजीतच बोलेन- असे म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. देशात धर्मांधता प्रचंड वाढली असून विरोधी विचार व्यक्त करणाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याचा नवा ट्रेंड आला आहे, काहींचे खूनही केले जात आहेत, असे त्या म्हणाल्या. ‘अमानवीय शक्तींना निर्भयपणे तोंड देण्याची शिकवण गांधींनी आपल्या अनुयायांना आयुष्यभर दिली. आपण स्वतःला त्यांचे अनुयायी म्हणत असू, तर या धर्मांध शक्तींचा मुकाबला निर्भयपणे केला पाहिजे.’ असे आवाहन करताना मल्लिका साराभाई कमालीच्या भावुक झाल्या होत्या.

दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि सामाजिक कार्यकर्ते अपूर्वानंद यांनी तत्कालीन राजकीय परिस्थितीवर आसूड ओढले. देशातील मुस्लिम समाजातील चलबिचल त्यांनी उदाहरणांद्वारे समजावून सांगितली. जम्मू-काश्मीर व आसाममधील परिस्थिती पाहून इथे तुमच्यासमोर सुखासीनपणे बोलायला लाज वाटत असल्याचे दु:ख त्यांनी बोलून दाखवले. काश्मीरविषयी समाजात अतिशय टोकाची आणि एकतर्फी मते पाहायला मिळत असल्यामुळे कुणी तरी उठून घोषणाबाजी सुरू करेल की काय, अशी धास्ती त्यांचे भाषण संपेपर्यंत लागून राहिली होती. सभागृहात उपस्थितांमध्ये बहुसंख्य तरुण असूनही अपूर्वानंद यांना दिलेला सकारात्मक प्रतिसाद आश्चर्यचकित करणाराच होता.

सगळ्यात शेवटी बोलले ते ज्येष्ठ भाषातज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवी. सुरुवातीपासूनच त्यांनी आपला हजरजबाबीपणा आणि व्यंग्यात्मक शैलीने उपस्थितांच्या मनावर ताबा मिळवला. मात्र भाषणाच्या शेवटी काही अस्वस्थ करणारे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. भाषणाचा शेवट करत ते म्हणाले, ‘‘जगभर हिटलरी प्रवृत्तींचा नाच सुरू असताना गांधीजी काय पडद्यामागे शांत बसून राहिले असते काय? जर आज हिटलर उदयास येऊ शकत असतील, तर गांधींचा व त्यांच्या विचारांचा उदय अशक्य कसा असेल? आज गांधी नक्कीच शक्य आहेत!’’

उपस्थितांकडून आलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन सत्राचा शेवट झाला. त्याला उपस्थितांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. ‘जनसामन्यांसाठी विज्ञान’ हे पहिल्या दिवसातील शेवटचे सत्र अनेक कारणांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले. गांधींच्या काही अलक्षित पैलूंचा या सत्रात आढावा घेण्यात आला. विज्ञान आणि समाज यांचा ताळमेळ साधत लोकोपयोगी विज्ञानाचे द्वार खुले करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या काही गणमान्य व्यक्ती, शास्त्रज्ञ या सत्रासाठी वक्ते म्हणून उपस्थित होते. सर्वांत आधी भाषण झाले ते डॉ. पी. आर. रवींद्र यांचे. विज्ञान आणि समाज यांवर त्यांनी विपुल लेखन केले आहे. गांधीजींचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विज्ञानविषयक त्यांची मते आजवर दुर्लक्षितच राहिली, त्यामुळे गांधीजी विज्ञान व तंत्रज्ञानविरोधी होते- अशीच त्यांची प्रतिमा तयार झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गांधीजींविषयीचा हा गैरसमज दूर करणारे अनेक दाखले त्यांनी दिले. प्रत्येक उदाहरणागणिक उपस्थित आश्चर्यचकित झाल्यावाचून राहत नव्हते. लोकांनी शास्त्रज्ञ म्हणून माझी आठवण काढली तर ती मला सर्वांत जास्त आवडेल, असे गांधी म्हणाल्याचे त्यांनी या वेळी नोंदवले.

ते पुढे म्हणाले, ‘‘हुजेज नावाचा अंतराळवीर एकदा बनारस येथे आला होता. गांधीजी त्यांना जाऊन भेटले. आपल्या ‘नई तालीम’ या शिक्षण पद्धतीसाठी सोप्या भाषेत विज्ञानविषयक पुस्तके तयार करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन गांधीजींनी त्यांना केले होते. गांधी इतक्यावरच थांबले नाहीत. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात त्यांनी विज्ञानावर हुजेज यांची दोन भाषणे ठेवली. ‘‘आज कुठला राजकीय पक्ष शास्त्रज्ञाला मंचावर बोलावेल का?’’ असा सवालही रवींद्र यांनी केला.

गांधीजींनी स्थापन केलेल्या ‘ऑल इंडिया व्हिलेज इंडस्ट्रीज असोसिएशन’विषयीही पहिल्यांदाच सखोल माहिती मिळाली, ती रवींद्रांच्या भाषणामुळे. ‘तंत्रज्ञानाचा उपयोग गाव-खेड्यातील जनतेसाठी करता यावा याकरता ही संस्था स्थापन झाली होती. पी.सी रे, सी. व्ही. रमन, जगदीशचंद्र बोस यांसारख्या जगद्‌विख्यात शास्त्रज्ञांना या संस्थेच्या कामात गांधीजींनी सहभागी करून घेतले होते.’ रवींद्र यांनी गांधींची उलगडवून दाखवलेली विज्ञाननिष्ठा प्रत्येकासाठी नवीच होती.

जमनालाल बजाज पुरस्कारविजेते व फलटण येथील निंबकर शेतीविषयक संशोधन संस्थेचे प्रमुख डॉ.अनिल राजवंशी यांनी प्रेझेंटेशनद्वारे ‘गांधीजी आणि तंत्रज्ञान’ यावर आपले विचार मांडले. गांधीजी आयुष्यभर संशोधक म्हणूनच राहिले, त्यातूनच त्यांनी चरख्यासारखे यंत्र लोकप्रिय केले आणि त्याला स्वावलंबनाचे साधन बनवले, असे ते या वेळी म्हणाले. गांधीजींनी दाखविलेल्या मार्गानेच जात आमची संस्था जगाच्या नकाशावर पोहोचली, गांधीजींच्या चरख्यापासून प्रेरणा घेत आम्ही तयार केलेले लॅन्टर्न (कंदिल) व स्टोव्ह यांना एकत्र करत लँटोव्हची निर्मिती केली आणि खेड्यापाड्यांपर्यंत उजेड पोहोचवल्याचे त्यांनी अभिमानाने नमूद केले.

डॉ.हेमलता बागला यांनी थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन याचे वाक्य उद्‌धृत करत ‘असा हाडा- मांसाचा माणूस पृथ्वीतलावर अस्तित्वात होता, यावर पुढच्या पिढ्यांचा विेशास बसणार नाही’ हे गांधींविषयीचे गौरवोद्गार काढले. गांधींनी आपल्या आत्मकथेचे नावच ‘माझे सत्याचे प्रयोग’ ठेवले होते; म्हणजेच आयुष्यभर प्रयोग करणारे ते एक शास्त्रज्ञच होते, असे त्या म्हणाल्या.

छत्तीसगडच्या कृषी आणि रोजगार मंत्रालयात सल्लागार असलेले डॉ. प्रदीप शर्मा म्हणाले, ‘‘गांधींचे विज्ञान म्हणजे छोट्या खेड्यात राबणाऱ्या शेतकऱ्याचे विज्ञान होते. आदिवासी जीवन आणि त्यांचे निसर्गाशी असलेले नाते उलगडून दाखवणारे ते विज्ञान होते. ६० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या रायपूरच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाला आजवर भाताच्या केवळ १२ ते १३ जाती तयार करता आल्या. मात्र छत्तीसगडमधील आदिवासींना भाताच्या जवळपास ३२,५०० जातींची माहिती होती, त्यापैकी तेवीस हजार जातींची नोंद झाली आहे. ‘खेड्यांकडे चला’ म्हणजे खेड्यातील लोकांकडे, आदिवासींकडे असलेल्या या पारंपरिक ज्ञानाचा फायदा करून घ्या, असे गांधींना सुचवायचे होते.’’ डॉ.शर्मा यांनी या वेळी आदिवासींच्या पारंपरिक ज्ञानाची दिलेली आणखी काही उदाहरणे ऐकून उपस्थित अवाक्‌ झाले नसतील, तर नवलच.

पुण्यातील आयसर या संस्थेचे माजी प्राध्यापक आणि शास्त्रज्ञ डॉ.मिलिंद वाटवे यांनी तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे जगभर उभ्या राहिलेल्या समस्यांचा आढावा घेत सत्राचा शेवट केला. ‘‘गांधी आपल्या चुका मान्य करत आणि त्यातून शिकत असत. एखाद्या  शास्त्रज्ञाला साजेसे असे अनेक पैलू गांधींच्या व्यक्तिमत्त्वात होते. आजच्या संशोधकांमध्ये हे गुण अभावानेच आढळतात. ते खऱ्या अर्थाने शास्त्रज्ञ होते.’’ असे वाटवे भाषणाच्या शेवटी म्हणाले.

यानंतर उपस्थितांनी पाहुण्यांना अनेक प्रश्न विचारत शंका-समाधान करून घेतले. दिवस मावळला तरी उपस्थितांमध्ये गांधींविषयी असलेला उत्साह आणि उत्सुकता मावळली नव्हती. दिवसाचा शेवट झाला तो गांधीजींच्या आश्रमात गायल्या जाणाऱ्या श्रवणीय भजनांनी. त्यासोबतच रवींद्रनाथांच्या कविता, सूफी संगीत आणि ख्रिश्चन संगीताने सभागृह भक्तिसंगीताने भरून गेले होते. आर्थिक प्रश्नांबाबत सर्वसामान्यांमध्ये कमालीची अनास्था आणि अज्ञान असल्याचे चित्र पाहायला मिळते. कदाचित म्हणूनच की काय, दुसऱ्या दिवशीच्या पहिल्याच सत्राचा विषय होता- ‘आर्थिक विकास आणि समृद्धी’ आणि त्यासाठी तब्बल तीन तास राखीव ठेवण्यात आले होते. या विषयाची सखोल माहिती असणारे प्राध्यापक, विचारवंत, क्रियाशील कार्यकर्ते व अर्थतज्ज्ञ या सत्रात बोलणार असल्यामुळे तीन तासही कमी पडतील की काय, अशी शंका वाटत होती.

सत्र बरोबर दहा वाजता सुरू झाले. आजही सभागृह उपस्थितांनी भरून गेले होते. सर्वप्रथम बोलल्या टाटा समाज विज्ञान संस्था (TISS) येथे प्राध्यापक असलेल्या डॉ.विभूती पटेल. ‘‘भोगवाद (hedonism) आणि उपभोक्तावाद यांच्यामुळे सामाजिक विषमतेची दरी आणखी वाढायला लागली आहे. अर्थव्यवस्था ही जनसामान्यांच्या लुटीचे माध्यम बनली आहे. केवळ गांधीवादाच्या आधारेच या संकटाचा मुकाबला करता येणे शक्य आहे. विकेंद्रीकरण आणि स्त्रीपुरुष समानता यांचा पुरस्कार करणाऱ्या आर्थिक योजनांचा गांधीजींनी नेहमीच आग्रह धरला होता.’’ असे म्हणत त्यांनी गांधीजींचे अर्थशास्त्र समजावून सांगण्याचा प्रयत्न या वेळी केला.

सामाजिक आणि आर्थिक समानतेचा मुद्दा पुढे घेऊन जात ग्राम-स्वराज संकल्पनेचे खंदे पुरस्कर्ते मोहन हिराभाई हिरालाल यांनी विनोबांच्या भूदान चळवळीची या वेळी आठवण करून दिली. गांधीजींची ग्राम-स्वराज संकल्पना समजावून सांगत त्यांनी गडचिरोलीतील मेंढालेखा या गावात यशस्वीपणे राबविलेल्या ‘दिल्लीत आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार’ या प्रयोगाची माहिती दिली. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे सहसचिव असलेले, मात्र ‘गांधी मला भेटला’ ही कविता प्रकाशित करून चर्चेत आलेले देविदास तुळजापूरकर यांनी आपल्या भाषणात बँकिंग क्षेत्रातील राष्ट्रीयीकरणपूर्व, राष्ट्रीयीकरणोत्तर आणि नवे आर्थिक धोरण अशा तीन युगांचा उल्लेख केला. ‘‘सर्वसामन्यांच्या जीवनात बँकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सध्याचे बँकिंग धोरण अधिकाधिक गांधीवादी म्हणजेच लोककल्याणकारी आणि पारदर्शी व्हायला हवे’’ असे ते या वेळी म्हणाले.

‘‘देशाचे स्वातंत्र्य गांधीजींचे अंतिम ध्येय नव्हते तर राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याचे ते एक साधन होते.’’ असे म्हणत ज्येष्ठ कृषी-अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. जागतिकीकरणामुळे आर्थिक स्वातंत्र्यावर गदा येत असल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. ‘‘शेतीच्या अशोशत पद्धती आणि सदोष आर्थिक धोरणांमुळे खेड्यापाड्यात राहणाऱ्या जनतेचा आर्थिक विकास होऊ शकला नाही. औद्योगिकीकरण करताना समतोल न राखला गेल्यामुळे ओल्या-सुक्या दुष्काळाचे दुष्टचक्र सुरू झाले आहे. स्मार्ट सिटीजपेक्षा स्मार्ट खेड्यांची आज जास्त गरज आहे.’’ असे डॉ. खांदेवाले भाषणाच्या शेवटी म्हणाले.

‘आर्थिक विकास आणि समृद्धी’ या सत्राचा शेवट झाला तो चेन्नईस्थित सी.के. प्रल्हाद संस्थेचे अध्यक्ष असलेल्या डॉ. झेवियर राज यांच्या भाषणाने. ‘‘जनतेचे रूपांतर अज्ञानी ग्राहकांमध्ये होऊ लागल्याने विधायक अर्थव्यवस्थादेखील विध्वंसक होऊ लागली आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शोशत आणि संतुलित विकासासाठी  Gandhi -I  म्हणजेच गांधी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची खरी गरज आहे.’’ असे म्हणत गांधी विचार आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालण्याचा प्रयत्न डॉ.झेवियर यांनी आपल्या भाषणातून केला.

तब्बल तीन तास चाललेल्या या चर्चासत्रानंतरही उपस्थितांचा उत्साह कमी झाला नव्हता. त्यांनी वक्त्यांना शेवटी अनेक प्रश्नही विचारले. ‘गांधी शक्य आहेत का?’ असा विषय असलेल्या या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप झाला तो ‘रामराज्य, शासनव्यवस्था आणि नागरी समाज’ या सध्या महत्त्वाच्या ठरलेल्या विषयाने. ज्येष्ठ राजकीय विचारवंत, ब्रिटनचे माजी खासदार व पद्मभूषणने सन्मानित भिकू पारेख  या सत्राचे अध्यक्ष होते. त्यांच्यासमवेत मध्य प्रदेशाचे माजी सचिव, ज्येष्ठ विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ शरद्‌चंद्र बेहर, ज्येष्ठ गांधी-अभ्यासक आणि पॉप्युलर प्रकाशनाचे प्रमुख डॉ.रामदास भटकळ, गांधी पीस फाउंडेशनचे डॉ.एम.पी. मथाई आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील डॉ.अभिनय चंद्रचूड आदी मान्यवर या शेवटच्या सत्रासाठी वक्ते म्हणून उपस्थित होते.

लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससारख्या जगप्रसिद्ध संस्थेत एके काळी राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणारे प्रा. भिकू पारेख यांनी राष्ट्रवाद, शासनव्यवस्था (nation-state), रामराज्य आणि नागरी समाज यांविषयी बोलताना गांधीजींना या संकल्पना कशा अभिप्रेत होत्या, हे उपस्थितांना समजावून सांगितले. ते म्हणाले, ‘‘गांधीजी शासनव्यवस्थेच्या (nation-state) विरोधात असले तरी राष्ट्रवादाचे समर्थक होते. त्यामुळे सामाजिक बंधुभाव आणि सामूहिक जबाबदारी वाढीस लागते, असे त्यांचे मत होते. पण गांधीजींचा राष्ट्रवाद अधिक खुला, नैतिक, आत्मचिकित्सक आणि विनयशील होता.’’ रामराज्य या संकल्पनेवर भाष्य करत पारेख शेवटी म्हणाले, ‘‘गांधीजींना अपेक्षित असणारे रामराज्य हे काही धर्मावर आधारलेले नव्हते. सत्यावर आधारलेले राज्य असा त्याचा मथितार्थ होता. लोकांनी अधिकाधिक स्वावलंबी होत आपले व्यवहार आपल्या ताब्यात घ्यावेत, ही गांधीजींच्या ‘हिंदस्वराज’ची कल्पना होती.’’

‘सुप्रीम व्हिस्पर्स’सारख्या पुस्तकांद्वारे भारतीय न्यायव्यवस्थेचे अंतरंग अतिशय प्रभावीपणे उलगडून दाखवणारे डॉ.अभिनव चंद्रचूड यांनी आपल्या भाषणातून भारतीय न्यायव्यवस्थेतील सुधारणांची गरज अनेक रंजक उदाहरणांद्वारे पटवून दिली. ‘‘भारतीय न्यायव्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख आणि स्वतंत्र करायची असेल, तर सध्या अस्तित्वात असणाऱ्या अनेक वसाहतवादी कायद्यांमध्ये सुधारणा आवश्यक आहे.’’ असे सांगत डॉ.चंद्रचूड यांनी आपल्या भाषणाचा शेवट केला.

ज्येष्ठ विचारवंत आणि प्रकाशक डॉ.रामदास भटकळ यांनी सुशासनासाठी नागरी समाजाची आवश्यकता उपस्थितांना पटवून दिली. ‘‘गांधीजींचा लोकांच्या सदसद्‌विवेकावर विश्वास होता, त्यामुळे ते बहुसंख्याकवादी कधीच नव्हते. व्यक्तीच्या आणि समूहाच्या स्वावलंबनाचा त्यांनी आयुष्यभर पुरस्कार केला. सदसद्‌विवेकावर आधारलेल्या गांधीजींच्या शासनव्यवस्थेच्या संकल्पनेपासून आज आपण फारकत घेतली आहे.’’ याची आठवण डॉ.भटकळ यांनी आपल्या भाषणातून करून दिली.

गांधींच्या आदर्शांपासून आपण इतके दूर आलो आहोत की, ही तत्त्वे आज आपल्याला स्वप्नवत्‌ आणि अशक्यप्राय वाटू लागली आहेत, अशी खंत गांधी पीस फाउंडेशनचे डॉ.एम.पी.मथाई आपल्या भाषणातून व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘नागरी समाज हा शासनव्यवस्थेवर अंकुश ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे. मात्र हा नागरी समाज आज आपली जबाबदारी उचलण्यास तयार नाही.’’ राजकीय पक्षांविषयी भाष्य करताना ते शेवटी म्हणाले, ‘‘राजकीय पक्षांना आपल्या आदर्शांचा विसर पडल्यामुळे त्यांच्यातील अंतर कमी होत असून त्यांच्यामध्ये आता फरकच करता येत नाही.’’

परिषदेचा शेवट ज्येष्ठ विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ शरद्‌चंद्र बेहर यांच्या भाषणाने झाला. गांधीजींच्या रामराज्याविषयी सत्राच्या सुरुवातीला भिकू पारेख यांनी मांडलेल्या विचारांना पुढे घेऊन जात बेहर म्हणाले, ‘‘रामराज्य म्हणजे गांधीजींना अपेक्षित असलेला नैतिकतेवर आधारलेल्या संस्कृतीचे प्रारूप होय.’’ भाषणाच्या शेवटी उपस्थितांना आवाहन करत बेहर म्हणाले, ‘‘वैविध्याने नटलेला समाज हे भारताचे वैशिष्ट्य टिकवून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, गांधीजींनी दाखवलेला मार्गच आपणासाठी मार्गदर्शक ठरणार आहे.’’

मुंबईतील के.सी. कॉलेजचा इतिहास विभाग आणि सेवाग्राम कलेक्टिव्ह यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘इज गांधी पॉसिबल?’ (गांधी शक्य आहेत का?) या दोन दिवसीय परिषदेतून महात्मा गांधीजींच्या अनेक अलक्षित पैलूंवर चर्चा करण्यात आली. ‘गांधी १५०’ निमित्त वर्षभरापासून आयोजित होत असलेल्या परिषदा, चर्चासत्रे यांमध्ये ‘गांधी शक्य आहेत का?’ ही बहुरूपी गांधींच्या व्यक्तिमत्वातील दुर्लिक्षित पैलूंचा, विचारांचा वेध घेणारी परिषद वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती विषयांमुळे आणि वक्त्यांमुळे. या परिषदेचे आयोजन करून गांधीजींची १५० वी जयंती खऱ्या अर्थाने साजरी केल्याबद्दल निमंत्रक डॉ. श्याम पाखरे आणि के. सी. कॉलेजचे गांधी अभ्यासकांनी आभार मानायला हवेत.

Tags: गांधी जयंती. महात्मा गांधी श्याम पाखरे भिकू पारेख अभिनय चंद्रचूड एम पी मथाई रामदास भटकळ शरद्चंद्र बेहर झेवियर राज श्रीनिवास खांदेवाले मोहन हिराभाई हिरालाल विभूती पटेल टाटा समाज विज्ञान संस्था मिलिंद वाटवे प्रदीप शर्मा गांधी आणि तंत्रज्ञान अनिल राजवंशी डॉ पी आर रवींद्र गणेश देवी अपूर्वानंद मल्लिका साराभाई अशोक वाजपेयी हेमलता बागला सुगन बरंठ आशिष नंदी समधोंग रिंगपोचे सेवाग्राम कलेक्टिव्ह के.सी. कॉलेज गांधी १५० परिषद इज गांधी पॉसिबल समीर शेख महात्मा गांधी शक्य आहेत का वृत्तांत Birth anniversary Mahatma Gandhi Abhinay Chandrachud TISS Ramdas Bhatkal Bhiku Parekh Gandhi and Technology Ganesh Devi Ashish Nandi Sevagram Collective K C College Gandhi 150 Conference Sameer Shaikh Is Gandhi Possible Vrutant weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

समीर शेख
sameershaikh7989@gmail.com


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके